Skip to main content

Skin deep

'Skin' नावाचा एक दक्षिण आफ्रिकन चित्रपट पाहिला. गोर्‍या जोडप्याला कृष्णवर्णीय दिसणारी मुलगी होते. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत 'apartheid' (वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांना वेगळं करणारा, वर्णभेद मानणारा) कायदा अस्तित्त्वात होता. गोरी मुलं वेगळ्या शाळेत असत, काळी मुलं वेगळ्या. काळ्या लोकांची आर्थिक परिस्थिती खालची, आणि सामाजिक स्थानही खालचं. त्यात ही मुलगी सांद्रा (Sandra) गोर्‍या मुलांच्या शाळेत जाते; कारण आई-वडील गोरे. तिथे अन्य पालकांना सांद्राच्या काळेपणाचा त्रास होतो. त्या काळात डीएनए चाचणी उपलब्ध नव्हती, त्यामुळे हेच हिचे (आई-)वडील हे सिद्ध करणं अशक्यच. वडील फार कष्ट घेऊन मुलीला त्याच शाळेत शिकता यावं याची काळजी घेतात. आपल्या मुलीला स्वतःची वंशपरंपरागत 'इस्टेट', म्हणजे काय तर गोरी आहे म्हणून वरचं सामाजिक स्थान, मिळावं म्हणून कोर्ट-कचेर्‍या होतात, न्यायालयाचा दरवाजा ठोठावतात तेव्हा एक जीवशास्त्रज्ञ, आपल्या कोणाचंच रक्त शुद्ध 'गोरं' नाही, त्यामुळे गोरे दिसणार्‍या जोडप्याची मुलंही काळी दिसू शकतात अशी साक्ष देतो. पण तरीही शाळकरी मुलीला पत्रकारांच्या भडीमाराला तोंड द्यावं लागतं, शाळेतल्या सहाध्यायींना ती फार आवडत नसते ही कुचंबणा निराळीच.

सांद्रा मोठी होते, वयात येते तेव्हा तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्याची धडपड सुरू होते. आई-वडील गोरे, म्हणजे मुलगाही गोराच हवा. या गोर्‍या मुलांकडून तिला जे हवं असतं ते मिळत नाही, समाधान. ती जवळच्याच एका कृष्णवर्णीय तरूणाच्या प्रेमात पडते. वडील आणि मोठा भाऊ तिच्या प्रियकराला मारण्याची तयारी करतात तेव्हाच हे दोघं दक्षिण आफ्रिकेतून स्वाझिलँडमधे पळून जाऊन लग्न करतात. (स्वाझिलँड हा छोटासा देश द. आफ्रिकेच्या पोटात आहे.) वडलांशी यातून दुरावा निर्माण होतो.

लग्नानंतर ती कृष्णवर्णीय स्त्रीचं, खालचं सामाजिक स्थान असणारं आयुष्य जगू लागते. त्या सगळ्या लोकांमधे तिच्यात 'आपल्या' लोकांमधे असण्याची भावनाही निर्माण होते. पण नवरा मारहाण करायला लागल्यावर ती पुन्हा एकटी पडते. तिच्या लग्नाच्या निर्णयामुळे वडील आणि दोन्ही भाऊ दुरावलेले असले तरी आईला मुलीबद्दल अजूनही काळजी असते. पण वडलांमुळे दोघींची भेट होत नाहीच.

द. आफ्रिकेतलं वंशभेद करणारं सरकार पडतं तेव्हा सांद्राच्या गोष्टीत माध्यमांना आता पुन्हा रस निर्माण होतो. तिच्या आयुष्याची वाताहत आईला माध्यमांमधूनच समजते. माय-लेकीची आईच्या वृद्धापकाळात भेट होते. सांद्राची ही सत्यकथा आहे. तिचे दोन्ही भाऊ तिला आजही भेटत नाहीत.

सांद्राला तिचे हक्क मिळावे म्हणून जागरूक असणारे तिचे वडील, कृष्णवर्णीय लोकही माणूसच आहेत हे कधीच लक्षात घेत नाहीत. आपल्यातही काही कृष्णवर्णीयांची गुणसूत्र आहेत याचं भान त्यांना सांद्रा (आणि तिच्या धाकट्या भावा)कडे बघून येत नाही. आपल्या वर्णसंबंधित अस्मिता संकुचित आहेत याची जाणीव ना त्यांना होते, ना तिच्या भावांना. आणि यात सगळ्यांचीच आयुष्य होरपळतात. द. आफ्रिकेतल्या वर्णभेदाशी आपला तसा जवळचा संबंध आहे. गांधीजींचा महात्मा त्याच देशात झाला. याच वर्णभेदाविरोधात त्यांनी तिथे लढा दिला होता. दुसरं म्हणजे आपला जातीयतेचा काळा इतिहास. सांद्राच्या आयुष्यात जे झालं ते आपल्याही आजूबाजूला होताना दिसतं. आपण फक्त आपण स्वच्छ आहोत यावरच समाधान मानून शांत बसावं का?

चित्रपटात द. आफ्रिकन इंग्लिश आहे. सवय नसेल तर समजण्यास थोडा त्रास होऊ शकतो. सबटायटल्स उपयुक्त ठरावीत.

हे 'स्किन'चं ट्रेलरः http://www.youtube.com/watch?v=wbj691Z1Z1E

अरविंद कोल्हटकर Fri, 15/02/2013 - 06:58

हा चित्रपट मी यूट्यूबवर नुकताच पाहिला. तेथे $२.९९ ला तो उपलब्ध आहे. तेथे 'Skin' ही search term घालून '२० मिनिटाहून मोठा' हा फिल्टर लावल्यास लगेच दिसेल. (http://www.youtube.com/movie?v=s77HWss0_cA&feature=mv_sr) अन्यथा अन्य शेकडो क्लिप्समध्ये तो कोठेतरी हरवतो.

असाच स्विस तरुणी आणि तिचा मसाई टोळीतील नवरा आणि त्यांच्यामधील संस्कृतिभिन्नतेमुळे निर्माण होणारा तणाव ह्यावर आधारित 'The White Masai' नावाचा चित्रपट नेट्फ्लिक्सवर उपलब्ध आहे. जरूर पहा असे सुचवतो.

ऋषिकेश Fri, 15/02/2013 - 09:41

दक्षिण आफ्रिकन चित्रपटांबद्दल अत्यंत उत्सूकता वाटु लागली आहे. मागे मी "त्सोत्सी" पाहिला होता. त्याचा (आणि इतरही काही आफ्रिकन चित्रपटांचा) परिचय या लेखात करून दिला होता.(दुवा मिसळपाववर जातो)

चित्रपट शोधायल हवाच असे वाटते आहे

चिंतातुर जंतू Fri, 15/02/2013 - 11:11

चित्रपट पाहिलेला नाही, पण ह्या निमित्तानं म्यूरिएल स्पार्क यांची 'ब्लॅक मॅडोना' ही गोष्ट वाचावी अशी शिफारस करेन. त्यात आणि ह्या कथेत एक मोठं साम्य आणि एक मोठा फरक आहे - त्यातदेखील एका श्वेतवर्णी जोडप्याला कृष्णवर्णी मूल होतं; पण ते जोडपं स्वतःला उदारमतवादी वगैरे समजत असतं. मूल झाल्यावर त्यांचा उदारमतवाद किती वरवरचा आहे ते दिसू लागतं. आणि ह्या निमित्तानं आणखी एक आठवण झाली ती आपल्या विजय तेंडुलकरांच्या 'कन्यादान' नाटकाची. त्यात समाजवादी, ब्राह्मण घरातली मुलगी एका दलित तरुणाशी प्रेमविवाह करते, आणि ही घटना त्या उदारमतवादी कुटुंबातले अंतर्विरोध आणि संकल्पनांचे गोंधळ कसे बाहेर आणते ते दाखवलं आहे. कुणालाही आसपास दिसतील अशा, पण काहीशा बाळबोध किंवा पाठ्यपुस्तकी म्हणता येतील अशा उदारमतवादी व्यक्तिरेखांचा वापर करून ह्या दोन्ही कलाकृती 'साने गुरुजींच्या गोड गोष्टी'सांगण्यापेक्षा काहीतरी वेगळं करतात; आणि तरीही त्या उदारमतवादाच्या बाजूनंच, पण काहीतरी अधिक गुंतागुंतीचं मांडतात.

अतिशहाणा Sat, 16/02/2013 - 02:04

In reply to by चिंतातुर जंतू

अरेच्च्या म्युरिएल स्पार्क यांनी ही कल्पना नुकत्याच आलेल्या अडगुळं मडगुळं या मराठी चित्रपटातून घेतली की काय? ;)

नागेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट गो-यापान कोकणस्थ कुटुंबात जन्माला आलेल्या काळ्याकुट्ट बाळाविषयी आहे. या चित्रपटात गिरिजा ओक, सुबोध भावे, उदय टिकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 16/02/2013 - 06:22

In reply to by चिंतातुर जंतू

'ब्लॅक मडोना' जालावर मिळाली. गुगल बुक्सचा दुवा

पुस्तकातली संपूर्ण कथा वाचली. आवडली.
वेगळा काळ, वेगळी पार्श्वभूमी आणि सावळ्या मुलीशी असणारं वर्तन दोन्ही कथांमधे निराळं आहे. "शिवाजी जन्मावा तो दुसर्‍याच्या घरात" तसं "सावळी मुलं जन्मावीत ती दुसर्‍याच्या घरात"!

स्मिता. Fri, 15/02/2013 - 15:48

चित्रपटाची ओळख रोचक वाटली. नक्की डाऊनलोडवून बघेन.

अवांतरः वर्णभेद आपल्याकडे, म्हणजे भारतातही भरपूर प्रमाणात दिसून येतो. अर्थात तो जातीभेदाइतका अन्यायकारक नसला तरी जेव्हा एखाद्याला, विशेषतः एखादीला, त्याला तोंड द्यायला लागतं तेव्हा ते तेवढंच अन्यायकारक होतं. बर्‍याच घरांमधून सावळ्या रंगाच्या सूनेला सतत टोमणे मारले जातात, आमच्या घरात 'शोभत' नाहीस, मुलं पण अशीच काळी होतील म्हणून बोल लावले जातात, चारचौघात लाज जाईल म्हणून कुठे बाहेर जावू देत नाहीत. रंग जास्तच काळसरपणाकडे झुकणारा असेल तर विचारायलाच नको. अश्यांची परदेशात आल्यावर कृष्णवर्णीयांकडे बघण्याची दृष्टी तशीच मलीन असते.

बॅटमॅन Fri, 15/02/2013 - 15:53

In reply to by स्मिता.

+१.

गोर्‍यांचा वर्णभेद फेमसच आहे. पण भारतीयसुद्धा काही कमी रेसिस्ट नाहीत. त्यावरून आठवलं, दाक्षिणात्यांना उत्तरेकडचे लोक कसे बोलतात आणि त्यावरची त्यांची सटकल्यानंतरची रिअ‍ॅक्शन म्हणून एकदम "झनझनित" आहे हे पत्र. अतिसरलीकरण वगैरे दोष नजरेआड केले तरी त्या विखाराआड सत्य आहे हे नाकारून चालत नाही.

ओपन लेटर टु अ देल्ही बॉय.

मन Fri, 15/02/2013 - 16:13

In reply to by बॅटमॅन

+२
अवांतर सुरु:-
आपण भारतीय नुसते रेसिस्ट नाही तर जबरदस्त हिप्पोक्रॅट्स आहोत. नाही नाही म्हणत सेक्सिस्टही आहोत.
बेशिस्त आणि अप्पलपोटेपणा हा राष्ट्रिय गुण आहे इथला. आणि अजूनही मानसिकता नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातही might is right अशीच आहे. "मी तुझ्यावर सत्ता गाजवू शकतो म्हणून मी योग्य आहे" असं कुणीही थोबाड वर करुन बोलू शकतं आणि प्रत्येकजण ते मनोमन मान्य करतो. "आपल्यावर अन्याय होउ नये" अशी न्याय्य मागणी कुणाचीच नाही. "आपल्यालाही इतरांवर अधिकाधिक अन्याय करता यावा(पर्यायाने आपल्यावर कमीतकमी अन्याय होइल)" अशी सगळ्यांची implicit भूमिका.
bravo. गटारगंगा करुन ठेवणारे हे महासत्ता होणारेत म्हणे.
अवांतर खतम.
चित्रपत बरा दिसतोय्.पाहिन म्हणतो.

बॅटमॅन Fri, 15/02/2013 - 16:34

In reply to by मन

अतिअवांतर सुरू:

आपण हरामी, अप्पलपोटे आणि बरेच काहीकाही आहोत हे सत्य आहे. इतिहासकाळापासून हे गुण होते तस्सेच आहेत.

पण याचा आणि महासत्ता होण्याचा तादृश संबंध नाही. नेते चांगले पाहिजेत. महासत्ता न होऊन सांगतो कुणाला? आता यावर नेते समाजातूनच येतात, मग असं कसं म्हणतो वगैरे अर्ग्युमेंट लागू पडत नाही, कारण मग चंद्रगुप्त, अशोक, हषवर्धन, कृष्णदेवराय, शिवाजी, अकबर, सातवाहन, इ. नेत्यांच्या वेळचा समाज आत्ताच्यापेक्षा लै भारी होता असे वाटत नाही, तरीही त्या नेत्यांना आपापला काळ गाजवलाच की.

सर्वसामान्य भारतीय हा आधीपासून तसाच आहे- आणि हा ब्रिटिशांनी रुजवलेला रेसिस्टपणाही नाहीये. उलट बहुसंख्यांच्या गुणोत्कर्षास पूरक परिस्थिती आजच्याइतकी कधीच नसावी आधी. त्यामुळे एक प्रबळ सत्ता/ वन ऑफ द महासत्ताज़ होण्याची क्षमता आहे हे नक्की. तूर्त तरी तेवढा खमक्या लीडर नाहीये इतकेच कारण दिसते.

अतिअवांतर समाप्त.

नगरीनिरंजन Sat, 16/02/2013 - 09:21

In reply to by बॅटमॅन

अतिअतिअवांतर>
अशा नेत्यांचेच अनुयायी नेते म्हणून चालतील का?
/अतिअतिअवांतर>

मूळ धाग्याविषयी: कशाला असले चित्रपट पाहून डिप्रेशनमध्ये जायचे असा विचार करून चित्रपट न पाहण्याचे ठरवले आहे. आशावादी होण्यासाठी अनेक गोष्टी पाहण्याचे/वाचण्याचे सोडावे लागेल असे दिसतेय. अज्ञानात सुख असते असे म्हणतात ते उगाच नाही.

मन Sat, 16/02/2013 - 09:34

In reply to by नगरीनिरंजन

शुद्धीवर न राहणे किंवा वाळूत तोंड खुप्सणे हा "घराला आग लागलिये. जळून भस्मसात होणारे" ह्या अलर्टवादी , त्रासदायक चिंतेतून बाहेर पडायचा राजमार्ग आहे.
सुखारुपी नशा करा. समाधानरुपी अफू प्या. आणि स्वतःलाच सारं कसं सुरळित सुरु आहे हे पटवत रहा; नशा अधिक दृढ होण्यासाठी.
.
कुणी रत्नाकर मतकरींचं "वटवट सावित्री" हे धमाल नाटक पाहिलं/वाचलय काय?
"राघोभरारी नाहिच्चेय. मला काहीच्च दिसत नाहिय्ये" हे कुणाला आठवतय का?

ऋषिकेश Mon, 18/02/2013 - 14:44

In reply to by मन

अतीअतीअवांतर

गटारगंगा करुन ठेवणारे हे महासत्ता होणारेत म्हणे.

एक प्रश्न असा की भारताला 'महासत्ता' व्हायचं आहे हे अनेकदा ऐकु येतं. पण कोण म्हणालं की महासत्ता व्हायचंय म्हणून? आणि 'महासत्ता' म्हणजे काय? त्याचे निकष कोणते?

बाकी उद्वेग पास ;)

मन Mon, 18/02/2013 - 14:54

In reply to by ऋषिकेश

हेच प्रश्न मलाही पडलेले आहेत. पण पुन्हा पुन्हा महासत्ता हा शब्द ऐकू येतो बुवा.
महासत्ता हे कशाला म्हणतात समजत नाही. महासत्ता होणार म्हणजे काय होणार हेही ठाउक नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 16/02/2013 - 01:44

खासगी संवादात एकीने चित्रपटाची संपूर्ण गोष्ट सांगून टाकल्याची तक्रार केली.

'स्किन' हा फक्त सांद्राच्या आयुष्यावर बनवलेला चित्रपट नाही. वर्णामुळे सांद्रा ना गोरी रहाते, ना काळे लोक तिला आपल्यातली समजत. वर्णद्वेष मान्य नसला तरीही तथाकथित उच्चवर्णीय असणार्‍या आई-वडलांबद्दल तिला प्रेम आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिचं हे प्रेम समजू शकत नाही. सांद्राची दु:ख ही फक्त तिची एकटीची रहात नाही. काही कारणांमुळे एकमेकांविरोधात उभ्या राहिलेल्या लोकांमधे समन्वय साधू पहाणार्‍या लोकांची शोकांतिका म्हणूनही सांद्राकडे बघावं लागतं.

तिच्या आयुष्यात फक्त तिचा दुस्वास करणारे लोकच येतात असंही नाही. आई आणि मुलांच्या नात्याचं सूचक पण हृद्य चित्रणही आहे. तिची आई, तिची सासू, ती स्वतः, तिची मुलं या सगळ्यांना वर्णद्वेषाचे परिणाम भोगावे लागले तरी त्यांच्या मनात माणसांबद्दल कडवटपणा नाही. छोट्या प्रसंगांमधून, संवादाशिवाय दिसणारी ही नाती लिखाणापलिकडची आहेत. वर्णद्वेष आणि टिपिकल पुरुषी इगो*, पुरुषप्रधान संस्कृती*या सगळ्यांचे दुष्पणरिणाम दाखवताना, सगळी मुख्य पुरुष पात्र कोत्या वृत्तीचीच का असावीत असाही प्रश्न पडला होता. सांद्राच्या बाबतीत लघुदृष्टी दाखवणार्‍या वडलांकडून तिने शेवटी नक्की काय 'इस्टेट' मिळवली हे ही तिच्याच तोंडून येतं.

---

चित्रपट नेटफ्लिक्सवरही स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

धाग्यात आधी चुकून मायलेकींची भेट होत नाही असा उल्लेख होता. तो दुरूस्त केला आहे.

*यांचे पाईक नसणार्‍या सर्व पुरुषांनी यातून स्वतःला जरूर वगळावं.

मन Sat, 16/02/2013 - 11:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर सुरु:-
"पुरुषी इगो आम्हाला नाही हो" असं मुद्दाम कुणी सांगत असेल तर तो असलेला इगो लपवू पाहतोय इतकेच.
ज्याला खरच इगो नसेल तो सहसा त्याचा उल्लेखही करणार नाही. "मला इगो नाही" असं उठसूट सांगतही सुटणार नाही.
पण ही रेअरेस्ट ऑफ रेअर स्पिसिज आणि मायनॉरिटी आहे. पुरुषी इगो कुणाला किती आहे, इतकाच प्रश्न आहे. कुणाचा कमी कुणाचा अधिक.
(स्वात्म्त्र्य हे हळूहळू मिळणारे प्रोसेस आहे असं राजेश म्हणतो, तसच इगो एका दिवसात संपत नाही. व्यवस्थेनं केलेलं तुमचं ट्रेनिंग पिढ्यानुपिढ्या उतरत जाउन हळूहळू तुम्ही काही पिढ्याम्नंतर अधिक मानवी होता. तुमचे माझे आजोबा वाईट नव्हते. पन जातिभेद त्यांच्या डोक्यात होता. म्हणजे माणुसकीही होती आणि त्याच वेळेस जातिभेदही होता. तो आपल्या पिढीत बराच निघून गेलेला निदान काहीएक वर्ग तयार होतोय. अगदि तसच. आमच्या डोक्यात ह इगो आहे. तो एखाद दोन पिढित कमी कमी होत जाइल. वय वाढेल, जाणिवा वआधतील तसा कदाचित आपल्याच पिढित कित्येकांच्या डोक्यातून कमी कमी होत राहिल.)
.
एकूणात असं वाटतं की एक मोठ्ठ्या प्रेशर पम्पची नितांत आवश्यकता आहे सगळ्यांच्याच डोक्यातील जळमटं आणि बकवास धुवून काढायला.

राजन बापट Sat, 16/02/2013 - 10:11

चित्रपट नुकताच पाहिला. अत्यंत परिणामकारक वाटला.

चित्रपटाची पार्श्वभूमी आणि कथानक तर वर येऊन गेलेलंच आहे. माझ्यामते चित्रपट अधिक परिणामकारक अशाकरता होतो की त्रिशंकू अवस्थेमधल्या एका व्यक्तीची ही कथा आहे. सांद्राच आख्खं आयुष्य , हे ती "काळी की गोरी" हे ठरवण्यात जातं.

आजीचा जुना उखाणा होता एक : "गडगड जातो गाडा नव्हे, सरसर जातो साप नव्हे, गळ्यात जानवं ब्राह्मण नव्हे. तर मी कोण ?" (याचं उत्तर आहे रहाट गाडगं.) तसं सांड्राचं आयुष्य आहे एक उखाणा. "गोर्‍या आईबापांची पण गोरी नव्हे. काळ्या वर्णाची नि काळ्या व्यक्तीशी लग्न केलं पण काळी नव्हे. आईबापांनी खूप प्रयत्न केले पण ते गोरेपणा सिद्ध करण्यासाठी , आपल्या मुलीवरच्या प्रेमाखातर नव्हे , दोन भाऊ आहेत पण त्यांची बहीण नव्हे , नवर्‍याबरोबर पळून लग्न केलं पण सुखी संसार झालेली नव्हे , स्वःचा देश वर्णद्वेषातून मुक्त झाला, पण मी माझ्या ओळखीबद्दलच्या दुष्टचक्रातून मुक्त झालेली नव्हे. तर मी कोण !"

आणि ही आयुष्यभर न पटलेली ओळख , ही अशी अवस्था बनण्याचं कारण तिची जनुकीय अवस्था, त्या जनुकीय अवस्थेमागचा इतिहास, तिची भयंकर सामाजिक परिस्थिती.

फ्रान्झ काफ्काने ज्या कादंबर्‍या लिहिल्या त्यातले कथानायक विलक्षण विपरित परिस्थितीमधे स्वतःला सापडलेले पहातात : एखाद्या काळ्या रात्री अचानक त्यांच्या नावने समन्स येतं. पोलीस दाराशी येऊन घेऊन जातात. अंधारकोठडीत टाकले जातात. जो खटला चालतो त्याचं स्वरूपसुद्धा असंच विपरित. आधीच शिक्षा ठरलेली. जे चालतं ते निव्वळ नाटक.

या परिस्थितीला असंगत - absurd - परिस्थिती म्हण्टलं जातं आणि काफ्काच्या कादंबर्‍यांमधील परिस्थितींनाच मुळी "काफ्काएस्क" असं नाव प्राप्त झालं आहे. सांड्राला जो आयुष्याचा उखाणा कधीच सोडवता येत नाही, जी तिची परवड होते - आणि या परवडीमागची पूर्ण मीमांसा तिला कधी करता येत नाही - ते सगळं पाहता सांड्राची कथा "काफ्काएस्क" आहे असं मला वाटलं.

सहज Sat, 16/02/2013 - 11:44

In reply to by राजन बापट

काल्की कोचलिन व तिच्या संघर्षाबद्दल बोलताना अनुराग कश्यप येथे पहाता येईल. (५ मिनट ३४ सेकंद)

अवांतर - काल्की कोचलीन ही अभिनेत्री फ्रेंच (?) माता पित्याची भारतात पाँडेचेरी येथे वाढलेली म्हणाले तर परदेशी म्हणले तर देशी मुलगी आहे.

जाताजाता: मधे कधीतरी ऐसीवर कल्कीच्या दिसण्याबद्दल काहीतरी लिहल्याचे वाचल्याचे स्मरते (चू.भू.दे.घे.)

मन Sat, 16/02/2013 - 11:55

In reply to by सहज

तो दुवा इथून उघडत नाहिये.
पण त्या कल्कीच्या तसं दिसण्याबद्दल मलाही फरच चिंता वाटते. तिला चांगलं खाय्ला प्यायला देउन आरोग्यपूर्ण ठेवावं असं मला वाटतं.

नगरीनिरंजन Sat, 16/02/2013 - 10:34

द. आफ्रिकेतल्या वर्णभेदाशी आपला तसा जवळचा संबंध आहे. गांधीजींचा महात्मा त्याच देशात झाला. याच वर्णभेदाविरोधात त्यांनी तिथे लढा दिला होता.

हे पाहा. भारतीयांविरुद्धच्या वर्णभेदाविरुद्ध गांधींनी लढा दिला होता पण 'नेटिव्हां'बद्दल त्यांचे फार अनुकूल मत नव्हते. 'महात्मा' ते नंतर झाले असावेत.

परिकथेतील राजकुमार Sat, 16/02/2013 - 10:50

ओळख आवडली, पण काहीशी उरकून टाकल्यासारखी वाटली. अजून विस्ताराने लिहिली असती तरी चालले असते.

अर्थात काही प्रतिक्रियांमधून ओळख वाढते आहेच.

रोचना Mon, 18/02/2013 - 17:19

अ ड्राय व्हाइट सीजन हा चित्रपट आठवला. स्वतःला लिबरल समजत असलेल्या एक श्वेतवर्णीय गृहस्थ घरच्या कृष्णवर्णीय कामगाराला थोडीशी मदत करायला निघतो, आणि अ‍ॅपार्थाइडच्या जाळ्यात गुंतत जातो, हा प्रकार नक्की काय आहे हे त्याला उलगडत जातं. डॉनल्ड सदरलंड आणि सूजन सॅरँडन चे अभिनय मस्त आहे.

विसुनाना Mon, 18/02/2013 - 18:22

वा! वा! चित्रपटाची मार्मिक ओळख.

एकमेकांविरोधात उभ्या राहिलेल्या लोकांमधे समन्वय साधू पहाणार्‍या लोकांची शोकांतिका म्हणूनही सांद्राकडे बघावं लागतं.

- अगदी.अगदी. ज्यावेळी पक्षापक्षांमधला वाद विकोपाला जातो तेव्हा सर्व पक्षांना समजावताना अशा समन्वयाची भूमिका घेणार्‍या व्यक्तींची ससेहोलपट होताना दिसते. तो मुळात ज्या गटातून आलेला असतो असतो त्या गटाचे लोक त्याला 'कुर्‍हाडीचा दांडा' म्हणून पाहतात आणि तो ज्यांच्यासाठी लढत असतो ते 'सुक्याबरोबर थोडे ओलेही जळायचेच' अशी भूमिका घेतात. (कोलॅटरल ड्यॅमेज.)(माझ्या काही प्रतिसादांमध्ये मी याची तुलना आशिस नंदींशी केली आहे.एक म्हण आहे - धोबी का कुत्ता, ना घर का न घाटका.) अनेक मोठमोठ्या नेत्यांबाबत असे घडलेले आहे. सामान्य माणसांची तर कथाच काय?
पण हे या शोकांतिकेचे बाह्य रूप झाले.

अशी समन्वयाची भूमिका प्रत्येक डाव्याउजव्या विचारांबाबत कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्तीत असते (असे मी मानतो.) , आणि वादात पडताना स्वतःलाच स्वतःशी संघर्षही करावा लागतो. ही आतली शोकांतिका (शोकात्मिका) आहे.