टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं
मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. दूरदर्शनचं ते ’टॅऽऽणॅणॅणॅ-टॅणॅणॅऽऽणॅणॅऽऽ’, माना वेळावून मानेचे व्यायाम दाखवणारा दाढीवाला सरदारजी, मूकबधिरांसाठीच्या बातम्या, ’एक चिडिया... अनेक चिडिया’वालं ऍनिमेशन, ’मिले सूर मेरा तुम्हारा’... असं करत करत नाना रस्ते घेता येतील नि शेवटी आपण ’काय साला दर्जा असायचा त्या काळात टीव्हीचा! नाहीतर हल्ली...’पर्यंत एकमुखानं येऊन पोहोचू.
पण ते कढ पुढे कधीतरी काढू. तूर्तास तरी हा लेख माझ्याबद्दलचा आहे.
तर - मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. इतका की, एकदा वर्षाअखेर दाखवला जाणारा निवडक गाण्यांचा ’सुपरहिट मुकाबला’ काही कारणानं हुकला, तर मी हमसून हमसून रडले होते. माझ्या टीव्ही बघण्यावर आईबापाचा प्रचंड अन्यायकारक आक्षेप असे नि त्या काळात आमच्यातले मेजर खटके (उर्फ एकाधिकारशाहीविरुद्धची बंडं उर्फ तमाशे) टीव्ही या एकमात्र कारणावरून उडत. तेव्हा आमच्याकडे खटके पाडून च्यानेलं बदलणारा (सगळी मिळून दोन. नॅशनल नि मेट्रो. अजून एक च्यानेल कधीतरी सरकारकृपेनं दिसत असे. त्यावर रात्री अकरा वाजता चार्ली चॅप्लिन, गुरुदत्त या मंडळींचे काही सिनेमे पाहिल्याचे आठवतात. त्यातही ’कशी मी जागून, क्लॅरिटी नसलेल्या च्यानेलावर दर्जेदार सिनेमाचा अभ्यास कम रसग्रहण करू पाहतेय, पण आईबापाला किंमत नाही’ हा एकूण नूर. (असो. या लेखाचा बराचसा भाग अनुक्रमे नॉस्टेल्जिया वारण्यात नि त्याला शरण जाण्यात खर्ची पडणार आहे.) तर, असो.), शटर सरकावून पडदा बंद करणारा ब्लॅकऍण्डव्हाइट टीव्ही होता. ’केबल असली की अभ्यास होत नाही’ या तेव्हाच्या पालकप्रिय समजुतीप्रमाणे केबल फक्त मे महिन्याच्या सुटीत जोडण्याचा प्रघात होता. (हल्ली मुलांचे अभ्यास कसे होतात कुणास ठाऊक. बहुदा ही समजूत मोबाईलमार्गे इंटरनेटकडे सरकली असणार. तत्कालीन माध्यमांतलं सगळ्यांत प्रगत नि सगळ्यांत रोचक असं जे काही प्रकरण असतं, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही असं हे समीकरण दिसतं.) परिणामी मला मेट्रोशिवाय तरणोपाय नसे. पण म्हणून काही अडलं असं नाही. मैदानी खेळांचं नि माझं सख्य तसंही कधीच नव्हतं. घनिष्ट मैत्रीही शाळेतच. त्यामुळे दिवसातला शाळेचा आणि झोपेचा वेळ वगळता बहुतांश वेळ मी टीव्हीला वाहिलेली असे. चष्म्याचा नंबर वाढणं आणि सामाजिक कौशल्यं जेमतेम पासापुरती असणं या दोन गोष्टी सोडल्या तर टीव्हीनं माझ्यासाठी पुस्तकांच्या खालोखाल महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमा या माझ्या प्रचंड आवडत्या विषयाशी ओळख करून दिली ती टीव्हीनंच. अधलामधला संतापजनक जाहिरातींचा व्यत्यय सहन करून मी इतके सिनेमे कसे काय पाहिले हे आजच्या मला अगम्य वाटतं. पण तेव्हा त्या जाहिरातींचं, ’फक्त सुटीत केबल मिळेल’ या दंडेलीचं, अशक्य वाईट दर्जाच्या थेटरप्रिंट्सचं इतकं काही वाटत नसे हे खरंच. सुटीच्या काळात तर मी दिवसाला पाचपाच सिनेमेही पाहिल्याचं आठवतं. (आईबाप बोलून थकले. चष्म्याच्या अधिकाधिक स्मार्ट फ्रेम्स येत गेल्या. अभ्यास आणि व्यायाम या गोष्टींची एकूण आयुष्यातली नगण्य पण अपरिहार्य जागा मी स्वीकारली. पण त्या काळात टीव्हीचं प्रमाण मात्र अटळ राहिलं.) परिणामी मी हिंदी सिनेमा (नट, दिग्दर्शक, त्यांची खाजगी आयुष्यं, एकुणात अभिरुचीबद्दलचं झेपेल तितपत आकलन, समांतर आणि मुख्यधारेतला सिनेमा इत्यादी सवतेसुभे, विशिष्ट वर्षांत गाजलेले, पडलेले, चाललेले, चांगलेवाईट सिनेमे, त्यांतली गाणी नि ड्वायलॉक) या विषयात पुरेशी अधिकारवाणी आणि बरंच बरंवाईट पाहून झाल्यावर येणारी जाणकार उदासीनता कमावली. (हीच उदासीनता प्रमाणाबाहेर वाढली की ती आपल्याला ’बनचुके’ हे लेबल बहाल करते हे ज्ञानही यथावकाश झालं, पण त्याकरता एका प्रेमभंगाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून जावं लागलं. असो. असो.) कुठल्याही एका विषयात आवडीनं नि झपाटून अशी - आपल्यापुरती का होईना - अधिकारवाणी कमावताना किती विषयांमधे रानोमाळ हिंडून होतं, किती गोष्टी काठाकाठानं आपोआप समजत जातात ते आता लक्षात येतं.
त्यामुळे आता टीव्ही आणि मी (आणि टीव्ही आणि पालक, पालक आणि मी) यांच्यातलं नातं पार उलटंपालटं झालेलं असलं, तरी टीव्हीबद्दलच्या नॉस्टाल्जियाला मी थोडी तरी विकली जातेच.
***
टीव्हीमुळे घरकोंबडे असलेले माझे समवयस्क संध्याकाळी बाहेर पडू लागायला बहरता राममारुती रोड हे एक कारण होतं, तसं डेली सोप्स हेही एक महत्त्वाचं कारण होतं. निदान माझ्यासाठी तरी होतंच होतं. (एकदा संध्याकाळी बाहेर पडायला लागल्यावर त्यातले अनेक रंगीबेरंगी फायदे मला यथावकाश कळत गेले ते निराळं. पण निमित्त मात्र टीव्ही असह्य होण्याचंच होतं.)
त्याच काळात मराठी वाहिन्या एकाएकी विऊन बसल्या. काही लायकीचे कार्यक्रम झाले, नाही असं नाही; (आता आठवून लैच धमाल येते, पण तेव्हा लोक ’नक्षत्रांचे देणे’चं तिकीट मिळवायला धडपडत नि ते मिळाल्यास प्रेक्षकांत झळकून आप्तमित्रांत त्याचा पुरावा देऊन यथाशक्ती मिरवत.) पण त्यांच्याही कॉप्या निघाल्या. पॉप्युलर पुस्तकांवर मालिका निघून संपल्या. नि मग टीव्हीत काही बरं करावं, त्याकरता कष्ट घ्यावेत, कौटुंबिक घमणसा सोडून इतर काही लिहावं... याचा टीव्हीतल्या लोकांना एकदम सामूहिक कंटाळाच आला. गणपती आला, की हर एक मालिकेत लोक नटूनसजून गणपती आणून बसवत. सगळीकडे नुसत्या सुबक-सुरेल-सजावटी आरत्याच. दिवाळी आली, की सगळ्या मालिकांत दिवाळीच. यच्चयावत मालिकांतल्या बायका नटूनसजून ठुमकत ठुमकत व्हरांड्यात येणार, पणती ठेवणार नि कुर्त्यातले पुरुष त्यांच्याशी माफक रोमॅण्टिक चेष्टामस्करी करणार. सण साजरे करायची कोण अहमहमिका. (तोवर सण साजरे करणं म्हणजे आपली संस्कृती जपणं असा आचरट फण्डा रूढ व्हायचा होता. तो व्हायला तिथूनच सुरुवात झाली असणार. लोक आधी या फण्ड्याला बळी पडले की टीव्हीनं आधी त्याची टूम काढली याचं उत्तर नेहमीप्रमाणे वादग्रस्तच, त्यामुळे ते मरो. पण स्वत:च्या लग्नात नऊवारी साड्या नि धोतरं नेसून संस्कृती जपणं (जशी काही होललॉट महाराष्ट्राची संस्कृती ब्राह्मणी लुगड्यात नि नथीत गहाण पडली होती), दसर्याच्या आदल्या रात्री सामूहिक दीपोत्सव नि चैत्रपाडव्याला शोभायात्रा साजर्या करणं, मराठी भावगीतं हा संस्कृतीचा अत्युच्च मानबिंदू असल्याच्या थाटात ’दिवाळी पहाट’ ष्टाईलचे कार्यक्रम करणं नि ऐकणं... हे सगळं त्याच काळात उपटलं.) अशा निरनिराळ्या लाटा येत राहिल्या. (’आजतक’ हा एक बातम्यांचा चांगला कार्यक्रम होता. तो हिंदी न्यूजच्यानेलांमधला ’पुण्यनगरी’ होण्यापर्यंतचा प्रवासही याच दिवसांतला. (पण न्यूज च्यानेलांच्या वाट्याला नको जाऊ या. ते एक स्वतंत्र प्रकरणच आहे.) हिंदी सिनेमे, सिनेमातली गाणी आणि टेस्ट क्रिकेटही हे सगळंही गप ब्याकफूटला गेलं. गाणी जाऊन सिनेमांचे प्रोमोज दिसायला लागले.) चराचर व्यापून फक्त मालिकाच काय त्या उरल्या.
सण झाल्यावर काही काळ लफडी करणार्या स्त्रीपुरुषांचा जोर होता. मग कपाळावर नागकुंकू काढणार्या मॉडर्न खलनायिका आणि त्यांच्याशी तुलनेला साटोपचंद्रिका तुपाळ आदर्श नायिका असा एक जमाना होता. मग बराच काळ खलनायिकांनी निरनिराळी कारस्थानं करायची, सज्जन नायकांनी त्या कारस्थानांतून साटोपचंद्रिकांना वाचवायचं आणि आपली सॅडिस्टिक कल्पनाशक्ती पणाला लावलावून खलनायिकांना शिक्षा करायच्या असा एक प्रकार होता. (चांगल्या पन्नाशीतल्या कर्त्यासवरत्या बायकांना अंगठे धरून उभे करणे, तोंडाला काळे फासून घरभर फिरवणे, उठाबशा काढायला लावणे वगैरे शिक्षा बघून मी आणि मैत्रिणीनं फेटिश या अद्भुत प्रकारावर चर्चा केलेली आठवते. असो.) सध्या लग्न या गोष्टीची चलती आहे. लग्नाळलेले, लग्नाला बिचकलेले, लग्न करून मग प्रेमात पडलेले, एकत्र कुटुंबामुळे लग्न नको / हवं असलेले... असे नाना प्रकार. लग्नाची पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट... फ्याक्टरी चालू.
माझ्या हातातला रिमोट पालकांच्या हातात जाणे आणि टीव्हीची आयुष्यातली जागा कमी होत जाणे हे महत्त्वाचं स्थित्यंतर याच काळात झालं.
***
टीव्हीची बाजू घेऊन माझ्याशी भांडायची वेळ कुणावर येणार नाही. कारण मी माझ्या ष्टाईलनं त्या माध्यमाचा पुरेपूर फायदा घेऊन बसले आहे. पण आता मला काही प्रश्नही पडले आहेत. टीव्ही अजून तगून आहे खरा. पण आघाडीचं माध्यम म्हणून त्याची जागा अजून शाबूत आहे का? की इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगनं ती जागा घेतली आहे? हल्ली लोक टीव्हीवर आवर्जून काय पाहतात? (कृपा करा आणि त्या ’आई, शू करायला जाऊ का?’ असं विचारणार्या चाळिशीतल्या मद्दड बायका असलेल्या सिर्यलचं नाव सांगू नका. राडा होईल. असो.) टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का?
मला या प्रश्नांच्या उत्तरांत मनापासून रस आहे, कारण लोकांना मी घरकोंबडी-चष्मिष्ट-मद्दड वाटत असू शकत असेन अशा काळात मी टीव्हीपासून खूप काही मिळवलं आहे. खरोखर मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे...
टीव्हीबाबत माझ्याही तशा रम्य
टीव्हीबाबत माझ्याही तशा रम्य आठवणीच आहेत. एकतर तेव्हा जेमतेम चार तास चालू असलेला टीव्हीने आपले हातपाय पसरायला सुरूवात केली होती. त्यामुळे अजीर्ण नव्हतं तशीच निवडही नव्हती. आमच्या घरी टीव्ही नव्हता तेव्हाही रविवारी सकाळी 'साप्ताहिकी' बघणं हाही न चुकवण्याचा प्रसंग असायचा. भक्ती बर्वे आपल्या लाडिक ठसकेबाज शब्दांत पुढच्या आठवड्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयी सांगायची. आणि काही विशेष कार्यक्रमांच्या झलकी दिसायच्या. हे बघणं म्हणजे अनेकांसाठी अपार आनंद असायचा. नंतर थोड्या कळत्या वयात रविवारी सकाळी दिसणारं 'ही मॅन', 'स्टार ट्रेक' आईने केलेलं इडली सांबार किंवा पोहे वगैरे खात बघणं म्हणजे पर्वणीच असायची.
संध्याकाळी नेटवर्क टीव्ही वगैरे काहीतरी सुरू झालं तेव्हा एकदम सीरियल्सचा रतीब लागला. थोर्थोर लेखकांच्या थोर्थोर कथांवर आधारलेल्या त्यात 'दर्पण' वगैरे सारख्या सीरियल्सचही पीक आलं होतं. त्यात ओहेन्रीच्या गोग्गोड कथा भरपूर असायच्या. थोर्थोर कथा संपून गेल्या म्हणून बहुतेक ते थांबलं असावं. ये जो है जिंदगी, नुक्कड वगैरे सीरियल्सनी माझ्याही टीव्हीप्रेमी संस्कारक्षम मनावर नक्की काय संस्कार केले माहित नाही. पण त्यावेळी मजा आली खरी. आमचं आख्खं कुटुंबच तसं घरबसं होतं. त्यामुळे
बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. 'आता एक वेळ अशी येणार आहे की टीव्ही, फोन, कॉंप्युटर, म्यूझिक प्लेअर वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी राहणार नाहीत. त्या एकमेकांमध्ये मिसळून जातील.' तेव्हा त्या लेखकालाही कल्पना नसेल इतकी घुसळण झालेली आहे - विशेषतः स्मार्टफोनमुळे. त्यामुळे टीव्हीच्या काही जबाबदाऱ्या इंटरनेटने घेतल्या आणि डोळ्यासमोरच्या स्क्रीनवर कुठच्यातरी टीव्ही कंपनीने तयार केलेल्या कार्यक्रमापलिकडेही अक्षरशः अगणित गोष्टी सापडतात.
आमच्या घरी केबल नाही. आम्ही फक्त नेटफ्लिक्सवर ऑन डिमांड गोष्टी पाहतो. बाकी वेळ नेटवरच वाचन, लेखन वगैरेमध्ये जातो.
लेख आवडला.गुरुदत्त, राज
लेख आवडला.
गुरुदत्त, राज कपुरचे चित्रपट मला वाटत निवडणुक निकालाच्या वेळी आलेले. अर्धा तास चित्रपट आणि अर्धा तास निकालाची चर्चा असायची.
आमचे आवडते कार्यक्रम मिकी डोनल्ड चे कार्टुन, ही मेन, रंगोली, चित्रहार, साप्तहीकी, विक्रम वेताळ, दादा दादी की कहानी, सिँहासन बत्तीसी, फेअरी टेल्स, स्ट्रिट हॉक. रामायण महाभारत भारत एक खोज वगैरे बाय डिफॉल्ट आहेच.. बाकी हम लोग, बुनियाद, नुक्कड, मालगुडी डेज, फौजी, नीव, इंद्रधनुष, कअॅप्टन व्योम वगैरे पहायचो पण फार काही आठवत नाही... समंदर नावाची पण एक मालिका होती. त्यात अमन वर्मा होता...
त्यानंतर लॉरेल अँड हार्डी, जंगल बुक, गायब आया...
मग एक से बढकर एक, शक्तिमान, देख भाई देख, शांती, स्वाभिमान, इतिहास :-D
मग आमी हॉस्टेलला गेलो आणि घरी केबल आल. अधेमधे घरी जाउ तेव्हा स्मॉल वंडर, डोरेमॉन, चित्रपट आणि गाणी एवढाच टिवीशी संबंध...
सासबहु मालिका कधीच पाहिल्या नाहीत. मला वाटत गेली काही वर्ष मालिकांएवजी रिअलीटी शो जास्त वाढलेत...
टीव्हीबद्दल आमच्याही आठवणी
टीव्हीबद्दल आमच्याही आठवणी रम्यच आहेत. नव्वदीच्या दशकापासून घरी केबल होते, सबब लै कै कै पाहता आलं. स्टार स्पोर्ट्सवरचे क्रिकेट क्लासिक्स आणि अर्थातच डब्ल्यूडब्ल्यूएफ(पुढे एफ चं ई झालं), कार्टून नेटवर्कवरची टनावारी कार्टून्स, स्टार प्लसवरचे स्ट्रीट हॉक (त्यात त्याच्या बाईकमधून मिसाईल्स निघायची ते खत्राड आवडायचे), सांता बार्बरा अन बेवॉच (यांतील विविध शीन्स चोरून बघायचो, बोल्ड अँड ब्यूटिफुल नामक शीर्यलीतसुद्धा) ;), हल्क ऊर्फ 'हिरवा माणूस', १० सेकंदात वेष बदलणारे 'पवित्र' बॅटमॅन अन रॉबिन (हो, तीच ती पयलीवायली ब्याटम्यानची सेरीज जिने आम्हांस मोह पाडला अन त्यातला अॅडम वेस्ट नामक बॅटमॅन पुढे बिग ब्यांग थेरी नामक शीर्यलीत अजरामर झाला. त्यात बॅटमॅन अन्य व्हिलनसमुदावाला मारत असताना कॉमिक पुस्तकांत दिसते तसे "डॅम", "क्र्लंक","पूफ",इ.इ. आवाज प्रत्यक्ष दिसत असत आणि रॉबिनच्या तोंडी "होली क्षयझ बॅटमॅन!" टाईपचे ड्वायलॉक कायम असावयाचे. एक लाल फोन वाजला की आल्फ्रेड सगळ्यांना कळेल अशा आवाजात हळूच सांगायचा अन मग बॅटमॅन अन रॉबिन त्याच्या कारमधून निघायचे. ते म्यूझिक जगात भारी होतं- "नानानाना नानानाना बॅटमॅन" टाईपचं.असो, त्या महाकाव्याबद्दल नंतर कधीतरी.)
चौथीत असताना कार्टून नेटवर्क सुरू झालं अन त्याच सुमारास डिस्कव्हरीदेखील. त्यातले एकाचढ एक जबराट प्रोग्रॅम्स बघताना कळायचं बंद व्हायचं. पुढे मग एएक्सएन , स्टार मूव्हीज इ.इ. ठिकाणचे देमार घेमार पिच्चर पाहताना वेळ कसा जायचा कळायचं नाही. डब्ल्यूडब्ल्यूएफ पाहताना तर यत्ता पयलीपासून समाधी लागत असे. अलीकडेच तो कैफ उतरला असला तरी जुन्य आठवणींनी अजूणही गहिवरायला होतं, विशेषतः द रॉक विरुद्ध स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन यांची भांडणे, अंडरटेकरचे म्यूझिक अन अजून कायकाय. तेही एक स्वतंत्र इलियडच आहे.
इतका सगळा मसाला असल्याने दूरदर्शन अंमळ पानीकम वाटायचं. पण त्यात रामायण, "क्रिष्णा", अन महाभारत हे बाकी लैच जबराट आवडते प्रोग्रॅम्स. अस्त्रांची मारामारी पाहताना अष्टसात्विक भाव जागृत व्हायचे. ( धनुर्विद्येची उपासना करता यावी म्हणून बुरुडाकडून चांगले धनुष्य बनवून एकच एक अमोघ बाणदेखील तीर्थरूपांनी घेऊन दिला होता. पण रोजच्या युद्धातली सामग्री कुठून आणणार? त्यासाठी मग केरसुणी वापरल्या जात असे. अंगणातले जांभळाचे झाड आमच्या एकलव्यगिरीची शिकार झालं होतं. पुढे सप्लाय कंट्रोल आणल्यावर विराटाघरी पांडवांनी लपवली तशी एका गुप्त जागी बाण लपवल्या गेले. प्लास्टिकच्या गदा आणून गदायुद्धही खेळले जायचे. धनुर्युद्धात एकदा चुलतभावाकडून ब्रह्मास्त्र म्हणून छत्रीची काडी वापरल्यावर आकाशवाणी झाली आणि आमचा परस्पर सराव बराच काळ बंद झाला. ) पुढे मग शक्तिमानही आवडू लागला. त्याचा सगळ्यात आवडता फंडा म्हणजे स्वतःभोवती फिरतानाचा होणारा विशिष्ट आवाज. त्याचा वेगळा अर्थ आहे असे इंग्रजी शिकल्यावर समजले, मग ज्ञान पाजळायला हर्कत कैची?
अकरावीत असताना हिस्टरी च्यानेल आल्यावर मग अजूनच मजा येऊ लागली. फ्याशन टीव्ही तोपर्यंत वेल एस्टॅब्लिश्ड झाले होते अन योग्य वेळी काय लागायचे तेही ठौक झाले होते. मग पुढे आली बारावी अन टीव्ही बघणे कमी झाले. नंतर मिरज सोडल्यावर टीव्ही जो कमी झाला तो आजतागायत ना के बराबर आहे. लेखाच्या निमित्ताने द्वापरयुगातील आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद.
धनुर्विद्येची उपासना करता
धनुर्विद्येची उपासना करता यावी म्हणून बुरुडाकडून चांगले धनुष्य बनवून एकच एक अमोघ बाणदेखील तीर्थरूपांनी घेऊन दिला होता
.
वा क्या बात है! मी पण असा धनुष्यबाण बनवून घेतला होता. बाण हरवला कि बुरुड फुकटात दुसरे बाण बनवून देत असे.प्रत्यंचा वळलेल्या सुतळीची मजबूत असे. भात्यासाठी मात्र कॉलरच्या बेचक्यातील जागा वापरत असे. आमचेच राममंदीर असल्याने धनुष्यबाण ही माझी मक्तेदारी वाटत असे.
मस्त
'सुपरहिट मुकाबला'चा उल्लेख बर्याच वर्षांनी वाचला. बाबा सैगल ("कल मैंने खाया बादाम, आज मैंने खाया काजू; अगला साँग इज फ्रॉम मूव्ही मोहब्बत की आरजू") आणि गांजोन्मीलित नेत्रांचा बाली ब्रह्मभट्ट ("दुनिया कह ते की रूख रूख, मगर जो रूखता ही नहीं वो है शाहरूख") इत्यादी नरपुंगव त्या काळात हा लोकप्रिय कार्यक्रम चालवत असत. कुठलं गाणं पहिल्या क्रमांकावर असेल याची चक्क चुरस वगैरे असायची (अपवाद 'दीदी तेरा देवर दीवाना'चा. राजश्रीवाल्यांनी वर्षभर तो स्पॉट बुक करून टाकला असावा.). ते आठवलं की 'चॉइस पॅरॉडॉक्स'ची सत्यता पटते :)
>>> टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का?
--- हा प्रश्न मलाही पडला आहे. हिंदी च्यानेल्स सर्फताना थापलेल्या भाकरीसारखा सुजट वर्तुळाकार चेहरा असणार्या राजस्थानी बायकांचे क्लोजअप्स तरी दिसतात किंवा लग्न ठरणे - सगाई - सात फेरे - ये शादी नहीं हो सकती यातलं एक काही तरी. एका मराठी मालिकेत तर "अगं बडीशेप कुठेय? - तुला म्हैतीय ना अण्णांना जेवल्यावर बडीशेप लागते ते - शोधाशोध - बरं केलं आणलीस ते - का हो? - अगं जेवल्यानंतर बडीशेप खाल्ली नाही तर जेवल्यासारखंच वाटत नाही - आळीपाळीने बायकांचे कृतकृत्य-क्लोजअप चेहरे" हा शीन पाहून तर फारच गंमट वाटली :)
अवांतर -
टीव्हीचे सामाजिक महत्त्व -
मेघना, तुम्ही ठाण्यात राहता
मेघना, तुम्ही ठाण्यात राहता का ? राममारुती रोड (संजीवनी मेडिकल्स व त्यासमोरचे ते आईसक्रीम चे दुकान, युनायटेड कलर्स ऑफ बेनेटन, शिवप्रसाद हॉटेल, तलावपाळी, गावदेवी, बँक ऑफ बडोदा वगैरे वगैरे) ....
नॉस्टाल्जिया .... जिया को बहुत दुखाता है.
- नॉस्टाल्जियाच्या स्विस बँक चा मालक (गब्बर)
गब्बर, व्हय, मी ठाण्यात
गब्बर, व्हय, मी ठाण्यात राहते. :)
नंदन, 'सुपरहिट मुकाबला'.... हॉय रे हॉय! गेले ते दिवस गेले! मला लई कष्ट पडलेत टीव्हीच्या अनेक रम्य आठवणी न जागवता मुद्द्यावर चिकटून राहायला. तुम्ही लोक सुटलाच आहात!
अस्मि, मी टीव्ही पाहत असे त्या काळात रिअॅलिटी शोज फार नसत. 'मेरी आवाज सुनो' नामक अन्नू कपूरसंचालित 'सारेगम(/प)'प्रकारचा कार्यक्रम तेवढा आठवतो. (त्यातच सुनिधी चौहान जिंकली होती. मग लतादीदींनी तिला मिठीत घेतलं इत्यादी.) हळूहळू रिमोटवर आईबापांनी कब्जा केला. मग एकतर क्रिकेट नाहीतर मराठी मालिका एवढ्यापुरताच टीव्ही उरला. हल्ली अधूनमधून 'हसा चकटफू' वगैरे दिसतं, पण फार नियमितपणे नाही. त्यामुळे 'रिअॅलिटी शोज'चे संस्कार माझ्यावर झालेच नाहीत! तूच त्यातल्या गंमतींवर प्रकाश टाकावास ही विनंती. :)
पण मुख्य प्रश्न असा आहे - हल्ली टीनेजर्स टीव्ही बघतात का? काय बघतात? नि तुम्ही काही बघता का सध्या?
अरे हो अनु कपुर सुनिधी चौहान
अरे हो अनु कपुर सुनिधी चौहान विसरलेच होते की.
मी कसा प्रकाश टाकणार रिअलीटी शो वर :-( माझा टिवी सासबहु रतीब चालु व्हायच्या आधीच बंद झाला :-D आतापण पहात नाही आणि भविष्यातदेखील पहायचा विचार नाही... गॉसिप कॉलममधे फार चर्चा झाल्याने कॉफी विथ करणचे दिपीका-सोनम, रणबीर-इमरान भाग तेवढे पाहिले युट्युब वर. आणि परवाचा व्हर्जीन सलमानचा भाग पण पाहिला सलीम येईपर्यँतच ;-).
केकता लाटेनंतर २४तास बातम्या, तेहेलका, स्टिँग वगैरेँची लाट आलेली वाटत. त्यानंतर रिअलीटीची. सध्या लोक काय बघतात काही कल्पना नाही. पण मला वाटत बिग बॉस आणि नाच गाणीचे रिअलीटी शोज च जास्त चालत असावेत. माझ्या ओळखीच्या लोकांत पवित्र रिश्ता, होणार सुन मी त्या घरची फार पॉप्युलर होत/आहे =))
पौगंडवाले काय बघतात ठाऊक नाही. म्युझीक चेनल्स पहात असतील.
केवळ सुपरहिट मुकाबलाच नव्हे
केवळ सुपरहिट मुकाबलाच नव्हे तर सुरभि, जबान संभालके, देख भाई देख, श्रीमान श्रीमती, तू तू मै मै वगैरे कार्यक्रमांपर्यंत माझं नी टिव्हीचं जामच सख्य होतं
नंतर काय बिनसलं नक्की सांगता येणार नाही कि सांगण्यात अर्थ नाही हे सोडून देऊ पण आम्ही ललित अंगापुरता वेगळे व्हायचा निर्णय घेतला खरा.
अजूनही मी टिव्ही बघतो पण जे कार्यक्रम बघतो ते १० वर्षांमध्ये पूर्णपणे बदलेले आहेत. सध्या मी फॉक्स ट्रॅव्हलर्स वरचा "टेस्ट" नावाचीचा "बाईंड टेस्टिंग" नी पदार्थांची स्पर्धा बघतो. सहसा नवा ट्रॅव्हल शो (ठिकाण नवे असायची गरज नाही) लागला की किमान ३-४ एपिसोड बघतो काही रोचक ठिकाण-माहिती दिसली तर टिपूनही ठेवतो (म्हणजे ती माहिती स्वत:लाच मेल करून ठेवतो). सर्फिंग करताना काही आवडते नवे/जुने चित्रपट दिसले तर थबकतो आणि बर्याचदा शेवटपर्यंत बघतो. (एकीकडे सर्फिंग करत असल्याने जाहिरातींचा त्रास होत नाही). डीडी न्यूजच्या बातम्या बघतो. घरी असलो तर संसदेचे लाईव्ह सेशन बघतो.
मुळात मी ऑफिस व्यतिरिक्त फार "ऑनलाईन" नसतो. अगदी तंत्रदुष्ट नसलो तरी अगदी तंत्रमित्रही नाही. अजून टिव्हीची जागा इतर माध्यमांना पूर्णपणे घेता आलेली नाही. (मला लहान स्क्रीनवर चित्रपट बघणे/पेपर वाचणे आवडत नाही. पुस्तके अजूनही छापिलच आवडतात) त्यामुळे अजूनही त्यात्या प्रकारच्या करमणूकीसाठी बर्याचदा मुळ तंत्राकडे मी झुकतो. अर्थात काही बाबतीत (विशेषतः गाणी ऐकणे वगैरे श्राव्य प्रकारात) मोबाईलने शिरकाव केला आहे हे ही खरेच!
जुन्या दिवसात घेऊन जाणारा धागा :)
माझ्या आठव्णी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातल्या आहेत. शेजार्यांकडे टीव्ही होता. तेथे जात असे. त्यानंतर आमच्याकडे आला. टीव्ही पाहण्याचं वेडच होतं म्हणाना. साप्ताहीकी पासुन ते अगदी छायागीत, गजरा, विनायक चासकर, विनय आपटेंची नाटकं, पुलंची वार्यावरची वरात. काही वेळा आमची माती आमची माणसे सारखे कार्यक्रम, तबस्सुमचा फुल खिले है गुलशन गुलशन असे कित्येक कार्यक्रम. आणि अर्थातच क्रिकेट. त्यानंतर मालिका सुरु झाल्या. त्यातर वेड्यासारख्या पाहिल्या. हमलोग, बुनियाद, खानदान, अमोल पालेकरांची नकाब. त्यावेळी तेरा भागात चालणार्या मालिकांचं आकर्षन खुप होतं. कथेचे तीन तेरा वाजायचे दिवस अद्याप यायचे होते.
पहिला धक्का बसला तो क्रिकेटवरील फीक्सींगच्या आरोपामुळे. त्यानंतर क्रिकेट पाहणं हळुहळु बंद झालं. आज मला आपल्या टीम मध्ये कोण आहे हेही सांगता येणार नाही. मात्र वडीलांचे क्रिकेट्प्रेम तसेच राहीले त्यामुळे तेवढा वेळ टीव्ही पासुन दुर व्हावे लागले. त्यानंतर सुरु झाल्या त्या भडक हिन्दी मालिका. त्या लगेच डोक्यात गेल्या. पण घरच्यांची ती आवड बरेच दिवस राहीली. म्ह्णुन तोही वेळ टीवी पासुन दुर झालो. घरी कौन बनेगा करोडपती सुरु झाले आणि टीव्हीचा संबंध बर्यापकी दुरावला. अमिताभची "मॉडेस्टी" का कुणास ठावुक पण मला कधीही खरी वाटली नाही. त्यातुन त्या दिवसात सगळीकडे त्याची जी चर्चा चालायची त्याची चीड येत असे.
मात्र टीव्ही बद्दल तिटकारा कधीही वाटला नाही. आजही रिमोट मो़कळा असल्यास टीव्ही पाहतो. मात्र रिअॅलिटी शोज, अश्रुपात , मलिका, आणि केबीसी सारखे कार्यक्रम टाळतोच.
विंग्रजी च्यानेलांवर तुलनेने
विंग्रजी च्यानेलांवर तुलनेने मस्त मालमसाला असतो. डिस्कव्हरी-फॉक्स हिष्ट्री-ज्यॉग्रफिक-अॅनिमल प्लॅनेट, ए एक्स एन-स्टार मूव्हीज-एचबीओ, झालंच तर कार्टून नेटवर्क, अन फॉर द फ्याशनेबल वन्स-फ्याशन टीव्ही बाय मायकेल अॅडम, इ. मस्त औरसचौरस ताट वाढून ठेवलेलं असतं.
देसी च्यानेलांवर ते आजकाल सौथ पिच्चरचे डबिंग दाखवणारी च्यानेल्स सुरू झालीयेत तोही प्रकार मस्त असतो. सिंपल अँड स्पायसी.
ज्याची त्याची जाणिव.
>>> टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का?
ह्या भावनांशी(थोडं पुढं जाणारं) जुळतं-मिळतं असं एक उदाहरण वपुंच्या एका कथेत सापडतं,(आता तपशीलातली गडबड माफ करा, पण पुढील वाक्ये साधारण भावना दर्शवतात) "आमचे हे(वय बहुदा ५०+) ना खिडकीशेजारी बसुन बाहेर येणार्या-जाणार्या तरुण मुलींना तास-न-तास बघत बसतात, एकदा मी पण त्यांच्यासोबत तशीच बघत बसले तर मी पण वेड्यासारखी बराच वेळ त्या मुलींकडे बघत बसले होते". कथा/फिक्शन रंजक आहे, त्यामुळे ते खिळवून ठेवतं, आता 'रंजक'ची व्याख्या अगदी चंद्रकांता पासून ते व्योमकेश बक्शी,साराभाई,जी मंत्रीजी, मॅन & वाइल्ड, टिएलसी चे कार्यक्रम वगैरे पर्यंत जाते.
टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं
टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का?
बलस्थान कार्यक्रमातील 'भावणारी' रंजकता आहे, कथा सुशीने/वपुंनी लिहिली असली तरी ती रंजक असल्याने ती आवडणारे लोक आहेतच, त्याचप्रमाणे सिरिअलमधील कलाकार, कथाआशय, अभिनय हे सगळं अगदी ट्रान्स्परंट असल्याप्रमाणे टक लाऊन पहाणारे लोकही आहेत. जाणिव समृद्ध झाली कि तेच कार्यक्रम आवडेनासे होतात पण एक गट काम करुन/दमुन भागुन(!) हे कार्यक्रम तन्मयतेने पहातो म्हणुन टीव्हीवर तेच कार्यक्रम लागतात, खरंतर मॅन & दि वाइल्डमधे तरी काय तो आचरट प्रकारच करत असतो पण ह्या सोपांना तुच्छ लेखणारे त्याची स्तुती करतीलच, त्यातली नॉव्हेल्टी हिच त्यातली रंजकता.
बलस्थान टीव्हीतील कार्यक्रमात नसुन त्याच्या प्रेक्षकांच्या आवडीत आहे असे सांगावे वाटते.
मला मोठे प्रतिसाद किंवा लेख लिहणारांचे कौतुक आहे, हि वरची हातावर मोजता येण्याजोगी वाक्ये लिहितानाही माझी दमछाक झाली.
हं... विंग्रजी च्यानेलांवर
हं... विंग्रजी च्यानेलांवर अजूनही पाहण्यासारखं काही असतं हे मान्य. पण मी रिमोट गमावून बसले आहे! नि दुसरं म्हणजे हे सगळं भांडूनतंडून पाहावं अशी आच नाही, कारण डाउनलोडवून बघता येत नाही, असं काही नाहीच. त्यात टीव्हीहून सोयही जास्त. दुसर्या कुणाला त्रास होणार नाही, अशा प्रकारे हेडफोन्स लावून तब्बेतीत, आपल्या सोईच्या वेळेत बघता येतं.
बाकी... अजूनही लोकांना त्यातून काही मिळत असेल हा मुद्दा मला मान्य आहेच. फक्त कुतूहल असं की - कुणाला, कशातून आणि काय?
अतुल ठाकुर यांनी
अतुल ठाकुर यांनी म्हटल्याप्रमाणे > रिमोट मो़कळा असल्यास टीव्ही पाहते.
बॅटमॅन यांनी म्हटल्याप्रमाणे > विंग्रजी च्यानेलांवर तुलनेने मस्त मालमसाला असतो. डिस्कव्हरी-फॉक्स हिष्ट्री-ज्यॉग्रफिक, ए एक्स एन-स्टार मूव्हीज-एचबीओ, झालंच तर कार्टून नेटवर्क. ( माझी यात अॅडीशन - मुव्हीज नाऊ, टी.एल.सी, स्टार वर्ल्ड)
बाकी काही नसेल तर खाणे-पिणे या विषयाशी संदर्भ असलेले काहीही बराच वेळ पाहू शकते.
पण एकूण जे काही पाहते ते - टिव्ही लावला - चॅनेल फिरवताना अमुक एक दिसले, आवडले म्हणून तास दोन तास पाहिले अशा सदराचे असते. आज पाहिले म्हणून उद्या पाहावेसे वाटेल अशा सदराचे कार्यक्रम बघत नाही. जरी एखादा एपिसोड बघितला आणि हे बघूयात पुढे असे ठरवले (मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया - फार आवडले - उगाच इमोशनल ड्रामा नाही - आणि त्यांनी केलेले बरेचसे पदार्थ मी जन्मात स्वतः बनवण्याची शक्यता नसली तरी कापाकापी, पुर्वतयारीच्या पद्धती, वेगवेगळ्या पदार्थांची/ पद्धतींची नावे, गार्निशिंग - यातून आपण कुठे तरी काहीतरी उचलतोच) तरी बाकी सगळ्यात तेव्हा वेळ मिळतोच असे नाही.
लेख मस्त आहे. स्पायडर मॅन,
लेख मस्त आहे.
स्पायडर मॅन, करमचंद, ये जो है जिंदगी, नुक्कड, स्टार ट्रेक(पुसटसे आठवते), रिपोर्टर ,सारेगामा(सोनु निगम), मेरी आवाज सुनो(तुम्ही सांगितलेला लताप्रसंग), व्योमकेश बक्शी, क्रिकेट वन्डे/वर्ल्डकप, जी मंत्रीजी, साऊथ पार्क, एव्हरीबडी लव्हस् रेमंड, शेरलॉक, डायनॅमो मॅजिशिअन हे माझे आत्तापर्यंतचे आवडते कार्यक्रम आहेत, आताशा टीव्ही बघणे होत नसल्याने सध्याच्या कार्यक्रमांना पास दिलेला आहे.
नॉस्टाल्जिया वगैरे फार वाटत नाही, टीव्ही फार बघण्यापेक्षा बाहेर उंडारण्यात वेळ गेल्याने टीव्हीबद्दल विषेश प्रेम नाही.
पूर्वी (हा! कसलं म्हातारं
पूर्वी (हा! कसलं म्हातारं वाटतं हा शब्द लिहिताना.) अमुक एक कार्यक्रम पाहायसाठी आवर्जून टीव्ही लावला जायचा. बहुतेक लोकांच्या म्हणण्यानुसार सध्या टीव्हीवर काहि विवक्षित पाहिलं जातंच असं नाही, जे समोर चाललं असेल ते आवडलं तर पाहिलं जातं. हे असं कशामुळे होतं? आता आपल्याला अती प्रमाणात गोष्टी मिळतात (वाहिन्यांची संख्या, २४ तास प्रक्षेपण) त्यामुळे? की आपला अटेन्शन स्पॅन कमी झालाय, हातात रिमोट आहे आणि कमर्शिअल ब्रेक्स अटळ आहेत, त्यामुळे?
(अटेन्शन स्पॅन कमी, म्हणून जास्तीत जास्त भडक करून लोकांना धरून ठेवत राहायचं अशा धोरणातून तयार होणारे कार्यक्रम; नि त्यामुळे जे पाहणं आवडण्यासाठी संयम, शांतपणा गरजेचा असेल असे कार्यक्रम लोकांना सपक, बोअरिंग वाटत जाणं... असं दुष्टचक्र.)
हे प्रश्न बीबीसीला पडत नाहीत काय? त्यांच्याकडे बरे एकाचढ एक चांगले कार्यक्रम होतात? की माझ्या आत्ताच्या अभिरुचीलाच फक्त तसं वाटतंय नि त्यांचे कार्यक्रमही पुरेसे भिकारच आहेत?
२००० साली मी टीवी घेतला.
२००० साली मी टीवी घेतला. त्यापूर्वी मी तो क्वचितच पाही/ तसा योग येई. पण तरीही त्या आठवणी रंजक आहेत. इथे लोकांनी कितीतरी कार्यक्रम सांगीतले आहेत, मला त्यातले फार तर फार ८-१० पाहिल्या ऐकल्याचे आठवते.
एच डी टीव्ही आल्यापासून माझे पाहणे वाढले आहे. ३ डी प्रक्षेपण अजून एकाही चॅनलचे होत नाही. मूळ ३ डी आणि २डी टू ३डी मधे खूप फरक जाणवतो, म्हणून मजा येत नाही.
तरीही बालपणीच्या टीव्हीच्या आठवणी आल्या तर मी किती आस्थेने टीव्ही पाहत असे (अगदी पुस्तके वाचक असे, पेपर वाचत असे) आणि अनास्था माझ्या मनी किती बळावली आहे हे प्रकर्षाने जाणवते.
टीव्हीबद्दल मी बोलावं असा
टीव्हीबद्दल मी बोलावं असा काही माझा अभ्यास नाही. पण प्रकटन आवडलंच.
शाळेत वगैरे असताना कधीतरी टीव्हीवर "ऐसी दिवानगी, देखी नहीं कही ..." सुरू असताना मधेच बाबांनी शारूक-दिव्या भारतीचा गळा आवळला. त्याचा बदला म्हणून मी जेवताना घरातल्या लोकांशी बोलणं सोडून पुस्तकात किंवा वर्तमानपत्रात नाक खुपसून पुस्तकं, पेपर वाचायला लागले. संध्याकाळी खेळायचा वेळ स्वतःच अर्ध्या तासाने वाढवला. मला वाटलं मी बंड केलं. कसलं काय, एकूण बा-बापूंची तेव्हाची प्रतिक्रिया पाहून त्यांना तेव्हा आनंदच झाला असावा, अशी शंका आता येते. चॅटरबॉक्स आपण होऊन बंद झाल्याचा आनंद तिच्या पालकांनाही होतो तर!
टीव्हीबद्दल दुसरं म्हणजे, सेट टॉप बॉक्स डिझाईन करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की, अजून काही दशकांनी केबल टीव्ही, सॅटेलाईट टीव्ही हा प्रकार बाद होईल. सगळं इंटरनेटलाच संलग्न असेल, नेहेमीचा टीव्हीसुद्धा आजच्यासारखा असेल तरीही स्ट्रीमिंग जालावरून होईल.
लेख कमाल जमवलेला आहे, गणपती,
लेख कमाल जमवलेला आहे, गणपती, दिवाळी, चैत्रापाडवा वगैरे कमाल निरीक्षणं!
शनिवार दुपार, शक्तिमान आपला आवडता कार्यक्रम होता :). अल्लादिन अन् डक टेल्स हे पण लै आवडायचे.
मी होस्टेलला असल्यापासून टीव्ही पाहणं पूर्ण पणे बंद झालेलं. घरी असलो तरी आठवड्यातून एकदा सुरु करून सर्व च्याणेल बदलून, चालतोय याची खात्री एकदा काँट्रास ब्राईटनेस सेटिंग बदलून बंद!! पुढच्या मद्रदेशात होस्टेलला मजल्यावर चार असे टीव्ही होते. ते रात्री अकरा पर्यंत चालायचे, त्यावर पब्लिक सन टीव्ही, सूर्या टीव्ही वगैरे पहायचं. चालू असल्या तर म्याचेस. पोरांची इतकी गर्दी व्हायची म्याच बघायला, बक्कळ आरडा ओरडा व्हायचा. पब्लिक अन् वातावरणामुळे तेव्हा मी म्याचेस पहिल्या. आता सध्याच्या जागी टीव्ही असला तरी आवर्जून असं काही बघितलं जात नाही. दोस्त लोकं स्पोर्ट्स पाहतात.
चुकून पाहिलं तर गाण्याचे एम टीव्ही अनप्लग्ड अन् कोक स्टुडीओ पाहतो. झी क्याफे वर काही विनोदी मालिका असतात त्या पाहतो. अर्णव गोस्वामी, करण थापर आदी मंडळी पण डोक्यात जातात. विनोद दुआचे "जायका इंडिया का"चे एपिसोड शोधून डाउनलोड केले होते. गेल्या काही दिवसात "बाबाजी का ठुल्लू" बरीच हवा करून राहिलाय.
बलस्थान कलाकृतीमध्ये आहे. माध्यम होतं तिथंच आहे.
टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का? असाच प्रश्न हिंदी शिनेमाबाबत कधी कधी पडतो. पण तिथे जशी थोडी चाकोरी बाहेरची निर्मिती होते. तितकी टीव्हीवर होत नसावी काय??