एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग २
रात्रीच्या वेळी चेंबूरमधल्या एका मित्राच्या घरी टेलिव्हिजनवर बाबरी मशीद पाडल्याची बातमी पाहिली आणि आता शहरात आगडोंब उसळणार याची मला कल्पना आली. सोमवारपासून युद्धपातळीवर काम करावं लागेल हे पूर्णपणे माहीत असल्याने मला झोपच लागली नाही. माझ्या मित्राच्या कुटुंबाने घेतलेले आक्षेप फारसे मनावर न घेता टॅक्सी शोधण्यासाठी रस्त्यावर आलो.
“भाईसाब, मुझे मोहम्मद अली रोड जाना है. मी एक रिपोर्टर आहे, आणि जिथे दंगल होते आहे त्याच्या शक्य तितक्या जवळ पोचायचं आहे. जमेल?”
“आप रिपोर्टर हो? बैठो साब, बैठो. मी तुम्हाला शक्य तितक्या जवळ घेऊन जाईन.”
आम्ही हार्बर रेल्वे लाईनला समांतर जाणाऱ्या शिवडी रस्त्यावरून वेगाने निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्क केलेल्या टॅक्सी आणि खाजगी वाहनं निर्मनुष्य कबरींसारखी भासत होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आम्ही वेगाने जात होतो, आणि टॅक्सीच्या मागच्या खिडकीतून धुराचे लोटच्या लोट आकाशात जमा होत जाताना दिसत होते. आम्ही आगीच्या केंद्रस्थानाकाडे जात होतो.
कर्नाक बंदर पुलाच्या रस्त्यांवर अडथळे लावण्यात आले होते. पुलावर कोणतंही वाहन नव्हतं. वाहतूक रोखण्यासाठी आडवे लावलेले ब्लॉक तकलादू होते. आम्हाला पुढे सटकण्याइतपत फट दिसली. मी टॅक्सीचालकाला म्हणालो,
“घे!”

त्याने एकदाच मागे वळून माझ्याकडे पाहिलं. पुलाच्या मुसाफिरखाना बाजूकडून निघणारा धूर वरच्या बाजूला दाट काळा होता आणि खालच्या बाजूला पांढऱ्या पडद्यासारखा होता. अधूनमधून रस्त्यात अडथळे म्हणून टायर ठेवलेले होते. टॅक्सी पुलाच्या दुसऱ्या टोकाकडे निघाली. अग्निशमन दलाचं एक इंजिन विरुद्ध दिशेने आमच्या बाजूला आलं. ते दंगलीच्या क्षेत्राकडच्या धुरातून बाहेर निघालं होतं. चालकाच्या विरुद्ध बाजूच्या काचेच्या तावदानांचा चक्काचूर झाला होता. आतला अग्निशमन कर्मचारी तणावात दिसत होता. गाडी आमच्या शेजारी थांबताच मी टॅक्सीचालकाला मला तिथेच सोडून परत जाण्यास सांगितलं. झालेल्या भाड्यापेक्षा भरपूर जास्त पैसे दिले आणि त्याच्याकडे बघून कृतज्ञतेचं हसू हसलो. आता आठवून बघतो तर लक्षात येतं; त्या भयानक डिसेंबरमधलं ते शेवटचं हसू होतं.
टॅक्सीमधून उतरून मी थांबलेल्या अग्निशमन इंजिनाच्या दिशेने गेलो. मी गाडीजवळ पोहोचताच एक अग्निशमन कर्मचारी शिव्या देत बाहेर पडला. तो मुख्य अग्निशमन अधिकारी होता.
“मादरचोद… आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. चूत्यांनी आमच्यावरच हल्ला केला.”
अग्निशमन दलाच्या जवानांवर फेकण्यात आलेली एक वीट त्याच्या चेहऱ्याला लागली होती. त्याच्या कवटीतून रक्तस्त्राव होत होता. हलक्या हाताने हेल्मेट काढताच रक्त त्याच्या चेहऱ्यावरून ओघळू लागलं.
अग्निशमन दलाचे कर्मचारी दंगलग्रस्त क्षेत्रापासून दूर गेले होते कारण दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. रस्ते जळत होते. अग्निशमन दलाच्या जवानांना न जुमानता आग दाट लोकवस्तीच्या रस्त्यांवरील चाळी आणि झोपड्यांचा घास घेत पसरली. पोलिसांनी पुलाची दुसरी बाजू बंद केली होती, त्यामुळे त्या भागात प्रवेश अशक्य होता.
मी रिकाम्या पी डीमेलो रोडवरून चालत कुलाब्याच्या माझ्या कार्यालयात गेलो. काही माहिती कळण्यासाठी आज पोलीस आयुक्तालय निरुपयोगी होतं, कारण दंगलीचा पहिलाच दिवस होता. आमचे मुख्य रिपोर्टर मयंक भट्ट कार्यालयात चिंताग्रस्त आणि व्यग्र दिसत होते. इतर कर्मचारी सतत फोनवर बोलत होते.
“सुखरूप पोहोचलास! बरं झालं! पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साध. इतर लोक रुग्णालयांच्या संपर्कात आहेत. पोलिस आयुक्त संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील. त्यापूर्वी तुम्ही गोळा करू शकता ती सर्व माहिती गोळा करा.”
माझ्या कारकिर्दीतील शारीरिकदृष्ट्या सर्वात थकवणाऱ्या टप्प्याची ती सुरुवात होती. पुढच्या काही दिवसांत शहर हळूहळू ठप्प झालं. आमच्या दैनिकाकडे काहीच संसाधनं नव्हती. अनेक पत्रकार – बलजीत, केतन मोदी (त्यांचं नुकतंच निधन झालं), आणि प्रणती मेहरा – हे कार्यालयात पोचू शकले नाहीत. बलजीत सतत फोनला चिकटलेला असे. केतनने स्वतःला त्याच्या घराजवळच्या गोल देवळाजवळ तैनात केलं. प्रणती वांद्र्याहून कामकाजावर लक्ष ठेवत असे.
मी मात्र चर्चगेटमधील ‘बी’ रोडवरच्या माझ्या वसतिगृहात परतू शकलो. दिवस उलटत गेले तशी राजकीय पत्रकार शुभांगी खापरे तिच्या वांद्रे वर्किंग वुमेन्स हॉस्टेलमधून कार्यालयात येऊ शकली. एके दिवशी शिकाऊ म्हणून मृण्मयी रानडे (पूर्वाश्रमीची नायगांवकर) रुजू झाली. मयंक भट्ट त्या संपूर्ण काळात ऑफिसमध्येच मुक्काम ठोकून राहिले. शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कल्याणमधल्या त्यांच्या घरी ते पोहोचूच शकले नाहीत.
याच काळात कधीतरी मला कळलं की मी दंगलग्रस्त क्षेत्रात प्रवेश करू शकत नाही. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या विविध वृत्तपत्रांनी त्यांच्या पत्रकारांना दंगलीच्या क्षेत्रात (पण फक्त पोलीस-संरक्षित क्षेत्रात) पोहोचवण्याची व्यवस्था केली होती.
मी मात्र जागीच अडकून पडलो होतो.
माझं काम छापल्या जाणाऱ्या मुख्य बातमीसाठी शहराच्या विविध भागांत असलेल्या आमच्या पत्रकारांकडून अहवाल गोळा करणं आणि माहिती संकलित करणे हे होतं. याला अधिकच्या माहितीची जोड मिळावी म्हणून मी माझा मुक्काम पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या कार्यालयात हलवला. विशेष शाखेचं नेतृत्व गुप्तचर कामाचं प्रशिक्षण घेतलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी वसंत देशमुख यांच्याकडे होतं. ते माझे ‘जोपासलेले मित्र’ होते. कदाचित उलटं होतं – मी त्यांचा ‘जोपासलेला मित्र’ होतो. माझ्या डोक्यात हा प्रकाश उशिरा पडला.
त्यांनी मला ऑफिसमध्ये सोबत बसण्याची परवानगी दिली. तिथूनच ते राज्याचे मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, राज्याचे डीजीपी आणि दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्र्यांच्या टीमला शहराच्या परिस्थितीची माहिती देत असत. शहरातील जातीय दंगलींचा झपाट्याने प्रसार कसा झाला याचं विहंगमावलोकन मला अशा रीतीने होऊ लागलं.
बहुतेक वेळा देशमुख आणि मी दोघेच त्यांच्या ऑफिसमध्ये असू. ते त्यांच्या रेडिओ सिस्टीमवर कॉल्स घेत करत असत. त्यांना माहीत होतं की मी त्यांचं एकतर्फी बोलणं ऐकतो आहे आणि मोठ्या टेबलाच्या दुसऱ्या बाजूने डेस्कखाली धरलेल्या माझ्या पॅडवर नोंदी करतो आहे. कधी मला नोंदी घेता आल्या नाहीत तर टेबलाच्या विरुद्ध बाजूच्या त्यांच्या नोंदींकडे नजर टाकत मी त्यातले तपशील उतरवून घेत असे.
मग एकदा तो अविस्मरणीय क्षण आला. देशमुखांचं एक विशिष्ट संभाषण मला खूप महत्त्वाचं वाटलं. ते अचानक बारीक आवाजात बोलायला लागले. मला ऐकू येईना. एकीकडे नोंदी करायचं त्यांचं काम सुरूच होतं. दंगलग्रस्त शहराबद्दल काही गंभीर माहिती सांगितली जाते आहे हे मला कळलं होतं. आणि मला कळलं आहे ते त्यांच्याही लक्षात आलं होतं, आणि म्हणूनच ते हळू आवाजत बोलत होते. मी त्यांच्या नोंदींकडे नजर टाकली. त्या अचानक उजवीकडून डावीकडे लिहिल्या गेल्या होत्या. नस्तालिक लिपीत.
मी मूर्ख ठरलो होतो!
मला वाटत होतं की देशमुख उदारपणे एका नवशिक्या पत्रकाराला मदत करत होते. पण आपलं औदार्य मागे घ्यायला ते ओघवत्या उर्दूचा वापर करतील हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं.
‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषा’ म्हणजे काय ते मला त्या दिवशी उमगलं.
हरीश नांबियार २०१६पासून इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये पुनर्लेखन विभागात कार्यरत आहेत. त्यांचे २००२मधल्या गुजरात दंगलीच्या आगेमागे ‘बुलेट’वरून केलेल्या भारतभ्रमणातील अनुभवांवर आधारित Defragmenting India: Riding a bullet through the gathering storm हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचा ॲमेझॉनवरील दुवा.
…
टीव्हीचा चेंदामेंदा झाला असेल, नाही?