स्वातंत्र्योत्तर भारतात समाजवादाची वाटचाल- भाग २ : मध्यमवर्गाचा विस्तार.
पुढे इंदिरा गांधींची टीवी क्रांती आणि राजीव गांधींची टेलिकॉम आणि कम्प्यूटर क्रांती यांमुळे बरेच काही बदलले. पारंपरिक उद्योगक्षेत्राहून भिन्न अशा इलेक्ट्रॉनिक्स आणि आय.टी. क्षेत्रात उच्चशिक्षितांसाठी रोजगार उपलब्धता पुष्कळच वाढली. खेडोपाडी, तालुक्याच्या गावी इंजीनीअरिंग कॉलेजांचे पेव फुटले. टीवीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची दृश्यमानता वाढली. वाहिन्या वाढल्या, परदेशी वाहिन्या वाढल्या, जाहिराती वाढल्या. वस्तूंमध्ये निवडीचे पर्याय निर्माण झाले. मशेरीऐवजी कोल्गेट आली. तथाकथित चंगळवाद वाढला. आर्थिक उदारीकरणानंतर ट्रेड आणि कॉमर्स ला महत्त्व येऊ लागले. उत्पादनापेक्षा व्यापारउदीमामुळे संपत्तीचे चलनवलन आणि हस्तांतर वाढू लागले. शेअर-बाजार विस्तारला. या सगळ्याची दखल समाजवाद्यांनी म्हणावी तशी घेतली नाही. उत्पादन क्षेत्रात निम्न स्तरावरील कामगारवर्गात समाजवाद्यांचे आणि कम्यूनिस्टांचे बस्तान बर्यापैकी बसले होते. पण आर्थिक व्यापाराच्या वाढत्या रोजगारीच्या क्षेत्रात मात्र त्यांचा शिरकाव झाला नाही. मध्यमवर्गाची मिळकत आणि व्याप्ती वाढली तसतसा या वर्गातून समाजवाद बाहेर फेकला गेला.
समाजवाद्यांचा पहिल्यापासूनच भर संपत्तीच्या समान वाटपावर होता, संपत्तीनिर्मितीवर नव्हता. ते कुटिरोद्योग, ग्रामोद्योग, स्वयंपूर्ण खेडी या संकल्पनांमध्ये मग्न राहिले. टीवी टॉवर्सना विरोध, कम्प्यूटरला विरोध अशा कालबाह्य कल्पनांना गोंजारत राहिले आणि स्वतःच कालबाह्य ठरले. काड्यापेटीनिर्मिती हा कुटिरोद्योग असावा, मोठ्या कंपन्यांस काड्यापेटया बनवण्यास परवानगी देऊ नये असे विचार राबवत असताना काड्यापेटी कालबाह्य होऊ लागली आहे, त्याऐवजी लाय्टर येताहेत हे या लोकांच्या लक्षात आले नाही.
ग्लोबल विलेजच्या जमान्यात खेडी स्वयंपूर्ण असावीत, गरजेच्या सर्व वस्तूंचे उत्पादन शक्यतो खेड्यातच व्हावे, हे स्वप्नरंजन झाले.
शेती घाट्यात जात होती आणि शहरांकडे लोकांची रीघ लागली होती. त्यामुळे तत्त्वांची, मूल्यांची समीकरणे बदलत होती याविषयी पुढच्या भागात.
>>उत्पादन क्षेत्रात निम्न
>>उत्पादन क्षेत्रात निम्न स्तरावरील कामगारवर्गात समाजवाद्यांचे आणि कम्यूनिस्टांचे बस्तान बर्यापैकी बसले होते. पण आर्थिक व्यापाराच्या वाढत्या रोजगारीच्या क्षेत्रात मात्र त्यांचा शिरकाव झाला नाही.
व्हाइट कॉलर लोकांमध्ये (बँका, सरकारी आस्थापने) ते कमीच होते. त्यात आर्थिक व्यापार हा बांडगुळी व्यवसाय आहे अशी काहीशी भूमिका असावी. म्हणून त्या क्षेत्राशी फटकून राहिले.
शिवाय अनेक आर्थिक व्यवसायात कर्मचारी/कामगार संख्या पुरेशी नसल्याने युनियन स्थापणे वगैरे अशक्यच होते.
लेखन आवडते आहे हे वेगळे सांगायला नकोच.
थोडासा असमहत
व्हाइट कॉलर लोकांमध्ये (बँका, सरकारी आस्थापने) ते कमीच होते. त्यात आर्थिक व्यापार हा बांडगुळी व्यवसाय आहे अशी काहीशी भूमिका असावी. म्हणून त्या क्षेत्राशी फटकून राहिले.>>
(खरंतर लेखातील सारे मुद्दे थोडेसे कालाच्या संदर्भात यायला हवेत. तेव्हा अशी विधाने तपासून पाहताना नेमकी चर्चा होऊ शकेल. असो.) मुळात स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा सर्वच इजम आणि राजकीय पक्ष आपापले प्रभावक्षेत्र निर्माण करत होते, तेव्हा मुख्यतः रशियाच्या प्रभावाखाली असलेले कम्युनिस्ट हे प्रत्यक्ष उत्पादक (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रावरच आपले लक्ष केंद्रित करत होते. मुळात आर्थिक आस्थापने हे उत्पादक आहेत, ते व्यवसायच करतात याचे भानच कम्युनिस्टांना - किंवा एकुणच कोणत्याही पक्षाला वा इजमच्या धुरिणांना - नसावे असा माझा कयास आहे. आर्थिक आस्थापनांकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची सुरुवातच खूप उशीरा झालेली असावी माझ्या मते प्रथम विमा कंपन्यांचा विस्तार झाल्याने हे घडले असावे, बँकांकडे व्यवसाय म्हणून पाहणे त्यानंतर आले असावे. पण हा कयास चुकलेला असू शकतो.
शिवाय अनेक आर्थिक व्यवसायात कर्मचारी/कामगार संख्या पुरेशी नसल्याने युनियन स्थापणे वगैरे अशक्यच होते.>>
हे बरोबर असले तरी निव्वळ कामगारांच्या बाजूने पाहतानाही अनेक कारणे आहेतच. (व्यावसायिक बाजूबाबत इथेच वर लिहिले आहेच.) समाजात नेहेमीच एक अदृष्य अशी रेषा असते नि जी ओलांडून जाण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. या रेषेने दोन गट निर्माण होतात. एक स्वतःला एकुण समाजापेक्षा अधिक यशस्वी, म्हणून प्रगत वा विकसित समजणारा आणि उरलेला त्या गटाला नावे ठेवत त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ती अदृष्य रेषा ओलांडू पाहणारा. कम्युनिस्ट याला आहे रे' नि 'नाही रे' वर्ग म्हणतात. परंतु हे निव्वळ आर्थिक निकषावर झालेले नसतात! आणि ती रेषाही सतत बदलतीच असते. तेव्हा स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरकारी नोकरी वा एकुणच चाकरमानी झालेले, नियमित उत्पन्न मिळवणारे लोक नि उरलेले कुशल/अकुशल कामगार अशी विभागणी नकळत झालेली होती. चाकरमान्यांना समाजात मान असे, लग्नाळू मुलींचे आईबाप देखील शेतीपेक्षा 'नवकरी' असलेला जावई शोधू लागले होते (गंमत म्हणजे आज हेच 'यनाराय' जावई शोधण्यापर्यंत पोचले आहे. :) ). तेव्हा हे 'यशस्वी' लोक उरलेल्या 'मागे राहिलेल्यांबाबत' सूक्ष्म तिरस्कार वा स्वत:बाबत अहंकार बाळगून होते. तेव्हा 'त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे नेते, त्यांची जीवनपद्धती' आपली नसली पाहिजे हा दुराग्रह, हट्ट असला पाहिजे. यातून 'सर्वसामान्यांचे हित' अशी भाषा करणारे म्हणजे आम्हा प्रिविलेज्ड लोकांचे अहित करणारे असे सरळ - पण चुकीचे - गणित मांडणारेही होते, आहेत. तेव्हा डाव्या विचारांना अशा समाजात तेव्हाही अपील नव्हते, आजही नाही. (गंमत म्हणजे यांचे नेते याच समाजातून येतात, पण त्याची कारणे वेगळी. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.)
थोडक्यात या वर्गाला हे तत्त्वज्ञान आपल्या हिताच्या विरोधी वाटत होते/वाटते. आजही जागतिकीकरण ही जादूची कांडी समजणारे त्याचा एकुण विस्तृत समाजाबाबतचा परिणाम लक्षात घेणे नाकारतात, त्याबाबत नकारात्मक बोलणार्याला चटकन प्रगतीविरोधी, कम्युनिस्ट ठरवतात तेव्हा 'कम्युनिस्ट वा समाजवादी' ही त्यांनी शिवीच बनवून टाकलेली असते (आणि ते विशेषण हे अवघड प्रश्नांपासून पळून जाण्यासाठी वापरलेले हत्यार). हा वर्ग जिथे युनिअन असते तिथेही संपात भाग घेणे टाळणारा असतो, सत्ताधार्यांना धार्जिणा असतो. पण त्याच वेळी संपाला जर तात्विक विरोध होता तरीही त्यातून हाती लागलेले लाभ स्वाभिमानी राहून नाकारत नसतो. हाती आलेली सुस्थिर आयुष्य गमावण्याची त्यांची तयारी नसते. एकुण कातडीबचावू वृत्तीचा म्हणावा लागेल. याच कारणासाठी मार्क्सने यांना क्रांतीचे, वेगवान प्रगतीचे शत्रू म्हटले आहे नि त्यातून बूर्ज्वा ही कम्युनिस्टांच्या तोंडची शिवीच होऊन गेली आहे. (दोन्ही बाजू एकाच वृत्तीच्या आहेत हे गंमतीशीर असले तरी दुर्मिळ नक्कीच नाही. :) ) कारण हे प्रामुख्याने धोका पत्करण्यापेक्षा जे चार आणे यश मिळाले ते राखून आयुष्यभर पुरवणारे असतात. आणि धंद्याच्या नियमानुसार वेगाने प्रगती व्हायची तर भरपूर धोका पत्करावा लागतो, अनेकदा आमूलाग्र बदल करावे लागतात (मग ती सशस्त्र क्रांती असो की जागतिकीकरणाचे तत्त्व स्वीकारून स्थानिक उद्योगांना कदाचित धोक्यात घालणे असो.) आणि या बूर्ज्वा समाजाची याला तयारी नसते. धंदापाण्याच्या फंदात न पडता महिन्याच्या महिन्याला पैसे देणारी नोकरी यांना अधिक प्रिय असते. मर्यादित स्वप्ने, मर्यादित महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक बांधिलकीचा अभाव यामुळे हा वर्ग राजकारणात नि समाजकारणात कधी फारसा रमलाही नाही आणि उलट दिशेन त्या दोन गटात असलेल्यांकडूनही उपेक्षितच राहिला. आणि म्हणून सतत उपेक्षितपणाची क्षीण ओरडही करत राहिला. यांचेच वंशज सध्या फेसबुकवर आपल्या उपेक्षितपणाच्या आवेशपूर्ण पोस्ट्स शेअर करतात नि एखादा जादूगार येऊन सगळे आलबेल करून टाकेल अशा बालिश स्वप्नांमधे रमतात.
माहितीपूर्ण लेखमालिका.
माहितीपूर्ण लेखमालिका.
कुटुंबव्यवस्थेची संयुक्ततेकडून चौकोनीपणा कडे झालेली वाटचाल आणि त्यानंतर आता फक्त "मी" महत्वाचा याकडे जात चाललेली सामाजिक व्यवस्था याचा समाजवादाच्या क्षीण होण्याशी संबध असावा का? कारण ज्यावर बेशक अवलंबून रहाता येतील अशी सार्वजनिक आरोग्य्,वाहन वगैरे व्यवस्था कमी होत चालल्या. एक माणूस चळवळीत असेल तर त्याच्या कुटुंबियांना सोडाच, त्याला कोणी पोसंणंही कठीण. कार्यकर्त्याला सुरक्षित वाटेल, संकटात आपल्या पाठीशी उभ्या राहतील असं वाटेल अश्या व्यवस्था बनवण्यात समाजवाद कमी पडला का?
आणि त्यानंतर आता फक्त "मी"
आणि त्यानंतर आता फक्त "मी" महत्वाचा याकडे जात चाललेली सामाजिक......
...
कार्यकर्त्याला सुरक्षित वाटेल, संकटात आपल्या पाठीशी उभ्या राहतील असं वाटेल अश्या व्यवस्था बनवण्यात समाजवाद कमी पडला का?
मोहनराव भागवतांचे दसर्यानिमित्त जे भाषण झाले ते ही याच - "मी पणा" विरोधी - सूर लावते. (स्वार्थ को परार्थ .... वगैरे वगैरे.)
कार्यकर्त्याला सुरक्षित वाटेल अशी व्यवस्था (सार्वजनिक आरोग्य, दळणवळण वगैरे) ही कार्यकर्त्याच्या स्वार्था शी किंवा स्वहितसंबंध जपण्याच्या प्रवृत्तीशी सुसंगत नाही असा अर्थ काढावा का ?
----
समाजवाद जिथे कमी पडला त्यात असलेल्या ज्या बाबी आहेत त्यातील काही बाबी ह्या - की - स्वहितसंबंध व स्वार्थ - हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत असे मानले गेले. व दुसरे म्हंजे व्यवस्था ही "झिरो सम गेम" आहे - असे ही मानले गेले. तिसरे म्हंजे सर्व प्रकारच्या स्वयंस्फूर्त ट्रेड (देवाणघेवाण) मधे शोषण अनिवार्यपणे होतेच - असे ही मानले गेले.
स्पष्टच सांगायचं तर
बरेचसे मुद्दे वरवर राहिलेत, विस्तारपूर्वक लिहिले तर अजून मजा येईल.
या सगळ्याची दखल समाजवाद्यांनी म्हणावी तशी घेतली नाही.>> या वाक्यापर्यंत पूर्ण सहमती. पुढे मात्र बरीचशी असमहतीच.
समाजवाद्यांचा पहिल्यापासूनच भर संपत्तीच्या समान वाटपावर होता,>> हे एक विधान मी वारंवार ऐकतो. गोबेल्स तंत्राचा वापर आपल्याकडे फार पूर्वीपासून होतो आहे. त्याचाच हा परिपाक म्हणावा लागेल. (जसे आमच्या बिचार्या चार्वाकाच्या नावे 'ऋण काढून सण साजरे करा' हे वाक्य ठोकून दिले जाते नि संस्कृत नि संस्कृतीप्रेमी त्यावर विश्वास ठेवू इच्छितात नि ठेवतात तसेच.) याचा उगम रशियन मार्क्सवादी धोरणात असावा असा माझा कयास आहे. मुळात समाजवादी सोडा पण त्यातले कट्टर असलेले कम्युनिस्टही संपत्तीचे समान 'वाटप' हे धोरण ठेवून नसतात, ते समान 'संधी' बाबत बोलतात. परंतु अभावाच्या काळात नि क्षेत्रात सर्वांच्या किमान गरजा भागाव्यात यासाठी शासनाला वितरण-नियंत्रण करावेच लागते. रशियातील लाल-क्रांतीनंतरच्या काळात याच कारणाने जे रेशनिंग केले त्या काळाचा आधार घेऊन हे 'समान वाटपा'चे तर्कट सोयीने उचलून धरले गेले असावे.
(यावर चटकन 'बघा पण तुटवडा आलाच ना' म्हणणार्यांनी कम्युनिजमपूर्व रशियाचा इतिहास थोडा अभ्यासावा ही आगाउ विनंती. मूठभर तार्तरांच्या झुंडींना खंडणी देणारा खंडप्राय देश ही त्याची ओळख होती. समृद्धी नावाचा प्रकार तिथे कधीच नव्हता. 'ही हॅज व्हॉट वी नेवर हॅड इन रशिया, स्टार्वेशन!' असे म्हणून टाळी खेचणारा डॉ. जिवागो हा झारच्या मर्जीतल्या गर्भश्रीमंत बापाचा पुत्र असतो हे विसरायचे नाही. म्हणूनच पास्तरनाक हा पाश्चात्त्यांचा डार्लिंग असला तरी रशियात त्याला किंमत नसते. संदर्भ चुकले - किंवा हेतुतः चुकवले - की हवे ते अर्थ काढता येतातच. पण सोयीच्या निष्कर्षांवर खूष होणार्यांचे सोडा, जाणून घेण्याची इच्छा असणार्याने ते लक्षात घ्यायला हवेत.)
संपत्तीनिर्मितीवर नव्हता. >> हे तर साफच अमान्य. केंद्रीय शासनव्यवस्थेकडून उद्योगधंद्यांची उभारणी करणे, त्यासाठी सुसूत्रपणे एकत्रित बळाची उभारणी करणे हेच मुळी समाजवादाचे मुख्य सूत्र राहिले आहे. रशिया, युगोस्लाविया, पूर्व जर्मनी, इटली इ. देशांतून हेच सूत्र अंमलात आणले गेले. (प्रत्येकाचे यशापयश वेगवेगळ्या पातळीवर राहिले ते त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थिती नि नेत्यांच्या कुवतीमुळे.) अर्थात यासाठी सत्ता हाती असणे आवश्यक असते. आणि म्हणूनच याची एक बाजू म्हणून कम्युनिस्ट हे लोकशाही व्यवस्था नाकारतात. प्रबळ केंद्रीय सत्ता निर्माण करायची तर लोकशाही व्यवस्थेमधे ते शक्य होत नाही हे याचे मुख्य कारण.
तुम्ही ज्यांचा संदर्भ घेत आहात ते भारतीय समाजवादी मंडळीतले गांधींच्या प्रभावाखालचे लोक आहेत. त्यांना मूळ समाजवादाचाच काय त्याच्या भारतीय अवताराचा स्पर्शदेखील झाला नसावा.
ग्लोबल विलेजच्या जमान्यात खेडी स्वयंपूर्ण असावीत, गरजेच्या सर्व वस्तूंचे उत्पादन शक्यतो खेड्यातच व्हावे, हे स्वप्नरंजन झाले.>>
माझ्या मते ग्लोबल विलेज हेच स्वप्नरंजन आहे! एकीकडे समाजवादी मंडळींच्या केंद्रीभूत सत्तेच्या रेजिमेंटेशन ला विरोध करताना ग्लोबल विलेजच्या नावाखाली पुन्हा रेजिमेंटेशनच आणले जाते आहे. शिवाय याचा एक मोठा धोका संरक्षक फळ्या नसण्याचा! धरणात अतिरिक्त पाणी साठून त्याला अपाय होऊ नये म्हणून जशी फ्लडगेट्स असतात तशी कोणतीही संरक्षित झापडे जागतिकीकरणात शिल्लक रहात नाहीत. हे काहीसे डोंगर चढताना सर्व ट्रेकर्सनी एकमेकांना दोरखंडाने बांधून घेऊन चढण्यासारखे आहे. याचा हेतू एखादा निसटला तरी इतरांच्या दोरांना लटकून तो खाली कोसळण्यापासून बचावेल हा हेतू असतो. परंतु असेही होऊ शकते की एखाद्या अवघड टप्प्यावर त्यातला एक जण हात निसटून एक कोसळला तर तो सार्यांनाच घेऊन तो तळाला जाईल. इतरांना स्वतःच्या बचावाची संधी मिळणार नाही. विशेषतः अशा वेळी जिथे पुरेशी पूर्वसूचना न मिळता हा टप्पा येतो तेव्हा, जसे सब-प्राईम क्रायसिसच्या काळात घडले (जसे २०१६ मधे पुन्हा एकवार घडू शकेल असे म्हटले जाते.) तेव्हा जसे 'खेड्याकडे चला' हे टोकाचे विकेंद्रीकरण धोकादायक तसे 'ग्लोबल विलेज'चे आकर्षक वाटणारे (ग्लोबल हा शब्द तसाही गोबेल्स'शी बराच मिळताजुळता आहे. :) ) पण अखेरीस सार्यांनाच रसातळाला घेऊन जाणारे स्वप्नही. मुद्दा राहतो तो तारतम्याचा! पण आपल्या बुवा बाबाच्या, इजमच्या, चार पैसे हाती खुळखुळले म्हणून वाटेल त्या व्यवस्थेच्या समर्थनार्थ वाटेल त्या थराला जात त्याचे संभाव्य गंभीर परिणाम नजरेआड करणार्या निव्वळ स्वार्थाप्रेरिण जिणे जगणार्यांच्या अस्तंगत झालेल्या तारतम्याचा !!!
केंद्रीय शासनव्यवस्थेकडून
केंद्रीय शासनव्यवस्थेकडून उद्योगधंद्यांची उभारणी करणे, त्यासाठी सुसूत्रपणे एकत्रित बळाची उभारणी करणे हेच मुळी समाजवादाचे मुख्य सूत्र राहिले आहे.
ररा, समाजवाद म्हंजे नेमके काय - याबद्दल आपल्या दोघांत एकमत आहे. लय भारी. या वाक्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. वाक्य कमीतकमी शब्दात समाजवाद व्यवस्थित स्पष्ट करते. शब्दार्थ व त्याची कनोटेशन्स अनेक असू शकतील पण हे वाक्य "माझ्या दृष्टीने" तू लिहिलेले सर्वोत्कृष्ठ वाक्य आहे.
लेख आणि प्रतिसाद उत्तम. हे तर
लेख आणि प्रतिसाद उत्तम.
हे तर साफच अमान्य. केंद्रीय शासनव्यवस्थेकडून उद्योगधंद्यांची उभारणी करणे, त्यासाठी सुसूत्रपणे एकत्रित बळाची उभारणी करणे हेच मुळी समाजवादाचे मुख्य सूत्र राहिले आहे. रशिया, युगोस्लाविया, पूर्व जर्मनी, इटली इ. देशांतून हेच सूत्र अंमलात आणले गेले. (प्रत्येकाचे यशापयश वेगवेगळ्या पातळीवर राहिले ते त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थिती नि नेत्यांच्या कुवतीमुळे.) अर्थात यासाठी सत्ता हाती असणे आवश्यक असते. आणि म्हणूनच याची एक बाजू म्हणून कम्युनिस्ट हे लोकशाही व्यवस्था नाकारतात. प्रबळ केंद्रीय सत्ता निर्माण करायची तर लोकशाही व्यवस्थेमधे ते शक्य होत नाही हे याचे मुख्य कारण.
चीनमधला समाजवाद/कम्युनिझम अधोरेखीताच्या(Democratic centralism) अनुशंगानेच आहे असे म्हणता यावे काय?
+१
>>तुम्ही ज्यांचा संदर्भ घेत आहात ते भारतीय समाजवादी मंडळीतले गांधींच्या प्रभावाखालचे लोक आहेत.
ते सर्वोदयी लोक होते. जयप्रकाश नारायण, विनोबा भावे वगैरे.
जयप्रकाश नारायण हे उघडपणे समाजवादविरोधी (कम्युनिझमविरोधी) होते. अमेरिकाप्रणित कम्युनिझमविरोधी (सोसायटी फॉर फ्री स्पीच)* संघटनेचे ते सचिव का काय तरी होते.
*या संघटनेचे नाव शोधून सांगतो.
लहान
हा अंक लहान वाटला.
अजून वाचायला आवडेल.
चार तारका माझ्यातर्फे.