रानभूल रातभूल
anant_yaatree
केतकीच्या बनातून
धूसरल्या संध्याकाळी
सळसळत येणाऱ्या
अचपळ नागिणीचा
नागमोडी डौल घ्यावा
काजव्यांनी ओथंबल्या,
झपाटल्या झाडाखाली
अंधाराला अव्हेरून
उजेडाचा कौल घ्यावा
भणाणत्या वाऱ्यावर
वेळूवनी उमटल्या
सात सुरांचा कल्लोळ
रोमरोमी झंकारावा
ऐन भरातल्या रात्री
स्फटिकाच्या तळ्याकाठी
ओंजळीत काठोकाठ
चांदण्याचा सडा घ्यावा
रातव्याची गूढ साद
भवताली कोंदताना
अदृष्टाचा पायरव
एकाएकी थबकावा
उगवतीच्या भांगात
तांबडफुटीचे कुंकू
भरताना आसमंत
किल्बिलत जागा व्हावा
रानभूल सरताना
रातभूल विरताना
हातातून कायमच्या
निसटल्या क्षणांसाठी
जीव थोडा थोडा व्हावा
कविता सुंदर आहे, परंतु…
…हे जे सगळे केतकीचे बन, काजवे, वेळूवन, स्फटिकाचे तळे, झालेच तर रातवे, या ज्या सगळ्या भानगडी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला पुण्यात (किंवा, ठाण्यात. किंवा, जेथे कोठे असाल, तेथे.) बसून नक्की कोठे पाहायला मिळतात?
(की, सगळाच कल्पनेचा खेळ आहे?)