एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ५
मी ऑक्टोबर १९९३ मध्ये ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये दाखल झालो. मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक चिदानंद राजघट्टा हे नवीन, आणि खूपच तरुण होते. माझी नोकरी आधीच्यापेक्षा वेगळी नव्हती, पण या नवीन संपादकाने या काळात दहा अतिशय हुशार पत्रकारांना ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये आणलं. त्या सर्वांच्या पार्श्वभूमीत प्रचंड वैविध्य होतं. ते फक्त विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच शक्य होतं. अनेक जण अभियंते होते. बहुतेक जणांनी पत्रकारितेच्या शिक्षणाचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. उदाहरणार्थ, (दिवंगत) सुमित घोषाल, आमचे आरोग्यविषयक बाबींवर लिहिणारे पत्रकार चक्क प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते.
दरम्यान, माझं क्षेत्र भरभराटीला येत होतं. अर्थव्यवस्था उदारीकृत झाली. सफेद कॉलर गुन्हेगारी सर्वत्र फोफावू लागली. १९९२मध्ये सुचेता दलाल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये जो हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला होता तो आधीच गाजत होता. एमएस शूज घोटाळा गाजू लागला होता.
१९९१च्या मे आणि जुलैमध्ये चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंह राव राजवटीने परकीय चलन खरेदी करण्यासाठी सोनं गहाण ठेवलं. भारताकडे फक्त तीन आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेल इतकं परकीय चलन उरलं होतं. ते बँक ऑफ इंग्लंड आणि यूबीएसकडे पाठवण्यात आलं आणि सुमारे ६०० दशलक्ष डॉलर्सचे आपत्कालीन कर्ज मिळवण्यात आलं. या प्रकरणाचा दूरगामी परिणाम आर्थिक उदारीकरणाला चालना मिळण्यात झाला.
मी (दिवंगत) मिलिंद पळणीटकर यांना ओळखत होतो. मोटारसायकलवरून शहरात फिरणारा एक धडाकेबाज स्वतंत्र पत्रकार. त्यांनी मला सांगितलं की त्यांना त्यांच्या स्रोतांनी आधीच खबर दिली होती. ते स्वतः सहार विमानतळाच्या धावपट्टीवर सोनं हस्तांतरित होताना पाळत ठेवून होते. त्यांनी ही बातमी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली. तथापि, जेव्हा ती शेवटी प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांचं नाव त्यात नव्हतं.
त्या काळात मी अंधेरी पूर्वे भागातील तक्षशिला अपार्टमेंट्समधील एका फ्लॅटमध्ये माझा कॉलेज वर्गमित्र ललित मराठेसोबत राहत होतो. त्या वेळी तो चित्रपटसृष्टीत पाय रोवण्याचा करत होता. त्याने अखेर रामगोपाल वर्मांच्या ‘भूत’ चित्रपटाची पटकथा लिहिण्यास मदत केली आणि स्वतःचा ‘शबरी’ नावाचा चित्रपट ईशा कोप्पीकरला घेऊन काढला. दुसरा फ्लॅटसोबती होता प्रणव प्रियदर्शी. तो पत्रकारितेच्या शाळेतला वर्गमित्र होता. आता तो ‘नवभारत टाईम्स’च्या संपादकीय पानाची धुरा वाहतो. विद्यापीठातल्या आणि दिल्लीहून अधूनमधून येणाऱ्या पुरुष आणि स्त्री मैत्रांचा राबता खोलीवर सतत असे.
आमच्या अड्ड्यावर सर्वांचं स्वागत असल्याने आमच्या घराच्या डुप्लिकेट चाव्या मित्रमंडळींमध्ये फिरत असत. आम्ही मित्रमंडळी खूप घट्ट असल्याने काही अडचण येईल असं वाटलं नव्हतं. या काळात माझ्याकडे एक प्रस्ताव आला. मागे वळून बघता असं वाटतं की मी तो नाकारायला हवा होता. माटुंगा येथील रुईया कॉलेजमध्ये माझ्या माजी प्राध्यापक अंजली भेलांडे यांना ‘कॅनेडियन लेखिका एथेल विल्सन यांच्या साहित्यावर हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर पीएचडी प्रबंधाचा शोध घेण्यासाठी सहा महिन्यांची फेलोशिपवर मिळाली. मला चालू सत्राच्या वर्गात त्यांची अनुपस्थिती भरून काढायची विनंती करण्यात आली. म्हणजे महाविद्यालयात त्यांचे विषय प्रामुख्याने पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे.
मी भीतभीतच हा प्रस्ताव संपादक चिदानंद यांच्याकडे घेऊन गेलो. मी त्यांना सांगितलं की ही कॉलेजसाठी एक फक्त तात्पुरती (स्टॉप-गॅप) व्यवस्था आहे. परंतु त्यासाठी करायला लागणारी तयारी आणि व्याख्यानांसाठी बराच वेळ द्यावा लागेल. मी त्यांना सांगितलं की मला साहित्यात रुची आहे आणि मी व्याख्याता म्हणून काम करू शकेन की नाही हे पाहण्याची ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण मला पहिल्यांदाच शिकवण्यासाठी बोलावण्यात आले होते. या आधी माझा शिक्षकी पेशाचा अनुभव शिक्षक दिनाला माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा होता.
संपादक चिदानंदने माझ्यासाठी नोकरीच्या वेळा बदलण्याची तयारी दाखवली तेव्हा मला आनंद झाला, पण थोडी चिंताही वाटली.
“हे अध्यापनाचं काम संपेपर्यंत रात्रपाळीमध्येच राहा. जर आम्हाला काही बातम्यांसाठी तुझी गरज पडली तर बोलावून घेऊ.”
मी इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसमध्ये रात्रपाळीत पुस्तकं, शिकवण्याच्या नोट्स वाचत, आणि टेलिफोन सांभाळत रात्रपाळी केली. मी माझा एकमेव काळी पँट, पांढरा शर्ट हा जोड माझ्या बॅगेत घेऊन जायचो आणि सकाळच्या गाडीने कॉलेजला जाण्यापूर्वी कपडे बदलून घ्यायचो.
छान चाललं होतं. माझ्या मनातल्या शंकाकुशंकांवर मात करत मी शिक्षक म्हणून बरं काम करत होतो. तिसऱ्या वर्षाच्या साहित्य वर्गात विद्यार्थीसंख्या जेमतेम वीस होती. त्या व्यतिरिक्त मला ‘फाउंडेशन कोर्स’ नावाचं काहीतरी शिकवायचं होतं. हा पहिल्या वर्षाच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्राथमिक अभ्यासक्रम होता. एक प्रकारचा ‘बूट कॅम्प’ म्हणा ना. उदाहरणार्थ, त्यात पत्रलेखन शिकवायचं होतं : पत्ता, तारीख, अभिवादन, विषय वगैरे औपचारिक गोष्टी. थोड्या चालू घडामोडी, समकालीन समाजाची स्थिती याबद्दल सामान्य ज्ञान.
आव्हान असं होतं की शंभराहून अधिक विद्यार्थ्यांच्या वर्गाला हे शिकवायचं होतं. आणि त्यांचं शालेय शिक्षण देशी भाषांमध्ये झालं होतं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझं शिकवणं पोहोचवण्यासाठी मी इंग्रजीसोबत हिंदी, मराठी आणि गुजरातीतही शिकवत असे.
एके दिवशी वर्ग संपल्यानंतर, विद्यार्थी रुईया कॉलेजच्या रुंद व्हरांड्यात पांगले. भेटायला आलेल्या काही विद्यार्थ्यांशी बोलून मीही बाहेर पडलो.

बाहेर माझी वाट पाहात एक तरुण उभा होता. सुमारे १८ वर्षांचा. देखणा, चांगला पोशाख केलेला, आणि सभ्य. आपण त्याला आनंद म्हणू.
“सर, मला तुमच्याशी बोलायचं होतं.”
“हो, बोल की.”
“तुम्ही ‘द डेली’मध्ये होता, नाही?”
मी आश्चर्यचकित झालो. अठरा वर्षांच्या एका तरुणाला माझ्या आधीच्या नोकरीबद्दल माहिती असण्याचं कारण नव्हतं. बहुतेकांना माझ्या सध्याच्या नोकरीबद्दलही माहिती नव्हती. म्हणजे कोणीतरी त्यांना सांगितलं असेल की त्यांचा नवीन मास्तर पत्रकार आहे, पण कोणत्या वृत्तपत्रात वगैरे तपशिलांत कोणाला रस असेल असं वाटलं नव्हतं.
“हो, पण तुला कसं कळलं?”
“सर, मी XXX XXXचा मुलगा आहे. तुम्ही ‘द डेली’मध्ये माझ्या वडलांबद्दल लिहिलं होतं.”
मी जागीच थिजलो.
ते नाव एका आयपीएस अधिकाऱ्याचं होतं. भरपूर पसरलेल्या भ्रष्टाचारासाठी त्याची चौकशी करण्यात आली होती. मी त्याच्या प्रकरणात खोदकाम करून अनेक अप्रिय गोष्टी उघडकीस आणल्या होत्या. त्यातली एक गोष्ट होती या (विवाहित) अधिकाऱ्याच्या प्रेमपात्रासाठी घाटकोपरमध्ये सदनिका खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशांच्या पावत्या.
“आनंद, तुला दुखावल्याबद्दल मला वाईट वाटतं. पण जे काही छापलं गेलं ते निराधार नव्हतं. मी एक पत्रकार आहे, पुराव्याशिवाय काही लिहीत नाही. मला आशा आहे की तुला समजेल."
“सर, मला कल्पना आहे. माझा तुमच्याप्रती कोणताही आकस नाही. मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की आम्हांला – आमच्या कुटुंबाला – या सगळ्यात खूप त्रास सहन करावा लागला. धन्यवाद, सर. येतो.”
दबावाखाली असाधारण धैर्य दाखवता येणं म्हणजे काय ते त्या दिवशी मला समजलं. ग्रेस.
त्या कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये भेटलेल्या मुलाने माझ्या काळजाचं पाणीपाणी केलं. मी जी गोष्ट नेहमीच मानत आलो आहे ती या प्रसंगाने दृग्गोचर झाली. छापील व्यक्तीविरुद्ध जनतेच्या मनात नैतिक तिरस्कार किंवा द्वेष निर्माण करण्यासाठी विशेषणांचा अतिवापर करू नये. कित्येकदा तो लेखनशैलीचा मुद्दा होतो, आणि या बाबतीत हा प्रमाद माझ्याकडून झाला होता. ऑरवेल म्हणतो त्याप्रमाणे, आपण अतिशयोक्ती करतो तेव्हा मुद्दा कमकुवत होत जातो.
पत्रकार असं करतात तेव्हा ते विसरतात की प्रत्येक व्यक्तीपाठी भावनिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक घटक असतात जे त्याला/तिला घडवतात. त्या देखण्या तरुण आनंदने मला हे लक्षात आणून दिलं की मी ज्या व्यक्तीबद्दल लिहित आहे तिच्यामध्ये खूप भावनिक गुंतवणूक असलेले निर्दोष लोकही आहेत – आणि तेही अजाणतेपणी दुखावले जाणार आहेत. जेव्हा एक पत्रकार नैतिक क्रोधाच्या भावनेतून लिहित असेल, तेव्हा त्याने त्या व्यक्तीच्या सुहृदांवर होणाऱ्या आघाताची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असलं पाहिजे. त्यांच्या घाईघाईने लिहिलेल्या शब्दांमुळे इतर निष्पापांना पिढ्यानपिढ्या चुकवावी लागणारी किंमत मोजावी लागू शकते.
माझ्या निरीक्षणाप्रमाणे बहुतेक पत्रकार या बाबतीत अनभिज्ञ असतात.
***
(क्रमशः)
हरीश नांबियार २०१६पासून इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये पुनर्लेखन विभागात कार्यरत आहेत. त्यांचे २००२मधल्या गुजरात दंगलीच्या आगेमागे ‘बुलेट’वरून केलेल्या भारतभ्रमणातील अनुभवांवर आधारित Defragmenting India: Riding a bullet through the gathering storm हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचा ॲमेझॉनवरील दुवा.
!!!
हा चिदानंद राजघट्टा म्हणजे तोच ना, जो बऱ्याच वर्षांपासून टाइम्स ऑफ इंडियाचा यूएसए कॉरस्पाँडंट म्हणून यूएसएत पडीक असतो? अत्यंत बंडल पत्रकार आहे. ज्या विषयात आपल्याला काडीचेही गम्य नाही, अशा विषयात काय मनाला येईल ते ठोकून देत असतो. टाइम्स ऑफ इंडियाला यूएसएत (भारतीय वंशाचे) मुबलक वाचक जरी असले, तरीसुद्धा, यूएसएत यूएसएसंबंधी बातम्यांकरिता (आणि, त्यापेक्षासुद्धा, त्यांवरील विवेचनाकरिता) टाइम्स ऑफ इंडिया कोण कशाला झक मारायला वाचेल? त्यामुळे चालून जाते, झाले. आणि, भारतातल्या वाचकांबद्दल म्हणाल, तर ते यूएसएसंबंधी विषयांत काही कळत असो वा नसो, परंतु चिदानंद राजघट्टाच्याही वरचढ जे मनाला येईल ते ठोकून देत असतात. त्यामुळे, कोणाला फरक पडतो?
(तसेही, टाइम्स ऑफ इंडियाचा दर्जा आता टॅब्लॉइड पातळीवर घसरला आहे, म्हणा. त्यामुळे, भारतात काय, किंवा यूएसएत काय, परंतु, गंभीर बातम्या (किंवा विवेचन, वगैरे) यांकरिता टाइम्स ऑफ इंडिया कोण वाचतो? नटनट्यांच्या चवदार भानगडी नाहीतर कोठेतरी कोणाचातरी झालेला खून असल्या मसालेदार गोष्टींकरिता ठीक आहे, झाले. त्यामुळे, चिदानंद राजघट्टाच्या मजकुराचा उपयोग फार फार तर पानपूरक — फ्रंट पेज पानपूरक, परंतु, nevertheless, पानपूरक — याहून अधिक तसाही नसावा. त्यामुळेही खपून जात असावे कदाचित. आश्चर्य एवढ्याच गोष्टीचे वाटते, की एवढ्याकरिता याला यूएसएत पोसायला टाइम्स ऑफ इंडिया बहुमूल्य परकीय चलन बरे उधळते! गंमत आहे, झाले.)
अच्छा, हा मनुष्य १९९३मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या मुंबई डेस्कवर होता तर! मग तिथे काय झाले? तिथे तो फार काळ टिकू शकला नाही काय? कारण, माझ्या अंदाजाप्रमाणे नि मला (एक वाचक म्हणून) जे आठवते, त्याप्रमाणे, १९९४पासून किंवा फार फार तर १९९५पासून हा मनुष्य टाइम्स ऑफ इंडियाचा अमेरिकेतील वार्ताहर जो आहे, तो आजतागायत आहे. १९९४मध्ये अमेरिकेतील माजी फूटबॉलपटू ओ.जे. सिंपसन यास आपली माजी पत्नी आणि तिचा प्रियकर यांचा खून केल्याच्या आरोपावरून अटक झाली. (तत्पूर्वी त्याने वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, नि पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, वगैरे बऱ्याच सनसनाटी गोष्टी घडल्या. परंतु ते एक असो.) नंतर १९९५मध्ये या आरोपावरून त्याच्यावर खटला चालला, तो अमेरिकेत चांगलाच गाजला. (अमेरिकेत टीव्हीवरून लाइव प्रसारित केला गेलेला पहिलावहिला खटला! Trial of the century म्हणून त्याचा गाजावाजा झाला. त्यात अखेरीस पोलीसतपासातील हलगर्जीपणा, झालेच तर (ओ.जे. सिंपसनच्या) वकिलांचे चातुर्य, तथा तपासात वर्णविद्वेषी बायस होता तथा पोलिसांकडून खोटा पुरावा पेरण्याचे प्रकार झाले वगैरे (बहुतांशी कृष्णवर्णीय) ज्यूरीस पटवून देण्यात (ओ.जे. सिंपसनच्या) वकिलांस आलेले यश, या सर्वांमुळे ओ.जे. सिंपसन सहीसलामत सुटला.) या खटल्याचा उल्लेख करण्याचे कारण, टाइम्स ऑफ इंडियाने (तेव्हा ऑनलाइन आवृत्ती, नक्की खात्री नाही, परंतु, बहुधा नसावी, परंतु, छापील आवृत्ती थोड्या उशिराने का होईना, परंतु आयात होऊन अमेरिकेतील देशी किराणामालाच्या दुकानांतून उपलब्ध होत असे.) हा खटला अधूनमधून, बहुतांशी पहिल्या पानावर, कव्हर केला होता. वार्ताहर/वृत्तलेखक अर्थात चिदानंद राजघट्टा! आणि, या वृत्तांकनावरील ठळक मथळ्यांतून (आणि अर्थातच बातम्यांतील बारीक मजकुरातून) ओ. जे. सिंपसनचे नाव, का, कोण जाणे, परंतु हमखास ‘सी. जे. सिंपसन’ असे लिहिलेले आढळत असे. आम्ही अमेरिकेतील काही देशी मित्र ते वाचून खदाखदा हसत असू; आमच्याकरिता नित्याचे करमणुकीचे साधन झाले होते ते. म्हणजे, अमेरिकन पत्रकारिता ही एकंदरीत काही फार उच्च दर्जाची वगैरे कधीच मानली जात नव्हती, परंतु, तीदेखील यापेक्षा बरी म्हणायची! (अर्थात, Indians, by and large and as a society, were never famous for being sticklers for accuracy, परंतु तरीही.)
परंतु, चालायचेच!