झिम्मा – नाट्यचरित्र

नुकतेच विजया मेहता लिखित झिम्मा वाचले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे जे विजयाबाईंच्या पुस्तकाला साजेसे आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले.

झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.
वयाच्या पंचविशीपर्यंत बाई आत्मचरित्र रूढ अर्थाने आत्मचरित्रासारखे सांगतात, बालपणीचे किस्से येतात, मुख्यत: आठवणी आई-वडील-आजी-गावाकडचे घर अशा घरगुती स्वरूपाच्या, शाळेच्या, शाळूसोबतींच्या, शाळेतल्या शिक्षकांच्या फारशा आठवणी बाई सांगत नाहीत. बाई आठवणीने त्यांच्या नात्यातील शोभना समर्थ आणि नुतनचा उल्लेख एक दोन प्रसंगापुरता करतात. बाईंचे घर विचाराने आचाराने पुढारलेले होते असे जाणवते, घरातील मुलगी म्हणून त्या काळी (बाईंचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४) असणारी फारशी बंधने त्यांच्यावर आहेत असे दिसून येत नाहीत. त्यामुळेच बाईंचे चरित्र सदैव खळखळत वाहणाऱ्या अल्लड प्रवाहासारखे घडत गेले असे वाटते. मात्र येथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की सुरुवातीला विजयाबाईंच्या आईचा म्हणजेच बायीजीचा बाईंच्या नाटक प्रकरणाला विरोध होता. बाई लहानपणापासून अत्यंत चळवळ्या आणि मनस्वी त्यामुळे इतर तात्कालिक वेडाप्रमाणेच हे ही तात्पुरते वेडच असे घरात समज होता असे आठवणीने बाई नमूद करतात.

कॉलेजमध्ये गेल्यापासून मात्र बाईंचे हे आत्मचरित्र थांबते आणि सुरु होते त्यांचे नाट्यचरित्र. वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून इब्राहिम अल्काझीपासून सुरु झालेलं नाट्यशिक्षण पीटर ब्रूक पर्यंत, वयाची पन्नाशी उलटून गेली तरी सुरूच राहिले असे बाई अभिमानाने सांगतात. आणि ह्यादरम्यानचा त्यांचा नाट्यप्रवास म्हणजेच – झिम्मा. ह्यामध्ये रंगायनची स्थापना, रंगायनचे सुरुवातीचे सहकारी अरविंद देशपांडे, नाटककार विजय तेंडुलकर यांच्यासोबत केलेली सुरुवात त्याचबरोबरच रंगमंचाची, संहितेची, नाट्याविष्काराची येत गेलेली समज याचे साद्यंत वर्णन बाईनी केलेले आहे.

मध्येमध्ये विजयाबाई आपल्या खाजगी आयुष्याबद्दल त्रोटक माहिती पुरवत राहतात. जसे वयाच्या पंचविशीपर्यंत लग्न न करता राहण्यासाठी बाईनी घेतलेला नाटकाच्या, त्याच्या तालमीचा आधार. अचानक नाटकाच्या संदर्भातूनच झालेली दुर्गाबाई खोटेची ओळख, रंगायनला त्यांनी मुघल-ए-आझमच्या कपडेपटातून नाटकासाठी दिलेली ड्रेपरी यांचा प्रासंगिक उल्लेख येतो, त्यातून दुर्गाबाईंनी त्यांच्या मुलासोबत दिलेला लग्नाचा प्रस्ताव मग हरेन खोटेशी लग्न, दुर्गाबाईंचा हौशी स्वभाव, त्यानंतर लगेच विजयाबाईंचे नवऱ्याबरोबर जमशेदपूरला स्थलांतर, रोजच्या रुटीनने आलेला कंटाळा आणि हे लक्षात घेऊन हरेन खोटेनी परत मुंबईत हलवलेले बिऱ्हाड. परत बाईंचा रंगायनशी पर्यायाने नाटकाशी आलेला संबंध. पु. ल. देशपांडेंच्या नाटक निमित्ताने झालेला परिचय, नव नाट्याच्या ध्यासाने बाईनी केलेला ब्रेश्तच्या चेअर्स या न-नाट्याचा फसलेला प्रयोग आणि पु.ल नी त्याचे केलेले विडंबन (मला वाटते खुर्च्या नावाने पुलंच्या उरलंसुरलं ह्या पुस्तकात हे विडंबन आहे.). बाई अगदी स्पष्टपणे पुलंनी त्यांच्यावर केलेले हे विडंबन आवडले नाही हे सांगतात. त्याचबरोबर रंगायन टीम आणि बाई यांचा पहिला परदेश दौरा पुलंनी दिलेल्या वाईट अभिप्रायामुळे रद्द झाला हे ही बाई खेदाने सांगतात. (खरेतर पुलंचे नाट्यप्रेम आणि नवनिर्मितीचे त्यांचेही चाललेले प्रयोग पहाता पुलं असं काही करतील असं मला तरी वाटत नाही).

ह्यानंतर मात्र बाईंच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले आणि बाई नवऱ्याबरोबर इंग्लंडमध्ये बोर्नव्हिलला गेल्या. परत दोन वर्षाने भारतात आल्यावर बाईंना जाणवलेली कटू सत्य - रंगायनच्या नाट्यचळवळीत बाईंची अनुपस्थिती रंगायनला मारक ठरली होती, रंगायन फुटायला सुरुवात झाली होती त्यातच भारतात परत आल्याबरोबर सहा महिन्यात अचानक हरेन खोटेचा हार्टअॅटॅकने झालेला मृत्यू होतो. त्यावेळी दोन मुले बाईंना झालेली असतात. बाईंचे आयुष्य नवऱ्याच्या अपमृत्युने आणि रंगायनच्या फाटाफुटीमुळे भोवऱ्यात सापडते. कसलेही प्रसंग, व्यक्ती न सांगता बाई सांगतात की मी चुकले आणि ह्या चुकीमुळे दुर्गाबाई खोटे दुरावल्या. एका परिच्छेदात बाई परत खाजगी आयुष्य अत्यंत त्रोटकपणे सांगतात त्यावरून बाईंच्या आयुष्यात कोणी तरी पुरुष येऊन गेला आणि बाई चुकल्या इतकेच कळते (विजयाबाई स्वत: ह्या प्रसंगाचा उल्लेख मी चुकले असाच करतात).

ह्यानंतर परत अगदीच थोडक्यात फरोख मेहताची नाटकाच्या संदर्भातूनच भेट आणि लग्न. फरोख मेहता पारशी पण त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांनी बिना अगदी मनापासून स्वीकारले तसेच मुलांना ही सावत्र बाप कधीही न जाणवू देता फरोखनी प्रेम केले अगदी स्वत:ची मुले असल्यासारखे आणि त्यांचे आडनाव मात्र खोटे असेच राहू द्यावे ह्याबाबत फरोख मेहता आग्रही होते. विजयाबाईना फरोख मेहता पासून अनाहिता नावाची मुलगी आहे. अनाहिता न्यूयॉर्कच्या ब्रॉंडवेला सात वर्ष कार्यरत राहून न्यूयॉर्कमधीलच आणि ब्रॉंडवेत काम करणाऱ्या भारतीयाशी संसार थाटते, अशी परत त्रोटक माहिती आणखी एके ठिकाणी बाई देतात.

ह्यानंतर सुरु होते जर्मनी पर्व. विविध संकृत नाटकांचा नाट्याविष्कार प्रथम मुंबईत आणि नंतर जर्मनीमध्ये जाऊन जर्मन भाषेत. विजयाबाई शाकुंतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी संकृत नाटके जर्मनीत जाऊन केली.

एकूणच झिम्मामध्ये विजयाबाई नाटकासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, मिळालेले यश, क्वचित चाखावे लागलेले अपयश अशा भरघोस आयुष्याचा नाट्यआलेख अत्यंत सुरेख मांडतात. त्यांच्या हाताखाली तयार झालेला प्रत्येक मराठी कलावंत आता प्रतिथयश आहेत जसे विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, नाना पाटेकर (काही तालीम ह्याला बाईकडून मिळाली आहे), रिमा लागू इ. विजयाबाई चेष्टेने हे आमचे घराणे (गाण्यात असते तसे) असे सांगतात. स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल मात्र हातचे राखूनच सांगतात. बालपणीच्या विस्तृत आठवणीनंतर परत अशा घराच्या आठवणी, किस्से त्या क्वचितच सांगतात. कदाचित आत्मचरित्राकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन तयार झालेला असतो, त्यांत सामाजिक घटनांबरोबरच वैयक्तिक आयुष्यही काही प्रमाणात असावे असे वाटत असते. पण अर्थात विजयाबाईंसारखी नाटककार जेंव्हा अशा गोष्टी शेअर करत नाहीत तेंव्हा आत्मचरित्राचा असा हा वेगळा साचेबंद त्यांनी परिश्रमपूर्वक मांडलेला आहे असे वाटते. नाट्यविषयक अनेक आठवणी, नाट्यक्षेत्रात केलेले नवनवीन प्रयोग ह्यासाठी हे पुस्तक एकदातरी वाचण्यासारखे आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

रोचक पुस्तक वाटते आहे.
परिचय अतिशय नेटका! आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!