Skip to main content

विमानांची मॉडेल्स बनवण्याचा छंद

नुकत्याच लिहिलेल्या माझ्या एका ब्लॉगपोस्ट मध्ये मी ड्रोन स्वयंचलित विमानांचा वापर करून घरात आवश्यक असलेल्या वाणीसामानासरख्या वस्तू घरपोच पोचवणे शक्य होईल का? याचा अभ्यास अमेरिकेमधील काही वाणिज्य संस्था कशा करत आहेत याबद्दल लिहिले होते. जगातील सर्व प्रमुख राष्ट्रे ही छोटेखानी ड्रोन विमाने सध्या आपल्या व शत्रू राष्ट्रांच्या प्रदेशाची टेहळणी करण्यासाठी नियमित स्वरूपात वापरत आहेतच. काही राष्ट्रांनी या छोटेखानी ड्रोनच्या सुधारित आवृत्त्या काढल्या आहेत. ही सुधारित विमाने चक्क बॉम्ब घेऊन उड्डाण करतात व शत्रू प्रदेशात अगदी खोलवर जाऊन विविक्षित लक्षांवर मारा करू शकतात व त्यासाठी ती वापरलीही जाऊ लागली आहेत.

परंतु बर्‍याच वाचकांना हे माहितीही नसेल की आकाशात उडणारी ही छोटेखानी विमाने हा नवा लागलेला शोध वगैरे नसून दुसर्‍या महायुद्धाच्या कालापासून किंबहुना त्याच्याही थोड्या वर्षे आधीपासून ती अस्तित्वात आहेत. मी लहान असताना अशी छोटेखानी पण उड्डाण करू शकणारी विमाने बनवण्याचा छंद मला होता. ग्लायडर्स आणि इंजिनच्या सहाय्याने समोरील पंखा फिरवून उड्डाण करू शकत असणारी, अशी दोन्ही प्रकारची विमाने मी बनवत असे. या माझ्या जुन्या छंदामुळे, एकेकाळी केवळ एक खेळणे म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात असे ती ही छोटी विमाने, आजच्या जगात खर्‍याखुर्‍या कामांसाठी वापरली जाऊ लागली आहेत हे बघायला मला विशेष रुची आणि गंमत वाटते आहे हे मात्र नक्की.

विमानांची मॉडेल्स बनवण्याच्या लहानपणच्या माझ्या या छंदामागचे मुख्य कारण म्हणजे माझे वडील हेच होते. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या लगेचच्या काही वर्षांमध्ये त्यांना धंद्याच्या काही कारणानिमित्त इंग्लंडला जावे लागले होते. (हा प्रवास त्या काळी अर्थातच बोटीने करावा लागत असे.) तेथून परत येताना त्यांनी माझ्यासाठी एक उडू शकणारे विमानाचे मॉडेल आणले होते. या विमानाचे अंग आणि पंखे अ‍ॅल्युमिनम धातूच्या पातळ पत्र्यापासून बनवलेले होते. या विमानाच्या पुढच्या बाजूला असलेला पंखा फिरवण्यासाठी त्याला मागच्या बाजूस काही रबर बॅन्ड्स जोडलेले होते. हा पंखा हाताने फिरवून मागच्या रबर बॅन्ड्सना पुरेसा पीळ देऊन हे विमान हवेत फेकले की हा पंखा जोरात फिरत असे आणि हे विमान रबर बॅन्ड्सचा पीळ उलगडेपर्यंत हवेत गोलगोल चकरा मारत असे. व एकदा पंखा फिरणे थांबले की अलगद खाली उतरत असे. हे छोटे विमान अत्यंत सुंदर असे एक खेळणे होते असे मला अजूनही वाटते.

हे विमान मोडेपर्यंत उडवल्यानंतर मला विमानांची मॉडेल्स बनवणे या विषयात खूपच रुची निर्माण झाली यात शंकाच नाही. माझ्या वडीलांनी इंग्लंडहून या विषयावरची थोडी पुस्तकेही आणली होती आणि मी स्वत: अशी विमानांची मॉडेल्स बनवावी यासाठी त्यांनी मला खूपच प्रोत्साहन दिल्याने मी स्वत:च ही मॉडेल्स बनवण्याची कला सहजपणे आत्मसात करत गेलो. मुंबईच्या मरीन लाइन्स स्टेशनच्या जवळ असलेले ‘इंडिया हॉबी सेंटर‘ या नावाचे एक दुकान त्यांनी शोधून काढले. अगदी हलके वजन असलेल्या ‘बालसा‘ नावाच्या लाकडाचे तक्ते व पट्ट्या यांनी युक्त असलेले विमानांच्या मॉडेल्सचे अनेक डिझाइनचे संच या दुकानात विक्रीसाठी ठेवलेले असत. या संचात लाकडांच्या तक्त्यांशिवाय विमानांचे छापील आराखडे, जोडणी करण्याबद्दल सूचना, रंग आणि डिंक ही सामग्री सुद्धा अंतर्भूत केलेली असे. या नंतर कधीही सुट्टीत मुंबईला जाण्याची संधी आली की माझी या दुकानाची एक फेरी ठरलेली असे.

ही विमानांची मॉडेल्स बनवण्यासाठी प्रथम बालसा लाकडाच्या तक्त्यांमधून विमानाचे छोटे छोटे पार्ट्स एका धारदार चाकूच्या मदतीने कापून घ्यावे लागत. विमानाचा सांगाडा, पंख, शेपूट वगैरेसारखे महत्त्वाचे सर्व भाग हे छोटे तुकडे एकमेकाला एका विशिष्ट डिंकाच्या सहाय्याने चिकटवून बनवले जात. यानंतर या सांगाड्यावर एक विशिष्ट प्रकारचा कागद चिकटवून घ्यावा लागे व सर्वात शेवटी यावर रंग लावून हे भाग पूर्ण केले जात. या रंगामुळे वरचा कागद अगदी ताणून बसवला जाई, यानंतर विमानाची चाके किंवा कॅनपी या सारख्या गोष्टी सांगाड्याला जोडल्या जात असत आणि विमानाचे हे मॉडेल उड्डाण करण्यासाठी सज्ज होत असे.

सुरवातीस मी हवेत तरंगणारी ग्लायडर्स विमाने बनवत असे. ही विमाने हातात घेऊन सरळ फेकायची असत. या विमानांचे सुकाणू काही अंशाचा कोन देऊन बसवलेले असल्याने विमान हवेत सरळ न जाता वर्तुळाकार उड्डाण करत राही आणि अखेरीस अत्यंत डौलदार रितीने जमिनीवर उतरत असे. विमानाचे उड्डाण आणि जमिनीवर उतरणे हे श्वास रोखून धरणारे असे वाटत असे. या नंतर मला माझ्या आजोबांनी 0.8 सीसी क्षमतेचे एक 2 स्ट्रोक इंजिन भेट म्हणून दिले आणि मी माझे पहिले स्वयंचलित उड्डाण करणारे विमानाचे मॉडेल बनवले. हे इंजिन अतिशय उच्च गतीने फिरत असे आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणात आवाज करत असे. या इंजिनाला इथाइल इथर, एरंडेल व केरोसीन यांचे केलेले मिश्रण इंधन म्हणून वापरावे लागे. इंजिनाला एक छोटासा टॅन्क जोडलेला असे. हा टॅन्क इंधनाने भरून इंजिनाला जोडलेला पंखा हाताने जोरात फिरवला की इंजिन सुरू होई व नंतर विमान हातात धरून सरळ फेकले की इंजिनाच्या शक्तीवर विमान उड्डाण करत असे व वर्तुळाकार उडत राही. इंधन संपले की विमान खाली उतरे. या विमानाचे उड्डाण हे तर अत्यंत प्रेक्षणीय असे होते.

या पुढच्या वर्षांमध्ये या विमानांच्या मॉडेल्समध्ये खूपच जास्त आधुनिकता येत गेली. रेडिओ कंट्रोल मॉडेल्स उपलब्धही झाली. परंतु ही सर्व मॉडेल्स मला वडीलांच्याकडून मिळणार्‍या पॉकेट मनी पेक्षा बर्‍याच जास्त मूल्याची असल्याने माझा हा छंद संपुष्टातच जमा झाल्यासारखा झाला. परंतु त्या नंतर नेहमीच म्हणजे अगदी आजमितीला सुद्धा, विमानांची छायाचित्रे बघणे मला अतिशय आवडते व त्या छायाचित्रांनी मी अजूनही भारावून जात असतो. एके काळी मला विमानबांधणीमधील डिझाईन अभियंता होण्याची खूप इच्छा होती. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी, मला फारसा रस नसलेल्या उच्च पातळीच्या गणितात प्रावीण्य आत्मसात करणे अत्यावश्यक आहे हे कळल्यानंतर माझा उत्साह ओसरला होता.
माझ्या आयुष्यातील बर्‍याच नंतरच्या काळात मला मॉडेल विमानांच्या उड्डाणांचे एक प्रदर्शन बघण्याची जी एक संधी मिळाली होती त्याबद्दल हा लेख संपवण्यापूर्वी सांगितलेच पाहिजे. त्या वेळेस मी कॅलिफोर्निया मधील सॅन फ्रॅन्सिस्को जवळच्या बे एरिआ मध्ये रहात होतो. बर्कली या उपनगरात रहाणार्‍या माझ्या एका तरूण मित्राचा मला एके दिवशी फोन आला व त्याने मला तेथे पुढच्या रविवारी भरवल्या जाणार्‍या एका एअर मॉडेलिंग शो बद्दल त्याने मला सांगितले आणि मला रुची असल्यास आपण तेथे जाऊ शकतो असे आमंत्रणही मला दिले. अर्थातच मी त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि त्या ठिकाणी रविवारी सकाळी वेळेवर पोहोचलो.

बर्कली या उपनगरात मॉडेल विमाने उडवण्यासाठी अगदी प्रेक्षकांसाठी गॅलरी सकट असलेला एक विमानतळ मुद्दाम बांधलेला आहे. या गॅलरी समोर डांबरीकरण केलेली एक धावपट्टी सुद्धा बनवलेली आहे. पुढचे काही तास मी माझ्या या तरूण मित्राबरोबर अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन एका पाठोपाठ एक, पूर्णपणे रेडिओ कंन्ट्रोलच्या सहाय्याने केल्या गेलेल्या अनेक विमानांची उड्डाणे आणि त्यांचे अडथळ्याशिवाय रितीने जमीनीवर उतरणे, वेड्यासारखा बघत घालवले होते. हा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणे शक्य नाही.

या एकेकाळी फक्त एक छंद असे स्वरूप असलेल्या विमानांच्या मॉडेल्सच्या तंत्रामधूनच आजकाल जी ड्रोन विमाने टेहळणी करणे किंवा विद्ध्वंस करणे या सारख्या सैनिकी उपयोगासाठी वापरली जात आहेत त्यांचा जन्म झालेला आहे. परंतु या सार्‍या प्रक्रियेत माझ्या लहानपणच्या या छंदामधील गंमत आणि उत्सुकता हे नष्टच होऊन गेले आहेत असे मला वाटते आहे. या ड्रोन विमानांचे तांत्रिक रचना इतकी क्लिष्ट असते की कोणालाही ती घरी बनवता येणे अशक्य वाटते.

या शिवाय तुम्ही जरी स्वत: बनवलेले विमानाचे मॉडेल छंदासाठी म्हणून उडवत असाल तरी तुम्ही अवैध रितीने कोणाचे तरी निरीक्षण करता आहात किंवा दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करता आहात असा संशय इतरांनी घेणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्या प्रमाणात तरी या ड्रोन्स विमानांनी या छंदाचे एक प्रकारे नुकसान केले आहे असे म्हटले तरी चालेल.

25 डिसेंबर 2013

माझा मूळ इंग्रजी लेख व त्यासोबत असलेली छायाचित्रे या दुव्यावर पाहता येतील.

Node read time
5 minutes
5 minutes

मन Wed, 01/01/2014 - 16:13

चांगला लेख.
टेहळणी आणि हेरगिरीला उपग्रह पुरेसे सक्षम असतात असे समजत होतो.
ड्रोनची नक्की गरज काय ते समजत नाही.

ऋषिकेश Wed, 01/01/2014 - 16:32

अतिशय रोचक माहिती. आभार!

अशी विमाने बनवायची एखादी कार्यशाळा घेऊ शकाल काय? त्यासाठी हवं तर एक वेळा प्लान्ड असा खास कट्टा ठेऊ :)

नपेक्षा त्यावर स्टेप बाय स्टेप "डु इट युअरसेल्फ" प्रकाराची लेखमाला लिहिलीत व त्याचवेळी इच्छुक सभासदांनी विमाने घरी बनवायचा प्रयत्न केला तरी छानदार प्रयोग होईल, मागे रुची यांच्या सोबत पाव बनवायला शिकलो होतो तसेच हे ही शिकावेसे वाटते आहे.

लॉरी टांगटूंगकर Thu, 02/01/2014 - 01:19

In reply to by ऋषिकेश

विमाने बनवायची एखादी कार्यशाळा घेऊ शकाल काय ?

हेच लिहिणार होतो. जरूर प्रयत्न करावा. साधारण या लहान इंजिनची किंमत किती असते ?? हे इंजिन्स पवई आयआयटी जवळ कुठे तरी मिळतात, त्याचा पत्ता वगैरे मिळवला होता पण नंतर गेला हरवून.

राजेश घासकडवी Wed, 01/01/2014 - 22:57

लेख आवडला. ऋषिकेशशी सहमत.

परवाच ख्रिसमससाठी एकत्र जमलेलो असताना काही मुलांना गिफ्ट म्हणून मिळालेलं रिमोट कंट्रोल हेलिकॉप्टर पाहिलं. जेमतेम दोनशे ग्रॅम वजनाचं, आठेक इंच मोठं. इतक्या सफाईने ते उडत होतं... पाहून मला त्या पोरांचा हेवा वाटला.

Nile Thu, 02/01/2014 - 02:17

हा पंखा हाताने फिरवून मागच्या रबर बॅन्ड्सना पुरेसा पीळ देऊन हे विमान हवेत फेकले की हा पंखा जोरात फिरत असे आणि हे विमान रबर बॅन्ड्सचा पीळ उलगडेपर्यंत हवेत गोलगोल चकरा मारत असे. व एकदा पंखा फिरणे थांबले की अलगद खाली उतरत असे. हे छोटे विमान अत्यंत सुंदर असे एक खेळणे होते असे मला अजूनही वाटते.

श्री माधव खरे हे पुण्यातील कोणत्याही इंजिनाशिवाय विमाने बनवण्याचा छंद असलेले असामी आहेत. माझ्या घरी (भारतात) त्यांचे काही दशकांपुर्वी लिहलेले पुस्तकही आहे. पुस्तकाचे नाव, 'हे विमान उडते अधांतरी'. ('रसिक साहित्य'मध्ये हे पुस्तक मिळेल असे दिसते आहे.) २००४-५ सालापर्यंत ते कार्यशाळाही घेत असत असे वाचल्याचे आठवते. बहुतेक हे स्वतः वेगवेगळी आणि स्वस्त अशी विमाने (ग्लायडर्स) विकतात. गलोलीने उडवायचे एक विमान आहे, हे विमानाचे एअरोडायनॅमिक्स शिकण्याकरता फार चांगले आहे.

पुण्यात एअरोमॉडेलिंगच्या स्पर्धा भरत होत्या, अजूनही भरत असतील. सेनापती बापट रस्त्यावर 'एनसीसी ग्राउंड्स' मध्ये एक मनुष्य आहे, त्याचे नाव विसरलो. मनुष्य विक्षिप्त आहे पण मदत करू शकतो.

ग्लो इंजिन भारतात मिळणे तसे अवघडच होते, बहुतेक करून लोक (दुकानेही) परदेशातून मागवत असत, त्यामुळे ते महागही पडते. आम्ही पुर्वी आमच्या मॉडेलकरता BOSCH कंपनीच्या पोर्टेबल ड्रीलमधील एलेक्ट्रिक मोटर वापरली होती. भारतात स्पेअर मिळत असल्याने स्वस्तात पडली. (अर्थात, आधी तुमच्या मॉडेल करता सेसीफिकेशन्स योग्य आहेत का हे पहावे लागते.) आजकाल ग्लो इंजिन्सपेक्षा इलेक्ट्रिकल मोटर्स जास्त पॉप्युलर आहेत (प्रॉपेलर वापरा किंवा 'डक्ट-फॅन')

या शिवाय तुम्ही जरी स्वत: बनवलेले विमानाचे मॉडेल छंदासाठी म्हणून उडवत असाल तरी तुम्ही अवैध रितीने कोणाचे तरी निरीक्षण करता आहात किंवा दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करता आहात असा संशय इतरांनी घेणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्या प्रमाणात तरी या ड्रोन्स विमानांनी या छंदाचे एक प्रकारे नुकसान केले आहे असे म्हटले तरी चालेल.

असे समजण्याचे अजिबात कारण नाही. ड्रोन्स अगदी रोजचा विषय झालेल्या अमेरिकेतही हा छंद अजून चांगला चाललेला आहे.

सिफ़र Thu, 02/01/2014 - 16:16

हडपसर ला सासवड रोड वर ग्लायडइंग ची सुविधा आहे. भारत सरकारचा उपक्रम आहे, फुल टाइम ग्लायडइंग शिकण्याची सोय पण आहे. पार्ट टाइम नाही :(
मज्जा म्हणून एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही फक्त १८० रुपयात. रविवारी सकाळी १० ते दुपारी १-२. सकाळी १० ला हजर झाल्यास नंबर लागणे शक्य आहे.

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 16:19

In reply to by सिफ़र

मी गेलोय तिथे. लै खत्रा अनुभव असतो. फी रु. १८७/- फक्त. असली अडनीड फी ठेवून त्यांना काय मिळते काय ठौक. टिपिकल सर्कारी.

बाकी १० ऐवजी ९ ला जाणे सुचवितो. नंतर गर्दी होऊ शकते-होतेच.

सिफ़र Thu, 02/01/2014 - 16:37

In reply to by बॅटमॅन

तिकडे भरुचा नावाचा एक पंजाबी (विनोदी पण सरदार नाही असा) उत्तम मराठी बोलणारा म्हातारा पायलट आहे, तो प्रत्येकाला सांगतो कि हि माझी पहिलीच वेळ आहे मग सोबत घेऊन उडतो अजूनच खत्रा वाटते मग.

त्याला मी फी चा मुद्दा मी विचारलेला … उत्तर: "साला फी जास्त असली तरी प्रोब्लेम कमी असली तरीही, काय कराव तुमच्या साठी सरकार्न ?"
मग मि विषय कट केला :)

बॅटमॅन Thu, 02/01/2014 - 17:17

In reply to by सिफ़र

भरुचा म्हणजे तोच का तो शिडशिडीत ब्रिटिश अंमलातील वाटाव्यात अशा मिशा ठेवणारा???? मस्त मजेशीर पात्र आहे. :)

शहराजाद Thu, 02/01/2014 - 21:26

In reply to by बॅटमॅन

लै खत्रा अनुभव असतो. फी रु. १८७/- फक्त.

सहमत. फार्फार पूर्वी मी तिथे ग्लैडिंग शिकायला जात असे ते आठवले.
त्याही आधी माझ्या वडिलांचे एक परीचित तिथे शिकत असत त्यावेळी आठ रु. प्रत्येक फेरीचा दर होता, तो नंतर एकाएकी वाढून पंधरा झाला होता :).
आत्ता हिवाळ्यात छान हवा असेल उडायला!