कॉपीराइट

नित्याप्रमाणे विकिप्रकल्पांसाठी धागा असल्यामुळे आपले लेखन प्रताधिकारमुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल. संदर्भ धागा :देवनागरीत लिपीचिन्हे नसलेली उच्चारणे कोणती ?

या कारणाने माझे इतर प्रतिसाद मी वेगळा धागा बनवून त्यात देण्याची शक्यता आहे.
संदर्भ उपरोक्त धाग्यास आलेला एक प्रतिसाद

विकिपानांसाठी असलेल्या धाग्यावर आलेला एक मनमोकळा प्रतिसाद वर दिला आहे. इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट्स आणि कॉपीराइट कायद्यांचा उद्देशच हा आहे की, सर्जनशीलतेस निव्वळ दाद नको तर त्या आधारावर आर्थीक उत्पन्नाच्या शक्यता सुद्धा असाव्यात ज्यामुळे नवीन संशोधन आणि सर्जक विचारांची समाजात जोपासना आणि वृद्धी व्हावी. अर्थात त्यामुळे वेगळा धागा काढू इच्छिणार्‍या उपरोक्त मनमोकळ्या प्रतिसादाचे स्वागतच आहे.

विकिपीडियावर सुद्धा प्रताधिकारांची नवागत संपादकांनी बुजराखावी म्हणून कन्व्हिंसींग साठी बर्‍या पैकी आटापिटा चालू असतो. खास करून विवीध विभूतीभक्त आणि विशीष्ट विचारांनी (चष्म्यांनी) प्रेरीत प्रचारकांना समजावणे सर्वात कठीण असल्याचा सर्व साधारण अनुभव असतो. काही वेळा तज्ञ लेखक मंडळींना त्यांच्या लेखनावरचे प्रताधिकार कसे शाबित राखावेत याचे मार्गदर्शनही करण्याची वेळ येते. हे सर्व विकिपीडियावरील नियमीत संपादकीय कामाचा भागच असते. त्या शिवाय मराठी विकिपीडियावर कॉपीराईटेड हल्ले टाळण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानही बर्‍यापैकी विकसीत होऊ लागले आहे. स्वशब्दात लिहिण्याच्या नैसर्गीक क्षमतेपेक्षा मोठा मजकुर नवागतांनी चिटकवण्याचा प्रयास केल्यास मराठी विकिच्या संपादन गाळण्या त्यांना आपोआप थांबवतात. अशा इतर तंत्रांविषयी पुढेही लिहिणारच आहे.

अर्थात इथे काही वेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष अधोरेखीत करावयाचे आहे. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेत बौद्धीक भांडवलावर आर्थीक लाभांची आशा असावी यात वावगे काही नाही. भारताची स्वातंत्र्योत्तर काही दशके सोडल्यास त्याचा आधीची आणि नंतरची व्यवस्था भांडवल प्रधानतेस मोकळीक असलेलीच होती आणि आहे. उपरोक्त प्रतिसाद लेखिकेने मनमोकळेपणाने नोंदवला आणि या धाग्याद्वारे भूमिका स्पष्ट करण्याची संधी दिली याबद्दल प्रस्तुत लेखिकेचे अभारच मानावयास हवेत. कारण याच (आर्थीक) विचारांनी विकिप्रकल्पांकडे पाठ फिरवणारी मंडळी जशी इतर भाषिकात आहेत तशीच मराठी मंडळी आहेत त्यांच्या प्रताधिकारीत लेखनानेही मराठी भाषा पुढेच जाते त्यामुळे त्याबद्दल तक्रारीचे मुळीच काही कारण नाही. गेल्या दहा पंधरा वर्षातील आंतरजालीय भाषिक समुहांचा मी जेव्हा मराठींसोबत तौलनीक ऑब्झर्वेशन करतो तेव्हा विशेषतः मराठी भाषिक मुक्त अर्थ व्यवस्थेचा आणि बौद्धीक भांडवलावर आर्थीक लाभांंचा गेल्या पाच पंचविस वर्षात प्रथमच शोध लागल्या सारखे वागतो आहे का ? पेंडूलम प्रमाणे एका टोका कडून दुसर्‍या टोकाकडे पोहोचू पहातो आहे का ?

आर्थीक दृष्ट्या मराठी माणूस व्यवहारी भूमीका घेऊ लागला असेल तर उद्योग-व्यवसायात मागे राहात आलेल्या मराठी माणसांबाबत एक आशेचा किरणच मानावा लागेल, पण आर्थीक दृष्ट्या व्यवहारी भूमीका घेण्याचे प्रयत्न करताना, अर्थशास्त्र कस काम करत याकडे मराठी माणसाच लक्ष आहे का ? उदाहरणार्थ प्रस्तुत विषयाचाच विचार करावयाचा झाल्यास, चला हा धागा मी कॉपीराईटेड ठेवतो. मी आहे तो पर्यंत मला आणि मी गेल्यानंतर माझ्या वारसांना पुढील ६० वर्षेपर्यंत माझ्या या धाग्यातील लेखनाच्या प्रकाशन हक्कांनी अथवा माझ्या विवीध ठिकाणच्या छोट्या मोठ्या प्रतिसादांवरील प्रताधिकार कायद्याने एकुण किती उत्पन्नाची मी आशा करावयास हवी, याचा मी विचार करतो का ? आमच्यातही पु. ल. देशपांडे, ग.दि.मा. असू शकतातच की ज्यांच्या पुढील पिढ्यांपर्यंत अथवा बाबा आमटे विनोबा भावे असू शकतात की ज्यांच्या विशीष्ट कार्यास पुढील काही काळ कॉपीराईट कायद्यांच्या संरक्षणाने आर्थीक पाठबळ उभे राहील. पण आमच्यातला प्रत्येक जण त्याच्या त्याच्यापरीने एक चांगला सर्जनशील लेखक जरी असला तरीही माझ्या प्रत्येक प्रतिसादावर आणि प्रत्येक कवितेवर मला/माझ्या पुढील पिढ्यांना खरेच आर्थीक उत्पन्न होणार आहे एवढे अर्थशास्त्रीय मुल्य त्यांना खरेच प्राप्त होत आहे का ? इतिहास संशोधक खासगी लोकांशी त्यांच्या घराण्यातील प्रचीन दस्तएवज पाहण्यास मागतात, त्या दस्तएवजातून फुटी कौडी उत्पन्न होणार नसून सुद्धा अनेकांना त्यात घबाडयोगतर नाहीना असे वाटत असते तसे मला वाटत नाही ना ? या अशा फुटी कौडी आर्थीक उत्पन्न नसलेले दस्तएवज/लेखन माझ जीवन+६० वर्षेपर्यंत अडकवून मी नेमक काय साधत असतो ? की माझा इगो प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष समाजपयोगी ठरण्यापेक्षा अधीक मोठा असतो ?

मागे एका याहुग्रूपवर मराठी एनआरआय चर्चा करत होते विषय देणगी देण्यावरून चालू होता आणि काही जणांच म्हणण कोणतीही गोष्ट फुकट का करावी/द्यावी? अस होतं त्याला आलेला एक प्रतिसाद आपण याहू आणि त्याशिवाय इतर अनेक गोष्टी कशा मोफत वापरत असतो या कडे लक्ष वेधणारा मोठा रोचक होता. जगातल्या सर्वात मोठ्या भांडवलशाही देशातील आमेरीकी लोक कोणतीही कुरकुर न करता जगातील विवीध सामाजिक कामांना सढळ हस्ते मदत करताना दिसतात. मान्य आहे की मराठी माणूस त्या उत्पन्नांच्या शिखरांवर पोहोचला नसेल, त्याचा अजून नित्याचा मध्यमवर्गीय स्ट्रगल चालूच असेल आर्थीक औदार्य दाखवण शक्य नसेल. परंतु ज्या गोष्टींसाठी मला फुटी कौडी उत्पन्न असणार नाही...बा.सी.मर्ढेकरांची गणपत वाणी नावाची कविता पुरेशी बोलकी आहे.

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;
.....
.....
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

स्वतःची बौद्धीक संपदेतील वाण्याची दुकान बंद करण्याचा इथे चुकूनही सल्ला नाही. बौद्धीक संपदेतील वाणी म्हणून प्रत्येक मराठी माणसाने यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छाच आहेत. अर्थात हा वैश्यधर्म निभावताना आपण गणपत वाण्याप्रमाणे स्वप्नरंजनात हरवून जाऊन संपूनतर जात नाही आहोत ?

मी जेव्हा समीक्षेच्या दृष्टीने बा.सी. मर्ढेकरांच्या ओळी उधृत करतो तेव्हा त्यांना कॉपीराईट कायद्याचा लाभ होत नाहीच. उलटपक्षी संदर्भासाठी त्यांच्या कवितेतील ओळी वापरल्याने येथील वाचकातील चार जण तरी ती पूर्ण कविता उघडून वाचण्याची शक्यता वाढेल. त्या चार जणातील एखादा त्यांचे कवितेचे पुस्तक दुकानात जाऊन विकत घेण्यास उद्यूक्त होईल; या दृष्टीने मी पाहणे आर्थीक दृष्ट्यासुद्धा अधिक व्यवहार्य असू शकते किंवा कसे. ललित साहित्याच्या यशस्वी लेखकांना कॉपीराईट कायद्यामुळे चांगल्या उत्पन्नाची आशा असू शकते. ललितेतर साहित्यही विकले जाते विकले जावे. परंतु ललितेतर वैचारीक साहित्याच्या विक्रीला बर्‍या पैकी मर्यादा असू शकतात हा भाग आपण बाजुला ठेऊ. जिथपर्यंत विकिपीडिया सारख्या ज्ञानकोशांचा भाग आहे ते कोणतेही साहित्य सहसा जसेच्या तसे वापरत नाहीतच. ज्ञानकोशांना स्वतःची लेखन शैली असते त्यासाठी आलंकारीक लेखन, विशेषणे, वर्णनात्मकतांना फाटा दिला जातो. विकिपीडिया सारख्या ठिकाणी अनेक जण एकत्र लिहित असल्यामुळे कुणी प्रमाण भाषेकरता कुणी स्वतःस अधिक योग्य वाटणार्‍या शब्दात ते लेखन बदलत असतेच त्यामुळे छायाचित्रांचा भाग सोडला तर कुणा नवागतांकडून काही मजकुर कॉपीराईट बद्दल अनभिज्ञतेतून चढवला गेला तरी तो कधीन कधी बदलला जाऊन ज्ञानकोशीय शैलीत येणारच असतो. त्या शिवाय वर आधी म्हटल्या प्रमाणे या क्षेत्रातील विवीध तंत्रे विकिपीडिया विकसीत करतेच आहे. त्यामुळे विकिपीडियावरील लिखीत मजकुरा बाबत जे समज आहेत ते बदलले जावयास हवेत. आंतरजालावरील ललितेतर साहित्याच्या मराठी लेखकाने छापील क्षेत्रातून (आणि जालावरही) नेमके कोणत्या मजकुरावर उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे आणि कोणत्या लेखनावर उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही याबद्दल स्वतःच्या विचारांना रिव्हिजीट करावयास हवे असे वाटते. खास करून अबकड असे म्हणतात आणि हळक्षज्ञंचे मत तसे आहे हे मी संदर्भासहीत नमुदकरत असतो तेव्हा कोणताही कॉपीराईटचा प्रश्न ज्ञानकोशीय लेखकांना आडवा येणार नसतो. त्यामुळे तुम्ही कॉपीराइटेड धाग्यात पुस्तकात लेखन करता आहात ही माझ्या अडचणीची गोष्ट मुळीच नसते. मी माझ्या विकिकरताच्या धाग्यामध्ये आपले प्रतिसाद कॉपीराईटमुक्त गृहीत धरले जातील असे लिहित असतो ती एका अर्थाने केवळ तत्कालीक सोय असते. आपण प्रतिसाद दिला म्हणजे तो मराठी विकिपीडियावर जसाच्या तसा घेतला जाईल असेही नाही आणि घेतला तरी तो त्याच शब्दातही विकिपीडियावर दीर्घकाळात राहण्याची शक्यता नाही. कोणतेही लेखन ज्ञानकोशासाठी उल्लेखनीय आहे का ? ते तर्कसुसंगत आहे का ? संबंधीत माहिती विश्वासार्ह आहे का माहितीचे समसमिक्षण झाले आहे अथवा माहितीस दुजोरा आहे का ? असे अनेक निकष माहिती विकिपीडियात अथवा कोणत्याही ज्ञानकोशात घेतली जाण्यापुर्वी लागणार असतात. मजकुर प्रताधिकार मुक्त करण्यातून तात्कालीक सोय एवढीच की ज्ञानकोशीय लेखन शैलीत सिद्धहस्त संपादकांची विकिपीडियालाही (अगदी इंग्रजी विकिपीडियावर सुद्धा) कमतरता भासतच असते. मजकुर प्रताधिकारमुक्त असेल तर इतर संपादकांचा आणि सिद्धहस्त संपादकांचा हात लागे पर्यंत जो मधला कालावधी असतो तो पर्यंतची सर्वसामान्य न रुळलेल्या संपादकाच्या डोक्यावरची हकनाक असलेली कॉपीराइट कायद्याची तलवार डोक्यावर टांगती राहण्याची शक्यता कमी होते एवढेच.

आज ज्या भांडवलशाही प्रणालींकडे आम्ही मोठ्या विस्मयाने बघतो त्या विकसीत देशातील भाषातील विकिपीडिया (केवळ इंग्रजी नव्हे) हे उत्तम काम करताहेत याच एक विश्लेषण त्यांच्या नागरीकांच खाऊन पिऊन दुसर्‍या संकेतस्थळांवर रंजन करून झालय म्हणून विकिपीडिया ज्ञानकोशात टाइमपास करतात अस करता येईल. पण वस्तुस्थिती वेगळीतर नाहीना घरोघरी ब्रिटानिका सारखे ज्ञानकोश बाळगणार्‍या भाषिकांमध्ये विकिपीडियावर लेखन योगदान करण्याच प्रमाण अधिक आहे. किंवा ज्या देशात शिक्षणाचे खर्च अवाढव्य झाले आहेत. आयूष्याच्या उभ्या उमेदीचा काळ शिक्षणासाठी घेतलेली कर्जे आणि त्यांचे व्याज बँकाना फेडत घालवणार्‍या भांडवली देशातील लोकांना विकिपीडियाच्या माध्यमातून शिक्षण साधने मुक्त व्हावीत याची आस अधिक नाही ना ? भांडवली मुक्त अर्थव्य्वस्थेत आपल्याकडे भारतातही शिक्षणाचे खर्च अवाढव्य पणे वाढत आहेत. खेडोपाडीचा गरीब माणूस आपल्यामुलांची स्वप्ने रंगवण्यासाठी अव्वाच्या सव्वा डोनेशन भरण्यासाठी उरलेला जमीन जुमला विकतो आहे तरीही खेडोपाडीचे उच्चशिक्षीत तरूण मोठ्या प्रमाणावर बेकार रहात आहेत. आज हातचा पैसा आहे खर्च होऊन गेला फरक पडला तरी बोचत नसावा. जेव्हा हेच काम स्वतःच्या नावावर कर्ज काढून होईल तेव्हा ते आपोआप बोचेल. जेव्हा बोचेल तेव्हा मुक्त शिक्षण साधनांसाठी तो आपोआप हातपाय मारेल. सध्याच्या कमावत्या अभिजनवर्गातील मंडळींना हि बोच आणि आच असण्याचे तुर्तास कारण नाही. जिथे आच असेल तेथे काम आपोआपच होते. बांग्लादेशातील बंगाली आणि केरळचे मल्याळी जेव्हा त्यांच्या भाषेतील ज्ञानकोशांवर हिरहीरीने काम करताना दिसतात तेव्हा दक्षीण आशियाचा उद्याचा संपन्न भाग कुठे असणार आहे ते समजून घेता येते.

एवढा खीस पाडणारा मीही; माझे काही लेखन कॉपीराईटसाठी वेगळे ठेवत नाही असे नाही या धाग्याचा उद्देश समतोल विचारांना प्रेरणा देणे एवढाच होता. खरेतर हा धागा चर्चा सदरात न टाकता लेख सदरात टाकावयाचा होता पण तो ललित सदरात मोडतो की नाही या बाबत मी स्वतःच संभ्रमात असल्यामुळे तो चर्चा सदरात टाकण्याचे ठरविले.

लेख लांबला असला तरी एक महत्वाची नोंद/आवाहन केल्या शिवाय संपवणे योग्य ठरणार नाही. मराठी संकेतस्थळांनी धागा लेख तसेच प्रतिसादांखाली संबंधीत लेख/प्रतिसाद प्रताधिकारयूक्त आहे किंवा प्रताधिकारीत ठेवायचा आहे हे निवडण्याचा ओप्शन देण्या बाबत विचार करावा. दुसरे हे की सर्वच मराठी संकेतस्थळांनी विकिप्रमाणे संदर्भ जनरेटरची व्यवस्था करावी म्हणजे लेखाचे,लेखकाचे आणि संकेतस्थळाचे नाव, आणि आंतरजालीय प्रकाशनाची तसेच संदर्भ जनरेट होतानाची वेळ असे करून मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यवस्थीत संदर्भ देण्याची वृत्ती मराठी लोकांमध्ये रुजवण्यास हातभारही लागेल. कॉपीराईट उल्लंघने शोधणे/टाळणे सोपे जाईल. आणि संकेतस्थळाचा दुवा संदर्भासहीत दुसर्‍या संकेतस्थळावर जाण्याची शक्यता असल्यामुळे संबंधीत मराठी संकेतस्थळांनाही आपोआप प्रसिद्धीचा लाभच होतो.


मी एवढासा प्रतिसाद दिला त्यावर एवढा खीस माहितगारांनी पाडला असा विचार प्रस्तुत लेखिकेने करू नये अशी नम्र विनंती आहे. ह्या विषयावर पुढे मागे लेखन करणार होतोच आपला प्रतिसाद निमीत्तमात्र होता एवढेच. कुणालाही व्यक्तीगत लक्ष करणे उद्देश नसल्यामुळे प्रतिसाद लेखिकेचा नामोल्लेख टाळला आहे हे वेगळे नमुद करण्याची आवश्यकता नसावी

* लिहिण्याच्या भरात या धागा लेखास चपखल शीर्षक सुचले नाही. कुणी सुचवल्यास स्वागत असेन. (अर्थात आपण सुचवलेले शीर्षकाचे कॉपीराईट माझ्याकडे येतील अशी आशा आहे Smile )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

बराच विस्तृत उहापोह आहे.
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!