Skip to main content

बेबंद हुकुमशाहीचा हायड्रोजन बॉम्ब

पूर्व आशिया खंडातला एक देश. सर्व जगापासून फारकत घेतलेला. देशांतर्गत घडामोडींबद्दल सहसा काहीच थांगपत्ता लागू न देणारा. सतत आपल्या भोवती एक गूढ अगम्य असे वलय घेऊन वावरणारा असा हा देश. उत्तर कोरिया म्हणजेच DPRK(Democratic People’s Republic of Korea) त्यांच्या भाषेत. नावात डेमोक्रेटिक असले तरी डेमोक्रसी इथे औषधालाही नाही. देशाच्या निर्मितीपासूनच इथे एकछत्री हुकुमशाही अंमल आहे. गेले अनेक दिवस दिवसेंदिवस अधिक आक्रमक आणि युद्धखोर बनत चाललेल्या या देशाबद्दल बरेच काही ऐकायला, वाचायला मिळत होते. पण परवा त्यांनी हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी करून जगाला जो हादरा दिला त्यामुळे त्याच्याबाबतची चर्चा अजुनच वाढली आहे. आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी उत्तर कोरिया या जगाला पुन्हा एकदा भीषण युद्धाच्या खाईत लोटेल की काय अशी भीती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जात आहे.

सध्या बेबंद हुकुमशहा किम जोंग उन याच्या राजवटीखाली असलेला उत्तर कोरिया हा दक्षिण कोरियाचा शेजारी देश. पण दोन्ही देशांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. एकीकडे द. कोरिया सर्वच क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करत आशिया खंडातील सर्वांत प्रगत देशांपैकी एक बनण्याच्या वाटेवर आहे तर उ. कोरिया मात्र सर्वच जवळजवळ बाबतीत पिछाडीवर आहे.

१९५० ते १९५३ मध्ये झालेल्या कोरियन युद्धाची परिणीती हे दोन देश निर्माण होण्यात झाली(उत्तर कोरियामध्ये दक्षिण कोरियाला केवळ दक्षिण भाग याच नावाने संबोधले जाते. कारण त्यांच्या मते तो अजूनही कोरियाचाच एक हिस्सा आहे). पण उत्तर कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत देशात हुकुमशाही राजवट कायम ठेवली. मुळच्या लेनिनवादी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारसरणीची सरमिसळ आणि मोडतोड करून त्यांनी स्वत:ची जुचे(Juche) विचारसरणी अंमलात आणायला सुरुवात केली. कोरियन भाषेत ‘जुचे’ म्हणजे स्वावलंबन. उत्तर कोरियन लोक हे स्वत:च आपल्या देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार आहेत अशा विचारसरणीचा हा सिद्धांत होता. सुंग यांनी हीच विचारसरणी दामटत तब्बल ४० वर्षे सत्ता गाजवली.

step1

तेव्हापासून आतापर्यंत या देशात हुकुमशाहीच नांदते आहे. किम इल संग यांचे पुत्र किम जोंग इल आणि आता नातू किम जोंग उन अशी ही तिसरी पिढी सध्या सत्तेत आहे. २०१२ मध्ये पित्याच्या मृत्युनंतर सत्तेवर आलेला आणि वरवर पाहता एखाद्या लाडावलेल्या ठोंब्यासारखा दिसणारा सध्याचा ३३ वर्षीय अध्यक्ष किम जोंग उन हा प्रचंड सत्तापिपासू आणि दुष्ट आहे. आपल्या काकांना कैद करून त्यांच्यावर भुकेली कुत्री सोडून त्यांचा काटा त्याने काढला असे म्हटले जाते. असा हा हुकुमशहा दिवसेंदिवस आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यात गुंतलाय. छोटासा देश असूनदेखील उत्तर कोरियाचे सैन्य हे जगातील सर्वांत बलाढ्य अण्वस्त्रसज्ज सैन्यांपैकी एक आहे. या देशाची स्वतंत्र अशी जुचे कालगणना आहे जी सुरु होते १५ एप्रिल १९१२ पासून (किम इल सुंग यांचा जन्मदिन) म्हणजे त्यानुसार सध्या तिथे २०१६ वे नव्हे तर १०३वे वर्ष सुरु आहे. नुकतेच उत्तर कोरियाच्या सरकारने नवीन टाईमझोन सुरु करत असल्याची घोषणा केली आहे ज्याचे नाव आहे प्योन्ग्यांग टाईम झोन.

step1

जुचे टॉवरचे दृश्य

या देशाबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात.

अर्थव्यवस्था :

थोड्या प्रमाणात चीन ,पाकिस्तान आणि रशिया सोडून आणखी कोणत्याच देशासोबत आर्थिक व्यवहार आणि संबंध नसल्याने उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था अक्षरश: डबघाईला आलेली आहे. देशांत मुख्य व्यवसाय शेती असूनदेखील अन्नाचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक लोक हे कुपोषित आहेत. शेती करण्यासाठी धड खत आणि चांगल्या प्रतीचे बी बियाणेदेखील उपलब्ध नाही. शक्यतो मानवी मलमुत्रच खत म्हणून वापरले जाते. लहान मुलेदेखील अपुऱ्या पोषणामुळे बळी पडत आहेत. १९९५ ते १९९८ च्या सुमारास पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये देशातील तब्बल साडेतीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते. सध्याच्या काळात हा जगातील सर्वात भयंकर दुष्काळ मानला जातो. परिस्थिती इतकी भयानक होती की भूक भागवण्यासाठी लोकांनी दिसेल ती जनावरे मारून खाल्ली. काहीजणांनी रस्त्यावरील अनाथ कुपोषित बालकेदेखील खाल्ली असेदेखील म्हटले जाते.
आणखीन एक गोष्ट म्हणजे इथे अन्नाच्या कमतरतेचा आणि गरिबीचा काहीही संबंध नाही. माणूस कितीही श्रीमंत असला तरी अन्नाची कमतरता सर्वांनाच आहे. फक्त पैसेवाल्याला ती किंचित कमी जाणवते इतकंच.

सामाजिक जीवन :

देशातील जनता बाहेरील जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यांना बाहेरील घडामोडींविषयी काहीच माहिती दिली जात नाही. उत्तर कोरिया हा जगातील सर्वांत प्रगत, बलाढ्य आणि संपन्न देश आहे असे खोटेच सतत बातम्या, वर्तमानपत्रे आणि भाषणांतून लोकांच्या मनावर ठसवले जाते.इतर देशांतील गोष्टी लोकांना कळणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. शाळेत मुलांना दोनच महापुरुषांबद्दलच शिकवले जाते. ते महापुरुष म्हणजे अर्थातच किम इल सुंग आणि किम जोंग इल. शहरातल्या चौकाचौकात, प्रत्येक इमारतीवर, बस थांब्यांवर, वाहनांवर, किम इल संग यांचे फोटो लावलेले दिसून येतात.
दुकानांत विकली जाणारी बरीचशी पुस्तके एक तर किम इल सुंग अथवा किम जोंग इल यांनी लिहिलेली आहेत नाहीतर त्यांच्यावर लिहिली गेलेली आहेत.देशातील ९९ टक्के लोक साक्षर असल्याचा दावा जरी उत्तर कोरियाचे सरकार करत असले तरी यात कितपत तथ्य आहे याबाबत शंकाच आहे. अनेक लोक झोपड्यांमध्ये अत्यंत गरीबीचे जीवन जगात आहेत. कमजोर अर्थव्यवस्थेमुळे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे.
देशात इंटरनेट वापरास बंदी आहे. केवळ VIP लोक इंटरनेट वापरू शकतात.टीव्हीवर केवळ तीनच channels आहेत आणि त्यातले दोन हे केवळ शनिवार रविवारी चालू असतात.तिसरा फक्त संध्याकाळच्या सुमारास. प्रत्येक घरात सरकार नियंत्रित रेडियो बसवण्यात आलेले आहेत आणि ते बंद करण्यास मनाई आहे. चौकाचौकात स्पीकर्स आहेत जिथे मोठ्या आवाजात सतत उत्तर कोरिया आणि तिथले नेते कसे महानतम आहेत याची पारायणे सुरु असतात.
लोकांच्या मनात तुम्ही जगात सर्वात सुखी आहात असे सतत बिंबवले जाते त्यामुळे अनेकजण गरिबीत आणि हलाखीत राहात असून आणि इतक्या अन्यायी व्यवस्थेतून जात असूनदेखील समाधानी आहेत (किंवा तसे दाखवत असावेत). देश सोडून दक्षिण कोरियात पळून जाणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे.

step1

सुविधा :

राजधानी प्योन्ग्यांग आणि काही ठराविक शहरे सोडली तर पूर्ण देशांत पक्के रस्तेच नाहीयेत. अक्ख्या देशात विजेचा तुटवडा आहे. खुद्द प्योन्ग्यांगमधेच दिवसातील अनेक तास वीज गायब असते. राजधानीमध्ये मेट्रो सेवा आणि सार्वजनिक वाहतूक जरी असली तरी अनेक सरकारी गाड्या या साठीच्या दशकातील बनावटीच्या आहेत. जुनाट आणि खटारा. शिवाय लष्करी आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी सोडून इतर कोणालाही कार विकत घेण्याची परवानगी नसल्यामुळे सगळा ताण सार्वजनिक वाहतुकीवर पडतो. खाजगी वाहनेच नसल्यामुळे भरदिवसादेखील प्योन्ग्यांगमधील रस्त्यांवर शुकशुकाट असतो.

step1

step1

न्यायव्यवस्था :

अतिशय जाचक आणि विचित्र कायदेव्यवस्था असलेला हा देश असून ज्या गोष्टी आपल्या इथे चूक म्हणतानाही विचार केला जातो अशा क्षुल्लक गोष्टींसाठी इथे देहदंडाची शिक्षा आहे. उदाहरणार्थ उत्तर कोरियन नागरिकाला बायबल जवळ बाळगणे , पोर्न मुव्ही पाहणे अथवा दक्षिण कोरियन चित्रपट पाहणे वा गाणी ऐकणे यासारख्या ‘गुन्हयांसाठी’ इथे मृत्युदंडाची शिक्षा आहे. किम इल सुंग यांच्या स्मारकासमोर मान न झुकवणे अथवा त्यांच्या स्मृतीदिनादिवशी न रडणे (अथवा खोटेच रडणे), परदेशी पर्यटकांशी संवाद साधणे, देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टींची गणना इथे गुन्ह्यांमध्ये केली जाते. इथे जीन्स घालण्यास बंदी आहे(कारण जीन्स ही देशाचा मुख्य शत्रू असलेल्या अमेरिकेची संस्कृती आहे म्हणून). सरकारने नेमून दिलेल्या ठराविक केशरचनाच नागरिकांनी कराव्यात असा नियम आहे.

इथला सर्वात अन्यायकारक कायदा म्हणजे तीन पिढ्यांना मिळणारा तुरुंगवास. म्हणजे समजा एखाद्याने काही गुन्हा केला तर त्याच्या अक्ख्या कुटुंबाला आणि पुढील दोन पिढ्यांच्या कुटुंबाला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागते. म्हणजे आजोबाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नातवाला देखील भोगावी लागते. सध्या कोरियामधील वेगवेगळ्या तुरुंगांत तब्बल दोन लाखाहून जास्ती राजकीय कैदी आहेत.
येथील भ्रष्ट आणि अन्यायकारक कायद्यांचे अनेक लोक बळी ठरले आहेत.एका architect ने डिजाईन केलेली इमारत किम जोंग उन यांना न आवडल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिली गेली असाही एक किस्सा ऐकिवात आहे.

पर्यटन :

बाहेरील देशांतून आलेल्या पर्यटकांसाठीदेखील अनेक कडक कायदे आहेत. खासकरून अमेरिकन लोकांसाठी. त्यांना स्थानिक लोकांशी संवाद साधण्यास सक्त मनाई असून केवळ सरकारने नेमून दिलेल्या गाईडशीच त्यांना बोलावे लागते. अनेक ठिकाणी फोटो काढण्यास बंदी आहे. देशातील गरिबी जगासमोर दाखवली जाईल असे फोटो काढण्यास पर्यटकांना मज्जाव केला गेलाय. फोटो काढण्याआधी प्रत्येक वेळी तिथल्या पोलीस अथवा सरकारी अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. परदेशी पाहुण्यांवर २४ तास पाळत ठेवली जाते. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही ठराविक हॉटेलमध्येच केली जाते आणि अशा खोलीत जिथून त्यांना शहराचा केवळ सुंदर भागच दिसू शकेल. पर्यटकांनी कुठे कुठे फिरावे कुठे जाऊ नये हे सर्व सरकारी अधिकारीच ठरवून देतात. शक्यतो चांगल्या भागांमधुनच त्यांना फिरवले जाते. प्योन्ग्यांग येथील चौकात किम इल सुंग यांच्या पुतळ्यापुढे परदेशी लोकांनाही सक्तीने मान झुकवावी लागते. इंटरनेटची सुविधा जरी उपलब्ध करून देण्यात आली तरी त्याचे दर खूप महाग असतात. म्हणजे इतके महाग की कोणी विचारदेखील नाही करू शकणार.

तंत्रज्ञान :

सैन्य आणि शस्त्रास्त्रांवर केल्या जाणाऱ्या प्रचंड खर्चामुळे इथे इतर तंत्रज्ञानाची तशी वानवाच आहे. अण्वस्त्रधारी जरी असला तरी बाकी अनेक बाबतीत उत्तर कोरिया अजूनही पिछाडीवर आहे. सर्व संगणक प्रणाली जुन्या आहेत. देशाची स्वत:ची अशी एक operating system आहे जिचे नाव आहे रेडस्टार. त्याचबरोबर नाडा (NADA-National Aerospace Development Administration) नावाची एक अवकाश संशोधन संस्थाही आहे. शिवाय हायड्रोजन बॉम्ब आणि इतर संहारक अस्त्रे बनवण्यात हा देश प्रगती करतोच आहे.

step1

step2

काही इतर गोष्टी :

उत्तर कोरियाचा कारभार मृत राष्ट्राध्यक्ष चालवतात. म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद तसेच आहे पण त्यावर अजूनही एका मृत व्यक्तीचाच हक्क आहे ती व्यक्ती म्हणजे प्रथम राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग. त्यानंतर हे पद कायमस्वरूपी रिक्त ठेवण्यात आले आहे. सध्याचे हुकुमशहा किम जोंग उन हे केवळ लष्करप्रमुख आहेत.

step1

किम इल सुंग स्मारक

सरकारतर्फे प्रकाशित केल्या गेलेल्या दुसरे अध्यक्ष किम जोंग इल यांच्या आत्मचरित्रात त्यांच्याबद्दल अनेक थापा ठोकल्या गेल्यात. त्यांचा जन्म झाला तेव्हा दुहेरी इंद्रधनुष्य आकाशात निर्माण झाले आणि एक तारा निर्माण झाला, ते एक दैवी पुरुष होते , ३ आठवड्याचे असतानाच ते व्यवस्थित चालायला शिकले , शाळेत ते शिक्षकांना असामान्य बुद्धीमत्तेने मुग्ध करत असत , त्यांनी जवळजवळ १५०० पुस्तके लिहिली , केवळ आपल्या मूडवर ते हवामान नियंत्रीत करीत असत असे अनेक विचित्र दावे त्यामध्ये केले गेलेत.

उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना ‘सुख’ देण्यासाठी सुंदर स्त्रियांचा खास pleasure squad तैनात केला गेलाय.

१९६८ मध्ये उत्तर कोरियाने अमेरिकेचे एक जहाज ताब्यात घेतले. तेव्हापासून ते त्यांच्याच ताब्यात आहे. असे करणारा हा एकमेव देश आहे.

विकासासाठी अनेक देशांकडून कर्जे घेऊनदेखील त्याची परतफेड करण्यास किम जोंग इल यांनी नकार दिल्यामुळे आणि इतर अनेक राजकीय कारणांमुळे जवळजवळ सर्वच देशांनी उ. कोरियावर निर्बंध लादलेले आहेत.

किम जोंग इल यांनी एका दक्षिण कोरियन चित्रपट दिग्दर्शकाचे हॉंगकॉंग येथून अपहरण करून त्याला उत्तर कोरियात जबरदस्तीने आणून देशात चित्रपट उद्योग उभे करण्यास सांगितले होते. त्याच्याकडून त्यांनी godzilla या हॉलीवूडपटाचा रिमेक करवून घेतला होता. त्या चित्रपटाचे नाव होते पुल्गासारी. आणि दिग्दर्शकाचे नाव होते शिन संग ओक.तब्बल ८ वर्षांनंतर तो दिग्दर्शक कसाबसा पळून जाण्यात यशस्वी झाला.

दर पाच वर्षांनी देशात निवडणुका होतात आणि एकच उमेदवार उभा राहतो.विरोधक नावाचा प्राणी तिथे नाही. मतदारांकडे त्या एकमेव उमेदवाराला मत देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. मतदान प्रत्येकाला सक्तीचे आहे.

आठवड्यातील ६ दिवस काम आणि १ दिवस स्वयंसेवी काम म्हणजे सर्वच दिवस कामाचे आहेत. सुट्टी नाही.

८ जुलै आणि १७ डिसेंबर या दिवशी देशात कोणताही आनंद साजरा करणे हा गंभीर गुन्हा आहे. भले तो वाढदिवस असो वा लग्न वा आणखीन काही. कारण त्या दिवशी अनुक्रमे किम इल सुंग आणि किम जोंग इल यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नो सेलिब्रेशन.

मारिजुआना हा अमली पदार्थ उत्तर कोरियामध्ये पूर्णपणे वैध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे सर्व कळल्यानंतर आपण खरोखर नशीबवान आहोत असे वाटल्याखेरीज राहात नाही. भारत लोकशाही मार्ग अवलंबल्यामुळे किती सुखी आहे हे कळून येते. सध्या तरी उत्तर कोरिया सुधारण्याची लक्षणे नाहीत. या देशाच्या लोकांचे भविष्य बदलेल का किंवा या अनिर्बंध हुकुमशाहीला तेथील जनता उलथवून लावून तेथे लोकशाही असलेली व्यवस्था निर्माण करू शकेल का याचे उत्तर सध्याची परिस्थिती पाहता नाही असेच आहे.
आगामी काळात हा देश जगाच्या राजकारणात कोणती भूमिका बजावतो याकडे संयुक्त राष्ट्रांसहित सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. फक्त जगाला युद्धातून विनाशाकडे नेण्याची भूमिका त्यांनी बजावू नये इतकीच अपेक्षा सध्या आपण करू शकतो.

मारवा Sun, 10/01/2016 - 11:20

अभिजीत जी
लेख अतिशय आवडला. अतिशय परीश्रमपुर्वक लिहीलेला चांगला माहीतीपुर्ण लेख आहे. अनेक अपरीचीत बाजुंवर प्रकाश टाकतो. तुमची एकंदरीत शैलीही आवडली.
हा फॅट बॉय हा गुटगुटीत निरागस ढब्बु पैसा इतका भयंकर आहे लेख वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं. अगोदर पुसटशी कल्पना होती फारशी डिटेल माहीती नव्हती. पण फारच गंभीर प्रकरण आहे. हा लेख वाचल्यावर आठवल मार्क्वेझ च एक पुस्तकं ऑटम ऑफ द पॅट्रीआर्क ही एका हुकुमशहा च्या आयुष्यावरील मार्क्वेझ ची असामान्य कादंबरी आहे. गंमत म्हणजे कादंबरी थोडी जुनी असली तरी तुम्ही जो वरील कुत्र्यांचा प्रसंग सांगितलेला आहे,जो त्या किम इल सुंग विषयीच्या दंतकथा सांगितलेल्या आहेत अगदी त्या सारखीच समान वर्णने त्यात आढळतात. म्हणजे मार्क्वेझ च निरीक्षण कीती अचुक म्हणाव वा वास्तव कीती समान म्हणाव अस काहीस वरील तुमचा लेख वाचुन वाटलं. न्यायव्यवस्था तर कीती निष्ठुर अमानुष म्हणावी ? ती आजोबाच्या गुन्ह्यासाठी नातवास शिक्षा काय भयंकर प्रकार आहे हा सगळा. कशी अमलात आणत असतील ही शिक्षा ? म्हणजे नातु जन्मल्यावर कीती वर्षांचा झाल्यावर त्याला आजोबाच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात टाकत असावेत ? आपल्याकडे जसा १८ वर्षाचा पुर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क मिळतो तसा तेथे प्रौढ झाल्यावर शिक्षा भोगण्याचा हक्क मिळतो की काय ?
एकुण सर्व लेख विचार करायला लावणारा त्यापेक्षा सुन्न च करणारा वाटला.
अभिजीत जी धन्यवाद या महत्वपुर्ण मार्मिक लेखासाठी.

दाह Sun, 10/01/2016 - 12:04

In reply to by मारवा

ती कादंबरी अजून वाचलेली नाही. आता वाचायलाच हवी असे वाटत आहे.
शिक्षेबद्दल बोलायचं झालं तर तीन पिढ्यांची शिक्षा ही शक्यतो देशद्रोही, राजद्रोही आणि बंडखोरांनाच दिली जाते. पण मुळात हुकुमशहा करे सो कायदा असाच काहीसा प्रकार असल्यामुळे अगदी किरकोळ चुकांसाठीदेखील राजद्रोहाचा गुन्हा लावला जातो. उदा. देश सोडायचा प्रयत्न करणे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वाचता येईल.
http://www.northkoreanow.org/the-crisis/north-koreas-gulags/

धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.

धर्मराजमुटके Sun, 10/01/2016 - 12:52

सुंदर लेख ! आवडला. लिखाणातुन काही मुद्दे सुटलेत ते म्हणजे धर्म. तेथे धर्म पाळायला परवानगी आहे काय ? एकूणच स्रियांची काय परिस्थीती आहे ? वगैरे ! वगैरे !
तसेच एवढा गरीब देश आहे तर त्याने अणुतंत्र कोठून मिळविले याचीही चर्चा झाली असती तर लेखाला चार चाँद लागले असते.

दाह Sun, 10/01/2016 - 14:21

In reply to by धर्मराजमुटके

उत्तर कोरियामध्ये धर्म पाळायला संमती नाही. सार्वजनिकरीत्या तर अजिबात नाही. देशात यापूर्वी अनेक धर्मविरोधी प्रचारमोहीमा राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे धर्माचे अस्तित्व जवळजवळ नसल्यासारखेच आहे. परंतु सामान्य उ. कोरियन नागरिकांच्या वैयक्तिक जीवनात धर्माचे काय स्थान असेल याविषयी मात्र मत-मतांतरे आहेत. कारण सामान्य जनता बाहेरील जगापासून १००% अलिप्त असल्याने नक्की काय स्थिती असेल याविषयी कुणालाच काही सांगता येत नाही. केवळ अंदाज बांधले जात आहेत. काही टक्के कोरियन लोक खाजगी जीवनात बौद्ध आणि ख्रिस्ती धर्माचे पालन करत असावेत असा एक समज आहे. पण नक्की कोणालाच माहित नाही.
चुआनडोईजम(cheondoism) नावाचा एका स्वतंत्र विचारसरणीचा पंथ तिथे साधारणपणे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून अस्तित्वात होता. तो अजूनही ते तग धरून आहे असेदेखील म्हटले जाते. अधिक माहितीसाठी या धर्माबाबत आंतरजालावर माहिती मिळू शकेल.
तशी स्त्रियांची परिस्थिती पुरुषांहून फार वेगळी नाही. स्त्रियांना सरकारी नोकरीमध्ये स्थान आहे. जे नियम पुरुषांना तेच स्त्रियांना लागू आहेत.

नगरीनिरंजन Sun, 10/01/2016 - 19:15

लेख आवडला. दुष्ट हुकूमशाहीखाली दडपलेल्या भुकेकंगाल देशाने अणुबाँब बनवणे आणि लोकशाही व मानवतावादी मूल्ये असलेल्या समृद्ध देशाने तो बनवून वापरणे यातलं जास्त धक्कादायक काय याचा विचार करतोय.
अमेरिकेचे बी-५२ बाँबर (अण्वस्त्रसज्ज) विमान आजच दक्षिण कोरियाच्या आकाशात विहरून धमकी देऊन आले म्हणे उत्तर कोरियन बंड्याला.

'न'वी बाजू Sun, 10/01/2016 - 19:29

किम जोंग उन वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, दुष्ष्ष्ष्ट!!!!!! आहे.

आपण त्याचे घर उन्हात बांधू, हं!

तेजा Sun, 10/01/2016 - 22:12

हा लेख सोर्स्ड आहे. ऐकिव (खरे म्हणजे वाचीव) माहितीवर आधारित आहे. म्हणजेच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेल्या पाहणीच्या आधारावर लिहिलेला नाही. लेखासाठी वापरलेले सोर्स अजिबात विश्वासार्ह नाहीत. उत्तर कोरियाला बदनाम करण्यासाठी हेतूत: उठविण्यात आलेल्या अफवांचा गोषवारा असेच लेखाचे स्वरूप दिसते. याचा पुरावा याच लेखात सुरूवातीलाच देण्यात आलेला आहे. या देशातील व्यवस्था पोलादी चौकटीत बंद आहे. कोणत्याही प्रकारची माहिती सरकार बाहेर येऊ देत नाही. तिथल्या कोणाही नागरिकास बाह्य जगातील कोणी भेटू शकत नाही. तर मग लेखात दिलेली माहिती बाहेर आलीच कशी? बरे बाहेर आलेली माहिती नेमकी उत्तर कोरियाची बदनामी करणारीच कशी आहे?

दाह Sun, 10/01/2016 - 22:27

In reply to by तेजा

ब्वार बुवां.....खरे म्हणजे उत्तर कोरिया अतिशय छान शांत आणि सहिष्णू देश आहे. पण मी असले बिनबुडाचे आरोप नेहमी करतो म्हणून किमला मी अजिबात आवडत नाही त्यामुळे मला तिथे तीन पिढ्यांचा तुरुंगवास जाहीर झालाय. म्हणून मी जायला घाबरतो. नाहीतर मीच जाऊन आलो असतो.

तेजा Sun, 10/01/2016 - 22:29

In reply to by दाह

किमला तुम्ही अचानक आवडू लागलात, आणि त्याने तुम्हाला व्हिसा दिला, तरी त्याच्या देशातील माहिती तुम्हाला थोडीच कळणार आहे. तिथे कोणाला भेटता येत नाही, हे तुम्हीच लिहिलेत ना!

तेजा Sun, 10/01/2016 - 22:32

In reply to by दाह

तीन पिढ्यांचा तुरुंगवास, माणसांना कुत्र्याला खायला घालणे वगैरे या सगळ्या कथा कादंबºयांतील कल्पना आहेत हो.

'न'वी बाजू Mon, 11/01/2016 - 00:31

इष्काच्या/सौंदर्याच्या (मादक) अ‍ॅटमबॉम्बबद्दल ऐकून होतो. हुकूमशाहीचा हायड्रोजन बॉम्ब हे प्रकरण नवीन दिसतेय.

असो.

ऋषिकेश Mon, 11/01/2016 - 16:19

खाजगी गाड्या नसणे, चौकाचौकात रेडीयो, गरीबी, रस्ते नसणे वगैरे भयंकर असले तरी अपेक्षित होते.

प्रत्येक घरात सरकार नियंत्रित रेडियो बसवण्यात आलेले आहेत आणि ते बंद करण्यास मनाई आहे.

ही मात्र नवी माहिती आहे. आणि मनातील चित्राला अधिकच भेसूर करणारी आहे! बापरे!
१९८४ तर प्रत्येकालाच आठवला असेल.

व्यक्तीस्वांतंत्र्याच्या विरोधकांना हा देश म्हणजे नंदनवनच वाटेल यात शंका नाही!

बाकी एकीकडे कित्येक धार्मिक देश उच्छांद मांडत असताना दिसरीकडे या 'निधर्मांध" देशानेही तितकेच आव्हान उभे करणे बरेच बोलके आहे. 'नास्तिक असणे सक्तीचे' ही कल्पना मला सहनशक्तीच्या पलिकडली आहे! त्यापेक्षा आस्तिक असणे सक्तीचे मला कमी त्रासदायक ठरेल. जर तुम्ही बहुसंख्यांच्या धर्माचे पालन करणारे असाल तर किमान आस्तिकांचे राज्य असे क्रूर तरी नाही

गब्बर सिंग Mon, 11/01/2016 - 22:10

North Korea at Night

--

फोटोमधे नॉर्थ कोरिया ची बॉर्डर इतकी सुस्पष्ट कशी ?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/01/2016 - 23:02

हे सगळं वर्णन सुरम्य आणि सुरस चेटूककथांसारखं वाटतं. तिथले लोक या चेटूककथांमध्ये खरोखरच कसे राहत असतील याची कल्पना न केलेलीच बरी! Out of sight out of mind.

दाह Tue, 12/01/2016 - 00:23

In reply to by बिटकॉइनजी बाळा

असे अनेक लेख आंतरजालावर आहेत. हा लेख मी रेफरन्स म्हणून घेतलेला नाही. पण हो. माहिती आंतरजालावरून घेतली आहे. कोरावर तिथे जाऊन आलेल्यांनी आपले अनुभव शेअर केले होते त्याचाही रेफरन्स घेतला.(तो जास्त खरा वाटला कारण आंखो देखी होती ) कारण दुसरा सोर्स नाहीच आहे.