पेन्शन-२

*************************************************************************************
पेन्शन-१

आता कितीसे तेल उरले आहे दिव्यात? आणि ते किती दिवस पुरणार? दत्ता येवून गेला आणि छाती फुटल्यासारखे वाटते आहे त्या दिवसापासुन...
*************************************************************************************

"अण्णा, उठले का? चहा देऊऽऽ?" करुणाची हाक आली आणि अण्णांनी घाईघाईने विडी भिंतीवर चुरडली. आज रेडिओ लागला नाही की काय? हाक आली की उठून तिने दिलेला ऊन-ऊन आलेपाक चहा घशाखाली ढकलणे हेच गेले काही दिवस चालले आहे. इतके का मनाला लावुन घेतले आपण? त्या दिवशी पाठीत उसण भरली होती ते एक निराळेच. वरांड्यातली फरशी उमलून वर आली होती आणि अडखळून पडता पडता वाचलो होतो. जवळ भिंत होती म्हणुन बरे नाहीतर करुणाला हातचे काम टाकुन सांबरशिंग उगाळत बसावे लागले असते.

म्हणुन दुपारी जरा पिशवीने शेकत पडलो होतो. नारायण पोष्टमनची हाक आली तेव्हा पडल्या-पडल्याच त्याला हात केला आणि त्यानेही दारातुनच चवकशी करुन पत्र करुणाकडे दिले होते. सदाशिवाचे होते. असेंब्लीच्या कामाने आठ दिवसांचा मुक्काम होता खरा पण तो तिकडे लांब रवीभवनाकडे. इकडे येणे अजिबात जमले नाही त्याला. पण त्याला आवडतात म्हणुन करुणाच्या हातच्या पुडाच्या वड्या घेऊन मुद्दाम एकदा चक्कर टाकली होती रेस्ट हाऊसकडे, चितळ्यांच्या गाडीतुन. घाईघाईत भेटला मला आणि चितळ्यांशी दोन गोष्टी केल्या. चितळ्यांना फार कौतुक सदाशिवाचे. त्याचे इंग्रजी, कायद्याच्या कामात असलेला त्याचा हातखंडा आणि सचोटी. शिवाय ऑल ईंडिया रिपोर्टरच्या बाडांशिवाय पान हलत नाही कोर्टात आणि सरकारात. समाजकल्याण खात्यातही लागत असेलच. सदाशिव मन लावुन शिकला, त्याने आयएएस् पहिल्या प्रयत्नात पटकावली आणि त्याच्या सत्कार समारंभात आमचाही आदराने उल्लेख झाला. धनवटे कॉलेजमधल्या समारंभात तर स्वत: माडखोलकरांनी त्याला नावाजले. पण विष्णु आणि दत्ताला 'कार्यक्रमाला येऊ नका' असे तो म्हणाला. काय गरज होती असे म्हणायची? दत्ताच्या युनियनबाजीमुळे त्याला तसेही प्रिंसिपॉलच्या कार्यक्रमात येऊच दिले नसते आणि विष्णुची तर हितवादमध्ये रात्रपाळी होती. घातल्या पाण्यानी पिकं येत नाहीत हे खरे पण भाऊ-भाऊ म्हणुन काही ओलावा नसावा? त्याला नागीण झाली होती तेव्हा विष्णु चांगली पोलिसातली नोकरी सोडुन धावत आला होता, हेही विसरला? एक ते होते आणि एक हे आहे.

पण सदाशिवाला कसे पटणार? दत्ताची सोबत पहिल्यापासुन अशीतशीच. एका दढियल मित्राने 'अबे ओ बामन्या!' म्हणावे आणि पाठीवर थाप मारावी, ह्यानेही उलटुन 'काऊन बे ओ धेडा!!' म्हणावे आणि मिठी मारावी. मीही शिकत असताना गांधींच्या नादाने नाल्या साफ केल्या, डोक्यावर पाट्याही वाहिल्या. मेश्राम, कांबळे, पाठक, दमकोंडवार सगळे एका विचारांचे होतो आणि जात-पात कोणतीही असली तरी पोटे एकजात खपाटीला गेलेली होती. तसे इथे काय आहे? निवडणुकांमध्ये, युनियनमध्ये ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मग तो हातभट्टीवाला का असेना. तेवढे एक सोडले तर दत्ता पुढे जाईल. नवरात्रात बंगाल्यांच्या देवीला पंडाल घालणे, रेल्वेवाल्यांशी हुज्जत घालुन नालीवर फवारा मारुन घेणे इथे दत्तासारखाच पाहिजे. मात्र संगत? तिथेच तर घोडे पेंड खाते. पण बाहेर एवढी भुतावळ गोळा केली आहे म्हणुन घरातल्यांशीही तसेच जमवुन घेईल तर दत्ता कसला?

लक्षातच आले नव्हते की हा नारायण अजुन घुटमळतो आहे. मग त्याचे ते आर्जवाचे बोलणे, सदाशिवाच्या कानी घालुन चिमूरला बदली करण्याबद्दल. आम्ही जन्मभर गावोगाव खुरडत-रखडत शहराकडे प्रवास केला आणि हे निघाले अबौट टर्न. त्याला काय ठाऊक नाही ४८ च्या धामधुमीत काकांचे डोळे फोडले ते गावातल्या लोकांनीच? पण जमिन आणि पैश्यापुढे वो सब झूट. म्हटले पाहु कसे काय होते ते, सदाशिवाला फुर्सत असेल तसे होईल. नारायण पुन्हा येईल तेव्हा ह्याच वांझ गप्पा माराव्या लागतील आणि हे त्याला माहित असावे पण तोही चिकट.

मग तिन्हीसांजेच्या वेळी दत्ता आला. खिशातुन मुलांना त्याने चुरगळलेले साबणाचे कागद आणि मातकट फुगे आणले होते. चिमणीला धरून कुकुंचा उचलले तेव्हा चिमणी आनंदाने फुलुन गेली आणि अन्तुला पकडुन त्याच्या गालावर दाढीचे खुंट घासुन त्याला गुदमरुन टाकले तरी तो खिदळतच होता. साबणाचे कागद ओले करुन हाताला आलेला फेस घेऊन थोडा वेळ त्याचा बागुलबुवा मुलांना दाखवला आणि मग फुगे फुगवुन, ज्यातले दोन फुसके निघाले, दोर्‍‍‍याने आवळुन त्याने अन्तुच्या बोटाला बांधले. अन्तु आणि चिमणी अंगणात पळाले तरी दत्ता हरवुन जाऊन त्यांचा कलकलाट पहात बसला होता.

माझ्याकडे वळून तो एकदम म्हणाला, "आईच्या पाटल्या लॉकरमधुन आणायच्यात, त्याकरिता तुम्ही आले पाहिजे बँकेत." मला कल्पना नव्हती हे इतक्या लवकर सुरू होईल अशी. काय बोलायचे?

"अनुराधावर वॉरंट निघाले आहे. तिचा जामीन घ्यायचाय. कस्तुरचंद पार्कातल्या सभेत जरा जास्त बोलली ती. चड्डीवाले चिडले आणि त्यांनी किटाळ आणलंय तिच्यावर. सगळ्यांना हूल देऊन वरोर्‍याला गेली आहे सध्या. काहीतरी केले पाहिजे लवकर." हे म्हणजे आईजीच्या जिवावर बाईजी उदार. हिने अनेक वर्षे खडुच्या कारखान्यात, मातृसेवासंघात राबुन थोडेफार पैसे जमविले काय, पाटल्या केल्या काय! घालू-घालू म्हणता म्हणता तिचे ब्रेन हेमरेज झाले, शुद्ध हरपली ती कायमचीच. पंधरा दिवसांनी ती गेली तेव्हा सवाष्णीचे सगळे सोहळे अंगणात झाले. सहा महिन्यांच्या आत दत्ताने लग्नाचा घाट घातला, हे बरे केले का? आणि शोधुन शोधली चळवळीतली मुलगी, जिचा पाय घरी ठरत नाही. आज हा गोंड मार खातोय तिथे जा तर उद्या तो कोष्टी राशन चोरतोय त्याला समज द्या. काही बोललो तर दत्ताने ऐकुन घेणे तर सोडाच पण करेन तर आत्ताच आणि हिच्याशीच ही भाषा. पाय आधीच खोलात जाऊन पाणी गळ्यापर्यंत आले होते का हे नकळे. कोण विचारणार? तेव्हा तसे आणि आता हे असे! परस्पर ठरवुन मोकळा.

मला तिडीक आली, पण म्हटले "अरे, मला जमणार नाही. तू दुसरा काही मार्ग काढ."

"पण का म्हणुन? नाहीतरी काय करायचे नुस्ते ठेवुन.. आज ना उद्या ते मोडावेच लागेल." आता सगळे बोललेच पाहिजे का स्पष्ट? पण नाही, इथे सगळा नंगा कारभार, मी असा आहे आणि तुम्हीही नंगे का नाही?

"असे पहा दत्ता, ते सोने आईने काही भोगले नाही. न सांगता सवरता ती गेली, आणि करुणाने तिचे किती केले तुला माहितच आहे. शिवाय सदाशिव आणि विष्णुला काय वाटते ते नको का बघायला? त्यांनी विचारले तर काय सांगू मी? ते जसे, जेवढे तुझे तसेच सदाशिवाचे आणि विष्णुचेही. तू लाग दुसरी काही सोय करायला."

दत्ता जणु ह्याच शब्दांची वाट पहात होता. तो उठला, पानाच्या तबकातुन त्याने चिक्कण सुपारी उचलली आणि अडकित्ता हातात खेळवत, छद्मी हसुन तो म्हणाला "म्हणजे तुम्ही सगळाच विचार करुन ठेवला आहे तर! हे एक बरे झाले. सदाशिव आणि विष्णुचे राहु देत, मला काय वाटते हे तुम्हाला सांगितलेच पाहिजे. सदाशिव आणि त्याच्या निर्लेपपणाचा फार अभिमान आहे नाही तुम्हाला? खरे तर त्याला काही देणे-घेणे नाही कोणाशी. आईच्या अस्थी रामकुंडात सोडून नाशिकहुन मी मुंबईला गेलो तेव्हा वरळीच्या घरी ह्याने काय केले ते सांगतो. मी बसलो असताना ह्याने गड्डमवार साहेबांसाठी चहा सांगायला मला आत पाठवले आणि ओशाळपणे त्यांना सांगितले 'he is a distant relative of mine, sir.' मी distant relative? हा अभ्यास करायला उठे तेव्हा चहा करुन देणारा मी. दिल्लीला याच्याबरोबर माझीही सैर होईल म्हणुन कौतुकाने गेलो, मुलाखतीच्या दिवशी ढोलपुर हाऊसबाहेर न खाता-पिता वाट बघत बसलो होतो. कॉलेजात पहिली नागीण उठली पाठीवर तेव्हा चंदन उगाळु-उगाळु माझे हात सुजले होते. मला पुस्तकी किडा नाही होता आले पण डोळ्यात बघुन नियत कळते अण्णा मला. मी तिथल्या तिथे तोंडावर त्याला ठेचून आलो असतो पण थांबलो. आतुन सामान आणले आणि चपला घातल्या. कशासाठी आटवायचे रक्त ह्या गांडुळासाठी? हा असाच गिळगिळीत राहाणार, ना इकडचा ना तिकडचा, दुतोंडी. आणि हे काही आजचे नाही हो, सगळे स्वच्छ दिसत होते पुर्वीपासुन पण वाटत होते सगळेच कसे पुरुषोत्तम होतील, काही दाणे असायचे तसे काही गणंगही असायचेच प्रत्येकात नं. पण हरेक गोष्टीची हद्द असते आणि कधी ना कधी डोळे उघडावेच लागतात. मला सदाशिवाशी काही करणे नाही आता. त्याचेही त्या तीन तोळ्यांवाचुन काही अडायचे नाही आज.

विष्णुसाठी मात्र जीव तुटतो. सदाशिवपेक्षा काही कमी हुशारी नव्हती विष्णुकडे. पण पोळीवर तुप ओढून घेणे त्याला जमले नाही कदाचित. चिखलदर्‍याच्‍या पोष्टात तार आली की तुमच्या हाकेसरशी पुस्तक टाकुन उठून, घुंगरांची काठी घेऊन तार द्यायला पळत जाई. जेव्हा सदाशिव प्रोत्साहनच्या बरण्यावर बरण्या खाऊन बुद्धीला धार लावत होता तेव्हा विष्णुला उमरावतीला सडाफटिंग बापुसाहेबांकडे रहायला पाठवले होते तुम्ही. तिथे काय थाट असे ते तर तुम्ही जाणताच. जे भांडे ताकाला तेच दुधाला. सगळेच फाटके पण त्यातल्या त्यात बापुसाहेब बरे. घरात बाईमाणुस नाही, न मूलबाळ. त्यामुळे घरात आयता, बिनमोलाचा गडी मिळाला त्यांना. तीन मुलांचा आणि अकर्त्या भावांच्या संसाराचा गाडा पेलताना जी तडजोड करायची ती केलीत तुम्ही तेव्हा. पण मग आता धर्मराजाचे अवसान आणुन जगाचा न्याय करायचे सोंग आणता कशाला? हे माझे, हे विष्णुचे असे वेगळे मी समजत नाही. आज ही अशी वेळ आहे पण आजही विष्णुसाठी जीव हळवा होतो. उमरावतीला जाताना मी हट्ट केला म्हणुन आपला नवा सदरा माझ्यासाठी तो सोडून गेला होता. बापुसाहेबांनी त्याला दुसरा घेऊन दिला नव्हता, शिवाय माजोरडाही म्हणाले. त्याला आता हा सगळा व्यवहार, हा तुमचा बेगडी धारवाडी काटा जमेल का हो?

तुमच्या सगळ्या पिढीनेच मार खाल्ला. धड टोपीही नाही आणि धड लंगोटीही नाही. म्हातार्‍याने सांगितले मारा की तुम्ही मारला झाडू. कोणी सांगितले हे चांगले तब्येतीला की तुम्ही प्यायचे मूत. खरे काय नी कचकड्याचे काय याचा काही वकूब नाही. ही आजची वेळ टळू द्या. विष्णुला, वहिनीला, मुलांना माझ्याकडुन काही देणे चुकणार नाही."

माझी केव्हाची थरथर होत होती, शिरा तडकतील की काय असे डोके भणभणत होते. हे जहर आता किती जाळत जाईल माहित नाही.

तेवढ्यात करूणा बाहेरुन आली आणि एका नजरेत तिने रागरंग ओळखला..

क्रमशः

field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

अतिशय प्रभावी आणि आशयघन. चालू दे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका चांगल्या नाटका-चित्रपटाची कथाबीजे आहेत या कथेत. लेखणी समर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सफाईदार आणि ओघवते लेखन आहे.
मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे जीएंच्या कथांमधल्या वातावरणाची प्रकर्षाने आठवण होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+११११११११११११११११.

फारच सुंदर लेखन आहे. जुन्या काळाची आठवण करून देणारे आणि खूपच प्रभावी. अलीकडच्या काळाबद्दल इतके उत्तम कधी वाचायला मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा भागही आवडला..
खरेतर असे बर्‍याच जुन्या वळणाने जाणारे व तेव्हाच्या काळातले 'टिपिकल' विषयांवरचे लेखन असले की तितका रिलेट करु शकत नाही किंवा एकूणच काय होणार याचा अंदाज उएय्य लागतो त्यामुळे उत्तरोत्तर कंटाळवाणे होऊ लागते. मात्र हे लेखन सुखद अपवाद आहे!

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुढला अंक कुठय भो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars