Skip to main content

अमेरिकन सैनिकांचे वाढते लैंगिक गुन्हे

अमेरिकन सैनिकांनी केलेल्या लैंगिक गुन्ह्यांच्या संदर्भातली एक बातमी http://in.news.yahoo.com/violent-sex-crimes-u-army-soldiers-rise-report… नुकतीच वाचनात आली. युद्धामधील प्रत्यक्ष सहभागामुळे बसलेला मानसिक धक्का, सैन्यामधील वाढती बेशिस्त, ताणतणाव आणि युद्धामुळे चढलेला उन्माद यामुळे हे सैनिक असे गुन्हे करण्यास उद्युक्त होतात असे या बातमीत म्हटले आहे. यातील बरेच गुन्हे अमेरिकेत होतात आणि लैंगिक हल्ले, बलात्कार, जबरी समलिंगी संभोग आणि लहान मुलांच्या संदर्भातले लैंगिक गुन्हे असे या गुन्ह्यांचे स्वरुप असते असेही या बातमीत म्हटले आहे. इराक आणि अफगाणिस्थानात जाऊन आलेल्या अमेरिकन सैनिकांमध्ये अशा प्रवृत्तींचे वाढते प्रमाण दिसले आहे.
जागतिक राजकारणात नाक खुपसण्याची किंमत अमेरिकेने अनेक वेळा अनेक पद्धतीने दिली आहे. नेहमीप्रमाणे घाणेरड्या राजकारणात भरडला जातो तो सामान्य माणूस. पण बदल्याचे राजकारण आणि 'माझेच नाक वर' असा माज याची किंमत काही लोकांना आयुष्यातून उठवून द्यावी लागत असेल तर याचा शेवट कुठे होणार असा प्रश्न मनात येतो. युद्धात एकूण होणार्‍या हानीच्या प्रमाणात हे काहीच नाही, असा यावर एक प्रतिवाद होऊ शकतो, पण युद्ध संपले (आणि समजा जिंकले) म्हणून प्रश्न संपले असे नाही हेच अशा बातम्यांनी अधोरेखित होते. War does not tell you who was right, it only tells you who is left अशा आशयाचे एक वाक्य आठवते.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/01/2012 - 09:12

घाणेरड्या राजकारणात आणि युद्धातही! सद्दामच्या राज्यात सद्दामच्या जातीतल्या सामान्यांचं आयुष्य तरी बरं असेल ना? बातमीत म्हटल्याप्रमाणे There were 2,811 violent felonies in 2011, nearly half of which were violent felony sex crimes. Most were committed in the United States. ... युद्धाची किंमत कराच्या स्वरूपात अमेरिकन्स काही प्रमाणात भरत आहेतच, या प्रकारानेही त्यांनाच किंमत चुकवावी लागते आहे.

व्हेटरन्ससाठी पैसे द्या, त्यांनी स्वातंत्र्यासाठी फार कष्ट केले आहेत, असले फोन आले की माझ्या तोंडावर येतं, "मी सांगितलं नव्हतं लोकांच्या देशात जाऊन मारामार्‍या करायला!"

अवांतरः ब्रिटीश सैन्याने काहीतरी नवीन सैनिकी कायदा केल्याची बातमी आठवली. इराक, अफगाणिस्तानात स्त्री, पुरूष सैनिकांचे एकमेकांशी संमतीनेही शारीरिक संबंध रहातात आणि त्यातून पुढे स्त्रिया बाळंतपणाची सुट्टी मागतात. अचानक मागितलेल्या सुट्ट्या नाकारणंही शक्य नाही आणि हो म्हणायचं तर तिथे फोर्स कमी पडणार! याला उपाय म्हणून स्त्री सैनिकांनी काँडोम्स बाळगावेत अशी सूचना आली.

मी Sat, 21/01/2012 - 10:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदाने व्हिएतनाम/इराक/अफगाणिस्तानात जाणारा कोणी सैनिक असेल असे वाटत नाही, आपल्या देशातील लोक चैन करत आहेत पण आपण सत्ताधाऱ्यांच्या सत्ता-लोलुपतेसाठी नको त्या देशात मरतो आहोत ही जाणिव फारशी आनंददायक नसावी, त्यामुळे सैनिकांना ते कुठे गेल्याबद्दल पुर्ण दोष देता येणार नाही, पण परिस्थिती अनैतिक वागण्याचे कारण कायम असू शकत नाही हे ही खरेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 22/01/2012 - 00:57

In reply to by मी

काही अमेरिकन सैनिकांनी, अधिकार्‍यांनी युद्धाचा विरोध केल्याच्या आणि त्यांच्यावर लष्करी शिस्त मोडल्याचे गुन्हे नोंदवण्याच्या घटना घडल्याचं आठवत आहे.

भारतीय सैनिकही अशा प्रकारचे अत्याचार करत आहेतच, आणि ते तर स्वतःच्याच देशात तळ ठोकून बसलेले आहेत. शर्मिला इरोम नावाची एक भारतीय स्त्रीच त्याविरोधात गेली दहा वर्ष उपोषण करत आहे.

काही मोजक्या लोकांच्या सत्ता, पैसालोलुप वृत्तीमुळे समाजाच्या मोठ्या घटकास नेहेमीच त्रास सहन करावा लागतो. 'बाईमाणूस' या स्त्रीवादी पुस्तकात करूणा गोखले यांनी एक वेगळा विचार मांडला आहे तो आठवतो. स्त्रियांनी पुरूषांशी बरोबरी करावी हे काही प्रमाणात ठीक आहे, पण पुरूषी वृत्तीतून जे दुर्गुण येऊ शकतात ते उचलू नयेत. इतिहासात युद्धखोर पुरुषांमुळे स्त्रियांना नेहेमीच त्रास झालेला आहे.
सर्वच पुरूष असे असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, किंबहुना आजच्या काळात बहुतांश युद्धाच्या विरोधातच असतील. पण इतिहासात आणि आजही बहुतांश सत्ता पुरूषांच्या हातात आहे, सैन्यात अधिकांश पुरूष आहेत आणि त्यांचा त्रास सर्वप्रथम स्त्रिया, मुलींना होतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पुरूषांशी बरोबरी करताना हा (दु:)गुण सोडून द्यावा, एवढंच.

देशाच्या संरक्षणासाठी सैन्य असावंच, पण युद्धखोरीपेक्षा त्या सैनिकी ताकदीतून शांतताच नांदेल याची काळजी घेणं मला जास्त श्रेयस्कर वाटतं.

मी Sun, 22/01/2012 - 21:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सैनिकांच्या मानसिकतेशी निगडित मुद्द्याबद्दल बोलायचे झाल्यास, तणावपूर्ण वातावरणात बर्‍याच काळ वावरल्याने त्याचे दुष्परिणाम दिसणे साहजिक आहे, तो तणाव कमी व्हावा यासाठी प्रत्येक देशाचे सैनिकदल विशेष प्रयत्न करत असते, तरी देखील दूरगामी परिणाम आणि मुळात पुरुषी मानसिकता व इतर काही वैयक्तिक बाबी अशा गोष्टींसाठी जबाबदार असाव्यात.

आपल्याकडे सियाचीन मधील काही ठाणी अशी आहेत की तिथे ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ पोस्टिंग दिलीच जात नाही, सभोवताली कायम बर्फ, बंदुकीच्या टप्प्यात शत्रू, शून्य सामाजिक जीवन ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीत सैनिकाचे मनोबल खच्ची होते, त्यासाठी पोस्टिंगचा कालावधी जास्त ठेवता येत नाही, ही माहिती त्या पोस्टिंगवर असलेल्या मेजर कडून मिळालेली आहे, काही अधिक वजा कालानुरूप असू शकेल.

तुम्ही मांडलेला दुसरा मुद्दा हा स्त्रियांबद्दल असलेली पुरुषी मानसिकता हा आहे, त्याबद्दल दुमत नाहीच, पुरुषी मानसिकता ही सत्ता गाजविण्याकडे जास्त झुकलेली असते, त्यासाठी कमी शारिरीक ताकदीचे कुठलाही जिव चालतो, स्त्री हा त्यामानाने स्वस्तात उपलब्ध होणारा जीव आहे, त्यामुळे हे असे गुन्हे घडताना दिसतात.

शांता गोखलेंचं मत रोचक आहे, पण मी वैयक्तिकरीत्या त्या मताशी सहमत नाही, त्या मुद्द्यात - "स्त्रियांनी पुरूषांशी बरोबरी करावी हे काही प्रमाणात ठीक आहे, पण पुरूषी वृत्तीतून जे दुर्गुण येऊ शकतात ते उचलू नयेत" पुरुष वागतात तेच आदर्श आहे, त्यामुळे बरोबरी करण्यास हरकत नाही असा देखील अर्थ निघतो, जो कदाचित त्यांना अभिप्रेत नसावा, प्रत्येक प्रकृती रादर व्यक्ती वेगळी असल्याने बरोबरी न करता जमेल तेवढे स्वत:ला योग्य वाटेल असे वागत राहणे जास्त उचित वाटते.

............सा… Sat, 21/01/2012 - 09:57

http://www.nytimes.com/2011/12/02/us/more-military-dogs-show-signs-of-c…

जिथे लढाईवर गेलेल्या श्वानांच्या मनावर दूरगामी अनिष्ट परीणाम होतो तिथे माणसासारख्या बुद्धी, विवेक, संवेदनशीलता जागृत असलेल्या प्राण्याबद्दल काय बोलावे!

आडकित्ता Sat, 21/01/2012 - 22:28

हाच एक भयंकर मोठा गुन्हा आहे.
तरीही प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सैनिक प्यारा आहे.
(अमेरिकन नागरिकांस तेच सैनिक प्यारे आहेत. तुम्ही कितिही बडबड केलीत तरी.)
जर दुसरे नगर जिंकले, तर सैनिकाने तिथे केलेली लूट अन बलात्कार युद्धाच्या नीतीस, धर्मास मान्य आहे. होता. राहील.
बलात्कार मान्य असण्याचं सोपं कारण. युद्ध हाच एक बलात्कार आहे. -बलाने केलेला अत्याचार.- तर आता.
हा प्रकार अमेरिकन सैन्याने केला, किंवा अर्मेनियन. मिडियाचा अधिकार आहे बिन्डोक बातम्या देण्याचा. भारत देशात रिटायर्ड मिलिटरी नोकरांसाठी 'कँटीन' असते. तिथे दारू फार स्वस्त मिळते. why?
A soldier has to be in 'not right mind' ;) कदाचित या कारणामुळे?
The moment u say, its an atrocity committed by 'soldiers' it ceases to be an atrocity. it becoms NORMAL. simple human psychology.

तात्पर्यः बिल झाले. तुम्ही नागरिक आहात. सैन्य, सैनिक तुम्ही 'पोसता' आहात. बिल भरा, अन हला. 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' अशी पाटी अस्लेली पुणेरी होटेले पाहिली नाहीत का कधी?
सर्वच सैन्ये असे अत्याचार करतात. अगदी भारतीय सैनिकही अती उत्तरेस वा पूर्वेस हेच करतात. आपले सेनाप्रमुख वय लपवतात... जे ही असेल, सैन्याने काय केले हे तुम्ही स्वतः सैनिक असल्याशिवाय वा युद्धग्रस्त प्रभागात वस्ती करून असल्याशिवाय बोलण्यात काही ही अर्थ नाही, हे नमूद करू इच्छितो.

War does not tell you what is right. It tells you who is LEFT..

-(लेफ्टिस्ट)आडकित्ता

नगरीनिरंजन Sun, 22/01/2012 - 12:05

In reply to by आडकित्ता

राज्यव्यवस्था (State) हे एक उत्क्रांत झालेलं एक जनावर आहे आणि ज्या माणसांनी ते बनलेलं आहे त्या माणसांचे गुणावगुण त्यात उतरले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे जॉर्ज कार्लिन म्हणतो ती "D*ck Fear".

"Men are insecure about the size of their d*cks and so they have to kill one another over the idea"
- George Carlin.

आणि मग युद्धात स्त्रियांवर बलात्कार करून सैनिकांनी आपली 'शक्ती' दाखवणे ओघाने आलेच.

धनंजय Mon, 23/01/2012 - 01:47

युद्धात आणि नंतर सैनिकांचे मनःस्वास्थ्य बिघडते, तो पूर्ण समाजाचा प्रश्न बनतो. हा यू.एस. तसेच अन्य देशांतही बाका प्रश्न आहे.

ऋषिकेश Mon, 23/01/2012 - 09:41

यावरून असे वाटले की आता सैनिकांवरही त्यांच्या इच्छेविरूद्ध वर्षानुवर्षे युद्ध लादले आहे.
इतिहासात बघितले मानवप्राणी हा 'युद्धखोर' आहे. मात्र गेल्या शतकात त्याच्या या वृत्तीत फरक पडला आहे असे वाटते का? युद्ध हे राजकीय दृष्ट्या सोयीचे असले तरी 'ठराविक काळापेक्षा अधिक काळ' (ठराविक काळ: सापेक्ष) युद्धात 'अडकणे' बहुमताला नकोसे असते का?

अधिक शांत जग हा डॉन मधील लेख वाचनीय आहे. याचे भाषांतर करून एकदा जालावर केवळ चर्चेसाठी एकदा प्रकाशित करण्याचे हक्क मी लेखकाकडून मिळवले होते पण ते काम तसेच अर्धवत राहिले आहे याची आथवण झाली :(