पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१)

===============================================================================
आंतरजालावर असलेल्या अनेक स्रोतांवर हे लेखन आधारित आहे. येणारी वळणं, त्यांचा क्रम, किंवा कमी-अधीक गडदपणा माझा म्हणावा. संदर्भ आणि स्रोत शेवटी देईन म्हणतो.
===============================================================================

पियुष मिश्राबद्दल बरंच बोलता येईल. पण आधी ताजी ओळख..

आजकाल बर्‍याच चित्रपटातुन दिसतो. वासेपुर १ आणि २ मध्ये नासिरचा रोल केलाय त्याने. वासेपुरच्या लंब्याचवड्या श्रेयनामावलीत कदाचित सुटुन जात असेल हे नाव पण नासिरचे कॅरेक्टर लक्षात रहातेच. हो, तोच तो, शाहिद खानाचा चुलत भाऊ जो लहानग्या सरदारला रामाधीरच्या गुंडांपासुन वाचवितो. नंतर हातुन होऊ घातलेल्या (पण न घडलेल्या!) पापासाठी जन्मभर स्वतःला कोरडे मारुन घेतो आणि सगळ्या नरसंहारातुन वाचुन फैझल खानाचा वंशाचा दिवा घेऊन मुंबईत येतो. अनुराग कश्यपचे ठरत नव्हते की कोणता रोल कराव पियुषने: रामाधीर की नासिर? पण शेवटी नासिरचा रोल ह्याच्या वाट्याला आला आणि त्याचं त्यानं सोनं केलं. वासेपुरच्या दोन्ही चित्रपटातला निवेदकही तोच आहे आणि 'इक बगल में चाँद होगा, इक बगल में रोटियाँ' या सुंदर गाण्याचा गीतकार, संगीतकार आणि गायकही!

तो बरंच काही करतो. कथा लिहितो, अभिनय करतो, गाणी लिहितो, चाली देतो आणि गाणी म्हणतो देखिल. नुस्त्या नावानं पिच्चर खेचणारा नाहीये तो आणि बहुदा कधी नसेलही. ते आपल्या अभिरुचीवर अवलंबुन आहे, आणि जोवर स्टार्सच्या, सुपरस्टार्सच्या, मेगासुपर्स्टार्सच्या वलयाने आपण दिपुन जाऊ तोवर पियुषसारख्या कलाकारांना टिकुन रहाण्यासाठी स्वतःला पावलो-पावली सिद्ध करावेच लागेल. ते पुर्वीही तसेच होते आणि आताही तसेच आहे. उद्या तसे नसावे ही भाबडी आशा. आणि नाहीतरी या पांढर्‍यावर काळे करण्याचा उद्देश तरी काय दुसरा?

पण तरीही, आज त्याचा चेहरा जास्त दिसू लागलाय, चेकवरचा आकडाही वाढला असेलच त्याचा. पण ते सगळं आताचं झालं, पुर्वी असं नव्हतं नक्कीच. त्यानंच लिहिल्याप्रमाणे,

इक बगल में चाँद होगा, इक बगल में रोटियां
इक बगल में नींद होगी, इक बगल में लोरियां
हम चाँद पे रोटी की चादर डालकर सो जायेंगे
और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आयेंगे

इक बगल में खनखनाती सीपियाँ हो जाएँगी
इक बगल में कुछ रुलाती सिसकियाँ हो जाएँगी
हम सीपियों में भरके सारे तारे छूके आयेंगे
और सिसकियों को गुदगुदी कर कर के यूँ बहलाएँगे

सुरवात केव्हा झाली सगळ्याची नेमकी हे कोण कसे सांगणार? जन्मला तो प्रियकांत शर्मा. घरी मुला-बाळाविना परतलेल्या आत्त्याला दत्तक गेल्यानंतर त्याचा झाला प्रियकांत मिश्रा. तिच्या छडी लागे छम् छम् करड्या, काहीशा जाचक एकांड्या कारभारात हा छोटा स्वतःचा अन् आत्त्याचा सगळा लहरीपणा संभाळत मोठा झाला. जिथल्या साच्यात पोर घातले की IPS, IAS नाहीतर गेलाबाजार Medical साठी तय्यार होऊनच बाहेर येणार अशा शाळेत शिक्षण. पण वळणाचे पाणी वळणावर जाणारच. एकीकडे शाळेतलं, पुस्तकातलं विश्व. गणित, व्याकरण, घोकंपट्टी. दुसरीकडे चित्रांतले आकार, शब्दांचे रूपडे घेऊन येणार्‍या भावना, शब्द थिटे पडावेत असे अनुभव मांडणारे संगीत आणि ठसठसणार्‍या मनाला खुणावणारे नाट्य, नृत्य, अभिनय इत्यादि. मनाचा निर्णय आपसुकच झाला!

मनात उलगडत चाललेले कलेचे नवनवे आविष्कार आणि घरातल्या वातावरणात होणारी घुसमट, जळफळाट यांचा परिणाम त्याच्या कलेत दिसू लागला. त्याचे पहिले शिल्प होते वेड्यावाकड्या शिळेतुन ठिकर्‍या उडवित बाहेर आलेला उद्दाम हात, मूठ वळलेली! मुलात चमक आहे हे वडिलांनी ओळखलं होतं पण त्यानं 'आर्टिस्ट' होणं त्यांच्या हिशेबी कमीपणाचं, नव्हे मूर्खपणाचं होतं. ग्वाल्हेरसारख्या छोट्या शहरात ते जमणारच नव्हतं. आत्त्याचा एककल्लीपणा वाढतच होता, इतका की कारभार घरातल्या सर्वांना जाच होऊ लागला. लहान्-सहान कारणांवरून होणारी शिवीगाळ नित्याचीच. संवेदनशील मनाच्या प्रियकांतला ते सगळं असह्य व्हायचं. त्याच्या हातुन उमटलेली पहिली कविता साक्ष आहे.

ज़िंदा हो हाँ तुम कोई श़क नहीं, सांस लेते हुए देखा मैनें भी हैं
हाथ़ और पैरों और ज़िस्म को हर्कतें खूब देतें हुए देखा मैनें भी हैं
अब भले ही ये करते हुए होंठ तुम दर्द सेहते हुए सख़्त सी लेते हो
अब हैं भी क्या कम तुम्हारे लिए, खूब अपनी समझ़ में तो जी लेते हो

इयत्ता आठवीतला हा मुलगा आणि अशी कविता.

पुढे तर कडेलोटच झाला त्याच्या सहनशक्तीचा. घरीदारी काही किंमत नाही, तोंड दाबुन बुक्क्यांचा मार किती दिवस खाणार? त्या तिरिमिरीत त्यानं आपली ओळख पुसून नव्याने दुनियेत उतरायचं ठरवलं. पण धीर होत नव्हता आणि काय करायचं तेही ठरत नव्हतं. ते ठरायला दहावीचं वर्ष उजाडावं लागलं. तोवर वर्गातले सगळे म्हणायचे प्रियकांत पण जेव्हा चेष्टेपाई मुलं त्याला प्रिया म्हणायला लागली तेव्हा, एका क्षणी, कोंडमारा सहन करणार्‍या मनानं पलटवार केला, भेंचोद, हैं कौन ये प्रियकांत शर्मा? कैसा चूतिया नाम हैं! दहावीची मार्कशीट घरी आली तेव्हा वडलांनी विचारलं हा पियुष मिश्रा कोण? चुकून आलेली दिसतेय. परीक्षेआधी केव्हातरी अ‍ॅफिडेविट करून यानं आपलं नांव बदललेलं, ते कागद फडफडत हा म्हणाला, हाँ, आज के बाद मैं हुं पियुष मिश्रा!

कला-मंदिर, लिटल् बॅले ग्रुप इथे तो रमायचा. कला-मंदिरात नाटकातली मंडळी, तर लिटल् बॅले ग्रुप मध्ये लोककला, स्ट्रीट थिएटरवाली टाळकी. एन् एस् डी च्या शहांनी मांडलेल्या, १८५७ च्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या 'दिल्ली तेरी बात निराली' नाटकात पहिलं काम केलं. रोल छोटा होता खरा पण शहांच्या स्मरणात राहिला. मग लिटल् बॅले ग्रुप मध्ये जयवंत दळवींच्या 'अरे शरीफ़ लोग!' मध्ये मुख्य भूमिका. फार गाजली ती! त्याला आता कोणीतरी ओळखत होतं, इथे त्याच्या शब्दांनी लोक हसत होते किंवा एका शब्दानं अख्ख्या जमावाचं काळीज हेलावुन टाकू शकत होता तो! 'ग'ची बाधा झाली काहिशी पण ते सगळं फार हवहवसं वाटत असणार! आता शिकायचे तर हेच, दुसरे काही नाही. एकदा मनावर घेतले तरी घरातले अडथळे दूर व्हायला वेळ लागलाच. नव्हे ते सारावेच लागले हिम्मत करून. घरातले ऐकेनात काही केल्या. तगमग वाढली. काही सुचेना तेव्हा सणकून मनगटावर ब्लेड चालवलं. मरायसाठी नाही, पण आत रक्त आहे की पाणी हे तरी कळू देत म्हणुन!

मग ग्वाल्हेर सोडलं ते सोडलंच. एन् एस् डी मध्ये प्रवेश केला तेव्हा बावचळल्यासारखं व्हायचं. ग्वाल्हेरहुन थेट दिल्ली, मुलामुलींची घसट, एन् एस् डी मध्ये चाललेल्या उलथापालथी ह्या सगळ्यात जिवाला निश्चिंती नव्हती. ती मिळाली संगीतात, म्हणजे दिग्दर्शनात. हात कलावंताचे, हातात ब्रश येवो किंवा बाजाची पेटी. मशरीकी हूर या नाटकाचं संगीत त्यानं केलं. पण दमदार अभिनय म्हणजे काय हे त्यानं स्वतः दाखवुन दिलं ते फ्रित्झ बेनेवित्झच्या 'हॅम्लेट' मध्ये. याच्या मनात खोल दडलेला जिप्सी नाटक्या ओढून काढला फ्रित्झ बेनेवित्झनं. तोही मोठ्या करामतीनं. सगळा वेळ तो ह्याला हिणवत असे आणि इथे तू काय करतोयस विचारी. ह्याचा निश्चय किती अभंग आहे ते तपासी. मग शेवटी हॅम्लेट जेव्हा रंगमंचावर येणार तेव्हा फ्रित्झनं मोठ्या मनानं कबुल केलं की याहुन सशक्त, काळ्या स्वप्नांचा हॅम्लेट त्याला मिळाला नसता!

तिथुन सुरू झाला प्रवास अभिनयातल्या खाचाखोचा समजण्याचा, नवे प्रयोग करण्याचा.

सरतेशेवटी मुंबईतल्या संधी खुणावू लागल्या. पण 'भारत एक खोज' मधल्या इवल्या इवल्या भुमिकांशिवाय काही हाती लागले नाही.

क्रमशः

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी. 'गुलाल'मधली गाणी ऐकून वेड लागलं, तेव्हा पहिल्यांदा या वेड्या माणसाचं नाव ऐकलं. मस्त आहे मालिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पियुष मिश्राची काही गाणी आणि खर्जातला/फाटलेला आवाज रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच दिवस वाचावं वाचावं म्हणत होतो, शेवटी आज मुहूर्त लागला. शेवटच्या लेखांकावर सावकाश प्रतिक्रिया देऊ म्हणून विचार करत होतो, पण रहावलं नाही. मनस्वी कलाकाराचं ओळखचित्रण खूप छान केलेलं आहे.

काही सुचेना तेव्हा सणकून मनगटावर ब्लेड चालवलं. मरायसाठी नाही, पण आत रक्त आहे की पाणी हे तरी कळू देत म्हणुन!

यासारख्या वाक्यांनी बहार आली.

आता पुढचं वाचतो आणि अजून लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0