ऊर्जेची गणिते ४: धोक्याची घंटा - २

कधी ढगफुटी होते. नदीला पूर येतो. पाण्याचा महाप्रचंड लोंढा घोंघावतो. आणि आपल्या वाटेत येणाऱ्या हजारो लोकांना वाहवून नेतो. काही काळ प्रलय होतो, आणि नंतर पुन्हा पूर्ववत प्रवाह सुरू होतो. पाण्याचे लोंढे डोळ्याला दिसतात. त्यांचा आवेग जाणवतो. रौद्र रूपाची भीती वाटते. ढगफुटी - पाण्याचा प्रवाह - गेलेले जीव ही साखळी स्वच्छपणे मांडता येते. तीवर कोणी शंका घेऊ शकत नाही. कधी कधी मात्र विचारांची ढगफुटी होताना दिसते. आणि त्यांच्या प्रवाहात लाखो जीव वाहून जातात. अठराव्या शतकाच्या अंतकाळात जी विचारधारा उगवली तिने असेच अनेक बळी घेतले. आता तो प्रवाह पुन्हा पूर्ववत झालेला आहे. पण विचारविश्वात त्या प्रलयाच्या खुणा अजून दिसतात.

हा विचार होता लोकसंख्या नियंत्रणाचा. शतकानुशतकं अनेकांनी याविषयी विचार मांडलेले आहेत, होते. पण या सर्वांमध्ये उठून दिसणारं नाव म्हणजे माल्थसचं. लोकसंख्या मर्यादित ठेवण्याच्या प्रश्नाला त्याने जो आकार दिला, जी गती दिली, जो प्रभाव पाडला ते त्याच्या आधी इतर कोणाला जमलेलं नव्हतं. त्याच्यानंतर पॉप्युलेशन बॉंब लिहिणाऱ्या पॉल एरलिकचंच नाव घेता येतं.

माल्थसच्या विचारांबाबत बरंच लिहिलं गेलेलं आहे. लोकसंख्यावाढीबद्दलची त्याची मूलभूत निरीक्षणं अचूक होती. 'अन्नपुरवठा मर्यादित असतो, प्रयत्नांनी फारतर सरळव्याज पद्धतीने वाढू शकतो. मात्र लोकसंख्या ही चक्रवाढीने चढत जात असल्यामुळे कितीही मुबलक अन्नपुरवठा असला तरी त्याला पुरून उरण्याइतकी तोंडं लवकरच निर्माण होतात. आणि अंतिमतः समजाच्या माथी उपासमार बसते.' ज्याकाळी पुनरुत्पादनावर नियंत्रण जवळपास नव्हतं त्यावेळी हे सत्य सर्वत्र लागू होतं. हे सत्य समजल्याने लोकसंख्या नियंत्रणाला काहीसा हातभार लागला हे मान्य करावं लागेलच. ('काहीसा हातभार' याविषयी पुढे येईलच) मात्र त्याने मांडलेल्या विचारांच्या ढगफुटीमुळे लाखो माणसं पुरामुळे वाहून जावी तशी वाताहत होऊन मेली.

हे होण्यामागे काही दुर्दैवी वैचारिक परंपरा आहेत. एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करून तो मांडणाराकडेच त्या प्रश्नाची उत्तरंही असतात असा प्रचलित समज आहे. काही वेळा हे खरं असतं, पण बहुतेक वेळा नसतं. दुसरी धोकादायक परंपरा म्हणजे जगात काहीतरी चांगलं होईल यापेक्षा काहीतरी वाईट होईल यावर लोकांचा चटकन विश्वास बसतो. आपल्या जनुकीय घडणीतच धोक्याबद्दल सतत जागरुक असण्याची प्रवृत्ती आहे असं म्हणता येईल. तिसरी धोकादायक परंपरा म्हणजे तांत्रिक, सोडवण्यासारख्या प्रश्नांचं रूपांतर काहीशा नैतिक, अपरिवर्तनीय नियमांमध्ये करण्याची प्रवृत्ती. खुद्द माल्थसच्या लोकसंख्यावाढीच्या प्रश्ना आयर्न लॉ म्हणजे न वाकणारा, पोलादी नियम म्हटलं गेलं होतं. चौथी परंपरा म्हणजे आत्तापर्यंत होत आलेलं आहे ते कायमच होत रहाणार यावर असलेला विश्वास. कच्चे रस्ते, अपार गर्दी, दुर्गम स्थान यामुळे या अचानक ढगफुटीचं रूपांतर प्रलयात आणि त्यापायी अनेक आयुष्यं गमावण्यात जसं होतं, तसंच माल्थसच्या विचारांबाबतही झालं.

लोकसंख्यावाढ हा तांत्रिक प्रश्न आहे हे आपल्याला आता आता समजतं आहे. समाजव्यवस्था बदलली, सुशिक्षितता वाढली, स्त्रियांचं स्वातंत्र्य वाढलं आणि संततिनियमनाची साधनं उपलब्ध झाली तर हळूहळू सुटत जाणारा प्रश्न आहे. हे समजून न घेता माल्थसने त्याला असाध्य प्रश्न मानलं. आणि तो प्रश्न सोडवण्याऐवजी त्या अपरिवर्तनीय सत्याशी तडजोड करून जगण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल विचार मांडले. आणि त्याचं उत्तर थोडक्यात असं होतं की गरीबांचा विनाश अटळ आहे. त्यांना जगायला मदत केली तर हा प्रश्न पुढच्या पिढीत अधिक भयंकर स्वरूपात डोकं वर काढेल. त्यापेक्षा त्यांना मरू द्यावं, आपली कातडी वाचवावी. त्याने लिहिलेली वाक्यं डोळे उघडणारी आहेत.
"... dependent poverty ought to be held disgraceful. A man who is born into a world already possessed, if he cannot get subsistence from his parents, or if the society does not want his labour, has no claim of right to the smallest portion of the food, and, in fact, has no business to be where he is. At nature's mighty feast there is no vacant cover for him. She tells him to be gone."
थोडक्यात मतितार्थ असा - ज्याने अगोदरच लोकांमध्ये वाटून घेतल्या गेलेल्या जगात जन्म घेतला आहे, त्याला जर स्वतःच्या कष्टाने काही मिळवण्याची शक्ती नसेल तर त्याने या जगात राहू नये. त्याला अन्नाच्या एका कणावरही हक्क नाही. निसर्गाच्या या जंगी पंगतीत त्याच्यासाठी जागा नाही. निसर्गच त्याला निघून जायला सांगतो.

माल्थसने केलेला मूळ निसर्गनियमापासून ते उपायापर्यंतचा प्रवास रोचक आहे. मालकी हक्कांना त्याने अतिशय चलाखपणे निसर्गनियमांचं स्थान दिलं आहे. आणि हे मालकीहक्क जपायचे असतील तर गरीबांना मरू देणं हे नैसर्गिक कर्तव्य आहे इथपर्यंत तो उडी मारतो. त्याने वाजवलेली धोक्याची घंटा ही प्रस्थापितांचे हक्क राखण्याची होती. कारण राजसत्ता श्रीमंतांच्याच हाती होती. त्यामुळे गरीबांना जगू दिलं तर पुढच्या काही पिढ्यांतच सगळेच अन्नान्न होतील हा संदेश त्यांच्यापर्यंत स्पष्ट पोचला. त्याच्या विचारांत सुजननीय विचारसरणी (eugenics) स्पष्टपणे दिसते.
"I believe that it is the intention of the Creator that the earth should be replenished; but certainly with a healthy, virtuous and happy population, not an unhealthy, vicious and miserable one. And if, in endeavouring to obey the command to increase and multiply, we people it only with beings of this latter description and suffer accordingly, we have no right to impeach the justice of the command, but our irrational mode of executing it." (संदर्भ विकिपीडिया)
थोडक्यात सारांश - माझा विश्वास आहे की ही धरती लोकांनी भरली राहो ही देवाची इच्छा आहे. पण ती धडधाकट, सद्गुणी आणि आनंदी लोकसंख्या असावी - रोगट, गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि हलाखीतली नसावी. मात्र देवाची आज्ञा पाळताना आपण जर दुसऱ्या प्रकारचीच लोकसंख्या भरत असलो तर आपल्याला देवाच्या आज्ञेला दोष देण्याचा अधिकार नाही. दोष ती पाळण्यात आपण वापरत असलेल्या चुकीच्या पद्धतीचा आहे.

चांगल्या, सद्गुणी लोकांनीच प्रजनन करावं, आणि या हलाखीतल्या घाणेरड्या लोकांना प्रजनन करण्यापासून रोखावं हा सुजननीय विचार झाला. यात 'चांगले, सद्गुणी' कोण आणि 'घाणेरडे, त्याज्य' कोण हे कसं ठरवायचं? अर्थातच त्याचं भाषांतर 'प्रस्थापित, सुशिक्षित, श्रीमंत, उच्चवर्गीय' म्हणजे चांगले तर 'रोगट, गरीब, बकाल वस्तीत रहाणारे, शिक्षण धड नसणारे' हे वाईट असं होतं. पुढे आपल्याला पहायला मिळेल की ही सुजननी विचारसरणी अनेक लोकसंख्या नियंत्रकांच्या मनात होती. (गंमत अशी की माल्थसने मांडलेल्या विचारांवरून डार्विनला नैसर्गिक निवडीची उत्तम मांडणी करता आली. मग उत्क्रांतीवाद प्रस्थापित व्हायला लागल्यावर अनेक सुजननी विचारसरणी असलेल्यांनी जी आपल्या विचारांची माल्थसचेच विचार पुढे नेत मांडणी केली, त्याला मात्र 'सोशल डार्विनिझम' असं नाव मिळालं. उत्क्रांतीवादासारख्या सुंदर थियरीला एकाच वेळी माल्थसच्या विचारांमागच्या तथ्याचा आधार मिळाला. पण त्याचबरोबर तिला माल्थसच्याचा सुजननी विचारसरणीच्या विचारांचा विटाळ झाला हे दुर्दैव.) सुजननी विचारसरणी सर्वात टोकाला नेणारा अर्थातच सर्वांना माहित असतो - हिटलर. पण तीच विचारसरणी पुढे अनेकांनी वेगवेगळ्या तीव्रतेने मांडली. बारकाव्याने पाहिलं तर हा प्रवाह अनेक ठिकाणी दिसून येतो.

माल्थुशियन ढगफुटीनंतरच्या प्रपातात जे लाखो लोक बळी पडले त्यांचं धगधगतं उदाहरण म्हणजे १८४५ सालचा आयर्लंडचा दुष्काळ. त्याकाळी आयर्लंड ही भारताप्रमाणेच ब्रिटिश वसाहत नव्हती. १८०१ साली आयर्लंडचा समावेश युनायटेड किंगडममध्ये झाला होता, आणि तिथून पार्लमेंटमध्ये सभासदही जात असत. पण याचा लोकशाहीशी काही संबंध नव्हता. बहुतांश प्रतिनिधी हे जमीनमालकांतूनच जायचे. तिथली चांगली जमीन दोन हजार मोठ्या इस्टेटींमध्ये विभागली गेली होती - बहुतांशी ब्रिटनमध्ये वस्ती करून राहिलेल्या प्रॉटेस्टंट श्रीमंतांच्या मालकीच्या. उरलेल्या जमिनीच्या लहान लहान तुकड्यांवर शेती करून आयरिश माणूस जगत असे. काही जमीन आयरिश लोकं भाड्याने घेऊन कसत असत. या जमीनदार - गरीब कुळ विभागणीला धार्मिक कंगोरेही होते. ८०% आयरिश जनता कॅथलिक. पण मूठभर प्रॉटेस्टंट उच्चवर्गीयांनी त्यांचे बरेच मूलभूत हक्क कायद्याने खच्ची करून ठेवलेले होते. (संदर्भ) उच्च शिक्षण, शस्त्र बाळगणं, सैन्यात भरती होणं, ५ पौंडापेक्षा महाग घोडा बाळगणं अशा अनेक गोष्टी करायला बंदी होती. ही परिस्थिती सतरावं आणि अठरावं शतक चालू राहिली. त्यानंतर १८२९ मध्ये पूर्ण समानता (कागदावर) आलेली असली तरी अर्थातच सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती फारशी बदललेली नव्हती. गरीब शेतकरी छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर आपलं पोट जेमतेम भरत. त्यासाठी ते स्वस्त आणि पोटभरीचं म्हणून बटाट्याचं पीक घेत. निव्वळ बटाटा खाऊन आयर्लंडची लोकसंख्या ८० लाखांच्या आसपास होती.

१८४५ साली बटाट्यावर कीड पडली. आणि सगळी व्यवस्था कोलमडली. ४५ साली एक तृतियांश पीक नासलं. ४६ आणि ४७ साली तीन चतुर्थांश नष्ट झालं. ४८ साली पुन्हा एक तृतियांश. या अस्मानीबरोबर सुलतानीही आली. एकेकाळी मोठ्या आयरिश कुटुंबांची भलामण करणाऱ्या जमीनमालकांनी या दुष्काळाच्या दरम्यानच १८४६ मध्ये जमीन भाड्याने कसणाऱ्या लाखो लोकांना हाकलून लावलं. याचं कारण म्हणजे त्याच सुमाराला आलेल्या नवीन सुधारणांमुळे तितक्या माणसांची गरज राहिलेली नव्हती. या सगळ्याचा परिणाम सुन्न करणारा आहे. ८० लाख लोकवस्तीच्या प्रदेशातून सुमारे १० लाख लोक उपास आणि रोगराईने मेले. १० लाख लोकं या भयानक दुष्काळापासून पळून अमेरिका आणि कॅनडात गेले. 10 लाख इंग्लंडमध्ये नोकऱ्या शोधायला गेले. या धक्क्यातून आयर्लंड सावरलं नाही. ही लोकसंख्येची घट पुढे अनेक दशकं चालू होती. आयर्लंडची लोकसंख्या व युरोपची लोकसंख्या डाव्या बाजूच्या आलेखात दाखवलेली आहे. १८४० च्या सुमाराला युरोपच्या ३.३% असलेली लोकसंख्या घटत घटत ०.८% पर्यंत गेली. या काळात युरोपची लोकसंख्या मात्र वाढत होती. याचा अर्थ युरोपभर काही अन्नाचा तुटवडा नव्हता.

माल्थसचा मृत्यू या दुष्काळाच्या आधी दहा वर्षं झाला असला तरी त्याचे विचार जिवंत होते. तत्कालीन माल्थुशियनांनी सोप्पं उत्तर मांडलं. 'या बेटावरची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढलेली होती. आणि अशी वाढलेली लोकसंख्या शेवटी भयानक दुष्काळांनीच घटते. तेव्हा हा दुष्काळ म्हणजे माल्थसचे विचार बरोबर असल्याचंच लक्षण आहे.' हर्बर्ट स्पेन्सरने म्हटलं की जे लोक अतिरेकी संतती निर्माण करतात ते असेच नामशेष होतात. वरवर वाचायला हे बरोबर वाटतं. पण हा खरोखर माल्थुशियन दुष्काळ होता का? याचं उत्तर नकारार्थीच येतं. मोठे जमीनदार दुष्काळातही बीफ आणि मका निर्यात करत होते. आणि थोडंथोडकी नाही, तर जगातली गाईबैलांची सर्वाधिक निर्यात आयर्लंडमधून होत होती. ब्रिटिशांनी उशीरा का होईना अन्नाची मदत सुरू केली. पण गरजेच्या मानाने फारच कमी, आणि अगदी का कू करत. आयरिश नेत्यांना सरकारकडून अक्षरशः भीक मागावी लागली होती. आयरिश रिलिफ प्रोग्रामचा मुख्य होता चार्ल्स ट्रेव्हेल्यान. हा ब्रिटिश ट्रेझरीचा प्रमुख, कट्टर नोकरशहा. माल्थसच्याच काळात ईस्ट इंडिया कॉलेजमध्ये त्याची शिकवण कोळून प्यालेला. त्याने दुष्काळाला 'अतिरेकी लोकसंख्या कमी करण्याची यंत्रणा' तसंच 'सर्वज्ञानी आणि दयाळू देवाने दिलेला प्रत्यक्ष हस्तक्षेप' असं म्हटलं.

या दुष्काळाला माल्थुशियन दुष्काळ म्हणणं हे त्या घटनेत पोळल्या गेलेल्या सर्वांच्याच जखमांवरती मीठ चोळणं आहे. माल्थसच्या विचारसरणीतल्या सुजननीय भूमिकेपोटी साम्राज्याचा भाग असूनही एक देश म्हणून शूद्रासारखी वागणूक दिली गेली. त्यातूनच बटाट्यासारख्या स्वस्त पिकाशिवाय दुसऱ्या कशावर जगणं अशक्य झालं. मग जेव्हा बटाटा फसला, तेव्हा मदत करण्याऐवजी ब्रिटिश सरकारने टंगळमंगळ केली. आणि मग त्यातून लाखो लोक मेल्यावर 'बघा, म्हटलं नाही असे माल्थुशियन दुष्काळ येतील म्हणून?' असा युक्तिवाद करणं क्रौर्याचं आहे. पण तसा युक्तिवाद केला गेला. माल्थुशियन प्रॉफेसी ही इथे सेल्फफुलफिलिंग प्रॉफेसी ठरलेली आहे. बटाट्यावर कीड पडल्यामुळे माणसं अन्नान्न झाली याचं कारण अन्न संपलं हे नसून ज्यांच्यावर हे संकट आलं त्यांना पुरेशी मदत दिली गेली नाही. त्यांना पुरेशी मदत का दिली गेली नाही? तर त्यातलं एक कारण म्हणजे माल्थुशियन विचारसरणीची ढगफूट. गरीबांना मदत केली तर त्यांची लोकसंख्या बेफाट वाढून सगळेच गरीब होतील ही भीती माल्थसने घातली. 'निसर्गाच्या या जंगी पंगतीत' कोणाला जागा मिळणार हे निसर्ग नाही, तर मानवी व्यवस्था ठरवते. या वसाहतवादी आणि स्वार्थी व्यवस्थेला निसर्गनियमाचं अधिष्ठान देऊन ही उपासमार होऊ दिली गेली.

धोक्याच्या घंटा बडवण्याचे काही समान गुणधर्म आपण गेल्या लेखात पाहिले. 'येत्या दहा-पंधरा-वीस-पंचवीस वर्षांत महाप्रचंड संकट येणार आहे हे मी सादर करत असलेल्या आकडेवारीवरून सहजच सिद्ध होतं, याचे परिणाम महाभयंकर, आणि दुरुस्त न करता येणारे असतील.' असं ठणकावून सांगण्याची अनेक उदाहरणं नजीकच्या भूतकाळात आहेत. माल्थसचा लोकसंख्येचा युक्तिवादही त्याच पद्धतीचा आहे. दुसरा एक मुद्दा, जो गेल्या लेखात स्पष्ट झाला नव्हता तो म्हणजे सुजननीय विचारसरणीचा. 'आपण (म्हणजे उच्चवर्गीयांनी) भरपूर खाल्लं तर तो आपला हक्कच आहे, पण हे गरीब/ खालचे लोकंही जर आपल्याइतकंच खायला लागले तर अन्न संपुष्टात येईल. तेव्हा हे अन्न किती प्रमाणात गरीबांना द्यायचं यावरती आपण आपली शक्ती वापरून बंधनं घालायला हवी.' या स्वरूपाची विचारसरणी दिसते. गरीबांच्या प्रश्नांपेक्षा प्रस्थापितांच्या प्रश्नांबाबतच्या धोक्याच्या घंटा या अधिक मोठा घणघणाट करताना दिसतात.

लोकसंख्येच्या धोक्याची घंटा वाजवणं माल्थसबरोबर संपलं नाही. युद्धं, रोगराई, अज्ञान, निष्क्रिय सरकारं, यापोटी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या प्रश्नाकडे देण्याची गरज पडली नाही. पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जेव्हा बहुतांश वसाहतींना स्वातंत्र्य मिळालं, आणि या सर्व कारणांवर उपाय होऊ लागले तसतशी लोकसंख्या वाढायला लागली. त्यातूनच माल्थुशियन विचारसरणीचा नवीन अवतार जन्माला आला. त्याबद्दल पुढच्या लेखात.
------
संदर्भ - विकीपीडियाचे संदर्भ वेळोवेळी दिलेले आहेतच. आयर्लंडमधल्या दुष्काळाबाबत आणि त्यामागच्या कारणांची छाननी, त्यांमागे माल्थुशियन आणि सुजननी विचारसरणीच्या दडलेल्या मुळांचा ऊहापोह "The coming population crash" या पुस्तकात फ्रेड पीअर्सने अतिशय उत्तम रीतीने केलेला आहे. हे पुस्तक (निदान त्याचा पहिला अर्धा भाग तरी) मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

रोचक.
परंतु ट्रेवेल्यानचे आयर्लंडबाबत मत वेगळे आहे. वसाहतवादी अधिकारी असले काहीतरी भंपक मत राखू शकतो. (अमेरिकन आदिवासी जमाती मारून टाकताना अमेरिकन अधिकार्‍यांनीदेखील काहीबाही मते सांगितली असतील.)

माल्थसचे इंग्लंडबाबत मत बघावे लागेल. त्याचे पुस्तक वरवर चाळले. दिलेल्या एक-दोन वाक्यांच्या उद्धरणापेक्षा ते अधिक गुंतागुंतीचे वाटले.

माल्थस हा सुजननवाद्यांपेक्षा आजकालच्या कंन्झर्वेटिव्हांचा मानसपिता आहे. गरिबांपैकी सुद्धा त्याला कौतुकास्पद लोक दिसतात - ते पैसे जमवतात, मग लग्न करतात, आणि या विलंबामुळे कमी संतती उत्पन्न करतात.

The preventive check appears to operate in some degree through all the ranks of society in England. There are some men, even in the highest rank, who are prevented from marrying by the idea of the expenses ... A man of liberal education, but with an income only just sufficient ... The sons of tradesmen and farmers are exhorted not to marry, and generally find it necessary to pursue this advice till ... The labourer who earns eighteen pence a day and lives with some degree of comfort as a single man, will hesitate a little before he divides that pittance among four or five, ... The servants who live in gentlemen's families have restraints that are yet stronger... If this sketch of the state of society in England be near the truth, and I do not conceive that it is exaggerated, it will be allowed that the preventive check to population in this country operates, though with varied force, through all the classes of the community. The same observation will hold true with regard to all old states. The effects, indeed, of these restraints upon marriage are but too conspicuous in the consequent vices that are produced in almost every part of the world, vices that are continually involving both sexes in inextricable unhappiness.

लेखाचे असे काहीसे मत दिसते, की संततिनियमनाची साधने आपोआप निर्माण होतात.
> लोकसंख्यावाढ हा तांत्रिक प्रश्न आहे हे आपल्याला आता आता समजतं आहे.
> समाजव्यवस्था बदलली, सुशिक्षितता वाढली, स्त्रियांचं स्वातंत्र्य वाढलं आणि
> संततिनियमनाची साधनं उपलब्ध झाली तर हळूहळू सुटत जाणारा प्रश्न आहे.

जणुकाही त्यांचा शोध लावणारे आणि उत्पादन करणारे, आणि उत्पादने वापरावीत अशी जाहिरात करणारे, आणि वापरण्यात ग्राहकांचा फायदा आहे असे जाहिरातीत पटवणारे मनुष्यांचे व्यवहार लागतच नाहीत. "वापरण्यात ग्राहकांचा फायदा आहे" आणि "न-वापरण्यात तौलनिक तोटा आहे" ही विधाने समान आहेत.

आणि समाज शेकडो वर्षांत कितीका बदलेना "लेकुरे उदंड जाहली, तो तें लक्ष्मी निघोनि गेली" हा घरगुती हिशोबाचा ताळा त्याच घरात चुकलेला आहे, असे कसे म्हणता येईल? बालमृत्युदर मोठा असेल, तोवर लोकांना संततिनियमन करायला सांगणे त्यांच्या फायद्याचे नाही, ते त्यांना लगेच कळते. ते ऐकणारच नाहीत. एखाद्या देशात मृत्युदर कमी-कमी होत जायला ३०० वर्षे लागली, तिथे जन्मदर कमी व्हायची परंपरा उद्भवायला अनेक पिढ्या जाऊ शकतात. परंतु भारतात मृत्युदर कमी व्हायला ५०-६० वर्षे लागली. तर "तुमची मुले मोठ्या प्रमाणात मरणार नाहीत, संतती कमी असूनही चालेल" अशी जाहिरात करणे योय धोरण आहे.
----
यावरून मला सध्याची आणखी एक धोक्याची घंटा मनात येते. आजकाल भारतातील काही (पुष्कळ) राज्यांत मुलांपेक्षा कमी मुली जन्माला येत आहेत. एक-दोन-तीन पिढ्या वाट बघितली, तर हा प्रश्न "आपोआप" सुटेल याबाबत मला पूर्ण खात्री आहे. तोपर्यंत आपण सर्व मेलेले असू. तरुण झालेल्या अनेक मुलांना लग्नाच्या वेळेला मुली मिळणार नाही. काही प्रौढ पुरुष बलात्काराने शरीरसुखाची सोय लावून घेतील, पण मुलींची सुरक्षितता सांभाळण्याकरिता बाजारात पाहारेकरी उपलब्ध होतील. मुलींना उलट-हुंडा देऊन विकत घेण्याची प्रथा (आजकाल नवरा विकत घ्यायच्या प्रथेच्या उलट) स्थापित होईल, मग मुली जन्माला घालणे फायदेशीर ठरेल, सर्व काही संतुलित होईल...
होईल ना संतुलित. पण मधल्या काळात काही लोकांना दु:ख सहन करावे लागेल, तेसुद्धा महत्त्वाचे आहे. धोक्याची घंटा त्याबाबत आहे. धोक्याची घंटा ऐकल्यामुळे समाजात फरक होऊ शकेल. धोक्याची घंटा ही "सेल्फ-डिफीटिंग प्रोफेसी" होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु ट्रेवेल्यानचे आयर्लंडबाबत मत वेगळे आहे. वसाहतवादी अधिकारी असले काहीतरी भंपक मत राखू शकतो.

'आपण आणि ते' हा भेदभाव सुजननवादात महत्त्वाचा आहे. आम्ही उच्च, श्रीमंत, शहाणे, इ. इ. जगण्यास लायक आणि ते घाणेरडे, गलिच्छ वस्तीत रहाणारे, अशिक्षित, असंस्कृत लोक जगण्यास लायक नाहीत - यात 'आपल्या देशाचे नसलेले' या विशेषणाचीही भर पडते. त्यामुळे कल्याणकारी योजना राबवणाऱ्या सर्वेसर्वाची अशी मतं असणं हे खचितच बायसचं लक्षण आहे.

माल्थस हा कंझर्व्हेटिव्हांचा मानसपिता आहेच. पण सुजननवाद हा एक टोकाचा कंझर्व्हेटिव्हिझमच म्हणता येईल.

लेखाचे असे काहीसे मत दिसते, की संततिनियमनाची साधने आपोआप निर्माण होतात.

संततिनियमनाची साधनं आपोआप तयार होतात, किंवा सामाजिक परिस्थिती 'आपोआप' बदलते असं खचितच म्हणायचं नव्हतं. माल्थसच्या गृहितकांत 'जोपर्यंत स्त्रीपुरुष आकर्षण कमी होत नाही तोपर्यंत' असा काहीसा शब्दप्रयोग आहे. एका रबराच्या तुकड्याने गर्भधारणा थांबवता येऊ शकेल कदाचित हे त्याच्या गृहितकांत नाही. असावं का, याची चर्चा करण्याची गरज नाही. त्याला पुरेसं ज्ञान नव्हतं असं म्हणता येईल. पण या सगळ्यावर तांत्रिक उपाय आणि सामाजिक उपाय निघतील याबाबत पूर्ण निराशा आहे हे तर म्हणावं लागतंच. हेच अधोरेखित करायचं होतं.

"वापरण्यात ग्राहकांचा फायदा आहे" आणि "न-वापरण्यात तौलनिक तोटा आहे" ही विधाने समान आहेत.

हा मुद्दा नीटसा समजला नाही.

परंतु भारतात मृत्युदर कमी व्हायला ५०-६० वर्षे लागली. तर "तुमची मुले मोठ्या प्रमाणात मरणार नाहीत, संतती कमी असूनही चालेल" अशी जाहिरात करणे योय धोरण आहे.

जाहिरात करून संततीनियमनाचं धोरण राबवण्यात फायदा नाही असं माझं म्हणणं नाहीच. प्रलयघंटा वाजवून झाल्यावर पहिल्यांदा जो गोंधळ होतो, त्यानंतर डोकी शांत होतात व त्यातून या योजना, प्रकल्प निघतात. ते बहुतांश वेळी ठीकठाकच असतात. माझा आक्षेप पहिल्या गोंधळाला आहे. शिवाय या लेखांमधून ज्या ज्या गोष्टींच्या प्रलयघंटा वाजवल्या जातात त्यांच्यामागे काय मनोभूमिका असतात याचा थोडा ऊहापोह करण्याचा प्रयत्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका वाचनात काही फारसे कळले नाही, पण काहीतरी रोचक आहे असे मात्र वाटले.
पुन्हा शांतपणे वाचून बघेन . तोपर्यंत पोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला. लेख एक आशावादी विचारप्रणाली मांडतो. (लेखकाचे इतर लेख म्हणजे इतर विषयांवरील लेखही सातत्याने आशावादीच मते मांडतात.)

एखाद्या मतप्रणालीतून (उदा. ग्रीन हाऊस इफेक्ट) धोक्याची घंटा वाजल्याने जी पळापळ होते त्यामुळे तात्पुरता का होईना (प्रचंड) गदारोळ होतो आणि त्यात समाजातल्या (अति)सामान्यांचे (मोठेच) नष्टचर्य होते - हे योग्य नाही आणि नेमके तेच टाळण्यासाठी धोक्याची घंटा वाजल्यावर प्रत्येकाने (निदान समाजाच्या अध्वर्यूंनी) डोके ताळ्यावर ठेवून ,विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आणि त्याप्रमाणे पावले उचलावीत असे लेखकाला म्हणायचे आहे असे दिसते.
चुभूद्याघ्या.

हे मत स्तुत्यच आहे. त्याबाबत सहमती आहे.

अवांतर :
भारतात नव्याने लागू झालेल्या अन्न सुरक्षा अध्यादेशाबाबत लेखकाने काही अभ्यास केला आहे काय? त्याच्यातले आशावादी पैलू एखाद्या लेखातून स्पष्ट झाले तर आनंद होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुभूद्याघ्या.

थोडीशी देवाणघेवाण - धोक्याची घंटा वाजवण्याने जो गदारोळ होतो तो हानिकारक असतो आणि त्यातून नष्टचर्य संभवतं हे मला म्हणायचं आहे हे बरोबर. त्यातलं 'डोकं ताळ्यावर ठेवून निर्णय घ्यावेत' हे अध्याहृत आहे खरं, पण मी ते पुरेसं स्पष्टपणे मांडलेलं नाही. सध्यातरी धोक्याची घंटा वाजवण्याचे दुष्परिणामच सांगतो आहे. शिवाय धोक्याच्या घंटा वाजवणारांच्या विचारसरणीमधला टोकाचा कॉंझर्व्हेटिव्ह/सुजननवादी प्रवाह उलगडून दाखवण्याचा सध्या प्रयत्न आहे.

अन्न सुरक्षा अध्यादेशाबाबत सामान्यज्ञानापलिकडे काही वाचन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रेड पिअर्सचं पुस्तक ('The coming population crash') वाचण्याइतका वेळ नसल्यामुळे त्याचे सगळे अमेझॉन रिव्ह्यूस वाचून काढले; त्यांवरून अात काय असावं याची थोडीफार कल्पना आली. (हे पाप आहे हे कबूल, पण अक्षम्य पाप नाही.) काही शंका:

१. समजा t म्हणजे वेळ आणि P म्हणजे लोकसंख्या असं मानलं, तर लोकसंख्यावाढीचा वेग v = dP/dt ने मोजला जातो. पिअर्सच्या मते लोकसंख्यावाढीचा वेग हळूहळू कमी होतो आहे, म्हणजेच dv/dt = d^2P/dt^2 < 0 अाहे. इथपर्यंत मान्य. पण सध्याच्या घडीला v > 0 अशीच स्थिती आहे, म्हणजे जगाची लोकसंख्या वाढतेच आहे. त्याच्या मते v < 0 ही स्थिती येत्या सत्तरऐंशी वर्षांत केंव्हातरी येईल. हेही वादासाठी मान्य करू. पण समजा v चं मूल्य तेंव्हा शून्यापेक्षा थोडंसंच कमी असेल तर जगाची लोकसंख्या हळूहळू कमी होत जाईल, आणि त्याला काही crash म्हणता येणार नाही. तो म्हणतो तसा crash होण्यासाठी v चं मूल्य शून्याच्या खूपच खाली जावं लागेल, आणि त्यासाठी काही युक्तिवाद पुस्तकात आहे असं आढळलं नाही. (निदान रिव्ह्यूस मध्ये तसा उल्लेख नाही. अर्थात ज्यांनी पुस्तक वाचलेलं आहे त्यांनाच अधिक सांगता येईल.)

तसं असेल तर पुस्तकाचं नाव 'The coming population crash' ऐवजी 'The possible gradual decline in world population, which in any case will not even begin for at least half a century' असं ठेवायला हवं. पण मग अर्थात ते पुस्तक खपवण्याचा प्रश्न येईल. एरलिखच्या 'The population bomb' या पुस्तकावर टीका करण्याच्या भरात स्वत: उलट्या दिशेने तीच चूक न करणं इष्ट.

२. मला असा एक संशय आहे की 'वाढती (किंवा न वाढती) लोकसंख्या आणि अन्नपुरवठा' या प्रश्नाची चर्चा करताना, अन्न म्हणजे 'डाळतांदूळबटाटेसोयाबीन' असं काहीतरी गृहीत धरलं जातं. आता 'ऐअ' च्या इतर वाचकांचं मला माहित नाही, पण ग्लोबल नॉर्थमध्ये राहणाऱ्या बहुतेकांचं एवढ्यावर भागत नाही. त्यांना गाजर, टोमॅटो, खजूर, अॅस्परॅगस, संत्री, डाळिंबं, गोट चीज, मध, अॉलिव्ह ऑइल, मांसमच्छी, बर्गंडी, स्कॉच, शेड-ग्रोन कॉफी, या अाणि अशासारख्या बरेच रिसोर्सेस खाणाऱ्या कित्येक वस्तू सातत्याने लागतात. या वस्तू जगातल्या बहुतांश गरीब लोकांना सध्या परवडत नाहीत, किंवा क्वचितच परवडतात. पण जसजशी आर्थिक सुबत्ता वाढेल तसतशी त्यांची मागणी वाढेल हे नक्की, आणि ती मागणी पुरी करण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे मलातरी मुळीच स्पष्ट नाही. त्यामुळे P चं मूल्य स्थिरावलं (किंवा हळूहळू कमी होऊ लागलं) तरीदेखील लोकांच्या 'अन्नधान्याचा' प्रश्न सहजी सुटेलच असं नाही. यात असूयेचा प्रश्न नाही. जगातल्या सगळ्यांना या वस्तू परवडल्या तर मला अत्यानंदच होईल, पण खरोखरीच त्या आठनऊ अब्ज लोकांना पुरतील इतक्या तयार करता येतील का याबद्दल मला थोडीशी शंका आहे. (इथे उगीच काहीतरी 'भावी तांत्रिक प्रगती' वगैरे मोघम उत्तर पुरेसं नाही.) तेंव्हा एकूण पाहता, धोक्याच्या घंटेविरुद्ध इशारा ठीक आहे, पण बारीक आवाजात धोक्याची किणकिण करायला थोडंफार कारण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

जगाची लोकसंख्या हळूहळू कमी होत जाईल, आणि त्याला काही crash म्हणता येणार नाही. तो म्हणतो तसा crash होण्यासाठी v चं मूल्य शून्याच्या खूपच खाली जावं लागेल, आणि त्यासाठी काही युक्तिवाद पुस्तकात आहे असं आढळलं नाही.

अगदी बरोबर. crash हा शब्द सनसनाटीकरणासाठी शीर्षकात आलेला आहे. त्याने जगातल्या वेगवेगळ्या देशांत फर्लिलिटी रिप्लेसमेंट लेव्हलच्या (~२.१) खाली गेलेली आहे हे दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर जिथे एकेकाळी फर्टिलिटी खूप जास्त होती अशा काही देशांतही तो रिप्लेसमेंटच्या जवळ आलेला आहे हे दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ बांगलादेश. त्यानंतर मात्र त्याने हॅंडवेव्हिंग आर्ग्युमेंटं करून फर्टिलिटी रेट खाली गेला की बायकाच कमी होतात आणि त्यामुळे हे चक्र पुढे चालू रहातं वगैरे म्हटलं आहे. सुमारे आठ बिलियनला जगाची लोकसंख्या स्थिरावेल आणि मग किंचित कमी होईल एवढंच त्याचं म्हणणं आहे. क्रॅश होईल यासाठी कुठचीही आकडेवारी नाही.

अन्न म्हणजे 'डाळतांदूळबटाटेसोयाबीन' असं काहीतरी गृहीत धरलं जातं.

हेही बरोबर. माल्थुशियनांना अपेक्षित असलेला दुष्काळ हा 'अन्नाचं दुर्भिक्ष्य' किंवा 'दरडोई २००० कॅलरी उत्पन्न न होणं' या स्वरूपाचा असतो. 'जगभरातलं अक्रोडाचं पीक यावेळी ३०% कमी आलं, आणि हाहाःकार माजला' या स्वरूपाचा नसतो. मूलभूत 'डाळतांदूळबटाटेसोयाबीन' गरजा भागल्या की माल्थुशियन विचार खरं तर संपतो. मग उरतात त्या 'गरजा' मॉस्लोच्या पिरॅमिडच्या वरच्या पायऱ्यांवर असतात. आणि पुरेसे बदाम अस्तित्वात नसल्यामुळे जर जगातले वीस टक्के लोकांना कायमच बदामांशिवाय जगावं लागलं तर होणारी किंचित किणकिण चालवून घ्यायला मी तयार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक विचार आहे लोकसंख्ये बद्द्ल.
आलेख पाहून डोक्यात आलेला विचार - आयर्लंड सारख्या थंड प्रदेशात जिवंत रहाण्यासाठी जास्त सुविधांची गरज(कडाक्याची थंडी असल्यामुळे अन्न, कपडे, इंधन, घर वगैरे) असते तर त्यामानाने ट्रॉपिकल देशांमध्ये ही गरज कमी असते. यावरून असं वाटतं की ट्रॉपिकल हवामानात माणूस खूपच कमी खर्चात जिवंत राहू शकतो-तेवढा गरीब व्हायच्या आतच थंड प्रदेशात माणूस मरून जाईल(निसर्ग मारून टाकेल). म्हणजे तुलनेने नेहमीच ट्रॉपिकल देशात गरीबांची संख्या जास्त असेल*. समजा अन्नाच्या दुर्भिक्ष्याने जर भारतासारख्या ट्रॉपिकल देशात लोकसंख्या कमी होऊ लागली तर त्याचा दर कसा असेल - जास्त सपाट असेल का? ह्या दोन गोष्टींचा संबंध अजिबात नाही असं असेल तर ते समजून घ्यायला आवडेल.

* हे अतीसुलभीकरण केलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रश्नाचं उत्तर देणं तसं कठीण आहे. याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या देशांत मूलभूत गरजा म्हणजे काय यांची व्याख्या बदलते. ज्याच्या गरजा भागल्या जात नाहीत तो गरीब असं म्हटलं तर 'जेमतेम जगणारे' दोन्हीकडे सारखेच असू शकतील. अन्न नाही म्हणून गरीब आणि ऊब नाही म्हणून गरीब या दोनमध्ये नक्की फरक कसा करायचा आणि त्यांचं मोजमाप कुठच्या स्केलवर करायचं हे तितकं उघड नाही. कदाचित थंड प्रदेशात पैसे असूनही जेमतेमच ऊब मिळवू शकणारा गरीब म्हणावा लागेल.

लोकसंख्या कमी होताना दरांत फरक काय असेल हा प्रश्न थोडा अधिक उत्तर देता येण्याजोगा वाटतो. पण एक लक्षात घ्यायला हवं, की जिथे जगणं सोपं आहे, तिथे लोकसंख्याही त्याच प्रमाणात जास्त फुगते. त्यामुळे मला तरी वाटतं की जर दोन्ही ठिकाणी ठासून भरलेली लोकसंख्या असेल - जेवढं अन्न+ऊब बनतं ते सगळं वापरलं जातं - तर अन्न+ऊब यांचं समान प्रमाणात दुर्भिक्ष्य आल्याने लोकसंख्या घटीचा दर समान असेल. जर फक्त अन्नाचं दुर्भिक्ष्य आलं तर कदाचित थंड भागात दर अधिक असेल. पण अगदी खूप खात्री नाही वाटत या उत्तराबाबत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल.
"अन्न नाही म्हणून गरीब आणि ऊब नाही म्हणून गरीब या दोनमध्ये नक्की फरक कसा करायचा..."
अन्न नसलं तरी माणूस काही दिवस तग धरेल पण ऊब नसेल तर आयर्लंड सारख्या प्रदेशात एखाद-दोन दिवसात मरेल असं सुचवत आहे.
मी 'गरीब' ह्या ढोबळ व्याख्ये बसणार्‍यांमध्येच पुढे नक्की किती गरीब होऊन माणूस जिवंत राहील? गरम कपडे आणि जेवण (पोटापुरतं) आहे पण घर नाही, हा थंड प्रदेशात मरणाच्या बर्यापैकी जवळ असेल- तर उष्ण प्रदेशातला घर नसले तरीसुद्धा पोटापुरत्या जेवणावर बराच काळ जिवंत राहू शकतो - अशी काहीशी तुलना मी करत होते. निसर्गाचा 'कटऑफ' थंड आणि उष्ण प्रदेशात वेगळा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निसर्गाचा 'कटऑफ' थंड आणि उष्ण प्रदेशात वेगळा आहे.

हेच मीही म्हणतो आहे. मात्र माझं म्हणणं आहे की गरीब म्हणजे काय याची व्याख्या या दोन प्रदेशात वेगवेगळी होईल. 'जीवनावश्यक गरजा पुरेशा भागल्या जात नाहीत तो गरीब' अशी व्याख्या केल्यास थंड प्रदेशात गरीबीला आणखीन एक परिमाण प्राप्त होईल. आयर्लंडच्या बाबतीत माझ्या अंदाजाप्रमाणे या गरजेसाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था (निदान कामचलाऊ तरी) बहुतेकांकडे होत्या, कारण त्याशिवाय इतका लोकसंख्या विस्तार झाला नसता. त्यामुळे त्या बेसलाइनपासून किती डीव्हिएशन होतं हे महत्त्वाचं. शिवाय थंड प्रदेशात अन्नाची गरजही अधिक असते त्यामुळे अन्न कमी झालं तर होणारे परिणामही अधिक तीव्र होतात. (आपण फारसं वेगळं म्हणत नाही हे माझ्या लक्षात येतं आहे...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन. पण मांडलेला मुद्दा आवडला इतकेच तूर्तास नोंदवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. १७४० ते १८४० च्या दरम्यान आयर्लॅडची लोकसंख्या exponentially वाढली आहे. याचे कारण बटाटा. असे युरोपात का नाही झाले? या काळात आयर्लॅडची लोकसंख्या तिप्पट झाली आहे, आणि युरोपची १.५ पट वाढली आहे. इतर युरोपच्या लोकांनी बटाटा खाऊन लोकसंख्या का वाढवली नाही?

२. आयर्लँडचे दुष्काळ ४-५ वर्षे चालले. त्यात ८० लाख लोकसंख्या घटून ५० लाख झाली. पण एकदा हे संकट टळले त्यानंतर आयर्लॅड्ची लोकसंख्या वाढायला हवी होती. पण ती सतत १०० वर्षे कमी होत आहे. या ५ वर्षाच्या दुष्काळाचा १०० वर्षे परिणाम राहिला का? कशामुळे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्तरं पुरेशी नीट माहित नाहीत, पण थोडा प्रयत्न करतो.
१. आख्ख्या युरोपची लोकसंख्या 'फक्त' १.५ पट झाली हे एकंदरीत लोकसंख्या वाढीचं निदर्शक आहेच. पण आयर्लंडच्या आसपासच, इंग्लंड आणि वेल्स भागात ही वाढ जास्त झपाट्याने चालू होती. इथे दिल्याप्रमाणे
The eighteenth century saw a population explosion in England and Wales with the English populace growing from 5.05 million in 1701 to 8.7 million in 1801. The population level was reasonably inert in the first half of the century with only an increase to 5.77 million in 1751, the main population growth occurred from 1751 until the mid nineteenth century, by which point it had reached a staggering 16.8 million.

यावरून दिसतं की १७०१ ते १८५० या काळात तिथली लोकसंख्याही तिपटीने वाढलेली होती. त्यामुळे माझ्या मते आयर्लंडच्या लोकसंख्यावाढीचं कारण 'बटाटा' इतकं साधं नसावं. आयर्लंडमध्ये दुष्काळात भीषण हानी झाली याचं कारण तिथल्या जनतेला बटाट्याशिवाय काही परवडत नव्हतं.

२. या ५ वर्षाच्या दुष्काळाचा १०० वर्षे परिणाम राहिला का? कशामुळे? याचं एक कारण त्या दुष्काळाने मोडलेला कणा. एक कर्ती पिढी मेली. ज्या तरुणांना शक्य होतं ते अमेरिका, कॅनडा किंवा इंग्लंडला निघून गेले. या देशात संधी नाही म्हणून पुढच्या पिढ्यांमधले तरुणही बाहेर जात राहिले. शहरीकरणात गावं जशी ओस पडून शहरं भरतात तसं काहीसं. पण आयर्लंड हे त्या काळी खेड्यांची वस्ती असलेलं बेट होतं. शहरात जायचं म्हणजे देशाबाहेर. पण हे एकच कारण नसून इतरही काही कारणं असावीत. त्यांविषयी मला खात्रीलायक माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचला. आधीच्या भागांप्रमाणेच मुद्देसूद, रंजक आणि सुगम भाषेत लिहिला आहे. काही मुद्द्यांना हवा तसा रंग गडदपणे लावून त्यांचा वापर केला जात आहे असे वाटल्याने न राहवून हा प्रतिसाद प्रपंच.

१. आयर्लंडमध्ये जे झाले ते माल्थसच्या विचारांची प्रचिती होती याला आक्षेप का? माणसांना जगण्यासाठी किमान वेतनाची (सबसिस्टन्स वेज) आवश्यकता असते आणि जसेजसे अर्थव्यवस्थेची वाढ होऊन उत्पादन वाढेल तसे वेतन वाढते आणि वाढलेल्या वेतनामुळे लोकसंख्येत वाढ होते. वाढलेल्या लोकसंख्येमुळे कामगारांची उपलब्धता वाढून श्रमांची किंमत कमी झाल्याने वेतन कमीकमी होऊ लागते आणि अर्थव्यवस्थेची वाढ थांबते या क्लासिकल थियरी ऑफ ग्रोथमध्ये त्याचे महत्त्वाचे योगदान होते. भांडवलदार लोक आपल्या वाढीव उत्पन्नातल्या बचतीचा पुढे वाढीव उत्पादनासाठी शंभर टक्के वापर करत नाहीत असा मुद्दा त्याने मांडला होता.

मोठे जमीनदार दुष्काळातही बीफ आणि मका निर्यात करत होते. आणि थोडंथोडकी नाही, तर जगातली गाईबैलांची सर्वाधिक निर्यात आयर्लंडमधून होत होती

हे त्याचेच उदाहरण नव्हे काय? वाढलेल्या लोकसंखेमुळे कामगारांची मागणी कमी होते आणि तेच आयर्लंडमध्ये झाले.
पुढे निओ-क्लासिकल थियरी ऑफ ग्रोथमध्ये जर तंत्रज्ञानात वाढ होऊन कार्यक्षमता वाढली तर कामगारांच्या मागणीत लोकसंख्या वाढली तरी वाढ होऊ शकते असा विचार मांडला गेला आणि माल्थुशियन विचार मागे पडले. तसे असले तरी तंत्रज्ञानाची पातळी स्थिर ठेवली तर ते लागू होतात

२. दुर्बळांनी मरावं यात वाईट काय आहे? किंबहुना आज दुर्बळ मरत नाहीत असे आहे काय? शारीरिक दुर्बळांनी मरावं हा निसर्गाचा कायदा माणसाने फार पूर्वी झुगारण्याचे ठरवले आणि आर्थिक दुर्बळांनी मरावं हा आपला कायदा लागू केला. हा कृत्रिम कायदा व खाजगी मालमत्ता हक्क माल्स्थसने निर्माण केलेले नाहीत आणि हा कृत्रिम कायदा नैसर्गिक कायद्याइतका अटळ नाहीय असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा वास्तवाशी फारसा संबंध नाही अशी शंका घ्यायला जागा आहे. 'नथिंग इज सॅक्रेड'च्या जमान्यात या जगात संस्कृतीच्या जन्मापासून सगळ्यात पवित्र काय आहे याचा शोध घेतल्यास उत्तर मिळणे अवघड नाही.

३. आज जगाची लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे आणि तरीही लोक मोठ्या प्रमाणावर मरत नाहीयेत कारण तंत्रज्ञान. वाढीव तंत्रज्ञानाने उत्पादनक्षमता वाढून वाढीव लोकसंख्येला पोसता येते. म्हणूनच भविष्यातल्या वाढीव लोकसंख्येला पोसण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा शोध लावण्याचे प्रयत्न अविरत चालू असतात. परंतु, तंत्रज्ञान म्हणजे ऊर्जा नाही आणि तंत्रज्ञान म्हणजे कच्चा माल नाही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. निओक्लासिकल ग्रोथ थियरीवरच्या आक्षेपांना अजून तरी मुख्यधारेतल्या अर्थशास्त्रज्ञांनी फारसा भाव दिलेला नाही, पण सध्या जसे वारे वाहत आहेत ते पाहता लवकरच त्यावर विचार करणे भाग पडेल असे वाटते. (काय होणार याचा अचूक अंदाज करण्यापेक्षा काय घडते त्यावर थिअरीज बनवणे एवढाच आधुनिक अर्थशास्त्राचा उपयोग आहे असा काहींचा आक्षेप आहेच).

४. जोवर आपण लोकसंख्या म्हणजे पृथ्वीवरच्या मानवी डोक्यांची संख्या एवढाच मर्यादित अर्थ घेऊ तोवर लोकसंख्या हा तांत्रिक प्रश्न आहे. पण भारतातले तीस कोटी लोक आणि अमेरिकेतले तीस कोटी लोक सारखेच म्हणायचे का? त्यातही भारतातले सगळ्यात खालच्या वर्गातले तीस कोटी लोक आणि अमेरिकेतले तीस कोटी लोक यांची तुलना काहीही दुरुस्ती न करता करणे कितपत योग्य आहे? एखाद्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन काढतो तसे जर लोकसंख्येचे उपभोगाच्या प्रमाणात आकडे काढले तर अमेरिकेची लोकसंख्या कमीतकमी एक अब्ज येईल (काही लोक दोन अब्जही म्हणतात). हॅन्स रोसलिंग म्हणतात की जेव्हा आणखी एक अब्ज लोकांचे राहणीमान मध्यमवर्गीय होईल तेव्हा त्यांची लोकसंख्या वाढणे बंद होईल. म्हणजे एक अब्ज लोकांचे दोन अब्ज लोक होणार नाहीत, पण त्यासाठी त्यांनी दोन अब्ज लोकांइतके खाल्ले पाहिजे. जगात समजा तीस टक्के मध्यमवर्गीय वा वरचे आहेत तर उरलेल्या सत्तर टक्के गरीब लोकांना मध्यमवर्गीय राहणीमान देण्यासाठीच अजून एखादी पृथ्वी लागेल. पण सगळेच अत्यंत गरिबीत राहिले तर चौदा अब्ज लोकही कदाचित राहू शकतील (रोगराईने मरणार नाहीत असे घटकाभर समजून).
मग प्रश्न असा पडतो की आपल्याला खरोखर निव्वळ शिरगणतीशीच देणेघेणे आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढलेल्या लोकसंखेमुळे कामगारांची मागणी कमी होते आणि तेच आयर्लंडमध्ये झाले.

इथे वाढलेल्या लोकसंख्येपेक्षा त्या लोकसंख्येची उत्पादनक्षमता जाणूनबुजून खच्ची केल्यामुळे हा अनर्थ घडला. कलकत्त्याच्या काळकोठडीत लहानशा खोलीत १४६ लोक भरले, आणि त्यातले १२३ गुदमरून, चेंगरून एका रात्रीत मेले. त्यांचा मृत्यू संख्येपेक्षा त्यांना आत कोंडणाऱ्या भिंतींमुळे झाला. आयरिश लोकांना बटाटे उत्पन्न करणे, यापलिकडे काही ज्ञान मिळू नये याची व्यवस्था शतक दीड शतक तरी राबत होती. या अन्याय्य व्यवस्थेचे ते बळी होते.

शारीरिक दुर्बळांनी मरावं हा निसर्गाचा कायदा माणसाने फार पूर्वी झुगारण्याचे ठरवले आणि आर्थिक दुर्बळांनी मरावं हा आपला कायदा लागू केला. हा कृत्रिम कायदा व खाजगी मालमत्ता हक्क माल्स्थसने निर्माण केलेले नाहीत

खाजगी मालमत्ता हक्क माल्थसने निर्माण केले नाहीतच. पण त्यांना भौतिक कायद्याच्या नियमांइतकंच अटळ मानलं, जे योग्य नाही. १० माणसांची संपत्ती जपण्यासाठी उरलेल्या ९० नी तडफडून मरावं किंवा पूर्ण वाताहत व्हावी याला निसर्गनियम म्हणत गरीबांना मरू देण्याच्या कल्पनेला नैतिक अधिष्ठान देण्याला आक्षेप आहे. सुदैवाने 'आर्थिक दुर्बळांनी थोडं कमी सुखकर आयुष्य जगावं' या आदर्शाकडे आपला प्रवास चालू आहे.

भारतातले तीस कोटी लोक आणि अमेरिकेतले तीस कोटी लोक सारखेच म्हणायचे का?

अर्थातच नाही. लोकसंख्या स्थिरावली तरी सर्व जगभरच्या जनतेचं राहणीमान साधारण सारखं होण्याची प्रक्रिया चालू रहाणार याबद्दल मला शंका नाही. कच्चा मालच संपला तर तंत्रज्ञानाने निर्माण करता येत नाही हेही तत्वतः मान्य. पण जयदीप चिपलकट्टींना गमतीने दिलेल्या उत्तराप्रमाणे माल्थुशियन क्रायसिस म्हणजे सगळ्यांच्या मूलभूत गरजा भागल्यावर उरलेल्या बदाम अक्रोडाच्या गरजा सर्वांच्या भागणार नसतील तर ती परिस्थिती फारशी वाईट नाही. तिथपर्यंत प्रवास व्हायच्या आतच कच्चा माल संपून जाईल यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा विदा माझ्याकडे नाही. उलट गेली कित्येक शतकं 'तंत्रज्ञान कितीही सुधारलं तरी हा प्रश्न अनिवार्य आहे...' अशी ठासून बोलणी चुकीची ठरलेली दिसलेली आहेत. त्यात सध्याच्या मनुष्याच्या बायोमासच्या सुमारे ५०० पट बायोमास इतर सजीवांत आहे, आणि सध्या मानव वर्षभरात वापरतो त्याच्या सुमारे ८००० पट ऊर्जा सूर्यातून दर वर्षी येते हे लक्षात घेता तंत्रज्ञान पुरेसं सुधारलं तर कच्च्या मालाच्या मर्यादा इतक्यात जाणवणार नाहीत याची खात्री वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात सध्याच्या मनुष्याच्या बायोमासच्या सुमारे ५०० पट बायोमास इतर सजीवांत आहे, आणि सध्या मानव वर्षभरात वापरतो त्याच्या सुमारे ८००० पट ऊर्जा सूर्यातून दर वर्षी येते हे लक्षात घेता तंत्रज्ञान पुरेसं सुधारलं तर कच्च्या मालाच्या मर्यादा इतक्यात जाणवणार नाहीत याची खात्री वाटते.

मर्यादा जाणवण्यासाठी ते स्रोत अक्षरशः संपले पाहिजेत असे नाही. उदाहरणार्थ खनिज तेलाच्या वापरावर मर्यादा येण्यासाठी ते पूर्णपणे संपले पाहिजे असे नाही, केवळ ते मिळवण्याची किंमत ते वापरण्याच्या फायद्यापेक्षा जास्त झाली तरी पुरेसे आहे.
आपली कर्जावर आधारित अर्थव्यवस्था ही युनिडायरेक्शनल रॅक अ‍ॅन्ड पिनियन सारखी आहे. ती फक्त एकाच बाजूला म्हणजे वाढीकडे जाऊ शकते, उलट बाजूला फिरल्यास सगळी मोडण्याचा धोका असतो. पृथ्वीच्या पोटात किंवा सूर्याच्या प्रकाशात कितीही ऊर्जा असली तरी ती मिळवण्याचा खर्च जर मिळणार्‍या फायद्यांपेक्षा जास्त असेल तर ती मिळवण्यासाठी कोणीही धडपड करणार नाही. आत्ताच भारतासह अनेक देशांना खनिज तेलाच्या उपलब्धतेचा प्रश्न भेडसावू लागला आहे.
इजिप्तमध्ये तर जे काही घडत आहे ती आपल्या जागतिक भविष्याची एक झलक आहे असे मत (लेखाचा दुवा) काही लोक व्यक्त करू लागले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखात लेखकाने लोकसंख्या, तिच्या वाढीचा दर, तिचे श्रीमंत व गरीब/बहुसंख्य असे भाग, न्याय्य व अन्यायी कायदेव्यवस्था, अशा व्यवस्थेस नैतिक अधिष्ठान देणारे तत्त्वज्ञान / शास्त्र, अशा नैतिकतेने गरीबांच्या लोकसंख्या वाढीवर घेतला जाणारा आक्षेप आणि तिच्या (लोकसंख्यच्या) नियंत्रणासाठी योजिल्या जाणार्‍या उपायांची लेखकाला अभिप्रेत असलेली अनुचितता असे विषय मांडलेले आहेत. अशा तत्त्वज्ञानाच्या आधारे लोकसंख्या केवळ बटाटे खावऊन वाढू देणे आणि नंतर त्याचे उत्पादन घटले असता ती 'नैतिक' दरापेक्षा कितीतरी जास्त दराने घटू देणे यावर (उदाहरणात काय झाले अशा बाबींवर) लेखकाचा आक्षेप दिसतो. थोडक्यात लोकसंख्या (आकडा) आणि तिचा दर हे निसर्गतः बदलू द्यावेत आणि वैधानिक्/व्यापारी/अमानवी मार्गांनी त्यात ढवळाढवळ करू नये असा या विचारांचा खेचलेला अर्थ घेता येऊ शकतो.

१. मानवाच्या इतिहासात एक पराकोटीची विचित्र घटना घडत आहे. सहसा जेव्हा गरजांची आपूर्ती होत नाही तेव्हा लोक कायदा सुरक्षा मोडून आपले पोट भरून घेतील्/घ्यायला पाहिजे. हा उपाय असताना मरणे कोण पसंद करेल? पण असं होताना दिसत नाही. जेव्हा श्रीमंत + मध्यमवर्गीय संख्या/गुणोत्तर खूपच कमी होइल तेव्हाच कायदा सुरक्षा व्यवस्था राहणार नाही. आता हे गुणोत्तर किती हे माहित नाही पण भारतातील नक्षलवादी राज्ये/जिल्हे या सीमेवर आहेत असे कदाचित म्हणता येईल. या थ्रेशोल्ड पुढे माल्थस आपला कायदा लावूच शकणार नाही. श्रीमंत लोकांना या थ्रेशोल्ड पासून खूप दूर परिस्थिती ठेऊन काम करणे आवडणार नाही कारण ते sub-optimal operation असेल.
२. जगात जो कोणी गुंतवणूक करतो त्याला कॅपिटॅलिस्ट्/भांडवलशहा म्हणता येइल. गरीब लोक केवळ खर्च करतात, गुंतवणूक नाही (दोन मिनिट असे मानू). लोक गुंतवणूक तेव्हाच करतात जेव्हा सरासरी त्यातून धन/पॉझिटिव मोबदला मिळतो अन्यथा ते सगळी संपत्ती खर्च करतील. म्हणजे भांडवलशाही मधे सहसा धन श्रीमंतांकडे संहत होत जाईल. मध्यमवर्गाच्या ५०% आणि श्रीमंतांच्या ९०% गरजा गरीबांपेक्षा फार वेगळ्या असतात. म्हणजे ते बाजार टिकून राहणार ज्यांची गरीबांना गरज नाही. गुंतवणूक करू शकणार्‍या उत्पन्नाची थ्रेशोल्ड वरवर चढत जाईल.
३. जगात सगळीकडे लोकशाह्या आहेत. सरकारला निवडून यायचे असेल तर गरीबांना मरू देणे परवडणार नाही. म्हणजे सरकार, अगदी टोकाची परिस्थिती असताना सगळे (म्हणजे कमाल शक्य) अंदाजपत्रक त्यांच्यावर लावणार. आणि तरच कायदा राहिल. आता सगळे शहाणे झाले तर सरकारची लोकसंख्या पोसण्याची क्षमता जिथे संपेल तिथे लोकसंख्या वाढ थांबेल. पण नाही थांबली तर दोन शक्यता आहेत - १. लोक मरणार २. कायदा व्यवस्था कोलमडणार.
४. इथे शेतकर्‍यांच्या आत्महत्या, इ. आणी नक्षलवाद, इ. हे 'प्रासंगिक' आहेत कि लोकसंख्या स्फोटाची 'सुरुवात' आहेत हे परिक्षिणे आवश्यक आहे. हे जर प्रासंगिक तर लेखक बरोबर नाही तर माल्थेस (diluted बरं का) बरोबर!
५. हे कसं ओळखणार? गुंतवणूक करण्याची जी थ्रेशोल्ड दिली आहे, त्यात सर्वात गरीब गुंतवणूकदार आणि त्याच्यावरचे हे सगळे जग चांगलं बनत चाललंय असं मानणार आणि खालचे वाईट बनत चाललंय असं मानणार. दारिद्रय रेषेखालची संख्या सतत वाढणे (लोकसंख्यपेक्षा जास्त का ते पडताळलं तर लगेच उत्तर मिळेल),दारिद्र्याचं परिमाण वाढणं हे स्फोटाकड्च्या वाटचालीकडची द्योतकं आहेत. भारताची cso ची थोडी सांख्यिकी पाहिली तर कोणती केस आहे ते कळेल.
६. Death is the last thing that happens to us. म्हणजे माणूस उकिरड्यावरचं अन्न खाऊन (शून्य उत्पन्न) जगू शकतो/जगत राहू शकतो. जीवनातल्या सौंदर्याला देखिल महत्त्व आहे. मानवतेने /सरकारने लोकसंख्या वाढीची घंटा वाजवावी का हा प्रश्न नाही, केव्हा, किती , कशी वाजवावी हा प्रश्न आहे. (भारतात ही घंटा जोरजोरात बदडावी असं माझं व्यक्तिगत मत आहे). पण असलेल्या लोकसंख्येला अमानवी पद्धतीनं कमी करू नये. घंटा कशी बदडल्याने लोकसंख्या कमी/योग्य व्हायला चालू होते हा विषय अभ्यासावा कारण वर नगरीनिरंजन यांनी (अप्रत्यक्ष)म्हटल्याप्रमाणे भारतातली तळाची ३०% लोकसंख्या सौंदर्यहिन आयुष्य जगते. त्या वरच्या ३०% ला पण खूप वाणवा जाणवतो.
७. स्वातंत्र्यापासून ६५ वर्षांत लोकसंख्या तिप्पट झाली आहे. घंटा वाजवणे, ती लोकांना ऐकू येणे, पटणे, तिचे अवलंबन होणे यात खूप लिड टाईम आहे, म्हणून घंटाशास्त्राची निर्मिती झाली पाहिजे.
८. 'जगत राहणारा माणूस' अणि 'समाजाला/सरकारला अपेक्षित person with standardized basic minimum consumption/life style/जीवन' यांत खूप फरक आहे. अशा प्रमाण नागरिकाची परिमाणे कोणत्याही सरकारने बनवली नाहीत पण ती नक्कीच 'कमित कमी जिवंत' माणसापेक्षा उच्च आहेत. वर उल्लेखलेला कमित कमी उत्पन्न असणारा गेरीब असे जीवनमान जगू शकावा मग त्याने आयुष्यभर ० गुंतवणूक केली तरी चालेल.
९. गेल्या काही शतकांत मानवतेला मिळालेले जैविक शोध, इतर शोध, राजकीय पद्धती, सामाजिक्/कौटुंबिक्/व्यक्तिगत सुविधा/स्वातंत्र्ये हेही त्याला नीटपणे पचवता आले नाहीत. (उदा. भारतीय संसदेत हमेशा निवडून जाणारे आरोपी/गुन्हेगार, depression या रोगाची वाढ , इ). असे असताना 'काहीतरी शोध लागेल' म्हणून तंत्रज्ञानावर विसंबून राहणे अयोग्य आहे. अकाउंटिंग मधे जशी accrual मेथड वापरतात तसे केवळ असलेल्या संशोधनांचा विचार केला पाहिजे. उद्या कोणताच शोध न लागण्याची, उ शीरा लागण्याची, अर्धवट लागण्याची, इ रिस्क आहे.
१०. लोक स्वतःला कितीही शहाणे (समाजापेक्षा) समजत असले तरी ९०% गोष्टी ते समाजाप्रमाणे करतात. माझ्या भोवतालच्या समाजात सर्व लग्न करतात म्हणून मी केले. शिक्षण घेतात म्हणून मी घेतले, इ. घंटा सतत बडवत राहिली की तिचा परिणाम होतो. सरकारने 'कमित कमी जीवन' आणि कोणत्या वर्षी किती लोकसंख्या हे टार्गेट करून चालले पाहिजे.
११. घंटेव्यतिरिक्त, मानवतेच्या/प्रशासनाच्या मर्यादा पाळून, काय करता येईल हा अभ्यासकांचा विषय आहे. त्याकरता आयोग बसवावा.
१२. गरीबांना अजून गरीब (मरणाच्या वाटेवर लोटण्यात)करण्यात सरकारला आणि गुंतवणूक दारांना काहीही स्वारस्य नाही हा घंटेचा एक संदेश असू शकतो. बाजारात लेबरला किती मागणी आहे आणि किती पुरवठा आहे, पृथ्वीचे किती स्रोत टॅप करता येतात आणि त्यांचे वितरण कसे होते हे पाहताना (गरीबांच्या दृष्टीने) लोकसंख्या कमी असलेलीच बरी.

बाकी (अप्रत्यक्ष)अमानवी कानाडोळा करू नये आणि घंटा प्रस्थापितांकरता न वापरता सर्वांकरता वापरवी हे आपले म्हणणे एकदम न्याय्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.