ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१४ - लेखनासाठी आवाहन.
नमस्कार,
सालाबादप्रमाणे यंदाही ऐसीचा दिवाळी अंक काढण्याचं घाटतं आहे. त्यासाठी ऐसीच्या सर्वच सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.
ऐसी अक्षरेवर दर्जेदार लेखन यावं अशी आमची कायमच इच्छा राहिलेली आहे. ऐसीचा दिवाळी अंक म्हणजे तर ऐसीच्या लेखकांच्या कौशल्याचं छोटेखानी प्रदर्शनच. त्यामुळे ते विशेष दर्जेदार व्हावं, दिवाळी अंक म्हणजे ऐसीच्या वाचकांसाठी मेजवानी वाटावी यासाठी आत्तापर्यंत आम्ही प्रयत्न केलेले आहेत. गेल्या अंकात एकाहून एक सरस लिखाण आलं तसंच किंबहुना त्याहूनही सरस लिखाण यावं अशी आमची इच्छा आहे. पण उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे या दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मोबदला देण्याची इच्छा आहे. त्यायोगे ऐसीवरच्या चांगल्या लेखकांना उत्तेजना तर मिळेलच, पण इतर मान्यवर लेखकांकडूनही मानधन देऊन चांगलं लेखन मिळवता येईल.
यामुळे गेल्या अंकासाठी आलेल्यापेक्षा अधिक लेखन येईल अशी आशा आहे. त्यामुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जाबरोबरच त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेलं लेखन, एकंदरीत बजेट यानुसारही ठरेल. तसंच लिखाण कधी आमच्या हाती येतं हेही यावेळी महत्त्वाचं ठरेल. कोणी जर लिखाण पाठवलं तर ते आम्हाला नाकारायचं असल्यास त्यांना इतरत्र (जिथे मानधन मिळू शकेल अशा ठिकाणी) पाठवण्याइतका वेळ शिल्लक हवा. याचा अर्थ आमच्या हातात ते लेखन लवकर यायला हवं. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१४ ठेवलेली आहे (जी आता १५ सप्टेंबरपर्यंत ढकलली आहे). या तारखेच्या जितकं आधी तुमचं लिखाण आमच्या हाती येईल तितकाच आम्हाला त्यावर संस्करण करायला व स्वीकारायला वेळ मिळेल. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही विनंती.
दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा एक विचार आहे. इथे उल्लेख केलेल्या संकल्पनेवरच तुम्ही लिहायला हवं असं बंधन नाही. अंकाचा काही भाग ज्या संकल्पनेवर आधारित असेल ती ह्या धाग्यात खाली दिलेली आहे. मात्र हा अंक केवळ त्याच विषयाला वाहिलेला असणार नाही. अंकाचा सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग ह्या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. बाकीचा अंक विविध साहित्यानं नटलेला असेल. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं समजू नये. ललित/वैचारिक लेख, कथा, कविता, व्यक्तिचित्रं, फोटो, चुटके, व्यंगचित्रं, चित्रं आणि अन्य संकीर्ण प्रकार ह्या साऱ्यांचं स्वागत आहे. 'ऐसी अक्षरे'वर वेळोवेळी सादर केली गेलेली चित्रं आणि छायाचित्रं (फोटोग्राफ्स) वगैरेंद्वारे विविध प्रकारच्या दृक-श्राव्य कलांना आणि त्यांच्या समीक्षेलाही व्यासपीठ मिळावं असा आमचा प्रयत्न असल्याचं तुम्हाला जाणवलं असेल. ह्या प्रकारचं काही साहित्य असेल तर तेसुद्धा पाठवा.
आणखी एक नोंदवण्यासारखी गोष्ट - आम्हाला हा अंक म्हणजे कागदी दिवाळी अंकांची डिजिटल आवृत्ती अशा मर्यादित स्वरूपात सादर करायचा नाही. इंटरनेटच्या माध्यमात लिखित शब्दापलीकडे कितीतरी अधिक सामावता येतं. ह्या बलस्थानाचा शक्य तितका वापर करण्याचा मानस आहे. तेव्हा काव्यवाचन, कथांचं अभिवाचन, चलतचित्र, अॅनिमेशन, संगीत अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत व्हाव्यात असं वाटतं. त्या दृष्टीनं तुम्हाला विनंती आहे की तुमचं योगदान देताना निव्वळ लिखित शब्दांचाच विचार करण्याची गरज नाही. ह्या अनुषंगानं तुमच्या आणखी काही अभिनव कल्पना असतील तर त्यांचंही स्वागत आहे.
ललित किंवा अन्य प्रकारच्या लेखनातही काही फोटो, चित्रं, स्केचेस टाकण्याची इच्छा आहे, पण आपण चित्रकार/फोटोग्राफर नाही अशी अडचण असेल तर कृपया संपर्क साधावा. लिखाण पूर्ण झालेलं नसलं तरीही थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर काय प्रकारची स्केचेस/चित्रं टाकता येतील ह्याचा अंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. ज्यांना लेख व कथांसाठी चित्रं काढून देण्याची इच्छा असेल अशांना विशेष आवाहन आहे.
कालमर्यादा - ३१ ऑगस्ट१५ सप्टेंबर २०१४
लिखाण ऐसी अक्षरे ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.
अंकाचा विषय - चळवळींचा जीवनक्रम - उदय, विस्तार, दिशा, अस्त, भविष्य
१९४७ सालानंतर स्वातंत्र्य मिळालं. ती चळवळ संपली. पण त्यामुळे प्रश्न संपले नाहीत. देशापुढे अनेक प्रश्न होते. त्यातले काही राज्यकर्त्यांनी हाताळायला सुरूवात केली तरी सगळेच काही वर्षांत सुटणं शक्यच नव्हतं. अजूनही अनेक सुटलेले नाहीत. दारिद्र्य, अज्ञान आणि रुढींनी वेढलेल्या समाजाला स्वातंत्र्यानंतरही आपले प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करावी लागत होती. या धडपडींतून अनेक चळवळींचा जन्म झाला. सुस्त समाजजीवन ढवळून काढून टाकायला सुरूवात झाली. प्रत्येक चळवळीला हा ढवळलेला समाज आपल्या प्रवाहात ओढून नेऊन आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोचवायचा होता. गेल्या सदुसष्ठ वर्षांचा इतिहास ही अशा अनेक एकमेकांना समांतर, कधी एकमेकांभोवती गुंतलेल्या प्रवाहांची कथा आहे.
त्या काळापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास या प्रवाहांबरोबर कसा झाला? कुठच्या चळवळी टिकल्या? कुठचे प्रवाह विरून गेले? कुठच्या चळवळी आता नावापुरत्याच उरल्या आहेत? या प्रवासात कुठच्या प्रवाहांनी एकमेकांना साथ दिली? या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देणारं लेखन यावं अशी इच्छा आहे. हे इतिहासाबद्दलचं लिखाण असलं तरी ते विशिष्ट व्यक्ती अगर पुढाऱ्यांबाबतचं नसावं. महत्त्वाच्या व्यक्तींची नावं आणि त्यांच्या कृतींचे उल्लेख टाळता येत नाहीत, पण ते नायक नसावेत. कथा चळवळीची असावी. यातून चळवळी कधी आणि कशा फोफावतात, कुठल्या प्रकारे वाढतात, त्यांच्या जीवनक्रमात कुठच्या प्रकारचे निर्णय घेतात, आणि ते कसे बरोबर किंवा चूक ठरतात याबाबत एक चित्र निर्माण व्हावं. उदाहरणार्थ - दलित चळवळ आणि स्त्रीवादी चळवळ यांनी एकमेकांची साथ का दिली नाही? किंवा कामगार चळवळीकडून एकेकाळी क्रांतीच्या अपेक्षा केल्या जात, पण आता तिचा जीव खूपच लहान दिसतो. असं का? यासारख्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न व्हावा.
अंकाच्या विषयावर अथवा इतर कुठच्याही विषयावर लिखाण केलं तरी ते शक्य तितक्या लवकर पाठवावं ही विनंती.
धन्यवाद,
संपादन मंडळ, 'ऐसी अक्षरे'.
t → t +Δt
मला अशी सूचना करावीशी वाटते की हा अंक दिवाळीच्या वेळी न काढता थोडा उशीरा म्हणजे नववर्षाच्या वेळी काढावा. म्हणजे सगळे दिवाळी अंक एकाच वेळी आल्यामुळे वाचनभार जो अचानक वाढतो तो कमी होईल. जे लोक दिवाळी साजरी करतात आणि त्यावेळी कामात असतात, त्यांनाही वाचून अभिप्राय द्यायला जास्त उसंत मिळेल. थोडक्यात असं की 'आउट अॉफ फेज' जाण्याचे बरेच फायदे आहेत, आणि तोटे काही दिसत नाहीत.
व्यनीमध्ये मजकूर कॉपी-पेस्ट
व्यनीमध्ये मजकूर कॉपी-पेस्ट करून पाठवता येईल. (दुवे, चित्रं पाठवायची असतील कॉपी-पेस्ट चालणार नाही.)
किंवा मला इमेल केलात तरी चालेल. (sanhita.joshi@जीमेल.कॉम)
रोजच्या जिवनातील विपश्यनेचा
रोजच्या जिवनातील विपश्यनेचा उपयोग.
यावर मी ऐसी अक्षरेवर टाकतोच आहे. पण तिथे संक्षीप्त स्वरुपात.
पण संक्षीप्त असल्याने ते समजतेच असे नाही. त्यासाठी उदाहरनाने स्पष्टीकरण दिल्यास थोडे आधीक समजु शकते.
पन माझ्याकडे हे काय रेडीमेड लिहीलेले नाही. जमवावे लागेल डोके लढवावे लागेल.अनुभव बराचसा असला तरी लेखकाचा पिंड वा आवड नसल्याने शब्द्बद्ध करायला वेळ लागतो.
शब्दमर्यादा कळली तर प्रयत्न करेल.
पण खरं सागायचं तर कितीही सांगीतल, पटतील अशी उदाहरणे देउनही तरी लाभ स्वतः केल्याशिवाय होत नाही.
त्यामुळे ज्यांना प्रेरणा मीळायची त्यांना माझ्या लेखामुळे मीळेलच.
विपश्यना ही संपुर्ण मोफत शिकवली जाते. त्यामुळे मला मानधन वगैरे कीतीही नगन्य्/भरपुर असेल तरीही त्याची आवश्यकता नाही.
फक्त लिहील्यावर ते प्रकाशीत होणार नसेल तर मला ते लिहायचे नाही.
विषय मी दिलाय. ते पाठवल्यावर त्यातील सुधारणांना माझी तयारी असेल.
शुभेच्छा
दिवाळी अंकाला मनःपूर्वक शुभेच्छा! गेल्या अंकाप्रमाणेच हा अंकही दर्जेदार असणार यात मुळीच शंका नाही.
(अंकाचा मुख्य विषय वाचून श्रावण मोडकांची आठवण येणे अपरिहार्य.)