Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा -४

धागा -३ वर १००पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढतोय.
या धाग्यावर पूर्वीप्रमाणे तुमचे फूल-पान-फळांचे फोटो आणि बागेचे वर्णन तर येऊ द्याच.
पण अ‍ॅडिशनली आम्ही (म्हणजे मी आणि ऋषिकेश, विथ रोचनाचा पाठिंबा!!) ठरवतोय की इथे तुमचे जुने अनुभवही येऊ द्या...
म्हणजे तुम्हाला बागकामाची आवड कशी निर्माण झाली?
तुम्ही बागकामाला सुरवात कधी आणि कशी केलीत?
सुरवातीला काय-काय अनुभव आले?
तुम्ही काय प्रयोग केलेत? तुमचे प्रयोग कधी यशस्वी झाले, कधी गंडले?
इत्यादि इत्यादि...

ओके? तर होऊ द्या सुरवात!!
:)

पिवळा डांबिस Tue, 12/05/2015 - 09:45

मघाशी ऑफिसातून धागा काढल्यामुळे सविस्तर अनुभव लिहिण्याइतका वेळ नव्हता..
आणि असाही विचार केला की धागा तर काढू, बघू कोण काही लिहितंय का ते!
तर अपेक्षेला उतरल्याबद्दल अनिवासी बागकामकरांना धन्यवाद! :)
निवासींना तिथे रात्र असल्यामुळे माफ!!

तर माझा अनुभवः
मी वयाच्या २६ वर्षांचा होईपर्यंत एकही रोप, अगदी तुळ्सदेखील, कधी जोपासली नव्हती.
मुंबईच्या उपनगरातील एक बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर आयुष्य गेलेलं. अगदी डालडाच्या डब्यात तुळस लावायचीदेखील पंचाईत! 'नको, उगाच खालच्या मजल्यावरच्यांनी वाळत घातलेल्या कपड्यांवर मातीच्या पाण्याचे डाग पडतील!' :)
सेंट झेवियरला असतांना कॉलेजच्या पुढल्या छोट्याश्याच आवारात असलेली पण सुंदर बाग मनात भरली होती...
नाहीतर तोपर्यंत बाग म्हणजे राणीची बाग, वृंदावन गार्डन्स वगैरे सरकारने करायचं असं काम!!! :)
नंतर विद्यार्थी म्हणून अमेरिकेत आल्यावर पहिली काही वर्षे झाडं लावण्यासारखी जागाही नव्हती आणि वेळही नव्हता.
त्याही नंतर नोकरीनिमित्ताने बॉस्टनला रहात असतांना एके दिवशी होम डेपोमध्ये मोगर्‍याची रोपटी पाहिली. बायकोला मोगरा हा अति म्हणजे प्रचंड आवडत असल्याने एक रोप घेऊन कुंडीमध्ये (तीही तेंव्हाच घेऊन,कारण संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी!!) कॉन्डोच्या बाल्कनीत लावली.
उन्हाळ्याचे दिवस होते, नियमितपणे पाणी घालत असू त्यामुळे ते रोप जगलं...
पण जसा उन्हाळा संपून बॉस्टनचा तो हिवाळा सुरू झाला तशी त्याने मान टाकायला सुरवात केली. म्हणून मग त्याला आत घरात घेऊन आलो आणि एक प्लास्टिकचा कागद पसरून त्यावर सकाळी ऊन येईल अशा बेताने त्याला ठेवलं.
तर घरामधलं उबदार हवामान बेट्याला भलतंच आवडलं. तीन चार वर्षात चांगलं चारेक फूट उंच आणि दोनेक फूट घेराने वाढलं की ते!! फुलं फुलली की किती तोडशील असं व्हायचं, घरामध्ये नुसता मोगर्‍याचा घमघमाट सुटायचा. मग ते झाड घरातल्या मेम्बरांपैकीच एक होऊन गेल....
त्यानंतर यथावकाश कॅलिफोर्नियात मूव्ह झालो. तेंव्हा बाकीचं सामान मूव्ह करतांना त्या १८ व्हीलरमध्ये त्या मोगर्‍याची कुंडीही ठेवली होती.
पण कॅलिफोर्निया हे अ‍ॅग्रीकल्चर स्टेट असल्याने इथे बाहेरची झाडं वगैरे आणण्यावर बंदी आहे. हे आधी माहिती नव्हतं...
आम्ही बॉस्ट्नहुन फ्लाय करून आलो, पण सामान ट्र्कातून येतेवेळी कॅलिफोर्नियाच्या बॉर्डरवर युएसडीए/ कस्ट्मसने ते झाड काढून फेकून दिलं आणि मगच ट्रक पुढे सोडला!!!
बातमी कळल्यावर अतिशय वाईट वाटलं!!! :(
मग इथे घर घेतल्यावर काही बागकाम करायचं असं ठरवलं. पण येत काहीच नव्हतं, ना घरात कुठलं हत्यार होतं...
आमच्या गावात कॅलिफोर्निया ल्यूथरन युनिव्हर्सिटी आहे. तिच्या सहकार्याने आमची नगरपालिका काही संध्याकाळचे कंटिन्युइंग एज्युकेशनचे कोर्सेस चालवते. मग फी भरून तिथे पद्धतशीरपणे काही बेसिक कोर्सेस केले....
मग फळझाडं, फुलझाडं, थोड्या निवडक भाज्या, लॉन, ग्राउंड कव्हर, अशा चढत्या क्रमाने आता हळूहळू लॅन्डस्केपिंगपर्यंत येउन पोचलोय....
सुरवातीला खड्डा किती खोल हवा, पाणी किती द्यायचं, खतं कधी/ किती द्यायची वगैरे प्रयोगात बरीच झाडं हातून मेली.
बिया पेरल्या तरी त्यातून काही उगवून यायचंच नाही...
हौसेने लावलेली भारतीय पेरू वगैरे महागडी झाडं पहिल्याच विंटरमध्ये मेली...
भाज्या किड्यांनी आणि फळं खारी-सशांनी किती खाल्ली, किती नासधूस केली याची तर गणतीच नाही. अजूनही करतात शिंदळीचे...
पण आता अनुभवाने शिकतोय हळूहळू. यावर्षी खारीना आत जाता येणार नाही असं माझ्याच डोक्याने एक तारांचं कुंपण तयार करून लावलंय, उपयोगी पडतंय असं वाटतंय कारण ते लावल्यापासून खारी त्याच्या शेजारुन जातात पण आत जायचा प्रयत्न करत नाहीयेत....
एक एक करून आवश्यक अशी बरीचशी हत्यारं जमवली. योग्य हत्यार हाताशी असेल तर कामं थोड्या भराभर होतात हे उमजलं. कुदळी आणि फावडी सहज वापरता आली पण पॉवर सॉ, पॉवर ट्रिमर, पॉवर एजर वगैरे वापरायलाही थोडं शिकावं लागलं (नाहीतर बोटं तुटून जायची भीती!)
बाकी अंगमेहेनतीला पर्याय नाही. दिवसा बागकाम केल्यावर मन अतिशय प्रसन्न होतं पण रात्री शरिरातला स्नायूनस्नायू आंबून ठणकतो. जकुझीच्या कढत पाण्यात बसून दोन लार्ज पेग स्कॉच मारणे हा त्यावर मस्त उपाय आहे हे ही शिकलो!! :)
तसं बाकी शिक्षण अजूनही चालूच आहे......

रोचना Tue, 12/05/2015 - 12:38

In reply to by पिवळा डांबिस

बागेचाच नाही, तर तुमच्या सहज लेखनशैलीचाही हेवा वाटतो. मस्त लिहीता. कालपासून दुसर्‍या धाग्यावर "सद्गुरूवाचूनि" वाचल्यावर "बेमट्या शिंच्या सूर देस, मेलास का......" डोक्यात बसलंय :-)

तुम्ही कोर्स केले हे वाचून बरं वाटलं, कारण माझा देखील पहिले ते पुस्तकी ज्ञान, दुसरे ते हाताचे काम असाच अनुभव आहे. माझे वडील शेतावर काम करत वाढले होते, आणि लहानपणी आमच्या घरी क्वार्टर्स मधे छोटी बाग होती. पण त्यांना फक्त फुलांचं वेड होतं - अबोली, गुलाब, मोगरा वगैरे. मी शाळा-कॉलेजात असताना फारसं लक्ष दिलं नाही. पर्यावरणावर, औद्योगिक पातळीवरच्या शेतीच्या दुष्परिणामांवर बरेच वाचन झाले, पण कोलोराडो, जर्सीवगैरे ठिकाणी राहताना बागकामाला काहीच वाव नव्हता. बर्कलीत असताना माइकल पॉलनचं "द ऑम्निवोर्स डिलेमा" या पुस्तकाने डो़ळे खाडकन उघडल्यासारखे झाले. त्यासोबत बागकाम करणारे, पर्यावरणाच्या चळवळीत कार्यरत असलेले बरेच स्नेही होते, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. माझ्या एका मैत्रिणीबरोबर एका उन्हाळ्यात कोकणात सहलीला गेले होते. तिचं आजोळ कोकणातलं, आणि तिला बागकामाची भारी आवड. तिच्याबरोबर असंख्य नर्सर्‍यांना भेट दिली, माळ्यांशी, शेतकर्‍यांशी गप्पा, रोपं आणून तिच्या पुण्याच्या घरात लावणं... मजा आली. स्वत:च्या बागेची हुरहुर लागली, पण बाल्कनीतल्या छोट्याशा जागेत कुंड्यांची बाग करायचा योग देखील खूप वर्षांनी, इकडे भारतात परतल्यावर आला.

सुरुवातीचे काही प्रयोग जाम फसले. इथल्या स्थानिक हवामानाशी, प्रजातींशी परिचित मंडळी भेटत नव्हती, आणि आमच्या सासरकडचा माळी काही विचारलं की यूरिया आणि हायब्रिड चा जप लावायचा. मग गेल्या वर्षी एप्रिल मधे टोमॅटो लावले, त्यांची अवस्था पाहून माझ्या उत्साहाने मान टाकली. शेजारच्या नर्सरीतून मिर्चीचं रोप आणलं, ते घरी आल्यावर लगेच बंद पडलं. भेंडीच्या बियांना कोंब फुटलाच नाही. जास्वंदाला माव्याने खाऊन टाकले. काकडीला जमेल तितके सर्व रोग लागले. एक कडीपत्ता फक्त शाबूत होता, आणि कंपोस्ट.

मग अचानक, वेगळ्या कारणासाठी फेसबुकवर एका मित्राची भिंत चाळत असताना, इथल्या एका स्थानिक पर्यावरणीय चळवळीशी निगडित संस्थेची ओळख झाली. त्यांनी उन्हाळ्यात दीड महिन्याचा परसबागेचा कोर्स चालवला. खरोखर, ढीगभर डिग्र्यांपेक्षा अधिक मौल्यवान होता हा कोर्स. कायकाय घोडचुका करत होते के कळलं. मग टोमॅटोंची आशा सोडली, जास्वंदं उपटलं, आणि पावसाळ्यात हळद आणि आलं पेरलं, पावटा आणि स्थानिक मोसमातली पालेभाजी लावली, नेमकं किती ऊन आहे हे मोजायला शिकले, आणि हिवाळ्यात टोमॅटो, वांगी, पालक, वगैरे लावली. खूप आत्मविश्वास वाढला, आपल्यालाही कदाचित जमेल असे वाटू लागले. फेब्रुआरीत ओल्या हळदीचं लोणचं करून खाल्लं. सर्वात चांगले म्हणजे इंटरनेटवर नॉर्थ अमेरिकेच्या संदर्भात बागकामाच्या माहितीला सोडून इथल्या काही मंडळींच्या स्थानिक तज्ज्ञांशी, माझ्यासारख्याच शिकाऊ मंडळींशी ओळखी वाढल्या, बीज-उत्सव वगैरेत सहभागी होऊन येथील जैवीशेती चळवळीची, आणि धाडशी आणि प्रयोगशील शेतकर्‍यांबद्दल माहिती मिळाली. आता आमचा एक छान ग्रूप जमलाय, बियाणं, माहिती, वगैरे एकमेकांमधे वाटून घेतो. रासायनिक खत-औषधं टाळून देशी बियाणं वापरातो.

यंदा वेगळ्या एका ठिकाणी गच्चीवर उन्हाळ्याची फळझाडं लावली, त्याचं रडगाणं वेगळ्या धाग्यात गायलं आहेच. पण या अनुभवाशिवाय दुसरा पर्याय नाही. पुढच्या वर्षी बरीच पूर्वतयारी करून घेऊ. प्रत्येक हंगामात दोन-तीन भाज्यांपुरते तरी बाजारावर अवलंबून न राहता स्वत: उगवता येतील का, हे तूर्तास पहायचे आहे. कधी पुढे खरीखुरी शेतजमीन लाभली तर मला वेडच लागेल हे नक्की.

मनीषा Thu, 14/05/2015 - 07:51

In reply to by रोचना

तुम्ही बागकामाचा छंद खूपच चांगल्या पद्धतीने जोपासला आहे.

तुम्हाला ते वेड लवकरात लवकर लागावे -- ही सदिच्छा ! :)

ऋषिकेश Tue, 12/05/2015 - 09:46

आम्ही जन्मजात मुंबईकर. बागकाम हा शब्द मुंबईकराला तसा परकाच!
आमच्या घराभोवती लोकांच्या खिडक्यांबाहेरच्या ग्रिलच्या बॉक्समधील डालडा वा एशियन पेंट्सच्या डब्यातील तुळस, चाळींच्या ग्यालरीत मनीप्लांट नावाचा वेल आणि एखाद्याला फारच आवड असली तर त्याच खिडकीच्या बॉक्समध्ये गुलाब आणि/किंवा मोगर्‍याची चैन केली जात असे. माझे आजोळ, मामा, मावशी सगळेच मुंबईत, आत्याचे लग्न व्हायचे होते, तिच्यासह काका वगैरे एकत्र कुटूंब, त्यामुळे जवळचे सगळेच नातेवाईक मुंबईचा परिघ सोडायला तयार नव्हते. त्यामुळे आम्हाला वर्षातील काही दिवस वगळले तर बागकाम हे उद्यानातल्या/सोसायटीच्या माळ्याने करायचे काम आहे असा समज करण्यासाठी पुरेसे वातावरण होते.

माझ्या नशीबाने माझ्या काकुचे माहेर पनवेलचे.तेव्हा पनवेल रम्य कोकणचा भाग होते. तिच्या माहेरी मात्र बसके घर, अंगण, परस, विहीर वगैरे सारे काही होते. आणि आम्ही वर्षातून दोनदा तिथे जात असू. उन्हाळ्यात आंबे खायला आणि गणपतीच्या सुट्टीत. त्यावेळी आमचे दोन्ही मामे (काकुच्या भावंडांना मी मामा/मावशी असेच म्हणतो) मात्र दिवसातले काही तस तरी त्यांच्या बागेत घालवत नी आम्हा पोरांनाही कामे करायला लावत. झाडांखालचा पाचोळाच उचल, शेणखतच घाल, कधी कलम करताना मदतीला घे, कधी झाडावर जांभळे वगैरे लागली की तो वर चढे नी आम्ही वेचायला खाली, कधी आकड्याने आंबे काढ, तर कधी कंपोस्टिंग साठी केलेला खड्डा भरला की तो मातीने बुजवून शेजारी नवा खड्डा कर अशा 'वरकामा'साठी आम्हा भाचरांना वापरले जाई. आम्ही मोठे होऊ लागल्यावर मात्र वेगवेगळी झाडे, भाज्या, फुले, फळे यांची माहिती व फरक ओळखू येईल अशा बेताने आमच्याशी गप्पा मारल्या जात (हे आता पश्चातबुद्धीने जाणवते). इतकेच नाही तर कोणते पक्षी कोणत्या झाडावर कोणत्या हंगामात घरटे करतात, तेव्हा त्या झाडांवर कधी फवारणी करू नये, त्यांच्या घरट्यांचे आकार, अंडी, त्यांचे रंग/आकार वगैरे बघण्यात आम्ही दुपारच्या दुपार घालवली आहे. नंतर पनवेलही आक्रसले, बाग मेंटेन करणे कठीण होऊ लागल्याने बराच भाग विकला व ती ही आक्रसली. आता तिथे २-३ मजली इमारती आहेत व चारी बाजूला इमारतींच्या मधोमध मामांचे एक बैठे घर व भोवतालची थोडी जागा इतकेच उरलेय. काकूची आई गेली नी घरातली केळही गेली त्यामुळे तो कोपरा अजूनही तसाच ठेवलाय. तर ते असो..

सांगायची गोष्ट अशी की आम्ही १०-१२ वर्षांचे होईपर्यंत आमचा बागेशी आलेला तो शेवटचा संबंध! आम्हा भाचरांच्या व मामाच्या अजूनही गणपतीत जमलो की फार छान ती तासनतास गप्पा होतात. झाडे, पक्षी, पुस्तके आणि पर्यटन या चार विषयांना टेकून होणार्‍या गप्पा असल्या तरी बाग आक्रसल्याने आमचे हात मातीला लागणे थांबले ते थांबलेच!

गेल्या वर्षी इथे बागकामाचा धागा निघाला. आणि आत कुठेतरी रुजलेली म्हणा किंवा राहून गेलेली म्हणा ती बागकामाची सुरसुरी पुन्हा वर आली. पुन्हा कुंड्या, माती, शेणखत, बिया यांच्यावर घरी चर्चा झाली. मिरच्यांचा पहिला प्रयोग केला, फसला, घरी कडीपत्ता होताच. नंतर दोनदा मेथी, कोथिंबीर वगैरे घरीच आल्यावर आता अधिकच मजा येऊ लागलीये.

परवाच मामाला लगेच फोन लावला वेगवेगळ्या भाज्यांवर बोलताना तो बहुतांश वेळ एकटाच तासभर बोलत होता. माझ्याकडे अजूनही बागेसाठी अशी जागा नाही, पण सोसायटीला गच्ची देण्यासाठि अर्ज केलाय. बघुया काय होते.

===

म्हणजे तुम्हाला बागकामाची आवड कशी निर्माण झाली?
तुम्ही बागकामाला सुरवात कधी आणि कशी केलीत?
सुरवातीला काय-काय अनुभव आले?
तुम्ही काय प्रयोग केलेत? तुमचे प्रयोग कधी यशस्वी झाले, कधी गंडले?

या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी अगदीच सुरूवातीच्या स्टेजला आहे. त्यामुळे त्यावर बोलणे आततायी होईल. मात्र या निमित्ताने थोडेसे लिहू म्हणून सुरूवात केली आणि आता बरंच लिहिलंय ते राहुदे. आता थांबतो कारण माझा नॉस्टॅल्जिया हा काही इथे विषय नाही. :)

रोचना Tue, 12/05/2015 - 12:46

In reply to by ऋषिकेश

अर्ज स्वीकारला जाईल अशी आशा आहे! घरातल्या बागकामप्रेमी वातावरणाबद्दल वाचायला आवडले. आमचे एक मामा मुंबईत ३५ वर्षं राहिल्यावर पुन्हा धारवाडला परतले, आणि आता दिवसातले १८ तास बागेत घालवतात. सगळ्या गल्लीला भाजी पुरवतात. मला याचंच आश्चर्य वाटतं की इतकी वर्षं मला त्यांना बागकामाची आवड आहे हे माहितच नव्हते. आता नियमित फोनवर बोलणं होतं, नव्याने नातं जमल्यासारखं झालंय.

काव्या Tue, 12/05/2015 - 18:45

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश अजुन लिहीलं असतत तरी चाललं असतं कारण तुम्ही अतिशय चित्रमय व सहज, ओघवतं लिहीले आहे.

झाडे, पक्षी, पुस्तके आणि पर्यटन या चार विषयांना टेकून होणार्‍या गप्पा असल्या तरी बाग आक्रसल्याने आमचे हात मातीला लागणे थांबले ते थांबलेच!

:) आपल्याला या विषयांची आवड आहे असा कयास होताच , १००% होता.

पिवळा डांबिस Wed, 13/05/2015 - 21:37

In reply to by ऋषिकेश

सोसायटीला गच्ची देण्यासाठि अर्ज केलाय. बघुया काय होते.

हार्दिक शुभेच्छा!!
आणि, "ह्या अशा भाज्या लावून का कुठे सोसायटीची रोजच्या भाज्यांची गरज भागणारै?", असा सानुनासिक मक्षिकापात करणारा कुणी महात्मा तुमच्या सोसायटीच्या मॅनेजिंग बोर्डावर नसो ही मनोकामना!!!
:)

अनुप ढेरे Tue, 12/05/2015 - 13:55

एक शंका,
बाग चालवून भाज्यांबाबत बाजरावर अवलंबुन न रहाणं/कमीतकमी अवलंबून रहाणं असं जमल आहे का कोणाला?

ऋषिकेश Tue, 12/05/2015 - 14:06

In reply to by अनुप ढेरे

कोकणातील माझ्या किमान दोन परिचितांकडे तेथील हवामान व मातीत उगवतील अशा कोणत्याही भाज्यांसाठी बाजारहाट केला जात नाही.
पुण्या-मुंबईसारख्या शहरांतही बर्‍यापैकी जागा असेल तर हे जमवणं शारीरीक कष्टप्रद असेल पण जरूर शक्य असावे. पुणे अशा 'बॅकयार्ड गार्डनिंग'चे मुख्य केंद्र समजले जाते. (बॅकयार्ड वायनिंगचेही हे केंद्रय - माझे काही परिचित स्वत:च्या खाजगी वापरापुरती वाईन घरच्या घरीच बनवतात आणि त्यांच्या समानशीलांच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट होते :) )

रोचना Tue, 12/05/2015 - 20:26

In reply to by अनुप ढेरे

माझ्या परिचितांमधे एक-दोघांनी प्रयोग करून पाहिला आहे. १०-१२ वेगवेगळ्या भाज्या लावण्यापेक्षा ३-४ मोठ्या प्रमाणात लावायच्या. पण घरच्या मंडळींना पुरण्यासाठी एका भाजीची किती रोपं लागतील याचा अंदाज यायला हवा.

पैचान कौन Tue, 12/05/2015 - 23:32

In reply to by अनुप ढेरे

बाग चालवून भाज्यांबाबत बाजरावर अवलंबुन न रहाणं/कमीतकमी अवलंबून रहाणं असं जमल आहे का कोणाला?

पण मी म्हणतो, शक्य असलं तरी असं का करावं कोणी? अगदीच हौस असेल, पण बागकाम शक्य नसेल तर त्यापेक्षा जवळच्या फार्मर्स मार्केटमध्ये जाऊन लोकल भाज्या विकत आणाव्यात. म्हणजे त्या शेतकर्‍याला पण चार पैसे मिळतात. याच कारणामुळे गाडीचे ऑइल मी स्वतः बदलत नाही (सहज शक्य असूनही). बाजारावर कमीतकमी अवलंबून रहाणं हा उद्देश असण्यापेक्षा लोकल इकॉनॉमीला चालना देणं महत्वाचं आहे. बागकाम हौस आहे म्हणून करावे, मग अगदी २ डॉलरला १ टोमॅटो पडला तरी हरकत नाही.

काव्या Wed, 13/05/2015 - 02:27

म्हणजे तुम्हाला बागकामाची आवड कशी निर्माण झाली?
तुम्ही बागकामाला सुरवात कधी आणि कशी केलीत?
सुरवातीला काय-काय अनुभव आले?
तुम्ही काय प्रयोग केलेत? तुमचे प्रयोग कधी यशस्वी झाले, कधी गंडले?

बागकामाची आवड कधीच लागली नाही याचे मुख्य कारण "धसका". एखादं पहीलं वहीलं रोपटं मेल्याने, घेतलेला धसका.
.
नको ते बाळरोपटं आणणं अन नको त्याचा दिसामाशी खंगत जाऊन होणारा मृत्यू. अजुन आत्मविश्वास जायच्या आत हा निर्णय घेतला की आपल्याला ना ग्रीन थंब आहे ना रोपाची काळजी घेण्याची शिस्त व सातत्य.
.
बालपण अतिशय पुण्याच्या जरा बाहेरच पण अत्यंत रम्य ठिकाणी गेले. टेकडी होती, विपुल निसर्ग अर्थात बेडूक, साप, गांडुळे, फुलपाखरे, विंचू, पक्षी, झाडे व मोकळा परीसर होता. मन निसर्गात अतिशय रमून जायचं. मे महीन्याच्या सुट्टीत, ऊंबराच्या अन तुतीच्या झाडांखालील फळे उचलून खाणे, कैर्‍या पाडणे हे धंदे चालत. उन्हाळ्यात माशा मारुन ढीगाने, मुंग्यांना खायला घातल्या जात.
.
मामा-मामी व आजोबा सदाशिव पेठेत लिमयांच्या वाड्यात भाड्याने रहात असत. तिथे क्वचित रहायला जाणे होइ. सकाळी उठून प्राजक्ताची फुले वेचणे यासारखं सौख्यच त्रिभुवनात नाही. तगर, मोगरा, कोरांटी, गुलाब, जाई-जुई ही झाडे-वेली तर होत्याच पण पेरु, रायाअवळे व कैरीची देखील होती. दुपार फुलपाखरांचे नीरीक्षण करण्यात व्यतित होत असे अन हे सर्व अनवाणी पायांनी. एकदा सुरवंटावर हलकेच पाय पडला होता. मग जी खाज अन पुरळ उठलं. संध्याकाळी चिमण्यांना तांदूळ घालणे व मुंगळ्यांना गूळ घालणे हा आवडीचा कार्यक्रम होत असे.
.
बाबांच्या मे मधील, वाढदिवसाला भेट म्हणून मी "मे फ्लॉवर" दिले होते. इतकं गोंडस फूल अन लाल रंगाचं. बाबांनी त्याची व्यवस्थित काळजी घेतली अन त्याला इतके कंद फुटले की अनेक आई-बाबांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये वाटून टाकले.

जे लोक बाग किंवा बाल्कनीत वगैरे लहान रोपटी लावतात त्यांच्याबद्दल नि-तां-त आदर वाटतो. आम्ही बघे, खरे कष्ट अन सृष्टीवरील प्रेम या लोकांचे. "अन्नदाता सुखी भव" च्या चालीवर "वनराजी-पालनकर्ता सुखी भव" म्हणावेसे वाटते.
___
हॉस्टेलवर असताना, रात्रीबेरात्री चांदण्यात जंगलमय वृक्षराजीतून मित्र-मैत्रिणीबरोबर फेरफटका माराण्याची मजाच काही और. ओल्या जंगलाचा एक सुगंध असतो. वेडावणारा नाही म्हणणार पण अतिशय छान असतो त्यात ओल्या मातीचाही वास भिनलेला असतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/05/2015 - 23:19

आमच्या ठाण्याच्या इमारतीच्या आवारात बऱ्यापैकी जागा होती. शेजारचे आप्पा बागकामाच्या बाबतीत फार हौशी होते. अंगणात बरीच फुलझाडं होती, शिवाय दोन पेरू, एक रायवळ आंबा, एक जांभूळ, चार नारळ अशी मोठी फळझाडं होती. बकुळ, मधुमालती, अनंत ही फुलझाडं होती. कढीलिंबाचं मोठं झाड होतं. कापसाचं पाच फुटाच्या आसपास उंची असणारं झाडही आठवतं. आमचं आणि आप्पांचं घर तळमजल्याला, शेजारीशेजारी. दोन्ही खिडक्यांसमोरच छोटीशी जागा होती तिथे आठवतंय तेव्हापासून आम्ही पोरं काहीतरी छोटी फुलझाडं वगैरे लावायला मदत करायचो. आप्पांना वयानुसार होईनासं झालं, पुढे ते गेलेच. पण शेजारचे काका आणि बाबांनी आप्पांचा वारसा सुरू ठेवला. दर उन्हाळ्यात बाबा आणि काका खिडकीसमोर लावलेला वाळ्याची मुळं उकरायचे; दोन्ही घरांमध्ये वाळ्याचं पाणी प्यायला मिळायचं. बाबांनी कधीतरी इमारतीच्या मागच्या बाजूला अळूही लावलेला आठवतोय. (मी तेव्हा भाज्या खाण्याच्या बाबतीत रोंदू असल्यामुळे तो अळू खाल्ला का नाही आठवत नाही.)

आजोळ कर्जतच्या जवळच. आजोबा शेतकरी. आजोबा ठाण्याला आले की आप्पा आणि आजोबा गप्पा मारत बसायचे. त्यात झाडं, शेती हे विषयही असायचे. हे काही मला अजिबातच समजायचं नाही, पण मातीत खेळण्यासाठी आमचं घर आणि शेजारचं मानलेलं घर, दोन्ही घरांमधून प्रोत्साहन असायचं. मोगऱ्याची नवी कलमं कशी बनवतात हे शाळेत, पुस्तकात शिकल्यावर खिडकीसमोरच्या मोगऱ्यावर आम्ही प्रयोगही केले होते.

ठाण्यातली लोकसंख्या वाढत गेली, पावसाचं पाणी वाहून जायची सोय अपुरी पडायला लागली. अंगणात तुळशी वृंदावन होतं, त्याचा खरोखर उपयोग व्हायला लागला. त्याचा ठराविक भाग पाण्याखाली गेल्यानंतरही पाऊस सुरू असेल तर आमच्या घरांत नक्की पाणी शिरणार असा अंदाज बाबा आणि काका वापरायचे. तो कधीही चुकत नसे. पावसाळ्यात अंगणात नियमितपणे पावसाचं पाणी आणि सांडपाणीही साचायला लागलं. त्यावर उपाय म्हणून अंगणात भर टाकली. छोट्या फुलझाडांचं अकाली दफन झालं. अनंत, बकुळ, जास्वंद आणि फळझाडं टिकली. तोपर्यंत आम्हां पोरांना शिंगंही फुटत होती, बागकाम कमी व्हायला लागलं.

मधली बरीच वर्षं मातीत हात घातल्याशिवायच गेली. मग पुण्यात मला नोकरी मिळाली. तिथली फुलझाडं बघून पुन्हा उत्साह आला. भाड्याच्या घराच्या बाल्कनीत कुंड्या वगैरे आणून फुलझाडांचे प्रयोग करून झाले. ते बहुतांशी फसलेच. पण ऑफिसात सरकारी जागेत, सरकारी माळी छान बाग फुलवतात ते बघून समाधान मानून घ्यायचे. ही नोकरी सुरू झाली त्याच सुमारास ठाण्याची इमारत पाडून नवीन बांधायला काढली. तिथली सगळीच झाडं गेली. फक्त नारळ आणि आंब्याचा छोटा, गरीब भाग उरला आहे. फेब्रुवारीत तिथे होते तेव्हा समोरच्या रस्त्यावरून जाताना नजर वर गेली. पूर्वी होता त्याच्या अर्धा आंबाही शिल्लक नव्हता. पण छोट्या छोट्या कैऱ्या दिसल्या.

आम्ही एकेकाळी बॉल, फळकुटं, दगड, झाडू काय वाट्टेल ते मारून कैऱ्या पाडायचो. क्वचित कधी बांबू वापरायचो. जुनी इमारत पाडायच्या आधी, रिकामी करायच्या शेवटच्या दिवशी मी आणि भाऊ कैऱ्या पाडत होतो. शेजारच्या दुसऱ्या काकांची आठवण झाली; ते कैऱ्या पाडायला लागलो की ओरडायचे. "आंबे होईपर्यंत तरी थांबा" म्हणायचे. त्यावर कोणीतरी आम्हाला पढवलं होतं, "काका हे झाड आंब्याचं नाही, कैऱ्यांचं आहे." कैऱ्या पाडताना आमची लहानपणची दुसरी मैत्रीण तिच्या मुलीसोबत तिथून जात होती. आरडाओरडा करून तिलाही बोलावलं. ती पण कैऱ्या पाडायला आली. आई, मावशी, मामाला ह्या रूपात बघून सात-आठ वर्षांच्या मुलीची बरीच करमणूक झाली. तिने पण थोडी 'फेकाफेक' करून पाहिली. आता वस्तू हवेत फेकताना कोणाच्या खिडक्या फुटतील अशी भीती नव्हती. झाडाचा विचार कधी केलाच नव्हता.

पण गेल्या वर्षी रोचनाने बागकामाचा धागा काढला. तिचा आणि रुचीचा उत्साह बघितला तरीही पुण्यातल्या फसलेल्या प्रयोगांमुळे आणखी काही करायची माझी इच्छा नव्हती. ऋषिकेशनेही अशीच भीती व्यक्त केली होती, पण त्यानेही सुरुवात करायची म्हटल्यावर माझी भीड थोडी चेपली. दोन दिवसांत झेपेल तेवढं गूगलग्यान मिळवलं. पुन्हा मातीत हात घालून खेळताना पुन्हा मज्जा आली. बाल्कनीत एकेक करत बऱ्याच कुंड्या आणून ठेवल्या. बऱ्या अर्ध्याला चार वर्षांपूर्वी स्वयंपूर्णतेचा जीवाणू डसला होता; तेव्हा मला त्यात काही रस नव्हता. "तू माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहेस," अशी खवचट टिप्पणी केली तरी घरी आलेल्या त्याच्या मित्रांना, त्याच्या माहेरच्या लोकांना हौसेने बाल्कनीतल्या कुंड्या, हिरवा रंग दाखवतो. "मी काही करणार नाही," असं तो म्हणतो पण मी नसताना नेमाने पाणी घालणं, प्रगतीपुस्तक फोनवर वाचणं वगैरे प्रकार करतो. हिवाळ्यात वांगं वगळता बाकीची झाडं नष्ट झाली तेव्हा दोघांनाही घर भकास वाटायला लागलं होतं.

माझं दुकान (डेस्क) बाल्कनीच्या खिडकीशेजारीच टाकलंय. कंटाळा आला, वाचून, स्क्रीनकडे बघून डोळे दुखायला लागले की झाडांची पानं मोजत बसता येतात. बऱ्या अर्ध्याचा त्या जागेवर डोळा आहे, पण मी ती सोडत नाही. बाल्कनीतला हिरवा रंग बघायला छान वाटतं. गेल्या वर्षी बऱ्यापैकी बेझिल मिळालं पण #$&* उंदरांनी नेमका दिवाळी अंकाच्या वेळेस फार धुमाकूळ घालून बरंच नुकसान केलं. (सापळ्यात उंदीर मारल्यावर बऱ्या अर्ध्याने हौसेने त्याचे फोटोबिटोही काढले होते.) गेल्या वर्षी बागकाम प्रकरण थोडं उशीराच सुरू केलं होतं, निदान अक्कलखात्यात भर पडली. पण अजून बरंच शिकायचं बाकी आहे असं दिसतंय. वांगं, मिरचीला नुस्तीच फुलं येऊन जात आहेत. रात्रीच्या वेळेला कधीमधी पानांची नासधूस झालेली दिसत्ये. बाल्कनीचा झाडांचा भाग तारा लावून बंद करावा का नाही यावर विचार सुरू आहे. यथावकाश हे प्रकारही करावे लागतील. आता पुन्हा तो आंबा आठवतो. आप्पांनी लावलेल्या झाडाच्या फळांबद्दलच आम्हाला प्रेम होतं.

उदय. Wed, 13/05/2015 - 03:36

जन्मापासून मी मुंबईत वाढलो. नशीबाने माझे लहानपण मुंबईला गोदरेज कॉलनीत गेले. तिथे मोठ्ठी-मोठ्ठी झाडे होती आहेत, ऐसपैस जागा होती, पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार होत असे. गोदरेज कुटुंबियांना झाडांबद्दल प्रचंड प्रेम आणि जिव्हाळा, त्यामुळे ते कॉलनीत कुठलेही झाड तोडायला देत नसत. होळीलासुद्धा ट्रकने लाकडे विकत आणून पुरवत असत. पहिली ते चौथीच्या आमच्या शाळेत आमची सामुदायिक बाग होती, ज्यात आम्ही भाजीपाला लावायचो आणि शाळेचे दुकान दर बुधवारी असायचे, त्यात विकायचो हे पण आठवतेय. शाळेतही झाडे तोडू नका, उलट अधिक लावा असे शिकवत असत. त्यामुळे लहानपणापासूनच निसर्गाच्या सान्निध्यात राहायची सवय आहे आणि आवडपण.

आंतरजालावर मिळालेले फोटो (मूळ फोटो panoramio.com वर आहेत). योगायोग म्हणजे, मी ज्या इमारतीत राहायचो, त्याच्याच गच्चीवरून काढलेले आहेत.

आम्ही वरच्या मजल्यावर राहात होतो आणि तळमजल्यावर सोसायटीचे दुकान होते, त्यामुळे बाग करायची संधी मिळाली नाही. गॅलरीत कुंड्या लावून गुलाब, जास्वंद लावले इतपतच बागकाम जमले. पण मित्राकडे जाऊन त्याच्या बागेत पाणी घालून यायचो. कॉलनीत पेरू, नारळ, आंबे, डाळिंब, पपया अशी अनेक फळझाडे होती आणि आम्ही मुले लोकांच्या बागेतून चोरून खायचो. तसेच गुलाब, मोगरा, अनंत, जास्वंद, पारिजातक, जाई-जुई वगैरे खूप फुलझाडे होती. शाळेत २ फुलटाइम माळी होते, त्यांनी चिनी गुलाब, कर्दळ, गुलमोहोर अशी अनेक झाडे लावली होती. शाळेजवळ आवळे आणि चिंचांची खूप मोठी झाडे होती. (अजून आहेत, आवळे मात्र गेले.)

अमेरिकेत सुरुवातीला अपार्टमेंटमध्ये राहाताना काही बागकाम करता आले नाही. पण इथे भरपूर बागा बघितल्या. त्यातून नॅशनल पार्क्सना भेटी देणे सुरू झाले आणि कँपिंगची चटक लागली. नंतर घर घेतल्यावर पुढेमागे भरपूर जागा मिळाली आणि बागकाम सुरु झाले.

सुरुवातीच्या चुका म्हणजे झाडांना भसाभस भरपूर पाणी घालणे. त्यामुळे माती सतत ओली राहून झाडे जगत नसत. इतर चुका म्हणजे खत कमी घालणे किंवा खूप जास्त घालणे, भरपूर झाडे हवीत म्हणून दाटीवाटीने जवळजवळ लावणे, मोठ्या-मोठ्या वृक्षाच्या बुंध्याजवळ फुलझाडे लावणे. फळझाडे लावली पण फळंच येत न्हवती, तेव्हा कळले की पॉलिनेशनसाठी रंगीबेरंगी फुलझाडे पण पाहिजेत. पण मग शिकत गेलो आणि अजूनही शिकतोच आहे.

आता नवीन घरी गेलो आणि सगळे मागे राहिले. परत पुन्हा सुरुवात करायची आहे. आता लॉटपण मोठा आहे (१५,००० sq.ft.) त्यामुळे वेळ लागेल. पीच, प्लम, अंजिर, लिंबू, संत्री इतकीच झाडे सध्या लावली आहेत. पण ४-५ वर्षात बाग चांगली होईल, अशी आशा आहे. बघु, कसं जमतय ते.

ऋषिकेश Wed, 13/05/2015 - 08:50

In reply to by उदय.

फळझाडे लावली पण फळंच येत न्हवती, तेव्हा कळले की पॉलिनेशनसाठी रंगीबेरंगी फुलझाडे पण पाहिजेत.

आह! असंय होय! आभार..
तरीच आमच्याकडे मिरच्या आल्या नाहीत. आता एखादे रंगेबीरंगी फुलझाडही लावणे आले :)

स्वगतः गुलबक्षीच लावतो. झटकन उगवते, पावसाळ्यात छान फुलेलही! छान भडक गुलाबी (गुलबक्षी) रंगाची!

पिवळा डांबिस Wed, 13/05/2015 - 21:41

In reply to by उदय.

परत पुन्हा सुरुवात करायची आहे. आता लॉटपण मोठा आहे (१५,००० sq.ft.) त्यामुळे वेळ लागेल. पीच, प्लम, अंजिर, लिंबू, संत्री इतकीच झाडे सध्या लावली आहेत. पण ४-५ वर्षात बाग चांगली होईल, अशी आशा आहे. बघु, कसं जमतय ते.

आता तुमच्याकडे बघायला नक्की आलंच पाहिजे लवकरात लवकर!!

रुची Wed, 13/05/2015 - 04:19

एका ठराविक वयात काही होऊ घातलेले म्हातारे, महागडी वेगवान वहाने घेऊन तरूण व्हायचा प्रयत्न करतात किंवा इतर काही छंद जोपासून आपले येऊ घातलेले म्हातारपण नजरेआड करतात. त्या वयाच्या उंबरठ्यावर आमच्या अर्धांगाने सायकल विकत घेतली आणि हातात खुरपे धरले. बर्फात सायकल चालवण्याच्या अघोरी प्रकारापेक्षा बागकाम निरुपद्रवी असल्याने आणि थोडी फुले-फळे पदरात पडण्याची शक्यता असल्याने मी ही त्याला प्रोत्साहन दिले आणि त्याच्या या छंदाचे लवकरच एका वेडात रुपांतर झाले; इतके झाले की उन्हाळा सुरु झाला की हा इसम घरात दिसणेच बंद झाले. शेवटी मीही आपल्या पत्नीधर्माचा स्विकार करून बागकामाची आवड लावून घेण्याचा प्रयत्न केला आणि लवकरच साथीच्या रोगासारखा हा छंद मलाही चिकटला.

लहानपणी जमीनीत धने पेरून विसरून जाणे यापलिकडे बागकामाचा आणि माझा प्रत्यक्ष काही संबंध येत नसे पण आजूबाजूला रहाणार्या अनेक कुटुंबांना बागकामाची आवड होती त्यामुळे कळत-नकळत बागकाम-शेती याबद्दलची तोंडओळख झाली होती. आमच्या शेजारी एक मूळचे कोकणी कुटुंब रहात असे, त्यांनी त्यांच्या परसात प्रति-कोकण उभारायचा प्रयत्न केला होता. त्यांच्या नशीबाने त्यांच्या आवारात एक उंच आणि अतिशय चविष्ट जांभळाचे झाड होते शिवाय आंब्याचीही झाडे होती. उन्हाळ्यात उनाडक्या करताना आमचा बराचसा वेळ या जांभळाच्या झाडाखाली जात असे. त्याशिवाय त्यांच्याकडे डोंगरी आवळा, पेरू अशी इतरही फळझाडे होती आणि उरलेल्या जागेत ते वांगी, मिरच्या वगैरे भाजीपाला लावत असत. अबोली, मोगरा, सोनटक्का, गुलाब, कुंद अशी फुलझाडे नेहमी फुलांनी भरलेली असत आणि आजींच्या आंबाड्यावर नेहमी गजरा माळलेला असे. आमच्याकडेही बरीच जागा होती पण लिंबाचे भरमसाठ पीक देणारे झाड आणि गोड पपई यापलिकडे फारसे काही आमच्या दारी नव्हते. नाही म्हणायला गुलाब, जास्वंद वगैरे फुलझाडे होती पण त्यांची फार निगा राखली जात नसे. आमच्या कॉलनीसमोरच बरीच शेतजमीन होती त्यामुळे शेतात खेळण्या बागडण्यात बालपण गेले तरी स्वतःच्या बागेत मात्र कधी काही भाजीपाला लावल्याचे आठवत नाही.

पुढे परदेशी रहायला गेल्यावर घरासमोरच्या काही कुंड्यापलिकडे बागकामाची मजल गेली नव्हती पण सहा-सात वर्षांपूर्वी ह्यू फर्नलीच्या रिव्हर कॉटेजचे भाग पहाताना अचानक दारात लावलेल्या स्वतःच्या बागेतला ताजा भाजीपाला खाण्याचा, मूल लहान असल्यापासून तिच्याबरोबर स्वतः काही पिकवल्याचा आनंद वाटण्याचा, मातीत हात घालून मनसोक्त खेळण्याचा आणि निसर्गाशी असलेले आपले नाते वाढविण्याचा आम्हाला फार मोह झाला. त्यावेळी भाड्याच्या टाऊनहाऊसमधे रहात असल्याने बागकामाला स्वतःची जागा नव्हती फक्त फरशी घातलेली थोडी जागा मागे होती. मग मालकाच्या संमतीने या जागेतच एक छोटा प्लँटर बनविला आणि तिथे थोडे हर्ब्ज, मेथी वगैरे भाजीपाला लावला, त्याला बरे यश आले आणि उत्साह वाढत गेला.

बागकामाची आणि त्यातही भाजीपाला-फळफळावळ लावण्याची खरी सुरुवात इथे आल्यावर सामुदायिक बागेत झाली. स्वतःचे घर घेण्याआधीही हा हक्काचा वाफा मिळाल्यावर ``आकांक्षापुढती इथे गगन ठेंगणे`` झाले. त्या अनुभवातून आणि इथल्या इतर बागकामप्रेमींच्या सहवासातून खूप शिकता आले. सामुदायिक बागेच्या गटाकडून वर्षभर अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि अगदी कालच तिथे `कमीतकमी जागेतून अधिकाधिक पीक`काढण्यावर एक चर्चासत्र झाले. शिवाय दर महिन्यात एक-दोनदा लहान मुलांच्या बागकामाचेही कार्यक्रम असतात. इथल्या हॉर्टीकल्चर सोसायटीदेखिल बागेतून सेंद्रिय पध्दतीने शेती करण्यासाठी अनेक चर्चासत्रे घेत असते ज्यात आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न करतो.

बागकामाचा छंद जोपासण्यात कुटुंबाबरोबर आनंदाचे क्षण घालवता येण्याचा प्रचंड मोठा फायदा असतो. मागच्या वर्षी माझे सासूसासरे उन्हाळ्यात आले होते, त्यांनाही बागकामाची आवड आहे त्यामुळे लहानथोर सर्वांनी नवीन घराच्या बागेत एकत्र काम करण्याचा अनुभव एक सुंदर आठवण बनून राहिला आहे. मुलीसाठी तर बागकाम हा फार आनंददायक अनुभव असतो, मो़कळ्या हवेत बागडणे, पाण्यात खेळणे, इतर पशूपक्षी-कीटक यांच्याशी येणारा संपर्क, स्वतः पेरलेल्या गोष्टी खाता येण्याचा अनुभव या सर्व गोष्टीं तिला अतिशय आवडतात.

आता सुदैवाने हक्काची बाग आहे, सामुग्री तयार आहे, माहिती हाताशी आहे, थोडाफार अनुभव आहे, ओसांडणारा उत्साह आहे...पण रहातो उत्तर ध्रुवाजवळ :-) त्यामुळे निसर्गाने थोडे सहकार्य करायला हवे!

मेघना भुस्कुटे Wed, 13/05/2015 - 09:01

या धाग्यावर हे जरा अस्थानी. पण सरोज देशपांडे यांच्या 'बाग एक जगणं' या पुस्तकाची आठवण झाली.

'अक्षर' प्रकाशनाचं हे पुस्तक फारसं कुणालाच ठाऊकच नसतं. पण काय रसाळ भाषेत परसबागेचे निरनिराळे प्रकार, अनुभव आणि आठवणी सांगितल्या आहेत त्यात त्या बाईंनी. भाज्या, फळं, सुगंधी आणि औषधी वनस्पती, फुलं, शोभेची झाडं, बागेची रचना.... असे अनेक प्रकार. इथल्या मंडळींना ते पुस्तक फार आवडेल असं वाटतं.

मेघना भुस्कुटे Wed, 13/05/2015 - 09:43

In reply to by ऋषिकेश

हो, मिळतं की. पुस्तकांची पुरेशी प्रसिद्धी करत नाहीत आपल्याकडे. :(

***

वरच्या प्रतिसादासाठी शुद्धिपत्र: प्रकाशन 'अक्षर' नाही, 'रोहन' आहे. पण या पुस्तकाचा काही भाग 'अक्षर'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता, आणि त्यातच आगामी पुस्तकाची जाहिरात होती. म्हणून 'अक्षर' डोक्यात राहिलं असावं.

रोचना Wed, 13/05/2015 - 11:13

In reply to by मेघना भुस्कुटे

छानच आहे - सुचवल्याबद्दल आभार. अशीच दुसरी बागकामाबद्दल, सेंद्रीय शेतीबद्दल वगैरे पुस्तकं माहित असली तर इथे अवश्य देत जा...

पिवळा डांबिस Wed, 13/05/2015 - 22:08

In reply to by मेघना भुस्कुटे

अस्थानी अजिबात नाही.
ज्याला हेमामालिनी आवडते त्याला ती कुठल्याही रूपात आवडते, मग ती मीरा असो वा बसंती!!! ;)
पण प्रिव्ह्यू वाचल्यावर लेखिकेच्या बागांचं साहित्यिक वर्णनच बरचसं दिसतंय.
तुम्ही पूर्ण पुस्तक वाचलंय म्हणून विचारतो की यात प्रत्यक्ष बागकाम करायची इच्छा असलेल्याला मार्गदर्शक अशी काही माहिती आहे का?
म्हणजे त्यानुसार विकत घ्यायचं की नाही ते ठरवायला बरं.

आणि हो, पुढल्या वेळेस गाजरं विकत आणलीत की त्यांची शिरं फेकून न देता एका बशीत थोडं पाणी घालून त्यात ठेवायला विसरू नका.
बघा काय गंमत होते ती!!
:)

बॅटमॅन Thu, 14/05/2015 - 02:10

In reply to by पिवळा डांबिस

हा गाजरवाला प्रयोग खूपदा केलाय लहानपणी. आठवडा-दहा दिवसांत अप्रतिम झाडे तयार होतात. कुणी कुशल फटूग्राफराने फटू काढले तर लयच भाव खाऊन जातील.

ऋता Wed, 13/05/2015 - 10:27

झाडांविषयी, वनस्पतींविषयी माझ्या घरात नेहमीच बोलले वाचले जायचे. माझी आजी आयुर्वेद शिकलेली होती त्यामुळे तिच्याकडून औषधी वनस्पतींबद्द्ल ऐकायला मिळायचे. लहानपणी घराच्या आसपास, शाळेत न राखलेले असे जंगल सदृश भाग असतात त्यात खूप वेळ निश्चिंत भटकंती करायाला मिळाली. घरी स्टँडर्ड असतात तशी तुळस, कढीपत्ता, एखाद दोन गुलाब, गोकर्ण्,शेवंती,मोगरा, जाई,झेंडू होते. पण मी स्वतः पहिल्यांदा काही लावले ते बंगलोरला लालबाग नर्सरीतून आणलेले- शेवंती आणि गुलाब. त्याबरोबरच नर्सरीतून न आणता बिया पेरून किंवा फांदी लावून मूग,गुलबक्षी, गोकर्ण,जाई(का जुई?) असे काही काही लावले.मोगरा(त्याचे रोप नर्सरीतले होते), कढीपत्ताही होता. मग बदली चेन्नैला झाली तेव्हा घर हलवले तेव्हाही सगळे टेंपोतून नेले. तिथल्या हवामानात सगळी रोपे आणखीन बहरली. तिथून पुण्याला घर हलवले तेव्हा मात्र सगळी 'बाग' मित्र मैत्रोणींना देऊन आलो कारण प्रवासात ते टिकले नसते आणि मुख्य म्हणजे ते मूव्हरच्या गोडाऊन मध्ये वीसेक दिवस राहताना मरून गेले असते. पुण्यात परत काहीबाही लावून सुरूवात केली.मुख्य प्रश्न एकेक दोनदोन आठवडे किंवा महिने घरी कोणी नसण्याचा होता त्यामुळे फार काही वाढवता आले नाही.
मध्यंतरी इटलीत एकटी रहिले तेव्हा विरंगुळा म्हणून तिथे काहीकाही लावून पाहिले. परत पुण्यात आल्यावर बागकाम करण्याचा उत्साह वढला आहे. पण अजून जे लावलय (आणि टिकलय) त्याला बाग म्हणण्यासाठी बागेची व्याख्या बरीच व्यापक केली पाहिजे. अजून तर सुरूवातच आहे. इथल्या बागकामाबद्द्लच्या चर्चा नेहमीच उत्साह वाढवतात आणि माहितीत भर घालतात.

रोचना Wed, 13/05/2015 - 11:28

सगळ्यांचे मनोगत वाचल्यावर एकूण "अजून बरेच काही शिकायचं आहे" हे बागकामाचे ब्रीदवाक्य (मी चुकून ब्रीडवाक्य लिहीलं.....) असं दिसतंय...

नंदन Wed, 13/05/2015 - 12:41

सगळेच प्रतिसाद आवडले. बहुतेक प्रतिसाद हे स्थलांतरितांनी लिहिलेले पाहून, येनकेनप्रकारेण नवीन जागेत आपली मुळं रूजवल्याशिवाय माणसाला घरासारखं वाटत नाही, असं विचार'वैपुळ्या'ची झाक असलेलं एक 'फाइन' विधान मनात डोकावून गेलं ;)

१. अजून काही नमुने.
२. "अरुणाचलच काय आणखी कितीही 'चल' आले तरी उदयाचल अचल आहे. हे 'फाइन' वाक्य एल्केसरांनी घातले होते." - माझी कु. संपादकीय कारकीर्द ('गोळाबेरीज')

पिवळा डांबिस Wed, 13/05/2015 - 21:48

येनकेनप्रकारेण नवीन जागेत आपली मुळं रूजवल्याशिवाय माणसाला घरासारखं वाटत नाही,

प्रीचिंग टू द क्वॉयर!
किंवा मराठीत,
लोकां सांगे ब्रम्हज्ञान!!!
=))

मनीषा Thu, 14/05/2015 - 10:04

एका दगडी अंगण आणि व्हरांडा असलेल्या वाड्यात आम्ही रहात होतो. जागा भरपूर होती, पण झाडाझुडपांची हौस फारशी कुणाला नसावी.
आमच्या अंगणात एक जांभळाचं झाड होत. त्याला टपोरी आणि रसाळ जांभळं पण लागत . पुढे ते वठून गेले. वाड्यातल्या माझ्या खोलीसमोर एक जुना हौद होता. न वापरातला. आमच्या एका भाडेकरूने , त्यांच्या घराच्या भिंतीना सिमेंट प्लास्टरिंग केले , त्यावेळी सगळा चुना, माती, वीटा त्या हौदात टाकला होता. आणि त्यात पपईची झाडे उगवली होती. माझा झाडाझुडापांशी इतकाच संबध होता. आभ्यासाव्यतीरिक्तं अनेक उद्योग असल्याने त्यावेळी तरी कधीच एखादे रोप लावावे असे वाटले नाही.
नंतर आम्ही नविन घरी आलो. तळमजल्यावरचे घर आणि मुख्यं म्हणजे घरापाठीमागे लहानशी बाग होती. मी उत्साहात ठरवत होते की बाग कशी करायची , तितक्यात बाबांनी सांगीतले की काका ते काम करणार आहे. माझे काका बॉटनीचे प्रोफेसर.. त्यांना नक्कीच जास्तं माहीती असणार. पण माझा थोडा विरस झालाच.
एकेदिवशी बागेचे काम सुरू झाले. माळी आले होते. त्यांनी संपूर्ण बागेची जमीन खणुन घेतली. गवताचे तण काढून टाकले. एका ट्रक मधून माती आणली होती. ती सगळीकडे पसरली. मग तारेच्या कुंपणालगत ओळीने अशोकाची रोपे लावली. (त्यातली बरीचशी नंतर आम्ही काढून टाकली, पण अजून दोन-तीन आहेत.) त्यानंतर ओळीने खलीफा ( त्या झाडाचं हेच नाव आम्हाला सांगीतलं) आणि त्याच्यापुढे ड्युरांटा (याला फिक्क्या व्हॉयलेट कलरची नाजूक फुलं येतात) . तिथे नीट वाफा करून त्याच्या कडेला तिरक्या विटा लावल्या.
बागेच्या आडव्या भिंतीवर एक वेल लावला (बहुदा जाईचा) भिंतीजवळच्या वाफ्यात ३-४ रंगांचे गुलाब होते आणि दुसर्‍या टोकाच्या वाफ्यामधे मोगरा. नंतर तिथे मी लाल आणि पिवळ्या रंगाची कर्दळ देखिल लावली होती. मधल्या भागात काही भागावर शहाबादी फरश्या लावल्या होत्या. आणि उरलेल्या भागात मऊशार गवताचं लॉन केलं होतं . मी बेहद्दं खूष होते. नाराजी तर कधीच संपली होती.
मग मी मला मिळेल तितका वेळ बागेत घालवायचे. त्या वेळी माझे शिक्षण चालू होतेच आणि मी नोकरी पण करत होते. त्यामुळे फक्तं रविवारच .
मग तिथल्या रोपवाटिके मधे जाऊन नविन रोपे आणणे. हा नविन छंद जडला. लॉनची देखभाल करणे सगळ्यात जिकीरीचे काम. तासंतास ते गवत एकसारखे कापणे, त्यातले नकोसे तण काढून टाकणे यातच जायचा. आमची बाग खरच खूप देखणी दिसायची.
लग्नानंतर बागकाम मागे पडले. घर जरी तळमजल्यावरचे होते, तरी भोवतीची जागा सोसायटीची. तिथेही भरपूर झाडे आधीपासूनच होती. नणंदेने दोन चार ग्लॅडीओला (नाव बरोबर आहे ना) लावले. त्याला पाणी घालणे इतकच बागकाम राहीलं होतं. नोकरी, घरकाम आणि नवर्‍याबरोबर भटकणे :D यातून फारसा वेळ नसायचा.
मुलाच्या जन्मानंतर सासुसासरे भिलईहून इकडे आले. सासूबाईं नी तिकडुन त्यांच्या बागेतल्या बर्‍याचश्या कुंडया रोपासकट आणल्या. नंतर काही काळ माझ्या हाताला माती लागली नाही.
जेव्हा स्वतःचे घर घेतले, तेव्हा त्याला एक लहानशी गच्ची आहे. तिथे मी काही रोपे लावली . चिनी गुलाब, गुलाब (दोन होते- एक फिक्क्ट पिवळा आणि गुलाबी ) ब्रम्हंकमळ, जास्वंदी, काळी तुळस अशी काही. त्यावेळी आमचे 'हे'. एनाराय अस्ल्याने दर दिवाळी आणि मे महिन्यात आमची रवानगी परदेशी व्हाययची. त्यात काही झाडे सुकुन जायची . वाईट वाटायचं पण इलाज नव्हता. .नंतर मीसुद्धा भारत सोडून इकडे रहायला आलो. पहीली काही वर्षं बाल्कनी, गच्ची. अंगण असं काहीच नसलेल्या घरात रहात होते. त्यामुळे बागा फक्तं दुरूनच बघयाचे. आता सध्या बाल्कनी असलेले घर मिळाले. त्यामुळे हाताला परत माती लागते आहे.
इथे सुरवातीला नुसती फुले पाने असलेलीच रोपे लावली. पण ऐसीवरचे अनुभव वाचून ठरवले, काहीतरी 'उपयोगी' लावू या. मग कढीपत्ता, आणि पुदीना आणले. कोथिंबीरीसाठी धणे पेरले आणि मिरचीच्या बीया. मोगरा छान येतो आहे. माझ्याकडे गुलाबी रंगाची जास्वंद होती. एका गणपतीत ५ -६ दिवस त्याचीच फुले होती बाप्पाला. पण ते झाड खूप मोठे झाले होते. त्यामुळे सिक्युरीटी ला विचारून इथल्या कॉमन जागेत ठेवले. मी एक लिंबाचे रोप पण आणले आहे. मला माहिती आहे ते जमिनीत लावायला लागणार. पण सध्या चांगले वाढते आहे त्याला आधी पांढर्‍या रंगाची फुले आली , मग बारीक हिरवी लिंबे लागली. त्यातली बरीचशी गळून गेली, पण दोन चांगली पिकली. मी परवाच त्याचं सरबत केलं होतं .
बाप रे! माझं पाल्हाळ फारच लांबलं . पण खरच बागकाम करणे माझं अत्यंत आवडीचे आणि आनंदाचे काम आहे.

रोचना Thu, 14/05/2015 - 22:09

त्याच्यापुढे ड्युरांटा (याला फिक्क्या व्हॉयलेट कलरची नाजूक फुलं येतात) .

लहानपणी पाचगणीत रस्त्याच्या दोन्ही बाजूने या फुलाची झुडपं होती - आजही काही मोठ्या रस्त्यांवर दिसतात. आम्हाला शाळेत जाताना उगाच त्या झुडपांना लागून चालायची हौस होती, कधी कधी त्यात लपायचो, छोट्याशा फटींमधून पळवाटा काढायचो. अर्थातच खरचटायचं, लागायचं. "कशाला जाता मरायला दुरांटीत!" हे वाक्य मोठ्यांकडून खूप ऐकले होते, आणि दुरांटी = रस्त्याच्या बाजूची झुडपं (हेज) अशी माझी समज होती. अगदी अलिकडेच मला दुरांटी हे ड्युरँटा फुलावरून नाव पडलं हे कळलं.

मनीषा Fri, 15/05/2015 - 10:24

In reply to by रोचना

बरोबर ड्युरांटा चांगलच काटेरी असतं . त्याच्या फुलांप्रमाणेच पाने सुद्धा लहानशी गोलसर आकाराची आणि नाजूक दिसतात. पण हात लावला तर खरचटण्याची शक्यता असते. तुम्ही त्यात लपायला जायचात म्हणजे कमाल आहे.
आम्ही ते कुंपणालगत लावले होते. त्याच्या मागे खलीफा.. हे नुसते गोल गोल आणि एकमेकात गुंतलेल्या पानांचे झाड आहे. आमच्या बागेला तारेचेच कुंपण आहे, त्यामुळे आडोसा व्हावा म्हणून आणि थोडं सुरक्षित रहावं म्हणून एकापुढे एक अशी ओळीने लावली त्यामुळे ती चांगली मोठी झाल्यावर हिरव्या भिंतीसारखी दिसायची. आता त्यातली बरीचशी काढून टाकली आहेत. आणि त्या जागी प्राजक्तं, रातराणी, जास्वंदी, लिंबू असे काहीबाही लावले आहे.

उसंत सखू Sat, 16/05/2015 - 12:48

माझी बागकामाची आवड अगदी बालपणापासूनची आहे.म्हणजे आई किंवा माळ्याने बागकाम करायचे आणि मी आवडीने बघायचं . आईनं कुंडीत झाड लावलं कि मी आणि माझे लहान भाऊ त्याला मूळ फुटलंय का, ते रोज सकाळ ,दुपार ,संध्याकाळ उपटून बघत असू. कुठलीच झाडं जगत का नाहीयेत याचा आईला अचंबा वाटे .वडिलांची बदली झाल्याने आम्ही अकोल्याला आलो . तिथे रहायला ब्रिटीश कालीन प्रचंड बंगला आणि बगीच्यासाठी विपुल जागा होती. पांडुरंग नावाचा एक माळी होता . माझ्या पालकांच्या देखरेखीखाली आमचा बगीचा उत्कृष्ट फळूफुलू लागला. फुलांना वार्षिक प्रदर्शनात बक्षिसे वगैरे मिळू लागली.

बगीच्यात रसरशीत कागदी लिंबाचे झाड फळांनी लदबदले असायचे.आंबटषौक जन्मदत्त असल्याने , दात आंबून त्याचे एनामल निघेपर्यंत मीठ लिंबू खाऊन खाऊन शालेय जीवनातच माझ्या दंतचिकित्सेचा शुभारंभ झाला. बगीच्यात पेरूची ५/६ झाडं होती. मोठ्ठे ,मधुर आणि रसाळ पेरू लागणार्या एका झाडाला, वाय आकाराची एक छानशी बेचकी होती. त्यावर एक सतरंजीची घडी ठेवून अस्मादिक पामर दिवसभर पुस्तके घेऊन आणि पेरू असतील तेंव्हा पेरू खात मुक्कामाला असे.पेरूच्या पांढऱ्या मऊसर फांद्यांवर मुंगळे हिंडत असत, त्यांचा प्राणत्याग झाला तरी बेहेत्तर पद्धतीचा कडकडून दंश एकदा सहन केल्याने ,सावध राहून टिचकीने मुंगळे उडवण्यात अष्टावधानी वृत्तीचा आपोआप विकास झाला.

चिंचेचे वृक्ष असल्याने ,पिकलेल्या चिंचा फोडून त्यांना खडे मीठ लावून गोळे करणे , हे कंटाळवाणे काम उन्हाळ्यात करावे लागे.तेंव्हापासूनच बालमजुरीला माझा सक्त विरोध आहे. निशिगंधाच्या फुलदाणीत लाल किंवा निळी शाई टाकून रंगीत फुले करण्याचा प्रयोग मात्र आम्ही मजेने करत असू.पूजेसाठी फुले तोडून देणे , सुगंधी गजरे, हार करणे ,कधीमधी पाईपने झाडांना पाणी घालणे , लॉनमोअरने गवत कापणे आणि जमेल तेंव्हा वृक्षारोहण करुन झाडावरच रमणे यात माझे अकोल्यातले दिवस सुखात गेले.

नागपुरात आल्यावर वडिलांनी माळ्याच्या हातून छोटीशीच ,उत्तम बाग तयार करुन घेतली.झाडांना पाणी घालणे आणि कधीतरी त्याची छाटणी करणे इतकाच माझा सहभाग असे. मी बागेत काम करायला आले कि डास आणि इतर कीटक माझी सर्वांगीण चुंबनं घेऊन मला लज्जित करुन सोडत.सोनेपे सुहागा अशी परागकणांची एलर्जी निर्माण झाल्याने बागकामाचे कष्ट घेण्याची शक्यता मंदावली. आता बाल्कनीत थोडीशी झाडं आहेत ,त्याला पाणीसुद्धा माझी बाई घालते. पर्यटनास अतोनात चालना देत असल्याने झाडं लावून त्याची हेळसांड करणे सध्या नकोसे झाले आहे. माझी बाई स्वतःच रोपटी विकत आणून मला विनासायास त्याचे कौतुक करण्याची संधी देते आहे.
बागमे कली खिली... बगिया महकी ......
पर हायेरे अभी इधर बागकामवाला भवरा नही आया..

नंदन Sat, 16/05/2015 - 13:02

In reply to by उसंत सखू

पर्यटनास अतोनात चालना देत असल्याने झाडं लावून त्याची हेळसांड करणे सध्या नकोसे झाले आहे. माझी बाई स्वतःच रोपटी विकत आणून मला विनासायास त्याचे कौतुक करण्याची संधी देते आहे.

चिक्की आणि चिकट्रावांचे लॉन आठवले :)

शहराजाद Sat, 16/05/2015 - 19:17

In reply to by उसंत सखू

खल्लास! _/\_

अभी इधर बागकामवाला भवरा नही आया..

क्षणभर 'अभी इथर बागकामवाला नवरा नही आया' असे वाटले :)

मनीषा Mon, 18/05/2015 - 06:14

In reply to by उसंत सखू

सखुबैंना बर्‍याच दिवसांनी उसंत मिळालेली दिसतेय.
नागपूर , आकोला ही तुमची वास्तव्याची ठिकाणे वाचल्यावर, या धाग्यावरची हिरवी शितलता जाऊन अचानक उन्हाचा कडाका जाणवू लागला.
पण कालपरवाकडे नागपूरला लै पाऊस झाला म्हणे?

उसंत सखू Mon, 18/05/2015 - 11:23

In reply to by मनीषा

फार्फार दिवसांपासून बागकाम प्रेमाबद्दल लिहायची हौस होती,अजून काही किस्से लिहून स्वतंत्र लेख झाला असता पण नेहेमीप्रमाणे चिकाटी कमी पडली . ६/७ वर्षांपूवी सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेत जाउन स्वखर्चाने बहावा, गुलमोहोर,पारिजातक, एक्झोरा आणि पुत्रंजीवी वृक्षाची रोपं ऑफिसच्या परिसरात आणून लावली आणि जगवली.बहाव्याच झाड गच्च बहरून नागपूरच्या उन्हाळ्यात ऑफिसात येण्याचे सार्थक करते आहे. पावसाळ्यात उगवलेलेली याची अनेक रोपे काढून लोकांना वाटते आहे.

रोचना Sat, 16/05/2015 - 22:23

इथल्या उन्हाळ्यामुळे रोपांचे जाम हाल होतायत. मला जेमतेम रोच एकदा पाणी घालणं जमतंय. शेड नेट लावूनही दोडका मेलाच बिचारा. बाकीच्यांचीसुद्धा दयनीय अवस्था आहे. कशीबशी पावसाळ्यापर्यंत जिवंत राहिली तर मिळवलं.

छोटी कारली येताहेत, पण का कोण जाणे पानं कोमेजलेली, आजारी दिसतात सारखी. टवटवीत दिसत नाहीत.
P1060249

पडवळीचं तेच. मध्यंतरी ऊन फार लागत होतं म्हणून भिंतीच्या आडोशात पडवळीचा वेल हलवला, आणि त्यामुळे फळं पुष्कळ येतायत, पण छोटी छोटी, फरसबी सारखी.
P1060256

भोपळा तर झोपलाच आहे. एकही फूल नाही की नवीन पान नाही. हिवाळ्यात अस्वल ब्रेक घेतं तसं काहीतरी त्याचं चालू आहे सध्या:
P1060253

दुधीला काहीतरी फंगस लागलंय असं वाटतं. सीताफळाची पानं रात्रभर भिजवून नीम-तेलाबरोबर मिसळून फवारा मारायला आमच्या सरांनी सांगितलं, पण इथे कुठेही सीताफळाचं झाड मला सापडेना!
P1060250

या बाईंनी सर्वत्र हैदोस घातला आहे:
P1060252

भेंडीला पनवती लागली! इतकी मस्त वाढत होती, अचानक व्हाइटफ्लाईज चा मारा झाला. नीम-तेलाच्या पाण्यानी पानं धूवून पुसून काढली, बघू काय होतं ते. पुन्हा कळ्या येतायत, पण हे किडे इतके छोटे आहेत की अंडी सगळी पुसली गेली की नाही खात्री नाही.
P1060255

काकडी जोरात आहे. पण उकाड्यामुळे भवरे-नवरे सगळेच झोपा काढताहेत, त्यामुळे परागण अभावी ही फुलंही सुकून जातायतः
P1060257

ही अत्यंत आळशी मिरची. चार महिने झाले, एका फुलाचं नाव घेत नाहीये.
P1060259

आणि हे कुणा तज्ञाला झाड ओळखता येतंय का? "मुसुकु ब्रिंजॉल" म्हणून बिया पेरल्या होत्या, पण अशी पानं आलीत. खूप दिवस झाले, पानं भरपूर, पण फुलं अद्याप नाहीत. वांगंच आहे की नाही हे पानं बघून ठरवता येत नाहीये.
P1060262

मनीषा Mon, 18/05/2015 - 06:07

In reply to by रोचना

तुमची परसबाग चांगलीच वैविध्यपूर्ण आहे.
तुमच्या आजारी रोपट्यांना लवकर आराम पडू दे.
सिताफळ नाही मिळालं तर त्याला काही पर्याय असेल ना?
मिरचीसाठी भरपूर पेशन्स लागतो असं दिसतय.

ऋता Tue, 19/05/2015 - 15:02

In reply to by रोचना

सुंदर आहेत सर्वच झाडं/वेल. लवकर कीडींचा नायनाट होवो ही सदिच्छा ! सीताफळाच्या पानांचा असा उपयोग पहिल्यांदा वाचला.
माझ्याकडे वेलांना लीफ बोरर नेहमी लागतोच. मी अजून काही उपाय केलेला नाही त्यावर.

झाडाचे पाणी कमी केले तर फुले, फळे येतात असे ऐकून आहे. मिरचीचे पाणी कमी करून पाहिले आहेत का ?

रोचना Tue, 19/05/2015 - 15:21

In reply to by ऋता

नाही, मिर्चीला थोडं पाणी कमी देऊन पाहते.
मिर्ची खालचा फोटो जो आहे - त्या पानांवरून झाड ओळखता येताय का? मला हे कोडंच पडलंय. मी वांग्याच्या बिया म्हणून पेरल्या होत्या, पण हे काय उगवलंय कोणास ठाउक. उपटून टाकायला जीव होत नाहीये, पण काही फूलबिलही नाही आलं.
सीताफळाचं झाडच इथे कुठे सापडत नाहीये मला! आम्हाला कोर्स मधे पारंपारिक कीटनाशकांच्या यादीत हे दिलं होतं, इथे बर्‍याच जणांना माहित आहे. मी रोज फक्त कडूनिंबाच्या तेलाचा फवारा मारत्येय, गेल्या दोन-तीन दिवसाच्या पावसाने थोडा दिलासा दिलाय.

नंदन Tue, 19/05/2015 - 15:58

In reply to by रोचना

निनावी झाडाचा फोटो डाऊनलोड करून, गूगल इमेज सर्चद्वारे काही सापडतंय का पाहिलं. त्यात जालावर जुळणारी प्रतिमा म्हणून हे पान सापडलं. ढोबळमानाने सारखंच दिसतंय, पण तिथेही त्याचं नाव दिलेलं नाही.

अजून एक उपाय, म्हणजे Plantifier सारखं एखादं विनामूल्य अ‍ॅप डाऊनलोड करून पाहता येईल.

रोचना Tue, 19/05/2015 - 17:41

In reply to by नंदन

तू बहुदा शेवटून दुसर्‍या फोटोतल्या रोपाबद्दल म्हणतोयस - ती मिर्ची आहे, आणि दुव्यातल्या बॅजिल सारखीच आहे. मी अगदी शेवटच्या फोटोतले, काटेकोर पानं असलेल्या रोपाबद्दल विचारत होते. खाली ऋताच्या पोस्टवरून हे वांगं असण्याची शक्यता तरी वाटतेय आता. जगवून बघते काय निघतंय ते!

ऋता Tue, 19/05/2015 - 17:09

In reply to by रोचना

सहज शोध घेता 'आफ्रिकन एगप्लांट' बद्द्ल माहिती मिळाली. पानं इथे दिलेल्या फोटोतल्या सारखी वाटत आहेत. पानाच्या देठाच्या लांबीत फरक आहे (फोटोतल्या पानाला जवळजवळ देठ नाहिये; लिंकमधल्याला ११सेमी पर्यंत लांब देठ आहेत). पण पानाचा आकार काही वांग्यांच्या प्रकारांसारखा आहे...त्यामुळे नक्कीच त्या झाडाला फुले फळे लागे पर्यंत वाट पहा असं मला वाटतं.

मेघना भुस्कुटे Tue, 19/05/2015 - 15:43

In reply to by ऋता

सीताफळाच्या पानांचा असा उपयोग पहिल्यांदा वाचला.

सीताफळात काहीतरी कीटकनाशक असावे. डोक्यात उवा झाल्यास, सीताफळाच्या बिया वाटून लावतात असे ऐकले आहे.

रोचना Tue, 19/05/2015 - 16:07

In reply to by मेघना भुस्कुटे

अर्रेवा, हे माहित नव्हतं. आम्ही एरवी बिया खतातच घालतो, पण कुटून फवार्‍यासाठी किंवा कुंडीतली माती तयार करतानाच मिसळण्यासाठी भारी कल्पना आहे.

रुची Tue, 19/05/2015 - 21:41

In reply to by रोचना

भेंडीला माझीच दृष्ट लागली बहुतेक! तुझ्या सुंदर भेंडीचे फोटो पाहून माझ्या भेंडीला कधी फळ भरतेय याची वाट पहात होते. व्हाईट फ्लाईज बद्दल माहिती पहाताना
"In many ways, whitefly is a modern pest, created by the over-use of pesticides that have killed off its natural enemies. One study has even demonstrated an increased whitefly reproductive capacity when sprayed with certain insecticides!"
हे दिसलं आणि सुस्कारा सोडला. असो, पण त्यावर काही इतर किड्यांचा उपयोग करता येतो का? भारतात असे उपयोगी किडे वगैरे विकत मिळतात का?
काल आमच्याकडे छान तापमान होते आणि बागेत काम करताना यावर्षात प्रथमच अनेक माश्या-कीटक आणि चक्क एक फुलपाखरूही दिसले, बरं वाटलं. त्यातला बहुतेक बाल्ड फेस्ड हॉर्नेट असलेला हा कीटक, गुलाबाच्या पानांवर काहीतरी चरत होता. काळजीने पाहिलं तर पानांना काही त्रास झालेला नव्हता पण त्यावरच्या सूक्ष्म किड्यांवर ताव मारत होता बहुतेक! म्हटलं उपयोगी दिसतोय पण तरी लक्ष ठेवायला लागेल.

उकाड्यामुळे भवरे-नवरे सगळेच झोपा काढताहेत

मला वाटत होतं की ट्रॉपिकल हीटमुळे मूडमधे येत असतील सगळे :ड!

रोचना Fri, 22/05/2015 - 07:29

In reply to by रुची

हो, मला एक मैत्रिण लेडीब्ग्स देणार आहे. तिच्या बागेतून घेऊन येणं जमत नाहीये.
परवा निंबाचा फवारा मारताना गांधिलमाशी दिसली. म्हटलं हिच्यावर नको फवारा, उगीच रागावून माझ्याचकडे यायची. एकदा शाळेत असताना चावली होती, अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो. म्हटलं परागणसाठी उपयुक्त असो किंवा नसो, काय करते ते करू दे.

नंदन Fri, 22/05/2015 - 07:55

In reply to by रोचना

परवा निंबाचा फवारा मारताना गांधिलमाशी दिसली. म्हटलं हिच्यावर नको फवारा, उगीच रागावून माझ्याचकडे यायची

असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा! ;)
[ह्या गंगेमधि गगन वितळले - मर्ढेकर]

बॅटमॅन Fri, 22/05/2015 - 14:44

In reply to by रोचना

अशा हिंसक माशीस 'गांधील'माशी हे नाव कुणा संघिष्टाने दिलेले असण्याची शक्यता जास्त वाटते.

तदुपरि गांधीलमाशीच्या आठवणीने काटा येणे हा एकप्रकारचा स्युडोकीटकभृंगन्याय म्हणावा काय?

आडकित्ता Fri, 19/06/2015 - 20:09

In reply to by बॅटमॅन

गांधील मधे गांधी दिसत असले, तरी ते मो. क. नव्हेत.
तो शब्द 'गांध' येणे अर्थात, ती माशी चावल्यावर ज्या प्रकारचे स्वेलिंग येते, त्याच्याशी संबंधीत आहे.

बॅटमॅन Fri, 19/06/2015 - 20:58

In reply to by आडकित्ता

ओह अच्छा, माहितीकरिता धन्यवाद! हा शब्द नव्यानेच कळाला, नायतर स्वप्न असलेलं ते स्वप्निल तसं गांधी असलेलं गांधील अशा स्युडोव्युत्पत्तिजन्य आत्मरंजनात मग्न झालो होतो. :)

.शुचि. Fri, 19/06/2015 - 20:22

In reply to by रुची

आणि चक्क एक फुलपाखरूही दिसले

रुचि ते मोनार्क असेल व्हर्मॉन्ट मध्ये मोनार्क खूप दिसायची. कॅनडा तेथून जवळच होता.

रोचना Sat, 16/05/2015 - 22:43

कमालीचा योगायोग म्हणजे, वरची पोस्ट टाकताच जोरात वळव्याचा पाऊस सुरू झाला! संध्याकाळभर बाहेर लक्षच नव्हतं. अचानक वीज कडाडली, आणि जोरदार पाऊस. तानसेन ने दिया जलाआआआओ म्हटल्यावर एकदम मेघा आओ रे गाणं चालू झाल्यासारखं झालं हे! :-) दोन-तीन दिवस सलग वळव्याचा पाऊस पडला तरी खरंच उपकार होतील!

आणि हो: या उन्हाळ्यात सगळ्यत सुखी आणि बहरलेली कर्दळीची फुलं:
P1060227

पिवळा डांबिस Sun, 17/05/2015 - 09:55

In reply to by रोचना

योगायोग म्हणजे आमच्याकडेही गेले दोन दिवस (शुक्रवार आणि शनिवार) पाऊस झाला....
पण चार वर्षांत प्रथमच पाऊस झाल्यामुळे आमच्याकडची झाडं आणि फुलं मात्र 'सुखी आणि बहरलेली' न होता,
"च्यायला, हे काय नवीनच! हे वरून पाणी कुठनं आलं?" असं म्हणत बावचळल्यासारखी उभी आहेत!!!!!!
:)

रुची Sun, 17/05/2015 - 20:46

In reply to by पिवळा डांबिस

काल दिवसभर संततधार आणि रात्री थोडासा बर्फ (सकाळ्पर्यंत वितळला) किती पाणी पाहीजेय ते घ्या म्हणून ओतल्यासारखे पाणी. रोचनाच्या 'दिया जलाओ' चालीवर काकुळतीनं "ऊन दिलाओ, बरफ ले जाओ" असा तानसेनी राग गायला हवाय! ते झालं नाही तर सरळ बोरीयाबिस्तर उचलून डोंगरापलिकडच्या ऊबदार प्रदेशात स्थलांतर करायला झालंय. मागच्या बर्फ प्रकरणात झाडे तगली म्हणून सुस्कारा सोडेपर्यंत हे सगळं. वैताग आलाय राव!

रोचना Mon, 18/05/2015 - 11:59

In reply to by रुची

शी, मे महिन्यातच हे तर रोपं बाहेर लावणार कधी? थोडीशी वाढेपर्यंत सप्टेंबर यायचा आणि मग पुन्हा बर्फ हजर! डोंगरापलिकडच्या प्रदेशात अकाली बर्फ कमी असतो का?

रुची Wed, 20/05/2015 - 01:55

In reply to by रोचना

मी एवढी रडारड करते खरी पण तरी इथल्या इवल्याश्या उन्हाळ्यातही अनुभवी बागकामप्रेमी भरपूर पीक काढतात. मे च्या शेवटापर्यंत पेरणी केल्यास आणि त्यानंतर निसर्गाने ऑगस्टपर्यंत साधारण सहकार्य केल्यास शंभराहून अधिक दिवस मिळतात आणि त्यात केल, पालक, बीट, गाजरे, श्रावणघेवडा, मटार, बटाटे, नवलकोल, कांदे, ब्रोकोली, लेट्यूस, अनेक प्रकारच्या बेरीज, काही जातीची सफरचंदे, पेअर्स आणखीही भरपूर काही करता येतं. आमच्या सारख्या नवशिक्यांनाही इतकं करता येत असेल तर मग अनुभवी लोकांना तर बरंच काही जमतं. इतकंच आहे की वेळापत्रक तयार असायला हवं आणि ते काटेकोरपणे पाळायला हवं, एखादा आठवडा गेला तरी काही गोष्टी पेरायला उशीर होऊन गेलेला असतो. शिवाय इथे अचानक अवकाळी हवा पडून (अती थंडी किंवा मधेच गरम) झाडांना बिचकावून टाकण्याचा प्रकार कधीही होत असतो (भरवसा नाही) . यावर्षी एप्रिलपासूनच खूप सुंदर हवा होती त्यामुळे आपल्याला तीन-चार आठवडे जास्त मिळताहेत या आनंदावर या मधेच पडलेल्या बर्फाने थोडं विरजण पडलं पण तशी झाडे ठीक दिसताहेत. शिवाय अल्बर्टा अतिशय सूर्यप्रकाशाचा प्रदेश आहे, थंडी असली तरी लख्ख सूर्यप्रकाश अनेक दिवस मिळत असल्याने झाडे ती ऊबेची कसर प्रकाशाने भरून काढतात. फ्रॉस्ट हार्डी झाडे इथे चांगली येतात.
डोंगरापलिकडे (ब्रिटीश कोलंबियात) त्यामानाने सौम्य हवा असते. तिथला वसंत लवकर सुरू होत आणि उन्हाळा भरवशाचा असतो. तिथल्या ओकनागन भागाला कॅनडाची 'फळांची परडी' समजले जाते आणि तिथे द्राक्षांची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. आपल्या अनेक सरदारजींनी तिकडे जमीनी घेऊन शेतीत जम बसवलाय. 'सरी' नावाच्या भागांत तर दुकानाच्या पाट्यापण पंजाबीत असतात. तिथल्याच एखाद्या कबिल्यात सस्त्रिहकाल म्हणून शिरकाव करावा आणि भेंडी-गवारीची पीक काढावं झालं :-)!

रोचना Fri, 22/05/2015 - 07:25

In reply to by रुची

ओह, *त्या* बाजूला, ओफकोर्स! या बाजूला कुठे आले डोंगर! तिथे गेलात तर मग काही प्रश्नच नाही. ब्रिटिश कोलंबिया इज ट्रूली गॉर्जस.

पिवळा डांबिस Tue, 19/05/2015 - 22:10

In reply to by रोचना

कर्दळ मस्त आहे. माझ्या जुन्या घरी होती. जमिनीत लावलेली असल्याने मागे सोडून यावी लागली.
मी आता इथे सोनटक्का शोधतोय. सोनटक्क्याच्या फुलांचा मंद सुगंध मला फार आवडतो..
इथे क्वचित दिसतो. आपल्याकडचा पांढराशुभ्र असतो, इथला थोडा पिवळसर दिसतो.

परी Tue, 19/05/2015 - 15:33

छोटया जागेत (ग्यालरीत) बाग करण्यासाठी कोणाकडे काही आयडिया असतील तर द्या.कारण आता ग्यालरीत झाडे आहेत पण अजून झाडे लावण्याचा विचार आहे त्यासाठी आयडिया हव्यात.

रोचना Tue, 19/05/2015 - 16:10

आयडिया म्हणजे नेमक्या कसल्या? काय उगवायचं, की कसल्या कुंड्या वापराव्या याबद्दल? सध्या काय झाडं आहेत? दिवसातून बाल्कनीला किती ऊन आणि कधीचं लाभतं? जागा किती बाय किती आहे? वेली चढवायला वाव आहे का? फुलं हवीत की भाज्या? हेल्प अस हेल्प यू :-)!

परी Tue, 19/05/2015 - 17:01

फुलं हवीत की भाज्या
दोन्ही हवंय
वेली चढवायला वाव आहे,ऊन सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत मिळत.सध्या तुळस,गवती चहा,मिरची, कडीपत्ता, दोडका, वाल, आणि झाड आहे पण नाव माहित नाही.मेथी लावली होती पण बोटभरच वाढली मग काढूनच टाकली

रुची Tue, 19/05/2015 - 21:16

In reply to by परी

मेथी थंडीच्या दिवसांतच चांगली येते असे वाटते, माझ्याकडची मेथी मागल्या वर्षी स्नो-स्टॉर्मनंतरही टिकली होती. मोड आणून मग लावल्यास पाने पटकन येतात.
आवडत असल्यास मोहरीही (पानांसाठी) लावता येईल. विदेशी पदार्थ करत असाल तर त्यासाठी लागणारी हर्ब्ज लावता येतील, वास छान येतो आणि भारतात बाजारात या गोष्टी खूप सहजपणे मिळत नाहीत असे ऐकून आहे. त्याशिवाय हळदीच्या पानांसाठी हळद, काकडी, विड्याचे पान (वेल छान दिसतो), फुलांसाठी जाई-जुई अशीही रोपे लावता येतील.

पिवळा डांबिस Tue, 19/05/2015 - 21:56

In reply to by रुची

आवडत असल्यास मोहरीही (पानांसाठी) लावता येईल.

सहमत. मोहरी थंडीत जास्त चांगली येईल असं वाटतं. गेल्या वर्षी लावली होती थोडी.
गेल्या वर्षी मग सरसोंका साग- मकेकी भाकरी हा बेत पाच-सहावेळा करता आला!!
आणि मोहरीची पानं थोडी उग्र असल्याने किडे खात नाहीत असाअ माझा अनुभव.

पिवळा डांबिस Tue, 19/05/2015 - 22:06

In reply to by परी

वेली चढवायला वाव आहे

मग कुठल्याही वेली वाढवू शकता. तुम्ही कुठे रहाता ते माहिती नाही, पण तुमच्या प्रदेशानुसार जाई, जुई, चमेली, मधुमालती, छोटे वेलगुलाब, इत्यादि. भाज्यांमध्ये वाटाणे, काकडी, कारली वगैरे.
भाज्यांमध्ये झाडं लावायची तर टोमॅटो, भेंडी, मिरच्या वगैरे. मेथी सोडून इतर पालेभाज्या गॅलरीत लावण्यबद्दल मी साशंक आहे. पालेभाजी शिजली कि इतकिशी होते. किमान दोन्-तीन जणांना एकदा तरी पोटभर भाजी खाता यावी इतकी पेरायची म्हणजे जागा खूप जाईल. त्यापेक्षा व्हर्टिकल गार्डनिंग जास्त बरं...

परी Wed, 20/05/2015 - 09:29

In reply to by पिवळा डांबिस

सहमत
माहितीबद्दल धन्यवाद.
कारल्याचा वेळ लावला होता ३-४ च खायला मिळाली. बाकी सगळी पिवळी पडली कारली.वेल काढून टाकला.
मी ६ व्या मजल्यावर राहत असल्यामुळे मला झाडे लावण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे.कारण ग्यालरी आहे परंतु परंतु फार मोठी नाही त्याचबरोबर तिथे इतर सामान हि आहे.मला तिथे जास्तीत जास्त झाडे कशी लावता येतील याबद्दल काही आयडिया असेल तर द्यावी.मी ग्यालारीमध्ये कुंड्या ठेवण्यासाठी काही रचना करून घेणार आहे पुढच्या महिन्यात त्यामुळे कदाचित जास्त झाडे लावता येतील मला तिथे. तरीही तुमच्याकडे काही कल्पना असतील तर मला सांगा.

रोचना Tue, 19/05/2015 - 17:44

जास्वंद? मोगरा? त्यासोबत श्रावण घेवड्याची वेल? पाऊस लागायच्या काही दिवस आधी घेवडा, वांगं, गवार, बरंच काही लावता येईल.

रुची Fri, 22/05/2015 - 02:43

यावर्षी 'स्वेअर फूट गार्डनिंग'चा प्रयोग करायचं ठरलं आहे, यात एक फूट बाय एक फूटच्या जागेत वेगवेगळ्या भाज्या लावून जास्तीत जास्त पीक काढण्याचा प्रयत्न असतो. ज्या दोन भाज्यांची मुळे वेगवेगळ्या प्रतलातल्या पोषणासाठी तयार होतात अशा भाज्या एकमेकांच्या अगदी जवळ लावल्या तरी बरेच पीक येते असा तर्क असतो कारण त्या एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत. त्याचबरोबर त्या भाज्यांच्या जमीनीवरचा विस्तार कसा आहे आणि त्या एकमेकांबरोबर सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणार नाहीत ना याचाही विचार करावा लागतो. शिवाय काही वनस्पती, दुसर्या काही वनस्पतींसाठी उपयुक्त वातावरण तयार करतात तर काहींचे विळ्या-भोपळ्याचे सख्य असते त्यामुळे तेही पहावे लागते. खालच्या चित्रातल्या दुसर्या वाफ्याला फार सूर्यप्र्काश मिळत नाही त्यामुळे तिथे फक्त पालेभाज्या लावल्यात ज्याला फार सूर्यप्रकाश नसला तरी चालतो. तीन आनि चार नंबरच्या वाफ्यांना पूर्ण दिवस सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे तिथे तशा भाज्या लावायचा प्रयत्न केला आहे. हे चित्र बनविणे फार मनोरंजक होते (विशेषतः तळटीपा!) आणि वेळ मिळेल तसे त्यात पेरणीच्या तारखाही घालणार आहे.

planter

केशसंभार

रोचना Fri, 22/05/2015 - 07:21

In reply to by रुची

मी तळटीपा पहायच्या आधीच स्केल पाहून मनात "गार्डन गीक्स!" म्हटलं :-)
स्क्वेर फुट चा आराखडा नीट वाचला, आत्ताच तोंडाला पाणी सुटलं. हा बेत आखणे बागकामातले अतिआनंदाचे काम आहे, ना? मी गेल्या हिवाळ्याला कंपॅनियन प्लांटिंगच्या साइटी चाळून चाळून असेच चिक्कार एक्सेल शीट तयार केले होते.

प्लांटर # ३ मधे एखादी फरसबीची वेल टोमॅटो-वांगी थोडी वाढल्यावरही टाकता येईल का? किंवा शेजारी पातीसाठी कांदे?

गेल्या वर्षी दोनच बटाटे लावून ८-१० छोटे बटाटे आले, पण कुंडी फार खोल नव्हती, मला वाढत्या फांद्यांना झाकायला तेवढी जागा मिळाली नाही. यंदा मी वर्षभर सिमेंटची ३ फुट खोल पोती गोळा करतेय खास बटाट्यांसाठी.

ऋता Fri, 22/05/2015 - 09:20

In reply to by रुची

५ बाय १० च्या प्लांटरचे मधले सहा वाफे मधल्या झाडांना धक्का न लागता हात पोहोचायला अवघड वाटत आहेत.
अनेक गोष्टी प्लान करण्यात विचारात घ्याव्या लागतात त्यात कोणती भाजी किती लागते साधारण याचाही विचार करायला हवा (केला असेलही; भेंडीला तीनच वाफे दिसले म्हणून वाट्ल). प्रत्येक वाफ्यातल्या नावाखाली नंबर कसला आहे ?
प्रयोगाला शुभेच्छा !

रुची Tue, 09/06/2015 - 09:58

In reply to by ऋता

मोठ्या वाफ्याच्या नकाशात पुष्कळ बदल झाले पण मधे शक्यतो अशा गोष्टी लावल्या आहेत की ज्या सिझनच्या शेवटी तयार होतील जसे की बटाटे आणि गाजरे. भेंडी कमी लावली आहे कारण इथल्या हवेत तिच्याकडून फार अपेक्षा नाहीत :-). प्रत्येक नावाखालचा नंबर म्हणजे एक चौरस फुटात किती रोपे लावायची याचा आकडा आहे.

ऋता Tue, 09/06/2015 - 16:35

In reply to by रुची

इतक्या मर्यादित वेळेत आणि जागेत पीक काढणं खरच अवघड आहे. पुन्हा शुभेच्छा.

प्रत्येक नावाखालचा नंबर म्हणजे एक चौरस फुटात किती रोपे लावायची याचा आकडा आहे.

ओह ओके.

अमुक Fri, 22/05/2015 - 10:02

In reply to by रुची

मुंबईच्या चाळीत राहताना वरच्या मजल्यांवरून अलगद तरंगत येणारी केसांची गुंतवळं (नेमकी) कुंड्यात, रोपांत विसावताना पाहिली आहेत. कुंडी-ते-मळा या 'स्केल-अप'नुसार गुंतवळाचा 'केशसंभार' झालेला पाहून (तुमच्या प्रतिसादाच्या शेवटी, आकृतीनंतर तो शब्द निवांत विसावला आहे) अंह झालो. ;)

रुची Fri, 22/05/2015 - 20:09

In reply to by अमुक

तू म्हणजे ना...गुंतवळ बरी शोधून काढतोस! अरे, त्या रोपांच्या केशसंभाराबद्दलचे एक वाक्य प्रतिसादात होते ते संपादन करताना काढले वाटतं पण फोटोच्या लिंकनंतर त्यातला एक शब्द न जाणो कसा तो राहिलेला दिसतोय, तो संपादित करून काढणार होते पण तोपर्यंत त्यावर प्रतिसाद आल्याने करता येईना.

ऋता Thu, 28/05/2015 - 09:51

मेडशिंगी आणि लिचीच्या बिया पेरल्या होत्या. दोन्ही उगवून आले आहे. अजून दोनेक महिन्यांनी रोपे जमिनीत लावायचा विचार आहे.
पळसाच्या पेरल्याला महिना होऊन गेलाय पण अजून काही कोंब नाही आला. अनेक वेळा उकरून बीमध्ये काही बदल आहे का ते पहावं वाटतं पण अजून वाट पहावी म्हणते आहे.
पुढ्च्या आठवड्यात सोनसावर आणि बहाव्याच्या बिया पेरणार आहे.

पिवळा डांबिस Sun, 07/06/2015 - 10:39

In reply to by ऋता

लिची आणि पळस म्हणजे काय ते कळलं.
पण मेडशिंगी, सोनसावर आणि बहाव्या म्हणजे काय? कुनी आमच्यासारक्या अडान्याला शानं करंल काय?
कॉलिंग रोचना!!!!!!!

रोचना Sun, 07/06/2015 - 11:29

In reply to by पिवळा डांबिस

मेडशिंगीच्या झाडाला पांढरी फुलं आणि चिंचेसारखी लांब लांब कॅप्स्यूल असतात.

सोनसावरला बाङ्लात शोनाली शिमुल म्हणतात - बटरकप, पिवळी धमक, गोलसर, खोल फुले.

ऋता, बहावा आणि अमलताश एकाच झाडाची नावं आहेत का वेगवेगळ्या प्रजाती आहेत? त्याला पण मेडशिंगीसारखीच लांब "शिंगं" असतात ना?
लिची चे झाड कुंडीत वाढेल का? माझ्या खतात दर वर्षी बियांना कोंब फुटतात, आणि मी ऑफिसच्या माळीला तेथील बागेत लावायला देऊन टाकते. पण गच्चीवर दोन-अडीच फुटाच्या खोल कुंडीत लावता येईल का?

ऋता Mon, 08/06/2015 - 10:55

In reply to by रोचना

बहावा आणि अमलताश एकच. त्याच्या शेंगा फूटभर ते जवळ जवळ हातभर लांब, सरळ,लंबगोलाकार काळ्या रंगाच्या असतात (मेडशिंगीच्या शेंगा चपट्या आणि वक्राकार असतात). मी जमवलेल्या शेंगांमध्ये अळ्यांनी बहुतेक बियांचा फन्ना उडवला होता. काल परत नवीन शेंगा आणल्या आणि आता काही चांगल्या बिया धुवून वाळवल्या आहेत. लवकरच पेरेन.
मेडशिंगीची अनेक झाडे वेताळ टेकडीवर आहेत.
लिचीचं एखादं रोप घरी ठेवणार आणि बाकीची जमिनीत लावणार (कुठे ते अजून नक्की केले नाही.).
सोनसावरीच्या मातीत लावलेल्या बिया काल पाहिल्या...होत्या तशाच कडक आहेत. काही वेगळ्या तर्हेने लावयच्या का, की खूप वेळच लागतो कोंब फुटायाला ही माहिती शोधावी लागेल.

पिवळा डांबिसना उत्तर मिळालेच आहे त्यामुळे वेगळे लिहीत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/06/2015 - 23:17

शेवटी वांग्याच्या एका फुलाचं पोट फुगलेलं दिसतंय.

आणखी दोन फुलांकडून फळाची अपेक्षा आहे. शिवाय बऱ्याच कळ्या आणि फुलं झाडावर आहेत.

मे महिनाभर पावसाळी हवेमुळे अळू वगळता बाकी सगळ्याच झाडांची प्रगती अपेक्षेनुसार झाली नाही. दोन्ही टोमॅटोंच्या कुंड्यांमध्ये पूर येऊन गेला, दोन्ही टोमॅटोंनी मान टाकून आता पुन्हा धरली आहे. पैकी एका झाडाला आता पुन्हा कळ्या दिसत आहेत. हुश्श.
आता दुपारचं तापमान ३० से. पर्यंत जातंय. अळू, वांगं, बेझिल सगळ्यांचेच अच्छे दिन येण्याची वाट पाहत्ये. अळूची गेल्या आठवड्यात दोघांपुरती भाजीही झाली.

पिवळा डांबिस Fri, 12/06/2015 - 23:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटोवरून अंदाज येत नाहिये पण हा अळू भाजीचाच आहे ना नक्की?
नायतर कॅल्शियम ऑक्झलेटचे क्रिस्टल्स किडनीत जाऊन बसायचे!!!

बॅटमॅन Sat, 13/06/2015 - 01:59

In reply to by पिवळा डांबिस

यत्ता सहावी, विषय सामान्य विज्ञान.

शास्त्रीय कारणे द्या: अळू खाल्ल्यावर घशात खवखवते.

उत्तरः अळूतील कॅल्शिअम ऑक्झालेटच्या स्फटिकांमुळे.

अळूच्या भाजीत चिंच का घालतात याचं शास्त्रीय कारण विचारत असत असे आठवते. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/06/2015 - 20:55

In reply to by आडकित्ता

भाजी शिजवताना चिंच घालायची का शिजवल्यानंतर? (आज शिजवल्यानंतर घालणारे कारण आधी चिंच भिजत घालायला विसरले.)

.शुचि. Fri, 19/06/2015 - 22:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी गं नक्कीच. चिंच भिजवून मग भाजीत घालून उकळायची असेल.
क्च्चे शेंगदाणे घालून आई अळूची भाजी करत असे. अफाटच लागे.
___
अदिती अशी कर भाजी सुपर्ब लागते (माझाच धागा)- http://www.misalpav.com/node/17858

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/06/2015 - 22:27

In reply to by .शुचि.

मी स्वयंपाकासाठी येवढे कष्ट घेत नाही. झेपत नाहीत मला.

मी कुकरमध्ये फोडणी* घालून त्यात भिजवलेली चणाडाळ, शेंगदाणे, अळू आणि उलुसा गूळ, गोडा मसाला ढकलून देते. शिटी फडफडेस्तोवर तंगड्या पसरून लोळते. आवाज करायला लागली की उठून गॅस बारीक करून पुन्हा निवांत सात-आठ मिनीटं लोळते. आणि मग गॅस बंद करते. कधी चिंच कुकरात ढकलते, कधी नंतर वाटीमध्ये भाजी वाढताना वरून कोळ घालते. मीठ वेगळं घालत नाही. वाळवलेल्या चिंचेला खडे मीठ आहे, तेवढं (आम्हाला) पुरतं.

*फोडणी कसली, हे ऋषिकेश विचारेल या भीतीपोटी लिहिते. तेलाची फोडणी. तेल तापल्यावर त्यात मोहोरी, जिरं, हळद, हिंग घालते. कढीपत्ता संपला नसेल तर तो पण घालते.

रुची Fri, 19/06/2015 - 22:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पातळ भाज्यांवर वरून घातलेली ठेचलेल्या लसणाची फोडणी अतिशय भारी लागते, मी एकूणच सगळ्या पालेभाज्यांत आवर्जून लसूण घालते.
अलिकडच्या काळात इथे मिळणार्या पालेभाज्या भारतीय पद्धतीने करायला लागल्यापासून त्या गोष्टींसाठी हळहळणे कमी झालेय. उदाहरणार्थ चार्डची पीठ पेरून भाजी उत्कृष्ट होते. डँडीलाईन (लोक उगीचच वीड आहे म्हणून बोंबलतात हिच्याबद्दल) लसणाची फोडणी घालून परतली की चांगली लागते. कोलार्ड ग्रीन्स, बीट ग्रीन्स वगैरे भाज्याही वापरता येतात. सोरेल हा आंबट चुक्याला उत्तम पर्याय आहे.
बागेत लावलेला पालक, मोहरी, चार्ड वगैरेही आता एक-दोन आठवड्यात वापरता येईल. मग रोज आलटून पालटून पातळ नाहीतर सुकी भाजी...स्वर्ग!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/06/2015 - 23:43

In reply to by रुची

मी बीटाच्या पाल्याची पीठ पेरून, भरपूर लसूण घालून भाजी करते. छान लागते. अळूमध्ये मला लसूण फार आवडत नाही, कोरड्या पालेभाज्यांमध्ये किंवा चिंच-गुळाशिवाय केलेल्यांमध्ये लसूण जास्त आवडते. (मी स्वयंपाक करणार म्हणजे माझी रेसिपी, बरा अर्धा करणार असेल तर त्याची रेसिपी अशी सोयीस्कर विभागणी आहे.)

आत्ताच अळूची पातळ भाजी खाल्ली. चिंच वरून घातली. अजूनतरी खवखवत नाहीये, म्हणजे मी भाजी खाल्ली नसावी.

(अवांतर - 'आलो आलो' बघितल्यापासून डँडीलाईन हा शब्द मी न चुकता डँडूलियन असा म्हणते. ग्यड म्यनिंग.)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 15/06/2015 - 18:51

In reply to by पिवळा डांबिस

भाजीचा अळू आणि इतर अळूंमध्ये फरक काय असतो? (आज दिवसभरात आणखी बरा फोटो काढून दाखवते. ज्यांना फरक समजतो त्यांना ते सांगता येईल.)

ही पानं दाखवल्येत ती अळकुड्या पेरून उगवलेली आहेत.

पिवळा डांबिस Tue, 16/06/2015 - 01:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ही पानं दाखवल्येत ती अळकुड्या पेरून उगवलेली आहेत.

विंडियण ग्रोसरी स्टोरात मिळणार्‍या अळकुड्या?
हां, मग तो अळू भाजीचा आहे, किमान त्यापासून तसा काही धोका नाही.
तेंव्हा ओरपा, फदफदं ओरपा! अळुवड्या करून खा!!
करा लेको चैन!!!
:)

चिमणराव Sat, 06/06/2015 - 07:32

खूप दिवसांत वाचन झालं नाही आणि मागे पडलो आहे.उसंत सखू आणि बय्राच जणांचं लेखन आवडलं आहे.निवांतपणे वाचणार आहे. परी यांच्या बाल्कनीत जास्तीत जास्त झाडे कशी लावायची याचं उत्तरही देणार आहे.किंबहुना मी हाच प्रयोग केला आहे.

घेवड्याच्या वेलांस फुलांचे तुरे सतत येत आहेत आणि किटकांची केविलवाणी वाट पाहात आहेत. परंतू किटक येणारच्च नाहीत.
आमच्याकडे दर आठ दिवसांनी डासनिवारक धुर मारत आहेत.आता शहरे ओपरेशन थिअटरसारखी निर्जंतुक करण्याचा चंग बाधला आहे.डास मरोत वा राहोत चांगले कीटकमात्र यमसदनास जात आहेत.शहरातल्या लोकांनी बाल्कनीत फक्त क्रोटोन्स आणि मनीप्लांट छाप वांझोटी झाडे लावावीत आणि नैसर्गिक शेती ओर्गेनिक शेतीच्या नावाने पेपरात मोठ्ठाले लेख टाकून गळा काढावा.

पिवळा डांबिस Sun, 07/06/2015 - 10:35

In reply to by चिमणराव

शहरातल्या लोकांनी बाल्कनीत फक्त क्रोटोन्स आणि मनीप्लांट छाप वांझोटी झाडे लावावीत आणि नैसर्गिक शेती ओर्गेनिक शेतीच्या नावाने पेपरात मोठ्ठाले लेख टाकून गळा काढावा.
खीऽऽऽक!!!!
मस्त वाक्य!!
:)

रोचना Sun, 07/06/2015 - 11:18

In reply to by चिमणराव

आमच्याकडे दर आठ दिवसांनी डासनिवारक धुर मारत आहेत.आता शहरे ओपरेशन थिअटरसारखी निर्जंतुक करण्याचा चंग बाधला आहे.डास मरोत वा राहोत चांगले कीटकमात्र यमसदनास जात आहेत.शहरातल्या लोकांनी बाल्कनीत फक्त क्रोटोन्स आणि मनीप्लांट छाप वांझोटी झाडे लावावीत आणि नैसर्गिक शेती ओर्गेनिक शेतीच्या नावाने पेपरात मोठ्ठाले लेख टाकून गळा काढावा.

खरंच आहे. पण शहरातल्या लोकांनी सुद्धा मोठ्ठाल्ले लेख आणि मनी प्लांटवर समाधाम मानून घेतल्यावर दुसरे काय होणार?

ऋता Mon, 15/06/2015 - 15:00

In reply to by चिमणराव

कीटक इम्म्युन होतील त्या धुराला लवकरच, थोडी वाट पहा.
कीटक नसतील तर ब्रशनेही पॉलिनेशन करतात, तसे करून पाहू शकता. टीव्हीवर एका कार्यक्रमात तर संपूर्ण शेतच (अ‍ॅप्रिकॉट्/आमंड होते बहुतेक) असे पॉलिनेट करताना दाखवले होते...कुठ्ल्याशा फवारणीने मधमाशा गेल्यामुळे तिथे ती परिस्थिती आली होती (नेमके कुठचे दाखवत होते ते आता आठवत नाही).

पिवळा डांबिस Tue, 09/06/2015 - 09:56

In reply to by ऋषिकेश

लोणचं करण्याइतक्या नाहीयेत. प्रत्येक झाडाला २-४च आहेत आणि अजून बेबी आहेत.
पण त्याचबरोबर गेल्या ७-८ दिवसांत हवामान अचानक गरम झाल्याने प्रत्येक मिरचीच्या झाडाला फुलं मात्र मजबूत आली आहेत.
आता त्यातून काही अजून मिरच्या मिळतात का ते पाहू.....
टोमॅटो पिकायला लागले आहेत, आजच चेरी टोमॅटोचे पहिले ३-४ टोमॅटो काढले....
चवळीच्या पाल्याची भाजी केली,कांदा, ओली मिरची आणि ठेचलेली लसूण घालून, मस्त लागली. ही चवळी आम्ही पहिल्यांदाच लावली, थोडंस भीतभीतच! आता पुढल्या बाराला जास्त लावणार!!!

रुची Tue, 09/06/2015 - 09:51

गेले दोन आठवडे निसर्गाने उपकार केल्याने हवामान, तापमान उत्तम होते आणि बराचसा उपलब्ध वेळ बागेत काम करण्यात गेला. आजचे कमाल तापमान चक्क ३३ डीग्री से. होते! त्यामुळे बर्याचश्या पेरलेल्या बिया उगवून आल्या आहेत. पालक, चार्ड, मोहरी, केल वगैरे पालेभाज्या, गाजरे, बटाटे, कांदे, मटार, फरसबी सगळे उगवून आले आहे. घरात सुरू केलेली रोपे दिवसा बाहेर, रात्री बाहेर अशी आठडाभर 'हार्डन' केल्यावर आता जमीनीत लावली आहेत आणि बर्याच टोमॅटोजना फुले आणि एकदोन झाडांना फळेही धरली आहेत. यावर्षी फरसबीची काही रोपे दोन महिने आधी घरात सुरू करण्याचा उपद्व्याप केला आणि बाहेर तापमान वाढण्याआधीच अनेक वेलींना घरातच फुले आली आणि शेंगाही धरल्या. त्यांना छोट्या कुंड्यात आणि घरात पुरेसे पोषण आणि सूर्यप्रकाश मिळणे शक्य नसल्याने एका वेलीला सात-आठ शेंगाहून अधिक काही आले नाही. पुढच्या वर्षी बिया थेट वाफ्यात पेरणार आहे.

रुची Tue, 09/06/2015 - 10:11

In reply to by पिवळा डांबिस

आमच्या हिवाळ्यात दोन फूट बर्फाखाली आणि ऋण पंचवीस डी.से. मध्ये बटाटे असले येतायत :-)! जे काय घ्यायचे ते पीक एप्रिल ते सप्टेंबरमधेच घ्यायला लागते.

पिवळा डांबिस Tue, 09/06/2015 - 10:20

In reply to by रुची

गेल्या वेळेस बहुदा तूच टाकलेल्या बटाट्याच्या फोटोवरून पुनःप्रेरणा घेऊन येत्या विंटरमध्ये बटाटे घ्यायचे असं ठरवून एक ६*४ चा तुकडा आत्ताच भरपूर मल्च घालून राखून ठेवला आहे.
आता त्याचं काय करू?
:(

रुची Tue, 09/06/2015 - 10:38

In reply to by पिवळा डांबिस

बटाटे तयार व्हायला ६०-८० दिवस लागतात त्यामुळे तुम्ही आताही लावू शकाल. मोड आलेले बटाटे असतील तर चार ते सहा इंच खोल जमीनीत पेरा, आठवड्याभरात कोंब येतील, जसे रोप वाढेल तसे खालच्या पानांना मातीखाली घालत ढीग वाढत न्यायचा. रोप सुकून पिवळे पडले की बटाटे तयार झाले असे समजायचे. बटाट्यांसाठी अ‍ॅसिडिक माती अधिक चांगली असते.

रोचना Tue, 09/06/2015 - 11:05

In reply to by पिवळा डांबिस

तुम्ही आत्ता पेरले तरी तुमच्या सो-कॅल हवेत सप्टेंबरपर्यंत चांगले येतील असं वाटतं.

आमची बाग सध्या ठप्प. आजार, प्रवास, प्रचंड ऊन आणि दमट हवा, पावसाचा नामोनिशान नाही, आमचे शेड नेट एकच वादळ आलं त्यात फाटून उडून गेलं, आणि बहुतेक सगळ्या म्हणजे सगळ्या रोपांना किडे लागलेत. मला फवारे मारून कंटाळा आलाय :-( खरंच या उन्हाळाने हैराण केलंय मला. आता काही झाडं उपटून, बोनमील घलून ठेवणार आहे, आणि पावसाळ्यात फक्त शेंगा नवीन लावणार आहे.
जे काय उत्साही प्रयोग करायचे ते सगळे हिवाळ्यात असं ठरवलंय. काम सुद्धा खूप वाढलंय, रोज हवा तितका बागेला वेळ देता येत नाहीये.

आता तुमचे फोटो पाहून समाधान/जळजळ, एवढेच काय ते.

पिवळा डांबिस Fri, 12/06/2015 - 23:36

In reply to by पिवळा डांबिस

तुम्हा दोघींचा सल्ला इचारात घेन्यात आलेला आहे... :)
पण आता पुढले दोन-तीन आठवडे मी प्रवासाला जातोय, परत आलो की बघू जुलैच्या सुरवातीला. नायतर ते कोंब यायचे बटाटयांना आणि नेमका मी तिथे नसल्याने कोळपून जायचे....
तसंही आमच्याकडे सप्टेंबर अखेरीपर्यंत गरम असतं....