Skip to main content

विरही वराहाची गोष्ट

हॅलो प्र, माझ्या सोनुल्या छकुल्या,

आईला पटतंच नाही की मला मोठ्ठी लेखिका व्हायचंय. हसते ती मला! जीवघेणी थट्टा करते माझ्या या हळव्या स्वप्नांची. उन्मळून पडतील माझ्या आकांक्षा अशाने! माझ्यातली उगवू पाहणारी लेखिका अशानेच करपून जाईल! भावकळी कोमेजेल माझी. पण जाऊ दे!!! तुला सांगते आज लिहिलेली गोष्ट ... विरही वराहाची गोष्ट.

तर ... एक ना वराह असतो. सुंदर, गोड, गुलाबी. देखणं! राजबिंडं!! (तुझ्यासारखं ... इश्श!) तर त्याचं ना एक मयुरपंखी स्वप्न असतं. स्वप्नपण कसं हळूवार, जसं पीस फिरावं गंधाळलेल्या मनावरून. आणि व्हाव्यात हजारो संवेदना जाग्या... तरल... भावुक! त्याची स्वप्नदेवता असते एक लावण्यवती, मखमली राजकन्या. तिचं नाव असतं "गुलबक्षी". नावाप्रमाणेच गुलाबी. दरवळणाऱ्या स्वप्नांची मालकीण. भुईपर्यंत पोहोचलेल्या गंधाळू केशसंभाराची, लांबसडक, शामसुंदर पापण्यांची, आणि त्या आभाळाला कवेत घेण्यासाठी खास देवांच्या सम्राटानं दिलेल्या मऊमुलायम गुलाबी, गुलाबी चांदण्यांच्या पंखांची. (ए राजा, मी पण अशीच वाटते का तुला?) तर तो वराह पाहतो तुला एकदा!!! स्वर्गातल्या एका कमलपुष्पांनी बहरलेल्या मृदगंधी तलावात ती स्नान करत असते. बघताक्षणी वराह स्वप्नमुग्ध होतो. त्याचं देहभाग हरपतं. प्रेमात पडतो तो. (तुझ्यामाझ्यासारखंच.) त्या स्वर्गसुंदरीला तो विसरूच शकत नाही. पण ती स्वप्नराज्ञी आणि हा साधा गरीब वराह!!! देवाचा तरी काय हा अघोरी खेळ? तरीही मोठ्या धिटाईनं तो तिला आपल्या कोमल, हळव्या, अलवार, पवित्र भावना सांगायचं ठरवतो. पण सांगणार तरी कशा? एका राजहंसाला तो दूत म्हणून पाठवायचं ठरवतो. लिहितो एक पत्र आपल्या सिंदूरी रक्तानं. (वाव! तू लिहिशील का असं माझ्यासाठी?) राजहंस आपले शुभ्रदुधी पंख पसरून आभाळात झेप घेतो. वराह विरहाने हळवा हळवा झालेला!

वाट बघत राहतो फक्त. दिवस जातात... महिने जातात... वर्षही जातात!!! (आई गं, बिच्चारा! कसं होत असेल रे त्याचं? मला तर तुझ्याशिवाय आत्ताच करमत नाहीये.) विरही वेदनेत पोळून निघालेला पण प्रेमासारख्या दैवी शक्तीने स्पर्श झालेला वराह देवाची आराधना करतो. आणि एक दिवस राजहंस निरोप घेऊन येतो... मोरपंखावर दवबिंदूने लिहिलेलं मखमली पत्र. त्याच्या स्वप्नराज्ञीने लिहिलेलं ... स्वहस्ताने. पण हाय! तिने सांगितलेलं असतं, मला गुलाबी रंगाचं झेंडूचं फूल आणून दे! काय ही मागणी!!! कुठे मिळणार असं फूल. पण तिच्या गुलाबी, गुलाबी रंगाला आणि त्याच्या गुलाबी स्वप्नाला शोभणारच ते! ती तोपर्यंत त्याला भेटणारच नसते. मीलन होणारच नाही का? त्याच्या प्रीतीचा वसंत फुलणारच नाही का? विरही वराहाची ही वेदना नेत्रांमधून लवणदव बनून बाहेर पडते. बरसू लागतात चमकणारे मोती. विरही वराह तडपत राहतो. (आई गं, मला आता नाही लिहवत यापुढे! रडायला येतंय.)

तुला आवडली ना माझी गोष्ट! आईला काही या स्वप्नाळू आकांक्षांची किंमत नाहीच कळणार. माझ्या लेखनाच्या कोवळ्या अंकुराला तूच खतपाणी घाल रे राजा!

तुझ्या विरहात वेडी झालेली,

वीणा, माझ्या प्र.

ॲमी Sat, 21/02/2015 - 11:28

अर्रे संपला नाही का प्रेमोत्सव अजून?
गुलाबी डुक्कराबद्दल लिहीणार्या वीणाताई म्हंजे उसंत सखू??

उसंत सखू Sat, 21/02/2015 - 12:27

In reply to by ॲमी

माझ्या गुलाबुंना लोळायला साधासा चिखल चालतो. प्रेमाचा चिखल तुडवत बसणारी डुकरे गोग्गोड दिसत असली तरी मी त्यांना डीसओन केले आहे.कारणकी और भी चिखल है जमानेमे मुहब्बतके सिवा ;;)

नाकी नऊ Sat, 21/02/2015 - 12:59

कमलपुष्पांनी बहरलेल्या मृदगंधी तलावात

कमलपुष्पांनी बहरलेला तलाव मृद्गंधी? सारी कमळे बिनवासाची होती काय? की कागदी? :p

त्याचं देहभाग हरपतं.

अर्रर्रर्र!! हरपलेलं भाग फार महत्त्वाचं नव्हतं ना, तै? नाही, पुढे मधुर मीलनात अडचणी नकोत. ;)

गब्बर सिंग Sat, 21/02/2015 - 13:14

In reply to by नाकी नऊ

पुढे मधुर मीलनात अडचणी नकोत.

चुकुन "अडवाणी" वाचलं. नुकतंच त्यांना कमलश्री (आयमीन पद्मश्री) मिळालंय ना ...

मनीषा Mon, 23/02/2015 - 20:40

वीणा तै , आता पुढच्या वर्षी हा ...
व्हॅलेंटाईनचे विसर्जन झालं की नाही ? आता पुरे
सगळं आत्ताच संपवलं तर पुढच्या वर्षाला काय ?

अजो१२३ Tue, 24/02/2015 - 11:36

छान लेखन.
====================
इथे तुम्हाला लेखनापासून परावृत्त करणार्‍या बजरंग दली प्रतिक्रियांना भीक घालू नकात.