मेथड अ‍ॅक्ट

मूळ कथा: Method Act, Splix
स्रोत: शरलॉक, बीबीसी
०१|०२|०३|०४|०५|०६|०७|०८|०९|१०|११|१२|१३|१४|१५|१६|१७|१८|१९|२०

गोष्ट आणि वास्तव यांच्यातली देवाणघेवाण, त्यांतल्या गंमती, गुंते, गोची रंगवणारी ही महत्त्वाकांक्षी गोष्ट मला अतिशय आवडते. भाषांतरातल्या चांगल्या गोष्टींचं श्रेय मूळ लेखकाचं, चुकांच अपश्रेय माझं. दरेक प्रकरणाचं भाषांतर करायला निदान महिनाभर लागेल, याची कबुली आधीच देऊन ठेवते.

***

फ्रिक आणि फ्रॅन्क या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की एकाच व्यक्तीने घेतलेली दोन वेगवेगळी रूपे होती हे सांगता येणे अवघड आहे. काही जणांच्या मते त्या दोन निरनिराळ्या व्यक्ती होत्या हे निश्चित. एकाच वेळी त्या दोघांना निरनिराळ्या ठिकाणी पाहिल्याचे अनेक जण सांगत. पण त्यांच्या दिसण्यात लोकविलक्षण साम्य होते, हेही खरेच. काही जणांच्या मते हा जाणूनबुजून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार होता. वेष पालटून, केसांचा टोप लावून फ्रॅकचे रूप घेणार्‍या फ्रिकला त्यांनी पाहिलेही होते म्हणे. काय असायचे ते असो. जाणवत राहावे, पण बोट ठेवून सांगता येऊ नये असे काहीतरी विलक्षण साम्य फ्रिक आणि फ्रॅक यांच्यात होते, तसे ढळढळीत फरकही होते इतकेच मी ठामपणे सांगू शकेन.

- ऍन्थनी एव्हरेट, अगेन्स्ट फिक्शनल रिअलिझम

***

"ऐच्ची-" आत शिरल्या शिरल्या नाकातोंडात घुसलेला भयानक भपकारा सहन न होऊन जॉननं घाईघाईनं तोंडावर हात दाबून धरला खरा, पण त्याच्या पोटात डचमळलंच. दुपारच्या जेवणात चापलेलं पुडिंग उलटून पडतंय आता, असंही वाटलं. त्यानं कसातरी आवंढा गिळला आणि घशाशी आलेलं अन्न मागे परतवलं. "शरलॉक, काय आहे हे?"

"बॅरोट्राउमा, जॉन." टीशर्ट, पायजमा, वरून ड्रेसिंग गाऊन, त्यावर ऍप्रन आणि शिवाय डोळ्यांवर गॉगल चढवलेला शरलॉक कीचनच्या बाहेर येत उत्तरला. त्याच्या दोन्ही हातांत दोन चिमटे होते. एका चिमट्याभोवती खारवलेला ब्रेस्ट इम्प्लाण्ट किंवा मेलेल्या माशाचं डोकं यांच्या अधलंमधलं दिसणारं काहीतरी ओलं, थबथबीत गुंडाळलेलं होतं. त्यातनं कसलातरी चिकट द्राव गळत होता.

"कुणाला झाला बॅरोट्राउमा? माशाला का?" हातातली सामानाची पिशवी खाली ठेवणं, त्या थबथबलेल्या पदार्थावरची नजर कायम ठेवत प्रश्न विचारणं आणि हे दोन्ही करताना नाकातोंडावरच्या हातानं शक्य तितका वास टाळणं अशी कसरत करत जॉननं विचारलं. "काय आहे काय ते?"

"हां, हे? पॉरपॉइज आहे हा." खूश होत शरलॉक. "बरोबर ओळखलंस की!"

"मग? माझं नाक शाबूत आहे अजून. पॉरपॉइजचं काय?"

"सेटेशिअन एअर सॅकचा तुकडा आहे हा. नॅचरल हिस्ट्री म्युझियममधल्या ओडुयानं दिला! झकास आहे ना?" हातातला चिमटा उंचावत शरलॉक म्हणाला. त्या तुकड्यातून गळणारा द्राव बुळूककन्‌ ‍जमिनीवर ठिबकला.

"हा असा? असेच ठेवलेले असतात त्यांच्याकडे हे तुकडे?"

"नाही, माझ्यासाठी मुद्दाम ठेवला होता तिनं राखून. गेल्या आठवड्यात बेलिझमधे मेला तो तेलसम्राट पेत्र फ्रोलेव आठवतोय का तुला? दीर्घकाळ हालचाल न केल्यामुळे झालेली पल्मनरी एम्बोली असं त्याच्या मृत्यूचं कारण दिलं होतं वर्तमानपत्रांनी. मॉस्कोहून बेलिझला जाणारी बारा तासांची फ्लाइट होती त्याची, तेव्हा त्याची प्रकृती तशी बरी नव्हतीच. बेसुमार वजन. सिगारेटचं व्यसन. सतत दारू. साहजिकच आहे."

"मग? तुला काय म्हणायचंय? प्रेशर ड्रॉपमुळे मेला?" जॉननं भीत भीत नाकावरचा हात काढून पाहिला. आता वासाचा इतका त्रास नव्हता होत. म्हणजे? आपलं नाक बंद पडत चाललंय की काय? त्याला नेहमीसारखी काळजी चाटून गेली. ’२२१ बी’मधे हे असले वास नेहमीचेच. त्याच्या मैत्रिणी कायम येऊन नाकं मुरडायच्या. त्यातल्या त्यात साराच काय ती एक खेळकरपणे चालवून घेणारी होती. "वेगळाच आहे ना वास?" इतकंच खेळकरपणे बोलून तिनं सोडून दिलं होतं. नाहीतर आधीच्या एकेक नखरेल पोरी. असो.

"प्रेशर ड्रॉप वापरून खून! जबरदस्त आहे आयडिया!" शरलॉक त्या कल्पनेवर भलताच खूश दिसला. त्याच नादात त्याच्या नेहमीच्या स्टाइलमधे गर्रकन वळून कीचनमधे शिरला. वळताना त्याच्या हातातल्या पॉरपॉइजच्या शेंबडाचा एक निसटता फराटा जमिनीवर. तरी तंद्रीत त्याचं चालूच होतं, "वासिली. त्याचा भाऊ. त्याचंच काम असणार हे. ते बडं प्रस्थ नाही तसं. पेत्रच्या सेक्रेटरीचंच काम करायचा तो. त्याच्या मागेमागे करत फिरायचं, एवढंच काम. बोअरिंग. पेत्रची श्रीमंती सहन झाली नसणार. पेत्रच्या मृत्युपत्रात त्याचंच नाव होतं मुख्य वारस म्हणून. ते कळल्यावर त्यानं लगेच डाव साधला. बेलिझला स्कूबा डायव्हिंगला गेले होते ते. सोबत तिथलाच एक डॉक्टर मित्र. समुद्रात जवळ कुणी नाहीसं बघून या पठ्ठ्यानं संधी साधली. पेत्रची वजनं टाकली काढून."

"ओह, आलं लक्षात. वजनं काढल्यावर तो ढोल्या पाण्याच्या पृष्ठभागावर आला असणार."

"बरोबर. त्याला हवेचा बदलणारा दाब सहन झाला नाही. त्यामुळे त्याची फुफ्फुसं फुटली. पेत्र जागच्या जागी ठार. हॉस्पिटलात वासिलीनं रीतसर तमाशा केला. रडूनभेकून दाखवलं. लोक त्याला भुलले."

"पण बॅरोट्राउमा आणि एम्बोलीची लक्षणं वेगवेगळी असतात. त्यांच्या लक्षात कसं नाही आलं? ओह - ऍटोप्सी केली नसणार.” जॉनची ट्यूब एकदम पेटली.

“घ्या, मेडिकल लायसन व्हॅलिड आहे की तुझं.” हातातला तो बुळबुळीत पदार्थ समोरच्या गटाण्या सिरींजमध्ये टाकत खवचटपणे शरलॉक. “बरोबर कळलंय तुला. ऍटोप्सी केलेली नाही. त्याहून गंमतीशीर गोष्ट म्हणजे पेत्र मेल्याची खातरजमा करणारा त्याचा तो डॉक्टर मित्र, तो गायब झालाय. आजारपणाच्या रजेवर आहे म्हणे.”

“पैसा चारला त्याला.” एकीकडे जॉननं आणलेलं सामान आवरायला घेतलं. दूध आणि चीज फ्रीजमधे टाकलं.

“किंवा मारून फेकलाही असेल त्याला. पेत्रचीच वजनं बांधून दिला असेल ढकलून पाण्यात.” बोलता बोलता शरलॉकनं सिरींज बंद केली.

उरलेलं सामान ओट्यावर ठेवून जॉन टेबलाशी बसला. आता त्याला वास जाणवतही नव्हता. जॉननं हे कदापि कबूल केलं नसतं, पण शरलॉकला असं कामात बुडून गेलेलं बघताना त्याला जाम आवडायचं. अशा वेळी शरलॉक कसा उत्साहानं रसरसलेला असे. त्याचे डोळे चमकत. पाय एका जागी ठरत नसे. आपल्या उत्साहाच्या वावटळीत बघता बघता तो जॉनलाही कधी खेचून घेई, ते जॉनलाही कळत नसे. सर्वसामान्य लोकांना त्यातली मजा कळणं अवघड, पण आपल्याच धुंदीत असणार्‍या अशा जगावेगळ्या माणसासोबत असण्यात जी मजा होती, ती जॉन पुरेपूर जाणून होता. बरं, शरलॉक हा वेगळेपणा मिरवणार्‍यांपैकीही नव्हता. तसं काही करण्याची नुसती कल्पनाही त्यानं सहज उडवून लावली असती.

हुह, परत तेच.

आपण शरलॉककडे बराच वेळ रोखून बघतोय हे लक्षात आल्यावर जॉननं घाईघाईनं नजर वळवली. उगाच टेबलावर ताल धरला आणि टेबलावरचा सर्दाळलेला पेपर चाळायला घेतला. थोडा वेळ उगाच ’लाईफ सेक्शन’ वाचायचा प्रयत्न केला. पण त्याचं लक्ष त्यात नव्हतं. ’हल्ली हे असं शरलॉककडे बघत राहणं वाढलंय आपलं...’ हेच डोक्यात चालू. अजून हे शरलॉकच्या लक्षात आलं नव्हतं, हे एक नशीबच. त्याला इतर लोक, जवळीक, नाती... असल्या गोष्टींचा वाराही लागत नसे, हे एक बरं होतं.

“त्या सिरिंजवर खुणा कसल्या?” उगाच आपलं काहीतरी विचारायचं म्हणून जॉननं विचारलं.

“ऑब्वियस. बॉयलचा लॉ, जॉन.” चिमटा घेऊन ओट्यावर ठेवत शरलॉक फिस्कारला. “पण- त्याच्याआधी मला-“ असं म्हणत त्यानं हॉटप्लेटचा प्लग सॉकेटमध्ये घालायला उचलला.

“त्याला हात नको ला-“ हातातला पेपर टाकत शरलॉकला थांबवायला जॉन उठलाच, पण तोवर शरलॉक कुठला ऐकायला? त्यानं ती सोललेली वायर बिघडलेल्या सॉकेटमध्ये घातली (काल मिसेस हडसननी त्याला चांगली टेप गुंडाळून ठेवलेली जॉनला पक्की आठवतेय. पण शरलॉकनंच ती वायर सोलून ठेवली होती. याची अक्कल कुठे झक मारायला जाते...) आणि शॉर्ट सर्किट झालं. शरलॉकला चांगलाच शॉक बसला असणार. कारण तो हॉटप्लेटच्या वायरसकट धाडदिशी मागे फेकला गेला.

धडपडत उठताना जॉनची खुर्ची मागे पडली. कसंबसं उठत त्यानं उताण्या पडलेल्या शरलॉकच्या जवळच्या खुर्च्या मागे सरकवल्या आणि ओट्यावरचा एक लाकडी चमचा घेऊन शरलॉकच्या हातातला चिमटा आधी खेचून काढला. तो चिमटा तापून शरलॉकला नक्की भाजलं असणार. जॉनला जरा आश्चर्यच वाटलं. इतका जोराचा शॉक बसूनही चिमट्यानं काहीच झालं नव्हतं. ’असं कसं झालं बुवा?’ असा विचार जॉनच्या डॉक्टरी मेंदूत चमकून गेला, नाही असं नाही, पण आत्ता शरलॉकला कितपत लागलंय ते आधी बघणं महत्त्वाचं होतं. “शरलॉक,” शरलॉकच्या मानेवर बोटं टेकून त्याचे ठोके तपासत जॉननं त्याला उठवायचा प्रयत्न केला. “शरलॉक, ऐकू येतंय का तुला? शरलॉक?”

***

“मिस्टर कंबरबॅच...” ही प्रॉडक्शन असिस्टंट नवीनच होती. फिल्म स्कूलमधलं नवखेपण तिच्या चेहर्‍यावर अजूनही स्पष्ट दिसत होतं. शिवाय आजूबाजूला वावरणार्‍या स्टार्सचीही तिला अजून तितकीशी सवय नसावी. काहीसं अवघडून खाकरत तिनं पुन्हा हाक मारली, “अं... मिस्टर कंबरबॅच, तुमचं झालंय असं म्हणाले ते. इथे सही करता का जरा?”

“दे ना. आणि प्लीज- ’मिस्टर कंबरबॅच’ वगैरे नको. नुसतं ’बेनेडिक्ट’ चालेल गं.” सफाईदारपणे पेन काढत बेनेडिक्टनं तिच्या हातातल्या पॅडवर सही केली.

“अं... ओके, बेनेडिक्ट.” संकोचत तिनं तिचं पॅड ताब्यात घेतलं. या पीएचं नाव निना होतं बहुतेक. हो, निनाच. हेअरबॅंडनं आवरलेले तिचे भुरे-सोनेरी केस खरंच खूप सुंदर होते. त्या केसांमुळे तिचा चेहरा उजळून निघाल्यासारखा दिसे. ते नीट ठाऊक असल्यासारखी तिनं अलगद एक बट कानामागे सारली.

“किती सुरेख आहेत गं तुझे केस!” दोनेक वर्षांपूर्वी बेनेडिक्टनं अशी दाद देताना सहज तिच्या केसांची बट हातात घेतली असती. पण आता नाही. आता त्यानं तिला नुसतं गोड हसून दाखवलं.

“ओह माय गॉड! थँक्यू!” पॅड छातीशी धरून निना तिथून जवळजवळ पळालीच. मग पुन्हा ऍण्ड्र्यूपाशी जाऊन पुन्हा तसंच लाजत-अवघडत, भारावलेल्या नजरेनं बघत सहीसाठी पॅड पुढे करणं. बेनेडिक्ट तिच्याकडे बघत राहिला.

हसू दाबत त्यानं मस्तपैकी आळस दिला. गेले दोन तास चेहरा कोरा ठेवून आणि एकाच जागी बूड चिकटवून अंग पार अवघडून गेलं होतं. त्याचा नि ऍण्ड्र्यूचा तो सीन दुपारपासून चालला होता. सुमारे दोनेक डझन तरी सफरचंदं खाल्ली असतील. आणि चहाचे तर किती कप ढोसले कुणास ठाऊक. आता त्याला डचमळत होतं. कपडे बदलायचे, मेकप काढायचा, धार मारून यायचं. मग एखादी बीअर. काहीतरी चांगलंसं खायचं. मग एक सिगरेट. खरं तर सिगरेट आधी चालेल...

तिथल्या टेप लावलेल्या वायरींच्या जंजाळातून वाट काढत त्यानं ऍण्ड्र्यूला खूण केली. “जेवायला येतोस? मी मरतोय भुकेनं.”

ऍण्ड्र्यूचे डोळे लकाकले. “चिप्स?”

“ब्रोकोली राब?”

“यक्स. खा लेका. मला कुठे तुझ्या तोंडात तोंड घालायचंय? थांबतोस बाहेर? आलोच. वीसेक मिनिटं.”

“पंधरा मिनिटं.” तिथल्या वाळूच्या पोत्यांना वळसा घालत बेनेडिक्टनं बॅकस्टेजवाल्या दोन पोरांनाही ’येतो, थॅंक्स’ म्हटलं. पुढच्या आठवड्यात भेटायचा वायदा केला. तेवढ्यात निना दिसली, तिला थांबवून विचारलं, “निना, मार्टिन गेला का गं?”

“साडेनऊला चाललाय.”

“ओके. थॅंक्स. गुड नाईट.” त्यानं निघता निघता सवयीनं खिशातला फोन चाचपला. नेहमी असतो खरा त्याच्या खिशातच. पण इतका वेळ बसायचं, म्हणून आज नव्हता. इतक्या तंग कपड्यांत तो उठून दिसला असता तसाही. म्हणजे गाडीत असणार.

“तुझा बूट बघ.... पडशील.” लाजत निनानं त्याचं बुटाच्या सुटलेल्या लेसकडे लक्ष वेधलं.

“ओह, थॅंक्स.” पेन तोंडात खुपसत बेनेडिक्ट लेस बांधायला वाकला, तर त्याला एकदम गरगरल्यासारखं झालं. गॉड, जामच भूक लागलीय की. खड्ड्यात गेला ब्रोकोली राब. चिप्स खावेत नि वीकेण्डला पूलवर दोन फेर्‍या जास्त मारून जिरवावेत. काय नाय होत.

पण उठता उठता त्याचा तोल गेला. आधाराला म्हणून त्यानं शेजारच्या डळमळत्या सी-स्टॅण्डला हात घातला, तर तोही पडला. काही कळायच्या आत बेनेडिक्टनं वायरींचा एक जुडगा धरला. गुंडाळलेल्या टेपचा स्पर्श होऊन तो हात मागे घेणार, तितक्यात त्याला एक जोरदार झटका बसला आणि मग डोळ्यांपुढे अंधारी आली.

***

बेनेडिक्टनं सावकाश चेहर्‍यावरचा हात काढला. डोळे उघडले आणि भगभगीत प्रकाश सहन न होऊन परत गपकन मिटून घेतले. कसेबसे डोळे किलकिले करून त्यानं आजूबाजूला पाहिलं. देवा, काय प्रकाश म्हणायचा का काय हा? फुटबॉलच्या मैदानात लावलेल्या हॅलोजन्ससारखा, डोळे दिपवणारा, प्रखर प्रकाश. दोनेक मीटरवर माणसाच्या आकाराची एक धुसर आकृती बसलेली. डोळे चोळत त्यानं "कोण आहे?" असं विचारून पाहिलं. उत्तर मिळालं नाही. त्यात तो भयानक उजेड. सहन न होऊन बेनेडिक्टनं गुडघे पोटाशी घेतले नि पॅण्टच्या काळ्या रंगाकडेच बघत तो पुटपुटला, "गंमत वाटली की काय तुम्हांला?" मग त्यानं परत समोरच्या त्या आकृतीकडे पाहिलं नि तो एकदम दचकला.

"होली फक!"

समोरचा माणूस अगदी बेनेडिक्टसारखाच दिसत होता. हुबेहूब. आपटल्यामुळे आपल्या डोक्यावर परिणाम तर नसेल ना झाला? भास होतायत आपल्याला? बेनेडिक्टला कळेना. कारण त्याचा आवाजही हुबेहूब बेनेडिक्टसारखाच होता. कुठून आणला त्यांनी हा तोतया? इतकं साम्य?

त्या माणसानं बेनेडिक्टनं ’ग्रेट गेम’मध्ये घातलेला पायजमा आणि वरून प्लॅस्टीकचा एक ऍप्रन घातला होता. शेजारी पडलेला एक गॉगल. जमीन पांढरीशुभ्र. भिंतीही. “कुठे आहोत आपण? सेट नक्की नाही हा.” बेनेडिक्टला काही झेपेना.

“’२२१ बी’पण नाही हे.” तो माणूस म्हणाला.

“माय गॉड! तुझा आवाजपण माझ्यासारखा आहे. मी झोपेत असताना माझा क्लोनबीन केला की काय ह्यांनी, आं?” किती हुबेहूब चेहरा! बेनेडिक्टची नजर हटेना.

“मानवी क्लोनिंग करणं वैद्यकशास्त्राला अजूनही शक्य झालेलं नाही. ’बॉइज फ्रॉम ब्राझिल’वाले काहीही बरळू देत, ते त्यांना तेव्हाही जमलेलं नव्हतं.”

मरो. ते महत्त्वाचं नाही. बेनेडिक्टनं डोकं शांत ठेवत विचारलं, “ओके. ओके. काय चाललंय हे?
बाकीचे सगळे कुठेयत? इथे इतका उजेड कसला आहे?” पण बोलता बोलता भांबावून तो इकडेतिकडे बघत राहिला. खरंच, कुठे होते ते? एखाद्या पांढर्‍याशुभ्र खोक्यासारखी होती ती खोली. दारं नाहीत, खिडक्या नाहीत. पांढर्‍याफटक भिंतींना अंधाराची एक चुणीही नाही. परत तो खाली बसलेल्या त्या माणसाकडे वळला. तो माणूस अनवाणीच बसला होता. त्याची पावलंसुद्धा बेनेडिक्टसारखी होती. “कोण आहेस तू? कुठून पकडून आणलं ह्यांनी तुला?”

त्या माणसानं एक भिवई उंचावत बेनेडिक्टकडे पाहिलं. ही लकब इतकी ओळखीची का वाटतेय?

“शरलॉक होम्स. तू? तुझं नाव काय?”

आता बेनेडिक्ट भडकला. “फालतूपणा बास झाला.” रागारागानं त्यानं त्या खोलीत येरझारा घालायला सुरुवात केली. “किती वेळ बेशुद्ध होतो मी?”

“तीन मिनिटं. थोडी सेकंदं मागेपुढे. मीपण आत्ताच शुद्धीवर आलो. इलेक्ट्रिक शॉक.” खांदे उडवत त्या माणसानं स्वत:चे हात नीट निरखून बघितले. “भाजले नाहीत पण हात. इंट्रेस्टिंग.”

“नि आपण आलो कसे इथे?”

“तीन-चार कारणं सुचताहेत मला. खरं म्हणजे पाच.”

आळस देत तो माणूस उठला नि बेनेडिक्ट बघतच राहिला. आपण आरशात बघत असताना, आरशातल्या आपल्या प्रतिबिंबानं मात्र एकदम वेगळ्याच हालचाली करायला लागाव्यात तसं काहीतरी विचित्र त्याला वाटायला लागलं. बेनेडिक्टनं रंगवलेल्या शरलॉकची नक्कल हा माणूस इतकी हुबेहूब करत होता, की बेनेडिक्टला एकाएकी भीती वाटायला लागली.

“हे बघ, तू आता बेअरिंग सोडलंस तरी चालेल. डिटेलिंगवर खूप काम केलेलं आहेस तू. पण आता पुरे. कळलं मला.” त्याचे केस, डोळे, दातसुद्धा अगदी बेनेडिक्टसारखे होते. हे अतीच झालं. अती झाल्यावर येतं तसं त्याला वेडगळ हसू यायला लागलं. “हे जरा अजबच आहे हां पण! जत्रेत हरवलेला जुळा भाऊबिऊ सापडल्यासारखं वाटतंय मला.”

“मला-जुळा-भाऊ-नाही.” एखाद्या बथ्थड माणसाला काहीतरी सहनशीलपणे समजावून सांगावं तसा तो माणूस म्हणाला. “मला भाऊ आहेत. पण सुदैवानं मी-त्यांच्यासारखा-दिसत-नाही.” आणि प्रयासानं शांत राहिल्यासारखा तो भिंतीला टेकला.

आता बेनेडिक्टला घाम फुटला. काय करावं ते न सुचून त्यानं त्या थंडगार पांढर्‍याफटक भिंतीवर डोकं टेकलं. “कोंडलं जाणं झेपत नाही मला.” तो स्वत:शीच पुटपुटला. मग त्यानं त्या भिंतीवर थडाथड बुक्के मारायला सुरुवात केली. “मार्क? सू? आहे का कुणी?” कसलाच आवाज येईना. तशी त्यानं दुप्पट जोरानं हाणायला सुरुवात केली. “डॅनी? मेलात का सगळेच्या सगळे?”

“तू ज्यांना हाका मारतो आहेस, त्यांना काहीही ऐकू जात नाही असं दिसतं.”

भडकून बेनेडिक्ट गर्रकन वळला. “हे काय चाललंय? आं? काय चाललंय हे? कोण आहेस तू? तू…” बोलता बोलता त्याचं तोतयाच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं. पुढे होत त्यानं त्या माणसाचे डोळे निरखून पाहिले.

तो माणूस निर्विकारपणे नजरेला नजर देत राहिला.

त्याच्या उजव्या बुबुळाखाली लहानसा तपकिरी ठिपका होता, बेनेडिक्टसारखाच. नीट निरखून पाहिलं, तर लेन्सेसची काहीतरी खूण दिसेल, म्हणून बेनेडिक्ट वेड्यासारखा डोळे तपासत राहिला. पण अहं. कसलीही खूण नाही.

थेट त्याच्यासारखे - त्याचेच - डोळे.

धसकून तो मागे हेलपाटला. “जीझस. जीझस ख्राइस्ट!” पोटात कुणीतरी गपकन गुद्दा मारावा आणि श्वासच घेता येऊ नये, तसं त्याला व्हायला लागलं.

“सावकाश. सावकाश. श्वास घे. दीर्घ श्वास घे. काहीतरी होईल तुला.” तो माणूस शांतपणे म्हणाला.

धापा टाकत बेनेडिक्टनं कशीबशी बसकण मारली आणि गुडघ्यात डोकं घातलं. डोकंच आपटलं असणार कुठेतरी वेडंवाकडं. त्याशिवाय असं कसं होईल?

डोळ्यांसमोर कुणीतरी काहीतरी नाचवत होतं, म्हणून त्यानं वर पाहिलं, तर तो माणूस सिगरेटचं पाकीट हलवत होता.

“घे.”

“सोडतोय मी.” कसाबसा बेनेडिक्ट उत्तरला खरा. पण त्याचे हात शिवशिवले. एखादी सिगरेट चालेल, असं त्यानं आजच नव्हतं का म्हटलं? समोरचं आख्खं पाकीट घेऊन तोंडात खुपसावं आणि भकाभका ओढावं असा मोह त्याला एकदम झाला. हात थरथरत होते. त्यानं कशीबशी एक सिगरेट काढून घेतली नि बावचळून लायटरसाठी इकडेतिकडे पाहिलं.

“थांब. आग लावशील कुठेतरी, मी पेटवतो.” हसत त्या माणसानं बेनेडिक्टची सिगरेट शिलगावली.

त्याचे हात - त्याचे हातही-

बास. बास.

सिगरेटचा एक खोल झुरका घसा जाळत गेला, तेव्हा कुठे बेनेडिक्टला जरा शांत वाटलं. हाताचं कापरं थांबलं. धीर करून त्यानं त्या माणसाकडे परत एकदा निरखून पाहिलं. “खरंच, कोण आहेस तू?”

“मला परत परत तेच तेच सांगायला आवडत नाही.”

“अच्छा, म्हणजे तुझं नाव शरलॉक आहे तर!” बेनेडिक्ट तिरसटून म्हणाला. याच्या तर-

“हं…” सुस्कारत त्या माणसानं सहनशीलपणाचा आव आणून उत्तर दिलं. “हे बघ, तू कोण आहेस हे मला माहीत नाही. मला त्यानं काही फरकही पडत नाही. काळाचा किंवा अवकाशाचा काहीतरी घोटाळा झालेला आहे. कसा काय ते मला अजून कळलेलं नाही. पण त्यामुळेच आपण दोघं इथे अडकलो आहोत असं दिसतं.”

“घोटाळा?” बेनेडिक्टचा धीर सुटून तो ताडकन उठला नि त्यानं येरझारा घालायला सुरुवात केली. “घोटाळा म्हणजे? तू चुकून आला असणार इथे. दुसर्‍या कुठल्या सेटवर जायचं होतं का तुला? तसाच काहीतरी घोटाळा असणार.”

पण त्या माणसानं बेनेडिक्टच्या बडबडीकडे दुर्लक्ष करत पुढे बोलायला सुरुवात केली, “हुबेहूब माझ्या डोळ्यातल्यासारखा ठिपका. तेच दात, तेच नाक, तस्सेच हात. आपल्या केसांची वाढही एकसारखीच आहे. मी एरवी पैजाबिजा लावत नाही. पण इथे हरकत नाही. तुला जुळा भाऊ वगैरे नसेलच. आहे का?”

“न- नाही. जुळा भाऊ…. नाही, एकटाच आहे मी...”

नक्की ना? की जत्रेबित्रेत हरवलेला एखादा जुळा भाऊ... की आईबापानं लपवून वगैरे ठेवलंय आपल्यापासून? ’मॅन इन दी आयर्न मास्क’सारखं काहीतरी आचरट कारण?

बास. लागतोय तेवढा शॉट पुरे आहे. अजून हे नको.

“हे बघ, मलाही कारण नीटसं उलगडलेलं नाही, कबूल आहे.” बोलता बोलता त्या माणसानंही एक सिगारेट शिलगावली. मग तो मनापासून सिगरेटचा धूर छातीत भरून घेत राहिला. मग आजूबाजूच्या पांढर्‍याशुभ्र भिंती न्याहाळत पुढे म्हणाला, “काहीच डेटा नाही. कसला पुरावा नाही... फक्त तुलाही शॉक बसला असावा, इतकंच काय ते स्पष्ट दिसतंय.”

“राइट.” बेनेडिक्ट एकदम आठवून भानावर आला. “मी पेन तोंडात खुपसून बुटाची लेस बांधायला वाकलो… उठताना तोल गेला म्हणून ती वायर धरली, तेव्हाच - त्या शॉकमुळे भास होत असेल का रे मला?”

स्वत:ला शरलॉक म्हणवणार्‍या त्या माणसानं काहीच न बोलता बेनेडिक्टला एक जोरदार चिमटा काढला फक्त.

“ओऽऽय! अरे ए!”

“आहे? भास आहे?” शांतपणे झुरका घेत तो माणूस. “समांतर विश्व सिद्धान्ताबद्दल ऐकलं आहेस का कधी?”

“समांतर काय? म्हणजे ते - एकाच वेळी… तसंच दुसरं जग वगैरे... कशात तरी वाचलंय… चल! पण ते गोष्टीत. खरं कसं असेल ते?”

“अच्छा, म्हणजे हुबेहूब स्वत:सारख्या दिसणार्‍या माणसाशी गप्पा मारतो आहोत आपण, ते स्वीकारायची तयारी आहे तुझी. पण भौतिकशास्त्र आणि वैश्विक विज्ञान मात्र थोतांड आहे, अं?” खवचटपणे त्या माणसानं विचारलं.

“पण तुला कसं माहीत असेल त्याबद्दल?” कसल्यातरी खातरीनं बेनेडिक्ट.

आता कुठे त्या माणसानं बेनेडिक्टकडे निरखून पाहिलं. “मला माहीत असेल की नाही, याच्याशी तुझा काय संबंध?”

“माझा नाही तर कुणाचा संबंध? मला माहितीय ना, शरलॉक होम्सला विश्व आणि त्याची उपपत्ती यांच्याबद्दल काहीही माहीत नाही. मी नाही तर कोण सांगणार?” आता बेनेडिक्ट खरंच भडकला होता.

“म्हणजे मी कोण आहे हे तुला माहीत आहे तर!” तो माणूस उलट खूश होत म्हणाला.

“मला नाही तर - मी - आम्ही बनवलीय रे बाबा ’शरलॉक’ बीबीसीसाठी! डॉयलची ओरिजनल गोष्ट आहे ती, असं काय करतोस? तुला माहीत नाही का?” आता बेनेडिक्टला गरगरायला लागलं होतं. पोटात काही नाहीय, त्याचाच परिणाम हा. निदान काहीतरी प्यायला तरी पाहिजे. प्यायल्यावर बरं वाटेल. बहुतेक.

“शक्यच नाही.”

“शक्यच नाही म्हणजे? गप्प बस, प्लीज गप्प बस.” थकून बेनेडिक्ट भिंतीला टेकला. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास घेतला पाहिजे. शॉक बसलाय, त्यामुळे हे असं होतंय. डोकंबिकं फिरलेलं नाहीय आपलं. नाही ना फिरलेलं?

“तू माझ्यासारखा दिसतो आहेस. तुझा आवाज माझ्यासारखाच आहे. तुझे कपडेही माझ्यासारखे आहेत. पण तू ’मी’ नव्हेस. म्हणजे तू नक्कीच नट असणार. सर्वसाधारण माणसं फासतात, त्याहून बराच रंग फासलेला आहे तुझ्या तोंडाला. तो फासूनही बराच वेळ झाला असणार, कारण तो बराचसा ओघळलाय. पण परत टच अप केलेला दिसत नाही, म्हणजे तुझं काम संपत आलेलं असणार. तुझे केस मुळात इतके काळेभोर नाहीत. मुळांशी लालसर रंग स्पष्ट दिसतो आहे. मधूनमधून पिकलेले केसही आहेत. म्हणजे केस रंगवून बरेच दिवस झाले असणार, पण लावणार्‍यानं डोकं वापरलं आहे. मूळचा रंग दिसू नये अशा प्रकारे केसाचं वळण फिरवलं आहे. सूट फारच घट्ट आहे. पॅण्टीची शिवणही उसवून परत घातलेली दिसतेय. ही नंतर तुझ्या मापाची करून घेतलेली पॅण्ट असणार. भारीतलं कापड आहे, पण म्हणून शिवण लपते थोडीच? हातानं फोन चाचपडतो आहेस सतत, म्हणजे सूट तुझा स्वत:चा असणं शक्य नाही. नाहीतर तुझा मोबाइल नक्की खिशात असला असता. या पॅण्टच्या खिशात काही मावणं शक्यच नाही. पण तरी तू सवयीनं चाचपडतो आहेस. म्हणजे तुझ्याकडे असले आणखी सूट असणार. पण हा सूट मात्र तुझा नाही. तुझ्या हाताला हलकं कापरं भरलंय. बोटं पिवळी पडलेली आहेत. दातही. दात काळजीपूर्वक स्वच्छ करून घेतलेले दिसताहेत. पण तरी खुणा लपत नाहीत. हिरड्या बघ कशा लालबुंद झाल्या आहेत, जोरजोरात घासल्यामुळे बहुतेक. नट असून सिगरेटनं पिवळे पडलेले दात? हा! कुणीतरी सिगरेट सोडण्यावरून खूप ऐकवलं असणार तुला. नि किती लोकांना हाका मारल्यास तू? कायम छप्पन्न लोकांना आपल्या तालावर नाचवायची सवय असणार तुला. म्हणजे नक्की नाटकधंद्यातला माणूस. वायरला हात लागून शॉक बसल्याचं तू स्वत:च सांगितलंस. पण हातावर भाजल्याच्या खुणा नाहीत. बोलू पुढे?”

“यात काय मोठंसं? शो पाहणारा कुणीही सांगेल हे. हेच तर करतो ना आम्ही!” तिरसटपणे बेनेडिक्ट. काहीही झालेलं नाही, घाबरायचं कारण नाही, असा धीर स्वत:लाच दिल्यासारखा तो पुढे म्हणाला, “तू गोष्टीतलं एक पात्र आहेस. मला फक्त भास होतायत. तू तुझी ती डिडक्शन्स वगैरे कर नि इथून बाहेर निघायचं बघ लवकर. नि जरा शांतपणे. फार बडबड नको. मी विचार करायचा प्रयत्न करतोय, ओके?”

त्यावर तो माणूस खवचटपणे फक्त हसला. “ते मरू दे. टॉम कोण?”

“क्काय?” बेनेडिक्टचं डोकं सणकलं. तो त्या माणसाच्या अंगावर धावून जायला उठलाच. तितक्यात प्रकाश एकदम उजळल्यासारखा झाला नि त्याचे डोळे एकदम दिपले. कसेबसे डोळे झाकत तो खाली कोसळला.

***

तो जागा झाला तेव्हा कुणीतरी त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवत होतं. कुणीतरी हातही धरला होता. त्याचा जीव एकदम भांड्यात पडला. आता कुणीतरी हॉस्पिटलात नेईल. सिटी स्कॅन, एमाराय… काही ना काही उपचार होतील नि मग आपल्याला बरं वाटेल. सुटलो बुवा...

तेवढ्यात कुणीतरी बोललं, “शरलॉक? शरलॉक? बरं वाटतंय का आता?”

***

क्रमश:

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

मस्त!
इंटरेस्टिंग आहे! आणि पुढचे १९ भाग लवकर टाक Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळेअभावी पूर्ण वाचलं नाही पण हे असं काही येतंय या आनंदातच हा प्रतिसाद देतोय!
तुला सगळे २० भाग भाषांतर केल्यास माझ्याकडून एक भोजन पार्टि लागू.

आता वाचतो पुढे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मेघना, सहीच.
पुढ्चा भाग लवकर टाक .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच... वाट पाहातेय पुढच्या भागांची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

कल्ला माल आहे. मज्जा आली वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थिजल्यासारखं वाचून काढलं.. तुफान आहे!
पुढिल भागाचं लवकर जमवच! पण इतकी उत्कंठा मोकळी व्हायला २० भाग लागणार याचं अपार दु:ख होतंय! Sad

====

छिद्रान्वेष:


पेत्रची वजनं टाकली कापून


स्कुबा डायविंगची वजनं अशी कापता येत नाहीत. ती बेल्टला असणार्‍या कप्प्यात असतात. ती काढून टाकली असा बदल करावा असे सुचवतो


वजनं कापल्यावर तो ढोल्या, बुचासारखा उसळी मारून फाटदिशी पाण्याच्या पृष्ठभागावर आला असणार."
"बरोबर. हवेचा दाब झटक्यासरशी बदलला. त्यामुळे त्याची फुफ्फुसं फुटली. पेत्र जागच्या जागी ठार. हॉस्पिटलात वासिलीनं रीतसर तमाशा केला. रडूनभेकून दाखवलं. लोक त्याला भुलले

हे हे पुन्हा कमी माहितीच्या आधारावर वा अंदाजपंचे केलेले विधान आहे. वजन काढल्यावर बुचासारखा कोणीही वर येत नाही. वर वर सरकु लागतो पण वेग नियंत्रीत करायला स्कुबा डायवर्सकडे इतरही मार्ग असतात.

शिवाय वेगात वर आलंच तर फुफ्फुसांच्य्या आधी कानाचे पडदे फाटतील व रक्तातला नायट्रोजन कमी न झाल्याने वेड लागेल असे आम्हाला शिकवले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कमेंटींबद्दल आभार. मूळच्या गोष्टीतल्याप्रमाणे भाषांतर केलं आहे. पण आता तज्ज्ञांच्या मतानुसार बदल करून संध्याकाळपर्यंत भाषांतरात टाकून देते. बदल केले आहेत. (हे असं फॅनफिकमध्ये केलेलं चालतं. असलं सुचवल्याबद्दल मूळ लेखकही मला नि तज्ज्ञांना दुवाच देईल, हीच फॅनडममधली सगळ्यात भारी गोष्ट आहे.)

गोष्टीतला हा भाग काहीच नाही, असे अनेक इंट्रेष्टिंग भाग पुढे आहेत. इन्सेस्ट चपखल आणि विश्वासार्ह पद्धतीनं वापरणे, फार भावनाशील न होता गोष्टीत ताण कायम ठेवणे, योग्य ठिकाणी संपवणे, नेहमीच्या फॅनफिकमधला शरीरसंबंधांचा भाग बराच कमी आणि वास्तववादी असणे, आणि प्रयोग करणे... वगैरे. पण हे वेळखाऊ काम आहे मात्र. होईल पुरं तेव्हा होईल. माझा रस कायम राहू दे, हीच प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आमेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जबरदस्त आहे हे!!
मस्त जमलय भाषांतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0