लोथलच्या निमित्ताने: एक उनाड दिवस (२/२)

पूर्वार्ध....
.....तोवर लोथल ला जाणार्‍या रस्त्याचा फाटा आला होता. मी रिक्शातून उतरलो. रिक्षावाल्याला पैसे दिले.
"ठीक है शुक्रिया. आपका नाम?" मी विचारले
"इम्तियाज" तो म्हणाला. आणि रिक्षा पुढे निघून गेली!
आता तिथे लोथलकडे जाणारा एक रोड होता, अर्ध्या किमीवर लोथल म्युझियम होते. अख्खा रोडच नाही तर दूर दूरवर मनुष्यवस्तीची कोणतीही खूण नव्हती!

मी त्या निर्जन रस्त्यावरून चालत पुढे गेलो तर काही अंतरावर एक इमारत दिसू लागली. तेच म्युझियम होते. त्याच्या दिशेने जात असताना एका बाजूला पाही पडके अवशेष, विटांच्या रचना वगैरे दिसत होत्या. पण माणसाची काहीच खूण नव्हती. नुसतं उन्हात भटकून काहीच कळणार नाही, त्यापेक्षा म्युझियममध्ये कोणीतरी भेटेल त्याच्याकडून समजून घेऊ वगैरे विचाराने आधी म्युझियम गाठलं. दाराशी एक म्हातारा मनुष्य बसला होता. एंट्री-फी घ्यायला (रु.५ - १० ची नोट पुढे केल्यावर अर्थातच सुट्टे नव्हते त्याच्याकडे. त्यामुळे मला स्वाहा! करण्यावाचून गत्यंतर नव्हतं). त्यानेच पुढे होऊन म्युझियममधील दिवे वगैरे लावले. म्युझियम मात्र व्यवस्थित मेंटेन्ड आहे. अनेक वस्तू आहेत, त्याची विस्ताराने माहिती उपलब्ध आहे. तत्कालीन व्यवस्थेची माहिती समजेल असे नकाशे, मॉडेल्स बनवून ठेवली आहेत. शिवाय स्वच्छही आहे. तेथील एका अभिप्राय लिहायच्या पुस्तिकेत तसा अभिप्राय लिहून बाहेर आलो. गेटवर पुन्हा त्या म्हातारबुवांकडे चौकशी केली
"इथे काही खायला मिळेल का?"
उत्तरादाखल फक्त एक 'च्यक!'
"स्टेशनजवळ काही दिसलं नाही पण तरी काही सोय होते का तिथे?"
"नाही. फारतर 'पकोडे' नी चहा मिळेल तिथे. तो ही ४ नंतर. आता कोणतीही गाडी नाही स्टेशनवर. तेव्हा खायला काय, माणूस बघायलाही मिळणार नाही"
"मग जवळच्या गावात कुणाला तरी पाठवून काही मागवता येईल का? मी पैसे देईन"
"कुणाला पाठवू? इथे मी असतो. मी डबा आणलाय त्यातलं थोडं खातोस?" समोरच ठेवलेला डबा लगेच पुढे केला.
त्यांच्या डब्यात मला ३-४ फुलके दिसले. त्यात मी काय खाणार नी त्याला काय उरणार. त्यात त्याचे वय बघून त्याला गरज अधिक असा विचार केला.
"नको. बघतो मी काय करायचं ते. आभार"
त्याला विचारले की साईटवर गाईड म्हणून येतोस का? तर त्याला ऊन झेपत नाही असे समजले. मग फारसे पर्याय उरले नाहीत. इम्तियाजला फोन केला. त्याने सांगितले की सगरथळ ला एक वाजेपर्यंत पोच. अजून पाऊण-एक तास होता.

मग मी लोथल साईट बघितली. म्युझियम बघितल्याने तसेच त्या म्हातारबुवांनी दिलेल्या डायरेक्शन्समुळे काय बघायचे ते समजत होते. लोथल हे एक व्यापारी केंद्र व नदीवरचे मानवनिर्मित बंदर होते. नदीचे पाणी आत वळवून खास गोदी, कोठारे व होड्यांसाठी पोर्ट बनवलेले होते. तिथे दागिन्यांत वापरल्या जाणार्‍या खड्यांचा/मण्यांच्या निर्मितीचा मुख्य व्यवसाय होता. त्यांच्या भट्ट्या आजही बघता येतात. एकुणात रोचक अनुभव. आपल्याकडील आदिम मानवी वस्तीच्या अवशेषांतून फिरणे, तत्कालीन वस्तू व वास्तूला स्पर्श करणे वगैरे रोमांचक होते. अर्थात डोक्यावरच्या उन्हामुळे हे उगवलेले रोमांच चांगलेच भाजून निघत होते!

त्या अवशेषांत भर उन्हात २०-२५ मिनिटे बागडून पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो. तिथे या टोकापासून त्या टोकापर्यंत एखाद्या अजस्त्र अजगरासारखा (हुश्श वापरली बॉ ही उपमा Wink ) तो रस्ता पहुडला होता. अजगराच्या शरीरावरचा काही भाग चमकतो, तसाच त्या रस्त्यावरही दुपारच्या उन्हात दिसणार्‍या मृगजळामुळे काही भाग चकाकत होता. दूर दूरपर्यंत ना एक टेकाड होते, ना फारसे वृक्ष. मात्र नशिबाने समोर एक चिंचेचे झाड होते. त्याच्या सावलीत जाऊन बसलो. १०-१५ मिनिटांमध्ये त्या रस्त्यावरून एकही वाहन गेले नाही की एकही मनुष्य गेला नाही. असा अनुभव घेऊन मला कित्येक वर्षे लोटल्याची जाणीव झाली. मुंबईत आणि आता पुण्यातही ऐन मध्यरात्रीसुद्धा असे रस्ते सुनसान नसतात. इथे तर पूर्ण शांतता होती. वाराही पडला होता. अर्थात त्यातही निसर्ग पूर्ण सुस्त नव्हता. नाही म्हणायला चिंचेच्या झाडावर काही पक्षी उगाच इकडची काडी तिकडे करत होते. दूरवर मोरांसदृश आकृत्या असाव्यात असे वाटत होते. तशात रस्त्याच्या पलिकडल्या भागात एक घोरपडही दिसली. मग मात्र, लागलेल्या भुकेमुळे व एकूणच परिस्थितीच्या- एकटेपणाच्या- काहीश्या सचिंत व भितीच्या जाणिवेमुळे, मी त्याचा आनंद घ्यायच्या मन:स्थितीत उरलो नाही.

इथे पहिल्यांदा मला वाटले की आपण चूक करतोय का? कोण तो अनोळखी इम्तियाज, कुठल्यातरी अनोळखी गावी बोलावतो आहे नी आपणही जातो आहोत. सगळाच वेडाचार! मी माझे पाकीट चेक केले. सोबत बॅग वगैरे घेतलीच नव्हती. त्याने लुटलेच तर काहितरी जवळ असावे अशा काहिशा अजब तर्कातून काही पैसे काढून चोरखिशात ठेवले. बाकी त्या गावाला जाण्यासाठी एखाद्या वाहनाची वाट पाहत बसण्यावाचून गत्यंतर नव्हते. इम्तियाज ३-४ किमी म्हणाला असला तरी सांगता येत नव्हते. गावातील मंडळी अंतरे कमी करून सांगतात असा अनुभव आहे. शेवटी अनेक वर्षांनी एकटाच, कोणतेही काम न करता, अनोळखी जागी शांतपणे बसण्याचा पुरेपूर अनुभव घेऊन झाल्यावर दूर क्षितिजावर दोन, व काही वेळात तीन ठिपके दिसू लागले. उन्हाच्या झळांमुळे हालते चित्र झाले होते त्यामुळे अंदाज येत नव्हता की कोणते वाहन आहे ते. ते जरा जवळ आले तर पहिल्या दोन बाइक्स होत्या. अधिक जवळ आल्यावर दिसले की बाप्ये आणि मागे त्यांच्या बायका बसल्या आहेत. त्या दोन सवार्‍या तशाच पुढे गेल्या. तिसरे वाहन जवळ येऊ लागले होते. ती सुद्धा बाइक आहे हे समजत होते. नशिबाने तो एकटाच बाईकस्वार होता.

मी ऑलमोस्ट रस्त्याच्या मध्यावर उभे राहून त्याला हात केला. त्यानेही बाइक स्लो केली व थांबला.
त्यानेच विचारले "सगरथळ?"
"हा जी"
"बैठो!"
त्यानंतर सगरथळ येईपर्यंत आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. एकतर आधीच मला नव्या व्यक्तीशी आपणहून काय बोलायचं समजत नाही नी त्यात इथे तर "फिअर ऑफ अननोन" ने माझा ताबा घ्यायला सुरुवात केली होती. दुसरीकडे एकूणच थ्रिलिंग वाटत होते. मजा येत होती. त्या सुनसान रस्त्यावर चांगला १०-१२ मिनिटे बाइक चालवल्यावर काही घरांचे पुंजके दिसू लागले, रस्त्याच्या कडेला प्लास्टिक, गुटख्याची पाकिटे उन्हात लकाकू लागली. लवकरच एक तळे लागले तिथे काही बायका कपडे धूत होत्या. तिथे बाइक थांबवली.
"किसके घर जाना है?" बाइकच्या सारथ्याने विचारले
"इम्तियाज"
त्याने अर्धा मिनिट फक्त स्वतःची दाढी खाजवली.
"ऐसा यहा कोई नही रहता| मै इस गाव के सरपंच का बेटा हू| सबको पहचानता हूं|"
मी थक्क! काय बोलावे काहीच कळेना
"उसको मैने फोन किया था| मै लोथल देखने आया था| उसने कहा की वो खाने का इंतजाम कर सकता है इसलिये इधर आया हूं. बस स्टॉप यही है ना?"
"हा"
"वो यही आनेवाला है"
त्याने विचारले "फोन नंबर है?"
"हा जी"
"दो मुझे"
मी फोन लावून दिला. दोघे अतिशय जलद गुजरातीत काहीतरी बोलले. एवाना मला गुजराती समजते असा गंड पुरता उतरलेला होता.
"पता नही कौन है| यहा आ रहा है देखते है"
आता मात्र मला समजेना तो इम्तियाज कोण आहे? मला का जेवायला बोलावतोय.
काही वेळातच समोरून इम्तियाज येताना दिसला. माझा सारथी ओरडला "ओ, ये तो डॉक्टर है| यहा नही रहता| जाओ उसके साथ|सेफ है!"
इम्तियाज जवळ पोचल्यावर त्यांचं पुन्हा अगम्य गुजरातीत बोलणं झालं.
वातावरणातील ताण निवळला. मला घेऊन इम्तियाज गावातील गल्ली बोळांतून घेऊन जात होता. आणि एकीकडे बडबड चालू होती.

इम्तियाज हा काही डॉक्टर नाही. कोणतातरी डिप्लोमा करून सरकारी नोकर म्हणून काम करतो. दोन गावांत दर आठवड्याचे काही दिवस जाणे. तेथील लोकांचा आढावा घेणे, मलेरियाचे डास नाही ना झाले, कुठे डबकी नाहीत ना? पोलियो डोस दिलेत ना? व झालंच तर लोकांना किडुक मिडूक सल्ले, मुलांच्या लसींचे टाईमटेबल बघणे वगैरे कामे तो करतो. गाव त्याला डॉक्टर म्हणूनच ओळखतो.

अर्थातच दर वळणावर त्याला घरांतून हाक यायची. मग त्या घरातील लोकांची चौकशी, काहीतरी वहीत लिहून घेणं, आम्हाला आत येण्याचा आग्रह, मग आम्ही ते टाळणं वगैरे आन्हिके आटपत ५ मिनिटांचा रस्ता १०-१५ मिनिटांत पार करत आम्ही गावाच्या दुसर्‍या टोकाला आलो. तिथे एक घर होतं. हा या गावचा सरपंचानंतर दोन क्रमांकाचा आहे अशी माहिती मला इम्तियाजने दिली. घरात गेलो तर चार-पाच वर्षांच्या १०-१२ लहान मुलांची झुंडच बसली होती. सगळे जण खिचडी खात होते. मला कळेचना. आता माझाही त्यांच्यात बसून खिचडी खायचा योग असण्याची मनाची तयारी करत होतो. तर इम्तियाजने अजून एक कुठलासा छोटा दरवाजा उघडला.
"अरे वो आंगणवाडी के बच्चे है. अभि खाके घर जायेंगे"

आजवर केवळ जाहिरातींत दिसणारा व रिपोर्टवर वाचला जाणार्‍या या प्रकल्पाची इतक्या अवचित ओळख होईल वाटले नव्हते. घराच्या मालकांची आमचे स्वागत केले. मग "ठंडू.. ठंडू" असा परिचित शब्द सोडल्यास काहीही न कळणारा संवाद तेथील नवरा बायकोंत झाला. इम्तियाज इतक्यात उठून बाहेर गेला. मालकीण बै माजघरात गेल्या तर मालकही "आया मै एक मिनिट" म्हणून पसार झाले.

समोरून लंगडत डोळ्यात फूल पडलेल्या एक आजीबाई आल्या. मला अगदी जवळून - ऑलमोस्ट डोळ्याला डोळा भिडवून - निरखलं. मग माझा ताबा त्या आजींनी घेतला (बघा ना आमच्या नशिबात आज्याच - इथेही - त्याला काय करणार) नी माझ्याशी गुजरातीत ते ही दात नसल्याने गोड-बोबड्या- गुजरातीत संवाद सुरू केला. आश्चर्य हे की (बहुदा त्या हळू बोलत असल्याने) मला त्या काय बोलताहेत त्याचा अंदाज येत होता. मग माझं बंबैय्या हिंदी नी त्यांचं गुजराती याची झटापट काही मिनिटं केली. इतक्यात एक २-३ वर्षांच गोड मुलगा माझ्या पायाशी आला. कारटं मोठं गोड होतं! गुबगुबीत गाल, एका गालावरच्या शेंबडावर माती चिकटलेलं, एका हातात बॉबिन, उघडबंब, दुसर्‍या हाताने बेंबीशी खेळत माझ्याकडे लुकलुकत्या डोळ्यांनी आ वासून बघत होतं. त्याला उचलून घेतले. सकाळी सुट्ट्या पैशांऐवजी मिळालेली दोन इक्लियर्स त्याच्या हातात दिली. गडी खूश. न मागता पापी दिली. माझेही गाल चिकट-मळकट झाले Wink

तोवर इम्तियाज "ठंडू" अर्थात 'थम्साप' घेऊन आला. मला जाम भूक लागली होती नी इथे यांना थ्री कोर्स लंच देण्याचे डोहाळे लागले होते. मी ते ठंडू गटागट संपवल्यावर पुन्हा लगेच जेवण नको असा फतवा मालकांनी काढला. मग जरा गप्पांचा प्रयत्न झाला. माजघरात भांड्यांचा आवाज आल्यावर मला हायसे वाटले.
जेवण आले. ८-१० फुलके आणि तेलात ऑलमोस्ट तळलेली अतीरुचकर गवारीची भाजी, ठेचायचा कांदा, तळलेली मिरची नी सोबत भरपूर छान असे ताक असा फक्कड मेन्यु होता. अजून फुलक्यांचा आग्रहही झाला. त्याऐवजी अजून थोडे ताक घेतले. जेवणानंतर पान-सुपारीचा डबा निघाला. गुजराती स्टाइलचे घरगुती पान खाल्ले. एकूणच मी इम्तियाजला कॉल करायच्या निर्णयासाठी स्वतःवरच खूश होत होतो.

त्यांनंतर तासभर भरपूर गप्पा मारल्या. पोट भरले असल्याने मला आता कितीही वेळ गप्पांना हरकत नव्हतीच. गावातील राजकारण, गुजरातमधील गावांत खरोखरच कशी २४ तास वीज आहे, इथल्या मेडिकल सुविधा इथपासून ते क्रिकेटमध्ये कोणाला खेळवले पाहिजे, भारताने पाकिस्तानच्या सीमेप्रमाणे बांगलादेश सीमेवरही कसे कुंपण घातले पाहिजे ते गावातील नसबंदी, बायकांचे प्रश्न इथपर्यंत अनेक विषयांवर भरपूर गप्पा झाला. मी केलेला पैशांचा आग्रह जोरदारपणे नाकारण्यात आला. इम्तियाजने जास्त आग्रह करू नकोस त्यांना आवडणार नाही असे सांगितल्यावर मी आग्रह केला नाही. फक्त निघताना त्यांच्या नातवाच्या हातात एक नोट बक्षीस म्हणून सरकवली Smile

मग इम्तियाजने मला जवळपासची पुरातन मंदीरे दाखवायचे ठरवले होते. मी लोथल बघायला एकटाच आलो असल्याने मला एकूणच स्थापत्यात खूप रस आणि अक्कल आहे असे त्याचे मत झाले होते. मी माझ्याबद्दलचे कोणतेही समज/गैरसमज दूर करायला सहसा जात नाही. त्यानुसार इथेही या नव्या रोलमध्ये मिळणारी माहिती, गप्पा, अटेन्शन इंजॉय करत होतो. एका बाइकला बैलगाडीसारख्या जुंपलेल्या गाडीतून आम्ही 'आर्णेज'ला निघालो. हा प्रवासही गमतीदार होता. आणखी दोन सहप्रवाशांनी माझ्याकडून एकूणच महाराष्ट्रातील सधन शेतकरी, सहकारी बँका व चळवळ याबद्दल गप्पा मारल्या. खरंतर मी फार काही बोललोच नाही, हा विषय काढून त्या निमित्ताने त्यांच्या स्थानिक नेत्यांना तोंड भरून शिव्या दिल्या.

आर्णेजचे मंदिर ठीकठाकच होते. तिथून स्टेशनवर जाईपर्यंत मी मंदिरात फार वेळ न बसल्याबद्दल इम्तियाजने आश्चर्य व्यक्त केले. मग गप्पांची गाडी आस्तिक्य-नास्तिक्य-माझे अ‍ॅग्नोस्टिक असणे यावर गेली. मग त्याने त्याच्या मुहल्ल्यात केलेले काही बदल सांगितले. एकूणच फार दिवसांनी एकदम रूट लेव्हलला जाऊन गप्पा हाकत होतो. प्रसन्न वाटत होते.

गाडी आली. इम्तियाजने त्याच्या रोजच्या परतीच्या ग्रुपसोबत ओळख करून दिली. त्यात आर्णेजच्या सरकारी शाळेचे प्रिन्सिपल "श्री पाटील" होते. मराठी बोलणारी व्यक्ती भेटल्याने ते तुडुंब खूश झाले. मग अहमदाबाद येईपर्यंत त्यांच्याशी मराठीतून गप्पा मारल्या. आम्हा दोघांचेही आवाज दणदणीत व मराठीत चालू असल्याने किमान डब्यातील अर्ध्या व्यक्ती आमचे बोलणे "बघायला" येऊन गेल्या Smile

ते दोघे उतरले. दिवसभर मला साथ देणार्‍या सूर्याला आणि त्याच्यासोबत मलाही दिवसभराच्या वणवणीनंतर घराचे वेध लागले. म्हटलं तर एक साधासाच, म्हटलं तर उनाड, म्हटलं तर दगदगीचा पण कसाही असला तरी अनुभवसंपन्न करणारा एक दिवस पूर्ण झाला!

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (6 votes)

प्रतिक्रिया

वा! भारीच आहे.

अशी एक ट्रिप मी दस्तुरखुद्द पुण्यात केली होती. त्याबद्दल लिहायची सुरसुरी आली. हाबार्स! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान लिहिलय! आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त लेख! आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथे पहिल्यांदा मला वाटले की आपण चूक करतोय का? कोण तो अनोळखी इम्तियाज, कुठल्यातरी अनोळखी गावी बोलावतो आहे नी आपणही जातो आहोत. सगळाच वेडाचार! मी माझे पाकीट चेक केले. सोबत बॅग वगैरे घेतलीच नव्हती. त्याने लुटलेच तर काहितरी जवळ असावे अशा काहिशा अजब तर्कातून काही पैसे काढून चोरखिशात ठेवले.

सदरहू सद्गृहस्थांचे नाव (उदाहरणादाखल) 'परेसभाय' असते, तर प्रतिक्रियेत कितपत फरक पडला असता, या गहन प्रश्नावर तूर्तास मनन करीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इम्तियाज किंवा परेसभाई या मुळे माझ्यापुरता तरी फरक पडला नसता.
कोणतेही नाव असते तरीही "फिअर ऑफ अननोन' म्हणा किंवा अनामिक उत्सुकता+भिती+साहसाचा कैफ तरीही धाकधुक याचे अजब रसायन त्या वेळी तयार होते. नक्की सांगता येईल का माहिती नाही पण लहानपणी काळा पहाड वगैरे वाचताना त्या डोंगरावरल्या मंदीराच्या ओझरत्या दिसलेल्या तळघरात काय असेल अशी भितीवजा उत्सुकता असायची ना? तसेच काहिसे फिलिंग आले होते. गूढ तरीही जावेसे वाटणारे.

या प्रकारच्या भितीला काही जण "नागर" भितीही म्हणतात. म्हणजे काही फायदा असल्याशिवाय मदत करेलच का कोण? अर्थात ही विचारसरणी क्षणभरच डोके वर काढते. (नी याला नागर म्हणायचेही खास असे काही कारण नाही) पण तरीही पुढे जायचे ठरवलं की आपण लै धाडसी वगैरे स्वतःलाच वाटू लागतो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुझ्या आणि इम्तियाझच्या गप्पांबद्दल विस्ताराने वाचायला आवडेल. का कुणास ठाऊक, तू नीट मन लावून लिहिले नाहीयेस असंच वाटत राहिलं! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सहमत. उद्देश तसा नसावा. पण मधे बरेच दिवस गेल्यामुळे तसं झालं असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्या गप्पांना फार सिस्टिमॅटिक फ्लो नव्हता. एकातून एक विषय फुटत होते, दोघांकडेही भरपूर वेळ होता आणि योगायोगाने बरीच माहितीसुद्धा होती.
त्याचेही हिंदी, उर्दू वाचन बरेच होते. काही शेर-शायर्‍या मुखोद्गत होते. शिवाय त्यालाही धार्मिक विषयांतही थोडी गती व कुराण व काही नामदेवांच्या अभंगांचाही मुळातून अभ्यास केलेला असल्याने फुकट हवेत गोळीबार नव्हता. तेव्हा तारा जुळून गेल्या!

गप्पाही बर्‍याच छान झाल्या. पण गप्पांबद्दल नेमके लिहिण्यासारखे खूप असले तरी मला ती शैली जमत नाही. एकतर नुसते संवाद लिहिले तर पाल्हाळीक वाटते सारांश अर्धवट वाटतो. तेव्हा त्यात फार न शिरता, त्याबद्दल टाळूनच लिहिले आहे

शिवाय मेघना म्हणते तसा बराच वेळही दरम्यान गेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक अनुभव!

अवांतर - किमान डब्यातील अर्ध्या व्यक्ती आमचे बोलणे "बघायला" येऊन गेली

नक्की कोण 'बघायला येऊन गेली? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केला हो बदल!

(सलज्ज) ऋ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोथलच्या स्ट्रक्चर्सबद्दल काहीच नाही?

तुझी पण निराशाच झालेली दिसते. खालीलसदृश चित्र तिथल्या म्युझियममध्ये सुद्धा लावलेले आहे. ते चित्र कशाच्या आधारावर काढले असावे असा प्रश्न पडतो. कारण त्याच्या जवळपास वाटेल असं तिथे काहीही दिसत नाही.

व्यवस्थापकः width="" height="" टाळावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाचा, अहो ते फक्त कल्पनाचित्र आहे. प्रत्यक्षात तो एक धक्का अन काही तंदूर वगळता तिथे काहीच उरलेले नाही असे आमचे विकीपांडित्य सांगते. पण त्या धक्क्याच्या जवळपासच्या विटांचे बरेच अवशेष बाकी आहेत. आय मीन ते चौकोनी वीटकाम दाखवलेय- तिथे जहाजे आतवर आलीत तेवढेच.

आधार म्हणजे उत्खनन. अमुक स्ट्रक्चर हे धान्यकोठार असावे, तमुक म्हणजे गोठा असावा, इ. कैक पुराव्यांनिशी सिद्ध झालेले आहे, उदा. विशिष्ट भागातील नायट्रोजन कंटेंट आसपासच्या भागापेक्षा जास्त होता, सो दॅट इम्प्लाईज़ की तिथे गुरांचे शेण वारंवार पडत असावे म्हणजेच गुरे तिथे बांधली जात असावीत इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेखाचा विषय लोथल नसून लोथलच्या "निमित्ताने" एका उनाड दिवसाचे वर्णन होते म्हणून ते जाणीवपूर्वक वगळले आहे.
बाकी त्या चित्राशी बर्‍यापैकी रिलेट करता येते. आता काही ठिकाणी पाट्याही लावल्या आहेत.

भट्ट्या, धक्का, विहिरी, साठवणूकीचे गोदाम, मसणवटा (प्रेते पुरायची जागा) या गोष्टी मुख्यत्त्वे गोष्टी बघता येतात.
घरांचे फारसे अवशेष नाहीत

निराशा वगैरे नै झाली कारण फार अपेक्षा नव्हत्याच. उलट दरम्यान उलटलेला कालखंड लक्षात घेता अपेक्षेपेक्षा बर्‍याच सुस्थितीत गोष्टी होत्या.
फक्त खूप उन होतं त्यामुळे फार काळ बागडलो नाही अर्ध्या तासात आटपतं घेतलं Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्तच लिहिलंय. आवडलंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुंदर लिहीलयं. शिर्षकातला उनाड दिवस उभा केलायत. पण खरचं म्युझियम बद्द्ल अजून काही लिहीलं असतं तर जास्त आवडलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0आवडलं.
दोन्ही भाग एकदम वाचले असता एखादी
छोटीशी रोडमुव्ही(होय,तीच ती सशक्त अभिजात विधा) पाहिल्याचा
फील येऊ लागतो.

सुट्ट्या पैशांचा अगदी गोड वापर केलात!
आपल्या चित्रपटांत परदेशी गेलेल्या कुणालाही
हिंदी बोलणारा एक माणूस हमखास भेटतो. अगम्य
गुजराती बोलणाऱ्या गुजरांच्या देशात श्री.पाटील भेटल्याचा योगायोग
गमंतीशीर वाटला.

(संजोपरावांची आठवण काढून)अजगराच्या उपमेचा वापर
अशा एकांड्या प्रवासातच शोभून दिसावा.आणि अशा प्रवासात नियतीनियमाने
डेस्टीनेशन महत्त्वाचे नसतेच,नाही का?;)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय मस्त फॉण्ट आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हां ना. कसा आणायचा हा फॉन्ट??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बहुदा त्यांनी असे केले असावे -

गुगल फॉन्टस् ड्रुपलवर चालतात, अधिक माहितीसाठी इथे पाहा.हे असं लिहिता येईल.

आधी एचटिएमएल लिंक टॅग द्यावा.

<link href='http://fonts.googleapis.com/css?family=Kalam&subset=latin,devanagari' rel='stylesheet' type='text/css'>

मग एचटिएमएल स्टाईल टॅग द्यावा.
<style>
sachin{
font-family: 'Kalam', cursive;
font-size: 48px;
}
</style>

आता नव्याने तयार केलेल्या स्टाईलमधे प्रतिसाद द्यावा.
<sachin>हे असं लिहिता येईल.</sachin>

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण हा मजकूर इंटरनेट एक्सप्लोरर ९ किंवा कमीमधे अजिबातच दिसत नाही. आय ई १०चं या टायपिंग स्क्रिप्टशी काहीतरी वाकडं असल्याने टायपिंगला तो ब्राउजरच निरुपयोगी ठरतो त्यामुळे अपग्रेड करता येत नाही.

आणि मोबाईल ब्राउझरमधे (मोबाईल क्रोम किंवा डिफॉल्ट) यामधे मजकूर नेहमीसारखाच दिसतो, फाँट दिसत नाही.

एकवेळ फाँट दिसला नाही तरी चालेल पण मजकूरच न दिसणे ही अडचण आहे. तेव्हा अधिक प्रमाणात असे फाँट बदललेले प्रतिसाद आले तर काही किंवा कदाचित आय ई वापरणार्‍या बर्‍याच लोकांना ते वाचताच येणार नाहीत असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या ब्राउजरच्या ऑप्शनमध्ये "Allow display of fonts used by websites" असे सेटिंग असेल तिथे अलाऊ असा ऑप्शन निवडायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते ठीक आहे. पण मुदलात अदरवाईज डिफॉल्ट फॉन्टमधे तरी दिसायला पाहिजे ना ? त्या ठिकाणी रिकामी चौकट दिसतेय. जणू ब्लँक प्रतिसाद असावे तसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो मला पण ब्लँक दिसत आहे. मध्ये मी अलाऊ फॉण्ट्स करून पाहिलं तेव्हा पत्रिकेवरच्या फॉण्टसारखा फॉण्ट दिसू लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुळात इंटरनेट एक्सप्लोरर वापरावाच? Wink माझ्या इंटरनेट एक्सप्लोरर ९ मधे दिसत आहे, जो मधे ब्लँक बॉक्स आहे ती रिकामी जागाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. असंच करावं.

अधिक माहिती आणि उदाहरणांसाठी इथे पाहा.

काही चांगल्या फॉण्टसची नावे :
कलम,
हिंद,
नोटो सान्स देवनागरी
लोहित देवनागरी
अक्षरयोगिनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त झालाय हा भागदेखील!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0