Skip to main content

पर्सनल फायनान्स - भाग ४ - सुरुवात कुठून करायची

या आधीच्या भागात आपण बघितले की आपले उत्पन्न कसे मिळवायचे.
पर्सनल फायनान्सचे मुख्य उद्दिष्ट आहे की आपली गंगाजळी (Net Worth) वाढवणे आणि त्याचा सरळ मार्ग म्हणजे आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करून उरलेली शिल्लक योग्य त्या प्रकारे गुंतवून त्याची वाढ करणे. हा मार्ग सरळ वाटला, तरी अगदी सरळसोपा नाही, त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात आणि मुख्य म्हणजे स्वतःवर संयम ठेवावा लागतो.

आता बघुया की सुरुवात कुठून करायची आणि पर्सनल फायनान्सचे काय-काय टप्पे आहेत.
१) सद्य-परिस्थितीची चाचपणी (Assessment): सर्वप्रथम आपले उत्पन्न किती आणि खर्च किती याचा आढावा घ्यावा. एका वहीत महिन्याचा जमा-खर्च लिहून काढा. (सॉफ्टवेर वापरले तरी उत्तम). खर्चात पण आवश्यक खर्च कोणते आणि अनावश्यक खर्च कोणते, याचे वर्गीकरण केले तर छानच. अनावश्यक खर्च कमी केल्याने अधिक पैसे शिल्लक टाकता येतील आणि ते चक्रवाढ व्याजामुळे अजून आणि पटपट वाढू शकतील. तुमचे या क्षणी नेटवर्थ किती, असे कुणी जर विचारले तर साधारणतः +/- १०% इतका अचूक अंदाज तुम्हाला करता यायला पाहिजे. त्यासाठी तुमच्या अ‍ॅसेट्स आणि लाएबिलिटीजची माहिती तुम्हाला असणे जरुरीचे आहे.

२) उद्दिष्ट बनविणे (Goal setting): नंतर तुमची उद्दिष्टे काय ते ठरवा. यात शॉर्ट-टर्म उद्दिष्टे (१-२ वर्षातील) असू शकतील उदा. नवी खरेदी (कपडे, बूट, टीव्ही, घरातल्या वस्तू वगैरे), स्वतः अजून शिक्षण घेणे, मोटरसायकल घेणे, क्रेडिटकार्डाचे कर्ज फेडणे वगैरे. लाँग-टर्म उद्दिष्टे म्हणजे ५ वर्ष किंवा नंतरच्या कालावधीतली उद्दिष्टे समजा उदा. घर-खरेदी किंवा घराचे कर्ज पूर्णपणे फेडणे, मुलांचे शिक्षण, लग्नकार्य, निवृत्त होणे इत्यादी. (६० व्या वर्षी १ कोटी रुपये हवेत वगैरे.) उद्दिष्ट (Goal) बनवताना ते SMART असले पाहिजे, म्हणजे Specific, Measurable, Action-oriented, Realistic, Time-based.

३) प्लॅन तयार करणे: यात महत्वाचे म्हणजे वार्षिक अंदाजपत्रक (budget) बनवा. वर्षाच्या अखेरीस नेटवर्थ साधारण किती वाढले पाहिजे, ते ठरवा आणि ते साध्य करण्यासाठी प्लॅन तयार करा. यात उत्पन्न वाढवता येईल का? (दुसरी नोकरी/धंदा करून वगैरे) किंवा वायफळ खर्च कसा कमी करणार, ते ठरवा. उदा. हॉटेलिंग कमी करणार असे मोघम न ठरवता, फारतर आठवडयात १दा हॉटेलात जाईन आणि माझे महिन्याचे बजेट रुपये 'क्ष' आहे, असे ठरवा. तसेच प्लॅन करताना स्वतःचे रिस्क प्रोफाईल काय आहे, ते जाणून घ्या. तुम्हाला स्वतःला कळले पाहिजे की तुम्ही स्वतः किती रिस्क घ्यायला तयार आहात आणि म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करू शकता/कर्ज कमी करू शकता.

४) अंमलबजावणी (Execution): माझ्यामते हा सर्वात कठीण भाग आहे. अचानक येणार्‍या खर्चामुळे पुरेशी शिल्लक उरत नाही, असा अनुभव एखाद्यावेळी आला तर समजू शकतो. पण जर वरचेवर असे व्हायला लागले, तर तुमचा प्लॅन गडगडायला वेळ लागणार नाही. याच्यावर एक उपाय म्हणजे बँकेच्या खात्यातून दर महिन्याला ऑटो-डेबिटने परस्पर गुंतवणूक करणे. या सवयीमुळे नियमित बचत होते आणि उरलेल्या पैशातच भागवायची सवय लागते.

५) देखरेख (Monitoring and reassessment): वर्षातून एकदा तरी तुमच्या प्रगतीचा आढावा घ्या. तुमचा प्लॅन यशस्वी झाला की नाही, यशस्वी/अयशस्वी का झाला याचा विचार करा आणि त्यानुसार पुढच्या प्लॅनमध्ये काही बदल करावे लागतील का? ते ठरवा.

लहान मुलांना आणि तरुण मुलामुलींसाठी उपयुक्त माहिती मिळण्याचे संकेतस्थळः MyMoney.gov

हे तुम्हाला माहीत आहे का?
जर तुम्ही वयाच्या ३१ ते ६५ वर्षे अशी ३५ वर्षे, वर्षाला फक्त रुपये २,००० गुंतवले आणि त्यात ९% वाढ झाली तर तुम्हाला ६५ व्या वर्षी रुपये ४,७०,२४९ मिळतील. पण तेच रुपये दरवर्षी २,००० प्रमाणे तुम्ही वयाच्या २२ ते ३० अशी फक्त ९ वर्ष गुंतवले आणि त्यात ९% वाढ झाली तर तुम्हाला ६५ व्या वर्षी मिळतील रुपये ५,७९,४७१!
सर्वात महत्वाचे: बचत सुरू करा आणि ती लवकरात लवकर सुरू करा!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अजो१२३ Tue, 29/07/2014 - 11:03

प्रशंसनीय मांडणी.
------------------
ते तत्त्वज्ञान वैगेरे टाका ना राव.

उदय. Tue, 29/07/2014 - 11:09

In reply to by अजो१२३

येईल, येईल. तत्त्वज्ञान पण येईल.
तत्त्वज्ञान वगैरे पोट भरल्यावर बोलायच्या गोष्टी आहेत. आत्ता कुठे स्वयंपाक काय करायचा, कसा करायचा, किती करायचा याचीच तयारी सुरू आहे. :)

अतिशहाणा Tue, 29/07/2014 - 16:09

लहान झालाय भाग. पण छान आहे.

SMART मधील A हा Achievable साठी असतो असे कालच वाचले होते. असो.

उदय. Wed, 30/07/2014 - 01:22

In reply to by अतिशहाणा

तुम्ही लिहिले ते बरोबर आहे, माझे मत तसेच आहे. पण माझ्या कंपनीत A = action-oriented आहे, त्याची सवय झाली. (HR च्या मते तुम्ही काय अ‍ॅक्शन घेता ते महत्वाचे आहे, अन्यथा सर्वकाही Achievable आहे.)

गब्बर सिंग Wed, 30/07/2014 - 01:36

या सवयीमुळे नियमित बचत होते आणि उरलेल्या पैशातच भागवायची सवय लागते.

अधोरेखित वाक्य सर्वात महत्वाचे आहे.

---

१) सद्यपरिस्थितीची चाचपणी - हे करताना तुमचे आजचे वय अवश्य लक्षात घ्या. ते खूप महत्वाचे आहे. You do not want to fall into a situation in which you outlive your lifelong savings + PF + Gratuity. तुम्हास आमरण पेन्शन असेल तर प्रश्न कमी भेडसावतो.

ऋषिकेश Wed, 30/07/2014 - 14:46

छान. हा भागही आवडला
शेवटच्या गणिताचं स्पष्टीकरणही वाचायला आवडेल. ३० व्या वर्षापर्यंत गुंतवणून करून ६५व्या वर्षी पैसे मिळाले ते कसे?

अपरिमेय Thu, 31/07/2014 - 09:00

In reply to by उदय.

थोडासा असहमत आहे. समजा आज माझे वय २२ वर्षे आहे, मला वयाच्या ६५व्या वर्षी जवळपास साडेपाच लाख हवे आहेत. तुमच्या गणितानुसार गुंतवणुकीसाठी माझ्याकडे दोन मार्ग आहेत.
१) वय वर्षे २२ ते ३० पर्यंत दरवर्षी २००० रुपये गुंतवणे (एकंदरीत १८००० गुंतवणुक)
२) आज काहीच न गुंतवता २९ ते ६५ पर्यंत दरवर्षी २००० रुपये गुंतवणे (एकंदरीत ७४००० गुंतवणुक) (हा कालावधी तुमच्या कालावधीपेक्षा २ वर्षे जास्त आहे)
थोडक्यात दुसर्‍या पर्यायात जवळपास सारख्या परताव्यासाठी मला ४.१ पट रक्कम गुंतवावी लागत आहे. हे प्रथमदर्शनी खूपच वाईट दिसते.
पण..
२२ ते ६५ हा कालावधी खूप मोठा आहे (४४ वर्षे) आणी त्यामुळे चलनवाढीचा परिणाम नगण्य धरून चालणार नाही. जर चलनवाढीचा दर ८.५% मानला तर या दोनही पर्यायांची net present value सारखीच येते (~१३,५००). जर चलनवाढीचा दर ८,५% पेक्षा जास्त असेल तर दुसरा पर्याय जास्त आकर्षक आहे. भारतात गेल्या चार वर्षात चलनवाढीचा दर हा ८% ते १२% यामधे राहिला आहे. जर आपण चलनवाढीचा दर ६% मानला (आणी गुंतवणुकीवर ९% म्हणजे चलनवाढीपेक्षा ३% जास्त परतावा) तर दुसर्‍या पर्यायाची NPV जवळपास १.४४ पट आहे. हे पहिल्या पर्यायापेक्षा नक्कीच वाईट आहे पण ४.११ पट इतकेही वाईट नाही.

ऋषिकेश Thu, 31/07/2014 - 10:41

In reply to by अपरिमेय

सहमत आहे. इतके नेमके मांडल्याबद्दल आभार!
मी २२ वर्षांचा असताना दरमहा २००० किंवा कोणतीही 'क्ष' रक्कम गुंतवणे मला जितके कठीण होते तितके ३१व्या वर्षी नसेल कारण एकतर त्या 'क्ष' रकमेची किंमत कमी झाली असेल + माझी मिळकत (चलनवाढीच्या दरापेक्षाही) काही पटिंनी वाढली असेल. मग माझ्या मिळकतीतील तेवढीच (क्ष) रक्कम गुंतवणे फार आतबट्ट्याचे कसे ठरावे?

चीजपफ Thu, 31/07/2014 - 22:47

In reply to by ऋषिकेश

बचत/गुन्तवणूक हा काही सवयीचा भाग असतो (व्यायामासारखा). उत्पन्न कितीही असले तरी काही भाग (उदा: १०%) नियमितपणे गुन्तवणे जरुरी. अचानक ३१व्या वर्षी गुन्तवणूक करणे कठीण होते.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 20:10

In reply to by चीजपफ

बचत/गुन्तवणूक हा काही सवयीचा भाग असतो (व्यायामासारखा). उत्पन्न कितीही असले तरी काही भाग (उदा: १०%) नियमितपणे गुन्तवणे जरुरी.

माणूस आयुष्यात खूप मोठी गुंतवणूक घरात (म्हणजे विकत घेण्यात) करतो. तर
१. एकतर मुलांनी सांभाळावे नि घर त्यांचेकडे ठेवावे.
२. नाहीतर मुलांनी आपापले पाहावे, नि आपण रेवर्स मोर्ट्गेज करावे.
------------------
गुंतवणूक करणे आवश्यक आहेच असं नाही. "आदर्शतः" आयुष्यात तुम्ही जितका 'रियल व्हॅल्यू' कमावता तितकाच तुम्हाला खर्चायला मिळतो. थोडा जास्त नाही, थोडा कमी नाही. गुंतवणूक म्हणजे केवळ 'जास्त उत्पन्नाचा काळ' नि 'जास्त खर्चायची गरज असलेला काळ' यामधे पैसा कुठे ठेवायचा त्याची जागा.
अर्थातच निवृत्त होण्यापूर्वीच सगळा 'रियल व्हॅल्यू' खर्चला तर लाईफ बेसिसवर तुम्ही इतरांसारखेच बेटर ऑफ आहात, पण निवृत्तीनंतर काय असा प्रश्न उभा राहतो. म्हणून बचत न करता स्वतःस रोज अशा भोग्य अशा डिप्रिशिएट न होणार्‍या असेटमधे दाबून पैसे ओतावेत.
------------------
लाँग टर्म मधे सगळ्याच असेट्स चे रिटर्न्स सेमच असतात.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 20:23

In reply to by अतिशहाणा

हे अर्थशास्त्राचं मूलभूत तत्त्व आहे.
इक्वीटी, बाँडस, सोने, परकीय चलन, कमोडिटी, जमीन, इ इ चा सामान्य वार्षिक परतावा गेल्या ४० वर्षांचा काढला तर तो सेमच असतो. कोणत्याही एका गुंतवणूकीत जर जास्त रीटर्न्स मिळवून द्यायची इंहेरेंट क्षमता जास्त असेल तर कोणीही इतर प्रकारच्या गुंतवणूकीच्या फंदात पडला नसता.

............सा… Fri, 01/08/2014 - 20:25

In reply to by अजो१२३

ओह ओके. मस्तच आहे हे.पण शिक्षणात गुंतवणूक केलीत तर रिटर्न फार उत्तम मिळतो :)
अर्थात आत्ता बोलणं स्थावर-जंगम मालमत्तेबद्दल चाललं आहे हे मला माहीत आहे. पण असाच मुद्दा टाकला :)

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 20:37

In reply to by ............सा…

पण शिक्षणात गुंतवणूक केलीत तर रिटर्न फार उत्तम मिळतो

हे भाषेचं दौर्बल्य आहे. शिक्षणात खर्च होतो, गुंतवणूक नव्हे. नि तसाच हिशेब लावयला लागतात तर जेवणात गुंतवणूक केल्याने देखिल उत्तम परतावा मिळतो.

............सा… Fri, 01/08/2014 - 20:16

In reply to by अजो१२३

गुंतवणूक करणे आवश्यक आहेच असं नाही. "आदर्शतः" आयुष्यात तुम्ही जितका 'रियल व्हॅल्यू' कमावता तितकाच तुम्हाला खर्चायला मिळतो. थोडा जास्त नाही, थोडा कमी नाही. गुंतवणूक म्हणजे केवळ 'जास्त उत्पन्नाचा काळ' नि 'जास्त खर्चायची गरज असलेला काळ' यामधे पैसा कुठे ठेवायचा त्याची जागा.
अर्थातच निवृत्त होण्यापूर्वीच सगळा 'रियल व्हॅल्यू' खर्चला तर लाईफ बेसिसवर तुम्ही इतरांसारखेच बेटर ऑफ आहात, पण निवृत्तीनंतर काय असा प्रश्न उभा राहतो. म्हणून बचत न करता स्वतःस रोज अशा भोग्य अशा डिप्रिशिएट न होणार्‍या असेटमधे दाबून पैसे ओतावेत.

हे पटतय. पण ते अ‍ॅसेट्स ज्यात आपण पैसा ओततोय ते रेसेलेबल आहेत का ? का अ‍ॅसेटचा अर्थच रिसेलेबल एन्टिटी असा असतो? काय माहीत!! असे काही प्रश्न मनात आले. बस.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 20:39

In reply to by ............सा…

त्यांचं बरंच किचकट क्लासिफिकेशन आहे. पण गुंतवणूक म्हणून भाज्या वैगेरे घेऊ नयेत, टीवी/फ्र्र्ज/कार सुद्धा टाळावी, जमीन्/सोने/हिरे/कला इ घ्यावे.

मन Mon, 04/08/2014 - 13:40

In reply to by अजो१२३

लाँग टर्म मधे सगळ्याच असेट्स चे रिटर्न्स सेमच असतात.

ह्या एका वाक्याबद्दल लकडी पुलावर जाहिर मुका घ्यायला तयार आहे.
mwaaaah

बॅटमॅन Mon, 04/08/2014 - 15:29

In reply to by मन

लकडी पुलावर जाहीर मुका घ्यायला तयार असण्याची कारणंच वेगळी आहेत. एक तर तिथे सकाळी ९ ते रात्री ९ परेंत बायका ब्यान असतात, फक्त चारचाकीच अलौड अस्तात. सबब मनोबा दिवसा तिकडं जाऊच शकत नाही. अन रात्री जाहीर कै केले तरी ते कुणाला दिसणारही नाही.

अपि च- जाहीर इ.इ. कै असेल तर ते शनवारवाड्यासमोर करावयाचे असते हा पुण्यपत्तनीचा पुरातन दस्तूरु विसरलाती काये?

अतिशहाणा Thu, 31/07/2014 - 16:13

In reply to by अपरिमेय

सहमत.

मात्र ४४ वर्षे गुंतवण्याची तयारी असेल तर परताव्याचा दर जास्त असायला हवा. चलनवाढीपेक्षा ४-५ टक्के जास्त दर मिळू शकतो.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 20:16

In reply to by अतिशहाणा

भारत सरकारच्या ५ वर्षाच्या नि ३० वर्षाच्या (कि २५?) जी-सेक मधे व्याजदरामधे ०.५% (% पॉइंट्स) इतकाही फरक नसतो. बाकी ५ से ज्यादा म्हणून एकच रेट ठोकतात. उलट तुम्हाला सतत २०च वर्षे मान्य केलेला व्याजदर देणे हा तुमच्यावरच उपकार आहे असे बँका मानतात. तैयार होत नाहीत.

अतिशहाणा Fri, 01/08/2014 - 20:20

In reply to by अजो१२३

इक्विटी वगैरेमध्ये रेट ऑफ रिटर्न जास्त आहे. भारतापुरता पंचवीसतीस वर्षातला रियल इस्टेट रिटर्नही जास्त आहे.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 20:46

In reply to by अतिशहाणा

When it comes to cancelling off the differences in the rates of return on various types of investments sheerly due to their nature, 25 years is a short period.
Even at overall level, there in nothing to suggest that equities or real estate provide higher returns over debt. Had it been really so, there would have been no reason for people to keep their investments in low yield instruments.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 19:55

In reply to by अपरिमेय

उत्तम प्रतिसाद.
So long as one's Expected Rate of Return is equal to the Market Rate of Return on one's Investment for the entire period of one's life, it really does not matter WHEN does one invest. Park the money in the investment machinery as you feel and take it away as and when you feel - it neither harms you nor the the machinery.
-----------------
You should invest when the Market Rate of Return is higher than your Expected Rate of Return. Else you should spend off the money.

राजेश घासकडवी Fri, 01/08/2014 - 15:06

लेख छानच.

२२ ते ३० आणि ३० ते ६५ या गणिताविषयी अपरिमेय यांनी अत्यंत अचूक मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे चाळिसेक वर्षं थांबणं, पैसे मिळवण्याची क्षमता, चलनवाढीचा दर वगैरे वगैरे. त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे पैशाची आपल्याला असलेली किंमत, किंवा त्यांपासून आपल्याला मिळू शकणारा आनंद याचाही विचार करायला हवा. बावीसाव्या वर्षी जेव्हा नोकरी नवीन लागलेली असते तेव्हा पैशाचं अप्रूप असतं. वय तरुण असतं. आणि त्यामानाने फार पैसे हाती येत नसतात. दहाएक वर्षांत आपल्याला किती मिळतील याचा अंदाजही नसतो. भारतातल्या चलनवाढीच्या आणि पगारवाढीच्या दरापोटी, तसंच सुरूवातीला होणाऱ्या बढत्यांमुळे दहा वर्षांनी काही पट पैसे मिळणं सहज शक्य असतं. कदाचित २२ ऐवजी ३२ लाच सुरू करावं सेव्हिंग, कारण तेव्हा आपल्या करिअरचा थोडाफार अंदाज आलेला असतो.

माझ्या आईने ६२ साली नोकरी सुरू केली तेव्हा तिला दरमहा २०० रुपये मिळायचे. त्यातले २० रुपये सेव्हिंगमध्ये टाकायचे झाले असते तर अशक्य नव्हतं. पण त्यासाठी काही आनंदाला मुकावं लागलं असतं. हा मुकलेला आनंद २००६ साली त्या २० चे २५०० झाल्याने मिळाला असता का? अर्थातच नाही. कारण त्याकाळी तिला त्या २० रुपयांत जे मिळायचं त्यापेक्षा किंचितच जास्त २००५ साली २५०० रुपयांत मिळालं असतं. मग तिने तरुणपणी, हातात पैसे असताना आनंद घेतला तर ती स्वतःमध्ये गुंतवणुक जास्त चांगली नाही का?

याचा अर्थ डोळसपणे खर्च मर्यादेत ठेवून पुढच्या काळासाठी काही बेगमी करूच नये असं नाही. पण लवकर सेव्हिंग सुरू करण्यासाठीच्या गणिताने भुलून जाऊन आजचा आनंद विसरू नये एवढंच म्हणायचं आहे. थोडक्यात चणे आहेत आणि दातही आहेत अशा परिस्थितीत सगळेच चणे भविष्यासाठी ठेवू नका, कारण तेव्हा कदाचित भरपूर चणे पण दातच नाहीत अशी परिस्थिती होऊ शकेल.

अतिशहाणा Fri, 01/08/2014 - 16:02

In reply to by राजेश घासकडवी

कसला आनंद? आणि स्वतःमध्ये कोणत्या स्वरुपाची गुंतवणूक? आनंद मिळवण्यासाठी पैसे खर्च करावेच लागतात, वस्तू घ्याव्याच लागतात हे अध्याहृत यामागे आहे असे दिसते. नोटा छापायला सुरुवात होण्यापूर्वी हजारो वर्षे मनुष्यजात अस्तित्वात होती ते आनंदी नव्हते काय?

नितिन थत्ते Fri, 01/08/2014 - 16:18

In reply to by अतिशहाणा

गुर्जी असं म्हणताहेत असं वाटत नाही.

किती खर्च करावा आणि करू नये हे व्यक्तीच्या मिळकतीनुसारच ठरेल. पण पुरेसे (पुरेसे म्हणजे काय हे सुद्धा व्यक्तिगत आहे) सेव्हिंग केल्या नंतर खर्च करण्यात उगाच गिल्ट वाटून घेऊ नये कारण त्या गोष्टीचे मूल्य (त्या व्यक्तीसाठी) काही वर्षांनी तितके राहीलच असे नाही. म्हणजे मी आज गाडी न घेता आणखी दहा वर्षांनी घेऊ शकतो. पण वयाच्या साठाव्या वर्षी गाडी चालवण्याची मजा कदाचित उरणार नाही. (आणि त्यासाठी दहा वर्ष मन मारून जे पैसे वाचतील त्यात गाडी* कदाचित येणार सुद्धा नाही).

*ऐतिहासिक दृष्ट्या गाडीची रिलेटिव्ह किंमत** कमी होत असते असे दिसते. पण इतर बाबतीत तसे असू शकेल.

**मी नोकरीला लागलो तेव्हा माझ्या पहिल्या पगाराच्या ७० पट साध्या मारुती गाडीची किंमत होती. आज फ्रेश इंजिनिअरच्या पगाराच्या २० हून कमी पटीतच चांगली गाडी येते.

अतिशहाणा Fri, 01/08/2014 - 17:15

In reply to by नितिन थत्ते

१. निव्वळ पैसा आहे म्हणून एखाद्याला खर्च करायचा असेल तर त्याचे पैसे आहेत त्याने ते कसेही खर्च करावेत हे मान्य. (मात्र हा खर्च एकंदर पैशाचीच उधळपट्टी नसून इतर नैसर्गिक स्रोतांची उधळपट्टीही आहे याची निदान जाणीव ठेवावी)
२. पैसा खर्च केल्यावर आनंद मिळतो हे अध्याहृत आहे काय? असा माझा प्रश्न आहे. विशेषतः अमेरिकेत 'You deserve it!' प्रकारची प्रचंड जाहिरातबाजी चालते. चकचकीत गाड्या, महागडे फोन, नवे कपडे यापासून ते सहासात डॉलरची स्टारबक्स कॉफी, या सगळ्याला 'यू डिजर्व इट' एवढे लेबल लावले की माणसाला लगेच आपल्या आयुष्यात या गोष्टीची प्रचंड कमतरता होती व आता ती वस्तू घेतल्याशिवाय आपण 'सुखी' होऊ शकणार नाही याची आपोआप जाणीव होती.
३. प्रचंड पैसा खर्च करणारे (एकूण उत्पन्नाच्या सरासरी पाच टक्क्यापेक्षा कमी बचत दर अमेरिकन ) त्यामुळे जास्त सुखी झाले का?
४. एखाद्या वस्तूची खरेदी केल्यावर झालेला तात्पुरत्या आनंदाला कितपत महत्त्व द्यायचे (आज आनंद देणाऱ्या गोष्टी नंतर दुःख देऊ शकतात. उदा. दोन दिवसांनी त्या नव्या गाडीला पोचा पडला , मोबाईलला स्क्रॅचेस आले तर दुःख होते)
५. तरुणपणात 'आयुष्य जगलेले' आज हातात शिल्लक नसल्याने पश्चातापदग्ध आहेत व तारुण्यात 'मन मारुन जगलेले' आज आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व समाधानी आहेत अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला पाहिली आहेत.

नितिन थत्ते Fri, 01/08/2014 - 18:12

In reply to by अतिशहाणा

मग तर सेव्हिंग करायची मुळीच आवश्यकता नाही. समजा उतारवयात पैसे कमी संपले तर आजारपणामुळे औषधोपचार न होऊ शकल्यामुळे लवकर मृत्यू येईल. मग पैशाची गरजच राहणार नाही.

म्हातारपणी मला जगायला जितका पैसा लागेल तितका पुरे. त्यापूर्वी मुलांचे शिक्षण (बेसिक लग्नखर्च) वगैरेपर्यंत पैसा साठवावा.

पण मुलांना गाडी, २ बीएचके फ्लॅट घेऊन देण्यासाठी पैसे साठवायची गरज नाही.

मुख्य फंडा असा.....

कोणत्याही वेळी तुमच्या १२ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम बचत खात्यात हवी.
महिन्याच्या कौटुंबिक उत्पन्नाच्या ३०% पेक्षा जास्त कर्जाचे हप्ते नकोत. [एखादी वस्तू घेण्यासाठी एकूण हप्ता ३०% पेक्षा जास्त होत असेल तर हार्श ट्रुथ इज तुमची ती वस्तू घेण्याची "आज" ऐपत नाही).

ही मर्यादा ओलांडली असेल तर वन मे बी लिव्हिंग ऑन द एज.

अतिशहाणा Fri, 01/08/2014 - 18:16

In reply to by नितिन थत्ते

:)
कर्जाचा हप्ता हा अॅप्रिशिएटिंग अॅसेट्स साठी आहे की 'लक्झरी/डेप्रिशिएटिंग' अॅसेट्साठी आहे? लक्झरी अॅसेट कर्ज काढून घेऊ नयेत असे मला वाटते.

मी Fri, 01/08/2014 - 18:21

In reply to by नितिन थत्ते

महिन्याच्या कौटुंबिक उत्पन्नाच्या ३०% पेक्षा जास्त कर्जाचे हप्ते नकोत. [एखादी वस्तू घेण्यासाठी एकूण हप्ता ३०% पेक्षा जास्त होत असेल तर हार्श ट्रुथ इज तुमची ती वस्तू घेण्याची "आज" ऐपत नाही).
ही मर्यादा ओलांडली असेल तर वन मे बी लिव्हिंग ऑन द एज.

वय कमी असल्यास लिव्हिंग ऑन द एज ऑन एन अ‍ॅव्हरेज फायद्यात पडते असे निरिक्षण आहे, बाकी सहमत.

राजेश घासकडवी Fri, 01/08/2014 - 18:27

In reply to by अतिशहाणा

पैसा खर्च केल्यावर आनंद मिळतो हे अध्याहृत आहे काय?

एका विशिष्ट मर्यादेपर्यंत - हो. दारिद्र्यरेषेखाली जगणारे लोक जगण्यातून जितका आनंद मिळवतात, त्याच्या कितीतरी पट आनंद त्यांना जर तिप्पट पैसे मिळाले तर ते खर्चून मिळवता येतो. जसजसे पैसे वाढत जातात, तसतसा हा वाढीव आनंद कमी कमी होत जातो. (डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी) म्हणूनच मी जे उदाहरण दिलं ते अगदी तरुणपणी बॅंकेत क्लर्क म्हणून कामाला लागल्यावर हातात जितके पैसे येतात त्या आकड्याचं दिलं होतं. म्हणजे दारिद्र्यरेषेच्या व्यवस्थित वर, पण कुठच्याही अर्थाने श्रीमंत म्हणता येणार नाही असं. अशा परिस्थितीत शेवटच्या दहा टक्क्यांची मार्जिनल युटिलिटी बरीच असते. याचं कारण ऐशी टक्के टापटिपीचं, रोजचं, साधं जीवन जगण्यासाठी खर्च होतात. तिथे काटछाट खूपच कठीण असते. मग उरलेले वीस टक्के आयुष्य सुकर, मौजेचं करण्यात घालवता येतात. उदाहरणार्थ कधी सिनेमाला जाणे, कधीमधी रेस्टॉरंटमध्ये जाणे, साध्या साडीऐवजी मनात भरलेली साडी घेणे इत्यादी. यातून निश्चितच आनंद मिळतो. रिटायरमेंटनंतरचं स्थैर्य हाही एक आनंद, मानसिक समाधानच आहे. पण या आनंदाची किंमत तरुण वयात कमी असते. तेव्हा आत्ताचे आनंद मारून हा आनंद विकत घेणं बावीसाव्या वर्षी सुरू करण्याऐवजी तिसाव्या वर्षी सुरू करणं हे आनंदाच्या एकंदरीत गणितात फायद्याचं ठरू शकतं.

अतिशहाणा Fri, 01/08/2014 - 19:22

In reply to by राजेश घासकडवी

सैध्दांतिक पातळीवर हे बरोबरच आहे. पण दारिद्र्यरेषेखालील लोख पर्सनल फायनान्सची लेखमाला व त्या दृष्टीने काही उपाययोजना करण्याच्या मनस्थितीत असतील असे वाटत नाही. सदर लेखमाला व चर्चा ज्यांच्यासाठी सुरु आहे त्यांना अधिक खर्च करुन अधिक सुख मिळेल असे वाटत नाही. चू.भू.द्या.घ्या.

राजेश घासकडवी Fri, 01/08/2014 - 20:12

In reply to by अतिशहाणा

दारिद्र्यरेषेखालचं उदाहरण हे 'पैसा खर्च करून सुख मिळतं का?' या सर्वसाधारण प्रश्नाला उत्तर म्हणून दिलं होतं. आता 'ज्यांच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंगची गरज भासण्याइतके पैसे असतात अशांना पैसा खर्च करून सुख मिळतं का?' प्रश्न बदललेला दिसतो. त्याचंही उत्तर वर आहेच. मार्जिनल युटिलिटीप्रमाणे प्रत्येक वाढलेल्या रुपयापासून कमी का होईन युटिलिटी मिळते. वेगवेगळ्या पद्धतीने खर्च केल्यामुळे ती व्यक्तीगणिक ऑप्टिमाइझ करते. नाहीतर या सर्वच फायनान्शियल प्लॅनिंगची काहीच गरज नाही.

असो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे फारच सैद्धांतिक चाललेलं आहे. मला वाटतं 'पैसे खर्च करून आनंद मिळतो का?' इतका मूलभूत प्रश्न लोकांना पडलेला नसावा. कारण प्रचंड प्रमाणावर लोक पैसे मिळवताना व तो खर्च करताना दिसतात.

अतिशहाणा Fri, 01/08/2014 - 20:19

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटतं 'पैसे खर्च करून आनंद मिळतो का?' इतका मूलभूत प्रश्न लोकांना पडलेला नसावा. कारण प्रचंड प्रमाणावर लोक पैसे मिळवताना व तो खर्च करताना दिसतात.

पैसे खर्च केल्याने आनंद मिळतो ही ढोबळ मांडणी केल्यानेच असा खर्च होतो आहे असे वाटते. इतका प्रचंड पैसा कमावून व खर्च करुन लोकांचा आनंद प्रचंड वाढला आहे असे दिसत नाही. (जीडीपी/पर कॅपिटा खर्च आणि हॅपीनेस इंडेक्स अशी काही आकडेवारी आहे का?)

राजेश घासकडवी Fri, 01/08/2014 - 20:50

In reply to by अतिशहाणा

हो आहे. मी पाहिलेली आहे. पण आत्ता सापडत नाहीये. कोणीतरी ती शोधून काढावी अशी विनंती करतो. विदा शोधून काढणं कटकटीचं असतं, आणि आत्ता तितका वेळ नाही. तसंच, मी तो शोधून सादर केल्यावर त्या विद्याला मीच जबाबदार असल्यासारखे प्रश्न येतात, त्याचाही कंटाळा आलेला आहे.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 22:48

In reply to by राजेश घासकडवी

http://ihds.umd.edu/IHDS_files/02HDinIndia.pdf
साधारणतः भारतात नागरी दरडोई उत्पन्न ग्रामीण लोकांपेक्षा २.०५ पट जास्त आहे.
http://www.business-standard.com/article/opinion/s-ganesan-self-destruc…
शहरी माणसाने आत्महत्या करण्याचे प्रमाण ग्रामीण माणसापेक्षा १६.३३ पट जास्त आहे.

म्हणजे या निकषाने तरी संपत्ती नि आनंदाचे प्रमाण ३२ पट व्यस्त आहे.

उदय. Sat, 02/08/2014 - 10:12

In reply to by राजेश घासकडवी

पैसे मिळाल्याने जितका आनंद होतो, त्याच्या जवळपास दुप्पट दु:ख पैशाचे नुकसान झाले तर होते. याच्याबद्दल लेखमालेत स्वतंत्र लेख लिहिणार आहे. (utility theory, behavioral economics च्या भागात).

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 18:49

In reply to by नितिन थत्ते

**मी नोकरीला लागलो तेव्हा माझ्या पहिल्या पगाराच्या ७० पट साध्या मारुती गाडीची किंमत होती. आज फ्रेश इंजिनिअरच्या पगाराच्या २० हून कमी पटीतच चांगली गाडी येते.

मी नोकरीला लागलो तेव्हा मी ज्या घरात राहायचो त्याची किंमत माझ्या वार्षिक पगाराच्या फक्त अडीच पट होती. आता जरा वेगळ्या परिस्थितीतून आलेलो म्हणून कर्जातच असायचो, पण आमचे 'सामान्य' घरांतून आलेल्या कलिग्जच्या वार्षिक बचत क्षमतेच्या १० पट होती.

आज १० वर्षांनी त्या घराची किंमत (साधंच घर आहे हो ते.) माझ्या वार्षिक पगाराच्या (जो चौपट झाला आहे) ४० (चाळीस) पट आहे. नि वार्षिक बचत क्षमतेच्या ... असूच द्या.
--------------------
असू का द्या? २५० पट आहे.
---------------

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 19:36

In reply to by अतिशहाणा

यस्स. एकदम पर्फेक्ट. .

आनंदाचा आणि पैशाचा संबंध नाही.

उलट पैसा म्हणजे साडेसातीही असू शकते. साला कोणतं लचांड कधी गळ्यात पाडिल सांगता येत नाही.
------------------
माझ्याकडून हा कमेंट ऑफ द यिअर!!! तुम्हाला कुठे पार्टी द्यायची फर्माईश करा.

मन Mon, 04/08/2014 - 13:58

In reply to by अजो१२३

उलट पैसा म्हणजे साडेसातीही असू शकते
प्लीझ. तुमच्या sbi, icici किंवा तत्सम अकाउंटवरची सर्व साडेसाती माझ्या citi, hsbc अशा कोणत्याही अकाउंटवर ट्रान्सफर करा ना. प्लीईईईईझ्झ्झ
अमावशा/अमाशा वाढा माय...
साडेसाती वाढा माय.
दे दान सुटे गिराण.

बॅटमॅन Mon, 04/08/2014 - 15:31

In reply to by मन

मला साडेसाती नको, पावणेदोन + अदपाव दिला तरी हर्कत नाही. तेवढाच या वर्षीचा खर्च भागेल.

(चौथाईप्रेमी) ब्याट्याजी जाधव.

बोले तो, १/८. खाण्याचा अर्थात 'अद' पाव न्हवे.

ऋषिकेश Fri, 01/08/2014 - 16:18

In reply to by राजेश घासकडवी

सहमत आहे. प्रतिसाद आवडला.
उतारवयात आरोग्यसेवेसाठी व रोजच्या पोटभरीसाठी आवश्यक तितका पैसा जवळ असलाच पाहिजे, आवडत्या स्थानिक छंदासाठी पैसा साठवता आल्यास उत्तम. मात्र त्यावेळी आपल्या गरजा शक्य तितक्या कमीत कमी ठेवणे तेव्हाच जमेल जेव्हा तरूणपणी आयुष्य "जगलो" असु.

उदा: मला भटकंती अतिशय आवडते. उतारवयात साठवलेल्या पैशानी ट्रॅवलवाल्यांच्या मुजोरीमागे जाणार्‍या वयस्कर पर्यटकांचे एकीकडे कौतुक वाटते खरे, पण त्याच बरोबर असणार्‍या करुण किनारीने (स्वतःला हवे तसे फिरता न येण्याची करूण किनार) मला तरूण वयातच अधिकाधिक भटकंती करण्याचे बळ मिळते. उतारवयात/रिटायर्मेंटनंतर मी यंव करेन मी त्यंव करेन म्हणत किती पैसा साठवायचा नी तरूणपणाचा किती वेळ तो पैसा मिळावण्यात घालवायचा जे ज्याने त्याने ठरवायचे हे खरे आहे, पण.. छ्या हा 'पण'च मोठा कळीचा आहे :)

अतिशहाणा Fri, 01/08/2014 - 17:17

In reply to by ऋषिकेश

आपल्या गरजा शक्य तितक्या कमीत कमी ठेवणे तेव्हाच जमेल जेव्हा तरूणपणी आयुष्य "जगलो" असु.

तरुणपणी आयुष्य 'जगल्यावर' जगण्याची तीच एक व्याख्या आहे असा गैरसमज होऊ शकतो. आणि उतारवयात 'गेले ते दिन गेले' अशी भावना येऊ शकते. तरुणपणातच गरजा कमी ठेवायला काय हरकत आहे?

ऋषिकेश Mon, 04/08/2014 - 09:35

In reply to by अतिशहाणा

हरकत काहीच नाही.
मी अशा (माझ्यासारख्या) व्यक्तींबद्दल बोलतोय ज्यांच्या आनंदाच्या काही कल्पना आहेत, काही स्वतःपुरत्या व्याख्या आहेत. नी त्या कल्पना साकार करण्यासाठी पैशा इतकाच वेळ व शारिरीक स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे. अशावेळी काही आनंद हे तरूणपणीच मिळवता येतात, पुढे शरीर साथ देत नाही. अशावेळी "अरेरे हे शक्य असूनही केले नाही" अशी निव्वळ खंत बाळगण्यापेक्षा; "गेले ते दिन गेले" ही भावना काहीशी हुरहुर, किंचित खंत नी काहिशी तृप्ती यांचा मिलाफ असतो

बाकी, ज्यांना आनंदाच्या सुखांच्या अशा काही कल्पनांमध्ये अडकायचे नाही किंवा ज्यांना काहीही करून आनंद मिळातो / मिळतच नाही, अशांसाठी निव्वळ भरपूर सेविंग/गुंतवणूक करत रहाणे हा उपाय उत्तम आहे हे मान्यच आहे.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 18:55

In reply to by राजेश घासकडवी

माझ्या आईने ६२ साली नोकरी सुरू केली तेव्हा तिला दरमहा २०० रुपये मिळायचे. त्यातले २० रुपये सेव्हिंगमध्ये टाकायचे झाले असते तर अशक्य नव्हतं. पण त्यासाठी काही आनंदाला मुकावं लागलं असतं. हा मुकलेला आनंद २००६ साली त्या २० चे २५०० झाल्याने मिळाला असता का? अर्थातच नाही.

२० रुचे ५२ वर्षात १०% ने कंपाउंडींग केले तर २८०० रु मिळतात. तितकाच आनंद नक्कीच मिळाला असता.

राजेश घासकडवी Fri, 01/08/2014 - 19:18

In reply to by अजो१२३

मी गणित न करता आकडे टाकले होते. ९ टक्क्यांनी ४३ वर्षांंत फक्त ८०० रुपये होतात. आणि १० टक्क्यांनी १२००. २००५ सालचे १२०० आणि ६२ सालचे २० हे बऱ्यापैकी तुलना करण्याजोगे आहेत.

असो. माझा मुद्दा 'बचत करू नका' असा नसून दात असताना थोडे चणे खा, प्रत्येकच चणा म्हातारपणाची बेगमी म्हणून साठवून ठेवू नका - असा आहे. चणे खाण्याचा आनंद थोडाफार उपभोगा, अगदीच बाविसाव्या वर्षांपासून बचत-बचत करण्याच्या मागे लागू नका. आणि शेवटी आत्ताचा सिनेमा बघण्याचा आनंद किती आणि तो मारून पैसे बचतीला टाकल्यामुळे मिळणारं मानसिक स्वास्थजन्य आनंद किती हा हिशोब प्रत्येकाने करायचा आहे. लेखात एका बाजूच्या आनंदाची मांडणी केली आहे, मी दुसरी बाजू मांडली इतकंच.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 19:27

In reply to by राजेश घासकडवी

खर्च वा बचत करण्याचा, न करण्याचा, आता करण्याचा नि नंतर करण्याचा किंवा अजून कधी करण्याचा नि "त्या उत्पन्नातून वा बचतीच्या परताव्यातून" कधी केव्हा किती आनंद मिळतो यांचा काहीच संबंध नाही.
"आदर्श" इकॉनॉमी इज सेल्फ बॅलॅन्स्ड. कोणतेही आर्बिट्राज आयुष्यभर खाता येत नाही.
-------------
इकॉनॉमिमधे काय होणार आहे याचा शोध घेण्यापेक्षा गरीब झालेलं परवडतं!!! (आमचं मत)
----------------
९%? १९८०ज मधे १८% व्याज मिळायचे!!! असो. शिवाय २००५ चे १२०० म्हणजे आजचे ३१००!!!
-----------------

............सा… Fri, 01/08/2014 - 19:57

In reply to by राजेश घासकडवी

लेखात एका बाजूच्या आनंदाची मांडणी केली आहे, मी दुसरी बाजू मांडली इतकंच.

अगदी खरे आहे.
राघा आता एकच करा तुमची बाजू नेहमी अगदी नेहमी मांडत चला. कोणी आक्षेप घेवो/प्रतिवाद करो/तुटून पडो/ टीका करो, पण प्लीज मांडा कारण अनेकांना त्याचा उपयोग होतोच!!!!

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 19:06

In reply to by राजेश घासकडवी

मग तिने तरुणपणी, हातात पैसे असताना आनंद घेतला तर ती स्वतःमध्ये गुंतवणुक जास्त चांगली नाही का?

त्याच रियल व्हॅल्यूचे सुख तरुणपणी घेतल्यास जास्त आनंद मिळतो नि म्हातारपणी घेतल्यास कमी मिळतो हा कोणता सिद्धांत आहे? म्हणजे ते २५०० रु घेऊन तरुणपणीच्या बचतीचे २५०० घेऊन रॅडीसनमधे लंच करून आलेली तुमची आई नि आजच मिळालेली पगार तिच्यातून २५०० रुपये खर्चून तेच लंच करणार तरणा पोरगा यांना वेगवेगळा आनंद येतो का?
---------------
सत्कृतदर्शनी येतो असे वाटत असेल तर...
ते २५०० रु खर्चून गाणगापूरला तीर्थाटनाला जावे लागलेला तो मुलगा नि निस्सिम भक्तीने उंचबळून येऊन तितके पैसे खर्च करून तीर्थाटनाला गेलेली तुमची आई यांत कोणाला जास्त आनंद येतो?
------------------
"आदर्श" अर्थव्यवस्थेला तुम्ही कधी खर्च करावा, कधी बचत करावी याबद्दल काहीही म्हणायचं नसतं. पण अर्थव्यवस्थेची अनादर्शता ओळखणं हा सोपा खेळ नाही. तो कोणत्याही दिशेने जाऊ शकतो.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 20:32

In reply to by राजेश घासकडवी

तसंच सुरूवातीला होणाऱ्या बढत्यांमुळे दहा वर्षांनी काही पट पैसे मिळणं सहज शक्य असतं.

This is true of, may be , hardly 5% of the Indian population.
मंजे दर्वर्षी ७% ने रीयल जीडीपी वाढतो, नि तुम्ही देखिल त्याच प्रमाणात सुखी होता असे मानले तर १० वर्षांत तुमचा रियल पगार १.९६ पट होतो. दुप्पट अजून शिवली नाही.
----------------------
आणि हो वरचं वाक्यही प्रचंड दिशाभूल करणारं असू शकतं. तुमचा पगार दुप्पट झालेला असू शकतो मंजे तुम्ही दुप्पट कष्ट करू लागले असता. अर्थात खरोखरच काय होते ते तुम्हालाच माहित.

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 19:39

In reply to by राजेश घासकडवी

याचा अर्थ डोळसपणे खर्च मर्यादेत ठेवून पुढच्या काळासाठी काही बेगमी करूच नये असं नाही.

वय ६० होईपर्यंत ६० ते ९० इतकी बेगमी केली पण ६०.१ व्या वर्षीच लुडकला तर?

अनुप ढेरे Fri, 01/08/2014 - 21:23

In reply to by अजो१२३

राजेशरावांनी इतका सोपा मुद्दा मांडला आहे की पैशाची फक्तं बचत नका करू मन मारून. त्या पैशाचा उपभोगही घ्या तरूणपणी सुद्धा. कारण म्हातारपणी तुमच्यावर अनेक मर्यादा येऊ शकतात. त्याचा किती कीस काढताय!

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 23:26

In reply to by अनुप ढेरे

म्हातारपणी मर्यादा येऊ शकतात नव्हे, येतातच. पण पैसे केव्हा खर्चायचे याचा निकष वय होऊ शकत नाही. पैसे खर्चण्याचा तितकाच वा त्यापेक्षा जास्त आनंदही म्हातारपणी येऊ शकतो. खर्चाच्या क्लालिटीचा नि टायमिंगचा (वयाचा) काही संबंध नाही. १०० रु (रियल व्हॅल्यू) हा खर्च केव्हाही करा, प्रत्येक वयात तुम्हाला तितकाच आनंद देणारे पर्याय बाजारात/जगात असतात.
---------------------
२२ वर्षे तुम्ही काहीच कमवत नाही. मला तुम्हाला तेव्हाचा खर्च फुकटात मिळतो. २२ ते ६० पर्यंत १०० रु कमवता. स्वतः कमावता, खर्चता, बचत करता, इ. ६१ ते ९० शून्य रुपये कमावता. पण तुमचा खर्च तुम्हालाच भागवायचा असतो. (मुल देऊ शकते, पण ते एक असो.)
आता निवृत्त झाल्यावर खर्च कमी होतो ही चूकीची धारणा आहे.उलट खर्च कसे करायचे हे माहित झाल्याने, नोकरीत वेळ न मिळाल्याने उपद्व्याप न करायला मिळाल्याचे फ्रस्टेशन असल्याने खूप काही करायची इच्छा असल्याने नि एकदमच प्रचंड वेळ मिळाल्याने, सामाजिक स्तर वाढला असल्याने तो मेंटेन करण्यासाठी, नात्यांची (काँटॅक्टांची) संख्या वाढली असल्याने, इ इ खूप पैसा लागतो. तुम्ही १००च रु कमावले असले नि ते तरुण आणि म्हातार्‍या वयात सगळं काही करायला बेसिकलीच कमी पडत असल्याने 'मन कुठे मारायचं' हा प्रश्न उरतो. त्याचं उत्तर तरुण वयात मारू नये असं देण्यात काहीही तथ्य नाही. तरुण वयात मन नाही मारलं तर म्हातारपणी मारावं लागेल.
------------------------
त्यावर आयुष्यभरात कधी मन मारावं लागणार नाही इतकं जास्त कमावणे हा एक उपाय आहे. गुंतवणूक फक्त तुमच्या पैशाची 'रिअ‍ॅलिटी' (खरे मूल्य) जपते. सगळे करतात त्यातलंच तुम्ही काही एक करत असाल तर ती गुंतवणूक "फायदेशीर" अशा परताव्याची खर्‍या अर्थाने नसतेच. गुंतवणूकीतून "जास्तीचा लाभ" काढण्यासाठी स्मार्ट किंवा लकी इन्व्हेस्टर असणे हा दुसरा उपाय आहे. हे जे करतात तेच 'मन न मारता' जगतात.
-------------------
राघा आमचे आवडते लेखक आहेत. शिवाय ते फार स्पोर्ट आहेत असे आमचे (म्हणजे माझे) निरीक्षण आहे. सबब नो वरीज.

मी Fri, 01/08/2014 - 17:07

गुंतवणुक हि फक्त पैसे अडकवून ठेवल्यानेच होते असे नाही तर त्याचबरोबर लवकर कर्जमुक्त होत गेल्यास जास्त फायदा होतो असे मत आहे, त्यामुळे कर्ज असल्यास गुंतवणुकीपेक्षा ठरावीक मासिक मुद्दल परत-फेड अधिक फायदेशीर ठरते असे वाटते, आता कर्ज घ्यावे काय तर वयाच्या गुणोत्तरात फेडता इतर सर्व अनियमीत घटक(मृत्यू, अपंगत्व वगैरे) सकारात्मक गृहित धरून एखादे कर्ज नक्कीच असावे असेही वाटते.

............सा… Fri, 01/08/2014 - 19:55

मी काही रिसर्च केलेला त्यानुसार (म्हणजे डेव्ह रामसे यांच्यानुसार) असा क्रम ठेवावा -
(१) लवकरात लवकर कर्जमुक्त होणे
(२) घर घेणे
(३) पेन्शन्ची व्यवस्था (जसे ४०१ क) करणे
(४) हे सगळं झाल्यानंतर उरलेला पैसा मुलांच्या भविष्यासाठी (५२९ प्लान) वगैरे गुंतविणे

चीजपफ Fri, 01/08/2014 - 21:39

In reply to by ............सा…

१)कर्जमुक्त होणे
२)६ महिने जगायला पुरतील इतके सेव्हिन्ग.
******* ह्यानन्तर व्यक्तिनुसार बद्लते ****
३)पगाराच्या २५% ह्प्ता जाइल इतपतच मोठे घ्र्र (बदलीची नोकरी असेल तर घ्रर विचार करुन घ्यावे.)
४)रिटायरमेन्ट अकौन्ट (पेन्शन मिळणार असेल तर थोडी उशिरा सुरुवात चालेल. हे नोकरी/व्यवसाय वर अवलम्बून आहे).
६)मुलान्चे भविष्य (मुले असल्यास)
७)गुन्तवणूक (इच्छा असल्यास.)

अजो१२३ Fri, 01/08/2014 - 23:45

In reply to by चीजपफ

१)कर्जमुक्त होणे
२)६ महिने जगायला पुरतील इतके सेव्हिन्ग.

१. घराचे कर्ज असते. पण काही फेडलेले असते. २०% किंमत स्वतःच दिलेली असते. घराच्या किमती महागाई दरानेच वाढत आहेत मानू. १०० रु चे घर, ८० रु चे मूळ कर्ज, ३० रु फेडले, किंमत १५ ने वाढली. (म्हणजे घर विकून सगळा कारभार आटोपला तर १००-८०+३०+१५ = ५५ रु नेट वर्थ.) आता समजा दर्वर्षी ५ रु मुद्दल फेडतो. यावर्षी माझ्याकडे २५ रु कुठूनतरी आले. मी या प्रकरणाला कर्ज म्हणून पहिल्यानी फेडावे का?
२. सरकारे कर्ज कधीच फेडत नाहीत. दर्वर्षी ते वाढतच जाते. कंपन्यांमधे लिवरेज म्हणून कर्ज नेहमी 'कंठाशी' (म्हणजे त्याच्याखाली नाही) ठेवण्याचा प्रयत्न करतात.
३. ६ महिने जगायला पुरेसे पैसे म्हणजे वरचे घरातले ५५ रु धरून? पीफ, घरातले सामान, सोने, बचती, दिलेली कर्जे, शेत्/घर यांसारखे असेट, डिपॉझिट्स, इ सगळे धरून? कि हे पैसे म्हणजे मासिक खर्चाच्या सहापट बँकेत बचत खात्यात पडलेले किरकोळ पैसे? कि आपल्या वार्षिक पगाराच्या अर्धे मूल्य असलेल्या लिक्विड गुंतवणूका?
४. देव न करो, पण काही झाले नि हे पैसे खर्च झाले तर सहा महिन्यांनी आयुष्य पुन्हा चालू? पण ज्यांच्याशी असे होते ते लोक नेहमी नेहमीच अशा इल्लिक्विड स्थितीत येणारांपैकी नसतात का?

चीजपफ Sat, 02/08/2014 - 02:06

In reply to by अजो१२३

डेव्ह राम्सेच्या अनेक क्लिप्स नेट्वर उपलब्ध आहेत. त्या सन्दर्भाने सारिका यानी लिहीले होते. वेळ मिळाला तर डेव्ह राम्से जरुर बघा.

............सा… Fri, 01/08/2014 - 20:51

एका परिचितांनी खालील लिंक एकदा पाठवलेली. मस्त आहे-
http://www.getrichslowly.org/blog/2009/09/28/money-is-more-about-mind-t…

Tenet #1: Money is more about mind than it is about math
Tenet #2: The road to wealth is paved with goals
Tenet #3: To build wealth, you must spend less than you earn
Tenet #4: Pay yourself first
Tenet #5: Small amounts matter
Tenet #6: Large amounts matter, too
Tenet #7: Do what works for you
Tenet #8: Slow and steady wins the race
Tenet #9: The perfect is the enemy of the good
Tenet #10: Failure is okay
Tenet #11: Financial balance lets you enjoy tomorrow and today
Tenet #12: Nobody cares more about your money than you do
Tenet #13: Action beats inaction
Tenet #14: It’s more important to be happy than to be rich

उदय. Sat, 02/08/2014 - 11:32

या लेखावर छान प्रतिसाद मिळाला हे बघून आनंद झाला. सर्वजण असेच सहभागी झाले, तर एकमेकांना एकमेकांकडून शिकता येईल, किमान दुसर्‍याची मते तरी कळतील.

जर तुम्ही वयाच्या ३१ ते ६५ वर्षे अशी ३५ वर्षे, वर्षाला फक्त रुपये २,००० गुंतवले आणि त्यात ९% वाढ झाली तर तुम्हाला ६५ व्या वर्षी रुपये ४,७०,२४९ मिळतील. पण तेच रुपये दरवर्षी २,००० प्रमाणे तुम्ही वयाच्या २२ ते ३० अशी फक्त ९ वर्ष गुंतवले आणि त्यात ९% वाढ झाली तर तुम्हाला ६५ व्या वर्षी मिळतील रुपये ५,७९,४७१!
सर्वात महत्वाचे: बचत सुरू करा आणि ती लवकरात लवकर सुरू करा!

या मुद्द्याचे जरा जास्त स्पष्टीकरण जरूरी आहे, असं मला वाटतय.
वर्षाला २००० रुपये किंवा २००० डॉलर जमा करणे इथल्या बहुतेकांना अशक्य नसावे. मुद्दा इतकाच आहे की शेवटी जर ५.५ लाख जमणार असतील (ते पुरेसे आहेत की नाहीत, हे मी म्हणत नाहीये), तर ते जमवण्याचे काय-काय मार्ग आहेत आणि त्यातला सोइस्कर पर्याय कुठला, हाच मुद्दा आहे. तुम्ही फक्त ९ वर्षे प्रत्येकी २००० रुपये गुंतवणार की ३५ वर्ष प्रत्येकी २००० रुपये गुंतवणार की वयाच्या ४० व्या वर्षी एकदाच ६१,६५१ रुपये गुंतवणार की ५० व्या वर्षी एकदाच १४५,९५० गुंतवणार की ६० व्या वर्षी एकदाच ३४५,५१७ गुंतवणार याने अंतिम ध्येयावर फरक पडत नाही, पण तुम्ही आयुष्यात ९ वर्ष मजा मारून ३५ वर्ष कुंथणार की ९ वर्ष जरा जास्त कुंथून मग ३५ वर्ष मजा मारणार हा सर्वस्वी व्यक्तिगत प्रश्न आहे. तितका उशीर कराल तितके जास्त पैसे गुंतवावे लागतील, म्हणजे जास्त वैताग. म्हणून त्याच्यावर माझे मत आहे की बचत सुरू करा आणि ती लवकरात लवकर सुरू करा. कारण चक्रवाढ व्याज ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. (Compound interest is a beautiful thing.)

२२ ते ३० वर्ष पगार खूपच कमी असणार, मग इतकी बचत कशी करणार, ३० नंतर बचत सोप्पी पडेल, हे नेहमीचे मुद्दे पुढे येतील, हा अंदाज आहे.
त्यामुळे चीजपफ यांच्याशी मी १००% सहमत आहे.

बचत/गुन्तवणूक हा काही सवयीचा भाग असतो (व्यायामासारखा). उत्पन्न कितीही असले तरी काही भाग (उदा: १०%) नियमितपणे गुन्तवणे जरुरी. अचानक ३१व्या वर्षी गुन्तवणूक करणे कठीण होते.

लग्न होण्याअगोदर पैसे शिल्लक ठेवण्याचे प्रयत्न केले तर नक्कीच जमू शकते. टक्केवारी बघितली तर लग्नाच्या आधी, कदाचित जास्त टक्के बचतही होत असेल. हिशोब करून बघा. (याच्यावरून एक विनोद आठवला: १ मित्र दुसर्‍या मित्राला म्हणतो "अरे, माझ्या बायकोचे क्रेडिट कार्ड गेल्या महिन्यात चोराने पळवले. दुसरा म्हणतो, मग लगेच कॅन्सल केलेस की नाही. तेव्हा पहिला म्हणतो, अरे, नाही केले. तो बायकोपेक्षा कमी खर्च करतोय.)

@अपरिमेय

२२ ते ६५ हा कालावधी खूप मोठा आहे (४४ वर्षे) आणी त्यामुळे चलनवाढीचा परिणाम नगण्य धरून चालणार नाही. जर चलनवाढीचा दर ८.५% मानला तर या दोनही पर्यायांची net present value सारखीच येते (~१३,५००).

दोन्ही पर्यायांची अंतिम रक्कम जवळपास सारखीच आहे (साडेपाच लाख), त्यामुळे चलनवाढीचा दर कितीही मानला तरी त्याने काय फरक पडतो? चलनवाढीचा दर बदलला तर फार तर NPV बदलेल. पण भविष्यात चलनवाढ किती असेल, इन्कम टॅक्सदर किती असेल तर ते आत्ताच सांगता येत नाही. त्यामुळे सध्याचे उत्पन्न किती आहे आणि त्याच्या किती टक्के आपण बचत करतोय, इतकेच आपण बघू शकतो.

@राजेश घासकडवी

पण लवकर सेव्हिंग सुरू करण्यासाठीच्या गणिताने भुलून जाऊन आजचा आनंद विसरू नये एवढंच म्हणायचं आहे.

असहमत. पैसा आणि त्यातून मिळणारा आनंद याबद्दल वेगळा लेख लिहिणार आहे. (utility theory, behavioral economics)

कदाचित २२ ऐवजी ३२ लाच सुरू करावं सेव्हिंग, कारण तेव्हा आपल्या करिअरचा थोडाफार अंदाज आलेला असतो.

worst advice in my opinion.
म्हणूनच वॉरन बफेने म्हटलं आहे Life is like a snowball. The important thing is finding wet snow and a really long hill. स्नोबॉल टेकडीवरून खाली येताना मोठा-मोठा होत जातो. आयुष्यात लवकर टेकडीच्या वर शक्य तितका wet snow जमा केला, तर शेवटी मिळणारा स्नोबॉल मोठा मिळेल.

लेखात एका बाजूच्या आनंदाची मांडणी केली आहे, मी दुसरी बाजू मांडली इतकंच.

Delayed gratification मुळे आर्थिक स्वातंत्र हे आयुष्यात लवकर मिळते, इतकेच लेखात सांगायचे आहे. अरे उद्याचा कसला विचार करताय, आत्ता मजा करा? हा विचार आजूबाजूला सर्वत्र दिसत असतो. त्यामुळे लेखातले विचार हीच दुसरी बाजू आहे, असे समजायला ऑब्जेक्शन नसावे, असे वाटते.

@अरुणजोशी

लाँग टर्म मधे सगळ्याच असेट्स चे रिटर्न्स सेमच असतात. इक्वीटी, बाँडस, सोने, परकीय चलन, कमोडिटी, जमीन, इ इ चा सामान्य वार्षिक परतावा गेल्या ४० वर्षांचा काढला तर तो सेमच असतो.

शिक्षणात खर्च होतो, गुंतवणूक नव्हे.

जमीन्/सोने/हिरे/कला इ घ्यावे.

१००% असहमत. तुमचे इतके प्रश्न आहेत, की त्या प्रश्नांना स्वतंत्र उत्तर लागेल. नंतरच्या लेखांमध्ये अजून खुलासा/डिस्कशन करू.

चीजपफ Sat, 02/08/2014 - 20:06

असहमत. पैसा आणि त्यातून मिळणारा आनंद याबद्दल वेगळा लेख लिहिणार आहे. (utility theory, behavioral economics)

-ह्या लेखाची वाट बघतो. कौटिल्य अर्थशास्त्र वाचले आहे - ३३% कमाई मध्ये वर्तमान, ३३% भविष्य आणि ३३% भूतकाळ (आई-वडील, जिथे वाढ्लो तो समाज इ.) असा खर्च करावा सान्गितले आहे. नवीन थेअरिज वाचायला आवडेल.

उदय. Mon, 04/08/2014 - 10:45

In reply to by चीजपफ

पण लवकर सेव्हिंग सुरू करण्यासाठीच्या गणिताने भुलून जाऊन आजचा आनंद विसरू नये एवढंच म्हणायचं आहे. >>> या वाक्यातील अधोरेखित भागाला असहमत म्हणायचे आहे. आजचा आनंद विसरावा असे म्हणत नाहीये.

खालील वाक्य वेगळ्या परिच्छेदात हवे होते.
पैसा आणि त्यातून मिळणारा आनंद याबद्दल वेगळा लेख लिहिणार आहे. (utility theory, behavioral economics)

............सा… Mon, 04/08/2014 - 18:31

उदयजी लेखमाला भन्नाट सरकते आहे. खूप उपयोग होतो आहे. आपण आधीच्या लेखांचेही दुवे देऊ शकता काय?
_________
वर्तमान्पत्रात अमेरीकन लोकांच्या कर्जबाजारीपणाबद्दल एक भेदक वाक्य वाचले- Ultimately, it's because we allow ourselves to be sold on things we can't afford, both as individuals and as society.