पंडिता रमाबाई आणि अमेरिकन रमाबाई असोसिएशन भाग १.

पंडिता रमाबाई ह्यांचे चरित्र आणि कार्य आपणा सर्वांच्या पुढे आहे. छापील स्वरूपात आणि जालावर त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी मुबलक साहित्य उपलब्ध आहे. ते पुन: स्वत:च्या शब्दांत ह्या लेखाच्या माध्यमातून लिहिण्याचा माझा इरादा नाही. रमाबाईंच्या कार्याला आर्थिक पाठबळ देणार्‍या ’अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ नावाच्या संघटनेची १८८९ पासून १९२८ सालापर्यंतची वार्षिक वृत्ते मला जालावर सापडली. त्यांमधून रमाबाईंच्या आयुष्याविषयी, त्यांच्या आसपासच्या अनेक व्यक्ति आणि घटना ह्यांच्या विषयी अल्पज्ञात वा अज्ञात असे बारकेसारके तपशील मिळतात आणि त्यांमुळे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा हा काळ अधिक सजीवपणे आपल्यापुढे उभा राहातो. असे तपशील नोंदवणे हा ह्या लेखाचा हेतु आहे. रमाबाईंच्या कार्याचे कौतुक असणार्‍या हेलन डायर नावाच्या एक इंग्लिश बाई मुंबईत राहात होत्या. १९१०च्या सुमारास त्या इंग्लंडला परतल्या असाव्यात असा तर्क करता येतो. त्यांनी त्या सालापर्यंतच्या रमाबाईंच्या आयुष्याचा आणि कार्याचा आढावा 'Ramabai The Story of Her Life' नावाच्या छोटया पुस्तकातून घेतला आहे. हे पुस्तक केव्हा आणि कोठे लिहिले आहे ह्याचा काहीच उल्लेख पुस्तकात नाही पण अंतर्गत पुराव्यावरून ते इंग्लंडमधील केंट परगण्यातील अल्डिंग्टन ह्या गावी १९१०च्या नंतर लगेचच लिहिले गेले असावे असे वाटते. अमेरिकन रमाबाई असोसिएशनच्या एक प्रमुख कार्यकर्त्या बाई क्लेमंटिना बटलर ह्यांनी रमाबाई १९२२ साली झालेल्या निधनानंतर लगेचच ’Pandita Ramabai Sarasvati' नावाचे चरित्रवजा पुस्तक अमेरिकेत लिहून प्रकाशित केले. स्वत: रमाबाईंनी अमेरिकेत असतांना 'The High-Caste Hindu Woman' नावाचे एक पुस्तक १८८७ साली लिहून प्रसिद्ध केले. हिंदुस्तानातील विधवांची बहुतांशी परावलंबी आणि असहाय, अगतिक स्थिति रमाबाईंच्या परिचयाची होती. त्यांचे स्वत:चे, त्यांच्या थोरल्या दिवंगत बहिणीचे उदाहरण त्यांच्यासमोर होतेच. अशा विधवा स्त्रियांना आधार देण्याचे काम आपण करायचे असा त्यांचा एव्हांना निश्चय झालेला होता. मिशनरी कार्यात स्वारस्य असलेल्या अमेरिकेतील लोकांपर्यंत हा प्रश्न पोहोचवून आपल्या नियोजित कार्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यास त्यांना उद्युक्त करण्याच्या हेतूने हे पुस्तक लिहिण्यात आले होते. वर उल्लेखलेल्या प्रकारचे तपशील ह्या तिन्ही पुस्तकांमधून विखुरले आहेत. त्यांचाहि उपयोग हा लेख लिहितांना केला आहे.

रमाबाई १८८६ साली प्रथम अमेरिकेत गेल्या येथपर्यंतचा त्रोटक आढावा प्रथम घेऊ. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे चित्पावन ब्राह्मण, पुराणिकाचा व्यवसाय करणारे मूळचे मंगलोरचे. पुण्यात आपल्या विद्यार्थिदशेत शिक्षण घेतांना आपल्या गुरूजींकडून त्यांनी असे ऐकले होते की दुसर्‍या बाजीरावची पत्नी वाराणसीबाई हिचा संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास होता. स्त्रियांना सर्वसाधारणपणे कसलेहि शिक्षण देण्याचा प्रघात नसलेल्या त्या काळात ही लक्षणीय गोष्ट होती आणि ह्यामुळे प्रभावित होऊन अनंतशास्त्री ह्यांनीहि आपल्या पत्नीला शिकवायचे ठरविले. स्वत: पत्नी आणि आई ह्या विचाराच्या विरोधी असल्याने पहिल्या पत्नीला ते काहीच शिकवू शकले नाहीत पण तिच्या निधनानंतर वयाच्या ४५व्या वर्षी दुसरे लग्न करतांना तिला शिक्षण देणार ह्या अटीवरच त्यांनी ९ वर्षाच्या दुर्गा - विवाहानंतर लक्ष्मी - नावाच्या वधूशी दुसरे लग्न केले. तिच्या शिक्षणालाही विरोध चालू राहिल्याने अखेर त्यांनी नव्या पत्नीसह घर सोडले आणि गावोगावी पुराण-प्रवचने करीत हिंडण्याचा उपजीविकेचा मार्ग स्वीकारला.

ह्या विंचवाच्या पाठीवरल्या संसारात त्यांना तीन मुले झाली, एक मुलगी, तिच्याहून लहान श्रीनिवास आणि २२ एप्रिल १८५८ ह्या दिवशी रमा. आपल्या पत्नीसह तिघांहि मुलांना वडिलांनी त्यांना माहीत असलेले पारंपारिक ज्ञान दिले. रमाबाईंच्या आईनेहि त्यांच्यावर ज्ञानाचे संस्कार केले. (ह्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख रमाबाईनी अमेरिकेत असतांना लिहिलेल्या The High-Caste Hindu Woman ह्या पुस्तकात केलेला आहे.) रमाबाईंची सर्वात थोरली बहीण लग्नानंतर लवकरच कॉलर्‍याने वारली. आई-वडीलहि १८७६-७७ च्या दुष्काळात दक्षिण हिंदुस्तानात तिरुपतीजवळ दारिद्र्याने गांजून मरण पावले आणि रमाबाई आणि थोरला भाऊ श्रीनिवास ह्यांची भारतभर एका गावाहून दुसरीकडे अशी भ्रमन्ती सुरू झाली. ह्या भ्रमन्तीतच ते दोघेहि १८७८ सालात कलकत्त्यात पोहोचले. तेथेच रमाबाईंच्या संस्कृतच्या अभ्यासामुळे आणि उत्कृष्ट वक्तृत्वामुळे प्रभावित होऊन कलकत्त्यातील पंडितांनी त्यांना ’पण्डिता’ आणि ’सरस्वती’ असे म्हणावयाला सुरुवात केली आणि त्या पदव्या त्यांच्या नावाच्या पुढेमागे तेव्हापासून लागल्या. हा सर्व घटनाक्रम सर्वपरिचित आहे.

लहान वयातल्या रमाबाईंचा आईवडील आणि भावंडांबरोबरचे एक छायचित्र पाहण्यास मिळाले. त्यात आईजवळ सात वर्षांच्या रमाबाई, भाऊ श्रीनिवास, थोरली बहीण जी लग्नानंतर लवकरच वारली, वडील अनंतशास्त्री दिसत आहेत. अजून एक मुलगेलासा तरुण आहे तो कोण हे कळले नाही. तो रमाबाईंचा मंगलोरमध्येच राहिलेला सावत्र भाऊ असू शकेल कारण ह्या छायाचित्रासाठी हे कुटुंब मुंबईस पोहोचले तेव्हा ते मंगलोरहूनच आले होते असा उल्लेख मिळतो. (ह्या सावत्र भावाचे उल्लेख पुढे येतीलच.) छायाचित्र मुंबईत डागेरोटाइप पद्धतीने केले होते असे कळते. ते १८६५ वा ६६ सालचे आहे हे उघड आहे.

कलकत्त्यातच बिपिन बिहारी मेधावी नावाच्या अब्राह्मण पण एम्.ए.ची पदवी मिळविल्या तरुणाशी त्यांचा विवाह १३ नोवेंबर १८८० ह्या दिवशी नागरी कायद्याखाली झाला आणि पतीबरोबर त्या आसाममध्ये सिल्चर येथे गेल्या. तेथेच त्यांच्या मनोरमा ह्या मुलीचा जन्म झाला. विवाहानंतर केवळ १९ महिन्यानंतर त्यांच्या पतीचे कॉलर्‍यामुळे निधन झाले. आपल्या पतीची स्मृति त्या अखेरपर्यंत बाळगून होत्या. त्यांचे नाव पुढे अनेक ठिकाणी ’रमाबाई डोंगरे मेधावी’ असे लिहिलेले आढळते. वर उल्लेखिलेल्या पुस्तकाच्या १८८७ सालच्या आवृत्तीचा प्रताधिकार ’रमाबाई डोंगरे मेधावी’ ह्यांच्याकडे असल्याचे दर्शविले आहे.

मेधावींच्यासह झालेला हा विवाह कोणालाच मान्य नव्हता ही गोष्ट रमाबाईंच्याच शब्दात लिहिलेली एका अनपेक्षित मार्गाने माझ्या समोर आली. ह्या विवाहाच्या वेळेस आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी हेहि कलकत्त्यातच नोकरीच्या निमित्ताने होते. आनंदीबाई आणि रमाबाई ह्यांचे काही दूरचे नाते असावे कारण पुष्कळ जागी त्यांचा उल्लेख cousins असा आलेला आहे, तरीहि त्यांचा एकमेकांत तोपर्यंत काही परिचय नव्हता. मेधावी ह्यांच्या अकल्पित मृत्यूनंतर रमाबाईंना काही साहाय्याची आवश्यकता असावी अशा समजुतीने आनंदीबाईंनी त्यांना आपल्याकडे येऊन राहाण्याचे आमन्त्रण दिले. हा उल्लेख आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे 'The Life of Anandabaai Joshee, A Kinswoman of the Pundita Ramabai' अशा नावाचे जे चरित्र कॅरोलिन डाल ह्यांनी १८८८ साली लिहिले त्याच्या प्रस्तावनेमध्ये सापडतो. (रमाबाई त्याच दिवसात अमेरिकेतच होत्या हे पुढे येईलच.) ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये रमाबाईंचे पुढील पत्र पूर्ण छापले आहे, ते असे:

संस्कृत आणि त्यातील धार्मिक विषयांचे ज्ञान, आईवडिलांची शिकवण आणि आसपासचे निरीक्षण ह्यांचा परिणाम होऊन स्त्रियांवर आणि विशेषत: विधवांच्यावर त्यांना शिक्षण नसल्यामुळे होणारे अन्याय रमाबाईंच्या मनात खोलवर रुतू लागले होते आणि त्यांविरुद्ध आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले होते. ह्या दृष्टीने सिल्चरमध्येच त्यांनी एक स्त्रियांसाठी शाळाहि पतीच्या सहकार्याने काढली होती. पतिनिधनानंतर तेथील घरातील मागास वातावरणात अडकून राहण्याऐवजी आपले कार्यक्षेत्र म्हणून पुणे निवडावे असे त्यांना वाटले आणि मनोरमेसह त्या पुण्यास निघून आल्या. त्यांनी स्वतन्त्र राहूनच मनोरमेस वाढवावे अशी त्यांच्या दिवंगत पतीचीहि शेवटची इच्छा होती हे वर दाखविलेल्या पत्रात आले आहेच.

पुण्यात पोहोचल्यावर स्त्रीशिक्षणाची कल्पना समाजाच्या गळी उतरविण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून त्यांनी प्रतिष्ठित घरातल्या स्त्रियांपुढे ही कल्पना मांडण्यास प्रारंभ केला आणि १८८२ मध्ये ’आर्य महिला समाजा’ची स्थापना झाली. सुप्रसिद्ध Hunter Commission on Indian Education समोरची १८८३ मधील रमाबाईंची स्त्रीशिक्षणाची आणि स्त्रियांना वैद्यकी शिक्षणहि द्यायची मागणी करणारी साक्ष सुशिक्षितांच्या नजरेत चांगलीच भरली.

सिल्चरमध्येहि एका मिशनरीच्या उपदेशाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला होता. कलकत्त्यात ब्राह्मो समाजी केशबचन्द्र सेन ह्यांनी त्यांना सर्व धर्मांची मूलतत्त्वे दर्शविणारे एक पुस्तक दिले होते. ते वाचून हिंदु धर्माऐवजी ख्रिश्चन धर्माची शिकवण त्यांना आपलीशी वाटू लागली होती. त्याचबरोबर इंग्रजी भाषेच्या ज्ञानाशिवाय आपल्याला कार्य करता येणार नाही असेहि त्यांना दिसू लागले होते. पुण्यातच राहणारे मूळचे चित्पावन पंडित पण ३० वर्षांपूर्वीच ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले नेहेमिया (नीलकंठशास्त्री) गोरे ह्यांचाहि रमाबाईंशी परिचय असलाच पाहिजे. ते आणि पुण्यातील पंचहौद मिशनमधील St Mary the Virgin कम्युनिटीच्या सिस्टर्सच्या मदतीने इंग्रजी आणि वैद्यकी शिकण्याच्या हेतूने त्या इंग्लंडमधील वॉंटेज येथे एप्रिल १८८३ मध्ये मनोरमेसह जाऊन पोहोचल्या. कानातील काही दोषामुळे वैद्यकीसाठी त्यांना प्रवेश मिळू शकला नाही पण एक वर्षभर त्यांनी इंग्रजी भाषेचा चांगला अभ्यास केला. तिथल्या त्यांच्या खर्चापोटी चेल्टनहॅममधील कॉलेजात शिकणार्‍या आणि नंतर हिंदुस्तानकडे येऊ घातलेल्या सिस्टर्सना संस्कृत शिकवण्याचे कामहि त्यांना मिळाले. येथेच त्यांनी गणित, शास्त्रे अशा विषयांचा जरुरीपुरता अभ्यास करून आपल्या शिक्षणातील ती त्रुटि त्यांनी दूर केली. वॉंटेज येथेच त्यांनी मनात बरेच दिवस घोळणारा विचार प्रत्यक्षात आणून सप्टेंबर २९, १८८३ ह्या दिवशी आपली दोन वर्षांची मुलगी मनोरमा हिच्यासह ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. हिंदुस्तान सोडण्यापूर्वी असा आपला काही इरादा नाही असे त्यांनी म्हटले होते पण अखेर ते झालेच. भारतातील त्यांच्या पाठिराख्यांवर ह्या वार्तेचा प्रतिकूल परिणाम साहजिकपणे झाला. त्यांचे नवे ख्रिश्चन सहकारी ह्यामुळे मोठे उल्हसित झाले असेहि नाही कारण धर्म घेतला तरी त्यातील धर्मकांड आणि अधिकारांची उतरंड आपण मानणार नाही असेहि त्यांनी स्पष्ट केले होते कारण ’एक भिक्षुकशाही सोडतांना दुसरीचा स्वीकार करण्याला त्या तयार नव्हत्या.’

ह्याच काळात आनंदीबाई जोशी Women's Medical College, Philadelphia येथे वैद्यकी शिक्षण घेत होत्या. रमाबाई १८८३ मध्ये इंग्लंडला गेल्या त्याच महिन्यात आनंदीबाईहि अमेरिकेतील वैद्यकी शिक्षण घेण्यासाठी कलकत्त्याहून अमेरिकेस निघाल्या होत्या. १८८६ सालापर्यंत त्यांचे हे शिक्षण पूर्ण होत आले होते आणि त्यांच्या पदवी समारंभास उपस्थित राहण्यासाठी त्या कॉलेजच्या डीन डॉ. रेशल बॉडली ह्यांच्या निमन्त्रणावरून फेब्रुवारी १८८६ मध्ये रमाबाईंनी मनोरमेसह अमेरिकेला जाण्यासाठी जहाज पकडले.

ह्या काळातील त्यांचे आणि मनोरमेचे छायाचित्र पुढे दाखवीत आहे. चित्र बहुश: अमेरिकेत काढलेले असावे. तसेच रमाबाईंची स्वहस्ताक्षरातील सहीहि पुढे दाखवीत आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. विशेष आवडला आहे आणि पुढील भागाची वाट पाहतोय, हेवेनसांल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख खूप आवडला. तुमच्या लेखनातील विषयांचे वैविध्य मला नेहमीच चकित करत आलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रमाबाई आणि आनंदीबाईंचं नातं, मैत्री याचे तपशील अजिबातच माहित नव्हते. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एका मित्राच्या अभ्यासासाठी म्हणून एकदा रमाबाई व त्यांच्या विचारांचा शोध घेत होते. 'The High-Caste Hindu Woman' आणि Ramabai The Story of Her Life ही दोन्ही पुस्तके तेव्हा नजरेत आली. बहुधा ब्रिटिश लायब्ररीने ही पुस्तके स्कॅन करून आंतरजालावर मुक्तपणे उपलब्ध करून दिली आहेत.

त्याकाळी स्त्रिया खरेच प्रगल्भ होत्या असं वाटतं, प्रमाण नगण्य असेल परंतु होत्या हे मात्र खरं. अंजली कीर्तने यांचं "आनंदीबाई: काळ आणि कर्तुत्व" हे पुस्तक याबातीत मला आवडले. साधारण संशोधकी बाजाचे असल्याने त्यांनी पुस्तकात आनंदीबाईंच्या आधी कितीतरी जणी फक्त शिकल्या नव्हत्या तर त्यांची विचारांची उत्तम बैठक होती हे अगदी उदाहरणासह लिहिले आहे. मला सहज आठ्वलेलं उदाहरण म्हणजे पुण्याच्या मोटेंची (ते बहुधा सावकार होते) मुलगी अनुदिनी लिहायची. आनंदीबाई पहिल्या शिकलेल्या डॉक्टर तर रखमाबाई वर्दे या पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर. रखमाबाईंनी वयाच्या अकराव्या वर्षी अशिक्षित व व्यसनी नवर्‍याच्या घरी जाण्यास नकार दिला, इतकेच नव्हे तर १८८५ च्या जमान्यात त्यांच्यावरील आरोपांना त्यांनी 'द हिंदू लेडी' नावाने टाईम्स ऑफ इंडियामध्ये इंग्रजीमध्ये पत्रोत्तरे लिहिली होती.

पंडिता रमाबाई यादेखील नि:संशय तल्लख बुद्धीच्या होत्या. माझ्याकडे आत्ता लिखित संदर्भ नाही, परंतु आजही मराठीत वाचली जाणारी 'जुना करार' व 'नवा करार' ही पुस्तके त्यांनी भाषांतरित केली होती व आजही तीच भाषांतरित पुस्तके वापरली जातात असे वाचल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

खुपच माहितीपूर्ण लेख.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0