उत्तररात्र
हणमंतअण्णा शंक…
ओढ्यावर माळावरच्या
थांबला चांद शरदाचा,
कडब्याच्या पडवीपाशी
चमचमतो हिरवा वेचा
सौंदळीच्या झाडाखाली
भूजलात पेटली धुनी,
वाहते मंद ही रात्र
थिजलेल्या वाऱ्यामधुनि.
सिगरेट कधीची विझली
बोटांत जळुनि सबंध,
श्वासातून येतो अजुनि
त्या सातविणीचा गंध
ना मागत नाही निद्रा
ही पहाट समंजस क्षीण,
धाडली तिला कवितेच्या
माहेरी पाठराखीण
स्मरणांच्या फिकट धुक्याचे
पडतील कुठे दहिवर?
कुसळाच्या सुकल्या देठी
आधीच अडकले गहिवर