दोन विडंबने
१) काटा रुते कुणाला, यावरुन सुचलेले हे विडंबन आहे. माझ्यासारख्या खादाड रिकामटेकड्या रिटायर्ड म्हातार्यांचे हे दु:ख आहे.
खा खा सुटे तुम्हाला
म्हणते कुटुंब सारे
मज भूक आवरेना
हा खाद्यभोग आहे
फडताळ शोधु पाहे
कळ आतल्या जिवाची
चिरतोबरे भरावे
मज शाप हाच आहे
शोधु डबे पहातो
पडुनि अनर्थ होतो
नजरा अबोल सार्या
विपरीत अर्थ होतो
तो मान संपला की
काहीच आकळेना
ओशाळल्या जिवाला
मी सावरु पहातो ||
२) श्रावणात पुरणपोळ्या रिचवल्या
मऊसुत जायफळवाल्या
उलगडल्या, पोळीवर अलगद
शुध्द तुपाच्या धारा |
श्रावणात . . . .
होळीपासुन वाट पाहिली
ते सुख आले भारी
जिथे तिथे खवय्यांची लागे
ब्रह्मानंदी टाळी
माझ्याही पोटावर चढले
चरबीचे थर बारा
श्रावणात . . . .
दुलईच्या उबेत हरवले
वामकुक्षीचे पक्षी
निळ्या भिंतीवर
नाचु लागे
कवडश्यांची नक्षी
या जन्मीची ओळख सांगत
येई चहाचा इशारा |
वर्क फ्रॉम होम
कोव्हिडच्या आधी रोज ऑफिसात जाऊन काम करण्याचा एक फायदा होता, सतत तोंडात टाकण्याची सोय नव्हती.
अर्थात, तेही नेहमीच खरं होतं असं नाही. एका स्टार्टपमध्ये सतत स्नॅक्स भरलेले असायचे. घरून काम करायला सुरुवात झाल्यावर स्नॅक्स आणण्यासाठी कष्ट करायचाही कंटाळा आल्यामुळे शेवटी ती सवय सुटली.
हा हा
भारी झालं आहे. खाऊन बारीक राहणाऱ्या लोकांचा मला आधीपासून खूपच मत्सर वाटतो. त्यामुळे मी आणि माझ्या आईनेही एक विडंबन केलं होतं. आता त्याला किमान वीस वर्षं झाली असतील. मी नुकतीच जिमला जाऊ लागले होते तेव्हा.
चाल: देहाची तिजोरी
देहाची तिजोरी
चरबीचाच ठेवा.
वजन उतरो देवा, आता
वजन उतरो देवा!
कॅलरीची करू आम्ही
रोज लयलूट
तळलेले गोड आणि
दाण्याचे कूट
कधीमधी आईस्क्रीम खाऊ
कधी सुका मेवा...
वजन उतरो...
हालचाल करणे म्हणजे
वाटे आम्हा शिक्षा
कोपऱ्यावर जाण्याकरिता
करू आम्ही रिक्षा
चालणे विसरलो आम्ही
बसून करू धावा..
वजन उतरो..
तरी मिताहारी आम्ही
म्हणू वारंवार
वजन कमी होतच नाही
करू तक्रार
सडपातळ व्यक्तींचा मग
आम्ही करू हेवा..
वजन उतरो देवा आता
वजन उतरो देवा..