अडगळीत गेलेल्या वस्तु आणि शब्द.

काळ पुढे जातो आणि नवनवीन संशोधनामधून नवनवीन चिजा बाजारात आणि वापरात येऊ लागतात. वागण्या-बोलण्याच्या रीती बदलतात. त्याबरोबरच जुन्या गोष्टी आणि शब्द अडगळीत आणि विस्मरणात जाऊन पडू लागतात. अशा चीजा, कल्पना, शब्द अशांची जर जंत्री केली तर ते मोठे मनोरंजक ठरेल. अशी जंत्री किती लांबेल आणि त्यामध्ये किती प्रकार आणि उपप्रकार असतील ह्याला काही मर्यादा नाही आणि कल्पक वाचक त्या जंत्रीमध्ये मोलाची भरहि घालू शकतील.

ह्या जंत्रीचा प्रारंभ म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये अदृश्य होऊ लागलेल्या काही गोष्टी मला सुचतात तशा लिहितो. (काहीजण मराठी भाषेचा येथे पहिल्याप्रथम उल्लेख व्हावा असे म्हणतील, पण मी इतक्या टोकाला जात नाही!) ही यादी मुख्यत: शहरी आयुष्याशी संबंधित आहेत कारण मला स्वत:ला तेच आयुष्य़ माहीत आहे.

गट १ वापरातील यान्त्रिक वस्तु - जुन्या प्रकारचे घडी घालून खिशामध्ये ठेवण्याचे सेलफोन्स, रोटरी फोन, प्रॉपेलरवर उडणारी प्रवासी विमाने, कोळशाच्या इंजिनांच्या आगगाडया, किल्ली द्यायला लागणारी गजराची घडयाळे, हाताच्या हालचालीवर चालणारी बिनकिल्ली-बॅटरीची घडयाळे, कोळशाच्या इस्त्र्या, कटथ्रोट वस्तरे, जिलेटसारखी ब्लेडस आणि ती घालण्याची खोरी, दाढीचा केकस्वरूपातील साबण आणि ब्रश.

गट २ वापरातील घरगुती वस्तु - स्वयंपाकघरातील अनेक भांडी (तांबे-पितळ्याची भांडी, वाटी, गडू, फुलपात्र, तांब्या, प्रवासासाठी फिरकीचा तांब्या, घागर, गुंड, आंघोळीचा बंब, तामली, सट, सतेले, ओघराळे, कावळा, बसायचे फुल्यांचे पाट, चौरंग, पूजेच्या वस्तु (पळी, ताम्हन, अडणीवरचा शंख, सहाण आणि गंधाचे खोड, रक्तचंदनाचे खोड, गंगेच्या पाण्याचे भांडे, पंचामृतस्नानाचे पंचपाळे, मुकटा.)

गट ३ कपडे - पुरुषांचे लंगोट आणि बायकांच्या बॉडया - झंपर, कोपर्‍या-अंगरखे-टापश्या-पगडया अशी वस्त्रे, बायकांच्या नायलॉन साडया आणि पुरुषांच्य़ा टेरिलिन पॅंटी, बुशकोट, सफारी, नऊवारी लुगडी आणि करवती धोतरे, अंग पुसण्याचे पंचे, मुलींची परकर-पोलकी.

गट ४ सामाजिक आचार - 'ती.बाबांचे चरणी बालके xxx चे कृ.सा.न.वि.वि' असले मायने आणि एकुणातच पोस्टाने पाठवायची पत्रे, तारा, 'गं.भा., वे.शा.सं.. ह.भ.प., चि.सौ.कां., रा.रा.' असले पत्रांमधले नावामागचे उल्लेख, 'लिप्ताचा स्वैपाक, धान्यफराळ, ऋषीचा स्वैपाक, निरसे दूध, अदमुरे दही, तीसतीन ब्राह्मण, अय्या-इश्श' अशा प्रकारचे विशेषतः बायकांच्या तोंडातील शब्द. जुन्या लग्नपत्रिका (सौ.बाईसाहेब ह्यांस असे डाव्या बाजूचे बायकांचे निमंत्रण, लेकीसुनांसह), शरीरसंबंध, चि.सौ.कां. इत्यादि, पानसुपारीचे समारंभ, सवाष्ण, मुंजा मुलगा जेवण्यास बोलावणे, गणपतीमध्ये आवाज चढवून म्हणायचे देवे, जेवणाआधी चित्राहुती आणि जेवणानंतर आपोष्णी.

गट ५ वजने, मापे, नाणी इत्यादि. - आणे, पै, पैसा, अधेली, चवली. पावली, गिन्नी अशी नाण्यांची नावे. खंडी, पल्ला, मण, पायली, पासरी, धडा, शेर, अदशेर, पावशेर, छटाक, रति, गुंज अशी वजने. गज, फर्लांग, कोस, वीत, हात ही लांबीची मापे. अडिसरी, पायली, रत्तल, अठवे, निठवे, चिपटे, मापटे, निळवे, कोळवे इत्यादि धान्यांची मापे. खण, चाहूर, बिघा अशी क्षेत्रफळाची मापे, पाउंड, स्टोन, हंड्रेडवेट ही इंग्रजी वजनी मापे.

असे गट आणि त्यातील वस्तूंच्या याद्या मारुतीच्या शेपटासारख्या कितीहि वाढविता येतील. ऐसीकरांनी यथास्मृति ह्यामध्ये भर घालावी हे विनंति. क.लो.अ.

आपला नम्र,

धागाकर्ता

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तो लाडीक "जीजू" शब्द ऐकला ना की उगाचच कोणाच्या तरी थोतरीत ठेऊन द्यावीशी वाटते

आयला!

म्हणजे एखादा 'अ', दुसर्‍या एखाद्या 'ब'ला जिजू म्हणून हाक मारणार आणि बिचारा 'क' मधल्यामधे थोतरीत खाणार! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने