अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (2)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
अडगळीतल्या आठवणींचा पसारा..

सिंहलांनी तमिळांचा चालवलेला वंशविच्छेद, त्याविरुद्ध एकाकी झुंज देणारा हिकमती प्रभाकरन, त्याचे जिवावर उदार सैन्य आणि त्यांचा निर्धार. सगळेच रसायन जबरी होते माझ्यासारख्या अंड्यातुन बाहेर येऊ पाहाणार्‍या मुलाच्या दृष्टीने.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

त्या वयात अशा गोष्टींविषयी, व्यक्तींविषयी सुप्त आकर्षण वाटत असे, असे आता मागे वळून बघताना जाणवते. इतरांच्या तुलनेत माझ्याकडे वाचनाचा रतीब मोठा होता हे वर सांगितलेच आहे. स्थानिक वृत्तपत्रे फुकटात येत असत, कर्टसी म्हणून. बाहेरगावची आणि इंग्रजी वृत्तपत्रे बाबा घेत असत. सकाळी एक गठ्ठा सकाळ, पुढारी, सत्यवादी, नवसंदेश, ऐक्य, तरूण भारत, जनवाणी(का दुसरे नाव होते? बाबुराव धारवाड्यांचा पेपर, इचलकरंजीहुन निघणारा). संध्याकाळी महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ इंडिया, एक्स्प्रेस् व आधल्या दिवशीचा हिंदु. आठवड्याला इलस्ट्रेटेड वीकली, दोन आठवड्यानी फ्रंट्लाईन, स्पोर्टस्टार, आजोबांनी कधीकाळी पूर्ण वर्गणी भरली असल्यामुळे ऑर्गनायझर.

शिवाय दर शनिवारी पोलिस टाईम्स येत असे तो निराळाच. त्यातील ग्राफिक चित्रे, बटबटीत बातम्या आणि क्रूड काव्यमय शैलीतले मथळे बालमनाला फार मनोरंजक असत. पण लहान मुलांना उघड, उघड वाचायची चोरी होती. मोठ्यांनी चवीने, चघळत वाचायचा पेपर होता! पो. टा. आलेला दिसला की बाबा तो तत्काळ शेजारी देऊन टाकत. त्यामुळे तो चुकून हातात पडल्यानंतर बाबांच्या नजरेआड, एखाद्या कोपर्‍यात बसून पटापट मुख्य मजकुर वाचुन काढावा लागे. अशा फाष्ट वाचनाला स्पीड रिडींग म्हणतात हे पुढे समजले आणि कॉलेजच्या अभ्यासात उपयोगही झाला. एकदा कोल्हापुरात प्रेमचंद डोगरा आला होता. त्याचे शरीरसौष्ठव प्रदर्शन पहायला आम्ही शाहु स्मारकात गेलो. मी नुकताच सातवी-आठवीत सुर्यनमस्कार, दंड वगैरे व्यायाम सुरू केला होता त्यामुळे हा बलभीम पहायची मला उत्सुकता होती. म्हणुन मीदेखील बाबांसोबत गेलो. कार्यक्रमात शेवटी प्रेमचंदचे प्रदर्शन झाले, डोळे विस्फारुन एकेक पोझेस पाहिल्या. अशक्य काम होते सगळे! मग कार्यक्रम संपला. आम्ही बाहेर पडायला लागलो. ऑर्गनायझर होते अनंत सरनाईक, स्वतः जबरदस्त बॉडीबिल्डर. बाबांना पाहुन त्यांनी हसुन हात केला. बाबांशी गप्पा चालु झाल्या आणि मध्येच बाबा त्यांना म्हणाले, ह्याला आवडतो तुमचा पोलिस टाईम्स! मी चाटच पडलो. मला कल्पनाच नव्हती की बाबांना हे माहित आहे म्हणुन. आणि हे सरनाईक तो पेपर चालवतात?!? 'हो, आवडतो' म्हणायचीही चोरी! सरनाईक आणि बाबा हसले, मला फार लाज वाटली स्वतःची, असे आठवते. पण तेवढ्यापुरतेच. पुढच्या शनवारी पुन्हा पोलिस टाईम्सची वाट पाहिली असेल.

त्यावेळी स्थानिक पेपरात येणारे विषय, म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल वगैरे, मला फारसे आठवत नाहीत. पण महाराष्ट्र टाईम्स, एक्स्प्रेस्, वीकली, हिंदु हे फार चांगले असे बाबा म्हणत असत. त्यामुळे मी वाचायचा प्रयत्न करत असे. सातवीच्या सुट्टीत फार कष्टाने मी टॉम सॉयरची गोष्ट इंग्रजीतुन वाचली. महिना लागला असेल! पण मराठी माध्यमाच्या मुलाला कितीसे इंग्रजी येणार? म्हणुन बाबांना सांगितले की तुम्हीच तुम्हाला आवडलेले थोडे-थोडे वाचुन दाखवा. मग त्यांनी गाळीव बातम्या मला वाचुन दाखवाव्यात, कधी मराठी तर्जुमा सांगायचा तर कधी नाही. पण एकुण बातम्या वाचायची, ऐकायची आवड लागली. हे सगळे वाचन, श्रवण चालले असताना मुख्य इतिहास घडत होताच, जगात उलथापालथी सुरू होत्या आणि अनिवार्य, अनाकलनीय घटनाप्रवाहात माणसे, समाज, राष्ट्रे होत्याची नव्हती होत होती. पण मला ते फक्त वाचुन कसे कळणार? चित्रांनी, फोटोंनी ते काम सोपे केले. चमच्या-चमच्याने भरवले म्हणा ना.

भिंद्रनवालेंचा काळ फार धामधुमीचा होता. पंजाबात पुर्वी एका घरात मोठा मुलगा हिंदु आणि धाकटा शीख अशी विभागणी असायची. शीख धर्म न मानता पंथ असे सारे समजत असत पण मास्टर ताराचंदांनी, माझ्या माहितीप्रमाणे, फाळणीच्या काळात शीखांच्या वेगळेपणाचा उच्चार केला. अकालींना काटशह देण्याच्या संजय आणि इंदिराबाईंच्या युक्तीने भिंद्रनवालेंचा उदय पंजाब राजकारणात झाला. तो संत होता की नाही हे माहित नाही पण राजकारणी नव्हता हे नक्की. खालसा आणि निरंकारी असे काही असते हे मला फोटोंवरून समजले. सात मजली निळी पगडी घातलेले, पांची हत्यारे ल्यालेले ते उंचेपुरे खालसा. आणि पांढरी साधी पगडी घातलेले संत-समागमवाले निरंकारी. तर निरंकारी/खालसा वादात शिखांची यादवी सुरू झाली आणि आज आपल्याला माहित असलेल्या पंजाब प्रश्नाची वात पेटली. त्या आगीत कोणी आपली पोळी शेकली आणि कोणाचे सरपण कामी आले ते सर्वज्ञात आहे. 'फ्रॅट्रिसायडल' शब्दातच काही चिरफाड करण्याचा भाव आहे असे मला वाटते, हिंदु-शीखांच्या, शीख-शीखांच्या संघर्षात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली पण लोकांपर्यंत माहिती पोहोचत नसे, आणि बरीच सेंसॉरही होत असे. एका मोठ्या संपादकाला, लाला जगत नारायण यांना, दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात पण मराठी वर्तमानपत्रांमध्ये एकही बातमी नव्हती, अपवाद फक्त म. टा. हे बाबांनी सांगितल्याचे आठवते. घटना मी स्वतः वाचायला लागण्याआधीची आहे. टा. ऑ. इं. तेव्हाही सरकारधार्जिणा होता आणि 'इन द गुड बुक्स' राहुनच त्यांनी आजचे साम्राज्य उभे केले आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चवथा खांब असे म्हणतात, पण भारतात एक्प्रेस्, इलस्ट्रेटेड वीकली, हिंदू हे आणि असेच इतर काही त्यातले बिनीचे मानकरी म्हणावे लागतील.

अर्जनसिंह, जसजीतसिंह अरोरा, दिपेंदरसिंह हे सेनानी सरदार 'दिसत' असत. पण कुलदीपसिंह ब्रार म्हणजे सफाचट सैनिक. मग मला आमच्या वर्गातला रणजीतसिंह खर्डेकर आठवे. खानदानी मराठयांमध्ये असलेले हे 'सिंहां'चे फॅड तोवर मला माहित नव्हते. ब्रार यांच्या मुलाखती, त्यांचे निर्णायक डावपेच आणि त्यांचा अरूण वैद्यांबरोबर चालत असतानाचा फोटो मला आठवतो. त्याच्याच शेजारचा फोटो होता भिंद्रनवालेंच्या छिन्नविच्छिन्न झालेल्या चेहर्‍याचा. म्हणजे सरकारने तसे जाहिर केले होते. भिंद्रनवालेंचा उजवा हात असणारे, निवृत्त मेजर जनरल शाहबेगसिंह यांचे शव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यावरुन उठलेली राळ आठवते.

शौरी एक्प्रेसचे संपादक असताना झालेला झगडा तर पत्रकारितेसाठी प्राणांतिक असाच होता. अंतुले प्रकरणात त्यांनी कॉन्ग्रेसला दे माय, धरणी ठाय करून सोडले होते. अंतुले खुर्चीवरून पायौतार झाल्यावर आलेले बाबासाहेब भोसले यांनी छोट्या इनिंगमध्ये जोरदार बॅटिंग करून अवघ्या महाराष्ट्राला लोटपोट हसविले. कोल्हापुरात आलेले असताना त्यांना बाबांनी राजोबा-गडदे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वैमनस्याबद्दल विचारले होते तेव्हा ते असे काहीसे म्हणाले होते "चालायचंच हो! एवढं काय मनावर घेता तुम्ही पत्रकार लोक? पुर्वी एका न्हाव्यानं मिशी उडवली तर सगळ्या न्हाव्यांची भावकी बोडकी व्हायची. आता एखादा खपला तर दुसरा एखादा खपणार इतकेच!" राज्यकर्त्या व्यक्तीला समाजाच्या नाडीवर बोट ठेवुन चालावं लागतं वगैरे गैरसमज माझ्या डोक्यात कधी शिरलेच नाहित याचं कारण अशा नेत्यांची मुक्ताफळे.

मराठी पेपरात बरंच काही येत होतं. कोल्हापुर सकाळ हा त्यातल्या त्यात राज्य/राष्ट्रीय स्तरावरील बातम्या द्यायचा तर पुढारी हा इतर स्थानिक बातम्यांसाठी वाचला जायचा. म्हणजे मंगळवार पेठ व शिवाजी पेठ येथील तरुणांमध्ये कमानपाटा हाती घेऊन झालेली हाणामारी, किंवा शाहु मैदानावर फुट्बॉलच्या मॅचमध्ये प्रेक्षकांनी खुश होऊन विजेत्या संघातिल खेळाडुला प्रत्येकी २ कोंबड्या तिथल्या तिथे घोषित केल्या. अशा बातम्या आणि 'विश्वसंचार' नावाचे तुफान लोकप्रिय चौकटवजा सदर. त्याशिवाय इतर वृत्तपत्रे अनेक होती. नवसंदेश हा कल्याण्/मुंबई मटक्याच्या आकड्यांसाठी वाचला जाई. सत्यवादी हा पेपर कुस्त्यांचे रंगतदार वृत्तांत देत असे. राजकुमार पाटलांचे वडील, आता नाव आठवत नाही, चालवत असत. शाहु मिलसमोर तेव्हा असलेल्या मैदानात एडक्यांची टक्कर होत असे. मोठमोठे वळलेली शिंगे असलेले एडके मोठ्या मस्तीत उभे असायचे. एकदा जिंकलेल्या एडक्याला, त्याच्या मालकाला बक्षिस देण्यासाठी सत्यवादीचे मालक आले होते आणि ते समोर येताच अजुन मूडमध्ये असलेल्या एडक्याने धडक देऊन त्यांना आडवे केले होते!

हळुहळु वाचायची गोडी लागली आणि मग मोहरा वळला हिंदुकडे. गोष्टी घडतच होत्या तशा तेव्हा. जिनिवाहुन कोणी एक नवी पत्रकार, चित्रा सुब्रह्मण्यम नावाची, नव्या बातम्या देऊ लागली होती...

||क्रमशः||
संपादकः अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (३)

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

इचलकरंजीचे 'पत्रक' दैनिक मँचेस्टर :).....नंतर त्याचे नाव 'महासत्ता' (मटा+लोकसत्ता = महासत्ता Wink ) झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो दैनिक मँचेस्टरच! पण अजुन एक पेपर होता. गोविंदराव कालिकतेंचा असावा. त्याचे नाव असेच काहीतरी 'जन..' होते. आता नीट आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कोणते (जन...)पत्रक ते शोधावे लागेल.

'कमानपाट्या'बद्दल स्पष्टीकरण : काही जणांना कमानपाटा म्हणजे काय ते माहित नसेल. ट्रक अथवा टेंपोचे सस्पेन्शन 'लीफ स्प्रिंग' प्रकारचे असते/असत होते. सस्पेन्शन म्हणजे गाडीची जमिनीला टेकणारी चाके खड्ड्याबरहुकूम खालीवर होण्यासाठी केलेली व्यवस्था. त्यामुळे हादरे कमी होतात .(असा एक समज आहे.) तर या लीफ स्प्रिंग सस्पेन्शनमध्ये कमानीच्या आकाराच्या पोलादी पट्ट्या एकत्र बांधलेल्या असतात. त्यांना कमानपाटा म्हणतात. हे पाटे स्प्रिंग स्टीलचे असल्याने उत्तम दर्जाचे असते. यापासून तेज धारेच्या आणि बराच काळ टिकणार्‍या तलवारी बनवल्या जातात/ जात असत. रस्त्याच्या कडेला खोपटी घालून बसलेले लोहार त्या बनवून देतात/देत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमानपाट्याची अशी व्युत्पत्ती आहे होय!!! जबरदस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओघवतं लिखाण.
भाविष्यात कुणाला "तो काळ कसा होता" हे तुमच्या चष्म्यातून पहायचं असेल, तर उत्तम लिखाण.
कदाचित काही वर्षांनी ह्या आथवणी आपल्याच दोक्यातून धूसर होत जातात. त्यापेक्षा वेळिच लिहून काढलेलं उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars