सायन्स फ़िक्शन कादंबरी : नवलाईच्या खेळाचा नावल अनुभव

माणसाला ज्ञात नसलेल्या, त्याच्या अनुभवविश्वाबाहेरच्या -¬¬¬ पृथ्वीपलीकडच्या विश्वाबद्दल बरेच काही लिहिले वा बोलले गेले आहे आणि जाईल. त्या-त्या काळात विशिष्ट समाजाच्या तर्कदृष्टीला, परंपरांना धरुन अज्ञात जगाबद्दलचे ज्ञान मांडले गेले आहे. कधी ते माणसाच्या गोष्ट-विश्वाचा भाग बनले; उदाहरणार्थ, लोककथांमधून वा देवादिकांच्या गोष्टींमधून. तर कधी, जगभरातल्या विविध तत्त्वज्ञानात्मक मांडणीतून वेगवेगळे जग आणि तिथे वास करणारे जीव यांच्याबद्दलची मांडणी विविध रूपांत प्रगट झालेली आहे. सदरच्या निबंधाचा हेतू बदलत्या काळानुसार मानवी समाजाचे अज्ञात जगाबद्दलचे आकलन कसे बदलत गेले आणि ते कल्पित साहित्यात कसे आकाराला आले याची चिकित्सा करणे, असा आहे. कल्पित साहित्याचा पट विशाल आहे. पण, या लेखात ‘सायन्स फ़िक्शन कादंबरी’ या साहित्यप्रकाराला समोर ठेवले आहे. साहित्यप्रकार असा उल्लेख करताना तो मूल्यविषयक वा बंदिस्त विचारचौकट म्हणून नसून निव्वळ वर्णनात्मक आहे असे समजावे. तसे नसल्यास, वेळोवेळी त्याची सैद्धांतिक चौकट मांडली केली जाईल.

जगातली बहुविधता आणि पल्याडचे जग

वेगवेगळ्या संस्कृतीत ‘पल्याडच्या जगा’चा शोध लावण्याचे विविध शास्त्रीय प्रयत्न होत असतात. अवकाशशास्त्रीयदृष्ट्या, माणसाच्या जगापेक्षा वेगळ्या जगाची संकल्पना मांडण्याची सुरुवात अवकाशातील भौगोलिक आणि भौतिक तत्त्वांपासून झाली. ग्रीकांचा अवकाश-जीवाबद्दलचा वर्ल्ड व्ह्यू अवकाशातल्या व्यवस्थेतील भौतिक तत्त्वांवर आधारलेला होता. एपिक्यूरस या ग्रीक तत्त्ववेत्त्याच्या मते ‘जग’ वा ‘kosmos’ म्हणजे एक नियंत्रित, सुनियोजित व्यवस्था. एपिक्यूरसने बहुविध विश्वाची मांडणी केली. एपिक्यूरसच्या मते हे असे जग माणसाच्या संवेदनांच्या पलीकडचे असेल, पण मानवी तर्काच्या पलीकडे नसेल. अवकाशशास्त्रातल्या अनेकतावादी विचाराला बहुविध जगाच्या कल्पनेची पुढची पायरी मानता येईल. एकमेकाला समांतर जाणारी विश्वे निर्माण होत असतात याची जाणीव हा प्रगल्भतेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याच सुमारास, थेल्स आणि अनॅग्झिमॅंडर या तत्त्ववेत्त्यांनी अनेकतावादाचा दरवाजा उघडला आणि लेऊसिपस, देमोक्रितस आणि एपिक्य़ूरससारख्या तत्त्ववेत्त्यांनी त्याला पाठिंबा दिला. पण, प्लेटो आणि अरिस्टोटलच्या काळात मांडल्या गेलेला ‘भूकेंद्रीत जग-वादा’चा प्रभाव अधिक होता. भूकेंद्रीत तत्त्वज्ञानाच्या मांडणीनुसार पृथ्वी एकमेवाद्वितीय आहे आणि पृथ्वीशिवायची दुसरी कोणतीही व्यवस्था असू शकत नाही. अरिस्टोटलने चिकित्सा केलेल्या जगात विश्व अरिय गोलाकृती सममिती मांडणीमधे रचलेले आहे. त्याच्या मते, जग गोलाकार आहे आणि या गोलाच्या केंद्राभोवती वर्तुळाकार जगे फिरत असतात. विश्वातल्या हालचाली त्रिज्येपासून केंद्रापर्यंत होत असतात. अरिस्टोटलच्या जग-रचनेत पृथ्वी केंद्रस्थानी आणि आजूबाजूचे जग केंद्राभोवती. ख्रिश्चन मध्ययुगापर्यंत हाच विचार प्रभावी होता. या विचाराला पाठिंबा देणारा असाही विचार की ईश्वराच्या अमर्याद शक्तीमुळे पृथ्वीकेंद्रीत जग त्याच्या पायाशी आहे. प्रत्येक जीव आणि वस्तू त्यांची-त्यांची ओळख या जगात वागवत असतात आणि जगाच्या मांडणीच्या साखळीत ते बांधलेले असतात. या धारणेत कुणी कुणाला परके, ‘दुसरे’ नसते. या साखळीमुळे मनुष्यप्राणी इतर प्राण्य़ांशी बोलू शकतो. साखळीतल्या प्रत्येकाने एकमेकाचा आदर ठेवणे अपेक्षित असते.

रेनेसान्स काळाने समकालीन विचारविश्वात आमुलाग्र बदल घडवून आणले. परमेश्वर आणि पृथ्वी-केंद्रीत जगाच्या कल्पनेला सूर्यकेंद्रीत जगाच्या मांडणीतून आव्हान दिले गेले. कोपर्निकसच्या विचाराने प्राचीन आणि मध्ययुगात मान्यता पावलेल्या भूकेंद्रीत जगाच्या कल्पनेला आव्हान दिले. त्याच्या मतानुसार जग वर्तुळाकार आहे आणि पृथ्वीसुद्धा. खगोलीय वस्तू वेगवेगळ्या गतीने हलत असतात आणि पृथ्वी हे विश्वातील एकच केंद्र नसून जगात इतरही अनेक केंद्रे आहेत ज्यांच्या भोवती खगोलीय हालचाली होत असतात. कोपर्निकसच्या धाडसी विचाराने त्याच्या समकालीन तत्त्वविचारात आणि सामाजिक शास्त्रात खळबळ उडवून दिली. त्याने मांडलेल्या अनेकतावादाच्या विचाराने पृथ्वी एका जागी स्थिर आहे आणि तीच विश्वाच्या केंद्रस्थानी असते या धारणेला मोडीत काढले. एका टप्प्यावर दुर्बिणीचा शोध लागला आणि असंख्य जीव आपल्याला अज्ञात असणाऱ्या जगात असू शकतात याबद्दलच्या शास्त्रीय संशोधनाला सुरुवात झाली. नवनवीन संशोधनाबरोबर ‘मनुष्य काय आहे आणि तो कोण आहे?’ अशा प्रश्नांनी नवे आयाम प्राप्त केले. किंबहुना, असे प्रश्न कधी नव्हते इतके महत्त्वपूर्ण ठरले. माणसाचे स्टेटस काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी रेनेसान्समधले तत्त्वज्ञ आपले ज्ञान पणाला लावू लागले. सोळाव्या शतकात जिओर्दानो ब्रुनो याला त्याच्या बंडखोर संशोधनासाठी ठोठावलेली जाळून मारण्याची शिक्षा याच नव्या ज्ञानपरंपरेतील एक कडी. चर्चच्या मते देवाजवळचा असणारा, सर्व प्राणिमात्रात बुद्धिमान मानला जाणारा मनुष्य हा एकटाच आहे काय? हा प्रश्न विचारवंत आणि शास्त्रज्ञांना गुंतवून टाकत होता. उदारमतवादाच्या काळात अनेकतावादाचा विचार जॉन लॉक, थॉमस पेन आणि बेंजामिन फ़्रॅंकलिन यांच्यासारख्या तत्त्वज्ञान्यांनी आणि राजकीय धुरिणांनी उचलून धरला. एका टप्प्यावर अनेकतावादाचा विचार निव्वळ अवकाशशास्त्रीय वा धर्मविद्येपुरता राहिला नाही. पुढे कान्ट याने सूर्यमालेवर भरपूर लिहिले आणि त्याने दोन महत्त्वाची निरीक्षणे मांडली. एक असे की, काही ग्रहांवर वस्ती असली तरी सर्व ग्रहांवर नाही आणि अवकाशात जसा विकास होत जाईल तशी नव्या प्राण्यांची वस्ती होत जाईल. १९६८ मधे चंद्रावर गेलेल्या ‘अपोलो ८’ या अवकाशयानाद्वारे पाठवल्या गेलेल्या फोटोंमुळे मानवी जाणिवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्या. कार्ल गुथके म्हणतात की, “टीव्हीसारख्या लोकप्रिय माध्यमाने समाजाला कोपर्निकस आणि कोपर्निकसनंतरच्या अवकाशाचे दर्शन घडवले. ‘अपोलो ८’ या यानाने कोपर्निकसच्या बौद्धिक क्रांतीची पूर्तता केली.” ‘अपोलो ८’ मधला एक अस्ट्रॉनॉट तरंगणाऱ्या पृथ्वीकडे पाहात प्रश्न विचारतो, “दुसऱ्या ग्रहावरचा एखादा प्रवासी पृथ्वीबद्दल काय विचार करेल?” त्यापुढे, नंतरच्या काळात विश्वाच्या स्वरूपाबद्दल अधिक जाणीवपूर्वक प्रश्न विचारले गेले. अवकाशाकडे पाहण्याच्या या तांत्रिक प्रगतीबरोबरच डार्विनचा सिद्धांत आणि फ़्रॉईडचे चिंतन या गोष्टींनी कोपर्निकन क्रांती पुढे नेली असे म्हणता येईल. फ़्रॉईड एके ठिकाणी लिहितो की डार्विनचे संशोधन म्हणजे, “the biological blow to human narcissism that put an end to this presumption on the part of man that he is being different from animals or superior to them.” कुणाला पटो वा न पटो, पण डार्विनचा सिद्धांत माणसाला केंद्रावरून हलवून इतर प्राणिमात्रांच्या बरोबरीने ठेवणारा होता. स्टीवन डिक अवकाशशास्त्रीय आणि जीवशास्त्रीय चिंतन एकत्र बांधून ‘जीवशास्त्रीय अवकाशशास्त्र’ ही संकल्पना मांडतात. या विचारांच्या घुसळणीतून माणूस आणि माणसाचे या विश्वातले अस्तित्व यावर चिंतन झाले आणि काही प्रश्न पुनःपुन्हा उभे राहिले: पृथ्वीवरच्या या जगापलीकडे कोण असेल? जे कुणी असेल ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील? अर्थात, या प्रश्नांची उत्तरे फक्त भौतिक वा जीवभौतिक नव्हती, तर भावनिक आणि मानसिकही होती. तत्त्वज्ञ वा अवकाशशास्त्रज्ञांबरोबर कलाकार-लेखक हे सुद्धा या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे आव्हान मानत आले आहेत. सायन्स फिक्शन कादंबरी लिहिणाऱ्यांनी अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

सायन्स फिक्शन नावाचे आधुनिक मिथ

आपल्याला ज्ञात नसलेल्या जगाकडे ‘परके जग’ अशा नजरेतून माणसाने पाहिले आहे. असे ‘परके जग’ फिक्शनमध्ये वेगवेगळ्या रूपांत, वेगवेगळ्या काळात समाजाच्या सांस्कृतिक संदर्भात येत राहिले. इंग्रजीतला परक्या जगासाठी असलेला ‘एलियन’ हा शब्द चौदाव्या शतकात युरोपला अनोळखी असणारे राष्ट्र, समाज, वा कुटुंब दर्शवण्यासाठी वापरला गेला. देव आणि दानव असोत, यक्ष वा किन्नर असोत किंवा परग्रहावरून येणारा कुणी; तो आपल्यापैकी नसतो किंवा उपरा असतो. त्याला दाखवण्यासाठी वेगवेगळी नामाभिधाने केली गेली आणि नव्या-नव्या संकल्पना आल्या. या अर्थाने, परकेपणा दाखवण्यासाठी प्रतिमा उभ्या करणे हा मानवी प्रतिभेचा खेळ बनला. या खेळाने निव्वळ बौद्धिकच नव्हे, तर भावनिक प्रतिसादही दिला. याचे प्रत्यंतर आपल्याला त्या त्या काळाच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीतून येते, तसेच ते फिक्शनमधेही दिसते. परक्या जगाचा शोध विविध ज्ञानशाखांद्वारे आणि तत्त्वज्ञानात्मक मांडणीतून घेतला गेला, तसा तो ‘भाकित कथा-साहित्य’ किंवा विज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या फिक्शन प्रकारांतून आणि चित्रपटांतूनही घेतला गेला. सायन्स फिक्शनची व्याप्ती पाहता, साहित्य वा चित्रपट या वर्गवारीपलीकडे परकेपणा आणि त्याचे माणसाशी असलेले नाते तपासले गेले आहे. पण सदर लेखाचा हेतू कथात्म साहित्याकडे पाहणे एवढाच आहे. लेखामधे चिंतनासाठी घेतलेले मुद्दे पुढीलप्रमाणॆ आहेत: ‘परके जग’ वा ‘परके लोक’ कथात्म साहित्यनिर्मितीमध्ये का येत असावेत? एखादा लेखक आपल्या कथात्म साहित्यात नेहमीच्या अनुभवाबाहेरचे जग आकळू पाहात असेल तर त्याला त्याद्वारे काय साध्य करायचे असते? त्याच्या भोवतालचे, म्हणजे पृथ्वीवरच्या जगापेक्षा वेगळे जग उभे करताना किंवा त्या जगाविषयी कल्पना करताना कोणत्या कारणांसाठी अनोळखी रूपे त्याला भुरळ घालत असतील?

माणसाची जी काही बौद्धिक आणि मानसिक उत्क्रांती झाली त्यावरून असे दिसते की माणसाच्या स्वतःचा शोध घेण्याच्या इच्छेतून त्याने अचंबित करणारी, न आकळणारी जगे निर्माण केली असावीत. या विषयावर झालेले संशोधन पाहता मानवी समुदायाचे स्वरूप, त्याच्या धारणा, त्याचा भवताल आणि भवतालाशी त्याचे नाते याचे समग्र आकलन करून घेण्यासाठी ‘आपले नसलेले’, ‘परके जग’ त्याने निर्माण केले. मग, परग्रहावरच्या व्यक्तींची भेट, एकापेक्षा अधिक तोंडे असलेल्या कुणाशी तरी त्याची पडलेली गाठ, वाट चुकून कुठल्यातरी अनोळखी जगात झालेली त्याची सैर, यातून माणूस स्वतःला पडलेल्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न करत असावा. अनोळखी, अपरिचित जग सर्जनशीलतेला आव्हान देत आले आहे. अज्ञात जग, अज्ञात माणसे फिक्शन निर्माण करण्याच्या अमर्याद शक्यता उपलब्ध करून देतात. ती माणसे, ते जग खरेच अस्तित्वात आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा नसतो. जे दिसत नाही ते जाणवते. मग, सायन्स फिक्शनमध्ये, जे ‘मानवी’ नाही त्यातून माणूस असणे म्हणजे काय या शोधाचे मिथक निर्माण केले जाते. इथे ‘मिथक’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे: माणसाला स्वतःला समजून घेण्यास प्रेरणा देणारे, या अर्थाने. वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात मिथकं तयार होत असतात. विश्वाविषयी पडलेले कोडे उलगडण्यासाठी आणि विश्वात माणसाचे स्थान तपासण्यासाठी फिक्शन लिहिणारा आपली मिथकं तयार करतो. अर्थात, मिथक-निर्मितीमधे फिक्शनकाराचा वाटा असला तरी कोणती मिथकं होऊ घालायची, याचा निर्णय घेण्यात समकालीन समाजाचे आणि संस्कृतीचे हितसंबंधही गुंतलेले असतात. निर्मितीप्रक्रियेत सहभागी होताना त्याची जीवनदृष्टी आणि श्रद्धा सोबत घेऊन कलाकार काव्यात्म मिथकांची निर्मिती करतो. सायन्स फिक्शन लिहिणाऱ्याने केलेली अज्ञात जगाची निवड किंवा त्याने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली अशक्य जगाची निर्मिती, यांचे कथन काळाच्या मर्यादेत मानवी क्षितिजे रुंदावण्यासाठी आणि काव्यात्म मिथक निर्माण करण्याच्या दिशेने उचलेले पाऊल असते.

वास्तव आणि बिन-वास्तव

सायन्स फिक्शन कादंबरीची एक साहित्यिक प्रकार म्हणून व्याख्या करून मोजक्या शब्दात त्याचे वर्णन करणे अवघड आहे. मेरी शेली, एच. जी. वेल्स आणि इतरांनी सुरुवातीची सायन्स फ़िक्शन कादंबरी लिहिली असली तरी त्यांना आपण लिहितोय ती सायन्स फिक्शन आहे याची स्पष्ट जाणीव नव्हती. किती तरी वर्षांनंतर १९२९ मध्ये ह्युगो गर्नसबॅक यांनी ‘अमेझिंग स्टोरीज’ हे पल्प मासिक सुरू केल्यानंतर सायन्स फिक्शन हे नाव पहिल्यांदा वापरले. ‘वैज्ञानिक शोधांना वा तत्त्वांना आधारभूत मानून कल्पनाविश्वाची निर्मिती करणारे फ़िक्शन’ अशा शब्दांत सायन्स फिक्शनचे केलेले वर्णन बहुतेकांना मान्य होईल. असे असले तरी, सायन्स फ़िक्शन कादंबरी म्हंणजे ‘विज्ञाना’विषयीच काहीतरी असते या पारंपरिक धारणेला १९६० नंतर बऱ्याच आधुनिक लेखकांनी फाटा दिला. उर्सुला के लग्विं ही लेखिका म्हणते, बऱ्याचदा लोकांची समजूत असते की सायन्स फ़िक्शनमधे येणाऱ्या कल्पना मेकॅनिक्स किंवा क्वांटम थिअरीतून येतात आणि असे फिक्शन नासामधे काम करणाऱ्याला किंवा ‘सायन्स’चा अभ्यास करणाऱ्या एखाद्यालाच कळते. पण शाळेत शिकणाऱ्या कुणालाही माहीत असतील अशा कल्पना सायन्स फिक्शनमधून मांडल्या जातात. विज्ञानावर आधारित कथनविश्वाबरोबर सायन्स फिक्शनमध्ये आढळणारे आणखी काही घटक पुढीलप्रमाणे सांगता येतील: रोमान्स, भयकथा, त्यातील गंमती आणि त्यावर आधारित कथने, भविष्यवाणी आणि त्यावरचे फिक्शन, परग्रहावरच्या अज्ञात जगाविषयीचे कथन इत्यादी. काही वेळेस वाटते, सायन्स फिक्शन म्हणजे विश्वाविषयीचे आकलन वेगळ्या रूपात मांडणे. एखादा असाही विचार करू शकतो की, प्रकाशन व्यवस्था आणि बाजारपेठेने पुस्तकावर सायन्स फिक्शन असा शिक्का मारला की ते सायन्स फ़िक्शन ठरते. याचा अर्थ, सायन्स फ़िक्शन म्हणजे एकच एक असे काही नाही. ओळखता येणारी एकच एक कृती सायन्स फ़िक्शन म्हणून दाखवता येणार नाही. एखादी चोख व्याख्या देऊन त्या चौकटीत कथनमीमांसा करण्यापेक्षा ज्या कथनपरंपरेत फिक्शन आकाराला येते त्याच्या प्रकाशात साहित्यप्रकाराचे विवेचन करणे अधिक फलदायी ठरेल.

फिक्शनच्या बदलत जाणाऱ्या स्वरूपाकडे पाहता वास्तवाचे दर्शन घडवणारे आणि न-घडवणारे फ़िक्शन अशी विभागणी सर्वसाधारणपणे करता येते. अर्थात, ती बाळबोध ठरू शकते. पण ऐतिहासिकदृष्ट्या, पाश्चात्त्य असो वा भारतीय साहित्य, विशेषतः अठराव्या शतकातल्या कादंबरी या साहित्यप्रकाराच्या उदयानंतर, सादर केलेले कथनविश्व आणि मानवी अनुभवविश्व यामधल्या नातेसंबंधाच्या आधारे साहित्य-चिकित्सेचा परंपरागत दृष्टिकोन तयार झाला आहे. तो म्हणजे साहित्य-लेखन वास्तवाची अनुकृती करणारी कला आहे. ‘खऱ्या’ अनुभवाच्या आधारे लेखक गुंतागुंतीच्या कृती-घटना निवडतो. काळ-अवकाशाच्या अनेक शक्यता उलगडून पाहतो आणि त्यांचे शब्दांच्या मांडणीत रूपांतरण करतो. प्रत्येक लेखकाची वास्तवाची आपली निवड असते आणि ती शैलीगत असते किंवा समाजातल्या त्याच्याशी संबंधित असलेल्या निर्मितीपरंपरांच्या चौकटीत असते. वास्तवाचे विविध तऱ्हेने निरुपण केले गेले असले/जात असले तरी ‘जीवन-सदृश’ निर्माण करणे हा साहित्यनिर्मितीचा फोकस राहिला आहे. वाचक, जग, लेखक इत्यादी घटक आणि त्यातील नातेसंबध अभ्यासायचा प्रसंग येतो तेव्हा साहित्य म्हणजे वास्तवाची अनुकृती ही भूमिका आणि चिकित्सक मांडणी-मागची तत्त्वे राहिली आहेत.

कथात्म साहित्य आपल्यासमोर जीवनसदृश कृती, वस्तू ठेवते. व्यक्ती, वस्तू आणि भवताल अशा प्रकारे साहित्यातून उभे केले जातात की त्यातून ‘खऱ्या’ जगाची आठवण यावी. संहिता विश्लेषण आणि लिखाणाची चिकित्सा यावर आधुनिक स्कॉलरशिप फोकस करते. पण जेव्हा केव्हा खोलवर जाऊन प्रेक्षक, जग, लेखक इत्यादी घटक अभ्यासायचा प्रसंग येतो तेव्हा साहित्य म्हणजे वास्तवाची अनुकृती हे त्याच्या मांडणीमागचे तत्त्व राहिले आहे. कथात्म साहित्य जीवन-सदृश कृती आणि वस्तू आपल्यासमोर ठेवते. अनुकृतीवादी साहित्यविचाराची पाळेमुळे प्लेटो आणि अरिस्टोटलच्या मांडणीत आहेत. ते दोघेही वेगवेगळ्या विचाराचे असले तरी संहिता आणि जग यामधले नातेसंबध दर्शवताना अनुकृती हे त्यांचे आधारतत्त्व राहिले आहे. कादंबरी हा प्रकार उदयाला येण्याअगोदरपासून कथनपरंपरेमध्ये नानाविध प्रकारचे फँटसी किंवा ‘भुलभुलय्या साहित्य’ प्रचलित असले आणि त्याला लोकांच्यात मान्यता असली तरी त्याबद्दल एकप्रकारचा अविश्वास राहिला आहे. अनुकृती साहित्याची चिकित्सा करताना, उदाहरणार्थ, समीक्षक रोलॉं बार्थस आपल्या S/Z या महत्त्वाच्या ग्रंथात अनुकृती साहित्याचा अपुरेपणा दाखवून देतो. फ्रेंच नवकादंबरीचा निर्माता अलन रॉबग्रिए हा तर असे प्रतिपादन करतो की अनुकृतीद्वारे कादंबरीत वास्तवाचे पुनर्निर्माण करण्याच्या प्रयत्नात मुळातले वास्तव उद्ध्वस्तच केले जाते. त्याला असे जाणवते की वास्तवाची चर्चा आणि अनुकृती करताना आपण ते अनाकलनीय करून टाकत असतो. यातून टोकाचा विचार येतो की वास्तव आणि साहित्य यांचा काही अर्थाअर्थी संबध नसतो. एकूण काय, तर विविध विचारांमध्ये सायन्स फ़िक्शन कादंबरीची चिकित्सा करणे एक आव्हान आहे. एका बाजूला, सायन्स फ़िक्शनची मांडणी भुलभुलय्या कथात्म साहित्याच्या पार्श्वभूमीवर करायची झाली तर असे म्हणावे लागेल की सायन्स फिक्शन रोमान्सपेक्षा वा हॉरर फ़िक्शनपेक्षा वेगळी आहे. असेही असते की, भुलभुलय्या कथात्म साहित्यातले अनेक प्रकार एकमेकात बांधलेले असतात आणि ते एकमेकांपासून वेगळेही असतात. दुसऱ्या बाजूला, सायन्स फ़िक्शन कादंबरीला वास्तवदर्शी साहित्यप्रकारांबरोबरीने जोखायचे तर फ़िक्शन ‘खरे’ नसते. मग प्रश्न उभा राहतो की सायन्स फ़िक्शनचे कादंबरी म्हणून वेगळेपण काय? सायन्स फ़िक्शन कादंबरी लिहिणारा लेखक भुलभुलय्या नसणारे तरीही ‘खऱ्या’ जगापासूनचे वेगळे दिसणारे जग कसे उभे करतो? अशा प्रश्नांचे एक उत्तर असे असू शकते की, सायन्स फ़िक्शनची खासीयत त्यातल्या गोष्टीत नसते, तर त्यात उभ्या केलेल्या कथनविश्वात असते.

सायन्स फ़िक्शन कादंबरी समजून घेण्यासाठी त्यातले कथनविश्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. सायन्स फ़िक्शनच्या कथनविश्वाची गंमत अशी की त्यात भुलभुलय्या असणे ही त्या विश्वाची गरज असते; आणि त्याचबरोबर, ते विश्व ‘वैज्ञानिक’ वस्तुस्थितीमधे नांगर मारून उभे राहिलेले प्रतिरुपात्म असते. भुलभुलय्या साहित्यापासून सायन्स फ़िक्शन कादंबरी वेगळी असते. ती वैज्ञानिक वा निसर्गाचे कायदेकानून समोर ठेऊन ते वाकवू शकते. पण, भुलभुलय्या कथात्म साहित्य कायदेकानून समोर न ठेवता आपले स्वतःचे कथनविश्व उभे करण्याची मुभा घेत असते. ते साहित्य मिथकांच्या आधारे अनैतिहासिक मांडणीतूनही मनुष्य आणि त्याचे किंवा त्या पल्याडचे कथनविश्व उभे करते आणि त्यामागचे लॉजिक कथनविश्वातल्या (अलौकिक) जगातच शोधावे लागते. त्यांना मानवी अनुभवांचे संदर्भ लावण्याच्या अपेक्षा नसतात. सायन्स फ़िक्शन कादंबरी माणसांचे जग उभे करते तेव्हा त्यात रेखाटलेले मानवी जीवन कसे आणि कुठल्या तऱ्हेचे आहे? आहे हे असे का आहे? माणूस (किंवा माणूस नसलेला माणूस) राहतो आहे त्या जगात का राहतो? अशा प्रश्नांना सामोरे जात कथनविश्व उभे करत असते. हे विश्व मिथक विश्वासारखे केवल वा अखेरचे नसते. माणसाचे असो किंवा परक्या जगाचे कथनविश्व असो, सायन्स फ़िक्शन कादंबरीमधल्या क्लृप्त्या, रूपे आणि कथन व्यवहार - वाजवी आणि पद्धतशीर कथनव्यवस्थेद्वारे उभे केले जाते. आपल्याला असे म्हणता येईल की सायन्स फ़िक्शन कादंबरी भवतालाचे प्रतिरूप उभे करते, पण त्या प्रतिरूपणाला खोडा घालण्याची जिद्द पात्र, नेपथ्य किंवा/आणि ‘भूभाग’ निर्मितीतून करते. बुबुळे बाहेर फ़िरवत बोलणाऱ्या एलियन (परक्या) पात्राच्या मेंदूत कॉम्प्युटरची चिप घालून त्यांना अवकाशात फ़िरवणाऱ्या सायन्स फ़िक्शन कादंबरीमधे मानवी जगाचे प्रतिरूप उभे केले असले तरी तंत्रज्ञान वा त्याद्वारे उभे केलेले कथनविश्व त्या प्रतिरूपाला वाचकापासून दूर लोटल्याचा आभास देत राहते. सायन्स फ़िक्शनमधले कथन विश्व ‘खऱ्या’ जगावर आधारलेले असले तरी ते खऱ्या जगाला अपरिचित वाटेल असे असते.

अपरिचित तत्त्व आणि नवलाईची गोष्ट

अपरिचित जगाची निर्मिती करणे सायन्स फ़िक्शन कादंबरीचे महत्त्वाचे स्वरूपवैशिष्ट्य आहे. विक्तर श्क्लोवस्की या रशियन समीक्षकाचे उदाहरण इथे घेता येईल. लेव टॉलस्टॉयच्या घोड्यावरच्या गोष्टीची समीक्षा श्क्लोवस्की करतो. या गोष्टीत माणसाच्या वागणुकीने वैतागलेल्या घोड्याची गोष्ट स्वतः घोड्याने कथन केली आहे. श्क्लोवस्की साहित्यात ‘अपरिचित’ तत्त्व आणताना लेखक कोणते तंत्र वापरतो याचे विश्लेषण श्क्लोवस्कीने केले आहे. अर्थात तो सायन्स फ़िक्शनबद्दल बोलत नसला तरी तंत्राबद्दल बोलतो. नेहमीच्या आयुष्यातला व्यवहार वा ‘भूमितीय समीकरणे’ आणि कलात्म व्यवहार यामध्ये तो फ़रक करतो. श्क्लोवस्कीच्या मते, खऱ्या कलेचा अनुभव ‘prolonged perception’ सेलिब्रेट करते. नेहमीच्या जगण्यातले व्यवहार, भाषा, भावन आणि कृती यामध्ये ‘वैचित्र्य’ आणणे हे कलेचे कार्य असते. दुसऱ्या शब्दात, गोष्टी ‘अपरिचित’ बनवण्याचे तंत्र कला देते. कलेचे हे तंत्र सायन्स फ़िक्शन कादंबरीलाही लागू पडते. माणसाला पडलेले पेच, त्याची स्वप्ने एकमेकाला परिचित असली तरी कथनतंत्र, शैलीवैचित्र्य, नाविन्यपूर्ण भाषा यातून सायन्स फ़िक्शन कादंबरी नेहमीचे जगणे अपरिचित करून दाखवते. म्हणजे, ते अपरिचित असले तरी पूर्णपणे नाही आणि परिचित असले तरी पूर्णपणे परिचयाचे वाटणार नाही असा खेळ सायन्स फ़िक्शन कादंबरीत असतो. अपरिचित आणि परिचित जगातला खेळ उभा करून नवलाईची गोष्ट सांगणे हे सायन्स फ़िक्शन कादंबरीचे वैशिष्ट्य मानता येईल. नवलाईच्या या खेळाचा नावल अनुभव वाचकाला ‘खऱ्या’ विश्वाजवळ नेत तो फ़िक्शनल बनवत असतो. जितक्या कौशल्याने नावल जग उभे केले जाते तितके सायन्स फ़िक्शन कादंबरीतले जग अनुभवविश्वापेक्षा वेगळे आणि तितकी लिहिणाऱ्याची कल्पनाशक्ती प्रगल्भ. लेखकाची कल्पनाशक्ती, त्याच्या फ़ॅन्सिज आणि त्याने केलेले प्रयोग भवतालाचे ज्ञान आणि भान देण्यात महत्त्वाचा वाटा उचलतात. आपल्या लेखनातून आणि विचार-प्रयोगातून तत्त्वज्ञांप्रमाणेच लेखकाची मनाची प्रयोगशाळा असते आणि तो तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन काही एक मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित, त्याचे कल्पनाविश्व तंत्रज्ञान वा निसर्गाच्या नियमांबरोबर जाणारे नसेल वा ते निसर्गाच्या नियमांनी बांधलेले नसेल. परंतु, त्याचे लिखाण विश्व, विश्वाचे स्वरूप आणि विश्वातले माणसा-माणसातले नाते यामधले अर्थपूर्ण पदर मांडत असते. त्याचे लिहिणे कल्पनाविश्वाप्रमाणे ज्ञानकक्षाही उजळून टाकणारे असते.

संकल्पन आणि बोधन

सायन्स फ़िक्शन कादंबरीमधून आकाराला येणारे कल्पनाविश्व संकल्पन आणि बोधन या दोन्ही पद्धतींतून आकाराला येत असते. संकल्पन पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक चिकित्सेच्या आधारावर भवतालाची चिकित्सा केली जाते तर, बोधन पद्धतीमध्ये भावविश्वावर आधारित व्यक्तिनिष्ठ प्रतिसाद असतो. समजा, सायन्स फ़िक्शनमधे एलियन्स आणि त्यांचे जग उभे करायचे असेल तर लेखक मानवी समाजाच्या विकासातली सिद्ध झालेली निरीक्षणे तर्कशुद्ध मांडणी करून आपल्या कल्पनाशक्तीद्वारे मांडेल. साहित्याच्या वेगवेगळ्या प्रवाहात वेगळेपणाचा सामना करण्यातून सायन्स फ़िक्शनला वेगळी दिशा मिळाली आहे. त्यातले एक वेगळेपण गॉथिकमधून आले. मेरी शेलीची ‘फ़्रॅकेंन्स्टिन’ ही कादंबरी त्यातला एक महत्त्वाचा प्रयोग. या कादंबरीतला महत्त्वाचा भाग म्हणजे वैचित्र्याची भेट. अर्थात, वेगळेपणाच्या निर्मितीत, विकसित होत गेलेल्या ज्ञानशाखांचा प्रभाव आहे हे आपण यापूर्वीच पाहिले आहे. अवकाश संशोधन, डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आणि सामाजिक/राजकीय बदल यातून सायन्स फ़िक्शन लिहिणाऱ्याला नवे नवे विषय मिळत गेले. एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीबरोबर भविष्याकडे पाहण्याची नवी प्रेरणा लेखकांना मिळू लागली. औद्योगिक प्रगतीबरोबर माणसाला या विश्वातले आपले स्थान बळकट करता आले तर दुसऱ्या बाजूला नवनवीन शोधांबरोबर स्वतःच्या स्थानाला आव्हान देणारे दुसरे जीव अस्तित्वात असताना आपले स्थान काय याबद्दलचे प्रश्न पडू लागले होते. विज्ञानाच्या आधारे नवे तंत्रज्ञान निर्माण करून त्यावर आधारित फ़ॅन्टसीज निर्माण करण्यात ज्य़ूल्स वर्न अशा लेखकांना मजा येऊ लागली होती. वर्न लिहू लागला होता तेव्हा नेपोलियनचा वनवासात मृत्यू होऊन सात वर्षे झाली होती. पण त्यांचे क्रांतिकारी विचार आणि डार्विनचे उत्क्रांतीचे सिद्धांत नवे लिहिणाऱ्याला खुणावत होते. ‘फ़्रॉम अर्थ टू द मून’ ही वर्णने लिहिलेली चंद्रप्रवासाची गोष्ट आहे. या किंवा त्याच्या ‘अराऊंड द मून’ या कादंबरीत एलियन्स येत नाहीत, पण पृथ्वीशिवाय इतर ठिकाणी जीवांचे अस्तित्व आहे आहे याची जाणीव दिसते. चंद्रप्रवास आणि पृथ्वीप्रवास यावर आधारित स्पेस ट्रॅवल कादंबरीप्रकारातून पृथ्वीपलीकडचे जीव आणि पृथ्वीवरचे युरोपियनांशिवायचे युरोपला ‘अज्ञात’ असणारे जीव समोर येऊ लागले. फ़िक्शनच्या माध्यमातून माणसाची स्वप्ने सत्यात उतरल्याचा आभास होऊ लागला. सायन्स फ़िक्शनमधले नवलाईचे जग अलौकिक तत्त्वांवर उभारलेले नसते. त्यांना तर्कशुद्ध, बौद्धिक तत्त्वांचा आधार असतो. नवलाईच्या जगात स्पेसशिप असेल, टाईम मशिन असेल, प्रकाशाच्या वेगाने आकाशगंगेत स्वैर संचार करणारे विचित्र प्राणिमात्र असतील. इथे संकल्पनात्मक मांडणीवर आधारलेले विचित्र जग असते. उदाहरणार्थ, लिंगभेदांची पुनर्मांडणी वा मानवी समाजाची पुनर्मांडणी करण्यासाठी उभा केलेला नवा समाज. साठनंतरच्या कादंबरीने शोषित आणि शोषक घटकांमधले राजकारण उभे करताना फ़िक्शनमधून अपरिचित जगाची निर्मिती केली हे साहजिकच होते. सायन्स फ़िक्शन कादंबरीतून नवे जग उभे करताना वर्ग आणि लिंग, वसाहतींवर आधारलेल्या भेदांना आव्हान देऊन नव्या समाजाचे स्वप्न पाहिले गेले.

टीपः लेखात ‘सायन्स फ़िक्शन कादंबरी’ ही संज्ञा ‘विज्ञान कथात्म साहित्य’ या सर्वसाधारण अर्थाने वापरली आहे. पण, लेखाद्वारे करायचे असलेले प्रतिपादन ‘विज्ञान कथात्म साहित्य’ या शब्दांपेक्षा ‘सायन्स फ़िक्शन कादंबरी’ या शब्दांमधून जास्त चपखलतेने व्यक्त होते असे या लेखकाचे म्हणणे आहे. ‘सायन्स फ़िक्शन’ या लिखित, दृक्-श्राव्य आणि/किंवा सादरीकरणाच्या मांडणीचा विशाल पट आहे. त्यामधे सिनेमा, टीव्ही सिरियल्सपासून, कथावाङ्मय आणि नाटक यांसारखे विविध प्रकार अभिप्रेत आहेत आणि त्यापैकी कादंबरी हा एक फ़िक्शन प्रकार आहे.

(लेख `नव-अनुष्टुभ'च्या नव्या अंकात आहे.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

काही शंका आहेत, पण त्यापूर्वी एक विनंती - मुद्दे मांडताना काही परिचित विज्ञान काल्पनिकांचा आधार घेऊन ते मांडले तर कदाचित अधिक स्पष्ट होतील. आता ज्यूल वर्न आणि मेरी शेलीच्या विज्ञान काल्पनिकांचा संदर्भ लेखात आहे, पण तो किंचितच आहे. शिवाय, हा त्या विधेच्या (जाँर) सुरुवातीचा म्हणजे जडणघडणीचा काळ होता. त्यानंतरच्या काळात अनेक वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण झालं. ते विचारात घेता लेखातले काही मुद्दे विज्ञान काल्पनिका ह्या लेखनप्रकाराला गरजेहून जास्त मर्यादित करणारे वाटतात. पण हा कदाचित माझ्या आकलनातला दोष असेल. म्हणून थोडा सोदाहरण मुद्देविस्तार करावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> पृथ्वीवरच्या या जगापलीकडे कोण असेल? जे कुणी असेल ते आपल्याबद्दल काय विचार करत असतील? अर्थात, या प्रश्नांची उत्तरे फक्त भौतिक वा जीवभौतिक नव्हती, तर भावनिक आणि मानसिकही होती. तत्त्वज्ञ वा अवकाशशास्त्रज्ञांबरोबर कलाकार-लेखक हे सुद्धा या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे आव्हान मानत आले आहेत. सायन्स फिक्शन कादंबरी लिहिणाऱ्यांनी अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. <<

>> लेखामधे चिंतनासाठी घेतलेले मुद्दे पुढीलप्रमाणॆ आहेत: ‘परके जग’ वा ‘परके लोक’ कथात्म साहित्यनिर्मितीमध्ये का येत असावेत? एखादा लेखक आपल्या कथात्म साहित्यात नेहमीच्या अनुभवाबाहेरचे जग आकळू पाहात असेल तर त्याला त्याद्वारे काय साध्य करायचे असते? त्याच्या भोवतालचे, म्हणजे पृथ्वीवरच्या जगापेक्षा वेगळे जग उभे करताना किंवा त्या जगाविषयी कल्पना करताना कोणत्या कारणांसाठी अनोळखी रूपे त्याला भुरळ घालत असतील? <<

चिंतनासाठी म्हणून हे मुद्दे घेणं ठीक आहे, पण 'परकं जग' ह्याची व्याख्या (लेखावरून अंदाज बांधता) पुरेशी स्पष्ट होत नाही. उदा : फ्रॅन्केस्टाईन किंवा 'ट्वेंटी थाउजंड...'मधलं जग परकं आहे की नाही? माझ्या मते आहे. 'फ्रॅन्केस्टाईन'मध्ये नव्यानं विकसित होत असलेलं आधुनिक वैद्यकशास्त्र किंवा एकंदरीत आधुनिक विज्ञान हे ते परकं जग आहे. त्याला उत्तर ध्रुवावरच्या मोहिमेची पार्श्वभूमी आहे. भूमी पादाक्रांत करण्याची आणि ज्ञान कवेत घेण्याची एकोणिसाव्या शतकातल्या माणसाची वृत्ती कादंबरीच्या गाभ्याशी आहे. परकं जग म्हणजे पृथ्वीपलीकडचं किंवा परग्रहावरचं असं विवेचन वर आल्यामुळे ते गरजेहून जास्त मर्यादित केल्यासारखं वाटतं.

ह्या नंतरचा लेखाचा भाग ('वास्तव आणि बिन-वास्तव') हा कथात्म साहित्याविषयी एकंदरीत बोलतो. त्याचा सायन्स फिक्शन आणि त्यातल्या परक्या जगाविषयीच्या तुम्ही मांडू इच्छित असलेल्या प्रश्नांशी संबंध जोडता येईल, पण तो संबंध त्या भागात फारसा जोडला जात नाही. मुद्दे आलेच तर ते काहीसे असे :

'सायन्स फ़िक्शनची खासीयत त्यातल्या गोष्टीत नसते, तर त्यात उभ्या केलेल्या कथनविश्वात असते.';
'सायन्स फ़िक्शन कादंबरीमधल्या क्लृप्त्या, रूपे आणि कथन व्यवहार वाजवी आणि पद्धतशीर कथनव्यवस्थेद्वारे उभे केले जाते.';
'सायन्स फ़िक्शनमधले कथन विश्व खऱ्या जगावर आधारलेले असले तरी ते खऱ्या जगाला अपरिचित वाटेल असे असते.'

म्हणजे इतर कथात्म साहित्य आणि सायन्स फिक्शन ह्यांमधले काही साम्य-फरक इथे दिसतात. पण ते फारच प्राथमिक स्वरूपाचे आहेत. म्हणजे त्यात सर्वसामान्य वाचकाला सहज जाणवतील अशाच गोष्टी आहेत. पण 'खऱ्या'सारख्या साहित्याकडून आणि प्लेटो-अरिस्टॉटलपासून ते एकदम रोलॉं बार्थ आणि अॅलॅं रोब-ग्रिएपर्यंत ते विवेचन गेल्यामुळे सर्वसामान्य वाचक संकल्पनांच्या ओझ्याखाली अडकेल आणि तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ह्याविषयी वाचकाचा गोंधळ उडू शकेल असं वाटतं.

नंतरच्या परिच्छेदात ('अपरिचित तत्त्व आणि नवलाईची गोष्ट') पुन्हा एकदा कथनात्मक साहित्य/कलांमध्ये दिसणारं अपरिचिततेतून किंवा वैचित्र्यातून खऱ्याविषयी काही तरी म्हणण्याचं तत्त्व सायन्स फिक्शनशी जोडून दोहोंतलं साम्य दाखवलं आहे, पण हा मुद्दा पुन्हा श्क्लोव्हस्की न वाचलेल्या माणसालादेखील परिचित असाच आहे.

शेवटचा भाग ('संकल्पन आणि बोधन') हा खरा लेखाचा गाभा म्हणता येईल. पण त्यातदेखील काही प्रश्न उद्भवतात. उदा : नेपोलियनचे क्रांतिकारी विचार कोणते? ते ज्यूल वर्नला का खुणावत होते? ते त्याच्या साहित्यात कसे दिसले? त्यातून सायन्स फिक्शनचा कोणता पैलू दिसतो? किंवा, लिंगभेदांची पुनर्मांडणी करण्यासाठी उभा केलेला नवा समाज सायन्स फिक्शनमध्ये कसा आला? इथे बहुधा उर्सुला ल ग्वॅनच्या 'द किंग वॉज प्रेग्नंट'सारख्या वाक्यांचा ('द लेफ्ट हॅन्ड अॉफ डार्कनेस', १९६९) संदर्भ असावा असं दिसतं. पण ते स्पष्ट होत नाही. बरं, 'स्वप्न सत्यात उतरणं' किंवा 'नव्या समाजाचं स्वप्न पाहणं' ह्या तुमच्या शब्दप्रयोगांना मराठीत एक रोमॅन्टिक आणि सकारात्मक भाव आहे, पण सायन्स फिक्शननं अगदी पहिल्यापासून भयस्वप्नं दाखवण्यात जो पुढाकार घेतला होता तो पाहता हा भाव नक्की कुठून येतो असा प्रश्न पडतो. किंबहुना, भौतिक जगाविषयीचं अधिकाधिक ज्ञान आत्मसात करून जगावर स्वार होऊ पाहणाऱ्या आधुनिक माणसाला अस्वस्थ करण्याचं काम सायन्स फिक्शन सातत्यानं करत आलेली असताना हे विवेचन नक्की काय आहे आणि ते कशाच्या जोरावर केलं जात आहे ह्याविषयी मूलभूत शंका पडतात.

एकंदरीत, दीर्घ लेख वाचून फारसे मुद्दे हाती येत नाहीत आणि जे येतात त्यांविषयी शंका पडतात असं वाटतं. कदाचित, लेखाला प्रतिसाद न येण्यामागे हे कारण असू शकेल. आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ही मझ्या आकलनाची मर्यादा असू शकेल.

(जाता जाता : लेखाला थोडे संदर्भ दिले असते, तर सोयीचं गेलं असतं. उदा : ह्या लेखातले मुद्दे http://deepblue.lib.umich.edu/bitstream/handle/2027.42/63996/friedman_st... इथेही आढळले, पण ते अधिक विस्तारानं आणि सोदाहरण आहेत. त्यामुळे लेख समजून घेताना त्याची मदत झाली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एका वाचनात लेखन झेपलं नाही. पुन्हा वाचुन प्रतिक्रीया देतो.
तुर्तास लेखन दोन भागात आलं असतं तर समजण्यास/आस्वादास अधिक सुकर झालं असतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद. चितांतूर जंतू.

आपण पाहिलेत तर जिथे लागेल तिथे मी संदर्भ पुरविले आहेत. अर्थात, एम एल ए शीट च्या शैलीत नाही. तसे हेतुपुरस्सर केले नाही. तुम्ही पाठवलेली लिंक मी आता पाहिली. मी यापूर्वी हे लेखन पाहिले नव्हते. वर वर चाळल्यावर असे दिसते की आपण पाठवलेल्या लिखाणाचा उद्देश वेगळा आहे. मला जर तशा उद्देशाने लिखाण करायचे असते तर मी तसे विस्ताराने आणि सोदाहरण दिले असते. पण, मला आता, तुमच्या प्रतिसादाच्या प्रकाशात माझाच लेख पुन्हा वाचल्यावर वाटते की मी काही ठिकाणी उदाहरणे दिली असती तर बरे झाले असते. पुढल्या वेळेस. पण काही ठिकाणी मी उदाहरणे पुरवून सुलभीकरण करण्याचा मार्ग पत्करला नसता. याचे एक कारण, थोड्या जागा तशाच ठेवाव्यात असे मला नेहमी वाटत आलेले आहे. दुसरे म्हणजे, जिथे वाचक इन्फ़ॉरम्ड (आधिक चांगला शब्द, सजग?) असतो अशा ठिकाणी असे लिखाण मला माझे लेखन ठेवावेसे वाटते. तसा तो ऐसी अक्षरे वर दिसतो. वाचकाला मी ’सर्वसामान्य’ (तुमचा शब्द, माझा नव्हे. हा मराठीत सढळ हाताने वापरला जाणारा शब्द कुठून आलाय माहिती नाही! आणि ती काय भानगडय!)-पण मी देत नाही. या अर्थाने मी स्वतःला लिमिट करतो असे वाटू शकेल, पण, मला तसे वाटत नाही. लिखाण म्हणजे आपला आपल्याशी संवाद असतो तसा तो वाचकांशीसुध्दा असतो. असा संवाद आपणाशीसुध्दा झाला आहे असे वाटते. तुमचे आक्षेप आले असले तरी काही मुद्दे आपल्या पर्यंत पोहचल्याची फ़ीलींग आहे. तुमच्या पुढील काही निरिक्षणावरुन तसे वाटते:

(लेखावरून अंदाज बांधता)

,

ह्या नंतरचा लेखाचा भाग ('वास्तव आणि बिन-वास्तव') हा कथात्म साहित्याविषयी एकंदरीत बोलतो.

इत्यादि इत्यादि.

इथे बहुधा उर्सुला ल ग्वॅनच्या 'द किंग वॉज प्रेग्नंट'सारख्या वाक्यांचा ('द लेफ्ट हॅन्ड अॉफ डार्कनेस', १९६९) संदर्भ असावा असं दिसतं.

हे वाचून तर मी क्षणभर प्रभावित झालो. तुम्हाला माझ्या मनातले कसे कळाले असे वाटले! आपली निरिक्षणे मी म्हणतो त्याच्याशी संवाद साधतात असे वाटते.

अर्थात, ‘जर-तर’ आहेच.

काही वेळेला ’ऋषिकेश’ सारखे वाचक म्हणतील की एका वाचनात समजले नाही. फ़ेअर इनफ़. मी लेख लिहायला बराच काळ घेतलाय. Smile मी ते काय म्हणू इच्छितात याची वाट बघेन.

माझ्झ्यासाठी ही प्रक्रिया मी चिंतन करत असलेल्या विषयाचे आकलन आधिक करुन घेण्यासाठी मला मदत करेल.

या लेखात, आपल्याला जाणवले असेल की, माझ्या चिंतनाचा एक टप्पा म्हणून मी ‘परक्या जगाची’ कल्पना/विचार सायन्स फ़िक्शन कादंबरीशी जोडून तपासून बघण्याचा प्रयत्न केलाय. पृथ्वीपलिकडचे जग हा त्या परक्या जगाचा फ़ोकस आहे. तुम्ही त्याला ’मर्यादित’केलेय म्हणता. माझ्यासारखा संशोधक त्याला फ़ोकस करणे असे म्हणतो. अजूनही मी लिखाण करत आहे त्यामधे फ़्रॅकेंनस्टाइन इत्यादी येईल. मग त्यामधे वैद्यकशास्त्राचा खराच कितपत वाटा आणि समकालिन गॉथिक सेन्सिबिलिटीचे योगदान अशी चर्चा होऊ शकेल.त्यावेळी आपण बोलूच, नव्याने.
या लेखाचा दुसरा फ़ोकस म्हणजे, कथात्मतेच्या कोणत्या शक्यता सायन्स फ़िक्शन कादंबरी मांडू शकते, हे पाहाणे. या फ़ोकसचा विस्तार मी येणा-या माझ्या काही लिखाणात करणार आहे.

पुढील वाक्ये लिहिताना तुमची काहीतरी गडबड झाली किंवा माझी समजून घ्यायला गडबड होतेय असे वाटते:

बरं, 'स्वप्न सत्यात उतरणं' किंवा 'नव्या समाजाचं स्वप्न पाहणं' ह्या तुमच्या शब्दप्रयोगांना मराठीत एक रोमॅन्टिक आणि सकारात्मक भाव आहे, पण सायन्स फिक्शननं अगदी पहिल्यापासून भयस्वप्नं दाखवण्यात जो पुढाकार घेतला होता तो पाहता हा भाव नक्की कुठून येतो असा प्रश्न पडतो. किंबहुना, भौतिक जगाविषयीचं अधिकाधिक ज्ञान आत्मसात करून जगावर स्वार होऊ पाहणाऱ्या आधुनिक माणसाला अस्वस्थ करण्याचं काम सायन्स फिक्शन सातत्यानं करत आलेली असताना हे विवेचन नक्की काय आहे आणि ते कशाच्या जोरावर केलं जात आहे ह्याविषयी मूलभूत शंका पडतात.

मला तुम्ही म्हणताय हे सगळे कळलेले आहे असे वाटत नाही. म्हणून, याला प्रतिसाद न देता आतापुरते असेच ठेवून देतो. मी पुन्हा एकदा वाचतो. वाटल्यास तुम्ही पुन्हा एकदा वाचा. संवाद पुढे जाईल तसा गडबडीचा उलगडा होईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तुम्हाला माझ्या मनातले कसे कळाले असे वाटले! आपली निरिक्षणे मी म्हणतो त्याच्याशी संवाद साधतात असे वाटते. <<

हे ठीक आहे, पण त्यातून माझा मुद्दा अधोरेखित होतो असं वाटतं - म्हणजे ह्या लिखाणातले मुद्दे कळण्यासाठी अनेक संदर्भ माहीत असणं गरजेचं वाटतं, पण असे संदर्भ माहीत नसलेला बहुसंख्य वाचक त्यामुळे दुरावण्याची शक्यता बळावते. असो.

>> मला तुम्ही म्हणताय हे सगळे कळलेले आहे असे वाटत नाही. <<

तुमच्या लिखाणातली वाक्यं खाली उद्धृत करतो आहे. त्यामुळे मुद्दा समजायला कदाचित मदत होईल.

फ़िक्शनच्या माध्यमातून माणसाची स्वप्ने सत्यात उतरल्याचा आभास होऊ लागला.

सायन्स फ़िक्शन कादंबरीतून नवे जग उभे करताना वर्ग आणि लिंग, वसाहतींवर आधारलेल्या भेदांना आव्हान देऊन नव्या समाजाचे स्वप्न पाहिले गेले.

स्वप्न सत्यात उतरणं - ड्रीम कमिंग ट्रू - ह्याला एक सकारात्मक भाव आहे. उदाहरणार्थ, घरात दरोडेखोर शिरले आहेत असं भय मला सातत्यानं वाटत असेल, आणि एक दिवस घरात खरे दरोडेखोर शिरले, तर त्याचं वर्णन 'माझं स्वप्न आज सत्यात उतरलं' असं केलं जाणार नाही. हाच मुद्दा 'नवीन जगाचं स्वप्न पाहण्याबाबत' आहे. म्हणून वर उद्धृत केलेल्या तुमच्या वाक्यांत काही सकारात्मकता अभिप्रेत आहे असं तो मजकूर वाचून वाटतं.

पण, माणसानं केलेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे सगळं काही आलबेल झालं असं सकारात्मक चित्रण सायन्स फिक्शनमध्ये सहसा नसतं. तर उलट विज्ञानात उपलब्ध झालेल्या कोणत्या तरी गोष्टीनं समस्या निर्माण झाली असं चित्रण पुष्कळदा असतं. ह्या पार्श्वभूमीवर 'स्वप्नं सत्यात उतरणं' किंवा 'नवीन जगाचं स्वप्न पाहणं' अशासारख्या वाक्प्रयोगांद्वारे सायन्स फिक्शनबद्दल तुम्हाला नक्की काय मुद्दा अभिप्रेत आहे ह्याविषयी संदेह निर्माण होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंतातूर जंतू:

फ़िक्शनच्या माध्यमातून माणसाची स्वप्ने सत्यात उतरल्याचा आभास होऊ लागला.

तुम्ही वाक्य पूर्ण वाचले असते तर बरे झाले असते. मी ’आभास’ म्हटले आहे. यावरुन

सकारात्मकता अभिप्रेत आहे असं तो मजकूर वाचून वाटतं

असे वाटण्याचे काही कारण नाही असे वाटते. अर्थात, सकारत्मकअता/नकारत्मकता असे काही ढोबळ म्हणणे इथे अभिप्रेत नसून बदललेल्या काळात, भेदाच्या राजकारणाच्या (लिंग/वर्ण) पार्श्वभूमीवर ’परक्या जगाची’ मांडणी सायन्स फ़िक्शन मधुन कशी झाली यांची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे. माणसांने पाहिलेल्या स्वप्नांचे वास्तवी जगात कोणते गुंते झाले, जगभरात भेद-विरहीत समाजाचे स्वप्न पाहिले पण त्याचे काय झाले त्याचे एका पातळीवर डार्क वर्णन पण त्याचवेळेस नवे/आदर्श जग असे काहीसे सायन्स फ़िक्शन मधून येऊ लागले. आजूबाजूला घडणा-या सामाजिक/सांस्कृतिक घटनांचा तो परिपाक होता तसाच, ‘परक्या जगा’ला घेऊन फ़िक्शनमधे नवा घाट शोधण्याचा प्रयत्न होता. उर्सुला ल ग्वी, ग्वनेथ जोन्स सारख्यांचे उदाहरण इथे पाहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायन्स फिक्शनचा माझा व्यासंग फारच सुमार आहे. लेख वाचून काही विचार डोक्यात आले ते मांडतो. अलौकिक फिक्शन, भुलभुलैय्या, स्वप्नरंजन हे उद्देश्य असलेली कलाकृती लक्षात येते, पण समाजातील 'तत्कालीन' असमानतेला भेदून समानतेचं साकारलेलं फिक्शन इतरही कादंबरी प्रकारात आढळतं, मांडणी-व्यतिरिक्त तुम्ही सांगता त्या सायन्स-फिक्शन मधे नवलाई नक्की कुठे आहे? उर्सुला ल ग्वी, ग्वनेथ जोन्स ही नावे माझ्यासाठी फारच ग्रीक आहेत, त्यामुळे तुम्हीच काही दाखले द्यावेत अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0