.
.
समीक्षेचा विषय निवडा
लागू, कार्नाड आणि मेहता
गिरीश कार्नाडांच्या आत्मचरित्राच्या भाषांतराचा परिचय आणि त्याचे परीक्षण असे दुहेरी कार्य या लेखाने उत्कृष्टपणे साध्य केले आहे. हे आत्मचरित्र मुळातून वाचावे असे वाटले.
समाधानाची बाब ही आहे की भारतीय आर्वाचिन नाट्यजगतात जे जुन्या-नव्या नाट्यपरंपरांमधील सेतू ठरावेत अशा तीन व्यक्तींची आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. त्यातील दोघांचे परिशीलन रमताराम करत आहेत. यातच भर घालून विजयाबाईंचेही आत्मचरित्र (झिम्मा-आठवणींचा गोफ) त्यांनी हाताळावे अशी त्यांना विनंती.
प्रत्येक आत्मचरित्रावर एक असे तीन लेख + त्यांची साहित्यमूल्यांच्या आणि जीवन मूल्यांच्या दृष्टीने तुलना करणारा एक लेख अशी चार लेखांची मालिका त्यांनी लिहावी ही आग्रहाची विनंती.
अपेक्षित
>> कार्नाडांच्या वैचारिक जडणघडणीचा प्रवास यात फारसा दिसत नाही. कलाक्षेत्रातील प्रवासात वाटेवर आलेल्या आपल्या अपयशांची, कळत न नकळत आपण केलेल्या अन्यायाची वा चुकांची थेट कबुली त्यांनी प्रांजळपणे दिलेली असली
गिरिश कार्नाड ह्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात एक अढी आहे. तरुणपणी काही चांगली निर्मिती हातून घडून गेली हे खरं, पण नंतरची नाटकं अनेकदा मर्यादित वकुबाची, कृतक आणि काहीशी बालिशदेखील वाटली. त्यात सध्याचं त्यांचं वर्तन आणि वावर काहीसा राजकारण्यासारखा वाटत राहतो. त्यामुळे ही अढी मनात बसली. म्हणून ह्या आत्मचरित्राबद्दल माझ्या फार अपेक्षा नव्हत्या. त्यांच्या मते त्यांनी काय चुका केल्या हे पाहणं त्यातल्या त्यात रोचक वाटेल कदाचित. अर्थात, अधूनमधून त्यांचं बोलणं चांगलं वाटतं हे खरं. उदाहरणार्थ, तन्वीर सन्मानावेळचं त्यांचं स्वतःच्या अपघाती जन्माविषयीचं भाषण.
नायपॉल आणि टागोर
कार्नाड राजकारणी वाटत असले तरीही इथे मी एक कबुली मात्र देतो. नायपॉल यांची भारतासंदर्भात अनेक विषयांतली समज अंमळ कमीच वाटते. मला आठवतं, कोणत्या तरी पुस्तकात त्यांनी विजय तेंडुलकरांच्या बाइंडरबद्दल काही तरी लिहिलं होतं. त्यांना बाइंडर समजलेलं नाही हे ते वाचून कळत होतं. आणि टागोरांची नाटकं मलादेखील विशेष महत्त्वाची वाटत नाहीत.
+१
घटना २ बाबतही मी असहमत आहे. कार्नाड जे काही बोलले ते मी स्वतः समोर बसून ऐकले आहे. प्रथम टागोरांच्या कवितेबद्दल नि त्यांच्या कथांबद्दल कार्नाडांनी भाष्य केले होते नि जाताजाता '...त्या तुलनेत टागोर हे सामान्य नाटककार आहेत.' असे ते विधान होते. तुलनात्मक विधानाचे आपल्या सनसनाटीप्रेमी (याचे आणखी एक उदाहरण नुकतेच सदानंद मेनन यांच्या व्याख्यानाच्या बातमीबाबत पहायल मिळाले, त्याबद्दल इथेच एका प्रतिसादात लिहिले आहे) मीडियाने मोडतोड करून स्वयंसिध्द विधान बनवले नि गदारोळ उडवून दिला. त्या विधानाच्या आधी त्यांनी केलेले भाष्य पूर्ण वगळले होते. टीआरपी मिळवायला हेच करावे लागते असा ठाम विश्वास आता पूर्ण रुजला आहे. तेव्हा असली सनसनाटी विधाने मीडिया छापते तेव्हा तिकडे दुर्लक्ष करणे एवढेच सुज्ञांचा हाती राहते.
मध्यंतरी एलकुंचवारांची एक - भल्ली मोट्ठी एक पानी!- मुलाखत 'पत्र एकदम भित्रं' ने छापली होती. त्यात वट्ट चार प्रश्न त्यांना विचारले होते. त्यातले दोन 'ग्रेस आणि तुमचं शिंचं न्येमकं काय फाटलंय' याचा मागोवा घेणारे होते. त्यातून एखादे सनसनाटी विधान त्यांच्या तोंडून वदवून घेण्याचा, वा निदान आधीच मुलाखत घेणार्याने तयार करून ठेवलेल्या विधानाला निदान पुष्टीकारक होईल असे काही काढून घेण्याचा प्रयत्न असावा. त्यांच्या दुर्दैवाने एककुंचवार सुज्ञ असल्याने हवे ते त्यांना मिळू शकले नव्हते. त्यांच्या विचारधारेबाबत, नाटकांच्या प्रवासाबाबत, गेला बाजार 'मौनराग' या आत्मचरित्रपर पुस्तकाबाबत तपशीलाने विचारण्याची तसदी मुलाखतकार (काय शब्द आहे 'मुलाखत तयार करतो तो') घेऊ इच्छित नसावा. किंवा एकुणच तसे करू शकणारा, तेवढी बौद्धिक कुवत असणारा पत्रकार हल्ली एकतर परवडत नसावा (स्वतंत्र विचाराची व्यक्ती या अर्थाने नि आर्थिक बाजूनेही) किंवा तशी व्यक्ती शोधण्याची कुवत त्या पत्रांच्या मालक-चालकांची नसावी.
आडाडता आयुष्य
'आडाडता आयुष्य' मी वाचलेले नाही. 'झिम्मा' आणि 'लमाण' मी वाचलेली आहेत. 'लमाण' ची तर पारायणेच केली आहेत.
आत्मचरित्रे या लेखनप्रकाराला काही जबरदस्त मर्यादा आहेत. एखाद्याला आपल्या आयुष्यावर चरचरीत डाग उमटवणारा वाटेल असा एखादा प्रसंग दुसर्या कुणाला अगदी सामान्य, दखल न घेण्यासारखा वाटू शकतो. (उदा. 'माणसे- अरभाट आणि चिल्लर' मधील पायथागोरसचे प्रमेय - 'माणसे' लौकिकार्थाने आत्मचरित्र नसले तरी). लेखकाला जे प्रसंग आपल्या चरित्रात मुद्दाम, जाणीवपूर्वक अधोरेखित करावेसे वाटतील ते वाचकाला अगदी किरकोळ, भरताड वाटणे अगदी शक्य आहे. त्यामुळे आत्मचरित्रे ही संपूर्ण समाधान देणारी असणे अवघडच आहे. आत्मचरित्रातून त्या माणसाची, त्याच्या विचारांची घडण कशी झाली हे कळणे अवघडच आहे. त्यातून प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने वयाच्या सत्तरीच्या आसपास आत्मचरित्र लिहिलेच पाहिजे असा दंडक असल्यासारखे सध्या झाले आहे. लागू, मेहता आणि कार्नाड हे मुळात रंगकर्मी. कार्नाडांची तशी नाटककार म्हणून मोठी ओळख. लागूंनीही काही अनुवाद केले असले तरी मूळ नट आणि दिग्दर्शक हीच त्यांची खरी ओळख. बाईंचेही तेच. त्यामुळे लेखक म्हणून जे कौशल्य लागते ते त्यांच्यात असावे आणि त्यांची आत्मचरित्रेही त्यांच्या आविष्कारांइतकीच प्रभावी असावीत असे मानणे चूक आहे. त्यातून अनुवाद आला की असा अपेक्षाभंग होण्याची शक्यता अधिकच.
प्रसिद्ध लोकांच्या आत्मचरित्रांवर जनतेच्या उड्या पडण्याचे कारण उघड आहे. लोकांना या प्रसिद्ध लोकांच्या खाजगी आयुष्यातले काही खमंग, चुरचुरीत वाचायला पाहिजे असते. ते मिळाले की पब्लिक खूष. ('आहे मनोहर तरी'. या पुस्तकातला जो भाग सर्वात प्रकर्षाने लोकांच्या पुढे यायला हवा होता तो दुर्लक्षितच राहिला. लोक फक्त 'भाई कसा अव्यवहारी आळशी नवरा आहे' हेच चघळत राहिले! दादा कोंडके, हंसा वाडकर, कांचन घाणेकर यांची चरित्रे- आत्मचरित्रे ही अन्य उदाहरणे). या तीन रंगकर्मींच्या बाबतीत काही वेगळ्या अपेक्षा ठेवून त्यांची पुस्तके वाचली तर अपेक्षाभंगाची शक्यता अधिक. 'झिम्मा' च्या बाबतीत माझे हेच झाले. त्यामानाने मला 'लमाण' अधिक समाधानकारक, पूर्ण वाटले. पण त्याविषयी मी याआधीच लिहिले आहे.
आपल्यालाही विनंती...
या तीन आत्मचरित्रांचा तौलनिक अभ्यास करणारा एक लेख (कदाचित त्याचे काही पैलू उपरोक्त प्रतिसादात ओझरते आले आहेत) लिहावा अशी सन्जोप राव यांनाही विनंती.
अशा आत्मचरित्रांकडून खर्या चोखंदळ रसिकांच्या काय अपेक्षा असतात/असाव्यात आणि त्या अपेक्षांचा भंग कसा आणि का होतो ते त्यातून स्पष्ट होईल असे वाटते.
उत्तम मूल्यमापन केले आहे. उमा
उत्तम मूल्यमापन केले आहे. उमा कुलकर्णींच्या अनुवादाबद्दल वाचून थोडे आश्चर्य वाटले. "माझं नाव भैरप्पा" किंवा "पर्व"चा अनुवाद त्यांनी उत्कृष्ट केला होता.
गिरीश कार्नाडांबद्दल फारशी माहिती नाही (हा लेख वाचण्याच्या आधीपर्यंत त्यांचे नाव कर्नाड आहे असे समजत होतो). त्यांची नाटके पाहिलेली नाहीत, फक्त तुघलक वाचलेले आहे.
अवांतरः
कार्नाडांना त्यांच्या अपघाती जन्माबद्दल ऐकून अस्वस्थता आली हे वाचून आश्चर्य वाटले. आपण जन्माला आलो नसतो तर जगाला काही फरक पडला नसता हे किती लोकांना माहित नाहीय? "आम्ही गर्भपात करणार होतो" असे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितले नसते तर कार्नाडांना 'आपण जन्माला आलो नसतो तरी जगाला काही फरक पडला नसता' हे कळले नसते?
बाकीच्यांचं माहित नाही, पण आमच्या जन्मदात्यांनी नगरीनिरंजन असा वाचाळ आयडी घेणारा माणूस जन्माला घालू असे ठरवून आम्हाला जन्म दिला नव्हता. ते नगरमध्ये असताना जो काही मांसाचा गोळा जन्माला आला त्याला त्यांनी निरंजन नाव दिलं आणि त्याचं पुढे असं झालं हे आम्हाला खूप पूर्वीपासून माहिती आहे. आम्ही नसतो तर जगच नसते, त्यामुळे आम्ही आहोत म्हणूनच आमच्या असण्यानसण्याने जगाला फरक पडत नाही.
झिम्मा आणि आडाडता आयुष्य
झिम्मा आणि आडाडता आयुष्य एकापाठोपाठ एक वाचून संपवली...
धागा सुरू करणार्याच्या मताशी ( आठवणींची मोळी !!!) सहमत आहे. भाषा बोचत राहते. कार्नाड हे उत्तम राजकारणी होउ शकले असते असे वाटत राहते. अचानक आत्मचरित्र संपते. ते ७६ सालापर्यंतचेच आहे. आता सीक्वेल येणार असावा.
... झिम्मा वाचून अपेक्षा बर्याच अंशी पूर्ण झाल्या. सुरुवात मात्र " बेबी आली , बेबी मोठी झाली , आता बेबीला विजू म्हणूया" वगैरे वगैरे क्लिशे / स्टायलाईज्ड आत्मचरित्रलेखनपद्धतीकडे दुर्लक्ष करून वाचावी लागली... बाकी लेखन आणि चिंतन आवडले. खूप कमी वाटले, अजून चिंतन / चर्चा आणि घटना वर्णने असायला हवी होती. काही गोष्टी गुंडाळल्यासारख्या वाटल्या.
पुस्तकाची छान ओळख करून दिलीत
>> जिथे अपेक्षा अधिक असतात तिथे अपेक्षाभंगाचे दु:ख अधिक तीव्र असते हे ओघाने आलेच.
रमताराम, तुम्ही पुस्तकाची छान ओळख करून दिली आहे. तुमचा अपेक्षाभंग झाला, तरी माझी मात्र उत्सुकता चाळवली गेली आहे, त्यामुळे मी जमेल तेव्हा नक्कीच हे पुस्तक वाचीन. पुस्तक परिचयाबद्दल आभार.
अवांतरः 'आडाडता' म्हणजे काय, कोणी सांगू शकेल काय?