धेनुकाकटचे गौडबंगाल – भाग 5

(मागील भागांचे दुवे)
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

2000 वर्षांपूर्वी एका विशाल बौद्ध मठ जेथे कार्यरत होता त्या कार्ले गुंफांच्या मुख्य चैत्य गृहाच्या द्वारासमोरच्या प्रांगणामध्ये, या भागामधील एक अत्यंत प्रसिद्ध असे देवस्थान आहे. एकविरा देवी या नावाने ओळखल्या जाणार्‍या देवीचे हे देऊळ म्हणजे दगडी चिर्‍यांच्या उंच चौथरावजा जोत्यावर बांधलेली आणि छतावर एक छोटा घुमट असलेली चौरस आकाराची वास्तू आहे. ऐतिहासिक नोंदींप्रमाणे सध्या समोर दिसणारे देऊळ 1866 मध्ये बांधलेले आहे. मात्र स्थानिकांच्या सांगण्याप्रमाणे, सध्याची मंदिराची वास्तू उभी आहे त्याच जागी, ही वास्तू बांधण्याच्या किमान शंभर वर्षे तरी आधी बांधलेल्या जुन्या मंदिराची वास्तू येथेच अस्तित्वात होती. स्थानिक लोक असेही मानतात की एकविरा देवीचे हे पूजास्थान अतिशय पुरातन आहे व या देवीची पूजा इतिहास-पूर्व कालापासून या स्थानी केली जाते आहे.

‘बॉम्बे गॅझेटियर’ या प्रकाशनाच्या (Vol 16 (pp. 455)) मधील अंकात या देवळाबद्दल मोठी वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिलेली आहे. एकविरा देवळासंबंधी ‘बॉम्बे गॅझेटियर’ काय म्हणतो ते पुढे बघूया.

” ऐतिहासिक दृष्टीकोनातून बघितले असता, द्राविडी देवता अक्का अवेय्यर या देवतेचेच एक रूप असलेल्या एकविरा देवतेच्या या देवळाबद्दलची सर्वात लक्ष वेधणारी बाब अशी आहे की हे देवस्थान बहुधा येथेच स्थापन केल्या गेलेल्या बौद्ध मठापेक्षा प्राचीन आहे. या देवस्थानाची त्या काळात दूरवर पसरलेली प्रसिद्धी लक्षात घेऊनच बहुधा डोंगराच्या उतारावरची ही खडकाळ जागा बौद्ध मठाच्या स्थापनेसाठी निवडली गेलेली होती. या देवीबद्दल सध्या प्रचलित असलेल्या अनेक कथा, आख्यायिका आणि भाविकांची श्रद्धा यापुढे या मंदिराशेजारी असलेली गुंफा एकेकाळी बौद्ध धर्मियांचे एक मोठे चैत्य गृह होते या बाबीचाही विसर आता स्थानिकांना पूर्णपणे पडलेला आहे. तरीही एकविरा देवीची मूर्ती आणि शेजारील चैत्य गृहातील स्तूप यांचा काहीतरी परस्पर संबंध, भक्तगण अजूनही मनोभावे पाळत असलेल्या देवीच्या काही पूजा-परंपरांशी जोडलेला आढळून येतो. कोळी समाजातील लोक या एकविरा देवीच्या परंपरागत भक्तगणांत सर्वाधिक संख्येने आढळतात. या लोकांमध्ये चैत्य गृहातील स्तूपाला धर्मराजाचे सिंहासन या नावाने ओळखले जाते. हे भक्तगण देवीला नवस बोलताना आपण देवीच्या भोवती अमूक इतक्या प्रदक्षिणा घालू असा नवस साधारणपणे बोलतात. परंतु प्रत्यक्षात असे करणे, देवीची मूर्ती, डोंगराच्या कड्याचा एक भाग असलेल्या पाषाणामध्येच कोरलेली असल्याने, प्रत्यक्षात अशक्यप्राय आहे. यावर उपाय म्हणून एक अतिशय हुशारीचा मार्ग कोणीतरी शोधून काढलेला आहे. चैत्य गृहातील स्तूपाभोवती कमानी असलेला एक लाकडी सांगाडा उभारला जातो आणि याच्या मध्यभागी एक फिरता आकाश दिवा स्तूपावर ठेवला जातो. मग नवस बोललेले भाविक लोक या लाकडी सांगाड्यामधून स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालून आपला नवस फेडतात. पुत्रप्राप्तीसाठी जर हा नवस बोलला गेला असला तर नवजात अर्भकाला देवीच्या मूर्तीसमोर न ठेवता स्तूपासमोरच ठेवण्याचाही प्रघात आहे. कोणतेही कोळी कुटुंब जेंव्हा देवीच्या दर्शनाला येते तेंव्हा स्तूपासमोरही नैवैद्य ठेवण्याची जुनी प्रथा आहे.”

( टीप:- बॉम्बे गॅझेटियर मधील वरील मजकूर, ब्रिटिश कालातील व एकोणिसाव्या शतकामध्ये लिहिला गेलेला आहे. कार्ले गुंफा आता पुरातत्त्व विभागाच्या अख्यत्यारीत असून वर उल्लेख केलेल्या पूजा-परंपरांना पुरातत्त्व विभाग आता परवानगी देतो की नाही हे मला तरी समजू शकलेले नाही.)

” the chief interest from the history point of view, in this small temple, is that this temple of the deity, called as Ekvira and related to Dravidian deity, Akka Aveyyar, actually may have been be older than the Buddhist Monastery itself and this site on the hill slope was probably chosen as the site for the monastery because of the local fame of this deity. Though all local remembrance of Buddhism is now buried under Hindu religion myths and superstitions, some connection is still being maintained between the deity of ‘Ekvira’ here and the old Buddhist relic shrine (Stupa). The Stupa is known amongst the disciples of the deity, who are mainly fishermen as throne of the king ‘Dharma Raja.’ By tradition, the fishermen votaries make a promise to the Goddess that they would walk a certain number of times around ‘Ekvira’s Shrine’ if their wish is granted. But this is something impossible as the Deity’s image is cut on a hill side and no one can walk round it. A clever way has been found out in which a large arched wooden frame with a revolving paper lantern in the center is set in the main Chaitya hall of the ancient monastery and people walk around the Buddhist Stupa itself to fulfill their pledge. Should a child be born in response to such a vow, the cradle is presented to the Stupa rather than to the Goddess. Whenever a Koli (fisherman) family visits the deity, the Stupa is also worshiped with offerings,

कार्ले येथे भक्तगणांनी आपल्या पूजा-परंपरांमध्ये एक हिंदू देवता आणि बौद्ध स्तूप यांच्यामध्ये हा जोडलेला परस्पर संबंध मोठा विलक्षण वाटल्यामुळे 1950-52 च्या सुमारास त्याचा अधिक अभ्यास करत असलेले प्रसिद्ध विद्वान, दामोदर धर्मानंद कोसंबी यांना भक्तगण पालन करत असलेली एकविरा देवीसंबंधीची आणखी एक विलक्षण परंपरा आढळून आली. भारतातील बहुतेक हिंदू मंदिरांमध्ये वर्षातून एक दिवस,बहुधा त्या देवतेच्या उत्सवाच्या दिवशी, त्या देवतेची पालखीतून किंवा रथातून यात्रा काढण्याचा प्रघात पाळला जातो. यापैकी बहुतेक ठिकाणी देवतेला मंदिरातून थाटामाटात सजवून बाहेर काढले जाते आणि मोठ्या जल्लोशात थोड्या अंतरावर असलेल्या एका विविक्षित स्थानापर्यंत देवतेची मिरवणूक काढली जाते व तेथे परत एकदा पूजा-अर्चा करून देवतेची मूर्ती देवळात परत आणली जाते. काही ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचीही परंपरा असते. कोसंबी यांना असे आढळून आले की एकविरा देवतेच्या बाबतीत मात्र हीच परंपरा अतिशय निराळ्याच पद्धतीने दर वर्षी साजरी केली जाते आहे.

कार्ले गुंफा आणि भाजे गुंफा यांच्या मधील सपाट प्रदेशात जी काही प्रमुख गावे आहेत त्यात “देवघर’ असे नाव असलेले एक गाव आहे. या गावात दरवर्षी एकविरा देवीच्या उत्सवाच्या दिवशी, हजारोंच्या संख्येने कोळी समाजातील भक्तगण जमतात. याचे कारण म्हणजे कार्ले गुंफांजवळच्या एकविरा देवीच्या उत्सवाची पालखी देवीच्या देवळापासून सुरू न होता या देवघर गावामधून सुरू होते. या गावापासून निघालेली पालखी मधे दुसर्‍या कोणत्याही गावाला किंवा देवळाला भेट न देता कार्ले गुंफा येथील चैत्य गृहा शेजारी असलेल्या एकविरा देवीच्या देवळापर्यंत थेट नेली जाते. कोसंबी यांना अधिक चौकशी केल्यावर आणखीही एक विलक्षण गोष्ट लक्षात आली ती अशी की प्रत्यक्ष देवघर गावात मात्र एकविरा देवीची भक्ती करणारे कोणीच भक्तगण नाहीत. त्या गावात फक्त ‘काळभैरव’ या देवतेचे मंदिर असल्याचे कोसंबी यांना आढळून आले. त्याचप्रमाणे एकविरा देवीची पालखी देवघर मधून निघण्याचे कारणही कोणा स्थानिकांना माहीत नसल्याने ते देऊ शकले नाहीत.

कोसंबी यांनी 1950 च्या सुमारास केलेली ही निरीक्षणे आता बर्‍याच प्रमाणात कालबाह्य झालेली मला आढळली. गेल्या काही दशकांपासून एकविरा देवीच्या उत्सवाला फारच मोठे आणि भव्य असे स्वरूप प्राप्त झाले आहे. (त्याला बहुधा ठाकरे कुटुंबियांनी बराच हातभार लावलेला आहे.) अजूनही प्रत्येक वर्षाच्या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला पूर्वीप्रमाणेच हा उत्सव साजरा केला जातो. मात्र त्या आधीच्या दिवशी, दोन स्थानिक स्वरूपाच्या भिन्न पालख्या देवघर आणि कार्ले गुंफा येथे काढल्या जातात. देवघर येथील काळभैरवाला आता एकविरा देवीचा बंधू असे नाते प्राप्त झालेले आहे व त्यामुळे देवघर गावाला एकविरा देवीचे माहेर या नावाने संबोधले जाऊ लागले आहे. हे सगळे बदल गेल्या काही दशकात झालेले असले तरी अजूनही एकविरा देवीची मुख्य पालखी देवघर गावातूनच चैत्र पौर्णिमेला परंपरागत पद्धतीनेच निघते आणि या पालखीमध्ये देवतांऐवजी फक्त एक काठी ठेवलेली असल्याने या पालखीला आता ‘काठीची पालखी’ या नावाने ओळखले जाते आहे.

आपल्या 1950 च्या सुमारास केलेल्या आपल्या निरीक्षणांच्या आधाराने दामोदर कोसंबी लिहितात:

” देवीची पालखी नेण्याच्या निमित्ताने हजारो कोळी समाजाच्या भक्तगणांनी, देवघर या गावात चैत्र पौर्णिमेला एकत्र जमण्यामागे कोणतेही सबळ कारण आता जरी देता येत नसले तरी देवघर हे गाव आणि कार्ले गुंफांमधील चैत्य किंवा स्तूप यांच्यामध्ये कोणतेतरी प्राचीन परस्पर संबंध असले पाहिजेत या विधानाला यामुळे दुजोरा खचितच देता येतो आहे. परंतु असे जर मानले की देवघर गाव हेच एके काळचे धेनुकाकट गाव होते तर मात्र या वार्षिक एकत्र जमण्यामागची कारण परंपरा सहजपणे लक्षात येऊ शकते.”

“The gathering under Koli (Fishermen) sponsorship of several thousand pilgrims and worshipers at ‘Devghar’ for the initiation of the palanquin procession leaves no doubt about the ancient connection between the village of ‘Devghar’ and the Karle’n Chaitya for no reason apparent today, but comprehensible if the village was once called as Dhenukakata.”

दामोदर कोसंबी आपल्या या लेखात प्राचीन कालच्या धेनुकाकट पासून आजच्या देवघर या नावाची व्युत्पत्ती कशी झाली असेल? हे विशद करतात. त्यांच्या मताने प्राचीन शिलालेखात सुद्धा धेनुकाकट हे नाव निरनिराळ्या पद्धतींनी लिहिलेले आढळते. उदाहरणार्थ कार्ले येथील 19 क्रमांकाच्या शिलालेखात हेच नाव “धेनुकट” असे लिहिलेले आहे तर शेलारवाडी येथे हेच नाव “धेनुकड” असे लिहिलेले आहे. देवघर गावात 11व्या शतकाच्या सुमारास बांधलेले एक हेमाडपंती मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. कोसंबी यांच्या मताने हे मंदिर बांधले गेल्यानंतरच्या काळात या गावाचे नाव “धेनुकड” वरून देवघर असे झालेले असावे.

कोसंबी यांचा हा युक्तिवाद मला स्वत:ला तरी पटला आहे. जर प्राचीन धेनुकाकट हे सध्याच्या देवघर गावाच्या जागीच अस्तित्वात होते असे मानले तर या आधी मी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देणे सहज शक्य होते आहे. आधुनिक युगातील सुधारणा देवघर या गावापर्यंत पोचण्यापूर्वी हे गाव कसे दिसत होते किंवा तेथे काही प्राचीन अवशेष अस्तित्वात होते का? हे जर आपल्याला समजू शकले असते तर देवघर गाव हे धेनुकाकट होते या विचाराला पुष्टी देता येणे शक्य झाले असते किंवा आधार देणारी काहीतरी सबळ कारणे मिळू शकली असती. आपल्या सुदैवाने जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्ग्युसन या पुरातत्त्व विभागाच्या दोन संशोधकांनी, 1880 या वर्षी प्रसिद्ध केलेल्या The cave Temple of India या आपल्या पुस्तकात देवघर गावामधील प्राचीन वैशिष्ट्यांचे वर्णन निदान 4 ओळींमध्ये का होईना केलेले आढळून येते. हे लेखक आपल्या पुस्तकात म्हणतात:

” कार्ले गुंफा ज्या डोंगरांमध्ये खोदलेल्या आहेत त्या डोंगराळ भागात अनेक ठिकाणी भिख्खूंसाठी खोदलेले कक्ष आणि पाण्याच्या खोदलेल्या टाक्या सापडतात. याच धर्तीवर कार्ले गुंफाच्या नैऋत्येला, थोड्या अंतरावर असलेल्या देवगढ गावामधील एका टेकडीवर भिख्खूंसाठीचा विहार म्हणून खोदल्या जाणार्‍या एका गुंफेचे, भग्नावशेष आढळून येतात. या खोदकामात पुढची पडवी व त्या मागे स्तूपासाठी असलेल्या चैत्य गृहाच्या कक्षात प्रवेश करण्यासाठी एक द्वार, यांच्या खोदकामाला प्रारंभ झालेला स्पष्टपणे अजूनही दिसतो. या पडवीच्या छताला आधार देण्यासाठी पडवीच्या बाहेरील बाजूस अर्धवट चिरलेले दोन चौरस स्तंभ त्यांना आधार देण्यासाठी खोदल्या गेलेल्या ब्रॅकेट कॅपिटल्ससह, अर्धवट काम झालेल्या अवस्थेत आढळून येतात. गावाच्या पूर्वेला असलेली जमिनीची पातळी गावाच्या मानाने बर्‍याच उंचीवर आहे. या ठिकाणी एक पाषाणात खोदलेला तलाव आहे त्याच प्रमाणे येथे भिख्खूंसाठी एक छोटा कक्ष आणि एक पाण्याची टाकी पाषाणात खोदण्यासाठी सुरू झालेले अगदी प्राथमिक अवस्थेतील प्रयत्न सुद्धा आढळून येतात.”

“In the hills near to Karle’n there are a number of cells and rock cisterns. Thus in the hill above the village of ‘Devgadh,’ a little to south west of Karle’n, is a half finished ‘Vihara’ (monk’s dwellings) cave, with two roughly-hewn square columns in front having bracket capitals; and in the back of the cave a door has been commenced as if for a shrine. In the rising ground, east of the village, is a rock cut tank and some cuttings, as if intended for the commencement of a small cave with a cistern.”

1955 मध्ये लिहिलेल्या आपल्या शोध लेखात, कोसंबी या सर्व गोष्टींचा आधार घेऊन आपले आणखी एक अतिरिक्त निरिक्षण नोंदवतात. ते यापुढे म्हणतात की देवघर येथील टेकडीच्या पायथ्याशी त्यांना पाषाणयुगातील सूक्ष्म आकाराची हत्यारे ( an unusual concentration of microliths (small tools)) सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येथे विखुरलेली दिसली. ही हत्यारे लालसर रंगाच्या कार्नेलियन (a semi-precious gemstone known as Carnelian) या प्रकारच्या रत्न-पाषाणातून बनवली असल्याचे आढळून आले. या हत्यारांच्या शोधामुळे, देवघर गावात दर वर्षी पालखीच्या निमित्ताने होणार्‍या विधींची (rituals) आणि एकविरा देवीच्या उपासनेची सुरूवात कदाचित इतिहासपूर्व कालापासूनच (prehistoric) झाली असल्याचीही शक्यता नाकारतायेत नाही.

या सगळ्या निरिक्षणांनंतर देवघर गावाजवळ असलेल्या गुंफेचे भग्नावशेष हे धेनुकाकट गावाजवळ असलेली, कार्ले मठाची संपर्क साधण्याची, देणग्या स्वीकारण्याची आणि व्यापारी सौदे पक्के करण्याची कचेरी असावी असे म्हणणे कल्पना विश्वामधील खचितच वाटत नाही. देवघर गावात एक प्राचीन तलाव आहे. हा तलाव किती जुना आहे हे कोणालाच माहीत नाही. कदाचित या तलावातील गाळ पूर्णपणे उपसला तर काही अजूनही दडलेली आणि आपल्याला अज्ञात असलेली ऐतिहासिक सत्ये बाहेर येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

कालचक्र पुढे फिरल्यानंतर धेनुकाकट्चे नंतर काय झाले असावे याची बर्‍यापैकी कल्पना करणे मला आता शक्य वाटते. शक क्षत्रप नहापन याच्या सैन्याचा संपूर्ण पराभव इ. स. 100 च्या सुमारास सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने केला व दख्खनला परत एकदा स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र या पुढच्या दोन शतकात सातवाहनांची दख्खनमधील सत्ता हळूहळू क्षीण होत गेली व तिचे मुख्य केंद्र पैठणकडून पूर्वेकडे म्हणजे आंध्र प्रदेशाकडे सरकत गेले. पश्चिम दख्खनमधे दुसरी सत्ता केंद्रे उदयास आली. या सगळ्या काळात उत्तरेकडे असलेली कल्याण, साष्टी व सोपारा या सारखी बंदरे परत एकदा रोमन जहाजांना खुली झाली व या बंदरांकडे नेण्यात येणारा माल नाणेघाटातून नेणे परत एकदा सोईस्कर बनले. नाणेघाटाचा रस्ता खुला झाल्यानंतर दक्षिणेकडच्या पिंपरी घाटातून वर येणार्‍या जिकिरीच्या रस्त्याचा वापर साहजिकच कमी होऊ लागला आणि या मार्गावर वसलेली धेनुकाकटची बाजारपेठ साहजिकच हळूहळू दुर्लक्षिली गेली व त्याचबरोबर कार्ले मठाचे महत्त्वही मंदावत गेले. धेनुकाकट मधील व्यापारी मंडळी साहजिकपणे हे गाव सोडून दुसर्‍या गावांच्या दिशेने जाऊ लागली व एकेकाळी भरभराटीतील बाजारपेठ असलेल्या धेनुकाकट गावाने परत एकदा दख्खनमधील एका दुर्लक्षित खेड्याचे आपले रूप धारण केले.

मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करावे.

(समाप्त)

संदर्भ:

Bombay Gazetteer, Vol. 16, pp 455
Journal of the Royal Asiatic Society 1941
Cave -temples of western India, by JAS Burgess and Bhagwanlal Indraji Pandit
Journal of the Asiatic society of Bombay Vol 30, 1955
The cave Temple of India, by James Fergusson and James Burgess
Journal of the Asiatic society of Bombay Vol 56-59, 1981-84

8 मे 2014

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखमाला खूपच आवडली. काही भाग उपक्रमवरही वाचले होते.
सध्याचे देवघर म्हणजेच धेनुकाकट ह्या तर्काकडे (किंवा निष्कर्षाकडे) येण्यासाठी अधिक ठोस पुरावे मिळायला हवे होते असे वाटत रहाते.
अर्थात 'समंदे तलाश' ची दौड जबरदस्त आहे. असे तर्क सुचणे हे प्रज्ञावंताचेच लक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही लेखमाला नुकतीच लिहिलेली आहे. मी उपक्रमवर ती कधीच टाकलेली नव्हती.

सध्याचे देवघर म्हणजेच धेनुकाकट ह्या तर्काकडे (किंवा निष्कर्षाकडे) येण्यासाठी अधिक ठोस पुरावे मिळायला हवे होते असे वाटत रहाते.

आपला हा मुद्दा मला मान्य आहे. देवघर गावामध्ये असलेला तलाव उपसला तर काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे. परंतु मुख्य अडचण अशी आहे की एकविरा देवीच्या भक्तगणांची संख्या एवढ्या प्रचंड वेगाने वाढत आहे की जुन्या परंपरा थोड्याच कालात संपूर्णपणे पुसल्या जाणार आहेत. देवघर मधील कालभैरव देऊळ हे आता जागृत दैवत मानले जाऊ लागले आहे. त्यामुळे आणखी काही पुरावे सापडणे कठिणच आहे.

अवांतर
ऐसी अक्षरे चे काही उत्साही सभासद (मनोबा, बॅटमन, मिहिर, वल्ली) पुण्यात रहातात. या मंडळींनी मोटर सायकल वरून देवघरला एखादी चक्कर मारली व तिथले फोटो काढले तर तेथील सद्य परिस्थिती काय आहे हे कळू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हीच लेखमाला असे म्हणायचे नव्हते. 'आपले या विषयावरील काही लिखाण' अशी दुरुस्ती करून घ्यावी. उपक्रम वरील लिखाणात धेनुकाकट म्हणून डहाणू हे ठिकाण कितपत योग्य ठरेल याविषयी थोडाफार उहापोह झाल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवघरला एक चक्कर मारावीच लागणार आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेखमाला.
तार्किकदृष्ट्या धेनुकाकट म्हणजेच देवघर हे कितीही पटण्याजोगे असले तरी ते हेच असेल असे अजूनही मनाला वाटत नाही. कारण हे यवनसंघ नेहमी समुद्र किनार्‍याच्या आश्रयाने राहत. देवघरसारख्या समुद्रापासून बर्‍यापैकी ठिकाणी ते मोठी वस्ती करून राहतील हे तसे असंभवनीय वाटते. शिवाय कार्ले लेण्याच्या परिसरात अजूनही बर्‍याच ठिकाणी बौद्ध लेण्यांचे अवशेष आहेत. उदा. कांब्रे लेणी, विसापूर किल्ल्यावरील लेणी (तिथे एका टाक्यावर ब्राह्मीतला एक शिलालेख आहे).

पण तसे बघायला गेलं तरीही धेनुकाकट हेच देवघर ह्यात तत्थ्य असणण्यास पण पुरेसा वाव आहे. कारण इकडील लेण्यांत ग्रीक शिल्पकलेशी संबंधित असलेली बरीच शिल्पे आहेत. उदा. भाजे लेणीतील सेंटॉर, पॅगेसस तसेच ग्रीकांसारख्या दिसणार्‍या पुरुष प्रतिमा, बेडसे लेणीतील पर्सीपोलिटन धर्तीचे स्तंभ, खुद्द कार्ले चैत्यगृहात असलेली एका स्तंभावरील स्फिन्क्स प्रतिमा.

अवांतरः कार्ले चैत्याचा स्थपती भूतपाल याची वैजयंती नगरी कोणती असावी असा तुमचा कयास आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्रातील लेण्यांमध्ये असलेल्या ग्रीक पुराणांतील प्रतिमांबद्दल इंग्रजीमधे एक लेखमाला मी नुकतीच लिहिलेली आहे. या दुव्यावर ती बघता ये ईल. पुढेमागे मराठी भाषांतर करण्याचा माझा विचार आहे.

सर्व इतिहासकार वैजयंती म्हणजे कर्नाटकातील शिरसी गावाजवळ असलेले बनवासी हे गाव असे मानतात. तेथे असलेल्या मधुकेश्वर मंदिरात एका सातवाहन राजाने देणगी दिल्याचा शिलालेख सुद्धा आहे. मला तरी हे योग्य वाटते. (अर्थात दुसरा कोणता पुरावा उपलब्ध होईपर्यंत तरी!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम लेखमाला. उपलब्ध पुराव्यांचा साक्षेपाने मस्त आढावा घेतला आहे. देवघरला एकदा जावे लागेल असे दिसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखमाला आवडली, बरीच (जवळजवळ सगळीच) माहिती नवी आहे माझ्यासाठी
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!