अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (३)

अडगळीतल्या आठवणींचा पसारा.. (2)

त्या घडामोडींकडे वळण्याआधी एक दुसरा आठवणींचा, विचारांचा पसारा निवारायला हवा. लिहायला घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती हे असे गाय रिचीच्या फिल्मसारखे नॉन्-लिनिअर होईल. हा सगळा 'वर्म्स् आय व्ह्यु' बघताना थोडे मागे-पुढे व्हायचंच असं म्हणुया. मागे जाऊया जरा.

कॉन्ग्रेस ही एक बाधा आहे असंच आमच्या भागात, नागपुरात, सगळे म्हणायचे. मोठमोठ्या नावांपुढे खास वर्‍हाडी हेलाने 'भोऽऽसडीचा' लावल्याखेरीज आजुबाजुचे बोलत नसत. '७७ च्या आणीबाणीत मी फारच लहान होतो आणि काही कळत नव्हतं. पण तरी नागपुरातले ते दिवस मला लख्ख आठवतात. कुंपणाचे लाकडी खांब उपटायचे आणि पेटवायचे दिवस म्हणजे होळीचे! हे समीकरण मोडलं ते त्या काळात. आमच्या घराशेजारी मा.गो. वैद्यांचे घर होते. त्या एका रात्री मोठ्ठा जमाव निषेधाच्या घोषणा, शिव्या देत, इंदिरा गांधी झिंदाबाद ओरडत आमच्या रस्त्यावर चालुन आला होता. त्यांचा रोख वैद्यांच्या घराकडे असावा. घरातुन बाहेर पडायचं नाही कोणी, असं वातावरण. फार वेळ ऐकलं, ऐकलं आणि बाबा - काका दोघे गरम डोक्याने लाठ्या घेऊन बाहेर पडले. आई, आजी हात धरून थांबवू लागल्या पण दोघे हट्टाला पेटले आणि बाहेर पडले. थोडे पुढे गेले असतील, नसतील तोच मोठा धोंडा भिरभिरत आला आणि बाबांचा हात पार फोडून गेला. रक्ताची मोठी धार लागली आणि लाठी कुठच्या कुठे उडून पडली. मारामारी झाली का नाही ते आठवत नाही. शेजार्‍यांनी, आईने हिंमत करून त्यांना आत खेचून आणलं म्हणून बरं. पण तेवढ्यावर कुठलं थांबायला? आम्ही उंदरांसारखे आतल्या खोलीत बसून होतो, डोकावुन पहात होतो. तेवढ्यात समोरच्या दाराचा अडसर फोडून एक हेऽऽ मोठा बल्ल्या (लाकडाचा सोट) घरात शिरला. वाटेतल्या वस्तु फोडाफाड करत स्वैंपाकघरात येऊन थांबला. मी आश्चर्याने सगळे बघत होतो. लोक बाहेरुन शिव्या देत होते, बाहेर तर या! म्हणत होते. पण आमच्या सुदैवाने ते आत आले नाहीत. वैद्य त्यांच्या घरात नसावेत तेव्हा. कारण काही कमीजास्त न होता लोक आले तसे शिव्या देत निघून गेले.

अशा वातावरणातुन आम्ही आलेलो, कोल्हापुरात, कॉन्ग्रेसच्या चिरेबंदी गडात! दर दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत (हो! उन्हाळ्याच्या सुद्धा!) नागपुरची फेरी ठरलेली, महाराष्ट्र एक्स्प्रेस ह्या ३० तास घेणार्‍या ढकलगाडीतुन. अधेमधे ब्रेक-जर्नी. शेगाव-खामगांव, भुसावळ. मोठी गंमत यायची. '८३ च्या दिवाळीच्या सुट्टीत मला कपिल देव ह्या माणसाने केलेले पराक्रम समजले, क्रिकेट हा खेळ असतो हे समजले आणि पेपरातली चित्रे गोळा करायला सुरवात झाली.

'८४ च्या दिवाळीच्या सुट्टीत मी बदललो. घडले ते असे:

दिवाळी ऑक्टोबर महिन्यात आली होती. फराळ, फटाके अशी सगळी धमाल होती. ३१ ऑक्टोबरचा दिवस काही वेगळा नव्हता. अमर-ज्योती मंगल कार्यालयाजवळ मामा रहात होता, त्याच्या घराच्या अंगणात सकाळी खेळत होतो. तेवढ्यात मामाचा साळा, अनिल, धावत घरात शिरला आणि जरा वेळानं धावत बाहेर आला. मी म्हटलं का रे अनिलमामा, काय झालं? तो दोन मिनिटं बघत राहिला आणि म्हणाला 'इंदिरा गांधींना ठार मारले रे!' कोणी मारले हे कुणाला माहित नसावे. पण प्रत्येकाला धाकधुक वाटत होती. मग मामा घाईघाईने आला आणि मला आत घेऊन गेला. त्यानंतर दुपारी बाहेर धांदल उडालेली दिसली. समोरच्या हितवादच्या ऑफिससमोर लोक गोळा झाले होते आणि माहिती मिळवायचा प्रयत्न करत होते. तोवर उडत उडत समजले होते की पंतप्रधानांना त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या घातल्या होत्या. बिअंतसिंह आणि सतवंतसिंह ही नावे संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी होती. ती संध्याकाळ नाही नाही त्या चर्चा करण्यात गेली. महात्मा गांधींना मारले त्यानंतर झालेले 'ब्रह्मसत्र' बर्‍याच लोकांना महितीहोते. त्याच्या कटू आठवणी निघाल्या आणि शेवटी एका विचारावर सगळे थांबले. शीखांसाठी उद्याचा दिवस काळ असणार!

पण तेवढे थांबायला लोकांना वेळ नव्हता, त्याच रात्री नागपुरात एका शीख ढाबेवाल्याला जाळले, त्याच्याच बाजेला बांधुन. दुसर्‍या दिवशी तयारी जास्त 'प्रोफेशनल' झालेली असावी. शहरभर 'इंदिराजी के हत्यारों को फांसी दो, फांसी दो' असे नारे देत घोळके हिंडू लागले होते. दिसेल त्या शीखाला केस धरून, ओढून, लाथा-बुक्क्यांनी तुडवत जमाव न्याय करू लागला होता. मी स्कूटरवर मागे बसून बर्डीवर जात असताना हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला आहे. अर्थात माझ्या लेखी तो फारसा घृणास्पद प्रकारच नव्हता त्यावेळी! कांगारू कोर्ट प्रत्येक माणसाच्या (आणि मुलांच्याही) मनात लपलेलं असतंच आणि म्हणुनच जमावाचे मानसिक वय लहान मुलापेक्षा मोठं नसतं हे मला पटतं. हा झटपट न्याय करण्याचा पायंडा आपल्याच अंगाशी येऊ शकतो हे जेव्हा सर्वांना कळेल तेव्हा माणसाची जात सुधरेल. अर्थात हे दिवास्वप्नच रहाणार. तसा समजावायचा प्रामाणिक प्रयत्न, सर्वार्थाने, एका म्हातार्‍याने केला होता. त्याच्या मागे, नव्हे त्याच्या हयातीतच, त्याच्या विचारांचे काय कडबोळे झाले ते काय सांगायला पाहिजे? असा अनैतिहासिक दृष्टीचा ऐतिहासिक पुरुष जगात दुसरा झाला नाही असे कुरुंदकर म्हणतात, ते काही खोटे नाही.

त्या प्रसंगांनी मला जाण आली. माणसे मारामारी करतात, ते मुले मारामारी करतात तसे नसते, हे प्रत्यक्ष कळाले! आजही मला वाटते की त्या अनुभवा-आधीचा आणि नंतरचा मी यात एक दरी आहे, जी सांधता येत नाही. I know it's no use going back to yesterday, because I was a different person then. पेपर, पुस्तके वाचुन जे बापजन्मात समजले नसते ते एका क्षणात समजले. मोठे व्हायची किंमत निरागसपणा, चांगुलपणाला मोठमोठे पोचे पडणे असावी ही आपली शोकात्मिका. शोकांतिका म्हणत नाही कारण नवी पिढी तो निरागसपणा घेऊन येतेच आणि चक्र चालुच रहातं. हे असंच चालु रहाणार हा ऐतिहासिक, डोळस दृष्टिकोन. पण त्या म्हातार्‍यासारखे वेडे व्हावेत, होत रहावेत. इतिहास बी डॅम्ड्! माणुसपणा त्यातच आहे.

त्या मोठ्या भुकंपानंतर (डार्क पन् इंटेन्डेड) मग एकामागुन एक घटना घडायला लागल्या. पेपर्स फेथफुली गाळीव वृत्तांत सांगु लागले. गेलेल्यांचे आकडे समजू लागले. मेलेली माणसे इतरांसाठी आकडे होऊन राहिली. आकडे मनातुन झाडता येतात, नावे नाहीत. तेवढे निलाजरे आपण झालो नाही हीच समाधानाची बाब! पण खरंच एक दिवस सगळ्या मारलेल्यांचे फोटोसहित नाव/पत्ते एका पेपरात यायला हवे होते असं मला वाटतं. हजार पानी पेपर काढावा लागला तरी बेहत्तर! निदान लाज वाटुन तरी ते सगळे थांबलं असतं. बरं! कदाचित नसतंही. माणसांची लांडगेतोड होत असताना सगळ्या साक्षेपी संपादकांत एकही खमका निघाला नाही. कदाचित माझ्या वाचनात, ऐकण्यात आले नसेल म्हणुया. सारे क्षीण आवाजात हळहळत. राजा ओंगळ, नागडा आहे हे ठणकावुन सांगायचे धैर्य कोणीही दाखवले नाही. ठेचलेले लोक हंबरडा फोडत कोर्टाकडे धावले आणि नावं समोर यायला लागली. एच के एल भगत, सज्जनकुमार, राजेश पायलट, ललीत माकन, ब्रह्मानंद गुप्ता.... ललीत माकन हे शंकरदयाळ शर्मांचे जावई. अतिरेक्यांच्या गोळ्यांना नंतर बळी पडले आणि सुडाचा एक चॅप्टर संपला. पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो जवळजवळ दोन वर्षांनी. जनरल वैद्यांची पुण्यात कॅम्पात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली तेव्हा.

हे सगळं तांडव सुरू असताना पंजाब बदलत होता. रिबेरोंवर प्राणघातक हल्ला झाला आणि सरकारने त्यांना बाजुला करून एक नवा पोलिसप्रमुख नेमला: के.पी.एस. गिल!

गोळीला उत्तर मोठी गोळी. ईंट का जवाब़ पत्थर. एक पोलिस गेला तर मारणार्‍याचे ३ नातेवाईक गेले. मारणाराही गेला. सीमेवर कुंपण पक्कं झाल्यावर पळवाटा बंद झाल्या आणि अतिरेकी प्रेशर कुकरमध्ये सापडले. एकेक करून सारे म्होरके मारले गेले. काही कॅनडातुन पत्रकं वाटण्यापुरते राहिले, काही न्युयॉर्कच्या रस्त्यांवर निषेधमोर्चे काढुन धुगधुगी कायम ठेवु लागले. तसे काही शीख मला सॅन होजेच्या गुरुद्वारात बरेचदा दिसले होते. राज करेगा खालसा! च्या खाली भिंद्रनवालेंचा फोटो असलेला टी-शर्ट घालुन एक पिकलेला म्हातारा हळुहळु पायर्‍या चढत होता. लंगरमध्येही तो फोटो होताच आणि शेजारी गुरू गोविंदसिंहांचा! पण जेवण छान होते, कीर्तन छान होते, रागींचे गायन छान होते. केशधारी आणि मोना शीख एकत्र मिसळत होते. अमेरिकेचा मेल्टिंग पॉट सगळ्यांना घुसळून काढत होता.

'८७ च्या ब्लॅक थंडर नंतर दहशतवाद पंजाबातुन खरवडून काढला गेला. '९२ पर्यंत पाळंमुळं खणून काढली गेली.

त्यावेळी भारतात काय काय सुरू होतं? सुभाष घिसिंग गोरखालँड चळवळ चालवत होते. आयझॅक्-मुईवा नागांचा प्रश्न पेटवत ठेवत होते. लालडेंगा मिझो नॅशनल फ्रंट चालवत होते. मणिपुरात कांगलैपाक पार्टी सुरू झाली होती. नक्षलवाद दबा धरून होता. भोपाळ दुर्घटनेचे रामायण सुरू झाले होते. आसाम विद्यार्थी चळवळ सत्तेत आली होती. महंता आता विरोधकाच्या भुमिकेतुन राज्यकर्त्याच्या भुमिकेत आले होते. तमिळनाडुत द्रविड पार्ट्या लंकेतल्या आगीत तेल ओतत होत्या.

सगळा भवताल खदखदत होता..

||क्रमशः||

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

एकापाथोपाठ एक तीनही भाग वाचले. अतिशय प्रवाही लेखन - स्मरणरंजन - आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकापाठोपाठ एक तीनही भाग वाचले. अतिशय प्रवाही लेखन - स्मरणरंजन - आहे.

अगदी असेच म्हणतो. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समृद्ध अडगळ आहे _/\_
पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

ऋषिकेश आणि अस्मि दोघांशीही सहमत.

सुरुवात मला वाटतं पुस्तकांपासून झाली होती. पुस्तकांबद्दल वाचताना सतीश काळसेकरांच्या 'पुस्तके साठत जातात' या कवितेची आठवण झाली होती. पण मग लेखानं वळण घेतलं. राजकीय-सामाजिक परिस्थितीतली स्थित्यंतरं, माध्यमं आणि माणसं... लेखात इतकी प्रचंड माहिती (नावं, ठिकाणं, घटना) आहे, की त्याला जंत्रीचं स्वरूप येणं सहज शक्य होतं. पण तसं झालं नाही. अतिशय चांगल्या अर्थानं समतोल-निष्पक्षपाती असलेला, पण निष्प्राण-स्थितप्रज्ञ न झालेला लेख.

लवकर पुढचा भाग लिहा. तुम्ही या आठवणमालेचा शेवट कसा करता ते पाहायची अपार उत्सुकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मलाही उत्सुकता आहे. या लेखाचा ट्रिगर पुस्तकं आवरणे हा होता तसंच शेखर गुप्तांनी लंकेबद्दल लिहिलेली ३ लेखांची अप्रतीम मालिका हासुद्धा आहेच. हे ते ३ लेखः

http://www.indianexpress.com/news/such-a-long-lankan-journey/1167330/

http://www.indianexpress.com/news/dead-men-talking/1167902/

http://www.indianexpress.com/news/uncovering-the-war/1168571/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक आणि विवेचक स्मरणरंजन आवडले. स्वतःविषयी तटस्थ मनाने केलेल्या नोंदी आणि त्या अनुषंगाने केलेली माहितीची पखरण यामुळे लिखाण मनोरंजक झालेय. पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या वर्षी या आठवड्यात या सदराच्यामुळॅ हे लेखन पुन्हा वाचले गेले. पुन्हा अतिशय आवडले!

तुम्ही हल्ली फारसे लिहित नाही. लिहित जा, वाचायला आवडेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय, सध्या ऐसीवर चाललेल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अशा लेखनाची आठवण फार वेळा होते बॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हो ना. छुपे ट्रोल, स्वयंघोषित ट्रोल, पुरोगामी, प्रतिगामी, आस्तिक, नास्तिक, छुपा निषेध, जाहीर निषेध, रोचक प्रतिसाद, उद्बोधक विदा, कांदा, लसूण...

लय पिडतात, नै? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला!

ज्या दिवशी इंदीरा गांधी ह्यांची हत्या झाली त्या दिवशी आम्ही म्ह. आमचा अख्खा ४० एक जणांचा ग्रुप नेमका अमृतसर वरुन निघालेलो पोहोचायचं ठीकाण होतं श्रीनगर. गाडीवाहक शीख होता.
आमची बस साधारण दुपारी एक च्या सुमारास कुठल्यातरी घाटात असताना हत्येची बातमी समजली.
त्याच मार्गावर पुढे तर अति अति दबावपूर्ण वातावरणात तो प्रवास पार पडल्याचं आठवतयं.
एक तर चालक शीख होता म्हणुन असेल, आणि दुसरं म्हणजे मिलिटरी च्या गाड्यांनी न भुतो न भविष्यती अश्या प्रकाराने येणा-जाणार्‍या सगळ्या गाड्यांची जी काही कसुन तपासणी करायला सुरुवात केली होती कि एक कागदाचा चिटोराही जर संशयास्पद वाटला तरी अख्खी बस, गाडी रिकामी करुन, त्यातल्या प्रवाशांची चौकशी करुन, गाड्या दरित ढकलुन देत होते, गाड्या जाळुन टाकत होते.
हे सगळं जेव्हा प्रत्यक्ष बघितलं तेव्हा जे काही धाबं दणाणलं होतं त्या बद्द्ल सगळे चिडीचुप होते. मी तर बरीच लहान होते पण आई बाबांच्या बोलण्यातुन ह्या प्रसंगाचं गांभिर्य कळत गेलं.
कसंबसं श्रीनगर ला पोहोचल्यावर ६ दिवसांच्या कर्फ्यु मध्ये हळु हळु दंगलीं बद्दल कळत गेलं.
१९८४ मध्ये नशिबाने जम्मु काश्मीर खरंच शांत, सुंदर आणी निसर्गाने भुरळ पडावी असं होतं.

म्हंटल्या तर अडगळीतल्याच ह्या ही आठवणी. नको म्ह्ंटलं तरी येतात, आणि नेमकं विसरायला लावतात.पण कधी कधी मोठ्या ग्रुप चा असाही फायदाच होतो. जश्या कटु आठवणी उजळणीत रेंगाळतात, तश्याच सुखद आठवणींनाही थोडी जागा मिळते त्या पसार्‍यात.

--
मयुरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचल्यावर "आदर" एवढा एकच शब्द सुचतोय. इंदिरा-हत्येवेळी मी जेमतेम ५ वर्षांची होते, त्यामुळे हा बराचसा इतिहास मला अनुभवायला मिळाला नाही, त्यापासून कुठेतरी "दूरस्थ" वाटत राहिलं. ह्या लेखांमुळे ती भावना बरीचशी कमी झाली, आणि या विषयांवर वाचनाचा श्रीगणेशा तरी झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/