पंडिता रमाबाई आणि अमेरिकन रमाबाई असोसिएशन भाग २.

रमाबाई अमेरिकेत प्रथम फेब्रुवारी १८८६ साली आल्या तेव्हा त्यांचा विचार तेथे काही महिने राहण्याचा होता पण प्रत्यक्षात तो मुक्काम नोवेंबर १८८८ पर्यंत वाढला. (ह्या काळात मनोरमेला शिक्षणासाठी त्यांनी ब्रिटनमध्ये वॉंटेजमधील सिस्टर्सकडे पाठवून दिले.) ब्रिटनपेक्षा अधिक मोकळे आणि आपल्या विचारांशी जुळते असे वातावरण अमेरिकेत आहे अशी त्यांची धारणा झाली. सिविल वॉर नुकतेच संपलेले होते आणि कृष्णवर्णी जनता कायद्याने गुलामगिरीच्या जोखडामधून मोकळी झालेली होती. विशेषत: अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये कृष्णवर्णीय जनतेला समान हक्क मिळवून देणे - (abolitionist), स्त्रियांना समाजात पुरुषांबरोबरीचे स्थान देणे - (suffragettes), मद्यप्राशनविरोध - (temperance) अशा विचारांना बरीच सहानुभूति ख्रिश्चन विचाराच्या सुशिक्षितांमध्ये होती. अशा गटांमधून आपल्या इच्छित कार्याला चांगले पाठबळ मिळेल अशा विचाराने अमेरिकेतच अजून काही काळ राहण्याचे त्यांनी ठरविले. समविचारी स्त्रीपुरुषांच्या गटांपुढे हिंदुस्तानातील विधवांचा प्रश्न मांडून त्यांच्याकडून साहाय्य मिळविण्याच्या हेतूने त्यांनी गावोगावी दौरे काढून असे साहाय्य करू इच्छिणार्‍या लोकांचे गट - Ramabai circles - त्यांनी निर्माण केली. त्याच काळात A High-Caste Hindu Woman हे पुस्तक लिहून शिक्षणाचा अभाव, बालपणात लग्न, स्त्रियांचे आणि विशेषत: विधवांचे परावलंबी आणि निराश जिणे ह्या समस्या हिंदु समाजाला कशा विळखा घालून बसल्या आहेत ह्याचे विदारक चित्रण अमेरिकन समाजापुढे मांडले.

ह्या पुस्तकाला डॉ. रेशल बॉडली ह्यांनी २४-पानी दीर्घ प्रस्तावना लिहून रमाबाईंचे तोवरचे आयुष्य आणि विचार ह्याचा परिचय अमेरिकन वाचकाला करून दिला. आनंदीबाई ज्या Women's Medical College मध्ये शिकण्यासाठी दाखल झाल्या होत्या त्या कॉलेजच्या ह्या प्रमुख होत्या. फिलाडेल्फियामध्ये स्वतन्त्रपणे राहणे आनंदीबाईंना झेपत नाही हे लक्षाता आल्यावर त्यांनी आनंदीबाईंना आपल्याच घरात ठेऊन घेतले आणि त्यांनी कॉलेजचे सर्व शिक्षण रेशलबाईंच्या घरात राहूनच पूर्ण केले. आनंदीबाईंच्या पदवी समारंभाला - ११ मार्च १८८६ - येण्यासाठी रमाबाईंना निमन्त्रणहि रेशलबाईनीच दिले होते. प्रस्तावना लिहितेवेळी आनंदीबाईंच्या निधनाची वार्ता अमेरिकेत पोहोचली होती म्हणून त्यांचे छायाचित्र आणि आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतला गेला.


रमाबाईंची हंटर कमिशनपुढची पूर्ण साक्ष ह्या प्रस्तावनेमध्ये आहे ती अशी:

ह्याचे फलित म्हणून मे २८, १८८७ ह्या दिवशी बॉस्टनमध्ये एक प्राथमिक सभा होऊन एक तात्पुरती समिति नेमण्यात आली. तिने दिलेल्या अहवालानुसार १८८७ च्या अखेरीस Ramabai Association नावाची संघटना अस्तित्वात आली. रमाबाईंच्या कार्याला दहा वर्षे अमेरिकेतून आर्थिक साहाय्य देणे असे ह्या संस्थेचे उद्दिष्ट होते. ह्या संघटनेनेच रमाबाईंच्या पुस्तकाच्या सात हजार प्रती विकून झाल्यावर दुसरी आवृत्ति १९०१ साली छापली. तिच्या प्रस्तावनेत पुढील उल्लेखावरून रमाबाईंनी हिंदुस्तानात परतेपर्यंत काय केले ह्याची कल्पना येते.

"After the formation of the Association Ramabai considered herself its servant. From May, 1887, to November, 1888, this dauntless little woman of thirty, in the midst of a strange people, strange customs and manners, eating neither "fish, flesh nor fowl," drinking nothing stronger than water and milk, often cold and hungry, showed a degree of mental and physical endurance that was marvellous even in the eyes of an American.

Protected from insult by her pure womanliness and strong personality, she traveled from Canada to the Pacific Coast, lecturing, forming Circles, studying educational, philanthropic and charitable institutions, omitting nothing that might prove helpful to her people. Reaching the Pacific Coast, her impassioned appeals enlisted the sympathy of ministers of all creeds Protestant, Catholic and Hebrew of earnest women and business men, and an auxiliary Association was there formed that sent to the treasury the first year $5,000. In November, 1888, with an assured annual income sufficient for the support of a secular school of fifty pupils for ten years, Ramabai bade good-by to a land that had grown very dear to her and turned her face homewards, bright with hope, and with a brave heart, though she knew not how her countrymen would receive her.

February 1st, 1889, she again stood on the shores of her native land after an absence of nearly six years..."

रमाबाई स्वत: ख्रिश्चन धर्माकडे ओढल्या गेल्या होत्या आणि त्यांचे अमेरिकन समर्थक ख्रिश्चन शिकवणुकीतूनच त्यांच्यामागे उभे राहिलेले होते. तरीहि आपली संस्था ही तिच्या आश्रयाला आलेल्या स्त्रियांना ख्रिश्चन धर्मात ओढण्यासाठी निर्माण झालेली नाही आणि ते तिचे उद्दिष्टहि नाही हे रमाबाईंनी अमेरिकेत स्पष्ट केले होते. मिशनरी शाळा असे कार्य करत होत्या पण धर्मबदल घडवून आणणे ह्या त्यांच्या उघड भूमिकेमुळे हिंदु समाजाची सहानुभूति अशा मिशनरी प्रयत्नांना मिळत नाही हे रमाबाईंना माहीत होते. अनाथ स्त्रियांना मदत करणे ह्या मूळ उद्दिष्टाला त्यामुळे बाधा निर्माण झाली असती म्हणून आपल्या शाळेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही आणि प्रत्येक विद्यार्थिनीस वैयक्तिक पातळीवर आपापला धर्म आचरणात आणता येईल असे धोरण त्यांनी ठेवले होते. शाळा आणि वसतिगृहात वेष, अन्न आणि राहण्याची पद्धति पूर्ण हिंदु असेल असेहि ठरले होते. रमाबाई स्वत: आजन्म शाकाहारीच होत्या आणि पांढरी साडी हा एकच वेष त्या वापरीत असत.

२८ ऑक्टोबर १८८८ ह्या दिवशी सॅन्फ्रान्सिस्को येथून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. पॅसिफिक महासागराच्या वादळी वातावरणामुळे त्यांची प्रकृति बिघडून त्यांना जपानमध्ये १५ दिवस विश्रान्ति घ्यावी लागली. तेथून हॉंगकॉंग-सिलोन मार्गाने जानेवारी १८८९ च्या अखेरीस त्या मुंबईला पोहोचल्या. ह्या सर्व ठिकाणी स्थानिक लोकांपुढे त्यांची भाषणे झाली. तेथून त्या पुण्याला गेल्या. तेथे त्यांना असा सल्ला मिळाला की त्यांची शाळा काढण्यास अधिक योग्य वातावरण मुंबईमध्ये मिळेल. तदनुसार लगेचच चौपाटीवरील विल्सन कॉलेजमागे एक जागा मिळवून रमाबाईंनी हिंदु उच्चवर्णीय स्त्रियांसाठी ’शारदा सदन’ ही संस्था ११ मार्च १८८९ ह्या दिवशी सुरू केली. तत्कालीन प्रथेप्रमाणे कोणी उच्चपदस्थ अधिकारी वा त्याच्या पत्नीकडून नव्या संस्थेचे उद्घाटन न करवता हा मान त्यांनी काशीताई कानिटकर ह्यांना दिला. संस्थेमध्ये राहणार्‍या निराधार वा अल्पाधार विधवा वा स्त्रिया/मुली, तसेच बाहेर राहून शिकण्यासाठी येणार्‍या स्त्रिया/मुली अशा दोन्ही प्रकाराने स्त्रीशिक्षणाचे हे कार्य सुरू झाले. संस्थेमध्ये पहिल्या दिवशी दोन विद्यार्थिनी होत्या - समाजसुधारणेला पाठिंबा असणारे प्रार्थनासमाजी गंगाधरपंत (दादा) गद्रे ह्यांची मुलगी शारदा ही बाहेरून येणारी आणि बालविधवा गोदूताई जोशी वसतिगृहामध्ये. शारदेच्या नावावरूनच संस्थेचे नाव शारदासदन असे ठेवण्यात आले. रमाबाई असोसिएशनला जानेवारी ३०, १८९१ ह्या दिवशी रमाबाईंनी कामाचा जो आढावा पाठविला होता त्यामध्ये विद्यार्थिनींची नावासकट यादी दिली आहे. हा आढावा रमाबाई असोसिएशनच्या मार्च ११, १८९१ ह्या दिवशी झालेल्या वार्षिक सभेपुढे ठेवण्यासाठी केला होता. आढाव्यानुसार संस्थेमध्ये २६ विधवा, एक सोडून सर्व सदनात राहणार्‍या आणि १३ परित्यक्ता वा अविवाहित, चार सोडून बाकी सर्व सदनात राहणार्‍या, अशा विद्यार्थिनी होत्या. गोदूबाई आणि शारदा ह्या दोघींच्या नावापुढे संस्थेत दाखल होण्याची तारीख ११ मार्च १८८९ अशी दर्शविली आहे आणि गोदूबाईंच्या नावापुढे ’Well taken care of, but unhappy, leading an aimless life' अशी नोंदहि ’Remarks' ह्या कॉलममध्ये केली आहे. (१८९१ मध्ये अण्णासाहेब कर्वे ह्यांच्याशी गोदूबाईंचा पुनर्विवाह झाला आणि नंतरच्या काळात आनंदीबाई अथवा बाया ह्या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. दादा गद्रे जरी प्रार्थनासमाजी होते तरी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास त्यांचा प्रारंभी विरोध होता. रमाबाईंची नवी शाळा स्त्रीशिक्षणाच्या निखळ हेतूने प्रस्थापित झाली आहे, तिचा हेतु मुलींना ख्रिश्चन करणे हा नाही ह्या रमाबाईंच्या प्रथमपासूनच्या भूमिकेमुळे आपल्या मुलीस त्यांनी ह्या शाळेत घातले होते. ह्या आश्वासनामध्ये अंतराय पडत आहे असे जेव्हा त्यांना नंतर वाटू लागले तेव्हा त्यांनी मुलीला शाळेतून काढून घेतले. दादा गद्रे प्रथमपासून रमाबाईंबरोबर शाळेच्या सेक्रेटरीसारखे काम त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत - १९१० पर्यंत - करीत राहिले. कालान्तराने ते स्वत:च ख्रिश्चन झाले आणि ’देवदास’ अशा नावाने ओळखू जाऊ लागले. त्यांची दुसरी मुलगी कृष्णा हीहि नंतर रमाबाईंच्या संस्थेत शिक्षण घेऊन संस्थेची निष्ठावन्त कार्यकर्ती आणि मनोरमेची जिवलग मैत्रीण बनली.)

१८९१ ते १८९८ ह्या सालांमधील Ramabai Association च्या उपलब्ध अहवालांमधून सापडणार्‍या तपशिलांवर थोडी नजर टाकू. प्रत्येक अहवालामध्ये रमाबाईंनी स्वत: लिहिलेला त्या त्या वर्षाचा कामाचा आढावा दिसतो.

मार्च ११, १८९१ च्या वार्षिक सभेच्या वृत्तान्तात शारदासदनाच्या हिंदुस्तानातील सल्लागारांच्या नावांचा उल्लेख आहे. मुंबईमध्ये सल्लागार मंडळात डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड, वामन आबाजी मोडक, न्या. काशिनाथ त्रिंबक तेलंग, नारायण गणेश चंदावरकर, डॉ सदाशिव वामन काणे, रामचन्द्र विष्णु माडगावकर, सदाशिव पांडुरंग केळकर, पंडिता रमाबाई डी. मेधावी असे सदस्य आहेत. पुण्याच्या सल्लागार मंडळात डॉ रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहादुर एम् रानडे आणि रावसाहेब देशमुख अशी नावे आहेत. (रानडे म्हणजे महादेव गोविंद आणि देशमुख म्हणजे लोकहितवादी हे आपणास दिसते.) अमेरिकेतील कार्यकारी समितीतील सेरा हॅम्लिन ह्या रमाबाईंना मदत करण्यासाठी हिंदुस्तानातच उपस्थित होत्या. अखेरीस प्रिन्सिपॉल म्हणून पंडिता रमाबाई डोंगरे मेधावी असा उल्लेख आहे.

१८९१ च्या अहवालात रमाबाईंच्या वैयक्तिक जीवनाची थोडी माहिती दिसते. १८९० च्या उन्हाळ्याच्या सुटीत रमाबाई एका आठवडयासाठी मंगलोर-उडिपी भागातील आपल्या नातेवाईकांना भेटण्यास गेल्या होत्या. तुंगा, भद्रा अशा नद्यांचा उगम जेथे होतो त्या गंगामूल अरण्यातील आपल्या वडिलांच्या आता पडझडीला आलेल्या आश्रमाला भेट दिल्यानंतर त्या आपल्या सावत्र भावाकडे मंगलोरला गेल्या. त्यांच्या कार्यामुळे त्यांचे गावात उत्तम स्वागत झाले पण भावाच्या घरात त्यांना अस्पृश्याचीच वागणूक मिळाली. सोंडे मठाच्या स्वामींनीहि त्यांना भेट देऊन चर्चा केली. ह्या भेटीनंतर काही महिन्यातच सावत्र भाऊ वारला आणि रमाबाईंनी पुन: मंगलोरला जाऊन भावाच्या इस्टेटीची व्यवस्था लावून विधवा भावजयीस बरोबर आणून संस्थेतच कामाला लावले. ’मामी’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या ह्या बाई नंतर अनेक वर्षे रमाबाईंबरोबर होत्या. पुढील चित्र त्यांचेच आहे.

मुंबईपेक्षा पुण्यात कार्य अधिक जोराने करता येईल असे ठरवून १ नोवेंबर १८९० ह्या दिवशी शारदा सदनाचा मुंबईतील दरवाजा बंद होऊन सदन पुण्यास हलले.

बंद होण्यापूर्वीचा मुंबईतील शारदा सदनातील विद्यार्थिनींचे रमाबाईंच्या बरोबरचे एक छायाचित्र पुढे दाखवीत आहे. मधल्या स्थानावर रमाबाई आणि छोटी मनोरमा आहे असा सहज तर्क करता येतो. अन्य कोणाचेच नाव उपलब्ध नाही पण रमाबाईंच्या डाव्या बाजूला बसलेल्या एक गोर्‍या बाई म्हणजे मुंबईतील प्रतिष्ठित घरातील रमाबाईंच्या कोणी चाहत्या बाई असाव्यात. त्या काशीताई कानिटकरहि असू शकतील. त्या शेवंताबाई निकंबेहि असू शकतील. शेवंताबाई ह्या रमाबाईंबरोबरच मुंबईत शारदा सदनात काम करीत असत. सदन पुण्यास हलल्यामुळे त्यांचे सहकार्य आता मिळू शकणार नाही असा खेदपूर्वक उल्लेख रमाबाईंच्या अहवालात आहे. (शेवंताबाईंची फार थोडी माहिती उपलब्ध आहे. मुंबईतील ख्रिश्चन वर्तुळात त्या होत्या आणि १९०० सालापूर्वी आणि नंतरहि त्यांनी इंग्लंड-अमेरिकेचे प्रवास केले होते. त्यांची ’रतनबाई’ ह्या शीर्षकाची एक हिंदु स्त्रीजीवनावरची कादंबरी इंग्लंडमध्ये १८९५ साली प्रकाशित झाली. साहित्य अकादमीने तिचे पुनर्मुद्रण केले आहे. त्याचा काही भाग आणि शेवंताबाईंच्याबद्दल अगदी त्रोटक माहिती येथे पहावयास मिळेल.) रमाबाईंच्या उजव्या बाजूस टोकाला लाल अलवणातील दोन विधवांपैकी एक गोदूबाई - बाया कर्वे - असू शकतील.

सदन पुण्यास हलल्यानंतर त्याचे वर्णन मिस् हॅम्लिनच्या शब्दात पहा:





संस्था पुणे रेल्वे स्टेशनजवळ होती असे वर म्हटलेच आहे. मी अन्यत्र वाचल्याप्रमाणे संस्थेची जागा आगाखान इस्टेटीकडून खरीदण्यात आली होती. माझ्या वैयक्तिक आठवणीनुसार पुण्याच्या मुख्य आयकर कार्यालयासमोर ही आगाखान इस्टेट होती आणि तेथे कांपाउंडच्या आत दोनचार लहानमोठया ब्रिटिशकालीन इमारती होत्या. ह्यावरून असे वाटते की त्या स्थानीच शारदा सदन असावे. काही वर्षानंतर हीहि जागा विकून शारदा सदन कायमचे केडगावला हलले. ह्या शारदा सदनाचे एक चित्र आणि रमाबाईंचे विद्याथिनींबरोबरचे तेथील चित्र खाली दाखवीत आहे.


Ramabai Association च्या १८९२ च्या अहवालामध्ये पुण्याच्या ह्या जागेच्या खरेदीसंबंधीची बरीच माहिती उपलब्ध आहे. जागा ३०,००० रुपयांना घ्यावी असा हिंदुस्तानातील सल्लगारांचा सल्ला होता. विक्री करणारा माथेरानात होता. रमाबाई रातोरात तेथे गेल्या आणि त्याच्याशी बोलून किंमत २७,००० - ९,००० डॉलर्स - वर आणण्यात त्या यशस्वी झाल्या. ह्यावर सुमारे ७००० डॉलर्स खर्च करून इमारतीची डागडुजी, इमारतीभोवती भिंत उभारणे अशी कामे केली गेली. सर्व मालमत्ता अमेरिकेतील असोसिएशनच्या नावाने घेण्यात आली.

१८९१ च्या अहवालामध्ये शारदा सदनाच्या काही विद्यार्थिनींची इंग्रजी अथवा मराठी (भाषान्तरित) पत्रे छापण्यात आली आहेत. त्यामध्ये एक गोदूबाई - बाया कर्वे ह्यांचे मराठीत तर दुसरे काशीबाई देवधर - नंतरच्या काळातील हिंगणे संस्थेच्या एक प्रमुख सेविका ह्यांचे आहे. तेरा वर्षाच्या काशीबाईंचे इंग्रजीचे शिक्षण नुकतेच सुरू झाले होते हे त्यांच्या ह्या पत्रावरून दिसेल.

असोसिएशनच्या १८९६ सालच्या अहवालात नेहमीच्या प्रघातानुसार रमाबाईंचे वार्षिक निवेदन छापण्यात आले आहे. त्यातील एक मुद्दा लक्षणीय वाटतो. शिकागोच्या प्रसिद्ध भाषणानंतर १८९३ ते १८९५ ह्या काळात स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत अनेक ठिकाणी भाषणे करून हिंदु तत्त्वज्ञानाचा परिचय जगाला करून देण्याचे कार्य सुरू केले होते. बेझंटबाईहि थिऑसफीच्या मार्गाने तेच कार्य करीत होत्या. रमाबाईंची अशी धारणा होती की तत्त्वज्ञान काहीहि सांगो, ते आचरणात येत नसल्याने हिंदु समाज आतून किडल्यासारखा होता. विवेकानंदांसारख्यांच्या भाषणांनी भुलून हिंदु तत्त्वज्ञानाची नव्याने माहिती झालेला आणि वरकरणी देखाव्याने भुललेला अमेरिकन समाज सत्यापासून दूर जात आहे असे रमाबाईंना वाटत होते. ह्याविरुद्ध इशारा देणारी काही वाक्ये १८८६च्या अहवालात आहेत. त्यांनी कोणाचेहि नाव घेतलेले नाही पण पुढील विधान विवेकानंद, बेझंटबाई आणि अन्य हिंदुधर्मसमर्थकांविरुद्ध आहे हे उघड आहे.

असाच वाद अमेरिकेमध्ये रमाबाईंचे समर्थक आणि विवेकानंदांचे समर्थक ह्यांच्यामध्येहि चालू होता ह्याची थोडी झलक ह्या पुस्तकाच्या पृष्ठ २०२ वर दिसते.

सदन पुण्याला हलल्यावर थोडयाच दिवसात सदनातील धर्मान्तरावरून एक मोठेच वादळ उठले. रमाबाई वरकरणी काहीहि म्हणत असल्या तरी त्यांचा हेतु धर्मान्तराचाच आहे अशी शंका खूप जणांना होतीच. रमाबाईंच्या बरोबर सदनात काम करणार्‍या सुंदराबाई पवार - ह्यांना ’अक्का’ म्हणत असत - ह्या धर्मान्तरित बाई उघडपणे धर्मान्तराच्या समर्थक होत्या. (ह्यांच्या अफूविरोधातील कार्याविषयी आणि त्या संदर्भातील इंग्लंडच्या दौर्‍यांविषयी, तसेच पुण्यातील झनाना ट्रेनिंग स्कूलविषयी अधिक माहिती येथे मिळू शकेल.)

रमाबाई आणि त्यांचे अमेरिकन साहाय्यक ह्या दोघांचीहि अधिकृत भूमिका अशी होती की शारदा सदनामध्ये धर्मान्तरणाचे कार्य केले जाणार नाही. तरीहि रमाबाईंचे असेहि म्हणणे होते की त्यांचे वैयक्तिक उदाहरण पाहून कोणा विद्यार्थिनीस ख्रिश्चन व्हावेसे वाटले तर त्या विरोधहि करणार नाहीत. शारदा सदन हे रमाबाईंचे राहते घरहि होते. सदनातील काही विद्यार्थिनींची सदनाची फी त्या स्वत:च्या वेतनातून भरत असत. रोज पहाटे ५ ते ६ ह्या वेळात रमाबाईंची वैयक्तिक उपासना, बायबल पठन चालत असे. त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या काही मुलींचे मन साहजिकच आपण रमाबाईंसारखेच ख्रिश्चन व्हावे अशासाठी उद्युक्त झाले आणि ही बातमी बाहेर पडल्यावर सनातनी पुण्यांमध्ये त्याची मोठी चर्चा सुरू झाली. मध्यंतरात रमाबाईंची आतेबहीण कृष्णाबाई ही सदनात कोठीवर काम करत असे तिने काही धुसफुशीवरून सदन सोडले आणि ’केसरी’कडे आपले समर्थन मांडणारे पत्र पाठवले. ’सदनावरील बाई आणि कोठीवरील बाई’ अशा शीर्षकाने ते ’केसरी’ने छापले. पत्रात रमाबाईंवर हिंदु धर्माविरुद्ध पक्षपात करण्याचा आरोप केला होता. उभयपक्षी बरीच वादावादी झाल्यानंतर आणि रानडे, भांडारकर इत्यादींच्या सुधारकी मार्गाच्या सल्लागार मंडळाला बरीच दूषणे मिळाल्यानंतर मंडळाने ऑगस्ट १८९३ मध्ये राजीनामा देऊन सदनाच्या कामातून आपले अंग काढून घेतले.

ह्या सर्व प्रकरणात सुधारणागटाचे वासुदेवराव केळकर हे ’केसरी’चे संपादक होते तोवर ’केसरी’ची भूमिका दोन्ही बाजू समजावून घ्यायची होती. १८९२-९३च्या काळात वासुदेवरावांच्या जागी टिळक ’केसरी’चे संपादक झाले आणि ’केसरी’ अधिक आक्रमक बनला. ह्या सर्व प्रकरणाचा दोन्ही बाजूने घेतलेला आढावा न.चिं.केळकरलिखित ’लोकमान्य टिळक ह्यांचे चरित्र - खंड १’ येथे पृष्ठ ३१३ पासून वाचावयास मिळतो. त्यातील समारोपाचा भाग पुढे दाखवीत आहे.



field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

वा! लेख चांगलाच जमला आहे.
विशेषतः शेवटचे काही परिच्छेद तर बरीच अधिकची माहिती देतात.

रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई यांच्यात मैत्री होती असे चालु असलेल्या सिरीयलवरून कळते. अर्थातच न्या. रानडे पंडिता रमाबाईंच्या बाजूने असणार. तेव्हा त्यांच्यावर टिका झाली म्हणून ते राजीनामा देऊन बाजूला झाले हा तपशील बरीच माहिती देऊन जातो.

बहुदा अश्याच छोट्या छोट्या माघारीमूळे 'जहाल' म्हणवत काहिश्या उजव्या मनोवृत्तीच्या नेत्तृत्त्वाला संधी मिळत गेली असावी. पुढे मुसलमानांच्या मोहर्रमच्या ताबुताच्या मिरवणूकांकडे आणि त्याला मिळणार्‍या जन-प्रतिसादाकडे बघून टिळकादी प्रभृतींनी 'सार्वजनिक उत्सव' सुरू केले आणि समाजकारणाला धार्मिक जोड देऊन जहालवाद्यांकडे सुत्रे पूर्णपणे हल(व)ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान! दोन्ही लेख आवडले _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद दुसरा भाग टाकल्या बद्दल. छान माहिती. टिळक आणि रमाबाईंमधले शितयुद्ध हे नवीनच. त्या शेवटच्या परिच्छेदात बाकी कितीही खुलासा असला तरीही टिळकांचे रमाबाईंबद्दलचे जे काही मत होते ते केवळ त्या स्त्री होत्या म्हणूनच असावे का असा प्रश्न जरुर पडतो. शिवाय त्या लेखात म्हटल्याप्रमाणे 'सुशिक्षित "स्त्रियांचा" विनय सुटला किंवा त्याचे बोलणे चालणे अथवा त्यांचा बोलबाला प्रमाणाबाहेर जातोसा दिसला की त्यांस खपत नसे' हे वाचून (विशेषतः ठळक केलेले वाक्य) प्रामाणिकपणे टिळकांची ही मतं किंवा विचार आवडले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिळकांचा सनातनीपणा जगजाहीरच आहे आणि तो काही बाबतींत आक्षेपार्ह वाटण्याइतपत होता हेही खरेच आहे. परंतु तो लिंगनिरपेक्ष असावा असे वाटते. प्रस्तुत लेखात टिळकांचे स्त्रियांबद्दलचे मत दिलेय त्यावरून पुरुषांबद्दल त्यांचे मत लिबरल होते असे म्हणता येईल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परंतु तो लिंगनिरपेक्ष असावा असे वाटते. >>
पुरुषांबद्दल त्यांचे मत लिबरल होते असे म्हणता येईल असे वाटत नाही. >>

हे वाचून बरे वाटले आणि तीच वस्तुस्थिती असल्यास उत्तमच. धन्यावाद बॅटमॅन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग खूपच माहितीसंपृक्त झाला आहे. रमाबाई अन टिळक यांमध्ये झालेल्या संघर्षाबद्दल अजून वाचायला आवडेल. कदाचित संस्थेद्वारा धर्मांतराच्या भीतीमुळे टिळक जास्त बिथरले असावेत. पण एनीवेज़, झाले ते वाईटच झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा ही भाग आवडला. बरीच नवीन माहिती समजली.

पंडिता रमाबाईंचा हेतू धर्मांतराचा असेल किंवा त्या धर्मांतर करवून घेतील अशी 'भीती' तत्कालिन हिंदूंना वाटणं रास्त वाटतं. या प्रकारच्या अनुभवांमुळेही महर्षी कर्वेंनी त्यांच्या आश्रमात कट्टरपणा दाखवला असेल का? त्यांच्या आश्रमात विठ्ठल रामजी शिंदेंच्या नात्यातल्या दोन स्त्रियांना घ्यावं असा शिंदेचा आग्रह होता. पण या दोघी ब्राह्मण नसल्यामुळे कर्वेंनी याला नकार दिला; कर्वेंचा आश्रम बहुतांशी ब्राह्मणांच्या देणग्यांवर अवलंबून होता.

अलिकडच्या काळात मंगला आठलेकर यांनी लिहीलेल्या 'महापुरुषांच्या नजरेतून स्त्री' या पुस्तकात विवेकानंदांचाही महापुरुषांच्या यादीत समावेश आहे. विवेकानंदांचं स्त्रीशिक्षणासंबंधातलं मत बुरसटलेलं म्हणावं असं होतं. त्यांच्या मते स्त्रियांना माफक अक्षरओळख, आणि त्यापुढे घरकाम, बालसंगोपनासाठी योग्य शिक्षण द्यावं. विद्यापीठीय शिक्षणाची स्त्रियांना आवश्यकता नाही.
पंडिता रमाबाईंचं शिक्षण संपूर्णतः स्वकष्टार्जित आणि विद्यापीठीय प्रकारचं होतं; संस्कृत, वेद वगैरे. त्या काळात संपर्काची साधनं कमी असल्यामुळे रमाबाईंना एवढे तपशील माहित असतीलच असं नाही. पण या मतभेदाला असाही काही संदर्भ आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिंदु धर्माच्या सुधारणेच्या संदर्भात प्रश्नाचे दोन निरनिराळे प्रकार समोर येतात. एकतर जातिव्यवस्थेमुळे होणारे अन्याय. दुसरा प्रकार म्हणजे स्त्रियांवर होणारे अन्याय. प्रारंभीच्या दिवसात तरी रमाबाईंनी आपल्यापुरते आपले क्षेत्र दुसर्‍या प्रश्नाशी मर्यादित ठेवले होते. त्यातहि अधिक लक्ष विधवांच्या प्रश्नावर केंद्रित होते. त्यामध्येहि सुरुवातीच्या काळात तरी त्यांनी 'वरच्या जातीतील विधवा' ह्यांना अधिक केन्द्रस्थानी ठेवले होते. महर्षि कर्वे ह्यांचाहि असाच विचार असावा असे वाटते. विधवांना साहाय्य आणि जातिव्यवस्था मोडणे हे दोन्ही प्रश्न एकदम अंगावर घेणे was not good strategy असे त्यांना वाटले असावे.

ह्याची दोन कारणे असावीत. पहिले म्हणजे जातीपातीपलीकडे जाऊन एकदम सर्व स्त्रियांच्या प्रश्नाला भिडायचे म्हणजे सामाजिक विरोध अधिकच होणार. गांजलेली विधवा उच्च जातीतील असेल तर खालच्या जातीतील विधवेकडे ती सहानुभूतीनेच आणि भगिनीभावानेच पाहील असे नव्हते. ती गांजलेली असली तरी आपल्या उच्च जातीची नैसर्गिक जाणीव आणि संस्कार तिच्यावर होतेच. तेव्हा strategy म्हणून उच्च जातीच्या विधवा हाच आपला रोख त्यांनी बुद्ध्याच ठेवला असेल. अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रियांना बळेच एकत्र आणल्यास ज्यांना मदत करायची त्यांचाच विरोध ओढवून घ्यायचा असे होऊ शकले असते. ह्याशिवाय, उच्च जातीच्या विधवेचे परावलंबित्व हे खालच्या जातीतील विधवेच्या परावलंबित्वाहून अधिक खडतर आहे असे त्यांचे नोंदवलेले मत होते. (खालच्या जातीतील विधवा काही शरीरश्रमाचे तरी काम मिळवून आर्थिक स्वायत्तता मिळवते पण उच्च जातीतील विधवेला हा शरीरश्रमाचा - शेतीवर मजुरी, भांडी घासणे - मार्ग बंद होता. नातेवाईकांच्या घरात मोफतची स्वैपाकीण ह्याशिवाय त्यांना काहीहि मार्ग नव्हता.)

अमेरिकेत रमाबाईंनी हा प्रश्न ज्या पुस्तकाद्वारे तेथील श्रोत्यांपुढे मांडला त्याचे नावहि The High-caste Hindu Woman असे होते. शारदा सदन सुरू करतांना सदनांतील विद्यार्थिनींना आपापले आचारविचार चालू ठेवण्याची मुभा दिलेली होती ती ह्याच कारणाने.

(नंतरच्या काळात रमाबाईंचे हे धोरण मागे पडल्यासारखे वाटते. सदन केडगावला हलले आणि जवळजवळ ख्रिस्ती केन्द्रच बनले. उच्च जातीवरचा पहिल्या दिवसांतील भर नंतर उरला नाही असे दिसते.)

<पंडिता रमाबाईंचं शिक्षण संपूर्णतः स्वकष्टार्जित आणि विद्यापीठीय प्रकारचं होतं; संस्कृत, वेद वगैरे.> हेहि तितकेसे सत्य नाही. मला वाटते त्यांचे शिक्षण अधिक पुराणिकी अंगाचे असावे कारण त्यांचे वडील पुराणिकाचाच व्यवसाय करीत असत. पुरणिकांना कामापुरते संस्कृत येते, रामायण, महाभारत, पुराणे इत्यादि ते स्वतः वाचून समजू शकतात येथपर्यंत ठीक आहे. पण त्यापुढे जाऊन वेदाध्ययन, षट्शास्त्रे अशा प्रकारचा काही अभ्यास त्यांनी केला असल्यासारखे वाटत नाही. त्या बुद्धिमान आणि भाषणचतुर होत्याच. वडिलांच्या कडून मिळालेले पुराणिकी ज्ञान, धिटाई, भाषणचातुर्य, तरुण वय, सौंदर्य ह्या सर्वांचा एकत्रित परिणांम कलकत्त्यातील पंडितांच्यावर पडून त्यांना थोडया कौतुकानेच 'पंडिता', 'सरस्वती' अशा उपाध्या मिळाल्या असाव्यात असे मला वाटते. त्यांच्या नंतरच्याहि कोठल्याच लिखाणात संस्कृत विद्येचे खास प्रतिबिंब दिसत नाही. (The High-caste Hindu Woman मध्ये अनेक संस्कृत संदर्भ आहेत. ते जवळजवळ सर्वच केवळ मनुस्मृतीतील आहेत. मनुस्मृति समजायला वेदान्तवागीश, तर्कचूडामणि, न्यायरत्न वगैरे असण्याची आवश्यकता नसते.) रमाबाईंच्या संस्कृतच्या पांडित्याचे हेच मूल्यमापन केळकरांनी आपल्या टिळकचरित्र खंड १ येथे पृष्ठ ३१७ येथे केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याशिवाय, उच्च जातीच्या विधवेचे परावलंबित्व हे खालच्या जातीतील विधवेच्या परावलंबित्वाहून अधिक खडतर आहे असे त्यांचे नोंदवलेले मत होते. (खालच्या जातीतील विधवा काही शरीरश्रमाचे तरी काम मिळवून आर्थिक स्वायत्तता मिळवते पण उच्च जातीतील विधवेला हा शरीरश्रमाचा - शेतीवर मजुरी, भांडी घासणे - मार्ग बंद होता. नातेवाईकांच्या घरात मोफतची स्वैपाकीण ह्याशिवाय त्यांना काहीहि मार्ग नव्हता.)

हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हायलाईट केल्याबद्दल धन्यवाद!

(नंतरच्या काळात रमाबाईंचे हे धोरण मागे पडल्यासारखे वाटते. सदन केडगावला हलले आणि जवळजवळ ख्रिस्ती केन्द्रच बनले. उच्च जातीवरचा पहिल्या दिवसांतील भर नंतर उरला नाही असे दिसते.)

मग टिळकांच्या विरोधाचे कारण काय? तेव्हाही धर्मप्रसार चालू होता तिथे की कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं