Skip to main content

सहस्त्रचंद्रदर्शनाविषयी माहिती हवी आहे

पुढच्या शुक्रवारी २६ डिसेंबरला माझा मामा वयाची ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. माझा मामा आमच्या सगळ्या विस्तारीत हत्ती परीवाराचा प्रमुख असल्याप्रमाणे आहे आणि त्याच्या शब्दाबाहेर कोणी नसते. त्याचा सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा करायचे मनात आहे. दरवर्षी १२ पौर्णिमा आणि अधिक महिना असेल तर त्या वर्षी १३ पौर्णिमा प्रमाणे जन्मापासून एक हजारावी पौर्णिमा असेल त्या दिवशी सहस्त्रचंद्रदर्शन करतात इतकेच माहिती आहे. ही हजारावी पौर्णिमा ८०-८१ व्या वर्षात कधीतरी येते. त्या व्यक्तीने जन्मल्यापासून एक हजार वेळा पौर्णिमेचा चंद्र बघितला आहे म्हणून तो सोहळा सहस्त्रचंद्रदर्शन.

ऐसीकरांकडून पुढील माहिती हवी आहे:
१. हा सोहळा नक्की एक हजाराव्याच पौर्णिमेला करायचा की थोडेफार इकडे-तिकडे चालते?

२. समजा हा सोहळा एक हजाराव्या पौर्णिमेलाच करायचा असेल तर मामाची जन्मतारीख २६ डिसेंबर १९४६ पासून आतापर्यंत किती पौर्णिमा झाल्या आहेत याची माहिती नक्की कुठे मिळेल?

३. या सोहळ्यात नक्की काय काय करायचे असते? आमचा हत्ती परीवार खूप मोठा आहे आणि आम्ही सगळे हत्ती म्हटल्यावर पुख्खे झोडणे होईलच. पण त्याव्यतिरिक्त काही करणे अपेक्षित असते का?

४. पूर्वी महत्वाच्या दिवशी महत्वाच्या व्यक्तींची सुवर्णतुला करायचे. सुवर्णतुला करता येणे शक्य नाही. पण मामाची गहू, तांदूळ, साखर वगैरे पदार्थांनी तुला करायची आहे आणि ते पदार्थ सामाजिक संस्थांना- अनाथाश्रम किंवा वृध्दाश्रम अशा ठिकाणी दान करायचे आहेत. सहस्त्रचंद्रदर्शनात अशी तुला नसली तरी आम्ही त्या दिवशी ते करायचा विचार करत आहोत. त्यासाठी लागणारा मोठा तराजू कुठे भाड्याने मिळू शकेल का? तराजू भाड्यानेच हवा आहे विकत नको कारण नंतर त्या तराजूचे करायचे काय हा प्रश्न होईल. आम्ही सगळे हत्ती खेळीमेळीने आणि कसलेही टेन्शन न घेता धमाल करत राहतो आणि सगळ्यांच्या तब्येतीही सुदैवाने चांगल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळे सेंचुरी झळकाविणार याविषयी शंका नाही. आमच्या विस्तारीत परीवारात पुढचे सहस्त्रचंद्रदर्शन होईल माझ्या मेहुण्याच्या काकांचे. त्यालाही चार वर्षे आहेत. मग मामाचा शंभरावा वाढदिवस आणखी २१ वर्षांनी. तोपर्यंत त्या तराजूचे काय करायचे हा प्रश्न आहे.

५. सोहळ्यानिमित्ताने अहेर, मानसन्मान वगैरे सगळ्यांचे होतीलच. पण या दिवशी मानाच्या नातेवाईकांना कोणत्या भेटवस्तू द्याव्यात अशी कोणती प्रथा आहे का? मुलीच्या लग्नात मामाने पिवळी साडी घेऊन द्यायची असते अशी प्रथा आहे. त्याप्रमाणे सहस्त्रचंद्रदर्शनाच्या सोहळ्यात कोणा नातेवाईकाने काही भेट द्यायची किंवा दुसरे काही करणे अपेक्षित असते का?

याविषयी कोणाला माहिती आहे का?

सुधीर Fri, 19/12/2025 - 20:56

तुमच्या प्रश्नांची उत्तरे कदाचित इथे मिळतील.

https://www.lokmat.com/bhakti/why-see-bij-moon-every-month-find-out-wha…

"८० वर्षे आयुर्मान असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात ३२ अधिक मास येतात, त्यानुसार ८१ व्या वर्षात ८ व्या महिन्यात १००० चंद्रदर्शन पूर्ण होते, असे गृहित धरता येते."

या अधिकमासावर आणि एकंदर भारतीय कालगणनेवर संदीप देशमुख यांचे "काळाचे गणित" नावाचे सदर येते. काही लेख सुटले वाचायचे. पण पुस्तक रुपात आलं किंडलवर तर एकसंध वाचायला आवडेल. अधिकमास दिवाळीत येत नाही. नाहीतर अर्धी दिवाळी एक महिन्या नंतर साजरी करावी लागली असती, हेही मला नवीन होतं. एनीवे, त्रुटी असल्या तरी पाश्चिमात्य कालगणनेचा हा अधिकमासाचा ताप डोक्याला नाही.

https://www.niludamle.com/blog-post_28-6/
"येत्या शतकाच्या शेवटी माणूस दीडेकशे वर्षं जगणार आहे. तेव्हां दोन सहस्र दर्शन साजरं होईल."
निळू दामलेंच्या ब्लॉगवर त्यांनी लिहिलेले शेवटचे पॅरा आवडले. त्यात एक व्हिडिओ डॉक्यूमेंट्री पण आहे.

मिसळपाव Fri, 19/12/2025 - 22:19

१ आणि २: काय फरक पडतो? दिर्घायुष्य लाभलंय त्याचा आनंद साजरा करताय ना? मग १०००, ९९८, ११०५ वेळा चंद्र बघून झालं तरी काय फरक पडतो? तसंही त्यानी १००० वेळा खरंच चंद्र बघितलाय का? !! आणि खरं म्हणजे आत्ताच्या काळात, वाढलेलं साधारण आयुर्मान लक्षात घेता, "१२०० (काहितरी वाढिव आकडा) चंद्रदर्शनाचा सोहळा" करणं जास्त संयुक्तिक नाही का होणार?

३. यज्ञ करायचा असतो, हजार हत्ती दान द्यायचे असतात, हजार सुवासिनीनी ओवाळायचं असतं .......... !! एकत्र जमा, खा-प्या, मजा करा, मामांच्या आठवणी सांगा, त्यांची मुलाखत घ्या, त्यांचं लहानपण कसं गेलं विचारा ....अशा अजून सतरा कल्पना मी तुम्हाला देऊ शकेन.

४. परत तेच. समजा बहात्तर किलो वजन असलं आणि तुम्ही सत्तर किंवा ऐंशी किलो पदार्थ दान केलात तर काय फरक पडणारे? आणि दान करणारात तर काचकुच न करता पाचशे किलोच दान करा की. फक्त पाचशे किलो गव्हाचं एखादा वृद्धाश्रम काय करेल, काही करू शकेल का? याचा विचार करा. खरं म्हणजे यातलं काही नको - रोख रक्कम द्या. अहो त्याना पोळ्या खात बसण्याऐवजी महिनाभर रोज कुल्फी खायचा आनंद जास्त महत्त्वाचा असला तर?

५. आहे तर. प्रत्येक नातेवाईकाने (आणि त्यानी नाही केलं तर तुम्ही) एकमेकाना अहेर (ज्याना याची काही गरज नाहीये) देण्याऐवजी अनाथाश्रमाला रोख पैसे द्यावेत. अहो आर्यक्रमाची आठवण म्हणून पुल, गदिमा, व्यंकटेश माडगुळकर, अनिल बर्वे, श्री ना पेंडसे, जिम कॉर्बेट, रिचर्ड फाईनमन वगैरे वगैरे मंडंळींची उत्तमोत्तम पुस्तकं भेट म्हणून द्या. अगेन, मी स्पेसिफिक नावं सुचवू शकेन.

तुमच्या मामाना शुभेच्छा. आणि जरा त्या 'सोहळा' मानसिकतेतून बाहेर येऊन उद्देश काय, आत्ताचा काळ काय आहे याचा विचार करून बघा - अजून बर्‍याच चांगल्या चांगल्या कल्पना सुचतील.

ता. क. खरडफळ्यावर तुमच्या हजार नोंदी झाल्या की "सहस्त्रहत्तीखरडदर्शनाच्या" कार्यक्रमाची माहीती विचारेन :-)))))

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 21/12/2025 - 04:13

माझ्या आजोबांचं केलं होतं, सहस्रचंद्रदर्शन. त्यांचा जन्म कोजागिरीचा, त्यामुळे महिनाभर आधीच करता आलं म्हणे!

तेव्हा १ रुपयाच्या ८० का १०० नाण्यांचा हार केला होता. १००० नाणी निश्चित नव्हती; त्याचं ओझं आजोबांना त्या वयात पेललं नसतं. ते तरुण वयात पैलवान होते, १०० जोर आणि ५०० बैठका काढायचे म्हणे; आणि ८८ वर्षांचे होईस्तोवर रोज किमान १२ सूर्यनमस्कार घालायचे. पण रुपयाची १००० नाणी जरा जास्तच वाटतात.

मुद्दा असा की एक रुपया म्हणजे १०-१२ महिने होतील.

त्यांना तराजूत बसवून तुला करण्याचे चाळे करायला त्यांनी किंवा आईनंच नकार दिला. हौस आईचीच होती; वडलांसाठी काही करण्याची, असं मला आठवतं. आमच्या घरात हौस तिलाच होती; आम्ही चौघे - आजोबा, बाबा, भाऊ आणि मी - बऱ्यापैकी रटाळ होतो; मी आई असेस्तोवर तिचं शेपूट असायचे. माझ्या दोन मावश्या - आईच्या चुलतबहिणी - तेव्हा हौशीनं या प्रकारात सहभागी झाल्या होत्या. लोकांनी चिकार मजा केली होती.

मला तो १ रुपयाच्या नाण्यांचा हार आठवतो. मी तेव्हा फार तर ८ वर्षांची असेन. मला तेव्हाही त्या हाराची गंमत वाटली होती. आणि आजोबांना या प्रकाराचं फार काही वाटलं नव्हतं, एवढंच आठवतं.

'न'वी बाजू Sun, 21/12/2025 - 05:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१ रुपयाच्या नाण्यांचा हार कसा करतात? त्याकरिता नाण्यांना भोके पाडावी लागतात काय?

तसे असल्यास,

मला तेव्हाही त्या हाराची गंमत वाटली होती. आणि आजोबांना या प्रकाराचं फार काही वाटलं नव्हतं, एवढंच आठवतं.

अर्थात! शंभर रुपये भोके पाडून बाद करून वाया घालवायचे! त्या काळात शंभर रुपयांना किंमत होती, म्हटले!


मुद्दा असा की एक रुपया म्हणजे १०-१२ महिने होतील.

समजले नाही.

असो चालायचेच.

सई केसकर Sun, 21/12/2025 - 06:14

In reply to by 'न'वी बाजू

>>१ रुपयाच्या नाण्यांचा हार कसा करतात? त्याकरिता नाण्यांना भोके पाडावी लागतात काय?

तसं नसावं. नक्कीच कुणी नाण्यांना भोके पाडणार नाही. गुढी पाडव्याला ती एक साखरेची माळ असते तसं काही असेल. एका दोऱ्याला नाणी सिरीयली चिकटवली असतील किंवा प्रत्येक नाण्याला दोऱ्याची एक गाठ मारली असेल, जसं आपण फुलांची वेणी करताना करतो.
असो. मी रविवारी सकाळी ६ वाजता हा सगळा विचार करते आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

चिमणराव Mon, 22/12/2025 - 05:33

In reply to by 'न'वी बाजू

नाण्यांचा हार...

दोन सेलो टेप्समध्ये नाणी चिकटवून हार करतात.

नोटांचा हार....खराच हार करतात. काम झाल्यावर तो इतर कुणाच्या मोठ्या वाढदिवसाला देतात. मुलांच्या व्यापार खेळासाठी खोट्या नोटा मिळतात शंभर, पाचशेच्या त्यांचा हार का करत नाही ही माझी सूचना धुडकावून लावली होती. तसा हार तुमच्याच ८०व्या वाढदिवसाला करू ... वाट पाहणे आलं.

चिमणराव Mon, 22/12/2025 - 05:46

In reply to by 'न'वी बाजू

एक रुपया म्हणजे १०-१२ महिने होतील.>>

एक रुपयाची खरेदी शक्ती( महिन्यांचा खर्च भागवणे) म्हणायचं झालं तर शक्य होतं १९०० त्या आसपास. चांदीचा राणी छाप रुपया होता तेव्हा.
यावरून आठवलं... माझा मित्र नाणी जमवत होता(आता नाही जमवत) तो म्हणाला "आमच्यात( म्हणजे भंडारी लोकांत) नवीन जावई पाहुणा म्हणून प्रथम आल्यावर त्यास एक रुपया द्यायचा. तो चांदीचा रुपया(रुपये नाणी) बऱ्याच जणांकडे जपून ठेवलेली आहेत. पण आता त्याची काही किंमत( value) काही नाही. त्या काळी मात्र एक दोन गुंठे जमीन मिळत असे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 22/12/2025 - 07:40

In reply to by 'न'वी बाजू

नाण्यांना भोकं! काय हे 'न'बा! काय समजलात काय तुम्ही माझ्या पितरांना! एका फितीला गोंदानं नाणी चिकटवली होती. नंतर ते रुपये कुणाला तरी दान दिले.

सहस्रचंद्रदर्शन म्हणजे हजार पौर्णिमा बघितल्या. एका पौर्णिमेसाठी एक रुपया - हे गणित मला फार अजब वाटलं नसतं. पण हजार नाण्यांचा हार कोण बनवणार होतं? हजार नाणी तेव्हा फार महाग वाटली नसतीलही. पण त्यांचं वजन किती झालं असतं! म्हणून बहुतेक ८० (हे वय वर्षं) किंवा १०० (गोळीबंद आकडा) नाण्यांचा हार केला असणार. जर १००० पौर्णिमांसाठी १०० रुपये, तर एका रुपया म्हणजे १० पौर्णिमा किंवा १० महिने झाले. 

सई केसकर Mon, 22/12/2025 - 08:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>>नाण्यांना भोकं! काय हे 'न'बा! काय समजलात काय तुम्ही माझ्या पितरांना!

हे मीच लिहिणार होते. पण उगाच आगाऊपणा नको म्हणून नाही लिहिलं. अदितीताई मलाही खर्च करू नकोस त्यापेक्षा पोस्टात पैसे ठेव असा सल्ला वेळोवेळी देत असतात. नाण्यांना भोकं पाडणं हे अदितीच्या हृदयाला भोकं पाडण्यासारखं आहे.

anant_yaatree Sun, 21/12/2025 - 12:19

गुरूला ९५ चंद्र आहेत. त्यापैकी ४ मोठ्या चंद्राच्या ३२ पौर्णिमा ३० दिवसात (७२० तासात) पाहता येतात. या हिशेबाने ३१- ३२ महिन्यांत सहस्रचंद्रदर्शनाचा एक भिडू तयार होईल.

मारवा Sun, 21/12/2025 - 16:51

1000 पौर्णिमेचे चंद्र पाहू शकणे ही आयु व्यतिरीक्त किंवा आयु मोजताना चे unit of measurement फार सुंदर आहे. चौदहवी का चांद हा पौर्णिमेच्या चांदपेक्षा उजवा कसा हा प्रश्न मला नेहमी पडतो. शायर कवी इत्यादींनी चौधवी का चांद" मार्केटिंग केलेला असला तरी मला पौर्णिमेचा चंद्रच अधिक सुंदर वाटतो नेहमी.
"सर्वत्रैव हि सौंदर्यं, न हि किञ्चिद् जगत्समम्। दृष्टिश्चैव हि कारणं, यद् यत्र तद् दृश्यते हि तत्"

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 22/12/2025 - 07:44

In reply to by मारवा

हे कवीलोक प्रत्यक्षात कितीदा चंद्र बघत असतील कोण जाणे! अनुप्रासाकरता डकवलं असण्याची शक्यताही आहे. प्रतिपदेची चंद्रकोरही, विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांत, छान दिसते.

चिमणराव Mon, 22/12/2025 - 05:59

श्री आलोक मांडवगणे यांनी एक सुरेख पंचांग app बनवलं आहे. Hindu Calendar
https://play.google.com/store/apps/details?id=com.alokmandavgane.hinduc…
यांनीच सहस्र चंद्रदर्शन जन्मतारखेप्रमाणे केव्हा हे त्यात सुरू केले तर उत्तम होईल.