पांढरू

"दूध गरम आहे म्हणून बाहेर ठेवलं आहे. बाहेर जाशील तेव्हा आठवणीनं फ्रीजमधे टाकून जा" अशा मातोश्रींकडून येणाऱ्या सूचना त्या काळात नवीन नव्हत्या. दोनेक तासांनी दूध फ्रीजमधे टाकायला स्वयंपाकघरात गेल्यावर अजब दृश्य दिसलं. दुधाच्या पातेल्यावर चाळणी उपडी टाकली होती आणि चाळणीवर वरवंटा होता. "आता दूध काय पळून जाणारे का? आई पण ना ... ", आईला मनमुराद हसण्याचा बालकधर्म मी पाळला. संध्याकाळी विचारल्यावर उलगडा झाला. अलीकडेच एक गलेलठ्ठ मांजर आमच्या घरात अतिक्रमण करायला लागलं होतं. रात्री जेवताना आई-बाबांच्या भांडणाचा विषय 'मी भाजी खाते का नाही' याऐवजी या नवीन घटनेला 'घुसखोरी' म्हणावे की 'भूतदया' असा होता. तीन विरुद्ध एक अशा प्रचंड बहुमतानं बाबांच्या भूतदयेचा पराभव झाला. पुढच्या काही दिवसांतच वाचत बसलेले असताना तीच ती टवळी घरात पहिल्यांदा दिसली. तिच्यावर ओरडायला म्हणून मी एवढा मोठा आवाज काढला की मलाच भीती वाटली.

काही दिवसांतच या गलेलठ्ठ मांजराची फिगर सुधारली आणि बोका नसून भाटी असण्याच्या तीन पावत्या आतल्या बाल्कनीत दिसल्या. आता मात्र चार विरूद्ध शून्य मतांनी भूतदया निवडून आली. माळ्यावरून एक अ‍ॅल्युमिनीयमची थाळी आम्हीच खाली काढली, तिच्यात नवमातेसाठी दूध, पोळी वगैरे नियमितपणे पडायला लागलं. एखाद आठवड्यात बाल्कनीतली मनुष्यांना असणारी प्रवेशबंदीही उठली. नवमातेने पिल्लांची जागा बाल्कनीतल्या दिवाणाच्या खालून एका मोठ्या तांब्याच्या पिंपामागे बदललेली होती, पण विशेष म्हणजे या चार प्राण्यांचा आपल्या पिल्लांना काहीही उपद्रव होणार नाही याबद्दल तिची खात्री पटली होती. यथावकाश मांजराची नखं पिल्लांना लागत नाहीत हे याचि देही याचि डोळा बघून झालं. पण काही आठवड्यातच आणि पुढेही अनेकदा, बोके आणि कुत्रे मांजराची पिल्लं खातात, ती कशी खातात वगैरे सगळं संशोधन बसल्याजागी करून झालं. रक्ताबद्दल भीती नव्हतीच, पण मांसाचे सचेतन आणि अचेतन गोळे पाहून आधी वाटणारी भीती आता कमी झाली होती. घरात बसून पिल्लांची राखणदारी करायला सुरुवात झाली. गनीमही बरोब्बर आमच्या शाळा-कॉलेजांच्या वेळा शोधून आपला कार्यभाग उरकत असे. वर्षातून अदमासे दोन पूर्णांक बारा शतांश वेळा 'आमची बब्बड' गलेलठ्ठ होत असे. या शिक्षण-हल्ल्यातून तिची दोन पिल्लं वाचली. मोठी 'छब्बड' दिसायला आईवर गेलेली असली तरी अगदीच पकाऊ होती. जवळ गेलं की घाबरायची. पोळी, ब्रेडचा तुकडा भिरकावला तरी पळून जायची. आम्ही वैतागून, पाठ वळवून चालायला लागलो की आपलंच अन्न खायची चोरी असल्याप्रमाणे खायची. माणसांची अशी भीती असणारीबद्दल माया उत्पन्न होणं कठीणच होतं.

काही महिन्यांनी, वर्षांनी तिच्या जोडीला एक लंबूटांग पिल्लू दिसायला लागलं. खरंतर छब्बड तिची बहीण, पण मोठी भावंडं धाकट्यांचं पालकांप्रमाणे करतात तसलाच प्रकार दिसत होता. बब्बड अधूनमधून घरी ताणून द्यायला यायची तेवढीच. पण या पिलाची झिरो फिगर मला बघवत नसे. मी तिच्या आईचीच अ‍ॅल्युमिनीयमची ताटली सायीने भरून जिन्यात ठेवायचे. छब्बडच बरचसं खायची. थोडी साय उरायची त्याला हे पिल्लू तोंडही लावत नसे. एक दिवस कॉलेजातून आल्यावर मी त्या पिल्ल्याची जिन्यात कोंडी केली. पळून पळून कुठे जाणार होती! मुंडी एका हातात पकडून दुसऱ्या हातानं थोडी साय चाटवली. चाटवली म्हणजे काय, तर सायीनं लथपथ बोट तिच्या नाकाच्या एवढ्या जवळ नेलं की तिनं बहुदा श्वास घ्यायला तोंड उघडलं. मी बोट तिच्या तोंडात खुपसलं. तिनं भीतीनं आवंढा गिळला तर "अरेच्चा, हे तर चटकमटक अन्न दिसतंय," अशी या पिल्लाला ज्ञानप्राप्ती झाली. रोज दुपारी, कॉलेजातून घरी आल्यावर पिल्लाची मुंडी पकडायची आणि साय चाटवायची हा माझा उद्योग असे. हे पिल्लू लंबूटांग नसून कुपोषित होतं हे काही दिवसांनी लक्षात आलं.

त्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठायची माझी अजिबात इच्छा नव्हती. पण पायाला पांघरूणात गुदगुल्या होत होत्या. मी अर्धवट झोपेतच भावाला ओरडले. तरीही हा प्रकार थांबेना म्हणून डोळे उघडले तर बाबा आणि भाऊ बाजूला उभे राहून हसत होते. हे पिल्लू पहिल्यांदा खिडकीत उडी मारून घरात घुसलं होतं, आणि कुठे लपायचं हे न कळून माझ्या पांघरूणात शिरून माझ्या पायांवर उड्या मारत होतं. घराचा एक मालक वाढला.

एकेकाळी तिचं नाव शनाया होतं हे निश्चित; शनाया ट्वेनचं गाणं, "That don't impress me much" त्या काळात फार गाजत होतं म्हणून ही शनाया. कधी ही अगदी विजयी सेनेच्या सरदारानं झेंडा फडकावत यावं तशी दिमाखात चालत यायची म्हणून झेंडू. कधी बदकासारखी पाठ वळवून यायची म्हणून बदकू. शिवाय त्या काळात तोंडात असणारी विशेषणं डांबिस, वात्रट वगैरे तोंडी लावायला होतीच. तिचं first name 'पांढरू' कधी ठेवलं आठवत नाही. बाबांचं या नावाला अप्रूव्हल मिळायला बरेच दिवस लागले. यथावकाश पांढरूचं पांढूही झालं. पण 'कागदोपत्री' ती पांढरूच. नाव पांढरू असलं तरी तिचं पोट फक्त पांढरं होतं. पाठ मुख्यतः करडी, आणि त्यावर किंचित काळे पट्टे आणि ठिपके. रेग्युलर असा आकार नाहीच. मला अचानक करड्याचा होणारा पांढरा रंगबदल बघायला नेहेमी गंमत वाटायची; पण तिच्या केसांतून उलटा हात फिरवून केस विस्कटून तिचं डोकं फिरवायला आणि कानांच्या बुडाशी हळूच बोटाचं टोक लावल्यावर ती कान झटकायची ते पाहायला जास्त मजा यायची. ती पण थोडी कार्टूनच होती, मानेखाली खाजवायला लागलं की मान खाली करायची. खाली करत करत एवढी खाली जायची की आपली बोटंच जमिनीला टेकायची. काय विचित्र आकार करायची ती शरीराचा! काही दिवसात हिचे बायसेप्स तयार होतील अशी बिल्डींगमधल्या एका मुलाची थिअरी होती.

बाहेरून खिडकीत उडी मारण्याएवढी तयारी झाल्यावर घराला मेन बेस बनवून अंगणाला बागडायची जागा बनवायला तिला वेळ लागला नाही. त्याच त्या 'शास्त्रज्ञ' मित्रानं एकदा, "हिचं वजन चार किलो आहे असं मानलं आणि खिडकीची उंची जमिनीपासून चार फूट असेल तर उडी मारतेक्षणी हिच्या पायांतून किती फोर्स एक्झर्ट होत असेल" असला अतिसामान्य प्रश्नही पांढरूबद्दल विचारून झालेला होता. मी पांढरूच्या शोधक वृत्तीचा मागोवा घेत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण अधूनमधून आमचा शास्त्रज्ञही बुद्धीची चमक दाखवायचा. मांजरमनाचे कंगोरे समजून घेण्यात त्याला प्रचंड रस असे. आमची बिल्डींग शहराच्या सखल भागात होती. एकदम खूप पाऊस झाला की घरात पाणी शिरायचं. एकदा असंच पाणी घुसणार हे लक्षात आल्यावर आम्ही आवराआवरी करत होतो. पांढरूची दोन पिल्लंही होती. एका मोठ्या तसराळ्यात पिल्लं भरली. ओट्यावर एका मोठ्या ताटलीत दूध, पावाचे तुकडे, बिस्किटं असं सगळं घालून पिल्लांसकट ताटली ओट्यावर ठेवली. बाईसाहेब कुठे गायब झाल्या होत्या कोण जाणे! आमचे शास्त्रज्ञ भाऊ दुसऱ्या मजल्यावर रहायचे. त्यांना मांजरीचं आपत्कालात निरीक्षण करायचं होतं म्हणून ते ही लगबगीने खाली आले. घरात घुसलेलं घाण पाणी पावलांपर्यंत यायला लागलं, आवराआवरी संपली होती आणि पांढरूही कुठूनशी उगवली. आम्ही घरातून निघायला लागलो तर शास्त्रज्ञ भाई "मी इथेच थांबलो तर चालेल का?". त्या घाण पाण्यात काय काय असेल याची काही पर्वा न करता तो तिथे अर्धा तास होता. पिल्लांची जागा बदललेली पांढरूने पाहिली. तिला ते अजिबात आवडलं नाही. तिनं एका पिल्लाची मान पकडली, जागा बदलायला निघाली आणि लक्षात आलं, आता ती तिथेच अडकली. मग ओट्यावरच बरीच शोधाशोध करून शेवटी तसराळंच कसं कोझी आहे हे बाईसाहेबांच्या लक्षात आलं. दोनेक तासांनी पाणी ओसरलं. आम्ही पोटोबा करून साफसफाईसाठी खाली उतरलो. घरात शिरल्याशिरल्या बाईसाहेबांनी आरडाओरडा करून नाराजी व्यक्त केली. जसं काही आम्ही हिची पिल्लं बोक्यालाच घालत होतो. मग मी पण तिला ओरडले.

तशी आमची दोघींची भांडणं घराला नवीन नव्हती. मला टेबलावर बसून अभ्यास करायला आवडायचं. तेव्हा घरातली एकुलती एक कंप्यूटर चेअर मला मिळायची. ही आगाऊ बया घरी एकतर उशिरा यायची. आणि वर मलाही खुर्ची हवी याचा हट्ट. बेळगावावरून महाराष्ट्र कर्नाटकात नसेल तेवढी मारामारी आम्ही दोघी खुर्चीसाठी करायचो. शेवटी आकार कमी पडल्यामुळे ती उठून टीपॉयवर जाऊन बसायची. पण तिथेही तिची अट असायची. रद्दी आणि आजचं वर्तमानपत्र या सगळ्यांची गादी असल्याशिवाय ही तिथेही बसायची नाही. त्यातही सर्वात वर ताजा पेपरच हवा. मग त्या पेपरासाठी तिचं आणि बाबांचं भांडण व्हायचं. पांढरूनं कधीही आम्हाला कोणाला डावली मारली नाही तरी वर्तमानपत्र आणि यो-योला तिनं चिक्कार बोचकारलं. तिच्या आळोख्यापिळोख्यांमधेच वर्तमानपत्राच्या चिंधोट्या होत असत. बाबा बिचारे रोज रात्री पांढरूनं बोचकारलेला आणि कोणा-ना-कोणाला बोचकारणारा अग्रलेख वाचायचे. पण हे सगळं थंडीत. उकाडा वाढला की मी नेम धरून पंख्याखाली, जमिनीवर तंगड्या पसरून पुस्तकांचा पसारा करायचे. मग तिलाही बरोबर तिथेच पंख्याखाली आणि टीव्हीसमोर बसायचं असायचं. बरं तेवढंच नाही, मी पंख्याखाली वाचत बसले असले की ही बरोब्बर पुस्तकावरच बसणार. पान उलटायचं नाही, हिला बाजूला ढकलायचं नाही. काही नाही. त्यातून जरा समंजसपणा दाखवून मी कधीतरी तिला मांडीत बसवायचे. पुस्तकं सोड गं बाई! आणि मग आपण जेव्हा कधी उठायला जाऊ तेव्हा ही अगदी केविलवाणा चेहेरा करून, भयंकर अजिजीनं "उंऽऽऽऽ" करायची; "काय गं, बसल्ये ना मी इथे सुखात, का हलवतेस?"

त्यातून सुटीच्या दिवशी कधी मनुष्यांना पंख्याखाली आडवं पडण्याचीही सोय नाहीच. उन्हाळ्यात तर आमची तिघांची रोजची भांडणं ठरलेली. शेवटी पंख्याच्या खाली मधोमध पांढरू आणि दोन बाजूंना मी आणि भाऊ टीव्हीसमोर पसरणार अशी विभागणी झाल्यावरच एकमेकांना टोचत, ढकलत जास्तीची अधिक जागा बळकावण्याचे प्रकार कमी झाले. शेवटी माणसाला जागा किती लागते? सव्वापाच फूटच, नाही का?

पांढरूनं आमच्या बऱ्याच सवयी बदलल्या. आठवड्यात एकदा तरी आम्ही दोघं संध्याकाळी चहाबरोबर खायला वडे आणायचो. कधीमधी दोघांत मिळून एक मूगभजी. असले तळकट वास आल्यावर ती काय बाहेर रहाणारे? लगेच दुडकत यायची, "मलाही हवंय"चं म्याव "उगाच त्रास देऊ नकोस"च्या म्यावपेक्षा वेगळं समजायला लागलं होतं. दर सहा महिन्यांनी बदलणाऱ्या बोकाफ्रेंडांशी गप्पा मारताना असणारं म्यांव फक्त त्यांच्यासाठीच असायचंं. असो. तर पांढरूनं मागितल्यावर तिला एकदा वड्याचा तुकडा खायला दिला. तिनं बेसनाचा भाग कसाबसा खाल्ला आणि बटाटा टाकून दिला. मग तिला भज्याचा तुकडा दिला. तो आख्खा फस्त. बघताबघता अर्धी भजी तिनंच गिळंकृत केली. पुढच्या वेळपासून भजी तिच्यासाठीच, उरली तर आपण संपवू इतपत समजूतदारपणा आम्हां भावंडांत आला. कधी भाजी आवडत नाही, कधी कमी पडते आहे, कधी उगाच भूक आहे म्हणूनही आम्ही दोघं दुपारी भजी, फ्राईज तळायचो. त्यातही पांढरूचा वाटा असायचा. कुरकुरीत गोष्ट खाताना पांढरूला वगळणं अशक्यच होतं. घावन घालतानाही पहिला अगदीच पातळ, कुरकुरीत पापुद्रा करून तो नैवेद्य हिच्या घशात घातला की मगच आमच्या घशाखाली घास उतरे. हे असले प्रकार खाण्याचे असतात ते बरं समजायचं हिला! नाहीतर रोज खाण्याची कटकट. रोज आम्ही जेवायला बसायचो तेव्हा बरोबर दुडकत यायची. दुपारचं जेवण बऱ्याचदा दोनदा करायची, एकदा मी आणि दुसऱ्यांदा बाबा भरवायचे. जेवताना फक्त पोळीच खायची. पण रोज नखरे. अजिबात सुरुवातच नाही करायची. त्यातून 'दीवार'मधे अमिताभ टाकलेले पैसे उचलत नाही तशी ही टाकलेली पोळी खायची नाही. तुकडा तोडून हिच्या तोंडासमोर धरायचा. खाऊन जणू हीच आमच्यावर उपकार करायची. पण पहिला घास घेणं हे दिव्य असायचं. अजिबात तोंड लावायची नाही. मग युक्ती समजली. पोळीचा तुकडा घेऊन तिच्या नाकाला लावायचा. सुरुवातीला ती दुर्लक्ष करायची. पण आपण चिकाटी सोडायची नाही. आपण तुकड्याचं टोक घेऊन तिच्या नाकाला टोचत रहायचं. शेवटी ती भडकून चावायला यायची आणि चावलं की ब्रह्मज्ञान होत असे, "अरेच्चा, हे तर अन्न आहे." पोळीच्या तुकड्याला आपण पूर्णब्रह्म असण्याचा साक्षात्कार तेव्हा होत असावा. मग पुढचे घास सुखासुखी जायचे. पण एका जागी बसून खाणार नाही. आम्ही जमिनीवरच जेवायला बसायचो, तर स्वतःची पाठ आमच्या पाठींवर घासायची, डोक्यानं हळूच गुडघ्यांच्या ढुशा द्यायच्या, कधी तिचा कान आमच्या गुडघ्यांवर घासायचा असं चालायचं. असं करत असेल तरच पुढचा घास द्यायचा हे समजायचं. उगाच, फार मस्का न लावता प्रदक्षिणा घालत असेल किंवा शेजारी बसलेली असेल तर मात्र बाईसाहेबांचं पोट भरलेलं आहे असं समजायचं. पण पुन्हा पुढच्या जेवणात तेच नाकाला पोळीच्या तुकड्यानं डिवचण्याचे, भडकून चावण्याचे आणि साक्षात्काराचे प्रयोग व्हायचे. घरात कोणीही जेवायला बसलं की मात्र बाईसाहेब लगेच हजर व्हायच्या. प्रत्येक वेळेला भूक असेलच असं नाही. पण लोकांना जेवताना कंपनी देण्याचा सुसंस्कृतपणा तिच्या ठायी, आमच्या बरोबर राहूनही, होता.

तशा तिच्या सवयी अगदी व्यवस्थित होत्या. घरात आमच्यासारख्याच तिच्याही बसण्याच्या, झोपायच्या जागा ठरलेल्या होत्या. ऋतुमानाप्रमाणे बसण्याच्या जागांमधले बदल तेवढेच. एका संध्याकाळी बाबा आणि मी टीव्हीवर काहीतरी बघत होतो तर बाई आल्या. नेहेमीची "मी आले" ही आरोळी आली नाही. आतल्या बाल्कनीत भलत्याच ठिकाणी जाऊन बसली. आम्ही कोणीही त्या बाल्कनीत जायचो नाही, दुपारची झोप क्वचित कधी तिथे काढली तरच! बहुदा काहीतरी बिनसलं असेल, येईल थोड्या वेळात ठिकाणावर म्हणत मी आणि बाबा तसेच बसलो. थोड्या वेळानं माझाच संयम संपला. आत गेले तर ही खिडकीच्या तावदानावर अंग चोरून बसली होती. "अरेरे, घरच्या मालकानं असं का बरं चोरासारखं बसावं?" असा विचार लगेच आला. तिला विचारावं काय झालं म्हणून मी तिच्या अंगावर हात फिरवला तर माझ्या हाताला चिखल लागला. मग लक्षात आलं. शेजारची बिल्डींग पुन्हा बांधत होते. बाईसाहेबांचं कुतूहल कुठेतरी अधिक झालं असणार आणि एखाद्या खड्ड्यात पडून आलेली असणार. आता चिखल घरभर पसरू नये म्हणून अशी कोपऱ्यात येऊन बसलेली होती. या माजुर्डीची अशी 'भीगी बिल्ली' झालेली पाहून मला जरा वाईटच वाटलं. मी सरळ गिझर लावला. गप्पा मारत प्रेमानं उचललं आणि फसवून बाथरूमात नेलं. खसाखसा घासून आंघोळ घातली. ती भयंकर भडकली होती माझ्यावर! पुसूनही घेतलं नाही. सरळ अशीच ओली जाऊन बसली बाबांना चिकटून. थोड्या वेळानं जेवायला बसलो तर माझ्या हातचं खायलाही तयार नाही. पोळीचा तोच तुकडा बाबांनी दिला तर घेतला. तब्बल तीन दिवस हा अबोला टिकला. तीन दिवस दुपारचं जेवणही एकदाच घेतलं. मी जेवताना माझ्या मागेच बसली असली तरी शेजारी बसलीही नाही. पण मग आली लायनीवर!

प्राणी पिल्लांच्या जवळ आपल्याला येऊ देत नाहीत हा ही समज तिनं वयात आल्यावर खोटा ठरवला. आम्ही तिच्या दोन मिनिटं वयाच्या पिल्लांशीही बिनधास्त खेळायचो. दोनेक आठवड्यांची पिल्लं नखं बाहेर काढतात आणि त्यांच्या पायांना त्यांचं वजन पेलवत नाही. मग पाय फेंदारत चालतात ते बघायला फार मजा यायची. एक पाऊल टाकलं की लगेच वाकडं पसरायचंच ते. त्यातून पिल्लं आईच्या शेपटीशी खेळतात ही गोष्ट तर सांगायची नाहीच. त्या प्रकारच्या करमणुकीसाठी एक मांजर घरी असलंच पाहिजे. मी आणि भाऊ मधूनच जाऊन काड्या करायला पांढरूच्या शेपटाला थोड्या गुदगुल्या करायचो. मग ती पिल्लांवर कावायची. पिल्लं तिच्यावर कावायची. आपण लांबून त्यांच्या भांडणांची मजा बघत बसायची. पांढरू आणि छब्बडचे खेळ मात्र निराळेच असायचे. पहाटेचे दोन-तीन ही त्यांची खास वेळ. दोघीजणी स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत धावत यायच्या. आणि शेवटी ब्रेक मारतेवेळी नखं काढायच्या. एखाद्या रात्री आपण जागे असताना हा खेळ सुरू झाला तर अंगावर काटा यायचा. नखं फरशीवर घासली जायची तर फळ्यावर नखांनी ओरखडल्यासारखं व्हायचं. यक्क! एकदा घरी पाहुणे आले होते. दोन टोकाच्या भिंतींना भाऊ आणि एक काका दिवाणांवर झोपले होते. दोघांच्या मधे जमिनीवर काकांचा मुलगा. त्या दोघांची मोठी पोटं घोरण्याच्या तालात हलत होती; हे अघोर संगीत ऐकून भाऊ जागा झाला. या दोघींच्या भरात आलेल्या खेळाला बहुदा या घोरण्यानं ब्रेक लागला. तर पांढरू सरळ भावाच्या शेजारी उभी राहिली; थोडा वेळ त्या मुलाच्या तालात हलणाऱ्या पोटाकडे मुंडी वर-खाली करत निरखून पाहिलं. आणि तिच्यातली मांजर अचानक जागी झाली. तिनं त्याच्या पोटावरच उडी मारली. पुढचा अर्धा तास त्याच्या शिव्या आणि भावाचं हसणं यात गेला.

बाबा गेल्यावर घरात दोन-चार दिवस बरीच गर्दी होती. तिलाही गर्दी आवडत नसे. स्वतःच्या घरात ती पण थोडी चोरासारखी यायची. ती घरात येण्याकडे मी किंवा भाऊ डोळा ठेवून असायचो. हळूच एखाद्या कोपऱ्यात नेऊन निदान तिच्या पोटाचं पाहायचो. नंतर आठ दहा दिवस तिचं खाणं, आवाज, हालचाल, खेळ सगळंच थोडं कमी झालं होतं. डोक्यावरून हात फिरवायला आता कोणी नाही हे आठवलं की मी तासनतास तिच्या अंगावरून हात फिरवत बसायचे. दुपारचं जेवताना वाढून घेताना तिच्यामुळेच एकटेपणा वाटत नसे. तिघांनाही या गोष्टीची सवय व्हायला वेळ लागला. पण जातोय कुठे?

पांढरूनं घराला आपलं म्हटल्यावर आता आम्हाला दुधाची काळजी नव्हती. तिच्यावर खुशाल दूध सोडून आम्ही बाहेर जायचो. भुकेचं म्याव आम्हालाही बरोबर समजायचं. तत्परतेनं तिला दूध, बिस्किटं द्यायचो. पुढे ही अतिशहाणी त्या छब्बडलाही खायला द्यायची. आम्हा भावंडांना छब्बड आवडायची नाही हे तिला माहीत होतं. मुद्दामच ती छब्बडचं पोट भरेपर्यंत काही खायची नाही. काही इलाजच नसे. मग आम्ही छब्बडच्या वाट्याचं दूधही ओतून जायला लागलो. पांढरूची मैत्रीण होती म्हणून एवढं केलं, दुसरं काय! पांढरू मात्र प्रचंड लाघवी स्वभावाची होती. माझी परीक्षा सुरू होती; रात्री दोन-अडीचच्या सुमारास ही घरी आली तरीही मी जागी होते. तिच्या तोंडात काहीतरी होतं आणि मला पाहिल्यापाहिल्या तोंडातलं प्रकरण पडणार नाही या बेतात तिनं "मी आले"ची नेहेमीची आरोळी ठोकली. माझं डोकं अभ्यासानं सॅच्युरेट झालेलं होतंच. मी मान वर करून पाहिलं. आत्तापर्यंत सकाळी उठल्यावर कबुतरं, खारी किंवा उंदरांची डोकी आणि हाडं पाहिली होती, पण आता लाईव्ह शो मिळणार म्हणून मी फार खूष झाले. तिनं चपलांच्या कोपऱ्यात तोंडातला उंदीर टाकला आणि माझ्यासमोर येऊन काहीतरी नवीनच म्याव केलं. मी तिच्या अंगावरून हात फिरवला आणि तिच्या येण्याची मी नोंद घेतलेली आहे हे तिला सांगितलं. ती पुन्हा उंदराजवळ गेली, म्यांव केलं आणि परत माझ्यासमोर येऊन तसलाच आवाज लावला. मला काहीच कळेना. उंदीर तर मेलेला होता, म्हणजे हिचा खेळायचा शोही संपला होता. हे असं माझ्यासमोर आणि उंदरासमोर दोन-तीनदा म्यांव झालं; आता काय आहे? तर लक्षात आलं, पांढरू मला जेवायला बोलावत होती. "रोज तू मला खायला घालतेस ना, आज मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय."

पुढे मी शिकायला देशाबाहेर गेले. भाऊ त्यानंतर काही महिने घरी होता आणि तोही नोकरीनिमित्तानं महाराष्ट्राबाहेर पडला. घर बंद झालं. आधी त्याच्याकडून आणि नंतर शेजाऱ्यांकडूनही पांढरू दिसल्याचे, शेजाऱ्यांकडेही मधूनच जाऊन आल्याचे रिपोर्ट्स मिळायचे. मी सुट्टी घेऊन महिनाभर यायचे तेव्हा पांढरू एखाद दिवसात घरी हजर व्हायची. महिनाभरात पुन्हा कपड्यांना, पांघरुणांना मांजराचे केस चिकटलेले असण्याची सवय व्हायची. तीन वर्षांनी मी परत येण्याचं शेवटचं तिकीट काढलं. त्याच्या काही महिने आधी भावानंही मुंबईत नोकरी शोधली होतीच. पांढरू दिसल्याचं भावाकडून फोनवर कळलं होतं. एकदाची मी तिकडचं चंबूगबाळं आवरून परत आले. पांढरू मात्र परत आलीच नाही. आपल्या मर्जीनं तिनं ते घर आपलं असल्याचं जाहीर केलं होतं, आपल्याच मर्जीनं सोडून दिलं असावं.

(स्केचेसः आडकित्ता)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (8 votes)

प्रतिक्रिया

जगात दोन प्रकारचे लोक असतात असं म्हणता येईल. एक म्हणजे 'मांजर आवडणारे' (म्हणजे अर्थातच खूप खूप आवडणारे) आणि दुसरे म्हणजे 'मांजर न आवडणारे' (म्हणजे अजिबात न आवडणारे)!

तुम्ही पहिल्या गटात आहात आणि मी दुस-या गटात आहे!!

पण अनेक मार्जारप्रेमी मित्र-मैत्रिणी असल्याने समजलं तुम्ही काय म्हणता आहात ते!
आडकित्ता यांची रेखाटनेही आवडली.

जीवसंस्कृती तयार होताना माणसाचे वसाहतीकरण झाले तेव्हा मांजराने माणसाची सोबत राहण्यासाठी निवड केली, असलं एक भयंकर (पण बहुदा जीवशास्त्रीय उत्क्रांती वगैरेच्या सैद्धांतीक मांडणीनुसार सत्य किंवा तथ्यात्मक) वाक्य परवा ऐकलं होतं. त्या वाक्याचा अर्थ लावताना अनेक मांजरं, आणि कुत्रीही समोर तरळून गेली. त्यात एक भर पडली. एका दिवाळी अंकात असाच लेख याआधी वाचल्याचं आठवतंय. कोणा प्रथिततयश लेखकाचा होता. म्हणजे, दोन चांगल्या आठवणी या लेखानंही करून दिल्या.
चांगला लेख. रेखाटनं लक्षवेधी. विशेषतः, पहिल्या आणि तिसऱ्या रेखाटनातलं मांजर पाहून वाटतं आडकित्त्याच्या घरी मांजर असावंच.

वर अतिवास म्हणाल्या तसंच म्हणतो! मी ही दुसर्‍या गटातला असलो तरी लेख आवडला.
रेखाटनेही लाजवाब!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला, रेखाटने सुंदर! बारीक निरीक्षणे ही मूळच्या शास्त्रज्ञवृत्तीतून आली असावीत. मला मांजरे आवडतात त्यामुळे 'पांढरु' बद्दल आपुलकी वाटली.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

>>एका दिवाळी अंकात असाच लेख याआधी वाचल्याचं आठवतंय.

अरुण खोपकरांचा मांजरीवरचा एक लेख मला खूप आवडतो. मोडक तुम्ही म्ह्णताय तो हाच का?
http://www.academia.edu/482666/KOSHKA_in_Marathi_

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

येस्स. हाच. खोपकरांना प्रथितयश लेखक म्हणता येणार नाही. बहुदा खोपकर आणि कोलटकर असला एक भलता गोंधळ झाल्याचा तो परिणाम असावा. Smile

खोपकरांचा कोश्का वाचला. चांगला आहे. पण तो एका विचारवंताने (मांजरावर प्रेम करणाऱ्या का होईना) बैठक मारून लिहिलेला वाटतो. पांढरूच्या खेळकर लेखनशैलीमध्ये मांजरीचा नखरा आणि रुबाब उतरला आहे. त्यामानाने तो किंचित कोरडा वाटला.

तुझ्या नेहमीच्या विषयांशी आणि शैलीशीही फारकत घेणारा लेख आहे. एरवी क्वचितच जाणवणारा कोवळेपणा यात दिसतो नि आपण काही चोरून तर पाहत नाही ना, असा अपराधीपणा वाटायला लावतो.

मेघना भुस्कुटेशी सहमत. यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांत वर्णन करणं कठीण आहे.

आडकित्तांनी काढलेल्या चित्रांनी लेख बहरून निघाला आहे. विशेषतः पाठ वाकवून आळस देणाऱ्या मांजराचं चित्र सुरेखच. एका दमदार रेषेत तो सगळा बाक आणि ताण सुरेख उतरवलेला आहे. चेहऱ्यावरचे आत्मसंतुष्ट भाव डोळा आणि ओठांसाठीच्या दोन रेषांत... तुम्हाला सलाम.

लेख आवडला. रेखाटनंही सुरेख. मनाला भिडणे इ. सारखे वाक्प्रचार अतिवापराने त्यांचा अर्थ हरवून बसलेत, पण पांढरूने आणलेल्या खाऊचा प्रसंग वाचून तसंच काहीसं वाटलं.

+१.

सगळा लेख मांजरप्रेमाने थबथबलेला आहे. आमच्या घरीपण २-३ मांजरे अशी राहिलेली असल्याने पूर्ण रिलेट करू शकतो. पण त्यातही तो पांढरूने आणलेल्या खाऊचा प्रसंग अतिशय खास. Smile

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

माझ्या शत्रु क्रमांक १ बद्द्लचा लेख. तुला मांजरी एवद्या आवडतात???
असो लेखन आवडल

दुसरे म्हणजे 'मांजर न आवडणारे' (म्हणजे अजिबात न आवडणारे)!

या गटात माझा पहिला नंबर

.

लेखन आवडलं.

माझ्या घरी एकाचवेळी दोन मांजरं (भावंडं) एकापाठोपाठ एक घुसली आणि घरातलीच झाली. त्यांची नावं पहिलू आणि दुसरु अशी ठेवली होती त्याची आठवण झाली. आणि त्यानंतरच्या बर्‍याच बर्‍याच मार्जारस्मृतींनी नख्या काढल्या..

मस्त लेख. वाचून मलाही एखादं मांजर पाळावंसं वाटू लागलं.

राधिका

तुझ्या नेहमीच्या विषयांशी आणि शैलीशीही फारकत घेणारा लेख आहे. एरवी क्वचितच जाणवणारा कोवळेपणा यात दिसतो नि आपण काही चोरून तर पाहत नाही ना, असा अपराधीपणा वाटायला लावतो.
अधूनमधून असेही लिहीत जावे...
आम्ही बंगळुरी मांजर पाळून पाहायचा उपक्रम केला होता. साधारण साडेतीन दिवस तो टिकला. त्याबद्दल लिहावं अशी सुरसुरी आली या लेखामुळे. Smile

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आम्ही बंगळुरी मांजर पाळून पाहायचा उपक्रम केला होता.

'पर्शियन क्याट'बद्दल ऐकले होते. हे 'बंगळुरी मांजर' काय असते, कळले नाही.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

Blum 3
वाक्यरचना चुकली.
आम्ही मांजर पाळून पाहण्याचा उपक्रम बंगळुरी (असताना) केला होता.
वोके?!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

निरागस अन लडिवाळ लेख आवडला.
मांजराची जात खरंच खूप समंजस ! त्याच्या विविध छटा छान टिपल्या आहेत.

हे असं माझ्यासमोर आणि उंदरासमोर दोन-तीनदा म्यांव झालं; आता काय आहे? तर लक्षात आलं, पांढरू मला जेवायला बोलावत होती. "रोज तू मला खायला घालतेस ना, आज मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय."

मग? तिने एवढे प्रेमाने आणले आहे म्हटल्यावर तिच्या समाधानापुरता एखादा तुकडा तरी मोडायचा की नाही? काय हे! ही माणसाची जात म्हणजे... आप्पलपोटी! दुसर्‍याच्या भावनांची काही किंमत म्हणून नसते! स्वतःचेच तेवढे काय ते खरे!

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

दुसर्‍याच्या भावनांची काही किंमत म्हणून नसते! स्वतःचेच तेवढे काय ते खरे!

बरोबर बोललात.
मारलेले उंदीर घरात आणणारी मांजर...
तुम्हाला सांगू पहत्ये की मला दूध पोळी नकोय!
माझा खाऊ हा आहे.
तर ह्यांना वाट्तंय की ते आपल्यावरचं प्रेम आहे.
कसं होणार ह्या देशाचं?

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

कसं होणार ह्या देशाचं?

अगदी अगदी. आमच्या वेळी असं बिल्कुल न्हौतं, आजकालच्या पिढीने कै ताळतंत्रच सोडलंय Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

जे काही वाट्टोळं व्हायचं ते तुमच्यासारख्यांमुळेच होतं.

तुम्ही कडबा खाणारे, आम्ही गवत खाणारे. मग तुम्ही आमच्या बाजूने बोलायचं का उंदरी, कबूतरं हादडणार्‍या मांजरांच्या बाजूने? आम्ही अगदी त्या मास-मच्छर खाणार्‍या प्राण्यांना घरात ठेवून घ्यायचो, अंमळ काळजी घ्यायचो, अगदी आमच्या ताटातलं तिला द्यायचो, त्याचं काहीच नाही! वर आम्हालाच दोष द्या. अशाने काही कोणाचं भलं होणार नाहीये लक्षात ठेवा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आणि बोलकी रेखाटनेही आवडली. मांजरं हा जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी आजुबाजूला बर्‍याच कुत्र्या-मांजरांचा वावर असे. आईने त्यांची केलेली बाळंतपणं पाहिली आहेत. झालच तर एकदा गावाला जाणार्‍या कुटुंबाला मदत म्हणून काही दिवस एक पोपट, ओळखीच्या गवळ्याकडची काही अडचण म्हणून त्यांची गायही काही दिवस सांभाळली आहे, त्यामुळे लेखाशी नाळ सहजच जुळली.

मागे एकदा मोठ्ठं वादळ झालं. दाराबाहेर एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला, म्हणून उघडून पाहते, तर एक मांजर अर्धवट भिजलेलं, केविलवाणं ओरडत उभं होतं. अर्थातच घरात घेतलं. त्याच्या गळ्यात पट्टा नसल्याने मालक कसा शोधायचा हा प्रश्नच होता. मांजरांचा दांडगा अनुभव असल्याने, अधिकारवाणीने सूत्र ताब्यात घेतली. त्याचं अंग पुसून, मोठ्या विश्वासाने दूध प्यायला दिलं. मांजराने किंचित हुंगून पाहिलं आणि नापसंतीचा कटाक्ष टाकून, तोंड फिरवून बसलं. आता आली का पंचाईत! माझा अनुभव पडला भारतातल्या मांजरांचा, अमेरीकेतल्या मांजरांचं नक्की डाएट काय असतं, ते इथे कोणाला ठाऊक! शेवटी त्या भर पावसात शेजारणीकडे गेले, ट्युना फिशचा डबा उसना आणला आणि मांजराला जेवू घातलं. रात्री एका कोपर्‍यात त्याचा बिछाना अंथरला, एक नाईट्लॅम्प लावला(माहितीये मांजराला अंधारात दिसतं ते! नाईट्लॅम्प रात्रीत त्याच्या खुडबुडीचा आवाज झाला आणि येताना मी धडपडले तर..म्हणून लावला होता.) पण मांजराने तशी वेळ नाही येऊ दिली. एका जागी बसून नसेल, पण काही मोड्तोड् किंवा पाडापाडी तरी नव्हती केली. पॉटी ट्रेन्ड होतं का माहिती नाही, पण तसेही काही कुठे दिसले नाही.

दुसर्‍या दिवशी परत त्याला खाऊ घातलं, नैसर्गिक विधींसाठी बाहेर जायचे असले तर..म्हणून दार किंचित उघडून ठेवलं आणि अ‍ॅनिमल शेल्टरचा नंबर शोधला. पण ते जे बाहेर पड्लं ते परत नाहीच आलं, कदाचित आपल्या घरी परतलं असेल.

सर्व प्रतिसादकांचे आभार. आडकित्तांचे विशेष आभार. त्यांच्याकडे मांजर नाही हे ही चित्रं पाहिल्यावर मलाही पटलं नाही. पांढरू आणि जेनेरिक सगळ्याच मांजरांचा नखरा त्या चित्रांमधे पुरेपूर उतरला आहे.

मांजर न आवडणार्‍यांनो, तळमजल्यावर रहात असाल तर सावधान. कधीही, कोणतंही मांजर तुमच्या घरावर दावा सांगू शकतं. आणि तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही.

'न'वी बाजू, नाही, मी अर्थातच एकही तुकडा मोडला नाही. तिच्या या कृतीचा अर्थ लक्षात आला (असं मला वाटलं) तेव्हा हसून हसून बेजार झाले होते. शेवटी तिने वाट पाहून पाहून तिची पार्टी करून टाकली. नंतरचं म्याव बहुदा "काय यडपट मुलगी आहे" या अर्थाचं असावं. भाऊ त्याला पांढरूची डरकाळी म्हणत असे. मी चूपचाप उंदराचं डोकं आणि उरलेली हाडं कचर्‍यात फेकली.

मेघना Smile

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखाखाली श्रेय दिल्यानंतर आभार मानायची खरेच गरज नव्हती. उलट माझ्या (खानदेशी भाषेत) 'चिरखडण्याला' जागा दिल्याबद्दल मीच धन्यवाद म्हटले पाहिजे. पुन्हा मदत लागली तर जरूर सांगा, यथाशक्ती प्रयत्न जरूर करीन!

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख आवडला.

३-१४-विक्षिप्त-अ‍ॅलिस असे नवे नामकरण करायला हरकत नाही असे वाटले.

- चेशायरसुनीत.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गंमत म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे परदेशात शिकायला गेले तेव्हा चेशरमधेच राहिले आणि त्या घराचं नावही 'चेशर हंट' असं होतं. तीन वर्षात तिथे एकदा, फक्त एकदा, मांजर दिसलं होतं. त्यामानाने ग्रीसमधे फारच मार्जारप्रेम दिसलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीन वर्षात तिथे एकदा, फक्त एकदा, मांजर दिसलं होतं.

तू तीन वर्षांत एकदाच आरशात पाहिलंस? Wink
(संदर्भ: गुगलचा प्रोफाईल फोटो)

रेखाटनं छान आहेत. आधी तीच पाहून ठेवली होती. लेख सुद्धा आवडला.
अवांतरः "थोडासा रूमानी हो जाए" या चित्रपटातला विक्रम गोखले आणि मांजराची पिलं यांचा एक सुंदर सीन आठवला.

लेखन आणि रेखाटन दोन्ही अप्रतीम.

-------------------------------------------

लेख आणि रेखाटने दोन्ही आवडले.

अदिति तुझी पांढरु आमच्या बू सारखीच आहे ग Smile फरक इतका की ह्या साहेबांन्ना बाबांनी घास भरवल्याशिवाय साहेब जेवत नसत. दूध न चुरमुरे न मासेवाल्याचे मासे कितीही खाईल.

मासेवाल्यालाही आपला माज दाखवल्याशिवाय राहिले नाहीत साहेब. त्याने दिलेला मासा कधीच नाही खायचे. त्याच्या टोपलीत उडी मारुन स्वतःसाठी मास/से निवडुन मग ते खायचे.

आमच्या बू ने ही त्याच्या आयुष्यातला त्याने पकडलेला पहिला उंदीर आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी न आईसाठी घेउन आला होता ..मग आम्ही हात लावत नाही हे पाहुन त्याला स्वैपाकघरात नेउन दूध-उंदीर खाल्लन होत Smile

तुझा लेख प्रच्चंड आवडलेला आहे. Smile

प्रीमो-माउ

खरोखर सुंदर लेख. मला स्वत:ला मांजर अजिबात आवडत नाही. पण ते सोड, एखाद्या माणसा बद्दल असावे इतके जिवंत शब्दचित्र आहे हे. ही एक वेगळीच जाणीव असावी, अथवा भावना, जी प्राण्यांशी भावनिक दृष्ट्या एवढी एकरूप होऊ शकते. ह्यातले तपशील ही एवढे जिवंत आहेत की असं एखादं नातं असावं असं कुणालाही वाटेल.

वरील सर्वाँशी सहमत.

===
Amazing Amy (◣_◢)

फारच सुंदर लेख. माझ्या लहानपणी पण माझ्याकडे मांजर असायच्या. एकाचे नाव "गंबा" होते आणि नंतर एक होते त्याचे "फुगा". माझ्या मांजरांना टी.व्ही, वर बसायला फार आवडायचे.

एका वेळेला साताठ मांजरं घरी होती माझ्या लहानपणी..

गेल्या ६ वर्षात कमीतकमी ३०-४० वेळेला "मांजर अथवा तू एकच कोणीतरी घरात रहा" असं ऐकून झालं आहे,
पण च्यायला या वर्षात एकतरी मांजर घेउन येतोच. किती दिवस मीच ताटाखालचं बनून रहायचं

आदिती, लेख मस्त आहे, कित्येक वर्षं क्षणात पुसली गेली..

मस्त लेख. सुन्दर .