Skip to main content

अस्मिताची कविता

मनबाभूळ

कधी धूसर धूसर
कधी अंधारल्या वाटा
मिट्ट काळोखाच्या दारी
आहे बाभळीचा काटा

काटा घुसला घुसला
कळ देहात देहात
दुःख वेदनेची झळ
जीव झाला कासाविस

केला देवाचा ग धावा
का रे दिलीस वेदना?
किती अंत बघशील
सांग जरा माझ्या मना

वाटे फुलावे फुलावे
साथ कोणाची मिळेना
एकट्या या बाभळीला
कसे जगावे कळेना....

लाल, गुलाबी, पिवळी
कधीकधी उमलते
काटे देहाला बोचरे
असूनही ती सजते

-अस्मिता

कवयित्रीविषयी

अस्मिताला मी लहानपणापासून ओळखतो, माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे ती. ज्या घरात पुस्तकांच्या कपाटांच्या भिंती असतात ते घर भाग्यवान असं माझं मत आहे आणि अशा एका घरात ती वाढली. चहूकडून नवे विचार, नवनवीन कल्पना आणि कलासक्त माणसं यांचा राबता तिनं अनुभवला आहे. संगीताची उत्तम रुची, हातात वाद्यकला आणि शब्दांचं भरगच्च देणं तिला देवानं दिलंय.