Skip to main content

फायरफ्लाय - एक सामाजिक सायफाय

अलीकडे चाललेल्या स्त्रीवाद, भांडवलवाद वगैरे चर्चांना अनुसरून त्याविषयांवर रंजक भाष्य करणार्‍या "पहाव्यातच" अशा एका मालिकेबद्दल माहिती देण्याचा हा प्रपंच.

(लिहताना वाचकाला कोणतेही विशेष स्पॉईलर्स दिले जाणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे, पण तरी सुद्धा एखाद्याचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. तस्मात, आपापल्या जबाबदारीवर वाचणे.)

फायरफ्लाय मालिका 'सायफाय वेस्टर्न' या प्रकारात मोडते. सायफाय म्हणल्यानंतर लगेचच तुमच्या डोक्यात येणार्‍या घटना मात्र यात घडत नाहीत. चित्रविचित्र दिसणारे एलियन्स यात नाहीत. टेलीपोर्टींग, टाईम वॉर्प वगैरे 'फंटॅस्टिक' गोष्टी यात घडत नाहीत. मालिका आजपासून पाचशे वर्षं भविष्यात घडते. मी आजवर पाहिलेल्या कोणत्याही सिनेमा वा मालिकांपैकी मला सर्वात जास्त पटणारं भविष्याचं चित्रण यात केलेलं आहे. शिवाय, आजच्या सामाजिक परिस्थितीवर आणि तसेच आज गौरवल्या जाण्यार्‍या वेगवेगळ्या तत्वांवरती (कथेपासून फार विषयांतर न करता) केलेलं भाष्य मालिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. हे सगळं करताना सिनेमातील "हिरोमंडळी" ही इतर कोणत्याही गोग्गोड 'अ‍ॅक्शन हिरों'प्रमाणेच दाखवलेली गेली आहेत खरी, पण तरीही हा 'चिझीनेस' मात्र मालिकेला बेमालूमपणे सूट होतो.

फायरफ्लायमध्ये केलेलं लिंग-समानतेचं चित्रण अफलातून आहे. इतर ठिकाणी दिसणारा दिखाऊ समानतेचा शुष्कपणा इथे नाही. आपल्या मनात ठसलेले वेगवेगळे पुरूषी रोल्स स्त्रिया करातना दिसतात पण तसे कसताना ती स्त्री पुरूष वाटत नाही. सामाजिक उच्च-नीचताही फार कल्पकपणे लिहली गेली आहे. बिग ब्रदर गर्व्हनमेंट, लोकशाही लादण्याचा प्रयत्न, चांगल्या उद्देशानेही सरकार समाजाची वाट कशी लावू शकतं आणि त्याचे काय परिणाम होतात इत्यादी गोष्टी ही मालिका पाहताना तुम्ही काहीतरी अशक्य काल्पनिक पाहत आहात असे तुम्हाला वाटू देत नाहीत.

मालिकेची सुरवात एका युद्धाने होते. भविष्यात पृथ्वी मानवजातीला अपूरी पडायला लागल्याने मानवाने वेगवेगळ्या ग्रहांवर वस्ती केली आहे (हा भाग वसाहतवादाच्या इतिहासाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही.) अनुकूल असलेल्या ग्रहांवरची मानवी वस्ती अर्थातच सगळ्यांना परवडणारी नाही, म्हणून काहींना लांबरच्या तरीही प्रतिकूल ग्रहांवर जाऊन वस्ती करणे भाग पडते. मध्यावर असलेल्या ग्रहांवरती अनुकूल परिस्थीतीमुळे साहजिकच जास्त विकास होतो. जे विकसित ग्रह ते सर्वांनाच एका अंमलाखाली आणण्याचे प्रयत्न करू लागतात. याला अनेकांचा विरोध असतो आणि या अरेरावीला विरोध म्हणून बाहेरचे ग्रह मध्यावर असलेल्या 'सेंट्रल अलायन्स' विरुद्ध युद्ध पुकारतात. (अमेरिकन सिव्हील युद्ध आणि त्याचे परिणाम याचं अप्रत्यक्षच चित्रण इथे फार सुंदर रितीने केलेलं आहे.) सिनेमाचा हिरो, माल्कम रेनल्ड्स, हा स्वतःहून अलायंसविरुद्ध ब्राऊनकोट्सवाल्यांकडून लढतो. पण युद्धात बाहेरच्या ग्रहांचा पराभव होतो. बाहेरच्या ग्रहांवरील लोक अजून लांबच्या ग्रहांवर लोटले जातात किंवा अलायन्सची दादागिरी नाईलाजाने पसंत करतात. माल्कम रेन्ल्ड्स स्वतःसाठी एक अंतराळयान घेऊन अलायंसची लुडबूड होणार नाही अशाप्रकारे लांबच्या ग्रहांवरती स्मगलिंगचा उद्योग सुरू करतो, हा एकप्रकारे त्याचा एकटाचा अजूनही सुरू असलेला लढाच असतो.

.
.

रेनल्ड्सच्या यानावरील कंपूची पात्रंही छान लिहली आहेत. रेनल्डस हा यानाचा, सेरेनिटी, कप्तान. त्याची डेप्युटी झोई. झोई ही युद्धातही रेनल्ड्सची डेप्युटी होती. झोई ही खरंतर रेनल्ड्स पेक्षाही शूर. रेनल्ड्स युद्धात तत्त्वासाठी लढला, झोई मात्र खर्‍या योद्ध्याप्रमाणे आपल्या कप्तानावर असलेल्या विश्वासाने लढली. झोईचा नवरा हा यानाचा पायलट. (ह्या नवरा-बायकोतील अनेक प्रसंगात प्रस्थापित 'फेमिनाईन' आणि 'मॅस्क्युलिन' स्टिरीओटाईप्सना सुंदर तडा दिला आहे. एकंदरीतच मालिकेत 'नवरा-बायको' हे नातं अनेक प्रकारे मांडून आपण कसे एकाच प्रतिमेला धरून आहोत याची जाणिव पाहणार्‍याला होत राहते.) यानाची 'जिनीअस' मेकॅनिक 'क्येली'. इंजिनबद्दल इत्यंभूत माहिती असणं हा साधारणपणे मेल स्टिरीओटाईप आहे. क्येली जिनीअस मेकॅनिक असूनही भोळी, लोकांमध्ये चांगलंच पाहणारी, एक प्रेमळ मुलगीह आहे (स्टिरीओटाईप मोडल्याचे अजून एक उदाहरण.) क्येली सुंदर, प्रेमात पडावं अशी आहे पण आकर्षक देहबोलीची मात्र दाखवलेली नाही (त्या अभिनेत्रीला या पात्रा करता वजन वाढवावे लागले होते.) क्येलीसारखं कोणी वास्तवात भेटलं तर आम्ही तर लगेच लग्न करायला तयार होऊ इतकं हे पात्र बेमालूम जमलेलं आहे. (मागे एकदा आम्ही "थोडा सा रुमानी हो जाए' मधील अनिता बद्दल असेच मत व्यक्त केले होते. पण ते पात्र फक्त स्त्रीची फेमिनाईन प्रतिमा मोडतं, क्येलीचं पात्र मात्र त्याही पुढे जातं.)

त्याशिवाय यानावरती एक अलायन्सचे अधिकृत लायसन्स असलेली वेश्या ('कंपॅनिअन'), इनारा सेरा, आहे, जी यानाबरोबर वेगवेगळ्या ग्रहांवर जाऊन आपली उपजिवीका भागवते आहे. भविष्यात वेश्याव्यवसाय कायदेशीरच नव्हे तर मान्यताप्राप्त आहे आणि या वेश्यांना समाजात एक मानाचं स्थान आहे. एका प्रतिष्ठीत संस्थेत प्रशिक्षण घेतलेली इनारा नुसतीच लावण्यवती नसून उच्चशिक्षीत सर्वकलागुणसंपन्न अशी आहे (अजून एक मोडलेला सिरीओटाईप). बेकायदेशीर काम करणार्‍या यानावरती असं एका प्रतिष्ठित हस्तीने असणं या मागेही बरीच गुंतागुंत आहे. वेश्याव्यवसायाला ज्याप्रकारे या मालिकेत दाखवलेलं आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे. त्याशिवाय, जेन हा 'सोल्जर' यानावरती आहे. गुडघ्यात डो़कं असलेला आणि जो जास्त पैसे देईल त्याच्या करता हा वाटेल ते काम करतो. (मात्र कोण्या मालकाचा पाळीव होणं त्याला मान्य नाही.) मालिकेत येणारी सगळीचं पात्र छान रंगवलेली आहेत. त्याशिवाय ५०० वर्षांनंतरची संस्कृती फक्त अमेरिकन आहे हा बालिशपणाही त्यांनी केलेला नाही. इतकंही की त्यांच्या बोलीभाषा ही इंग्रजी+चायनीज्/मँडरीन अशी आहे.

बेकायदेशीर स्मगलिंग करताना 'फ्रंट बिजनेस' म्हणून हे यान प्रवांशाना एका ग्रहावरून दुसर्‍या ग्रहावर नेण्याचं काम करतं. एकदा अशाच घेतलेल्या प्रवाशांमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीत कप्तान रेनल्डस पुन्हा एकदा गर्व्हर्नमेंटच्या विरुद्ध तात्विक युद्धात सापडतो आणि त्याचं चित्रण ही मालिका पुढे करते. ह्या सगळ्याबरोबरच कथानकामधील रंजकता तुम्हाला अजिबात कंटाळा येऊ देत नाही.

मालिकेच्या तांत्रिक बाबीही उत्तम आहेत. संगीत, लिरीक्स, संवाद प्रभावी आहेत. सर्वच पात्रांचा अभिनय चांगला आहे. त्याच बरोबर जेव्हा यान आंतराळात प्रवास करतं आणि तुम्ही थर्ड पर्सन पाहता आहात तेव्हा तुम्हाला काहीही आवाज येत नाही कारण आंतराळात आवाज ऐकू येत नाही वगैरे तांत्रिक गोष्टींची काळजीही घेतलेली आहे. (इतर सिनेमे/मालिकांत जेव्हा 'झूं झूं' करत यानं जातात तेव्हा ते फार्फार बालिश वाटतं.)

दुर्दैवाने मालिका फार लवकर रद्द झाली. काहींच्या मते अमेरीकन आयडल वगैरे रिअ‍ॅलिटी शोंच्या फुटलेल्या पेवामुळे गंभीर, सामाजिक विषयांवर भाष्यकरणार्‍या आणि तरीही विनोदी मालिका चालतील असे चॅनलवाल्यांना वाटले नाही. इतके की त्यांनी रँडमली सर्वात 'माईल्ड' भाग निवडून सर्वप्रथम प्रसारीत केला. आऊट ऑफ ऑर्डर दाखवलेल्या भागांमुळे मालिकेचे अधिकच नुकसान झाले आणि मालिका दोन तीन भाग दाखवून संपुष्टात आली. मात्र ज्या लोकांनी ते भाग पाहिले आणी ज्यांना ती आवडली त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी स्वतः पैसे उभे करून करून मालिकेचे सगळे भाग (सिझन १) असलेली सिडी रिलीझ केली. आजही 'फायरफ्लाय फॅन्स' हा एक फार मोठा सोशल फिनॉमिनन आहे. पाश्चिमात्य देशांत आज असलेल्या 'कल्ट' कल्चरमध्ये फायरफ्लाय फॅन्सचं स्थान मानाचं मानलं जातं.

समीक्षेचा विषय निवडा

अमुक Mon, 25/08/2014 - 05:00

एका वेगळ्या प्रयत्नाच्या उत्तम ओळखीकरता अनेक आभार !
तुम्ही अधिक लेखन करण्याचे मनावर घ्यावे, ही विनंती.
---
"थोडा सा रुमानी हो जाए' मधील अनिता -
.........त्या बिनीचे 'पापा ओ पापा, अब तुमही बता दो, औरत बनूँ कैसे, ये तो सिखा दो |' हे मार्मिक गाणे आठवले. एक अतिशय चांगला, जमून आलेला चित्रपट.

अस्वल Mon, 25/08/2014 - 05:40

आधी मलाही ह्या मालिकेबद्दल माहिती नव्हती (अज्ञानात सुख वगैरे) मग नेटफ्लिक्सावर ओळख झाली.मग एक tongue in cheek टिप्पणी करणारी मालिकेची स्टाय्ल एकदम भिडली. बिंज वाचिंग म्हणतात ते केलेली ही आद्य मालिका!
सामाजिक पैलू मांडलेत ते एकदम मस्त! अशा तर्हेने विचार केला नव्हता आधी, पण पटलं!
त्यामानाने हिची जुळी छोटी बहिण सेरेनिटी तितकीशी झेपली नाही.

बॅटमॅन Mon, 25/08/2014 - 10:55

रोचक लेखन. मालिकेबद्दल अगोदर ऐकले असूनही पुनरेकवार उत्सुकता वाढवणारे.

तदुपरि- सर्वगुणसंपन्न इ. वेश्या हा 'मोडलेला स्टिरिओटैप' सद्यकालाबद्दल असेल, पण प्राचीन काळी ही वस्तुस्थिती होती.

Nile Mon, 25/08/2014 - 11:03

In reply to by बॅटमॅन

पण प्राचीन काळी ही वस्तुस्थिती होती

माझ्या माहितीप्रमाणे ज्याप्रकारे ह्यात पात्र आहे त्याप्रकारे कोणत्याच संस्कृतीत नव्हती. पाहिल्यानंतर सोदाहरण स्पष्टीकरण दिल्यास माझे म्हणणे मागे घेईन.

बॅटमॅन Mon, 25/08/2014 - 11:11

In reply to by Nile

अवश्य. जेवढे लिहिलेय तेवढ्यावरून सांगितले इतकेच. प्राचीन काळी भारत, ग्रीस, इ. ठिकाणी वेश्या/गणिकांना गायन-वादन-नृत्य-नाट्य-वक्तृत्वादि अनेक कलांचे शिक्षण मिळाल्याचे उल्लेख आहेत. या शीर्यलीत जर त्या पात्रास इन अ‍ॅडिषन मार्षल आर्ट्सदेखील येत असतील तर तशी तुरळक उदा. का होईना, सापडतील- विषकन्या इ.इ. असो.

मी Mon, 25/08/2014 - 11:29

ओळख आवडली, बघण्याचा प्रयत्न करेन.

वसाहतवाद, सिव्हील वॉर वगैरे बघता पाश्चिमात्य साय-फाय ड्रामाच आहे असे दिसते, विकीपण वेस्टर्न सायफायच म्हणते आहे.

बॅटमॅन Mon, 25/08/2014 - 11:40

In reply to by Nile

'वेस्टर्न' अन 'सायफाय' हे दोन्ही शब्द एकत्र आल्यास वेस्टर्नचा तो कावबॉयवाला अर्थ अभिप्रेत नसणं हे ओघानंच आलं असं वाटतं.

बॅटमॅन Mon, 25/08/2014 - 11:50

In reply to by Nile

तो अर्थ शब्दसमुच्चयात टिकतो असं वाटत नाही, उदा. वेस्टर्न सायफाय म्ह. ते टेक्सस इ. राज्यांत उदा. इ.स. १८५० मध्ये टाईम ट्रॅव्हल करणं असं काहीसं अपेक्षित आहे का? बहुधा नसावं. पण असो, वेस्टर्न सायफाय म्ह. कुणी गोर्‍या लेखकाने लिहिलेलं सायफाय इतकाच अर्थ अभिप्रेत असावा बहुधा. पण हा शब्दप्रयोग तितकासा प्रचलित नसण्याबद्दल सहमत आहे.

Nile Mon, 25/08/2014 - 11:55

In reply to by बॅटमॅन

तुमची मतं मालिका पाहून आहेत का न पाहता आहेत? वेस्टर्न धर्तीवर बनवलेलं हे सायफाय आहे. आता असा जॉन्रं असु शकतो का नसतो हा वेगळा वाद झाला.

बॅटमॅन Mon, 25/08/2014 - 12:00

In reply to by Nile

जे वाटणं आहे ते फक्त शब्दार्थावर आधारित आहे. वेस्टर्नपटांच्या धरतीवर बनवलेलं हे सायफाय आहे हा खुलासा याच प्रतिसादातून झाला. अगोदर जे काही लिहिलं ते माझ्यासाठी इतकं स्पष्ट नव्हतं, आमचं अज्ञान त्याला कारणीभूत आहे. तस्मात कमाल इ. नसावी असे वाटते.

Nile Mon, 25/08/2014 - 20:25

In reply to by बॅटमॅन

अगोदर जे काही लिहिलं ते माझ्यासाठी इतकं स्पष्ट नव्हतं, आमचं अज्ञान त्याला कारणीभूत आहे. तस्मात कमाल इ. नसावी असे वाटते.

ठीक आहे. पण याकरीताच पहिल्याच वाक्यात 'सायफाय वेस्टर्न' असं मुद्दामच एकेरी अवतरणचिन्हांत लिहलेलं होतं. असो.

फायरफ्लाय मालिका 'सायफाय वेस्टर्न' या प्रकारात मोडते.

Nile Mon, 25/08/2014 - 11:57

In reply to by मी

हे वेस्टर्न वायलं असलं तरी सिरीजमधे वैश्विकपणा असल्याबद्दल मात्र सहमत नाही.

हे मतप्रदर्शन कोणत्या कारणांमुळे आहे हे ही लिहलं तर प्रतिवाद करता येईल. स्पॉयलर्स नको म्हणून मी मुद्दाम सविस्तर लिहलेलं नाही, पण त्यावर प्रतिसादांत चर्चा करता येईल. वैश्विक करण्याचा प्रयत्न स्पष्ट आहे आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला. वैश्विक नसण्याची तुमची कारणं तुमच्याकडून अपेक्षित.

मी Mon, 25/08/2014 - 12:09

In reply to by Nile

वसाहतवाद, सिव्हील वॉर हि दोन कारणे निदान मला तुर्तास दिसतात, त्याविरुद्ध मॅडरिन भाषेचं असणं ह्यापलिकडे स्पॉयलर नको म्हणून तुम्ही अधिक काही सांगितलेले दिसत नाही. कथेचा बाज किंवा त्यातील कल्पना हि प्रतिभेचीच अपत्ये (दिसत) आहेत त्यामुळे त्याला अमुक एका जगाचे असे म्हणणे अवघड आहे. अर्थात हे महत्त्वाचे नाही, त्यामुळे ह्याउप्पर तुम्ही पटवून दिलेत किंवा म्हणालात की 'वैश्विकच प्रयत्न आहे' तर ते मला मान्य असेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/08/2014 - 00:04

मालिका यादीत आलेली आहे. याच आठवड्यात बघायला सुरूवात करेन.

>> तुम्ही अधिक लेखन करण्याचे मनावर घ्यावे, ही विनंती.
+१

मिहिर Sun, 08/05/2016 - 00:52

नेटफ्लिक्सवर नुकतीच मालिका बघून संपवली. अतिशय आवडली. पात्रांचा अभिनय उत्तम आहे आणि सगळ्या पात्रांना चांगला वावही दिला आहे. बाकी इतके छान दाखवले आहे, तर मालिकेत काही तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण दिले असते तर आवडले असते. त्यातल्या काही बाबींचे मालिकेचेच यक्षटेण्षण असलेल्या 'सेरेनिटी' चित्रपटात स्पष्टीकरण आहे, पण बऱ्याच गोष्टी अनुत्तरीतच आहेत. एक उदाहरण म्हणजे यानातले आणि ग्रहांवरचे गुरुत्वाकर्षण.