Skip to main content

तप

शांत स्वरांची सात्विक वृत्ती
कधी ऐकतो अंधारातील
कधी झोंबतो पहाटवारा
शाल तोकडी घेता वत्सल

मनी कुणाच्या बीज रुजवितो
बीजातुन कधी स्वये उगवतो
खडकाची मुळी तमा न धरता
मातीतुनी पालवी घडवितो

वनवासी सोयरे नसो, पण
रत विश्वाचे भान असे मज
थेंब टपोरे सरसर येता
होऊन कोळी जाळे विणतो

नदी वाहता निर्मळ झुळझुळ
मान-पाठ करुनिया धनुकली
पलाशपानी द्रोण घेऊनी
प्रवाहातले कृमी तारतो

वृक्षांच्या अंतरिचे रूदन
बनुनी पिंगळा स्तब्धसाक्षीने
अपुल्या हृदयी अर्कवून मग
भोवताली कर्कशा घुमवितो

क्षुद्र भुकेने व्याकुळ अवघा
उघड्या नेत्रीं नीर साकळे
क्षणभर खिन्न खेदलो जरी मी
मिटून डोळे चंद्र रेखतो