Skip to main content

असा एकांत हा

असा एकांत हा
जणू आंतरिक ज्वाळा
मखमली आठवणींचा
सुकला पावसाळा
प्रेमात तुटलेल्या
भावनांचा लोळागोळा
व्यवहाराचे शल्य
जगण्याच्या अवतीभवती
विखुरलेल्या स्वप्नांची
संसारिक पोचपावती
दिग्मुढ शांततेत
दारिद्रयाची दशा
मर्दुमकीच्या ठिकऱ्या
सर्वदूर दाही दिशा
माझ्यातला मी
कधी संपत नाही
इतरांसोबत तुलना
सदैव त्राही त्राही
अहंपणाची कवचकुंडलं
सत्कर्माची मृगजळे
वल्गनांचे मनोरथ
गतकाळाची पाळेमुळे
जागेपणीचे भूकेले प्रश्न
भागवाभागवीचे अग्नीदिव्य
गद्यपंचवीशीचं वास्तव भग्न
समाजमान्यतेचे सव्य-अपसव्य

---------------------
--भूषण वर्धेकर
21 डिसेंबर 2009
पुणे
----------------------