'अॅटलास श्रग्ग्ड'चा मराठी अनुवाद
सध्या गेले काही दिवस मुग्धा कर्णिक यांनी अनुवादित केलेलं आयन रँड या लेखिकेचं 'अॅटलास श्रग्ग्ड' हे पुस्तक वाचते आहे. मोठ्या आकाराच्या ११७९ पानांचं हे पुस्तक. हे राक्षसी आवाक्याचं काम ही बाई तीन वर्षं करत होती, त्याबद्दल तिच्या चिकाटीला प्रथम दंडवत. कथांमध्ये पाणी घालून फुळकवणी बारक्या कादंबर्यांची सवय झालेल्या अनेक प्रकाशकांनी हा अनुवाद नाकारला, पण अखेरीस तो छापला डायमंड प्रकाशनाने... त्याबद्दल डायमंडच्या निलेश पाष्टे यांचे आभार. यानंतर या बाईनं याच लेखिकेचं 'फाउंटनहेड'ही मराठीत आणलंय आणि तेही डायमंडनेच प्रकाशित केलंय. जिगर लागते राव अशा पुस्तकांचं काम करायला...
हे मी आजवर वाचलेल्या अनुवादांमधलं दुसरं उत्कृष्ट पुस्तक. पहिलं राम पटवर्धन यांचं पाडस. मुग्धाचा हा अनुवाद उत्कृष्ट का? किंवा ती मला एक अस्सल अनुवादक का वाटतेय याची काही ठोस कारणं आहेत. ( श्रेष्ठ म्हणण्याची घाई मी एका पुस्तकात करणार नाही, पण अस्सलपणा जाणवतोच. )
अस्सलपणाचं एक लक्षण म्हणजे एखाद्या संदर्भात तो संदर्भच आपल्याकडे नसल्याने नवे शब्द घडवावे लागतात आणि ते आपल्या संस्कृतीत घोळवलेलेही नको, पण आपले वाटतील असे हवे असतात. असे नवे शब्द व क्रियापदं मला पुस्तकात सापडताहेत.
मुग्धाचा शब्दसंग्रह अमाप आहे आणि शब्दस्मृती विलक्षण आहे, त्यामुळे कालबाह्य झालेले शब्द, फारसे वापरात न राहिलेले उत्कृष्ट वेचक शब्द, साहित्यात - विशेषतः कवितेत येऊन जाणारे काही विशेष देखणे शब्द ती अत्यंत सहज वापरते. एखादाच ठळक दागिणा घातला की तो लक्ष वेधून घेतो तसं या शब्दाने होतं. साधेपणाही दिसतो आणि आकर्षकही वाटतं, अशी गंमत त्यामुळे भाषेत येते.
कुठेही अडखळायला न होता सहज प्रवाही अनुवाद झाला आहे हे तिसरं वैशिष्ट्य. मोठं काम बैठक मारून नेटानं पूर्ण करणं हे चौथं.
अगदी प्रत्येक शीर्षकही काळजीपूर्वक वाचावं इतकं सुरेख आहे. शब्दाला शब्द न ठेवता इतका नजाकतीनं अनुवाद केलाय की आपोआप दाद निघून जाते तोंडातून... नकळत मान डोलावली जाते आणि शब्दसुख चेहर्यावर उमटतं.
हे पुस्तक वाचताना वाटत होतं की इतकं नितळ, स्वच्छ लिहिता आलं पाहिजे आणि तशा अनुकूलता मुलींना मिळायला आपल्याकडे अजून किती काळ जाणार आहे माहीत नाही. बिचकत लिहिणं किंवा धुसर लिहिणं असंच होतं बायकांकडून. किंवा मग गद्यातही काव्यात्म भाषा वापरायची सोयीस्कर म्हणून. ( ती कधी शैलीच असू शकते, पण ते निराळं. ) बैठकीची कामं तर कमीच दिसतात.
पंचेचाळिशीनंतर, एकटी व स्वतंत्र राहताना मी काही गोष्टी जेमतेम लिहू शकतेय आणि त्यावरही ढीगभर आक्षेप, शिव्याशाप ऐकावे लागतात. आता मी या सगळ्या प्रतिक्रियांना फाट्यावर मारायला शिकलेय, पण सुरुवातीच्या काळात प्रतिक्रियांच्या भयाने किती उर्जा वाया गेली असेल.
मुळात आपले स्वतःचे विचार काय आहेत, मतं काय आहेत, आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि ते कसं म्हणायचं हे समजून घेण्यातच वेळ जातो आणि एकेक समजू लागलं की त्यानं आपण आधी स्वतःच दचकू लागतो, हा माझातरी अनुभव. या अनुभवातून काहीजणी एकदम बंडखोर किंवा कडवट होऊन काहीतरी टोकाचं लिहू लागतात... आणि जगत मात्र वेगळ्या असतात. ही कादंबरी वाचताना सुरुवातीला 'भाषिक शैलीदारपणाचा अभाव' जाणवत होता, पण दुसर्या बाजूने तसा अभाव असणंच सुसंगत वाटत होतं घटनांशी व त्यातल्या विचारांशी. पण पुढे सरकत गेले तेव्हा त्यातल्या अनेक गमती ध्यानात येऊ लागल्या की लेखक म्हणून या क्लृप्त्या किती मस्त वापरल्या आहेत. उदा. काहीवेळा संवाद दोन माणसं करत असली तरी दुसरा दुय्यम असतो तेव्हा त्याचे संवाद घेतलेच नाहीत. एकटाच बोलतोय असं वाटतं, पण त्या बोलण्यातूनच दुसर्याचा तुटक संवाद समजतो व ही 'स्वगतं' कंटाळवाणी होत नाहीत. त्यात नाट्य निर्माण होतं.
हे पसरलेलं असलं तरी पसरट वाटत नाही हे वैशिष्ट्यच. पाल्हाळ नाहीच कुठे. तिचीच प्रतिमा वापरायची तर अवाढव्य यंत्रांनी भरलेला कारखाना आहे तो...! सगळं अचूक व जागच्या जागी. गती असलेलं.
वाचताना मी अधूनमधून मुग्धाशी फोनवर बोलत राहिले, कधी मेसेजेसमधून, तर कधी इमेलने. पुस्तक एका टप्प्यावर आलं तेव्हा लेखिकेविषयीही कुतूहल वाटू लागलं, तेव्हा विचारलं तर मुग्धानं एक फार चांगला मुद्दा लिहिला. तो असा -
"... पुढे ती खूपच अधिकारशाही व्यक्तिमत्वाची झाली, कल्टफिगर होण्याचा प्रयत्न केला वगैरे म्हणतात. त्यात प्रवाद जास्त आहेत. मला तिचं चरित्र वगैरे वाचायची इच्छा होत नाही. कारण तिने काय मांडलं हे महत्त्वाचं. ती कशी वागली, तिने काय लफडी केली, ती कुणाशी वाईट वागली वगैरे जाणून घेणं अनावश्यक वाटतं मला. पण तिने स्वतःचं तत्वज्ञान नेहमीच सुसंगतपणे मांडलं. आणि ललित पध्दतीने मांडलं हेच मला पुरेसं वाटतं. पण आपण भक्त असल्याचा आरोपही मला नकोसा वाटेल. वागली असेलही ती वाईट. असेलही ती अधिकारशाही व्यक्तित्वाची. असं म्हणून मी सोडून देतो. आयन रँड या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध...
लोक तसे स्त्रीबद्दल काहीही बोलतात. इतकी यशस्वी, जिचं तत्वज्ञान अर्ध्या अमेरिकेने डोक्यावर घेतलं, इतक्या भाषांत तिच्या पुस्तकांचे अनुवाद झाले... तिच्याबद्दल काहीबाही बोलतीलच की. म्हणून मी लक्ष देत नाही. त्यांच्या म्हणण्यात काही अंश सत्याचा असेलही म्हणून मी सोडून देते."
समीक्षेचा विषय निवडा
अनुवाद वाचायला अजुनी राहिलाच
अनुवाद वाचायचा अजुनी राहिलाच आहे. आता प्राधान्यानं वाचीन. अनुवादाचा आणि अनुवादकर्तीचा परिचय आवडला.
हे म्हटलं तर जरा अवांतरः(बिचकतच लिहितेय. यावरून वाद संभवतात.)
धार्मिक भावना - अस्मिता - संस्कृतिरक्षकांच्या भावना - आर्थिक हितसंबंध का-य-म-च ज्वालाग्राही असत आले आहेत - असतात. त्यांची पर्वा न करता, आपल्याला जे लिहायचं आहे ते जबाबदारीनं पण ठामपणे म्हणत राहण्यासाठी धैर्य लागतं. मग ते बाईला असो, वा बुवाला असो. एका विशिष्ट मर्यादेनंतर आपण बाई आहोत की बुवा आहोत, यानं खरंच फरक पडतो का? पडावा का?
फरक
एका विशिष्ट मर्यादेनंतर आपण बाई आहोत की बुवा आहोत, यानं खरंच फरक पडतो का? पडावा का? > यातले 'एका विशिष्ट मर्यादेनंतर' हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. माझ्यापुरतं म्हटलं तर मी हळूहळू धैर्य वाढवत नेलं, नेते आहे. त्यामुळे 'विशिष्ट मर्यादा' कोणती व कशी हे प्रत्येकासाठी वेगळं असेल. भाऊ पाध्येंनी लिहिलं तेव्हा त्यांच्यावर टिका झाली, राडाची तर अख्खी आवृत्ती जाळली, भाऊंनी ती आठवून आठवून लिहून काढली पुन्हा. तो शिवसेनेचा काळ होता आणि भाऊंनी सेनेशी पंगा घेतला होता. आता हेच एका लेखिकेला लिहिण्यासाठी अजून किती वर्षं जावी लागली? ( काही संदर्भात मेघना पेठेच्या कथांची तुलना भाऊंशी झाली होती. 'भाऊ पाध्येंना मुलगी झाली' असा एक लेख तिचे कथासंग्रह आले तेव्हा प्रकाशित झाला होता, म्हणून मेघनाचं उदाहरण.)
मी सध्या 'भारतीय लेखिका' नावाची ४० पुस्तकांची मालिका संपादित करतेय. त्यातली चौदा आलीत, नऊ प्रेसमध्ये गेलीत आणि सहांचं काम चाललंय. पुढची निवड करते आहे. लेखिकांच्या चर्चासत्रांमध्ये, शिबिरांमध्ये अशा अडथळ्यांविषयी, अडचणींविषयी आजही अटीतटीने बोललं जातं. एका कॉन्फरन्समध्ये 'कुटुंबातून परवानगी मिळाली' म्हणून येऊ शकलेल्या लेखिका अधिक, काहीजणी चोरून आलेल्या... सलमा या तमीळ लेखिकेला तर ऑपरेशन करायचंय असं खोटं बोलून 'उचलून' आणलं होतं... लिहिते म्हणून बामाचा हात तोडला गेला, वोल्गाला इतकी वर्षं चळवळीत व राजकारनात काम करूनही राजकीय लेखन करण्याची हिंमत एकवटता आलेली नाही ( ती नक्षलवादी गटांशीही संबंधित होती ), अनेकींचे लेखन करतेय या कारणास्तव घटस्फोट झाले, मीही माझी पहिलीवहिली अर्धी लिहिलेली कादंबरी नवर्यासमोर एक टोपलं ठेवून सारे कागद फाडून टाकत जाळली होती. ब्लँककॉल्स, अश्लील पत्रं अशा गोष्टींना हिमतीनं कसं सामोरं जायचं हे मेघनाने एकदा मला समजावून सांगितलं होतं. ज्या सहजतेने आजही एखाद्या बाईचं चारित्र्यहनन होतं आणि घरी व कामाच्या जागी तिचं जगणं मुश्किल करून ठेवलं जातं, ते पुरुषांबाबत होत नाही.
आणि हे केव्हा, तर आम्ही अजून आमची राजकीय व धार्मिक मतं मांडायला सुरुवात केलेलीच नसताना... ते धाडसही आम्ही हळूहळू एकवटू, नाही असं नाही. जसं दिल्लीतल्या हिंदी / उर्दू / इंग्लिशमध्ये लिहिणार्या लेखिका आता राजकीय कादंबर्या लिहू लागल्या आहेत व धार्मिक दंगलींसारखे विषय हाताळू लागल्या आहेत. पण तरी नूर जहीर सारख्या लेखिकेचं पुस्तक उर्दूत कुणी प्रकाशित करायला तर सोडाच पण छापून द्यायलाही तयार होत नाही आणि अखेर तिला ते इंग्लीशमध्ये प्रकाशित करावं लागतं. जमिला निशातच्या कवितासंग्रहाला स्त्रीप्रश्नांवर काम करणार्या संस्थेच्या मदतीने पहिल्यांदाच पुस्तक छापता येतं.
अशा परिस्थितीनंतर बायकांचा वेगळा विभाग करू नये, असं म्हणणार्या माझंही हे मत मी मागे घेते आणि 'भारतीय लेखिका' सारखी मालिका स्वतःचं लेखन बाजूला ठेवून करते. 'काय असावं' याबाबतचे आपले आदर्श निराळे आहेत, पण परिस्थितीच्या प्रतिकूलता इतक्या तर्हांच्या आहेत की वेग खुंटतो आणि उर्जा संघर्षात वाया जाते.
सविस्तर प्रतिसादाकरता
सविस्तर प्रतिसादाकरता धन्यवाद.
माझ्यासारख्या शहरी, सवर्ण, शिक्षित कुटुंबांतून येणार्या मुलींना सहसा स्वातंत्र्यासाठी झगडावं लागत नाही. निदान तुम्ही म्हटलं आहे त्या पातळीवर तर नाहीच नाही. त्यामुळे या प्रकारच्या भीषणतेची कल्पना येत नाही. म्हणून जरा बथ्थड वाटेलसा प्रश्न विचारला गेला खरा.
पुस्तक परिचय छानच. त्याशिवाय
पुस्तक परिचय छानच. त्याशिवाय काही वेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे तेही आवडलं.
मला अॅटलस श्रग्ग्ड चं भाषांतर आत्ता मराठीत येतंय हे वाचून वाटलं की हे पुस्तक लिहून इतकी दशकं झाली, मर्यादित वर्तुळांत ते कल्ट पुस्तक त्यावेळीही होतंच. मग ते आत्ताच का भाषांतरित व्हावं? त्याचं कारण मला पुढीलप्रमाणे वाटतं.
व्यक्तिकेंद्रित उजवी विचारसरणी आणि समाजाच्या भल्यातून व्यक्तीचं भलं मानणारी डावी विचारसरणी यांचा कायमच संघर्ष राहिलेला आहे. गेल्या तीन दशकांत भारतात या समीकरणांत बदल झाले. एक म्हणजे श्रीमंत असणारांची संख्या वाढली - साहजिकच उजव्या विचारसरणीचा पगडा वाढला. दुसरं म्हणजे कॅपिटालिझम आणि कम्युनिझम यांच्या झगड्यात कॅपिटालिझम जिंकला असं मानणारांची संख्या वाढली. असं म्हणतात की तुम्ही विशीत असताना तुम्ही डावे नसाल तर याचा अर्थ तुम्हाला हृदय नाही, आणि पस्तिशीत जर तो सोडून कॅपिटालिझमच्या मागे गेला नाहीत तर तुम्हाला मेंदू नाही. प्रस्थापित, श्रीमंत आणि चळवळ वगैरेंऐवजी स्वार्थ पाहून पैसा गोळा करणारे - ज्यांना रॅंडच्या तत्त्वज्ञानाची भुरळ पडेल असे लोक - वाढले आहेत. आणि गरीब, हालअपेष्टा सहन करणारे, भविष्यकाळ अंधारात आहे असा विश्वास बाळगणारे कमी तरी झाले आहेत, किंवा त्या प्रमाणात वाढलेले नाहीत. तेव्हा आता या पुस्तकाला मागणी वाढणं सहज शक्य आहे.
अनुवादकर्तीने मांडलेला - लेखिकेचं लेखन आणि तिचं व्यक्तिगत जीवन वेगळं ठेवण्याचा मुद्दा पटला. या दोन गोष्टी दुर्दैवाने अनेकांना वेगळ्या काढता येत नाहीत. मग किशोरी आमोणकर त्यांच्या साथ देणारांशी तुसडेपणाने वागतात किंवा सचिन तेंडुलकर साईबाबांची भक्ती करून लोकांपुढे चूक/बरोबर आदर्श ठेवतो वगैरे तद्दन निरुपयोगी आणि असंबद्ध मुद्दे चघळले जातात. अशा चर्चा होणं हे मला मूळ कलाकाराने मांडलेल्या कलेला पुरेशी दाद देता न येण्याचं लक्षण मी मानतो.
पण पुस्तक वाचून कळणार ना
पण पुस्तक वाचून कळणार ना आपल्याला त्यातलं तत्त्वज्ञान पटतंय की नाही ते. अमुक पुस्तक (विशेषतः ललित लेखन / कादंबरी) माझ्या तत्त्वज्ञानाशी मिळतंजुळतं आहे म्हणून मी ते विकत घेणार असं होत असेल का?
माझ्यामते ललित लेखन खपायच्या कारणांमध्ये प्रमुख कारण "रंजकता असणे" हे असतं. अॅटलासचा मराठी अनुवाद (तोही ११०० पानांचा जाडजूड) काढण्यामागे मराठी पुस्तक विकत घेणार्याचं डिस्पोजेबल इन्कम वाढतंय हे कारण असावं. अॅटलास रंजक आहे आणि ११०० पानांचा ठोकळा घेण्याइतकी आर्थिक बळकटी वाचकामध्ये आली आहे म्हणून अनुवाद होतो आहे.
आकार
पुस्तकाचा आकार हेही एक कारण आहे.
फाउंटनहेड पूर्वी कुणीतरी केलं होतं, पण तो अनुवाद भीषण होता, असं ऐकिवात आहे.
इतकं मोठं काम करण्यासाठीची बैठक म्हणूनच मला कौतुकाची वाटली आणि तेही कुणा प्रकाशकाकडून ऑफर आलेली नसताना आपण काम करून मग प्रकाशक शोधण्याची उचापत करणं हेही आजच्या काळात नवलाचंच.
चरित्रात्मक समीक्षा
चरित्रात्मक समीक्षा हा प्रकार मला म्हणूनच हास्यास्पद वाटत आलेला आहे.
अशी कुठली चरित्रं ठाऊक असतात या समीक्षकांना? प्रवादच ठाऊक असतात बरेचसे आणि त्यावरून अंदाज बांधून लिहायचं काहीतरी.
मुळात निर्मितीप्रक्रियेचं भान नसणं हा चरित्रात्मक समीक्षेतला मोठा दोष आहे असं मला वाटतं.
व्यक्तिकेंद्रित उजवी
व्यक्तिकेंद्रित उजवी विचारसरणी
पांढर्या रंगाला - हाच काळा रंग आहे - असे म्हणण्यातला प्रकार आहे हो मालिक.
---
असं म्हणतात की तुम्ही विशीत असताना तुम्ही डावे नसाल तर याचा अर्थ तुम्हाला हृदय नाही, आणि पस्तिशीत जर तो सोडून कॅपिटालिझमच्या मागे गेला नाहीत तर तुम्हाला मेंदू नाही.
चर्चिल म्हणाले होते.
---
प्रस्थापित, श्रीमंत आणि चळवळ वगैरेंऐवजी स्वार्थ पाहून पैसा गोळा करणारे - ज्यांना रॅंडच्या तत्त्वज्ञानाची भुरळ पडेल असे लोक - वाढले आहेत.
Rand's philosophy is the basics of the basics of the basics. पण तरीही अशा लोकांचे प्रमाण वाढलेले असेल तर ते स्वागतार्हच आहे.
---
आणि गरीब, हालअपेष्टा सहन करणारे, भविष्यकाळ अंधारात आहे असा विश्वास बाळगणारे कमी तरी झाले आहेत, किंवा त्या प्रमाणात वाढलेले नाहीत.
हे मात्र काही पटले नाही. कदाचित तुम्हास जे म्हणायचे असेल ते मला नेमके समजलेले नाही. पण आर्थिक असमानता वाढली आहे व त्याचे परिणाम महाभयंकर आहेत - असा आरडाओरडा करणारे लोक मात्र महा प्रचंड प्रमाणावर वाढलेले आहेत. त्यांचे पीक आलेय नुस्ते. (उदा. जोसेफ स्टिग्लिट्झ यांचे प्राईस ऑफ इनएक्वॅलिटी, पॉल क्रुग्मन, एलिझाबेथ वॉरेन, बराक ओबामा, नॅन्सी पेलोसी ......).
आता लगेच - गब्बर, फक्त अमेरिकेतली उदाहरणे देतो - असा आरोप ठरलेला.
भारताबद्दलच बोलायचे झाले तर मनमोहन सिंगांपासून सुषमा स्वराज पर्यंत सगळे - एकच धोषा लावून असतात - गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, बिछडलेले, पिछडलेले, तळागाळातले, राष्ट्रीय प्रवाहापासून दूर असलेले वगैरे वगैरे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ चा बकवास करणारे. या सगळ्यांची कमतरता कधीच नव्हती.
चर्चिल
असं म्हणतात की तुम्ही विशीत असताना तुम्ही डावे नसाल तर याचा अर्थ तुम्हाला हृदय नाही, आणि पस्तिशीत जर तो सोडून कॅपिटालिझमच्या मागे गेला नाहीत तर तुम्हाला मेंदू नाही.
चर्चिल म्हणाले होते.
वाक्य असं आहे.
If you're not a liberal at twenty you have no heart, if you're not a conservative at forty, you have no brain.
चर्चिल म्हणाले होते, असं म्हणतात. वास्तविक चर्चिल असं म्हणालेले नव्हते. खुद्द चर्चिल पंचवीशीच्या आसपास 'कन्सर्वेटीव्ह' पार्टीत होते, पुढे ते तिशीपासून ते पन्नाशीपर्यंत 'लिबरल' पार्टीत होते, त्यानंतर ते पुन्हा कन्सर्व्हेटीव्ह पार्टीत गेले आणि प्राईम मिनिस्टर झाले.
त्रोटक-रोचक
पुस्तक/अनुवाद/अनुवादक परिचय रोचक पण त्रोटक वाटला. रँडचे 'We the Living' हे पुस्तक अतिशय आवडल्याचे आठवते. त्याचा अनुवाद मराठीत आहे का? अॅटलास आणि फाउंटनच्या तुलनेत ते एकदमच बारके पण एकदम अस्सल आहे.
असे नवे शब्द व क्रियापदं मला पुस्तकात सापडताहेत.
याची काही उदाहरणे देता येतिल का?
परिचय अनुवाद वाचण्यास
परिचय अनुवाद वाचण्यास उद्युक्त करणारा.
मला अॅटलास श्रग्ग्ड वाचताना कायम ते लिखाण म्हणजे एक खूप तपशिलात लिहिलेलं स्क्रिप्ट वाटतं, प्रत्येक बारीक तपशील शब्दात पकडला आहे जणू सगळं लेखिकेच्या समोरचं घडतंय, पण त्यात स्क्रिप्टचा कोरडेपणा नाही, ते लिहित असताना मूळ संकल्पना जपत, पात्राची मांडणी जपत वाचकाला त्या महापसार्यातून बरोबर घेऊन जाण्याचा एक थोर प्रयत्न रँड्ने केला आहे. \अनुवादक ह्या भुमिकेला कशाप्रकारे न्याय देतो आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल पण मला मूळ कादंबरी फारशी आवडली नाही.
>>पुस्तकाचा परिचय हा मुळात
>>पुस्तकाचा परिचय हा मुळात विषयच नाही, अनुवाद हा विषय आहे.
धन्यवाद. समीक्षा कॅटेगरीत लेख होता म्हणून पुस्तकाचा परिचय हा विषय आहे असे वाटले.
अनुवादाविषयीसुद्धा केवळ 'अनुवादिका वेगळ्या जुन्या अडगळीत गेलेल्या शब्दांचा वापर करते' आणि 'अनुवाद प्रवाही झाला आहे' या खेरीज काही माहिती मिळत नाही.
छान
मस्त परिचय!