निव्वळ माणसांबद्दलची गोष्ट

एखादी गोष्ट आवडण्याकरिता त्या गोष्टीत काय असायला हवं?

कोणाला सुखांत आवडतो तर कोणाला शोकांतिका आवडतात. काहींना नाट्यमयता ठासून भरलेली गोष्ट आवडते. पण माझ्याबद्दलच सांगायचं तर मला ’य’ बिंदूपासून सुरू हो‌ऊन ’व’ बिंदूपाशी संपणारी गोष्ट आवडते. त्या गोष्टीने ’य’ पाशी सुरू होण्यात आणि ’व’पाशी सपण्यातच तिचं सौंदर्य असतं. ’य’ पाशी सुरू होताना ’प’, ’फ़’ हे टप्पे सांगता येतात किंवा तिला ’श’ पर्यंत ताणता येतं, किंबहुना तसंच करायला हवं होतं असं सर्वांचं मत असतं; पण, तिने ’व’ पाशीच संपून ती गोष्ट माझ्या पद्धतीने संपवण्याचं, अनेक शक्यता पडताळून पाहायचं स्वातंत्र्य मला दिलेलं असतं. अशी गोष्ट सुरूवातीच्या आधीच्या कित्येक शेवटांच्या शक्यता सांगते आणि शेवटानंतरच्या अनेक सुरूवातींना जन्म देते. इतरांना वाटतं की त्यात काहीतरी राहून गेलंय. पण काहीतरी नेहमीच राहून गेलेलं असतं फ़ोक्स, काहीतरी नेहमीच राहून जातं. पूर्णत्वाची भावना नकोच असते अगदी पण गोष्टीत काहीही नसण्याची, त्यातल्या कशानेही आतात काहीही न हलल्याची भावना नको असते. बारीकसारीक तपशीलांतील केव्हढेतरी मोठे अर्थ उलगडत, सामान्य गोष्टींना असामान्यत्व बहाल करत, मनाच्या आत खोल खोल कुठेतरी रुतून बसलेल्या आठवणी उपसून काढत काढत या गोष्टीचा ’य पासून ’व’ पर्यंतचा प्रवास चालतो. त्यांत छान छान आदर्शवादी, लार्जर दॅन ला‌ईफ़ माणसं नसतात तर अनंत चुका करणारी, चुका प्रांजळपणे मान्य करणारी किंवा कधीकधी त्या चुका नव्हेच अशा ठाम समजात जगणारी, चुका करत करत, पडत-सावरत पुढे जाणारी, विचार करणारी माणसं असतात, या माणसांमध्ये एक समान दुवा असतो-नसतो. ती माणसं कधी एकमेकांना ओळखत असतात, कधी नसतात. ती माणसांच्या सभोवतालची नव्हे तर माणसांबद्दलची गोष्ट असते. मी नुकताच अशी माणसांबद्दलची गोष्ट पाहिली.

या गोष्टीत दोन माणसं आहेत. ही दोन माणसांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. ते एकमेकांच्या शेजारी राहात नाहीत, त्यांच्यात दूरन्वयानेही कोणतं नातं नाही. ते बहुधा शहराच्या विरूद्ध टोकांना राहतात. त्यांच्या वयातही बराच फ़रक आहे. त्यातला एक माणूस आहे साजन फ़र्नांडीस आणि दुसरी आहे ईला.

साजन फ़र्नांडीस एक चाकरमानी आहे. गेली पंचवीस वर्षे तो एका रूक्ष सरकारी ऑफ़िसातल्या क्लेम्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. लवकरच तो स्वेच्छा निवृत्ती घेणार आहे. तो रोज सकाळी आपलं घर सोडतो, बस पकडून गर्दीतून धक्के खात बांद्राला येतो. बांद्राहून ट्रेन पकडतो, बसायला जागा मिळाली तर ठीक नाहीतर उभं राहून चर्चगेटला उतरून ऑफ़िसला येतो. तिथल्या पिवळट, खाकी रंगाच्या फ़ायली, सरळ पाठीच्या, जास्त बसलं तर ’तिथं’ रग लावणा-या, माणूसघाण्या लाकडी खुर्च्या, फ़ायलींच्या ढिगा-यात हरवून गेलेली माणसं, कण्हत फ़िरणारे पंखे, त्या पंख्याने हवा घुसळली गेली तरी जाणवावी इतकी वातावरणातील तटस्थता, प्रत्येक जण आपला मान खाली घालून काहीतरी करतोच आहे असं एकंदरीत वातावरण. मा्ना खाली घालून काम करणा-या त्या असंख्य कर्मचा-यांतील एक कर्मचारी म्हणजे साजन फ़र्नांडीस. गेली पंचवीस वर्षे कामात कोणतीही कसूर न करणारा अतिशय इंफ़िशियण्ट पण माणूसघाण्या मनुष्य. आपण बरं आपण काम बरं, बाकी लेको तुम्ही गेलात तेल लावत असा खाक्या. साजन एका रेस्टॉरंटमधून डबा माग्वतो याचा अर्थ करून घालणारं कोणी नसावं असा अर्थ लावायचा. तिथेही तो जेवणाबद्दल सारख्या तक्ररी करणारं गि-हा‌ईक म्हणून ओळखला जातो त्यामुळे तिथलं जेवण, जेवण नसून पोटात घालायचं जळण असा प्रकार असावा हादेखील एक कयास. साजन एक वाजता जेवत असेल, पुन्हा कामाला लागत असेल. पावणेपाच वाजता काम आटपून आजूबाजूला न पाहता स्टेशनवर येत असेल आणि थकलेल्या, पेंगुळलेल्या आणि घराची ओढ लागलेल्या हजारो चाकरमान्यांच्या गर्दीचा एक भाग बनून जात असेल. तो गर्दीत जा‌ऊन मिसळतो तेव्हा त्याच्याभोवती पातळ मेम्ब्रेनचे बुडबुडा असल्यासारखा वाटतो. त्या बुडबुड्याच्या पलीकडे सर्वांची आयुष्यं समांतरपणे चाललियेत. माणसं त्यांच्यावरुन वाहतायेत खरी पण असं असूनही ती ऑब्लिव्हियस आहेत आणि तोसुद्धा. त्या बबलच्या एका विशिष्ट परीघातलं वातावरण एकदम स्तब्ध, त्या वातावरणापलीकडे कुठेतरी ती गर्दी अनावर आपल्यातच कोसळत असलेली. मग ट्रेनमधून उतरून तो तीच ठराचिक बस पकडत असेल, कधीकधी त्याला बसयला जागा मिळत असेल,कधीकधी मिळत नसेल, कधीकधी चेंगरून यावं लागत असेल. काहीकाही वेळा साजनला विंडो सीट मिळते तेव्हा साजन रिकाम्या डोळ्यांनी बाहेरचं दृश्य पाहात असतो. ते दृश्य त्याच्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे कळायला मार्ग नाही. तो घरी येतो. त्याचा दिनक्रम रोज असाच असतो, उद्याही तसाच असणार आहे, त्यात जराही बदल होत नाही. आला दिवस तसा-तसाच असण्याच्या ग्लानीतच त्याच्या नकळत कित्येक वर्षे निघून गेली आहेत.

मुंब‌ईतील हजारो गृहिणींसारखी एक ईला. ईला फ़क्त ईला आहे. तिला आडनाव नाही. ती पंजाबी ढंगाचं तोडकं हिंदी बोलते. लग्न, लग्नानंतर लगेचच मूल, मग मुलाची उस्तवार करण्यात पाच-सहा वर्षे चुटकीसरशी निघून गेलेली, नव्हाळीची वर्षं त्यात करपत चाललेली बा‌ई आहे ती. नवरा कायम कामात व्यस्त आणि घरी असेल तेव्हा कायम फ़ोनवर. त्यामुळे पती आणि तिच्यामध्ये दुरावा निर्माण होतो आहे. पतीला जिंकून घ्यायचे सर्व उपाय हरतात तेव्हा ती समस्त स्त्रीवर्ग करतो तो उपाय करते. पतीला खूष करण्याचा मार्ग म्हणे त्याच्या पोटातून जातो, त्यामुळे त्याला आपल्या हातातल्या चवीने जिंकायचं असं ती ठरवते. या कामात तिच्या घराच्या बरोबर वर राहणारी तिची स्मार्ट आंटी खंबीरपणे तिच्या पाठीशी आहे. ईला सकाळी उठते, मुलीच्या शाळेच्या तयारीला लागते, सगळ्या आयांप्रमाणे कितीही लवकर उठलं तरी शाळेची रिक्शा ये‌ईपर्यंत तिची मुलीची तयारी करून झालेली नसते. मुलीला शाळेला पिटाळलं की ती नव-याच्या डब्याच्या तयारीला लागते. उद्या काय करायचंय हे तिने बहुतेकवेळा आदल्या दिवशीच ठरवून ठेवलेलं असतं. जेवण होता होता डबेवाला येतो, तिने कितीही वेळ ठेवून जेवण करायला सुरूवात केली तरीही डबेवाला ये‌ईपर्यंत तिचा डबा कधीही भरून झालेला नसतो. ती घा‌ईघा‌ईत डबा भरते पण त्या घा‌ईतही ती गव्हारीच्या भाजीवर खिसलेलं खोबरं टाकायला विसरत नाही. डबा भरून डबेवाल्याच्या हातात दे‌ईपर्यंतच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या डब्याच्या पिशवीवर लागलेलं पीठ झटकण्याचा तिचा निकराचा प्रयत्न चाललेला असतो. दार बंद केलं की मुलगी घरी ये‌ईपर्यंतचा दिवस तिच्यासमोर आ वासून पडलेला असतो. रात्री जेवताना नवरा ताटातल्या जेवणाबरोबर टीव्हीपण जेवत असतो, मुलगी खाली मान घालून जेवण चिवडत असते, तिघांमध्ये हसणं-खेळणं तर सोडूनच द्यायचं पण एका शब्दाचंही संभाषण होत नाही. जेवण होतं आणि तिचा दिवस संपतो. उद्याचा दिवस देखील आदल्या दिवसावरून छापून काढल्यासारखा असतो. फ़क्त भाजी बदलते, कपडे बदलतात आणि आंटीला सांगीतलेल्या व्यथा बदलतात. पण ती आला दिवस साजरा करायच निकराने प्रयत्न करते. कधीकधी खूपच असह्य झालं की ती तिच्या आ‌ईकडे जाते. पण तिथूनही ती डोक्यात हजारो प्रश्न, नव्या काळज्या घे‌ऊनच परतते. तिच्या बाबांना फ़ुफ़्फ़ुसाचा कॅन्सर आहे. या सर्व रगड्यात ती इतकी हरवून गेल्यासारखी झाली आहे की मागच्या वेळी कोरलेल्या भुवयांचे केस आता कसेही वाढले आहेत याचे तिला भानही नाही.

ईला तरुण आहे. तिच्या बोलण्यातल्या लाडीकपणाला, आर्जवाला नवेपणाचा वास आहे. नवरा तिची हौस कायम मोडून पाडत असला तरी ती हौशी आहे हे खरं. नवीन प्रयोगांचं तिला वावडं नाही. पण, साजनचं तसं नाही. साजनच्या घरातल्या गोष्टी साजन इतक्याच जुन्या आहेत किंवा त्या गोष्टींसोबत साजन जुना होत गेलाय असं म्हणत ये‌ईल. जुनं काळातलं कपाट, शेल्फ़स, कित्येक वर्षांपासून पडलेली असावी अशी वाटणारी, कोणी हलवायचीही तसदी न घेतलेली अशी अडगळ, जुनी सायकल, जुने प्रोग्राम्स, जुना रेडीयो ज्यावर भुटानचं चॅनेल लागतं, कुठल्यातरी जुन्या काळचा शाम्पू ज्याचं टोपण लावायचीही तसदी घेतलेली नाहीये, जुन्या टीव्हीवर रेकॉर्ड केलेले जुनेच कार्यक्रम पाहणारा जुना साजन. या सर्व जुन्या गोष्टींना साजनची सवय हो‌ऊन गेलीये आणि साजनला त्यांची. या सर्व चक्रात इतका तोचतोचपणा आहे की साजन रोज घरी ये‌ऊन तेच तेच कपडेच घालतो, त्याच वेळेला सिगरेट्स पितो, त्यानंतर बाहेरून आणलेल्या चिवट पोळ्या आणि कुठलीही भाजी म्हणून खपेल अशी भाजी चिवडत काल संपलेल्या पानावरून कादंबरी वाचायला सुरूवात करून काही पाने पुढे आणून ठेवतो. उद्याचा दिवस कसा असणार आहे हे त्याला आताही सांगता ये‌ईल, ते त्याला माहीत आहे. माहीत असलेल्या गोष्टींचं एव्हढं काय ते नवल आणि त्यात काय एव्हढंसं. तो उठेल, तयार हो‌ईल, बांद्राहून ट्रेन....

ही गोष्ट वर्षानुवर्षे शरीराला, मनाला त्याच त्याच प्रकाराच्या जगण्याची, अशा-तशा प्रकारच्या संवादांची किंवा संवादाच्या अभावाची, चुकूनही यांत कोणताही बदल न होण्याची सवय झालेल्या या माणसांच्या आयुष्यात अचानकपणे घडून आलेल्या बदलाविषयी आहे. बदल घडण्याची शक्यता दिसत असेल तर ती आजमावून पाहण्याकरिता, त्या बदलाला सामोरे जाण्याकरिता धाडस लागतं. मुळात आपल्या आयुष्यात बदल घडतो आहे हे मान्य करण्याकरिता प्रचंड प्रामाणिकपणा लागतो, बदल करून घेताना तो आपल्याला पटला, भिडल तरच करून घ्यायचं शहाणपण लागतं. कधीकधी बदल घडतोच आहे तर फ़ार विचार न करता मनाला वाटतं म्हणून धाडकन एखादी गोष्ट करून वेडेपणा लागतो. कधीकधी बदलांमुळे प्रचंड बावरायला होतं, सगळं सोडून, कोणालाही कसली उत्तरं न देता पळून जावंसं वाटतं, कधीकधी पळून गेल्यावर पुन्हा परतावंसंदेखील वाटतं. पण, आपल्याला अमुक एका वेळी अस का वाटतंय याचे निश्चित कारण माहित नसलं तरी अंदाज मात्र असतो. या गोष्टीतील माणसं अशीचवेडी- खुळी, शहाणी, प्रांजळ, प्रामाणिक, स्वप्नाळू अशी बरीच काही आहेत. ती खोटी नाहीत, दुटप्पी, दांभिक तर त्याहून नाहीत.

बदल घडणं ही चांगली गोष्ट आहे. वर्षानुवर्षे एकाच रूटने प्रवास केल्यावर कधीतरी एकदा नवीन रूट घे‌ऊन पाहावा. नेहमीचेच थांबे घेण्यापेक्षा एखाद-दुसरा थांबा वाढवून पाहावा. कधी बसने न येता रिक्षा करावी, कधीकधी उगाच कुठेतरी रेंगाळावं, उशीरा घरी परतावं. चहाचे दोन घेत केवळ आपल्याकरिता दहा एक मिनीटांचा वेळ काढावा. त्यात आपल्या आवडीचं काम करावं. कधीकधी अज्ञाताच्या हाती स्वत:ला सोपवून द्यावं, कधीकधी अनोळखी माणसावर विसंबून राहावं, वेडेपणा करून पाहावा, कधीमधी माणूसघाणेपणा सोडून एखादा माणूस जोडून पाहावा, त्याला पाठीशी घालावं, त्याची हकनाक काळजी करत राहावी, कधीकधी चुकीच्या रस्त्याने आपल्या घरी जायला पाहावं. कधीकधी तो चुकीचा रस्ता देखील आपल्याला बरोबर ठिकाणी पोहोचवतो. बदल खरंच चांगलं असतात. आयुष्यातली पुरेशी वर्षं जगून घेतली म्हणजे जगून घेतलेल्या वर्षांमधली लय अखेरीस आपणांस सापडली आहे असं आपल्याला उगाचच वाटत असतं. पण, असे छोटेछोटे बदल झाले तरी बदला‌आधीच्या दिनक्रमातली, त्या सापडलेल्या लयीतीलही चाकोरी,तोचतोपणा चटकन लक्षात येतो. साजन एके संध्याकाळी नेहमीचे कपडे घालत नाही तेव्हा त्याच्यामधला बदल अखेरीस त्याने मान्य केल्याचे आणि त्या बदलासोबत दोस्ती करून टाकल्याचे आपल्याही लक्षात येते. आपल्यात बदल झाले की आपल्या नकळतच आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणातलेही बदल टिपायल लागतो. वास्तविक पाहता ते तेव्हाच बदललेलं असतं नाही तर एव्हढी वर्षे आपलं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं इतकंच. मग बदललेल्या इमारती दिसतात, कित्येक वर्षांमागे पाहिलेल्या जागा आहे तशाच आहे असे पाहून आश्चर्य वाटतं, आयुष्याला काहीतरी अर्थ गवसला आहेसं वाटायला लागतं. आयुष्य अशा छोट्या छोट्या गोष्टींनी अर्थपूर्ण करता येते. एक साधं सरळ जिवंत सत्य असतं ते. या गोष्टीत ते सापडतं.

पण कधीकधी जास्त बदल करून घेण्याचीही भीती वाटते. एकतर ते अन-डू करता येत नाहीत. मागे परतायचं म्हटलं तरी पूर्वीचे ते आपण आपल्याला सापडू की नाही याचं भय वाटतं. मग बदला‌आधीच्या आपल्याला एका खुंटीला बांधून बदल आपल्यात बदल करायचे म्हटले की कुतर‌ओढ ही व्हायचीच. मग साजननं एके संध्याकाळी सिगरेट न पिणं. कित्येक वर्षांची सवय अचानक मोडल्याने होणारी तगमग, अस्वस्थता आणि निर्ढावलेल्या, बदलांना नाखूष असलेल्या, निबर झालेल्या साजनच्या डोक्यात परिहार्पयणे सुरू होणारं विचारांचं चक्र. ही गोष्ट बदलांना आपल्या आतून होणा-या विरोधाचीही गोष्ट सांगते.

या गोष्टीत स्वाभाविक गोष्टी तर आहेत पण खूप सूक्ष्म गोष्टींतून डिफ़ा‌ईन होणा-या खूप सा-या गोष्टी आहेत. कधीकधी खूप शांतता आहे पण त्या शांततेच्या पार्श्वभूमीला खूप सारे, वेगवेगळ्या पिचमधील, वेगवेगळ्या टेक्सर्चचे आवाज आहेत. ते त्या शांततेला अधिक गडद करतात. साजनाच्या घरातली शांतता अशीच काळीकभिन्न आहे. कधीकधी खूप गोंगाट आहे, खूप गर्दी आहे, खूप माणसं एकाचवेळी बोलतायेत पण त्या गर्दीत उभ्या असलेल्या माणसाचं एकटेपण, तुटकपण कच्चकन रूततंय, फ़ार काही सांगायला –दाखवायला न लागता कळतंय. घडयाळाच्या ताणलेल्या स्प्रिंगसारखा ताण आहे, कंटाळ्याने सगळ्यांना संमोहीत केल्यासारखा चमत्कारीक यंत्रवतपणा देखील आहे. गोष्टीच्या सुरूवातील साजन आणि ईला यांचा दिनक्रम दाखवल्यावर यांत कधीही कसलाही फ़ेरफ़ार होत नाही, होणार नाही. हे असच असणार आहे हे आपल्याही नकळत आपण गृहीत धरण्यातला, हे असंच चालू असण्यातला, तपशिलातही फ़ेरफ़ार न होता असं-तसंच असण्यातला, ह्या असण्या-नसण्यातलं आपल्या हाती काहीच नसण्यातला, इतकंच काय तर त्यांच्याही हाती काहीही नसण्याचा होपलेसपणा आहे. साजन बसला आहे ती एक खोली आहे. पण त्या खोलीपलीकडेही खोल्या आहेत; म्हणजे असू शकतील. पण साजन तिथे बसला असताना एखादी व्यक्ती या खोलीतून बाजूच्या खोलीत जा‌ऊ शकते ही शक्यता आपण साजनला लागू करत नाही. त्याच्या एकटेपणाची आपण आपसूक मान्य केलेली ही जाणीव अतिशय तीव्र आहे, धारदार आहे. ती जाणीव डोक्याच्या पाठी कुठेतरी सतत टकटकत राहते . पण साजनचं असं असलं तरी ईलाला ते लागू नाही ही गोष्ट आपल्या नकळत आपल्याला मान्य होणेही आहे. ईलाचं स्वत:ला प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणं यापेक्षा तेच प्रश्न दुस-याला विचारून त्यातून आपली उत्तरं मिळतायेत का हे पाहणं आहे. त्याचवेळी साजनचं एकही प्रश्न न विचारणंही ठळक होतं आहे. बोलण्यातील घुटमळीतून मनातल्या प्रश्नांना होय/नाहीमध्ये तोलणं सुरू आहे. मनातलं सगळं सांगून टाकतो त्या व्यक्तीपासून काही गुपिते ठेवणं आहे किंवा कधीतरी सांगायचं तर भरपूर आहे पण मध्ये दुराव्याची एक मोठीच्या मोठी भिंत उभी आहे अशी परिस्थिती आहे. टेबलाच्या दोन टोकाला बसलेल्या व्यक्तींमधलं पार न करता येणारं अंतर दिसतं आहे तर कधीकधी शहराच्या दोनटोकाला बसलेल्या व्यक्ती एकमेकांच्या एकदम निकट असाव्यात असं वाटतंय. दोन माणसांच्या बाबतीत एकाच वेळी समान गोष्टी घडण्यातला योगायोग आहे पण माणसांची गर्दी असलेल्या शहरात असे घडणे नवलाचे आहे असं वाटण्याची अपरिहार्यताही आहे.

मी खूप लहान असतानाची गोष्ट आहे. पहाटे पहाटे चार साडेचारच्या सुमारास मला जाग यायची. डोळे किलकिले करून पहिल्याप्रथम मी अंथरूणावरच्या आ‌ईच्या जागेकडे पाहायचे. तिथे तिचं अंथरूण नीट घडी करून गादीच्या पायाशी ठेवलेलं असायचं. स्वयंपाकघरात जाग असायची. दिवा ढणढणत असायचा. तिथं दारापाशीच एक पारा उडालेला छोटा आरसा लावलेला असायचा. त्यामध्ये पाहत बाब केस विंचरत असायचे. त्यांनी लावलेल्या कुठल्यातरी पावडरीचा हलका गंध दरवळत असायचा. आम्हा मुलांची झोपमोड हो‌ऊ नये म्हणून त्या दोघांमध्ये हलक्या आवाजात काहीतरी बोलणं चालू असायचं. मग स्वयंपाकघरातून येणरे एकेक खमंग वास माझ्या नाकाला गुदगुल्या करू लागायचे. पोळीचा खरपूस वास यायचा आणि झोप पार उडून जायची. मग मी उठायचे आणि अर्धवट झोपेत स्वयंपाकघराच्या दाराला ओठंगून उभी राहायचे. २० वॉट्सच्या दिव्याच्या प्रकाशात ते धुरकटलेलं स्वयंपाकघर एकदम सिंदबादच्या गोष्टीमधल्या जादु‌ई नगरीसारखं वाटे. आ‌ई बाबांचा डबा भरत असायची. तिचे केस पार विस्कटलेले असायचे, उठल्या उठल्या ती बाबांच्या डब्याच्या तयारीला लागलेली असायची. परवडत नसताना तिने त्या काळी बाबांसाठी तो मोठा डब्बा आणला होता. मस्टर्ड रंगाचा, चार कॅरीयरवाला. त्याला जाड ऑफ़ व्हा‌ईट रंगाची पट्टी होती. बाबा तिच्या खांद्यावरून वाकून ती डब्यात काय भरतेय ते पाहत असायचे. मध्येच ते काहीतरी बोलायचे आणि आ‌ई गालातल्या गालात हसायची. बाबा डबा घ्यायचे, दारापाशी यायचे, माझे केस खसाखसा विस्कटायचे आणि निघून जायचे. त्यांना सोडायला आ‌ई दारापाशी जायची आणि ते रस्त्याच्या वळणा‌आड दिसेनासे झाले की दार बंद करून त्याला टेकून उभी राहायची. त्यावेळी तिच्या वेह-यावर एकदम गूढ हास्य असायचं. काहीतरी गुपित केवळ तिला आणि तिलाच माहित असल्यासारखं. या आठवणीत संभाषण नाही. असलंच तर ते न कळेलशा कुजबुजीच्या स्वरूपात आहे. बाकी फ़ोडणीच्या चुरचुरीचे आवाज आहेत, बेसिनचा नळाची तोटी जरा जास्तच फ़िरल्याने फ़र्र्कन आलेल्या फ़व-याचे, पोळपाट लाटण्याचे, पोळी तव्यावर टाकल्याचा चर्र आवाज आहे. तेव्हा गाजत असलेले गाणे आ‌ई हलकेच गुणगुणत असायची ती गुणगुण आहे. बायोस्कोपमध्ये फ़टाफ़ट बदलल्यासारखी दिसणारी अर्धवट प्रकाशातली दृश्ये आहेत, खूप सारे गंध आणि आवाज आहेत. पण एखादी आठवण यावी आणि दुल‌ई पांघरल्यासारखं उबदार वाटतं अशा आठवणींपैकी ही एक आठवण आहे.

काही गोष्टी जशाच्या तशा आपल्या आठवणीत राहात नाहीत-त्या महत्वाच्या नसतात म्हणून नव्हे तर त्यांना आठवणीत न ठेवणं ही आपली त्या त्या वेळ्ची गरज असते. त्या आठवणींतील बारीकसा तपशील मात्र आपल्या मनात खोलवर रुतून बसलेला असतो. एखाद्या वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण नेगेटीव्ह वर कसे चिरंतन उमटतील पुराव्यादाखल, तसंच त्या तपशीलाने मनावर कायमची खूण उमटवून ठेवलेली असते. नंतर काहीतरी चांगलं वाचल्या-पाहिल्याचं निमित्त होतं आणि त्यातल्या एखाद्या तपशीलावरुन ती पूर्ण आठवण आपल्यासमोर उलगडत येते. गुगल सर्चमध्ये टॅग्स असतात ना तसं. विवक्षित टॅगवरुन कशी पेजेसची जंत्री आपल्यासमोर हजर होते?

आठ्वणी अशा अकस्मातच ये‌ऊन आपल्याला चकीत करतात. मी नुकताच पाहिलेल्या त्या गोष्टीने माझं हे असं, एव्हढं-एव्हढं, इतक-इतकं झालंय. त्या गोष्टीचं नाव होतं-
’द लंचबॉक्स’.

--

हे लिखाण माझ्या ब्लॉगवरही पाहता येईल.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.833335
Your rating: None Average: 4.8 (6 votes)

प्रतिक्रिया

मूव्ही कुठे बघायला मिळेल विचार करतोय. पण तोपर्यंत ही समीक्षा / रसग्रहण पुरेल. व्वा.

...त्या पंख्याने हवा घुसळली गेली तरी जाणवावी इतकी वातावरणातील तटस्थता...

...वास्तविक पाहता ते तेव्हाच बदललेलं असतं नाही तर एव्हढी वर्षे आपलं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं इतकंच....

अशा काही वाक्यातनं नेमकं वर्णन केलंय. आणि शेवटी तुमची आठवण लिहिली आहे ती तर अप्रतिम आहे. एका शब्दात सांगायचं तर 'शब्दचित्र'.....नाही, 'शब्दचित्रपट' म्हणूया. कारण वर्णन वाचताना मला ते सगळं दिसायला लागलं. सुंदरच लिहिलंय तुम्ही.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मूव्ही कुठे बघायला मिळेल विचार करतोय. पण तोपर्यंत ही समीक्षा / रसग्रहण पुरेल. व्वा.

अगदी.

लेख पुन्हा वाचला, आणि पुन्हा आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फार फार सुंदर लिहीलंय.. लेख घाई घाईत न वाचता निवांत वाचण्यासाठी ठेवला होता, आणि खरंच बराचसा भाग तर प्रिंटऔट काढून ठेवण्याइतका सुरेख जमला आहे.
खूप खूप धन्स, लिहीत रहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनस्वी लेखन आवडलं. गोष्टीची गोष्ट न सांगता तिची बलस्थानं सांगून तिच्याविषयी उत्सुकता फार सुरेख रीतीने निर्माण केलेली आहे.

आजच्या जगातला गर्दीमधला एकटेपणा या समीक्षेतून पुरेपूर उतरलेला आहे. पण या दोघांच्या एकटेपणाचे पोत वेगळे वाटतात. साजनचा एकटेपणा जगाबद्दलची आसक्ती उडल्यातून आलेला आहे. तर ईलाची आसक्ती संपलेली नाही, तिला तो डबा बनवणं जमत नाही. आपल्या हातात मिळणाऱ्या चार क्षणांकडे बघण्याची, त्यांच्यातून काहीतरी घडवण्याची ऊर्मी त्या लंचबॉक्समधून दाखवलेली आहे. एका अर्थाने वाटतं की साजन ही ईलाची पुढची आवृत्ती आहे.

असो, समीक्षा वाचूनच कथेत इतकं अडकून पडायला होणं, तीविषयी काही अंदाज बांधण्याची इच्छा होणं हे समीक्षा यशस्वी झाल्याचं गमक आहे.
ता. क. सगळ्यांना इतक्या सहज समजेल अशा शब्दात आल्यामुळे म्हणा, किंवा एकंदरीत रसाळपणामुळे म्हणा या लेखनाला समीक्षा म्हणावं की रसग्रहण असा प्रश्न पडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समीक्षा, परीक्षण, चिंतनपर परीक्षण, आढावा, रसग्रहण काहीही म्हणा. भिडलं ते पोहोचलं (म्हणजे पोहोचलंय) म्हणजे मिळवलं.
आणि समीक्षा वाचक-फ़्रेण्डली नसतात का? की ब-याच अंशी वाचक-फ़्रेण्डली नसतात त्याच समीक्षा असतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

या प्रश्नावर मी काहीशी संभ्रमित आहे. (हे या धाग्यावर अवांतर आणि मणिकर्णिकेच्या सुंदर लेखाला अन्यायकारक होणार आहे. पण ठीक. बाई, समजून घ्यावा. ;-))

मला गणेश मतकरीच्या समीक्षा सहसा पटतात. त्यांत गोष्टीबद्दल एक अलिप्त कोरडेपणा असतो. समीक्षकाकडे या प्रकारचा अलिप्त कोरडेपणा होता होईतो असला पाहिजे, असं मला वाटतं. (हे १०० टक्के वेळा शक्य नाही. पण ठीक.) पण त्याचे लेख वाचून एखाद्या दिग्दर्शकाबद्दल माझ्या मनात पुरेशी उत्कंठा निर्माण होत नाही, असा माझा अनुभव. मी त्याचा लेख वाचून एखादा सिनेमा मुद्दामहून डाउनलोडवण्याचे कष्ट घेऊन पाहिला, असं सहसा होत नाही. त्या अर्थानं त्याचं लिखाण पुरेसं परिणामकारक नसतं. ते काठावरच राहतं.

याउलट मीच मागे मिपावर लिहिलेला मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यरबद्दलचा लेख आता मलाच फसवा वाटतो. त्यात गोष्टीखेरीज काही नाहीच. पण गोष्ट सर्वाधिक परिणामकारकपणे सांगण्या-दाखवण्याचं काम तर सिनेमानं आधीच केलंय. मग माझ्या लेखाचं काय प्रयोजन? लेख अधिक काही सांगतो का सिनेमाबद्दल? सिनेमानं माझ्यात पाडलेल्या फरकाबद्दल? तर तो कामाचा. नाहीतर नुसते शब्दांचे बुडबुडे. (मणिकर्णिका, या संदर्भात तुझ्या लेखातला शेवटचा भाग मला फार महत्त्वाचा नि जमलेला वाटतो. बाकीचा लेख नाही, स्वारी.)

यांतलं चांगलं काय नि वाईट काय, हे मला ठरवता येत नाही. ते बहुधा वाचकानुसार नि लेखकाच्या उद्देशानुसार सापेक्ष असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण या कोरडेपणाने काय साधतं? कोणत्याही गोष्टीने काही साधलं गेलंच पाहिजे असे नव्हे पण आपल्याला चित्रपट का आवडला किंवा का नाही आवडला हे लोकांना कळेल अशा भाषेत लिहीलं तरच लोकं तो आवडून किंवा नावडून घेतील नं? आवडून किंवा नावडून घ्यायची उत्कंठा निर्माण झालीच नाही आणि "हो! असं का?" म्हणून ती समीक्षा तितक्यावरच निकालात काढली गेली तर हे सगळं किमर्थम?
समीक्षा म्हणजे रिपोर्ताजसारखं असतं का? आणि हे रिपोर्ताज असे-तसेच असले पाहिजे असं कोण ठरवतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

कोरडेपणामुळे वाहून जाणं टळतं. व्यक्तिपूजा टळते. आपल्या व्यक्तिगत आवडीनिवडींपायी एखाद्या कलाकारावर होऊ शकणारा अन्याय वा वृथा आरत्या टळतात.

पुन्हा एकदा नोंदते: मला समीक्षकाकडे कोरडेपणा हा आवश्यक गुण वाटतो. (किंवा कोरडेपणा हा शब्द चुकीचा आहे. तटस्थभाव असा शब्द हवा.) पण मला त्या प्रकारे लिहिणं जमत नाही. आणि ज्यांना जमतं, त्यांच्या लिहिण्यातही (मतकरी) काहीतरी कमी आहे, असं जाणवतं. पण नेमका तोल कसा साधायचा (की तो साधणं अशक्य आहे, आणि मी समीक्षा नि रसग्रहण हे दोन लेखनप्रकार माझ्या त्या त्या वेळच्या गरजेनुसार वाचले पाहिजेत) यावर मला बोट ठेवता येत नाही. म्हणून संभ्रमित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते तसंही टाळता येऊ शकतं असं मला वाटतं, पण, पुन्हा एकदा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा. मनापासून केलेलं लिखाण (कोरडेपणाचा विरूद्धार्थी) म्हणजे भावनेत वाहावत जाऊन केलेलं लिखाणच असतं असं नसतं असं मला वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

तटस्थभाव
+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मतकरींबद्दल अगदी सहमत.
मतकरी बहुदा वर्तमानपत्रे/नियतकालिके अशा ठिकाणी लिहितात. शिवाय त्यांनीच मागे समीक्षणाबद्दल सांगताना असं जाणवलं की त्यांची समीक्षेची प्रकृती ही Rodger Ebertशी जुळती आहे. मर्यादित शब्दसंख्येचे भान त्यांच्या लेखाला लगडलेले जाणवते. ते पूर्ण/परिणामकारक वाटत नाही. जिथे शब्दसंख्येचे फारसे जाच नाहीत अश्या ठिकाणी त्यांचे लेखन पुरेसे विस्तृत वाटले.(काही दिवाळी अंकांतले लेख, दिग्दर्शकांना मध्यवर्ती ठेवून लिहिलेले पुस्तक). पण एकंदरीत त्यांचे चित्रपटात न गुंतलेले असणे,सिनेमाच्या तांत्रिक अनुषंगाने प्रामुख्याने लिहिणे मलाही नीरस करणारे असते. अजुन एक उत्सुकता होती, त्यांना लहानपणापासून लाभलेले सांस्कृतिक वातावरण, साहित्य(कदाचित साहित्यिक)(विशेषत: मराठी)(शिवाय त्यांचे पुस्तकप्रेम ते जाहीर करतातच) आणि चित्रपट या संबंधी त्यांनी फारसं का लिहिलं नाही, याची. मुक्त-शब्द मध्ये याच विषयावर लिहून त्यांनी ही उत्सुकता काही अंशी शमवली. but still...

निखिलेश चित्रे हे आणखी एक दमदार नाव. हौशींनी कृपया प्रकाश टाकावा.
गुलजारमय पाडळकर कधी कधी जास्तीचे इमोसनल वाटतात आणि पूर्णत: ललित अंगाची समीक्षा करतात.
अजून एक (दुर्लक्षित)नाव म्हणजे, अनमोल कोठाडिया. विद्वान, संतुलित, मानवतावादी, पर्यावरणवादी, डाऊन टू अर्थ असा सिनेमा कोळून प्यालेला माणूस. परंतु हा दीर्घ लिहायलाच तयार नाही.
बाकी श्रीकांत बोजेवार, विश्वास पाटील,सुधीर नांदगावकर,अलीकडे लोकमतच्या मंथन पुरवणीत 'मोंताज' म्हणून लिहिणारे आणि रसग्रहण, समीक्षा म्हणजे डायलॉग्ज लिवणारे 'अभ्यासक'अशोक राणे अज्याबात आवडत नाहीत.
चिजं बद्दल अ.सां.न.ल!भारी!
संदर्भ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशोक राणेंचे फार कमी लेख वाचले आहेत मी. पण माझ्या काय डोक्यात वगैरे जायला नाहीत ते. का आवडत नाहीत हो राणे?

बोजेवारांचे समीक्षात्मक परीक्षणात्मक लेख स्वतंत्रपणे बरे वा वाईट असत. सिनेमाची त्याचा घंटा संबंध नसे.

नांदगावकर म्हणजे नुसत्या जंत्र्या.

विश्वास पाटलांचे रसाळ असत. पण ट्रिव्हिआ भारी. समीक्षा आपली चिमूटभर.

चित्रेंचंही फार काही वाचलेलं नाही. कुठे मिळेल?

कोठाडिया हेही नवीन आहे नाव.

पाडळकर उग्गीच कायच्या काय लांबण लावतात. एकदा एक सिनेमा घेतला की पिळूनच बाजूला होणार. त्याहून त्यांचं पुस्तकांबद्दलचं एक पुस्तक मला आवडलं होतं. नाव विसरले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बोजेवारांचे समीक्षात्मक परीक्षणात्मक लेख स्वतंत्रपणे बरे वा वाईट असत. सिनेमाची त्याचा घंटा संबंध नसे.
कळाले नाही. बोजेवारांच्या खाती "वास्तवदर्शी चित्रपट" हे पुस्तक आहे. ते लिहितात की सिनेमावर अधूनमधून. ( शिवाय 'हजाराची नोट’ नावाचा चित्रपट लिहिला आहे.)
चित्रेंबद्दल मलाही हाच प्रश्न पडला आहे. लोकसत्तेमध्ये कधीतरी त्यांचे एक दोन लेख वाचल्याचे स्मरते. आवडले होते.
पाडळकर म्हणशील तर तुझे म्हणणे "गंगा आये कहांसे" या गुलजारी चित्रपटांची समीक्षा असलेल्या पुस्तकाबाबत खरे आहे. त्यांनी लोकरंग मध्ये दिग्दर्शककेन्द्री लेखमालिका लिवली. "सिनेमाटोग्राफ" नावाची. ते लेख आकाराने मर्यादित असल्याने त्यांना पिळता आले नसावे. त्यात त्यांनी एक दोन चित्रपटाबद्दल सविस्तर स्वतंत्र लेख लिहिलेत. (postman in mountains, pianist, 8 and half etc) ते बरे आहेत. त्याचे सिनेमायाचे जादुगार हे पुस्तकरूप.

आणखी एक उत्सुकता.
राणी दुर्वे. त्यांची प्रवासवर्णने/ललित लेख एकेकाळी खूप रुतून बसलेले. शब्देविण संवादु हे सदराचे नावही आठवतेय. त्यांचे पुस्तकरूप शोधताना त्याच नावाचे त्यांचे सिनेमाचे पुस्तक मिळाले. कुणी वाचले आहे का ते? (शिवाय "लक्ष पावलांचे अर्घ्य" हे पुस्तक देखील?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोजेवार लोकसत्तेत परीक्षणे लिहीत तेव्हाच्या त्यांच्या परीक्षणांबद्दलचा शेरा आहे तो. त्यांचं पुस्तक वाचलेलं नाही. त्यांचे लेख रोचक वा बोअरिंग असत. सिनेमा त्यांनी म्हटल्यासारखा असेच असं मात्र नाही.
राणी दुर्वेचं सदर (आणि नंतरचं पुस्तक) मलाही प्रचंड आवडलेलं होतं. मी दोन्ही पुस्तकं वाचलीयेत. दोन्ही सुंदर आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लंचबॉक्स म्हणजे मला दोन जीवांच्या अन्कोन्शिअस ब्रेन ने एकमेकांबरोबर केलेला संवाद वाटतो.लेख भारीच आहे. असाच काही वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

हे लिखाण माझ्या ब्लॉगवरही पाहता येईल.
मणिकर्णिकेच्या ब्लॉगला आवर्जून भेट द्या. जमेलतर सगळं वाचा. वयाच्या, समजुतीच्या,अनुभवांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत, घन होत जाणारा प्रयोगशील लेखनप्रवास खूप मनोज्ञ आणि हृद्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिनेमा पण आवडला आणि लेख पण!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऐसीवरचे क्षुद्र पाच तारे अगदी कमीच वाटायला लावायचे असा चंग बांधुन केलेले लेखन! तुफान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचनखूण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खूप छान लिहीलय _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

व्वा!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

कमाल लिखाण आहे. म्हणजे चित्रपटापेक्षा रसग्रहण भारी!! अतिशय सुंदर!!
मला मात्र हा चित्रपट फार भावला नव्हता.. चित्रपट बघून बाहेर पडल्यावर हा चित्रपट ऑस्करला पाठवायला पाहिजे होता हे नक्की! इतक काय ते जाणवलं. अर्थात ऑस्करला का पाठवायला हवं होत वगैरेची कारण खूप आहेत. पण फक्त ‘जबरदस्त भिडलेली गोष्ट’ या मुद्द्यावर मोजमाप करायला गेल तर हा चित्रपट मला उथळ वाटला.
कलाकृतीच्या मुळाशी असणाऱ्या भावना, विचार जितक्या कलाकाराच्या खोल अंतरंगातून येतात तितकी त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्याला ती जास्त भावते. भले व्यक्तिगणिक तिचे अर्थ कितीही वेगळे लागो पण कुठे तरी भिडण्याची बात त्या कलाकृतीत नक्की असते. थोडक्यात जितक्या भावना लोकल तितकी कलाकृती ग्लोबल! आता या सगळ्याला कारणीभूत असणारी निर्मितीची उर्मी ही तितकीच कलाकाराच्या जाणीवेतून तावून सुलाखून, कलात्मकतेच्या चाचण्या लावून बाहेर पडायला हवी आणि कलाकाराने या आंतरिक प्रवासाला जाणून सचोटीने ती मांडायला हवी.
ह्या सचोटीचा अभाव मला लंचबॉक्स मध्ये जाणवला. आणि वाटलं ‘हे’ म्हणजे अस्सल भारतीय नव्हे?. (हा चित्रपट भारतीय (म्हणजे नेमकी कोणती?) संस्कृतीचं, लोकांचं प्रतिनिधित्व करतो अस छातीठोक पणे लिहील बोललं जात होत) मी जे पाहतीये ते फार वरवरच आहे. चकचकीत आहे, सजावट आहे पण पण गाभा रसाळ नाही.
चित्रपट भावण्या न भावण्याचा अनुभव व्यक्तीगणिक बदलत असला तरी उदाहरणादाखल सांगते , साजन आणि इलाला जोडणारा लंचबॉक्स बऱ्याचवेळा लोकाल मधून, हातगाडीवरून डब्बेवाल्यांबरोबर मुंबईचा प्रवास करतो. हीच मुंबई मग कथेचा अविभाज्य भाग बनतेही. पण ती या सिनेमातली एक व्यक्तीरेखा म्हणून येत नाही. ही मुंबई अथांग पसरली आहे. माणसाच अस्तित्व किती शुल्लक आहे याची पदोपदी जाणीव करून देणारी आहे. या माणसाच्या समुद्रातले दोन नगण्य जीव नियतीच्या एका धक्क्याने एकमेकांना जोडली गेली आहेत, मग या नाट्याच पुढ जे काही होईल ते ते दोघे मुंबई मध्ये आहेत म्हणून काहीतरी वेगळ होईल. हेच दोघे जर अजून कुठल्या शहरात असले असते तर अजून काही तरी वेगळ झाल असत. कितीतरी वेळा शहर आपल्या व्यक्तीरेखांचा भाग होतात कि नाही? पण इथे असा होत नाही. शिवाय या सगळ्या डब्याच्या प्रवासात , किंवा साजनच्या लोकलच्या प्रवासात दिसणारी मुंबई ही एकसुरी मुंबई आहे. अगदी तश्शीच एकसुरी जसे डब्बेवाल्यांचे लोकल च्या डब्यामधलं ‘विठ्ठल-माउली’चे भजन. खरच डब्बेवाले वारकरी अस भजन म्हणतात?
जाता जाता खटकलेली अजून एक गोष्ट म्हणजे इलाचा स्वयंपाक. इथे सगळ आहे फोडणी टाकल्याचे चर्र आवाज, डबे भरायची घाई , नळाचे पाणी सोडण्याचे आवाज..वगैरे वगैरे. पण ती जे काही पदार्थ बनवते ते नेमके कुठले आहेत? पनीर सब्जी? गवारीची भाजी वरून खोबर?? कोफ्ताकरी?? म्हणजे यावरून ईलाविषयी आपल्याला काय कळत?? ती कुठली आहे? मुंबईला जरी चेहरा नसला तरी तिथे राहणाऱ्या माणसांना आहे ना. म्हणजे मराठी,कोकणी,पंजाबी असे अनेक प्रकारचे rootsroots आहेतच की. सगळे आपापल्या घरी आपापल्या संस्कृतीप्रमाणे रहात असतील की नाही? आणि अशी संस्कृती आणि तिची मूळ रोजच्या जेवण्यात तर अगदी प्रतिबिंबित होते. पण मग हे ईलाच्या बाबतीत मात्र होत नाही.
असो..तूर्तास इतकेच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिनेमा आवडला नाहीच.
खरच डब्बेवाले वारकरी अस भजन म्हणतात?
लोकल मध्ये हरीपाठ/भजन/होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा मुद्दा अगदी मान्य! मला सुद्धा चित्रपटात दाखवलेल्या भजनाची चाल कृत्रिम वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मला "शिप ऑफ थिसियस' ऑस्करला जावा असे वाटते.
गेल्यावर्षी रीलिझ झालेल्या इतर कोणत्याही भारतीय चित्रपटापेक्षा तो उजवा असावा असे म्हनावेसे वाटते (किमान मी बघितलेल्यांपैकी नक्कीच)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अमृतवल्ली,

मला आवडलं तू जे काही लिहीलं आहेस ते.

तुझी कमेण्ट वाचून मी मला काय वाटलं ते माझ्यापुरता लिहीते-
एखादी गोष्ट आपल्याला भिडणं, न भिडणं हे आपण त्या गोष्टीकडून काय अपेक्षा करतोय यावर अवलंबून असतं असं मला वाटतं. मला कोणत्याही चित्रपटातील इंटरपर्सनल रिलेशन्समध्ये रस असतो, त्यांच्यातले झालेले, न झालेले संवाद, बीटविन द लाईन्स अर्थ, शांतता, आवाज यांत रस असतो. ते अलवारपणे मांडलेले असतील तर त्यांच्या अलवारपणाबद्दल मला ते भावतात, इतकंच काय तर ते व्हायोलण्ट असतील तरी मी ते समजून घेऊ शकते. हे समजून घेणं हे आपला जेनोटाईप, आपले चॉईस, आपलं 'जगणं', आपले अनुभव यावर अवलंबून असतं. कोणत्या गोष्टीबद्दल किती एक्स्टेण्टपर्यंत जाणून घ्यावंसं वाटतं हे व्यक्तीगणिक बदलतं. पल्प फिक्शनमधला व्हिन्सेण्ट व्हेगा तो आहे तसा का आहे, हा प्रश्न मला नाही पडला. मी त्याला आहे तसा स्वीकारला. काहीजण त्याच्या गुन्हेगारी जगताकडे वळण्याबद्दल अगदी अभ्यासपूर्ण भाष्य करू शकतील. त्यांची गरज ती आहे. माझी गरज ती नाही. हे प्रश्न न पडणं, न पडणं यातील चूक काय, बरोबर काय हे मला माहीत नाही. म्हणून ईलाची रूट्स काय आहेत याबद्दल मला प्रश्न पडत नाहीत, ती एकटी आहे इतकं मात्र लख्ख कळतं कारण ते भिडतं, त्याच्याशी रिलेट करता येतं. ज्याच्याशी मला रिलेट करता येत नाही, किंवा रिलेट होताना ज्या गोष्टींची गरज भासत नाहीत त्याबद्दल मला प्रश्न पडत नाही. एखाद्या गोष्टीचा 'विचार' करणं आलं की विचारांचं पॉलिटीक्स होणं आलं आणि मला चित्रपटाचा, किंबहुना समष्टीय 'विचार' असा खरंच करता येत नाही. भिडलं असेल तर काय भिडलं हे मात्र नक्की सांगू शकते, नाही आवडलं तर काय आणि का नाही आवडलं ते सांगू शकते. हे असंच का नाही? हे प्रश्न विचारणारी मी कोण? ते कलाकारावर सोडावं, आपल्यापर्यंत पोहोचलं तर ठीक. Smile

Smile बघ, आता तुझ्या प्रतिक्रियेला लिहीताना मला आपसूक कळलं की मी समीक्षकी लिखाण का नाही करू शकत ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

मणी,

>>>तुझ्या प्रतिसादातला ईलाची रूट्स काय आहेत याबद्दल मला प्रश्न पडत नाहीत, ती एकटी आहे इतकं मात्र लख्ख कळतं कारण ते भिडतं, त्याच्याशी रिलेट करता येतं. ज्याच्याशी मला रिलेट करता येत नाही, किंवा रिलेट होताना ज्या गोष्टींची गरज भासत नाहीत त्याबद्दल मला प्रश्न पडत नाही.>>>>>>
ईलाचे रुट्स काय आहेत हा प्रश्न पडावाच असा नाही. पण मग character motivation च काय? एखाद पात्र असं का दिसतं असं का वागत याचं काहीतरी कारण हवं ना. मला मान्य की पल्प फिक्शनमधला व्हिन्सेण्ट व्हेगा गुन्हेगारी जगताकडे का वळाला याचा विचार करावाच अस नाही. किंबहुना तो त्या चित्रपटाचा scope च नाही. पण व्हिन्सेण्ट हा कसा दिसेल, कसा बोलेल, एखाद्या परिस्थितीला कसा सामोरा जाईल हे 'तो काय आहे ? कोण आहे?' वगैरे प्रश्न ठरवतील. थोडक्यात चित्रपटाच्या 'लॉजिक फ्रेम' मध्ये पात्र 'justify' व्हायला हवं तरच ते खर वाटत.

>>>>चित्रपटातील इंटरपर्सनल रिलेशन्समध्ये रस असतो, त्यांच्यातले झालेले, न झालेले संवाद, बीटविन द लाईन्स अर्थ, शांतता, आवाज यांत रस असतो. ते अलवारपणे मांडलेले असतील तर त्यांच्या अलवारपणाबद्दल मला ते भावतात,>>>>
इथे मला असं वाटतंय की जे तुला बिटवीन द सीन्स भावलय त्या चित्रपटातल्या रिकाम्या जागा तुझ्या मनाने तर भरून नाही काढल्या? जे आडात नाही तेही पोहऱ्यात आलंय . कदाचित म्हणूनच लेख फक्कड जमलाय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

हा चित्रपट मला बिल्कुल आवडला नाही पण हा ऑस्करला पाठवायलाच हवा असे मात्र वाटले.
याची कारणे खालीलप्रमाणे..
१) इट्स अबाउट बॉम्बे यु नो 'द कल्चरल मेल्टीग पॉट' अ‍ॅन्ड ऑल.
२) याच्यात इन्डीयन वुमन आर व्हेरी सेन्शुअस हे दाखवण्यात आलं आहे.
३) नॉट ओनली दॅट, दोज सेन्शुअस वुमन कुक स्पायसी फुड. युनो इन्डियन फुड इज व्हेरी स्पायसी वी ऑल हॅव हर्ड ऑफ करीज अ‍ॅन्ड ऑल.
४) चित्रपटात बॉम्बे इज व्हेरी हॉट अ‍ॅन्ड कंजस्टेड दाखवण्यात आली आहे. नॉट ओन्ली दॅट डु यु नो मेनी पिपल इन बॉम्बे इट ओन्ली अ बनाना अ‍ॅज लंच. यामुळे भारताची योग्य ती प्रतीमा पुढे येते. यु नो द पूर अ‍ॅड हगरी पिपल ऑफ इंडिया.
५) चित्रपटात बॉम्बेविषयी कमीत कमी डिटेल दाखवण्यात आलेल्या आहेत. इथे बोलल्या जाणय्रा भाषा, ऐकु येणाय्रा आवाजांचा पोत, विविध समाजांची सरमिसळ, लोकांची जगण्याची धडपड वगैरे. असले काही दाखवले तर ती उगा आर्ट फिल्म होते आणि फिल गुड निघुन जातो. दुसरे महायुद्ध, हॉलोकॉस्ट, गे ब्लॅक राइट्स, ग्रेट अमेरीका इ. सोडता आर्ट फिल्म्सला मज्जाव आहे.
६) चित्रपटाच्या कथेत अत्यंत वरवरचे संदर्भ आहेत उदा. फॅन चालु बंद होणे, शेविंग करणे, लंचबॉक्स. त्यामुळे फॉरेनच्या लोकांना जास्त डोक्याला ताण न देता बघता येतो. शिप ऑफ थिअसीस किंवा देउळ सारखे भारतय संस्क्रुतीचे डोक्याला ताप संदर्भ नाहीत.
७) यु नो दोज डब्बावालज इन बॉम्बे आर क्वाईट फेमस. प्रिन्स चार्ल्स मेट देम.
८) अ‍ॅड दोज ड्ब्बावालज सिन्ग सम स्पिरिच्युअल साँग इन ट्रेन्स कॉल्ड 'माउली माउली' समथिग. आय डोंट नो वाट इट मिन्स बट इट साउंड सो कुल अ‍ॅड स्पिरिच्युअल. डिड आय टोल्ड यु इंडीया इज अ स्पिरिच्युअल कंट्री??
९) द मुव्ही अस्लो टॉक्स अबाउट ट्रॅव्हलींग टू अदर स्पिरिच्युअल प्लेसेस लाइक भुतान ऑर समथिन्ग. रेमेंबर व्हेन इन डाउट अल्वेज ट्रॅव्हल टू सम एग्झोटीक स्पिरिच्युअल प्लेस.
१०) इट्स अबाउट वुमन एमपॉवरमेंट. द इडिपेंडंट वुमन ऑफ इंडीया टेकिंग कंट्रोल ऑफ देअर लाइफस.
११) मुख्य पात्र इंग्लीश बोलतं. ते अ‍ॅन्ग्लो इंडीयन (?) आहे. त्यामुळे ऑस्कर वाल्यांना एकदम चुकल्यासारखे नाही होत.
१२) चित्रपटात इरफान खान आहे. या द सेम फेल्ला फ्रॉम दॅट इंडियन मुव्ही.
१३) चित्रपटाच्या मर्केटींग मधे दम होता. दोन तीन फॉरेनची नावं, अनुराग कश्यप + करन जोहर. अजुन काय पाहिजे?
...
...

पण तसेच ऑस्करच्या विरोधात जाणाय्रा काही गोष्टीपण आहेत
१) चित्रपटात एकही हत्ती नाही. (चित्रातला, खरा, खोटा)
२) चित्रपटात एकही साप नाही.

नंतर विचार करताना जाणवले की स्लमडॉग मिलेनीयर आला होता तेन्व्हा त्याला लै शिव्या घातल्या होत्या पण आत्ता लक्षात येतय कि त्यातल मुंबईच डिटेलींग बरच बर होत.
तुर्तास एव्हडेच बाकि चालु द्या.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा चित्रपट ऑस्करला गेला नाही म्हणुन निर्माता-दिग्दर्शकांनी जाहीर नाराजी आणि बरेचसे आरोप केले होते. त्यावर फिल्म फेडरेशन ऑफ इन्डियाने दिलेले हे उत्तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.

'लंचबॉक्स' पाहिला नसल्याने तो ऑस्करला जायला पाहीजे होता किंवा कसे याविषयी काही मत नाही. पण या फिल्म फेडरेशनने अनेकदा टूकार (क्वचितच चांगल्या) चित्रपटांना ऑस्करला पाठवले आहे. या यादीतून काही उदाहरणे: इंडियन, जिन्स, हे राम, लगान, देवदास, रंग दे बसंती...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद भयंकर आवडल्या गेल्या आहे. सिनेमा पाहिलेला नसल्यामुळे सिनेमाला वावा म्हणणाऱ्या ताईसाहेबांचंही बरोबर आणि सिनेमाची चेष्टा करणाऱ्या नानासाहेबांचंही बरोबर म्हणून दोन्ही डगरींवर पाय ठेवता येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

प्रतिसाद ध्म्माल, ज्याम आवडला.
तरीसुद्धा म्हणेन
(सिद्धार्थ) राजहंसाचे चालणे झाले जगीया शहाणे म्हणौनी काय .... Wink

मजा आली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठ्ठो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखिकेच्या लहानपणीच्या गोष्टींचा उल्लेख खूप आवडला. त्या निमित्ताने आई कधी कधी कापडात भाकर्‍या बांधून देई ते आठवले.

बाकी चित्रपट बघायचे आणि सोडून द्यायचे. इतका काथ्याकूट आवडतो त्यांनी करावा. माझ्यासारख्याने हा काथ्याकूट वाचण्याचा आनंद लूटावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वा! Lunchbox नुकताच पाहिला, नुकताच म्हणजे बरोबर ५ दिवसांपूर्वी. आणि म्हणूनच चित्रपटाची फ्रेम न फ्रेम ताजी आहे, त्या पार्श्वभूमीवर इतका सुरेख लेख वाचून फारच झकास वाटले :). चित्रपट आवडला, भावला. याच्या कथे पटकथे बद्दल विवाद होऊ शकतील परंतु यातल्या ध्वनी चा वापर हा अफलातून आहे. कथा धावपळ करणाऱ्या मुंबईतील असूनही एका (संथशा) लयीत सरकते आणि ही लय आणि कथेतले काही बिंदू अधोरेखित करणारे ध्वनी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

अवांतर : लेख आणि लेखाच्या निमित्ताने ब्लॉग देखील थोडा चाळला, रोचक वाटला हे नमूद करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed