खोट्या जगातले खरे लोक

खोट्या जगातले खरे लोक

- अस्वल

.

"शिंग वाजता रॉबिनकरता
शरवुड जंगल भंगेल
गडी लोटतील रंगेल!"

अशी 'रॉबिन हुड'शी झालेली माझी पहिली ओळख मला अजूनही नीट आठवतेय. त्यापूर्वी ह्या रॉबिन हुडबद्दल काहीएक कल्पना नव्हती. मग एकदा बाबांनी कुठलंसं पुस्तक आणून दिलं आणि म्हणाले - वाच. तुला आवडेल हे.
.


हे पुस्तक आता 'मुलांचा लाडका रॉबिन हुड' या नावानं उपलब्ध आहे.

.
बाबांनी 'छान' म्हटल्यामुळे जराशा संशयानेच मी ते पुस्तक उघडलं, पण १-२ पानांतच मी त्यात चिकटलो. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट होती - राजा, युद्धं, ते सरदार आणि काय काय... मग ह्या सग़ळ्यातून वेगळा झालेला लॉक्सले; त्याला नंतर येऊन मिळालेले मित्र - आडदांड धाकला जॉन, टक पुजारी, तांबडा वुईल, रॉबिनची बालमैत्रीण मेरियन आणि म्हातारीची तीन मुलं, त्यातलाच एक तो विली स्ट्यूटली; नॉटिंगहॅमचा कोतवाल, असे सगळे ओळखीचे झाले. धनुष्यबाण घेऊन खतरनाक करामती करणारा असला हिरो न आवडला तरच नवल होतं! जसजसा रॉबिन हुड अंगात भिनत गेला, तसतसे आमच्या घरातल्या हिराच्या केरसुणीला वाईट दिवस येऊ लागले. मग आईने एक दिवस भयानक ओरडा दिल्यावरच माझ्या धनुष्याचा भाता रिकामा झाला. तर थोडक्यात रॉबिनच्या गोष्टीने मला टोटली जिंकून घेतलं होतं! शंभर टक्के.

त्यानंतर एका पुस्तक प्रदर्शनात 'भुताळी जहाज' नावाचं एक पुस्तक दिसल्यावर मी त्यावर उडी टाकली. लहानपणीच पोरका झालेला प्रवीण पतंगे, त्याच्या वडलांच्या मित्राने त्याला दिलेलं ते अजब पत्र आणि तिथून ओनामा होऊन सुरू झालेली ती यात्रा. मग भेटलेले कॅप्टन नायर, शामूभय्या, अण्णा गावडे हे सद्गृहस्थ; तसंच पांडू पाशा आणि लंगडा फकिरा, लुच्चू वगैरे दुष्ट त्रयी. आणि मग सगळ्यांत भारी म्हणजे जपान, होक्काईडो, कामचटाका अशा बर्फाळ आणि दुर्गम प्रदेशातली ती जहाजसफर. "हुहे हुहे ह" असा विचित्र आवाज काढणारं एक पुरातन जहाज....

पुस्तक एका बैठकीत संपवलं हे काय वेगळं सांगायला हवं? भा.रा. भागवतांची चित्रमय शैली यात पुन्हा दिसून आली. जहाजावरचा वादळाचा प्रसंग, दुष्ट त्रयी पत्ते खेळताना (वकई!) प्रवीणवर त्यांनी केलेला हल्ला आणि शेवटचा ग्रँड क्लायमॅक्स - अशा अनेक ठिकाणी भारांची प्रसंग खुबीने वर्णन करण्याची हातोटी परत एकदा अनुभवली. भुताळी जहाजाचाही मी मेजर फ्यान झालो.

ह्या 'इजा बिजा'नंतर तिजा मिळाला तो शाळेतल्या लायब्ररीतूनः फास्टर फेणे!

इथे मात्र मी संपूर्ण भारामय झालो. १०-१२ वर्षांच्या मुलांसाठी जे काही आदर्श आणि रोमांचकारी असू शकेल ते सगळं फाफेला (आणि म्हणूनच मला) अनुभवता येत होतं! साध्या मुंबई पुणे प्रवासात त्याला चिंकू चिंपाझी भेटे. मग तिथून खंडाळ्याचं जंगल आणि मग डायरेक्ट वरळीचा टीव्ही टॉवर! प्रतापगडावर जा - तिकडे कुणी ठग साधू. गुलमर्गला गेला - तिथे पाकिस्तानी हेर. फुरसुंगीचे प्रताप आहेतच. पुणे ही तर त्याची कर्मभूमी. युद्धावेळी गप्प बसला तर तो फाफे कसला? मग नेफापर्यंत जाऊन ये. चित्रपटात काम मिळालं तर तिथेही टिंगो-फिंगोंचा सामना कर! फाफे संकटात सापडत नसे तर संकटंच त्याचा पाठलाग करत येत, त्याला तो तरी काय करेल? बरं, संकट म्हणजे डाकूफिकू असले पाहिजेत असं नाही. मोगलगिद्दीकरांच्या रद्दीचीच गोष्ट घ्या! किंवा मग पानशेतच्या पुराच्या वेळी बन्याने प्रसंगावधान राखून दिलेला तो संदेश, "आम्हा सर्वांची फेफे. लवकर या- फा.फे." नाहीतर मग भूकंपाच्या वेळी गुहेत एकटाच अडकला असतानाही डोक्याचा आणि त्रिशूळाचा सुपीक वापर करणारा फाफे. हे सगळं माझ्या दृष्टीने अद्भुत होतं! बन्या (आणि म्हणूनच मी!) करू शकणार नाही असं काही नव्हतंच.
.

.
बन्या, त्याचे मित्र सुभाष देसाई आणि शरद शास्त्री, बरोबरीला कधी त्यांचे सुर्वे सर, हे सगळे लोक पुण्याला कुठे गेलं म्हणजे भेटतील हा प्रश्न बरेचदा माझ्या मनात घोळला असेल. एके काळी फाफेचा एवढा प्रभाव पडला होता, की मी कुठेही गेलो तरी माझ्यावर संकट यावं अशी प्रार्थना मी करत असे. एका मित्राबरोबर वसईला त्याच्या घरी गेल्यावर तिथे रिक्षा करून कुठेतरी जायचं होतं. पूर्ण प्रवासात मला बरेचदा असं वाटलं होतं की ते रिक्षावाले काका आम्हाला किडन्याप करतील आणि मग आम्हाला फाफेगिरी करून सुटकेची संधी मिळेल! फास्टर फेणे डोक्यातून निघून जायला बरीच वर्षं लागली, आणि तरीही तो तसा गेला नाहीच!
उलट त्याच्या जोडीला 'ज्यूल व्हर्न' साहेबांची नवी साहसं डोक्यात ठाण मांडून बसली! एका मे महिन्याच्या संध्याकाळी घरात पुस्तकांचा एक खोका येऊन पडला.

मी उघडून बघितल्यावर मला त्यात 'चंद्रावर स्वारी' डोकावताना दिसलं. पुन्हा अक्षरश: भान हरपून महिनाभर तो १५ पुस्तकांचा संच मी पुरवून पुरवून वाचला. भारांनी आता आमच्यासाठी सूर्यमालाच उघडून दिली होती. त्यातलं जवळपास संपूर्ण श्रेय अर्थात व्हर्नसाहेबांना दिलं तरी आमच्यासाठी तेव्हा भाराच हिरो होते. पुढल्या आयुष्यात वाचलेल्या सगळ्या विज्ञानकथांच्या मागे भारांची ही ज्यूल व्हर्नची मालिका आहे.

आता मागे वळून बघताना बऱ्याच गोष्टी दिसतात आणि भारांचं अजूनच कौतुक वाटतं.

नंबर एक म्हणजे त्यांची प्रसंग वर्णन करण्याची हातोटी. त्यांचं कुठलंही पुस्तक घेतलं तरी त्यात चित्तथरारक म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांनी प्रसंग रंगवले आहेत. फाफेच्या प्रत्येक कथेमधले प्रसंग त्यांनी तपशीलवार वर्णन करून सांगितलेत. उदा. फाफे आणि गुलमर्गचे गूढ. बन्याचा मित्र अन्वर जेव्हा एका बंगल्याच्या तळघरात कैद होतो तिथला एक प्रसंग आहे. अन्वर तळघरात एकटाच बंदी आहे. घाबरलेला आणि हताश. पण तो स्वत:ला धीर देतो, त्या गडद अंधारात चाचपडत काही मिळतंय का ते अन्वर शोधत असतो. मिट्ट काळोखातल्या अन्वरच्या त्या धडपडीचं वर्णन भारांनी प्रचंड परिणामकारक केलंय. मी तेव्हा Claustrophobia म्हणजे काय हे न समजता निव्वळ ते वर्णन वाचून ती स्थिती अनुभवली होती.

रॉबिन हुडच्या पुस्तकातला एक प्रसंग म्हणजे तिरंदाजीचे सामने! रॉबिनच्या टोळीतील पुंड आणि राजेसाहेबांचे तिरंदाज (गिल्बर्ट प्रभृती) ह्या दोन गटातील सामन्याचं वर्णन एवढं खुमासदार होतं, की मी कित्येकदा तेवढाच भाग पुन्हा पुन्हा वाचायचो. अगदी डोळ्यांपुढे चित्र उभं राहायचं. प्रत्येक बाण सोडल्यावर काय झालं, कसं झालं, ते भा.रा. तिथे बसून आपल्याला सांगताहेत - रनिंग कॉमेंट्रीच जणू!

नंबर दोन म्हणजे भाषांतरावरची हुकूमत. तेव्हा जाणवलं नाही, पण आता समजतं. भारांच्या भाषांतरात कसली सहजता होती! माझ्या दृष्टीने रॉबिन हुड आणि त्याच्या रंगेल गड्यांची मातृभाषा अस्सल मराठी होती. त्यात मला काहीही वावगं वाटलं नाही आणि ते पुस्तक वाचताना अजूनही वाटत नाही! ज्यूल व्हर्नची भाषांतरंही अगदी झकास होती. नंतर काही कृत्रिम भाषांतरं वाचल्यावर मला त्या ज्यूल व्हर्न कथांचं माहात्म्य कळलं. भारांनी निव्वळ अनुवाद केला नव्हता. पाताळलोकच्या अद्भुत यात्रेत जिथे मूळ आल्प्स पर्वत आहे, तिकडे त्यांनी हिमालय आणला, त्याबरोबर संस्कृतात श्लोकही जोडला. पात्रांना जमेल तितकं(च) भारतीय बनवलं आणि त्यांचे संवाद लिहिताना बाजही मराठी ठेवला. किशोरवयातल्या वाचकांना पचेल अशी भाषांतरं केली.

नंबर तीन - विनोद. भारांच्या कुठल्याही पुस्तकात कितीही गंभीर संकटं असली तरी त्यांची सगळी पात्रं एक सॉलिड विनोदबुद्धी बाळगून असत. बिपिन बुकलवार किंवा फाफे गंभीर होऊन आलेल्या संकटावर विचार करतायेत, हे दृश्य माझ्या डोळ्यापुढे येऊच शकत नाही. बन्याचं चित्र त्याच्या मिश्किल लुकलुकत्या डोळ्यांशिवाय समोर आणणं अशक्य! कदाचित त्यात भारांचा स्वभाव डोकावत असेल!

भारांच्याबद्दल कधीच कुठल्या मासिकात वाचलं नाही. कुठल्या चॅनेलवर कधी ते दिसलेत असंही आठवत नाही. त्यांनी मुलाखती, चरित्र किंवा तत्सम काही लिहिलंही असेल, पण ते मला कधी आवर्जून उल्लेखल्याचं स्मरत नाहीये. मात्र भारांच्या काल्पनिक दुनियेतली सगळी सगळी मंडळी मला अजूनही आठवतात. तशीच - अगदी नेमकी. बरेचदा ती माझ्या खऱ्या मित्रांएवढीच जवळचीही वाटली आहेत. त्या खोट्या दुनियेतल्या पात्रांना एवढं खरं बनवू शकणारे भारा माझ्या दृष्टीने एकदम ग्रेट आहेत! माझे मोठेपणी तरी काही आयडॉल वगैरे असल्याचं लक्षात नाही. कदाचित त्यातला फोलपणा समजला असेल! पण लहानपणी आणि किशोरवयात माझे सर्वात आवडते लेखक कोण ह्या प्रश्नाला एकच उत्तर आहे - भा.रा.भागवत!

एकाच गोष्टीचं वाईट वाटतं - त्यांना एकदा प्रत्यक्ष भेटून "तुम्ही माझे खूप आवडते लेखक आहात" असं सांगायचं होतं. माझ्या फाफे संग्रहावर त्यांची सही घ्यायची होती. तेवढं मात्र राहून गेलं. Sad
***
चित्रे: जालावरून साभार

***
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सुप्परलाईक! या हृदयीचे त्या हृदयी वगैरे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हेच म्हणतो.. सर्वच्या सर्व संदर्भ मनात घट्ट असल्याने लेख वाचताना खूपच आनंद झाला.

शेवटच्या भारांना भेटू न शकण्याविषयीच्या वाक्यानिमित्ताने..

शहरात साहित्य संमेलनासाठी आलेले असताना एकदा भारा खुद्द सपत्नीक आमच्या घरी आले होते. तेही माझ्या कुमारवयात मी त्यांच्या पुस्तकांचा सर्वात जास्त फॅन असताना. ते पुष्कळ वेळ गप्पा मारत बसले होते. त्यांच्याशी मी नुसताच बोललो असं नव्हे, तर त्यांच्या "खजिन्याच्या बेटावर संजू राजू" या पुस्तकातल्या तलवारीवर आणि म्यानावर असलेल्या श्लोकांच्या अर्धभागांमधली तार्किक चूकही दाखवून दिली होती. ते शिष्टाचाराला धरुन होतं का? एरवी घरी आलेल्या कोणत्याही मोठ्या पाहुण्याशी त्याचीच चूक दाखवणारं काही बोलण्याचं धाडस झालं असतं का?
नक्कीच नाही,

पण माझ्यासारख्या लहान पोरांसाठी भारा नुसत्या पुस्तकांतूनच किती आपले आणि किती अप्रोचेबल बनून गेले होते हे आत्ता मागे वळून पाहताना जाणवलं.

त्यांनीही ती चूक मोठ्या कौतुकाने मान्य केली आणि प्रकाशकांशी लगेच चेक करतो वगैरे म्हणाले.."बारीक वाचन आहे तुझं" असं ते म्हणाले तेव्हा कॉलर ताठ.

कोंकणातल्या घरी हातपाय वगैरे धुवायला अंगणात, बागेत टाकी किंवा पाण्याचा साठा असतो..साधं भारांना हातपाय धुण्यासाठी मी त्या जागी खास "गाईड" म्हणून सोबत गेलो तेव्हा मोठ्ठी जबाबदारी वाटली होती.

त्यांचं घरी येणं हे, बिलीव्ह मी, त्यावेळी अमिताभ घरी येण्यासारखं वाटलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहरात साहित्य संमेलनासाठी आलेले असताना एकदा भारा खुद्द सपत्नीक आमच्या घरी आले होते. तेही माझ्या कुमारवयात मी त्यांच्या पुस्तकांचा सर्वात जास्त फॅन असताना. ते पुष्कळ वेळ गप्पा मारत बसले होते. त्यांच्याशी मी नुसताच बोललो असं नव्हे, तर त्यांच्या "खजिन्याच्या बेटावर संजू राजू" या पुस्तकातल्या तलवारीवर आणि म्यानावर असलेल्या श्लोकांच्या अर्धभागांमधली तार्किक चूकही दाखवून दिली होती. ते शिष्टाचाराला धरुन होतं का? एरवी घरी आलेल्या कोणत्याही मोठ्या पाहुण्याशी त्याचीच चूक दाखवणारं काही बोलण्याचं धाडस झालं असतं का?

वॉव!
हे वाचताना या अंकाचं मुखपृष्ठ डोळ्यासमोर तरळून गेलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला. रांगड्या मराठी मातृभाषेपुरते बघायचे झाले तर त्या रॉबिन हुडप्रमाणेच शशिकांत कोनकरलिखित "टारझनच्या गोष्टी" या पुस्तकाचेही नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लिहीलयत अस्वलजी. तुमच्या कुमारवयिन दृष्टीकोनातून भारा.
अन त्यातही ती काल्पनिक पात्रे तुम्हाला खर्‍या मित्रांइतकी जवळची वाटलेली - ही कॉम्प्लिमेन्ट तर खासच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतिम लेख. भारांचे तीन स्ट्रॉंग पॉईंट्स, प्रसंग वर्णन करण्याची हातोटी, रूपांतर करताना लागणारी भाषेवरची हुकमत आणि तरल विनोदबुद्धी तुम्ही अत्यंत मार्मिकपणे अधोरेखित केले आहेत.
"भारांच्याबद्दल कधीच कुठल्या मासिकात वाचलं नाही. कुठल्या चॅनेलवर कधी ते दिसलेत असंही आठवत नाही. त्यांनी मुलाखती, चरित्र किंवा तत्सम काही लिहिलंही असेल, पण ते मला कधी आवर्जून उल्लेखल्याचं स्मरत नाहीये. मात्र भारांच्या काल्पनिक दुनियेतली सगळी सगळी मंडळी मला अजूनही आठवतात. तशीच - अगदी नेमकी. बरेचदा ती माझ्या खऱ्या मित्रांएवढीच जवळचीही वाटली आहेत. त्या खोट्या दुनियेतल्या पात्रांना त्यांनी खर्‍या दुनियेत आणलं" हे तुम्ही लिहिलेलं अगदी खरं आहे. १०१% सहमत.
हे सांगताना तुम्ही वाचनसंस्कृतीवर जाताजाता जे भाष्य केलं आहे त्याला दादच द्यायला हवी. कारण खोट्या दुनियेतल्या पात्रांना खर्‍या दुनियेत आणणं हेच तर लेखकाचं काम असतं.
भारांवर मराठी साहित्यजगताने खूप अन्याय केला. तुम्ही म्हणता तसं, त्यांच्यावर कुणी लिहिल्याचं, दूरदर्शनवर त्यांच्यावर काही कार्यक्रम झाल्याचं आठवत नाही.
त्यांच्या निधनानंतर पुण्यात (सदाशिव पेठेत!) शोकसभा झाली त्यावेळी, योगायोगानं पुण्यात असल्यामुळे, मी हजर राहू शकलो. तिथं जेमतेम दहाबारा माणसं होती. एखादा सन्माननीय अपवाद वगळता, आपण वर्तमानपत्रात नेहमी ज्यांची नावं वाचतो त्या मान्यवरांपैकी तिथं कुणीच नव्हतं.
खर्‍या दुनियेतली ही खोटी माणसं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0