Skip to main content

थोडा थोडा

सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेला
निष्ठुर घोडा
घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला
संधिसाधू घोडा
जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला
अश्वमेधी घोडा
बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला
अडिचक्या चालीचा घोडा
गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला
टाहो फोडणारा घोडा
व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला
तेजोमेघी घोडा
बहुरूपी घोडा
समजू लागलाय
थोडा
थोडा

जयदीप चिपलकट्टी Wed, 14/12/2022 - 21:45

कविता आवडली, पण ‘सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेला निष्ठुर घोडा’ ह्या वाक्यात गोलमाल असल्याचा संशय येतो. माझ्या समजुतीप्रमाणे ‘बंदुकीचा घोडा’ हा तिच्यामागचा हातोड्यासारखा भाग असतो. तो आदळला की गोळी बाहेर येते. कपाळावर टेकवतात ती नळी. घोडा टेकवायचा तर बंदूक विचित्र पवित्र्यात उलटी धरावी लागेल.

‘बुद्धिबळाच्या..’ आणि ‘गर्निकाच्या..’ ह्या ओळी सुंदर आहेत.

-----