गंमत जंमत!

स्वाती व प्राची (दोघीं, सुमारे चार वर्षाचे असावेत) रोज काहीना काही खेळ खेळत असतात. समोर दिसेल त्या वस्तूंचा वापर करत खेळाच्या प्रकारात विविधता आणत असतात. परंतु त्यांचे खेळ नेहमीच नावीन्यपूर्ण असतात. कधी खोटा खोटा स्वयंपाक, कधी शाळा, कधी प्रवासाचे ठिकाण, कधी आजी आजोबांची, शेजार्‍यापाजार्‍यांची हुबेहूब नक्कल, आगगाडी, विमान, बाग इ.इ कुठलाही विषय असो, दोघी मनापासून खेळतात. त्यांच्या खेळात काही वेळा प्रत्यक्ष कृतीपेक्षा बडबड जास्त असते. व ती बडबड इतर कुणी ऐकत असल्यास त्यातील एक अवाक्षरही कळत नसते. तसे पाहता त्यांच्या संवादात नेहमीचेच शब्द असतात. परंतु त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. त्या दोघींना मात्र प्रत्येक वस्तूचे त्या खेळातील स्वरूप, घटनाक्रम, संवाद, संवादातील आशय यांची पक्की जाणीव असते व त्या खेळापुरते त्या शब्दांचा अर्थही ते बदलत नसतात. ऐकणार्‍यांना तो ओळखीचा शब्द वाटत असला तरी त्या दोघी तो शब्द अत्यंत वेगळ्याच अर्थाने वापरत असतात.
आजचा खेळ दोन रिकाम्या काडीपेटींच्या भोवती गुंफलेला होता. दोघींनी प्रत्येकी एकेक पेटी घेतली होती. मात्र आजच्या खेळासाठी एक अट होतीः पेटीत काय आहे ते फक्त स्वतःच बघावे आणि दुसर्‍याच्या पेटीत काय आहे ते बघू नये. एवढेच नव्हे तर स्वतःच्या पेटीत काय आहे हेसुद्धा दुसर्‍याला सांगू नये, किंवा त्याची तुलनाही करू नये. परंतु खेळ पुढे सरकण्यासाठी फार फार तर पेटीच्या आतील वस्तूला आपण भुंगा म्हणायचे यावर तडजोड झाली व खेळ पुढे सरकू लागला.
काही कारणामुळे त्या दोघींना हा खेळ फार आवडला. अत्यंत अभिमानाने पेटीत दडलय काय याला उत्तर म्हणून 'भुंगा' असे दोघीही म्हणत असल्या तरी हा भुंगा दिसतो कसा, त्याचा रंग रूप, त्याचे किती पाय इत्यादी तपशील विचारल्यास दोघीही गप्प गप्प. काहीही बोलायला तयार नाही. फक्त काही तरी बोलून वेळ घालवत असतात. कदाचित त्या पेटीत काही नसेलही. किंवा भुंग्याऐवजी एखादा भलताच किडाही असेल. परंतु त्या दोघी मात्र पेटींच्या आत भुंगाच आहे यावर जोर देत होत्या. त्यांच्या आजच्या खेळासाठी भुंगा हा शब्द एकदम फिट् होता. व त्यात बदल करण्याचे त्यांना दुसरे कुठलेही योग्य कारण दिसत नव्हते. परंतु मोठ्यांच्या दृष्टीने हा सर्व पोरखेळ होता.
भुंगा हा एक निरर्थक शब्द असेल की स्वाती – प्राचीलाच माहित असलेला अर्थ त्यातून ध्वनित होत असेल हा आता आमच्यासमोरचा प्रश्न आहे.

संदर्भः Philosophical Investigations by Ludwig Wittgenstein

लुड्विग विट्गेनस्टाइन या ऑस्ट्रियन तत्वज्ञानी उल्लेख केलेल्या Beetle in the Box या खेळाचे मराठीतील हे संक्षिप्त वर्णन आहे. विट्गेनस्टाइन या तत्वज्ञाला सगळ्या भाषा म्हणजे एका प्रकारचे खेळ आहेत असे वाटते. कारण खेळाप्रमाणे भाषेतही काही नियम, परंपरा व संकेत असतात. व जे कुणी ती भाषा वापरत असतात त्यांनाच त्याची पूर्ण कल्पना असते. म्हणून त्यांच्यामध्ये विनासायास संवाद होऊ शकतो.
परंतु विट्गेनस्टाइनला भुंगा या शब्दाचा संदर्भ काय असू शकेल हा प्रश्न पडला आहे. गंमत म्हणजे भुंगा या शब्दाचे अनेक interpretations त्याच्या पुस्तकात सापडतात. त्यामुळे पेटीत काय आहे याच्याशी त्याचे काहीही देणेघेणे नाही. फक्त त्या शब्दाशी त्याची बांधिलकी आहे. भुंगा या शब्दाचा काहीही अर्थ असो, त्याच्याशी आणि पेटीत काय आहे याच्याशी काहीही संबंध नाही, हे मात्र निश्चित. जरी यातून काही गोष्टी स्पष्ट होत असले तरी हा चर्चेचा विषय होऊ शकतो का हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो.
खरे पाहता आपण स्वाती – प्राचीसारख्या लहान मुलासारखे विचित्र खेळ खेळत नसतो. परंतु हेसुद्धा आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. काऱण कदाचित मानसिक समाधानासाठी आपण याहूनही चित्र - विचित्र खेळ खेळत असतो, हे सांगण्यास का म्हणून लाजायचे? आता हेच बघा ना; मी जर तुम्हाला माझे गुडघे दुखतात असे सांगितल्यास तुम्हाला नेमके काय कळते? यात पेटी म्हणजे माझे अनुभव. स्वाती – प्राचीच्या खेळातील अटीप्रमाणे या पेटीत कोणीही डोकाऊन पाहू शकत नाही. फक्त मीच पाहू शकतो व माझ्या शब्दावर विश्वास ठेवण्यावाचून तुम्हाला गत्यंतर नाही. किंवा गुडघे दुखतात म्हणजे नेमके काय होते हेही मी कुणाला सांगू शकत नाही. तो फक्त माझा व माझाच अनुभव असतो. जी काही शब्दरचना गुडघ्याच्या वेदनेसाठी मी योजलेली आहे, व जे काही स्पष्टीकरण त्याच्या पुष्ट्यर्थ देत आहे ते सर्व या पेटीत आहे, येवढेच मी सांगू शकतो.
अनुभव हा प्रकारच व्यक्ती सापेक्ष असतो त्यामुळे अशी एखादी पेटी प्रत्येक जण बाळगत असतो. फक्त इतर तुमच्या पेटीत डोकाऊ शकत नाही. किंवा तुमचा तो अनुभव अनुभवू शकत नाहीत. त्यामुळे आपण सर्व स्वाती – प्राचीच्या पातळीवर वावरत असतो असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. आपण फक्त आपल्या अनुभवाशी निगडित असलेले शब्दच नेहमी वापरत असतो आणि या शब्दाचा (मला माहित असलेला) नेमका अर्थ सगळ्यांना माहित असणार या तोर्‍यात आपण वावरत असतो.
या भुंग्याच्या उदाहरणावरून (अनुभवाच्या पेटीच्या) आत काय दडले आहे किंवा आत काय चालले आहे त्याच्याशी व वेदनेसारख्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी वापरत असलेल्या शब्दसमुच्चयाशी काडीचाही संबंध नाही, असे म्हणता येईल. हे जरा अतीच होत आहे असेही वाटण्याची शक्यता आहे. कारण वेदना वा दुःख हे वैयक्तिक बाब असली तरी त्या शब्दातून इतरांना आपल्याला होत असलेल्या अनुभवाची झलक नक्कीच दाखवू शकतो. परंतु शेवटी ती झलकच असते, पूर्ण अनुभव नाही. जेव्हा आपण दोघेही दुःख या शब्दाचा वापर करत असतो तेव्हा माझे दुःख आणि तुमचे दुःख यात फार मोठा फरक असण्याची शक्यता आहे. फक्त या शब्दातून आपण एकाच परिस्थितीतून जात आहोत, आपल्या वर्तनात सारखेपणा आहे, किंवा आपण देत असलेले स्पष्टीकरण जवळ जवळ सारखेच आहेत एवढेच यावरून कळू शकते. फक्त काही तरी वेगळेच घडत आहे, याची कल्पना येते. भुंग्याच्या चर्चेत उल्लेख केल्याप्रमाणे बाह्य वर्णनाचा आणि आतील अनुभवाचा एकमेकाशी संबंध नाही. त्यामुळे हा शब्द, त्या शब्दाची भाषा, आणि त्यातून ध्वनित होणारा अर्थ व प्रत्यक्ष अनुभव यात चारचौघात सांगण्यासारखे काहीही नाही, एवढे समजले तरी पुरे.
मन या नावाची चीजच या गोधळाला कारणीभूत असू शकते असे आपल्याला म्हणता येईल. परंतु मन म्हणजे नेमके काय – मेंदू, की मेंदूची प्रक्रिया की चेतापेशी की चेतापेशींची क्रिया/प्रतिक्रिया की 'आणखी' काही तरी!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

रोचक आहे खरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आवडला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छानच. आवडला लेख

अवांतरः

विट्गेनस्टाइन या तत्वज्ञाला सगळ्या भाषा म्हणजे एका प्रकारचे खेळ आहेत असे वाटते. कारण खेळाप्रमाणे भाषेतही काही नियम, परंपरा व संकेत असतात. व जे कुणी ती भाषा वापरत असतात त्यांनाच त्याची पूर्ण कल्पना असते. म्हणून त्यांच्यामध्ये विनासायास संवाद होऊ शकतो.

आमच्या अजोने हे आम्हाला त्याच्या मेडन धाग्यातच शिकवले आहे Smile
हो की नै रे अजो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख फारच रोचक वाटला अन काय बोलावं तेच सुचेना. म्हणजे खरच वेगळाच दृष्टीकोन देणारा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेटकं आणि उच्च लेखन !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान! 'भाषेचे दौर्बल्य' सोप्या उदाहरणाने, नेटकेपणे मांडलय लेखात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0