Skip to main content

हुंडीव्यवहार

ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले.  तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे.  अशा ’हुंडी’चा हा अल्पपरिचय.

हुंडीचे मूळ स्वरूप म्हणजे ’अ’ ह्या व्यक्तीने ’ब’ ह्या व्यक्तीला लिहिलेले पत्र, ज्यामध्ये ’क’ ह्या व्यक्तीला एक रक्कम देण्याचा आदेश असतो.  हिंदुस्तानातील व्यापारी समाजाने निर्माण केलेली ही पद्धत कोठल्याहि कायद्यानुसार निर्माण झालेली नव्हती.  बाजारपेठांमधील रीतिरिवाज आणि दूरदूरच्या व्यापारी पेढयांचा एकमेकांच्या पतीवरील विश्वास ह्यांवर हुंडीपद्धत अवलंबून होती.  पुरेशा संख्येने बॅंकांच्या शाखा उपलब्ध नसल्याने १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत हिंदुस्तानी व्यापारीवर्ग पैशाच्या देवाणघेवाणीसाठी प्रामुख्याने हुंडीव्यवहारावर अवलंबून असे.  तदनंतर तिचा संकोच होत जाऊन आता हा शब्द क्वचितच कानी पडतो.  हुंडीचाच दुसरा प्रकार, ज्याला ’हवाला’ असे नाव आहे, तो मात्र जगभर पसरलेल्या भारतीय, पाकिस्तानी आणि अन्य आशियाई लोकांचा स्वदेशाकडे पैसे पाठविण्याचा आवडता मार्ग आहे.  हवाल्याचा उपयोग काळा पैसा पांढरा करणे, अमली वस्तूंच्या विक्रीची किंमत चुकती करणे, दहशतवादी संघटनांना पैसा पुरविणे, विनिमय कायद्यांचे उल्लंघन करणे ह्यासाठीहि केला जाऊ शकत असल्याने जगभरच्या गुप्तहेर संघटना आणि पोलिस दले हवाल्याकडे संशयी नजरेने पाहतात आणि त्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

हुंडीचा उपयोग कोठे होत असे?  एक उदाहरण घेऊ.  १७९८ साली पुण्याहून बाळंभट माटे आपल्या आईला काशीयात्रा घडवून आणण्यासाठी काशीयात्रेला जात आहेत.  रास्तेवाडयावर ते पूजेसाठी जातात तेथे त्यांच्या कानावर असे पडते की रास्त्यांच्या घरातील काही मंडळी काशीयात्रेला जाणार आहेत.  त्यांच्याबरोबर आपणहि गेल्यास चांगली सुरक्षित सोबत मिळेल असा विचार त्यांच्या मनात येऊन एके दिवशी धाडसाने थोरल्या वहिनीसाहेबांना ते ’मीहि तुमच्याबरोबर येऊ का’ असे ते विचारतात.  वहिनीसाहेबहि हो म्हणतात आणि अचानक ही दुर्मिळ संधि भटजीबोवांना उपलब्ध होते.

काशीच्या प्रवासासाठी आणि तेथील खर्च अणि दानधर्मासाठी त्यांना तीनशे रुपये बरोबर न्यायची इच्छा आहे. गेली चौदापंधरा वर्षे वार्षिक रमण्यात मिळालेली पाचदहा रुपयांची दक्षिणा, सरकारवाडयावर दरवर्षी अनुष्ठानाला ब्राह्मण बसवतात तेथे मिळालेली दक्षिणा, एका यजमानासाठी केलेले वटवृक्षाला लाख प्रदक्षिणा घालण्याचे अनुष्ठान आणि रोजच्या पूजाअर्चा, रुद्राची आवर्तने ह्यांच्या परचुटन दक्षिणा अशी अडीचतीनशेची पुंजी त्यांनी जमवली आहे.  काशीयात्रेतून त्यांना स्वत:ला आणि आईला पुण्यप्राप्ति तर झाली असतीच पण परतीच्या वेळी गंगेच्या पाण्याची कावड आणून ते पाणी गडूगडूने यजमानांना विकून यात्रेतली सगळी गुंतवणूक दामदुपटीने परत मिळविता येईल हाहि व्यावहारिक विचार बाळंभटांच्या मनात आहे

आपल्या कमरेभोवती तीनशेचा कसा बांधून बाळंभट जाऊ शकतात पण त्यामागे अनेक धोके संभवतात.  सर्वात मोठा धोका म्हणजे वाटेत चोर-दरोडेखोर अथवा फासिगार ठगांच्या टोळ्या त्यांना लुटून त्यांचा पैसा काढून घेतील आणि पैशाच्या लोभाने त्यांना मारूनहि टाकतील.  पेंढार्‍यांच्या झुंडी वावटळासारख्या कोठून बाहेर पडून गरीब वाटसरांना लुटतील ह्याचा नेम नाही.  पैसे वाटेत कोठेतरी हरवण्याचीहि शक्यता आहेच.  तत्कालीन दळणवळणाची साधने पाहता असे काही झाले तर बिचार्‍या बाळंभटाचे हाल कुत्रा खाणार नाही अशी वेळ येईल.  त्यांच्या सुदैवाने ह्यावर एक तोडगा उपलब्ध आहे.  पुण्याच्या बाजारपेठेत अशा काही पेढया आणि सावकार आहेत की ज्यांचे हिंदुस्थानभरच्या पेढयांबरोबर व्यापारी संबंध आणि हिशेबाची खाती आहेत.  बाळंभट बुधवारातल्या चिपळूणकरांच्या पेढीवर जातात आणि काशीमधल्या सावकारावर हुंडी मागतात.  चिपळूणकरांचा कारकून भटजींना हुंडणावळीचा दर - commission - दरसदे म्हणजे दर शेकडा २ रुपये पडेल असे सांगतो पण भटजीबोवा तसे व्यवहारी आहेत.  मी दरिद्री ब्राह्मण, केवळ आईची इच्छा मरण्यापूर्वी पुरी करायची म्हणून पोटाला चिमटा घेऊन ही रक्कम कशीबशी उभी केली आहे अशी विनवणी ते करतात.  चार अन्य प्रतिष्ठितांच्या ओळखीहि आणतात आणि अखेर दरसदे १॥ रुपया हुंडणावळीवर सौदा तुटतो.  बाळंभट ३०४॥ रुपये चिपळूणकरांच्या पेढीवर आणून भरणा करतात.  भटजीबोवांनी ह्या रकमेचा मोठा भाग त्यांच्या दक्षिणेमधली नाणी साठवून उभा केला आहेत.  साहजिकच ती नाणी म्हणजे वेगवेगळ्या पेठांमध्ये चालणारी, कमीजास्त मान्यता असलेली, कोरी, मळकी, अनेक छाप असलेली आणि अनेक सावकारांनी आपापल्या खुणा उमटवलेली लहान मोठी नाणी आणि खुर्दा आहे.  भटजीबोवांना काशीमध्ये हवे आहेत इंग्रजी सिक्का रुपये.  चिपळूकरांचे कारकून प्रत्येक नाणे पारखून इंग्रजी सिक्क्याच्या तुलनेत त्याचा बट्टा  ठरवून बाळंभटांचे ३०४॥ रुपये सिक्का रुपयांमध्ये २८०॥=। रुपयांइतकेच (२८० रु १० आ. १ पै.) आहेत असे सांगतात.  भटजीबोवांना हा मोठाच धक्का आहे पण आता मागे परतायचे नाही असा त्यांचा निर्धार आहे.  बायकोच्या दोन तोळ्याच्या बांगडया विकून ते अजून २५-३० रुपये उभे करतात आणि अखेर दुकानावर दोन तीन चकरा मारल्यावर काशीवाले हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या पेढीवर चिपळूकरांनी लिहिलेली आणि बाळंभटांचे नाव त्यात ’राखिले’ म्हणून घातलेली दर्शनी शाहजोग हुंडी घेऊन बाळंभट समाधानाने घरी येतात आणि प्रवासाच्या तयारीला लागतात.  हुंडीमध्ये हुंडी लिहिण्याची तारीख वैशाख शु १ शके १७२० अशी आहे आणि हरकिसनदास लखमीदास ह्यांनी हुंडीची रक्कम ज्येष्ठ व १ ला म्हणजे १॥ महिन्यानंतर हुंडी दाखल झाल्यावर बाळंभटांना द्यायची आहे.  चिपळूणकरांनी त्याच दिवशी हरकिसनदास लखमीदास पेढीला त्यांच्यावर अशी हुंडी लिहिल्याचे पेठपत्र जासूदाबरोबर वेगळे रवाना केले आहे.

भटजीबोवांच्या सुदैवाने आणि काशीविश्वेश्वराच्या असीम कृपेने ते स्वत:, पत्नी आणि आई हातीपायी धड महिना-सवामहिन्यातच काशीत हुंडीसकट पोहोचतात.  तेथे आपले दूरचे आप्त मोरशास्त्री कर्वे ह्यांच्याकडे ते सर्वजण उतरतात.  मोरभट २०-२५ वर्षांपूर्वी न्याय वाचण्यासाठी काशीला गेलेले असतात पण त्यांचे तेथे बस्तान चांगले बसल्यामुळे आता ते काशीकरच झालेले असतात.  त्यांच्याच ओळखीने बाळंभट चांगली पत असलेल्या वरजीवनदास माधवदास ह्यांच्या पेढीवर जातात आणि वरजीवनदासांना विनंति करून आपल्या हुंडीचे पैसे त्यांनी मिळवून द्यावे अशी विनंति करतात.  वरजीवनदास आपला लेख हुंडीवर लिहून आपला गुमास्ता बाळंभटांबरोबर देतात आणि सर्वजण हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या पेढीवर पोहोचतात.  बाळंभट तेथे हुंडी दाखवतात.  ती उलटसुलट नीट तपासून आणि गुमास्त्याकडून हे बाळंभटच आहेत अशी शहानिशा करून घेतल्यावर हुंडी ‘सकारली‘ जाऊन बाळंभटांच्या हातात ३०० कलदार सिक्का रुपये पडतात आणि तशी नोंद हुंडीवर केली जाते.  चिपळूणकरांचे खाते हरकिसनदास लखमीदास ह्यांच्या वह्यांमध्ये आहे आणि त्यामध्ये पुरेशी रक्कम जमा आहे.  त्या खात्यात ही रक्कम आता नावे लिहिली जाईल आणि हुंडीचा खोका आता जासूदाबरोबर उलट चिपळूणकरांकडे पोहोचेल.  तेथे ही ‘खडी हुंडी‘ आणि हा व्यवहार संपेल.  मधल्या काळात बाळंभटांच्या मागे काशीक्षेत्रातले पंडे लागलेले आहेत.  बाळंभटांचे ३०० रुपये संपवण्याचा पत्कर आता ते पंडे घेतीलच!

वरच्या गोष्टीतील हुंडी दर्शनी आणि शाहजोग होती.  म्हणजे तिचे पैसे हुंडी पटवण्यासाठी म्हणजे ‘सकारण्या‘साठी पुढे आल्यावर लगेच द्यावयास हवेत.  तसे न दिल्यास हुंडीधारकास त्या विलंबाचे व्याज मिळते.  हुंडी शाहजोग आहे म्हणजे पेठेतील कोणी प्रतिष्ठित आणि पतदार व्यक्ति मध्यस्थ म्हणून उभे राहिल्यावरच तिचे पैसे धारकास मिळतात.  हुंडी शाहजोग न करता धनीजोग (ज्याच्यापाशी हुंडी आहे अशा कोणासहि पैसे मिळतील), नामजोग (ज्याचे नाव हुंडीमध्ये आहे त्याला पैसे मिळतील), निशाजोग (ज्याच्या शरीरावर वर्णिलेल्या खुणा आहेत अशा व्यक्तीलाच पैसे मिळतील) अशा प्रकारची असू शकते.  तसेच ती जोखमी हुंडी असू शकते.  एक व्यापारी दुसर्‍याला काही माल पाठवतो आणि मालाच्या किंमतीच्या रकमेची हुंडी खरीददारावर लिहितो.  माल कोठल्या वाहनाने येत आहे हेहि नोंदवतो.  ही जोखमी हुंडी तो एका दलालाला विकतो आणि आणि दलाली वजा करून मालाची किंमत त्याला मिळून जाते.  माल खरीददाराकडे पोहोचल्यावर दलाल त्याच्याकडे हुंडी पाठवून तिचे पैसे वसूल करतो.  माल पोहोचेपर्यंत मालाचे पैसे चुकते करण्याची जबाबदारी खरीददारावर नाही.  अशा रीतीने विकणारा आणि खरेदी करणारा ह्या दोघांचीहि मालवाहतुकीमधील जोखीम दलाल स्वीकारतो म्हणून ह्या हुंडीला जोखमी हुंडी म्हणतात.  कधीकधी परक्या गावात गरजेप्रमाणे पैशाची उचल करता यावी म्हणून व्यापारी मूळ गावातून भलावणपत्र घेऊन येतो.  ह्या पत्राच्या आधारे त्याला हवी ती रक्कम वेळोवेळी मिळते.  भलावणपत्र लिहिणारा, ते जवळ बाळगणारा आणि पैसा देणारा आपल्याआपल्यामधील हिशेब नंतर पूर्ण करतात.

दर्शनीऐवजी हुंडी मुदती असू शकते म्हणजे तिचे पैसे हुंडी दाखविल्यानंतर विशिष्ट मुदतीनंतर मिळतात.

बाळंभटांना मिळालेली हुंडी एका ठराविक पद्धतीने आणि व्यापार्‍यांमध्ये वापरात असलेल्या महाजनी भाषेत लिहिली असावी.  अशा एका हुंडीतील मजकूर पहा:

निशानी 
हमारे घरु खाते नाम मांडना
दस्तखत ब्रिजकिशोर भार्गव के हुंडी लिखे मुजिब सीकर देसी
श्रीरामजी

सिध श्री पटना सुभस्ताने चिरंजीव भाई रिकबचंद बिर्दीचंद जोग श्री जयपुर से लिखी ब्रिजकिशोर भार्गव की आसिस बाचना.  अपरंच हुंडी एक रुपिया २००० अक्षरे दो हजार के निमे रुपिया एक हजार का दुना यहां रखा साह श्री पुनमचंदजी हरकचंदजी मांगसिर बद बारस शाहजोग रुपिया चलान का देना.  संबत १९९० मिति मांगसिर सुद बारस

पाठीमागच्या बाजूस
रु २०००
नेमे नेमे रुपिया पांच सौ का चौगुना पूरा दो हजार कर दीजो.

(अर्थ: पेढीच्या शिक्क्याखाली
आमच्या पेढीच्या खात्यात नावे लिहा.
ब्रिजकिशोर भार्गव ह्यांनी हाताने लिहिलेली हुंडी.

श्रीराम

सिद्धि.  शुभस्थान पटना येथील चिरंजीव भाई रिकबचंद बिर्दीचंद ह्यांना श्रेष्ठ शहर श्री जयपूरहून ब्रिजकिशोर भार्गव ह्यांचे आशीर्वाद वाचावे.  आणखी म्हणजे  एक हुंडी रुपये २००० अक्षरांनी दोन हजार ह्याचे निम्मे रुपये एक हजार ह्याची दुप्पट. येथे राखिले शाह श्री पुनमचंदजी हरकचंदजी शाहजोग.  मार्गशीर्ष वद्य १२ ला चलनी रुपये देणे.  संवत १९९० मिति मार्गशीर्ष वद्य १२.

मागील बाजूवर

रु २०००
निम्म्याचे निम्मे रुपये पांचशे ची चौपट पुरे दोन हजार करावे.

अशा एका हुंडीचे चित्र पहा: (श्रेय)

पुण्याच्या सावकारी पेठेत हुंडी आणि चलनांचे व्यवहार कसे चालत असत ह्याची उत्तम माहिती ना.गो.चापेकरलिखित ’पेशवाईच्या सावलीत’ ह्या पुस्तकामध्ये मिळते.  चिपळूणकर सावकार आणि तुळशीबागवाले घराण्यांच्या अनेक वर्षांच्या हिशेबवह्या तपासून संकलित केलेली अशी ह्या पुस्तकातील माहिती पेशवे काळातील अर्थव्यवहार, सामाजिक चालीरीती अशा बाबींवर प्रकाश टाकते.  त्यातील पुढील दोन उतारे वानगीदाखल पहा:

चिपळूणकरांच्या वह्यातील हा एक व्यवहार आहे.  असे दिसते की सगुणाबाई पंचनदीकर ह्या एका प्रतिष्ठित घराण्यातील बाई काशीयात्रेला जाणार आहेत.  त्यासाठी तरतूद म्हणून त्यांनी चिपळूणकरांचे तेव्हाचे कर्ते पुरुष दाजिबा चिपळूणकर ह्यांच्याकडे आपले कोणी आप्त/सेवक/परिचित असे राघोपंत थत्ते ह्यांच्या हस्ते काही रक्कम शके १७४६ (सन १८२४) पौष महिन्यात सोपवली आहे.  त्या रकमेमध्ये ३१५ सिक्का रुपयाची नाणी होती आणि बाकी रक्कम ३०८ रु ६ आणे २ पैसे हे चांदवडी रुपये होते.  चांदवड रुपये सिक्का रुपयात बदलण्यासाठी दर शेकडा ६ रु. ५ आ. १ पै. ह्या दराने १९ रु. ८ आ. १ पै. इतका बट्टा चिपळूणकरांनी घेतला.  (३०८ रु ६ आणे २ पैसे भागिले १०० गुणिले ६ रु. ५ आ. १ पै. = १९ रु. ८ आ. १ पै. )  बट्टा वजा जाता उरले सिक्का २८८ रु १४ आ. १ पै.  मूळचेच सिक्का असलेले ३१५ रु ह्यात मिळवून एकूण रक्कम झाली सिक्का ६०३ रु १४ आ. १ पै.  ह्या रकमेची काशीवरची हुंडी जगजीवदास बुक्खीदास ह्यांच्या पेढीवरून करून घेण्यासाठी - चिपळूणकरांची अडत काशीमध्ये नसावी म्हणून दुसर्‍या पेढीवरून हुंडी घेतली - दरशेकडा १॥ रुपये इतकी हुंडणावळ पडली.  ती पेढी प्रथम १।।। रुपये दर मागत होती पण थोडी घासाघीस करून १॥ वर दर आणला. ह्या दराने ६०३ रु १४ आ. १ पै. ह्या रकमेवर हुंडणावळ होते ८ रु १५ आ.*  १९ रु. ८ आ. १ पै. इतका जो बट्टा चिपळूणकरांनी घेतला आहे त्यावरची हुंडणावळ होते ४ आ. ३ पै.  ८ रु १५ आ. मधून हा आकडा वजा केला की उरते देय हुंडणावळ ८ रु. १० आ. १ पै.  ही हुंडणावळ ६०३ रु १४ आ. १ पै.  मधून वजा करून हुंडीची रक्कम उरते ५९५ रु. ४ आ.  ही रक्कम बाईंना काशीमध्ये वैशाख शु १ शके १७४७ ह्या दिवशी मिळेल.

(* ह्या आकडेमोडीत मला एक अडचण जाणवते.  शेकडा दीड रुपया प्रमाणे ६०३ रु १४ आ. १ पै. वर हुंडणावळ ९ रु.हून थोडी जास्तच होईल.  येथे ती ८ रु १५ आ. अशी कशी काढली आहे?  चिपळूणकरांच्या वाकबगार कारकुनांकडून अशी चूक हे शक्य वाटत नाही.  ह्याचे स्पष्टीकरण कोणी देऊ शकेल काय?)

ह्यापुढे दोन हुंडीव्यवहार दिसत आहेत.  पहिल्यामध्ये काशीवरची ५०० ची हुंडी ज्या कोणाकडे होती त्याच्याकडून ४७५ रोख देऊन विकत घेतली.  त्याला बहुधा रोख रकमेची निकड असेल वा हुंडी पटविण्यासाठी काशीला जायची त्याची तयारी नसेल.  ह्यातील नफा रु २५ कसर खात्यात (discount) जमा केला आहे.  त्याच्यापुढे असे दिसते की कोणा बाळकृष्ण आपाजीला उज्जैनीत ५०० ची गरज आहे.  तेथे चिपळूणकरांची अडत नसावी म्हणून बाळकृष्ण आपाजीला औरंगाबादेवर त्या रकमेची हुंडी दिली आहे.  तेथे ह्या हुंडीच्या जागी त्याला उज्जैनीवर ५०० ची दुसरी हुंडी करून घ्यावी लागेल.  येथे चिपळूणकरांना १ टक्का अशी ५ रु हुंडणावळ मिळाली आहे.  हुंडीची रक्कम आणि हुंडणावळ बाळकृष्ण आपाजीच्या नावे लिहिली आहे.  ह्या रकमेचा भरणा बाळकृष्ण आपाजी सवडीने करेल.

इंटरनेट बॅंकिंगच्या चालू जमान्यात अंतर्गत व्यापारासाठी हुंडीव्यवहार आता कालबाह्य झाले असले तरी हुंडीचे दुसरे भावंड, जे हवाला ह्या नावाने ओळखले जाते, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठया प्रमाणात चालू असावे.  ह्याचे सर्वपरिचित उदाहरण म्हणजे आखाती देशांमध्ये गेलेला भारतीय-पाकिस्तानी कामगारवर्ग आपल्या कुटुंबांकडे पैसे पाठविण्यासाठी बॅंकांकडे न जाता पुष्कळदा सहज ओळखीने उपलब्ध होणार्‍या ’हवाला’ ह्या खाजगी सेवेचा लाभ घेतात.  दुबईमधील भारतीय कामगार आपली परकीय चलनामधली कमाई तेथील एका हवाला एजंटाच्या हाती सोपवतो आणि बरोबर आपल्या कुटुंबीयाचा पत्ता, फोन नंबर इत्यादि.  एजंट फोनवरूनच आपल्या भारतातील सहकार्‍याला लगेच हे तपशील पुरवतो.  एवढ्यावर दुसर्‍याच दिवशी कुटुंबाच्या हातात रुपये येऊन पडतात. केवळ विश्वासावर चालणारी ही यंत्रणा एक्स्चेंज दर, कमिशन दर, लिखापढीचा अभाव, सेवेची तत्परता आणि गति अशा बाबतींत बॅंकांहून अधिक समाधानकारक सेवा देते आणि त्यामुळे विशेषत: खालचा वर्ग तिच्याकडे सहज आकर्षित होतो.

ह्याच मार्गाने गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा, कर चुकविलेला काळा पैसा, दहशतवादी चळवळींना पुरवला जाणारा पैसा तितक्याच सुकरतेने सीमापार जाऊ शकतो आणि देशोदेशींच्या आर्थिक देखरेख करणार्‍या संस्थांच्या नजरेबाहेर आपले काम करत राहतो.  ह्याच कारणासाठी इंटरपोलपासून देशोदेशींचे पोलिस त्याच्या मागावर असतात.

हुंडी व्यवहार कमी झाले पण हुंडीव्यवहारांनी मराठी भाषेला दिलेले काही शब्द आता भाषेचा अविभाज्य भाग झाले आहेत.  शहाजोगपणा करणे, शहानिशा करणे, लग्नाळू मुलीला चांगले स्थळ मिळवणे अशा अर्थाने हुंडी पटविणे, भलावण करणे हे शब्द असेच वापरात चालू राहणार!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/01/2014 - 04:22

शहाजोग या आताच्या वापरातल्या शब्दाचं मूळही या व्यवहारातच असेल अशी शंकाही आधी आली नव्हती. मोल्सवर्थमधे शोधल्यावर हे सापडलं. पण या शब्दाचा अर्थ कसा बदलला असेल?

'न'वी बाजू Wed, 08/01/2014 - 06:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'जोग' म्हणजे 'योग्य' आणि 'शाह' म्हणजे 'राजा' (किंवा तत्सम मान्यवर, अर्थात क्रेडिटवर्दी, व्यक्ती) असे काही असावे काय?

मोल्सवर्थभटाने दिलेला अर्थ नेमका वेगळा कसा?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/01/2014 - 00:34

In reply to by 'न'वी बाजू

आता जो शब्दप्रयोग वापरात आहे, 'शहाजोगपणा करणे' त्याला काहीसा नकारात्मक अर्थ आहे. हा कसा आला असेल?

'न'वी बाजू Thu, 09/01/2014 - 10:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'शहाणे असणे' आणि 'शहाणपणा करणे' यांत काही फरक होतो की नाही? तसाच.

'शाहजोग असणे' म्हणजे 'विश्वासार्ह, प्रतिष्ठित असणे, काही पत असणे', पण 'शाहजोगपणा करणे' म्हणजे 'मी(च काय तो) शाहजोग(, तुम्ही कोण?)' असा ष्ट्याण्ड घेऊन वागणे, पक्षी 'होलियर द्यान दाउ'गिरी करणे, असा काहीसा प्रकार असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

शैलेन Thu, 09/01/2014 - 17:53

In reply to by 'न'वी बाजू

शहाजोगपणा करणे म्हणजे आपण आहोत त्यापेक्षा वेगळ्या उच्च 'प्रती'चे आहोत असे दाखवणे. 'शहाजोग' हुंडी ही 'payable at sight' (हे वर लेखात आलेले आहेच) असल्याने हुंडी-व्यवहारात उच्च मानली जाई. तशा हुंड्यांप्रमाणे आपली 'पत' आहे असे खोटेच दाखवणे म्हणजे इंग्लिशमध्ये 'pretentiousness' करणे ह्या अर्थी तो शब्द वापरला जातो.

शैलेन Thu, 09/01/2014 - 18:06

In reply to by 'न'वी बाजू

'शहाजोग'मधील 'जोग' हा शब्द 'योग्यता'दर्शक आहे हे बरोबर - पण 'शाह' हा शब्द 'राजा' ह्या अर्थाने आलेला नाही. तो शब्द व्यापारी/सावकार वर्गांत एकमेकांना 'साह'/'साहु'/'शाह' हे जे आदारार्थी संबोधन वापरले जाते त्या अर्थाचा आहे. 'साह + योग/जोग' म्हणजे ती हुंडी दाखवणारा माणूस हा प्रत्यक्ष ती जारी करणाऱ्या 'साह'च्या योग्यतेचा आहे (सबब ती हुंडी सर्वोच्च 'प्रती'ची आहे आणि प्रत्यक्ष जारी करणारा इसमच जणू ती घेऊन आला आहे अशा रीतीने तिचा वटाव करावा) अशा अर्थाने तो शब्द उगम पावला आहे.

बॅटमॅन Thu, 09/01/2014 - 18:19

In reply to by शैलेन

सहयोग पासून शहाजोग आलाय हे रोचक आहे. पश्चाद्दृष्टीने पाहता ते स्वयंस्पष्ट आहे पण 'जोग' शब्दाच्या मराठी उच्चारामुळे कुणी शहा & जोग या लोकांनी सुरू केलेली ही भानगड असावी असा एक पु.ना.ओकीय तर्क मनात आला. त्याचे अज्जीच निराकरण केल्याबद्दल धन्यवाद!

अतिशहाणा Thu, 09/01/2014 - 22:42

In reply to by बॅटमॅन

कुणी शहा & जोग या लोकांनी सुरू केलेली ही भानगड असावी

हो ना. किंवा शहा नावाच्या गुजराथी स्त्रीने जोग नावाच्या उपवर ब्राम्हण* तरुणाशी (ब्राम्हण समाजात त्याचा विवाह होऊ न शकल्याने) विवाह केल्यानंतर शहा-जोग असे आडनाव लावून हुंडीचा व्यवसाय सर्वप्रथम सुरु केला असल्याचीही एक शक्यता आहे.

*यावरुन उपवर ब्राम्हण तरुणांना ब्राम्हण समाजातच विवाहाच्या संधी पूर्वीही उपलब्ध होत नव्हत्या हेही सिद्ध करता येईल.

असो इतक्या चांगल्या चर्चेत आणखी अवांतर नको.

'न'वी बाजू Thu, 09/01/2014 - 23:21

In reply to by अतिशहाणा

त्यापुढे, कितीही झाले, तरी जोग हा शेवटी बोलूनचालून मराठी माणूस पडल्याने, हुंडीच्या धंद्यात खोट येऊ लागली, नि 'धंदा कसा चालवावा' यावरून तिच्यात आणि त्याच्यात वारंवार खटके उडू लागले, आणि पुढे भांडण विकोपाला गेले. बरे, कितीही झाले, तरी तो शेवटी 'जोग' असल्याकारणाने धंद्याचे मूळ भांडवल संपूर्णपणे 'शहा'चेच, हे उघड आहे. आता भांडवलही पुरवायचे, जोगचा व्यावसायिक ढिसाळपणाही चालवून घ्यायचा नि परत उलटा जोग 'तत्त्वाच्या प्रश्ना'वरून भांडणार, बिचारी शहा तरी किती दिवस ऐकून घेईल? शेवटी तिने जे करायचे, तेच केले. बोले तो, स्वतः विभक्त तर झालीच, आणि धंद्यातले भांडवलही काढून घेतले. मग जोगला शहाही नाही, आणि हुंडी(चा धंदा)ही नाही. हात हलवत बसण्यापलीकडे नि कपाळावर हात मारून घेण्यापलीकडे त्याला पर्याय उरला नाही.

आणि अशा रीतीने 'जोग' हुंडी-बळी ठरला.

(या ष्टोरीविषयी अधिक चर्चा करणे असल्यास, संपादनमंडळाने योग्य वाटल्यास या अवांतरमालेचा स्वतंत्र धागा बनवावा, ही नम्र विनंती. अन्यथा, या विशिष्ट अवांतरमालेपुरते इत्यलम्|)

मिसळपाव Wed, 08/01/2014 - 07:10

धन्यवाद अरविंदराव! तुमच्या पोतडीतून कधी काय निघेल सांगता येणार नाही.

या व्यवहारासंबंधी अजून काही माहिती देउ शकाल का?
- हुंडीच्या खोक्याचा उल्लेख आहे. खरोखर खोका, चामड्याची ठराविक पिशवी वगैरे असं काहि वापरलं जायचं की आपला एक शब्दप्रयोग होता?
- चिपळूणकरांच्या जासूदाकडून पेंढार्‍यानी हुंडी/खोका पळवला तर? चिपळूणकर भटजीबोवाना त्यांचे पैसे भले परत देतील पण भटजीबोवा काशीहून परत येउ शकले तर!
- भटजीबुवांचा काउंटरपार्ट (मराठी शब्द सुचत नाहिये याला)गरजू असामी काशीहून लखमीदासांकडून हुंडी घेउन चिपळूणकरांकडे येउन पैसे घेत असेल कि फिट्टंफाट झाली. पण हे दर वेळेस होईलच असं नाही. चिपळूणकर व लखमीदास वार्षिक सेटलमेंट करायचे का?

हुंडीचे प्रकार वाचून गंमत वाटली. परत एकदा तुम्हाला या सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

'न'वी बाजू Wed, 08/01/2014 - 09:51

In reply to by मिसळपाव

- चिपळूणकरांच्या जासूदाकडून पेंढार्‍यानी हुंडी/खोका पळवला तर? चिपळूणकर भटजीबोवाना त्यांचे पैसे भले परत देतील पण भटजीबोवा काशीहून परत येउ शकले तर!

कोणता जासूद? चिपळूणकरांकडून जाणारा, की चिपळूणकरांकडे परत जाणारा?

- चिपळूणकरांकडून जाणारा जासूद असेल, तर त्याच्याबरोबर जात आहे, ती हुंडीही नव्हे, आणि रोखही नव्हे. हुंडी बाळंभटाबरोबर जात आहे. जासुदाबरोबर जात आहे, ते हुंडी केल्याचे पेठपत्र, बोले तो (बहुधा) हुंडीची काउंटरफॉइल. म्हणजे पेयिंग पेढीस आगाऊ सूचना, झालेच तर अधिकची व्हेरिफिकेशन. आता, बाळंभटाने हुंडी सादर केली असता, केवळ 'व्हेरिफिकेशन मिळाली नाही' (कारण व्हेरिफिकेशन पेंढार्‍यांनी पळवली म्हणून पेयिंग पेढीपर्यंत पोहोचलीच नाही), या कारणास्तव पेयिंग पेढी ती सादर केलेली हुंडी डिसऑनर करेल का (किंवा कसे), हा प्रश्न आहे. विशेषतः, हुंडी शाहजोग असेल तर. (म्हणजे, व्हेरिफिकेशन मिळाली नाही तर बाळंभट कदाचित नकली हुंडी सादर करीत असेल ही शक्यता राहतेच, पण ज्या अर्थी तो कोण्या स्थानिक प्रतिष्ठित माणसाला मध्यस्थ म्हणून आणतोय, त्या अर्थी त्याची किंवा त्याच्या कोणा स्थानिक आप्ताची त्या प्रतिष्ठित माणसाशी ओळख असावी, किंवा त्या प्रतिष्ठित माणसाने त्यास पारखले असावे - तेवढाच रिस्क फ्याक्टर कमी.) शिवाय, त्या काळातले तीनचारशे रुपये ही बाळंभटाकरिता जरी मोठी रक्कम असली, तरी पेयिंग पेढीच्या सावकाराच्या एकंदर टर्नओव्हरच्या मानाने सावकाराकरिता क्षुल्लक असणार. तेव्हा, हुंडी सादर केली असता केवळ व्हेरिफिकेशन मिळाली नाही तरी ती हुंडी ऑनर करण्यामागील तीनचारशे रुपयांची रिस्क घेणे त्याला बहुधा परवडावे, असे वाटते. (अरविंद कोल्हटकरांनी किंवा इतर जाणकारांनी खुलासा करावा.)

- चिपळूणकरांकडे परत जाणारा जासूद असेल, तर तो जी नेत आहे, ती वटवून झालेली हुंडी. बोले तो क्यान्सल्ड चेक. (बोले तो, अमेरिकन अर्थाने क्यान्सल्ड चेक. भारतीय अर्थाने ज्याला 'क्यान्सल्ड चेक' म्हणतात, आणि अमेरिकन परिभाषेत ज्याला 'व्हॉइडेड चेक' म्हणतात, तो नव्हे.) बोले तो, पेयिंग सावकाराने हुंडी वटविल्याची आणि चिपळूणकरांच्या खात्यावर ती रक्कम मांडल्याची चिपळूणकरांना पावती. ती जरी पेंढार्‍यांनी चोरली, तरी बाळंभटांस त्यांचे पैसे त्याअगोदर मिळालेले आहेत, सो ही कुड केअर लेस.

त्यामुळे, कोणत्याही जासुदावर पेंढारीहल्ला झाला, तरी बाळंभटावर बहुधा त्याचा परिणाम होऊ नये.

खरी अडचण आहे जर बाळंभटावर पेंढारीहल्ला होऊन त्याच्याजवळची हुंडी लुटली गेली, तर. म्हणजे, हुंडी धनीजोग असल्याखेरीज ती चोरून पेंढार्‍यांना तिचा फारसा उपयोग नसावा, पण बाळंभटाकडे ब्याकप काय, हा प्रश्न उरतोच. (अ.को. किंवा इतर जाणकारांनी खुलासा करावा.)

अरविंद कोल्हटकर Thu, 09/01/2014 - 01:13

In reply to by मिसळपाव

वर 'न'वी ह्यांनी लिहिलेच आहे त्याला जोड.

'खोका' म्हणजे रक्कम चुकती केलेली हुंडी. रक्कम चुकती झाली म्हणजे ती चुकती करणारी पेढी (वरील हरकिसनदास लखमीदास) हुंडीवर तशी नोंद करते आणि आता काहीच मूल्य नसलेला तो खोका पैसे अदा केल्याचा पुरावा म्हणून आपल्याजवळ जपून ठेवते आणि हुंडी लिहिणार्‍या पेढीस (चिपळूणकर)तसे कळवते. चिपळूणकरांची पेढी आपल्या खतावणीपुस्तकात (ledger) हरकिसनदास लखमीदास पेढीच्या खात्यात ती रक्कम जमा बाजूस(credit)लिहिते. हुंडयांची येजा दोन्ही बाजूने चालत असल्याने अशा जमा-नावे रकमा दोन्ही पेढयांच्या खतावण्यांमध्ये एकमेकांच्या नावे पडत राहतात. वर्षाच्या अखेरीस, वा अन्य सोयीस्कर काळाने, प्रत्यक्ष पैशाची देवाणघेवाण होऊन दोन्ही खाती 'शून्य' बाकीवर येतात

मिसळपाव Thu, 09/01/2014 - 08:58

In reply to by अरविंद कोल्हटकर

'न'वी बाजू: व्हेरीफिकेशन आलं नाही एखाद्या हुंडीचं तरी चालू शकेल हे माझ्या ध्यानी आलं नाहि. माझे व्यवहार भटजीबोवांच्याच स्केलचे असल्यामुळे बहुदा!
अरविंदराव: चिपळूणकाराना वर्षाअखेरी सेटल करायला लखमीदासाना पैसे पाठवायचे असले तर कोणाची हुंडी घ्यायचे? :-)

'न'वी बाजू Thu, 09/01/2014 - 11:21

In reply to by मिसळपाव

व्हेरीफिकेशन आलं नाही एखाद्या हुंडीचं तरी चालू शकेल...

(इन्स्टंट रिस्क असेसमेंट करून) असे होत असावे (थोडीफार रिस्क घेतली जात असावी) असा माझा केवळ अंदाज आहे. (पडताळणी केलेली नाही. चूभूद्याघ्या.)

पण माझा (आणि कदाचित तुमचाही) मुख्य प्रश्न अनुत्तरित राहतो. समजा बाळंभटावर पेंढारीहल्ला झाला, नि त्याच्याजवळ मौल्यवान असे काही मिळाले नाही, तर चिडून पेंढार्‍यांनी त्याचे बोचके म्हणा, झोळी म्हणा, जे काही असेल ते लंपास केले. त्या बोचक्यात म्हणा, किंवा झोळीत म्हणा, नेमकी ती हुंडी होती. आता, ती हुंडी धनीजोग असल्याखेरीज पेंढार्‍यांना ती पेयिंग पेढीकडून वटवणे तर शक्य नाही. (पेंढार्‍यांचे साटेलोटे असलेल्या तिसर्‍याच कोठल्यातरी पेढीस डिस्काउंटवर विकणे शक्य आहे की नाही, कल्पना नाही; बहुधा हुंडी बाळंभटाने पेंढार्‍यांच्या नावे केल्याखेरीज हे शक्य नसावे, आणि बाळंभटाकडून पळविलेल्या झोळीत पेंढार्‍यांना ती हुंडी पोस्टफ्याक्टो 'सापडलेली' असल्यास, असे नामांतरण पेंढार्‍यांनी किंवा त्यांच्याशी साटेलोटे असलेल्या सावकाराने फोर्ज केल्याखेरीज - किंवा पेंढार्‍यांच्या सावकाराने ती नामांतरणाशिवायच स्वीकारल्याखेरीज हे शक्य नसावे. अर्थात, पेंढार्‍यांनी समजा बाळंभटाकडून नामांतरण जबरदस्तीने करवून घेतले, किंवा पेंढार्‍यांनी किंवा त्यांच्या सावकाराने ते फोर्ज केले, तरी, पैसे पेंढार्‍यांच्या सावकाराकडून जातील. त्याला ते पेयिंग पेढीकडून वसूल करावे लागतील. कारण हुंडी अल्टिमेटली पेयिंग पेढीवर आहे. पेयिंग पेढीच्या सावकारास जर हा पेंढार्‍यांचा सावकार असले धंदे करतो हे माहीत असेल, किंवा अन्यथा पेंढार्‍याच्या सावकाराची पेयिंग पेढीच्या सावकाराकडे पत नसेल, तर पेयिंग पेढीचा सावकार अशी डिस्काउंटेड आणि नामांतरित हुंडी ऑनर करावयास नकार देईल. कारण, अल्टिमेटली, पेयिंग पेढीचा सावकार बाळंभटास ऑन व्हेरिफिकेशन ऑफ आयडेंटिटी पैसे देणे लागतो, या त्रयस्थ सावकारास नव्हे. या त्रयस्थ सावकाराने बाळंभटाची आयडेंटिटी आणि बाळंभटाने हुंडी स्वतः नामांतरित केली ही बाब व्हेरिफाय केली, आणि हा त्रयस्थ सावकार काही गडबड करत नाहीये, यावर जर पेयिंग पेढीच्या सावकारास विश्वास असेल, तर आणि तरच तो हुंडी ऑनर करेल. असा विश्वास त्या त्रयस्थ सावकाराची (किंवा मध्ये आणखी सावकारांची साखळी असल्यास त्या साखळीमधील अंतिम दुव्याची) पेयिंग पेढीच्या सावकाराजवळ पत असल्यासच निर्माण होईल. थोडक्यात, पेंढार्‍यांच्या सावकाराचा किंवा साखळीतील मधल्या कोणत्यातरी दुव्याचा घाटा होण्याची शक्यता - तो पेंढार्‍यांना किंवा आधीच्या दुव्याला डिस्काउंटेड का होईना, रक्कम तर देऊन बसेल, पण त्याला ती वसूल करता येणार नाही. थोडक्यात, फ्रॉड अशक्य नसले तरी तितके सोपे नाही.) सांगण्याचा मुद्दा, पेंढार्‍यांना ती हुंडी मिळाली तरी पेंढार्‍यांना त्यातून काही अर्थलाभ होण्याची शक्यता जवळपास शून्य. पेंढार्‍यांकरिता ती हुंडी यूसलेस आहे. इथवर ठीक.

मात्र, बाळंभटाजवळ आता ती हुंडी राहिलेली नाही. तर बाळंभट काय करेल? बाळंभटाकरिता जर ते पैसे गेल्यातच जमा असतील, तर मग भले ही पेंढार्‍यांना ती हुंडी वटविता न येवो, पैशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बाळंभटास सोने बाळगण्याऐवजी हुंडी बाळगून नेमका काय फायदा झाला? सोनेनाणे बाळगले असते, तर तेही हरवू किंवा चोरीस जाऊ शकले असते, कबूल. पण मग हुंडीदेखील जर हरवू किंवा चोरीस जाऊ शकत असेल, तर मग हुंडीही गेली अधिक हुंडणावळ गेली, काय फायदा झाला? बाळंभटाने हुंडणावळ देऊन हुंडी नेमकी कशासाठी बनवून घ्यावी, आणि शिवाय ती हुंडी सोनेनाण्यासारखी वाटेत वाटेल तिथे खर्च करता न येण्याची तसदी तरी का उचलावी; त्याऐवजी थेट सोनेनाणेच का बाळगू नये?

कोठेतरी मधला कोठलातरी माहितीचा दुवा गायब आहे. हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या हुंडीकरिता काही बर्‍यापैकी रिलायेबल आणि सोयिस्कर अशी एखादी रिकवरी मेक्यानिझम बाळंभटास उपलब्ध असल्याखेरीज, बाळंभटाच्या दृष्टिकोनातून ही योजना फारशी आकर्षक दिसत नाही. ('माझी चोरी केलीत, पण त्यातून तुम्हाला काहीच मिळाले नाही. मग भले माझे गेले तर गेले. टुकटुक.' असे नैतिक समाधान हा वेगळा भाग आहे.) ज्याअर्थी ही शिष्टम चालत असे, त्याअर्थी अशी काही मेक्यानिझम असली पाहिजे. तिच्याबद्दल जाणून घ्यावयास आवडेल.

मन Thu, 09/01/2014 - 11:35

In reply to by 'न'वी बाजू

हुंडी असणार्‍अय बाळंभटाकडून चोर/दरोडेखोर इतर सर्व जसे की गाय्-घोडे,बैलगाडी,चुकून सोबत आणले असतीलच तर दाग दागिने लुटतील, हुंडी लुटूनही फायदा नसल्याने ती तिथेच सोडून देतील ही शक्यता असू शकते काय?
मागे एक दोनदा पाकिटमारांच्या नैतिकतेचे किस्से ऐकले आहेत. त्यांनी लोकल मध्ये पाकिट मारले, त्यातील रक्कम काढून घेतली, फक्त तिकिटाला लागू शकते तेवढी अंदाजाने त्यात परत ठेवून पाकिट नकळतपणे खिशातही परत घातले मालकाच्या. ह्या प्रकारचे काही किस्से ऐकलेले आहेत, पेप्रात वाचणयत आलेत. चोरांची नैतिकता ,दयाबुद्धी कशी उफाळून येइल सांगता यायचे नाही.
.
.
.
शिवाय ते चोरांचय लेखी कागदाचे चितोरे असण्याची शक्यता अधिक.(सावकाराशी सर्वांचेच साटेलोटे असेल असे नाही.) त्यामुळे तो कागद ते तसाच सोडून देतील ह्याची शक्यता अधिक.
अर्थात, हे शुद्ध अंदाजने लिहितोय.

गवि Thu, 09/01/2014 - 11:50

In reply to by 'न'वी बाजू

सहमत.. एकदा चोरलेल्या मालाची स्क्रुटिनी करुन त्यातले स्वतःला निरुपयोगी पण मूळ मालकाला उपयुक्त असे सामान परत करणे या प्रक्रियेत चोराच्या पार्टीला गोत्यात आणणार्‍या नसत्या भानगडी होऊ शकतात. इतकी मॉरॅलिटी असलेले चोर मुळात या धंद्यात पडतील / राहतील असं वाटत नाही. उपरोक्त उदाहरणे म्हणजे अपवादच असणार.
आणि एकदा का सर्व सामानासहित ती हुंडी चोरली गेली की मग चोराला त्याचा फायदा असो नसो, मूळ मालकाला न्यूसन्स झालाच की..

मन Thu, 09/01/2014 - 12:15

In reply to by 'न'वी बाजू

हुंडी चोराने मागाहून परत करण्याची शक्यता ना के बराबार , हे मान्य.
मुळात चोरतानाच त्याला यजमानाने "हे तुझ्या कामाचे नाही, निदान माझ्या आहे. ते सोडून दे. बाकीचे काय वाटेल ते घेउन जा(घेउन जातच आहेस)." अशी ऑफर देता येणे शक्य आहे.
शिवाय मोठे,जड सोनेनाणे सांभाळण्यापेक्षा हुंडीचा कागद सांभाळणे, लपवणे सोपे असावे.
(लंगोटमध्ये चेक लपवता यावा. हुंडीही येत असेल.(लंगोट, हुंडी आणि प्रवाशाचे माप ह्यावर अर्थातच ते अवलंबून आहे.)) इतररत्रही दरवेळी लपवता यावा. तहानलाडूमध्ये, वॉटारबॅगमध्ये एखादा चोरकप्पा केला, त्यात कागदाची पुंगळी लपवली. नंतर दरवडेखोराने सगळे सामान पालथे घातले. हाती लागते ते नेले असे शक्य आहे. तहानलाडू त्याने हलवून पाहिला, पण त्यात सोन्या-नाणयचा आवाज आला नाही, आतमध्ये भांड्यात फक्त पाणीच दिसले किंवा भांडे रिकामे दिसले तर तो ते सोडून देइल; हा चान्स.
शिवाय "हुंडीचा कागद कुठे लपविलास भोसडिच्या" असे म्हणत दरवडेखोर प्रवाशाला कानफडात मारण्याची शक्यता कमी.
अशी एक पितळी वॉटरबॅग, पितळी तहानलाडू माझ्या घरी दशकभरापूर्वीपर्यंत होता. त्या छुप्या कप्प्याचा वापर काय हा प्रश्न पडे. त्यावर "त्यात नाणी लपवता येतात" असे उत्तर आले. व तो हलवल्यास नाण्यांचा आवाज नाही का होणार? आणि लपवून लपवून किती नाणी लपवणार? ह्यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते. दुसर्या प्रश्ना उत्तर होते की "आमच्या काळी स्वस्ताइ होती. काही नाण्यात काम होउन जाइ. एका आण्यात दूध मिळे " वगैरे वगरिए स्वस्ताइची वर्णने.
सध्या अंदाजाने ते उत्तर शोधत आहे.
अशी भांडी पारंपरिक वस्तू जिथे मिळतात, तेथील मोठ्या व्यापार्‍यांकडे आजही उपलब्ध असावीत, हौशी लोकांसाठी.पुणे,कोल्हापूर, कनौज येथील जुन्या होलसेलर भांड्याच्या दुकानांच्या घरण्यांकडे हे असेल असा अजून एक अंदाज करतो.
.
.
.
हा तहानलाडू कसा असे? एक जाड पितळी गोल गरगरित सुबक तांब्या. त्याचे बूड सपाट व लैच जाड असे. पाहणार्याला ते सलग , भरीव बूड वाटे, पण त्यात अलगद अशी छोटीशी चिर हलवून ते उघडता येइ आडावे.(क्रॉस सेक्शन) व आतमध्ये एखाद दोन सेंटिमीटर उंच इतका कप्पा असे .
उंची किती? तर त्यात एकावर एक दोन तीन नाणी फारतर ठेवता यावीत. पण आडवी नाणी बरीच(ते त्या भांड्याच्या बुडाच्या आकारवर , साइअझवर अवलंबून) ठेवता यावीत.

गवि Thu, 09/01/2014 - 12:25

In reply to by मन

अर्थातच हुंडी कॅशपेक्षा शतपटीने सेफ आहे हे मान्यच आहे, (धनीजोग नसल्यास).

चोरीच्या बाबतीत एक मुख्य फायद्याचा मुद्दा असा की हुंडीचा कागद चोरीला गेला तरी चोर ती डेस्टिनेशनच्या गावी जाऊन वटवू शकणार नाही (शहा लोकांना जमवणे शक्य नसल्याने). तस्मात हुंडीमालकाला गन्तव्यस्थानी जरी ही रक्कम कामास आली नाही तरी परत आल्यावर मूळ हुंडी बनवणार्‍याकडून ती न वटल्याची खात्री पटवून देऊन आणि ती कायमची रद्दबातल ठरवून आणि त्याबद्दल काही पेनल्टी असल्यास ती भरुन मूळ रकमेतली बरीचशी रिकव्हर करणे शक्य होत असावे असं वाटतं. प्रत्यक्षात असं होत होतं का? असणार, अन्यथा ही पद्धत लोकप्रिय झाली नसती.

अरविंद कोल्हटकर Thu, 09/01/2014 - 23:44

In reply to by 'न'वी बाजू

हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या हुंडीकरिता काही बर्‍यापैकी रिलायेबल आणि सोयिस्कर अशी एखादी रिकवरी मेक्यानिझम बाळंभटास उपलब्ध असल्याखेरीज, बाळंभटाच्या दृष्टिकोनातून ही योजना फारशी आकर्षक दिसत नाही.>

ह्याचे उत्तर असे की हुंडी चोरीस गेली अथवा गहाळ झाली तर हुंडी आणि तिचे पेठपत्र पुनः करून द्यायची पद्धत होती. ह्या दुसर्‍या पेठपत्राला परपेठ असे नाव होते.

अधिक माहितीसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट गझेट अथवा अहमदनगर डिस्ट्रिक्ट गझेट मधील पाने पहा. अन्य गझेटांमध्येहि ही माहिती असू शकेल पण ती शोधलेली नाही.

मिसळपाव Fri, 10/01/2014 - 01:24

In reply to by अरविंद कोल्हटकर

तुम्हा सगळ्यांच्या या प्रतिसादातून (निदान शहाजोग हुंडीसाठी तरी);
- बाळंभटांकडून पेंढार्‍याने हुंडी लुटली तरी त्याला (पेंढार्‍याला) ती वटवता यायची शक्यता फार म्हणजे फारच कमी आहे. किंवा बाळंभटांकडून हुंडी सांडली आणि कोणाच्या हाती लागली तरी ती मिळालेला माणूस त्याचे पैसे हडप करू शकत नाही.
- जवळच्या सामानात (उदा. तहानलाडू) किंवा अंगावरच्या वस्त्रात हुंडी लपवणे, पेंढार्‍याने गाठलं तरी वाचवणे सोईचे/शक्य होते. (बाय द वे, मनोबा, "तुला उपयोग नाहि, मला आहे, तस्मात हुंडी घेउ नको" असं सांगितलं पेंढार्‍याला तर तो नक्कि खवळून जीव घेईल. नपेक्षा सगळ्या पेंढार्‍यांचा धंदाच बसेल!!)
- खोका पळवला गेला तरी चिपळूणकर आणि लखमीदास त्याचा हिशोब बरोबर करू शकतात
- बाळंभटांची हुंडी गाईने खाल्ली, किंवा समजा एखाद्या 'नवशिक्या' पेंढार्‍याने पळवली :-), तरी ते 'परपेठ' करून मूळ रक्कम (निदान बरीचशी) परत मिळवू शकत असत. हे अर्थातच कटकटीचं असणार. ("सहा महिने लखमीदासांकडे वटवायला आली नाही की मग बघू" असं काहीतरी चिपळूणकर नक्किच सांगणार! ) पण शक्य होतं.

असं सगळ होतं म्हणून हुंड्या चालायच्या.

ता.क. - मनोबा, तू स्वस्ताईबद्दल लिहिलं आहेस. परवाच बाबा जुन्या डायरीतल्या नोंदी ऐकवत होते. साधारण ५८ साली गिरगाव ते दादर टॅक्सीचा खर्च - रुपये अडीच! "म्हाराजांच्या टायंबाला, रुप्याला बारा शेर दूद" च्याहि वरताण !!

राजेश घासकडवी Wed, 08/01/2014 - 07:14

लेख आवडला. आधुनिक बॅंकिंग व्यवस्था बीजावस्थेत कशी दिसत होती याचं छान चित्र मांडलेलं आहे.

काही महिन्यांपूर्वी एका ठगाच्या आत्मकथनावर आधारित कादंबरी - कन्फेशन्स ऑफ अ ठग - वाचली होती. त्यावरून प्रवास करणं किती धोकादायक होतं याचा अंदाज आला होता.

आधुनिक काळात जागोजागी पैसे देणारी एटीएम मशीन्स असण्याने, बऱ्याच खरेद्या क्रेडिट कार्डने करता येण्याने, सहजी चेक लिहिता येण्याने केवढी प्रचंड सोय झालेली आहे हे आपल्याला कधी कधी लक्षातही येत नाही.

ऋषिकेश Wed, 08/01/2014 - 10:08

उत्तम लेख.

माझ्याही डोक्यात ही हुंडीच चोरांनी लुटली तर काय?
बाकी, ट्रॅवलर्स चेक व हुंडीत बरेच साधार्म्य वाटले. यात फरक काय?

बाकी हवाला/हुंडी आणि मनीग्राम मध्ये फरक काय?

अनुप ढेरे Wed, 08/01/2014 - 10:25

भारतातल्या भारतात पण हवाला सदृश प्रकारे पैशांची उलाढाल करतात, विशेषतः व्यापारी लोक. पण त्यात बहुतेक सगळा काळा पैसा फिरत असतो. नुस्त्या चिठ्ठ्या-चपाट्यांवर कोट्यावधीचे व्यवहार होतात.

विसुनाना Wed, 08/01/2014 - 13:01

हुंडा, हुंडी आणि हंडी या तीन शब्दात काही अर्थसाधर्म्य असावे का असा विचार मनात आला.
अत्यंत दूरचा शब्द - 'हबेलहंडी' - या शब्दाचे मूळ कुठे असेल?

लेख आवडला हे उगाचच वेगळे सांगितल्यासारखे वाटते.

शहराजाद Wed, 08/01/2014 - 22:46

In reply to by विसुनाना

मला तो शब्द हाबेलंडी किंवा हबेलंडी असा माहित आहे.वि. वा. भिड्यांच्या 'मराठी भाषेतील म्हणी आणि वाक्प्रचार' पुस्तकात हाबेलंडी शब्दाचा उगम 'हा बे लवंडी, म्हणजे, अरे बायल्या असे उपहासाने म्हणावे अशी वेळ येणे' असा वाचल्याचे आठवते. ते तितकेसे पटत नाही, पण या हाबेलंडी उडणे यासाठीचे दुसरे कुठले स्पष्टीकरणही ऐकिवात नाही.

गवि Wed, 08/01/2014 - 13:47

बाय द वे.. सध्याची चलनी नोट (उदा. ५०० रु. ची) ही प्रक्रियेचे सुलभीकरण केलेली आणि लाखो आउटलेट्स मधे स्वीकारली जाणारी "धनीजोग" हुंडी आहे असं म्हणता येईल का?

बॅटमॅन Thu, 09/01/2014 - 00:03

लेख फार मस्त झाला आहे. पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा. शहाजोग या शब्दाचा अर्थ कळाला त्याबद्द्ल ट्रिप्प्पल धन्यवाद.

पुनर्वाचन करतना एका शब्दाकडे लक्ष गेले - "परचुटन". हा शब्द खूपच कमी वेळेस वाचला आहे, मेबी एकदोनदाच अन तोही जुनी पुस्तके वाचतानाच. त्याचा अर्थ काय?? जुना रूढ शब्द आहे की कोकणस्थ-स्पेसिफिक आहे?

अरविंद कोल्हटकर Thu, 09/01/2014 - 03:22

In reply to by बॅटमॅन

परचुरण म्हणजे किरकोळ, miscellaneous. हा शब्द गुजराथी-मारवाडी हिशेब वह्यांमध्ये अनेकदा भेटतो. मुख्य नाण्यापलीकडे अन्य जातीच्या नाण्यांची चिल्लर, परचुरण खर्च अशा संदर्भात त्याचा वापर होतो. जुने मराठी लेखक ह्याचेच परचुटन असे रूपान्तर वापरत असत. तोच शब्द मी ह्या लेखाच्या प्रकृतीशी जुळता म्हणून वापरला आहे.

ऋषिकेश Thu, 09/01/2014 - 08:43

In reply to by बॅटमॅन

परचुटण गुजराती शब्द आहे हे तुझ्या प्रतिसादानंतर ध्यानात आले. मुंबईतील मित्रांपैकी जे हा शब्द सर्रास वापरतात (अजूनही!) ते सगळेच गुज्जु असल्याचे लक्षात आले.
अर्थात त्यांचा च' चा उच्चार अमराठी अर्थात चम्मच सारखा.. शिवाय ण नाहि न.. परचुट्न.

अर्थात हे लक्षात रहायचे कारण शेवटची तीन अक्षरे आणि ज्यु कॉलेज मध्ये असताना या शब्दाचा श्या म्हणून केलेला वापर आहे! उदा: वो तो साला एक नंबर का परच्युटन् है! ;)

धनंजय Wed, 08/01/2014 - 22:22

नवे शब्द आणि नवे तपशील कळले. मूळ कागदपत्रांची चित्रे आणि आलेख असल्यामुळे माहिती अधिक कसदार झाली.

हुंडीव्यवहार बहुधा अजून प्रचलित असावा. आंतरराष्ट्रीय हवाला कुप्रसिद्ध असला, तरी देशाच्या अंतर्गतसुद्धा सरकारला न सांगता हुंडीने पैशांची देवाणघेवाण होत असेल.

आजकालचे बॅकेचे डिमांड ड्राफ्ट (यू.एस मध्ये त्याला कॅशियर्स चेक म्हणतात, वाटते), तसेच ट्रॅव्हलर्स चेक आणि पूर्वीची हुंडी यांच्यात काहीएक फरक नाही. बँक हुंडणावळ घेते. त्याच प्रमाणे वायर ट्रान्सफरही. ज्या देशांच्या चलनी नोटा म्हणजे कुठल्याशा मध्यवर्ती बँकेच्या प्रॉमिसरी नोटा आहेत, त्यांच्यात पूर्वी हुंडी असल्याचे शाब्दिक अवशेष दिसतात. परंतु नोटांच्या बदल्यात नाणी मिळण्याचे वायदे उपचारापुरते असतात, बदल्यात खरी नाणी कधीच मिळत नाहीत, म्हणून या नोटा आता हुंड्या राहिलेल्या नाहीत.

वैयक्तिक धनादेश हा सुद्धा हुंडीसारखाच आहे.

अरविंद कोल्हटकर Thu, 09/01/2014 - 02:09

In reply to by धनंजय

तसे पाहिले तर हुंडीने पैसे पाठविण्यात बेकायदेशीर काही नाही आणि ज्याची इच्छा असेल तो त्यांचा वापर करू शकतो. मला ऩक्की कल्पना नाही पण जुन्या प्रकारची हुंडी Negotiable Instruments Act खाली Negotiable Instrument मानली जात नाही. हुंडी पूर्णपणे विश्वासावर चालते पण काही वांधा निर्माण झाला तर Negotiable Instruments Act खाली न्यायालयात जाता येणार नाही ही अडचण आहे.

ज्याला काळा पैसा (ज्यावर आयकर भरायला हवा होता पण भरलेला नाही असा पैसा) वापरायची इच्छा असेल तो असा पैसा हुंडीमार्गाने पाठवू शकेल पण हे करायची तितकी गरज नाही. तेच काम दूरच्या बँकेमधून बेअरर ड्राफ्ट घेऊनहि करता येईल.

आयकर खात्यात ६०-७०च्या काळात 'हुंडी रॅकेट' नावाचे प्रकरण बरेच गाजत होते. मुंबईतील व्यापारी आपल्याच काळ्या पैशाने हुंडी ब्रोकरमार्फत हुंडी मिळवून आपल्या वह्यात तो पैसा हुंडीकर्ज म्हणून वापरत असत आणि काम भागले म्हणजे तो पैसा हुंडी कर्ज परत केले अशा मिषाने धंद्यामधून बाहेर काढत. सिंधमधील शिकारपूरचे व्यापारी इकडे आले आणि त्यांनी 'शिकारपूर सिंधी असोसिएशन' नावाची informal संस्था काढली. हीच संस्था ह्या सगळ्या प्रकरणात पुढारी होती.

राही Thu, 09/01/2014 - 00:25

डिमांड ड्राफ्ट ही हुंडीच आहे. एका ठिकाणी पैसे भरून त्याचे कागद दुसरीकडे दाखवल्यावर पैसे मिळण्याची सोय, आणि निकडीच्या प्रसंगी हे कागद मधेच वटवून थोडे कमी का होईना, ताबडतोब पैसे मिळण्याची सोय ही हुंडीची वैशिष्ट्ये डिमांड ड्राफ्ट मध्ये आहेत.
आपल्याकडे फाळणीपूर्वी 'मुलतानी हुंडी' तिच्या पक्केपणामुळे प्रसिद्ध होती. तिचा अनादर सहसा होत नसे. मुलतानचे लाला लोक हे एक जबरदस्त प्रकरण असे. त्यांना फसवणे अशक्यच असे. त्यांच्या पदरी पैसेवसूलीसाठी गुंडांची फौज असे तसेच सावकारी पेढ्यांची पत जाणून घेण्यासाठी हेरांचे जाळेही असे.
सध्याही चिट्ठ्याचपाट्यांद्वारे पैशाचे व्यवहार होतातच.
लेख उत्कृष्ट आहे.

पराग पाटील Thu, 09/01/2014 - 01:28

//चिपळूणकरांनी त्याच दिवशी हरकिसनदास लखमीदास पेढीला त्यांच्यावर अशी हुंडी लिहिल्याचे पेठपत्र जासूदाबरोबर वेगळे रवाना केले आहे.
//त्या खात्यात ही रक्कम आता नावे लिहिली जाईल आणि हुंडीचा खोका आता जासूदाबरोबर उलट चिपळूणकरांकडे पोहोचेल.

१.५ टक्के व्याजावर माणसे एवढ्या लांबवर पाठवून पुण्याच्या पेढीला नफा कसा होत असेल?

अरविंद कोल्हटकर Thu, 09/01/2014 - 03:05

In reply to by पराग पाटील

एकटे पत्र जासूदजोडीबरोबर पाठवणे अर्थातच आतबट्टयाचे ठरेल. असे कोणी करतहि नव्हते.

पेशव्यांच्या फौजा हिंदुस्तानभर हिंडू लागल्यावर महत्त्वाच्या शहरांमध्ये सरकारी आणि सावकारी डाका निर्माण झाल्या होत्या. (बाळाजी बाजीराव पेशव्यांना पानिपतमधल्या दारुण पराभवाची बातमी ते हिंदुस्तानच्या वाटेवर असतांना भेलसा येथे सावकारी डाक नेणार्‍या जासूदाकडून कळली हे प्रसिद्धच आहे. पहा रियासत भाग २). कल्याण-काशी, सातारा-ग्वाल्हेर अशा काही डा़कांचा उल्लेख 'पेशवाईच्या सावली'त आहेच. डाकेबरोबरची पत्रे वजनावर घेत असत आणि तोळ्याला ४ आणे असा दर होता. अनेक जणांची अनेक पत्रे डाकेने गेल्यावर खर्च वाटला जाईलच.

अरविंद कोल्हटकर Wed, 20/01/2016 - 02:42

दोन वर्षांपूर्वीचा हा धागा वर आणण्याचे कारण असे की १३व्या-१४व्या शतकांमध्ये शासकीय पत्रव्यवहार, व्यापारी दस्तऐवज, कौटुंबिक पत्रे कशी लिहावी हे सोदाहरण दाखवणारे 'लेखपद्धति' नावाचे संस्कृत पुस्तक माझ्यासमोर आले. हे पुस्तक गुजराथमधील अनहिलवाडा - अनहिलपट्टणच्या परिसरात त्या काळात लिहिले असावे असे अंतर्गत उल्लेखांवरून कळते. पुस्तकाचा लेखक कोण असावा हा अनुत्तरित प्रश्न आहे. पुस्तक गायकवाड संस्कृत सीरीजमध्ये १९२५ साली छापण्यात आले. महाराष्ट्रात कारकुनी पेशाच्या व्यावसायिकांसाठी 'मेस्तके' लिहिली जात त्या धर्तीचेच हे पुस्तक आहे. त्यामध्ये तत्कालीन राजव्यवहारातील दोन हुंडयांचे नमुने दाखविले आहेत. त्यांना 'राजहुंडिका' असे म्हटले आहे. (मोनियर विल्यम्सच्या कोशामध्ये अशा हुंडिकेचा उल्लेख कल्हणाच्या 'राजतरंगिणी'मध्येहि - १२वे शतक - केला गेल्याचे नमूद केले आहे.) दोन हुंडया आणि त्यांची मराठी भाषान्तरे अशी:

स्वस्ति। महामण्डलेश्वरराणकश्रीअमुकाक: स्वमण्डले अधिकारिणममुकाकं समादिशति यथा। आदेष्टव्यम्। यत् राज०००अमुकाकस्य भवता प्रथमोद्ग्राहितपोत्तकात्देयद्र० ३००० सहस्रत्रितयं द्रम्मा देया: तथा तत्रसमायाततदीयपदातिजन ८ अष्टपदातीनां द्रम्माणां विशुद्धिं यावत् दिनं प्रति देयं कणभक्तक ८। संवत्००० ज्येष्ठ शुदि १५ गुरौ। मतं श्री:। दू० स्वयमेवादेश:।

स्वस्ति। महामण्डलेश्वर राजपुरुष श्री अमुक आपल्या मंडलातील अधिकारी अमुक ह्याला आदेश देत आहे. आदेश असा. महाराज अमुक ह्यांच्यासाठी तू आतापर्यंत गोळा केलेल्या महसूलापैकी ३००० द्रम्म आता देणे आहेत. महाराजांचे आठ पायदळ शिपाई तेथे आलेले आहेत. रक्कम संपेपर्यंत त्या आठ जणांना प्रतिदिन धान्याचा शिधा पुरवला जावा. संवत् ००० ज्येष्ठ शुद्ध १५ गुरुवार. सहीशिक्का. दूताहस्ते आदेश पाठविला आहे.

राजादेशात् अथ श्रीअमुकवचनात् अमुकदेशे अमुकाकस्य हुण्डिका लिख्यते यथा। राज०अमुकाउत्तअमुकाकस्य फलितपदे हुण्डिकाचारेण देयद्र० १२४ चतुर्विंशत्यधिकशतमेकं देयम्। अवधौ दिन १५। ऊर्ध्वदिनपाटिकायां दिनं प्रति देयद्र० १ क० २। संवत् ००० वर्षे ज्येष्ठ शु० ८ भौमे। मतम्।

श्रीअमुक महाराजांच्या आज्ञेवरून अमुक स्थानी असलेल्या अमुक अधिकार्‍याला हुंडी लिहिली ती अशी: महाराज अमुक ह्यांनी नेमलेल्या अमुक अधिकार्‍याने ही हुंडी मुदतबंद झाल्यावर द्रम्म १२४ शब्दात चोवीस आणि वर एक शेकडा भरणा करावयाचा आहे, हुंडीची मुदत १५ दिवस. मुदतीनंतर प्रत्येक दिवसामागे द्रम्म १ कला २ (१ कला = द्रम्माचा १६वा भाग?) (इतके व्याज भरायचे आहे.) संवत् ००० ज्येष्ठ शुद्ध ८ मंगळवार.

अरविंद कोल्हटकर Thu, 21/01/2016 - 20:57

वरती प्रतिसादांमधून 'परचुरण' आणि 'परपेठ' ह्या शब्दांविषयी काही चर्चा झाली आहे. ह्या शब्दांबद्दल 'A Glossary of Judicial and Revenue Terms' ह्या एच.एच.विल्सन ह्यानी लिहिलेल्या पुस्तकामधून थोडी अधिक माहिती मिळाली.

'परचुरण' हा शब्द सध्या अधिक करून गुजराथी बोलणार्‍यांच्या तोंडात आणि लिहिण्यात आहे असे दिसते. पण विल्सन ह्यांनी तो मूळचा मराठी असल्याचे नोंदवले आहे. ती नोंद अशी आहे: "Parchuran, Mar. (परचुरण) Coin of various currencies as distinguished from current coin." मोरेश्वरशास्त्री हाच अर्थ अधिक विस्ताराने दाखवितात आणि हा शब्द गुजराथी असल्याचे ते सुचवीत नाहीत. 'परि+चूर्ण' असा त्याचा उगम ते दाखवितात. मूळचा मराठी शब्द आता सासरी गुजराथमध्ये जाऊन माहेर विसरला आहे असे दिसते.

पेठ-परपेठ ह्याबद्दल विल्सनसाहेब सांगतात "Painth = Bill of Exchange." "Parpainth + Duplicate Bill of Exchange." सध्या आपण 'पेठ'चा 'गावाचा एक भाग', 'बाजाराची जागा' इतकाच अर्थ घेतो पण 'मूळ हुंडीपत्र' असाहि त्याचा अर्थ आहे असे दिसते.

आपल्या नेहमी वापरातल्या 'आतबट्टा' ह्या शब्दाचाहि उगम कळला. एखादे नाणे (उदा.चांदवड रुपये) बदलून दुसर्‍या नाण्यात (उदा. सिक्का रुपये) रक्कम घ्यायची असेल तर त्या नाण्याच्या दर्जाप्रमाणे आणि बाजारातील स्वीकाराप्रमाणे कमी अथवा अधिक रुपये मिळतील. कमी मिळाल्यास दृश्यमान तोटा म्हणजे 'आतबट्टा' आणि त्याच्याविरुद्धचा तो 'बाहेरबट्टा' असे अर्थ मोरेश्वरशास्त्री आणि विल्सन देतात.