ब्रह्मघोटाळ्यात फास्टर फेणे
_____________________________________________________________________________________________________________
.

_____________________________________________________________________________________________________________
.
.
- आदूबाळ
Intelligence Bureau – Docket No. 23016/GTKHC-FST/1991 updated 26/02/2014
***
From: Dr Sharad Shastri [sharad.shastri@iucaa.ernet.in]
Date: Sun, Jan 27, 2013 at 4:13 AM
Subject: Urgent!
To: ████@██. ███. ██ truncated
Banya! See this:
http://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm
What the…! Is this what really happened?!
Regards,
Sharad
***
From: ████@██. ███. ██ truncated
Date: Mon, Jan 28, 2013 at 9:27 AM
Subject: Re: Urgent!
To: Dr Sharad Shastri [sharad.shastri@iucaa.ernet.in]
Meet me at Aniket tomorrow at 10am.
FF
"हु: हु: हु: हु:... बेगीनं आवरा, शास्त्रीबुवा! मेस बंद झाली तर हवा खाऊन झोपावं लागेल आज!"
चौकड्यांच्या शर्टातला किडकिड्या पोरगा आपल्या 'हडकुळीस’ सायकलीच्या थंडगार दांड्याला टेकून हुडहुडला.
डिसेंबरातली संध्याकाळ होती. पुण्यात चांगलीच थंडी पडली होती. विद्याभवनच्या वसतीगृहातली पोरं दिवसा लांबवर सायकलच्या ट्रिपा काढायची, पण संध्याकाळ झाली की हॉस्टेलच्या उबदार हॉलमध्ये झब्बू नाहीतर लॅडिस खेळायची. स्काऊटची जांबोरी त्यावर्षी औंधच्या पुढे, काळेवाडीजवळच्या एका मैदानात भरली होती. सुर्वे सरांनी बसची व्यवस्था करायची तयारी दाखवली होती, पण बनेश उर्फ फास्टर फेणे आणि मित्रांनी हडपसरपासून सायकल राईड करायची ठरवली. जांबोरीत या बालचमूने तुफान मजा केली. दिवसभर दमल्यानंतर जांबोरी संपवून परत येताना शरद शास्त्री उर्फ शास्त्रीबुवांच्या पायात आले पेटके. त्याने सगळ्यांना पुढे जायला सांगितलं, पण बन्याला उगाचच अपराधी वाटायला लागलं. बसचा आरामशीर प्रवास सोडून बन्याच्याच आग्रहाने या पुस्तक-पांडूने सायकलचा दांडू धरला होता. शरदबरोबर बन्याही मागे थांबला.
म्हसोबा गेटजवळ शरदने करंगळी वर केली. बन्या थांबला. एका डेरेदार वटवृक्षाच्या अंधार्या छायेत उभा राहून शरद शेतकी कॉलेजच्या कुंपणाला युरिया अर्पण करत असताना बन्यानेही खाली उतरून पाठ मोकळी केली.
"छ्या:! काय सुनसान असतो हा भाग संध्याकाळचा! नायदर अ सिंगल चिट, नॉर अ सिंगल पाखरू!" बन्या स्वतःशीच म्हणाला.
फास्टर फेणेची वाणी जणू खोटी ठरवण्यासाठी एक फिकट निळ्या रंगाची अँबेसेडर भरधाव वेगाने पुणे युनिवर्सिटीच्या बाजूने आली. पेट्रोल पंपासमोर अँबेसेडरचा वेग अचानक कमी झाला, आणि खिडकीतून काहीतरी पडलं! की टाकलं? अँबेसेडर भरधाव निघून गेली!
"ट्टॉक्!"
पडलेल्या चिटस् उचलायला बन्या धावणार इतक्यात समोरून एक पाखरू आलं. समोरच्या पेट्रोल पंपावरून एक अतिशय सुंदर, गोरी तरुणी घाईघाईने आली, आणि तिने ते पुडकं उचलून आपल्या पर्समध्ये टाकलं!
बन्याला राहावेना.
"एक्सक्यूज मी!"
अंधारातून बाहेर आलेल्या बन्याकडे बघून ती तरुणी दचकली.
"ते तुम्ही आत्ता उचललंत ते... ते आत्ता त्या अँबेसेडरमधून पडलं?"
"काय? नाही ... नाही नाही." तरुणी सारवासारव करत म्हणाली. "माझ्या पर्समध्ये माझेच कागद आहेत. माझ्या नोट्स... एमे करतेय मी, त्याच्या..."
बन्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. "पण आत्ता पाहिलं मी..."
"अं... या अंधारात काहीतरी भास झाला असेल तुला. होतं असं कधीकधी. चल, निघायला हवं मला..."
तरुणीने घाईघाईने रस्ता ओलांडला. त्याच वेळी पेट्रोल पंपावरून एक लुना बाहेर पडत होती. ती घाईघाईने लुनावरच्या तरुणाशी काही बोलली, आणि मागे बसली. लुना युनिवर्सिटीच्या दिशेने निघाली.
"ट्टॉक्!" फास्टर फेणेच्या चेहर्यावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं. भुवया वक्र करून तो लुनाच्या दूरदूर जाणार्या लाल टेल लाईटकडे बघत होता. इतक्यात त्याला मागून कुणीतरी ढोसलं.
"पाहिलं मी सगळं, बन्या." शरद हातात एक कागद फडकावत होता. "हे बघ!"
"हे काय आहे?"
"अरे, ती अँबेसेडर ते पुडकं फेकून गेली. त्या मुलीने ते उचललं. त्या गडबडीत त्या पुडक्यातला एक कागद निसटला, आणि वार्याने उडाला, तो थेट माझ्याकडे." शरदने खुलासा केला.
बन्याने चिमटीत तो कागद धरला, उंदीर धरावा तसा.
"घाबरू नकोस, बन्या. कागद कोरडा आहे! माझी अगस्तीगिरी तोवर संपली होती!"
बन्याने आपल्या पाठपिशवीतून टॉर्च काढला आणि कागद त्या उजेडात धरला.
प्रिंटरवर छापलेल्या कागदाची दुसरी किंवा तिसरी कार्बन प्रत असावी. आकडेच आकडे! आणि काही आकड्यांवर हिरव्या लाल पेनांनी खुणा केल्या होत्या.
"शास्त्रीबुवा, काही प्रकाश पडतोय का?"
"इकडे दे..." कागद आणि टॉर्च शरदने हिसकावून घेतला, आणि कागद पतंगासारखा धरून त्यावर टॉर्चचा झोत फेकला. तीन सिंहांचा वॉटरमार्क उजेडात चमकला.
"ट्टॉक्! हे काय वाट्टेल ते असलं, तरी कॉलेजच्या नोट्स नक्कीच नाहीत."
"फास्टर फेणे, धिस इज समथिंग सीरियस." शरद डोळे तांबारून कागदाकडे पहात होता. "अठरा चौतीस पंचावन्न. त्र्याहात्तर पंचावन्न दहा. आता समजलं का काय आहे?"
"फोन नंबर?" बन्याने लोणकढी ठेवून दिली. "नाही, पण फोन नंबर सहा आकडी असतात."
"पुण्याचे अक्षांश-रेखांश आठवताहेत का?" शरदने विचारलं, आणि उत्तर स्वतःच सांगून टाकलं. "अठरा डिग्री एकतीस मिनिट्स नॉर्थ, आणि त्र्याहात्तर डिग्री पंचावन्न मिनिट्स ईस्ट."
"ट्टॉक्! हे ठिकाणांचे पत्ते आहेत! कोऑर्डिनेट्स!” फास्टर फेणेचं डोकं आता धावायला लागलं होतं. “अठरा चौतीस म्हणजे पुण्याच्या थोडं उत्तरेला, पण त्र्याहात्तर पंचावन्न म्हणजे जवळजवळ पुण्याच्याच रेषेत. याचा अर्थ ... पुण्याच्या डोक्यावरची जागा. ट्टॉक्!" पुणे जिल्ह्याचा नकाशा डोळ्यांसमोर आणत बन्या उद्गारला.
शास्त्रीबुवांच्या डोक्यातल्या अॅटलासने ती जागा आधीच शोधली होती.
"बाकीचेही एअर फोर्सचे विमानतळ असणार." शरद म्हणाला. "उदाहरणार्थ हे बघ - नऊ नऊ नऊ, ब्याण्णव एकोणपन्नास अकरा. हे नक्की अंदमान आहे. पोर्ट ब्लेअरचा अक्षांश अकरा डिग्रीज काहीतरी आहे. पण बन्या... ही काही गुप्त माहिती नाही. तुझ्यामाझ्यासारख्या शाळकरी पोरालाही विमानतळ माहीत असतात."
"ते आहेच रे, पण कागद नीट बघ. हे पहिलं पान वाटतंय, कोणत्यातरी लांबलचक रिपोर्टचं. हा कागद गुप्त आहे. टॉप सीक्रेट! नॉट फॉर एव्हरीबडीज आईज." फास्टर फेणे भुवया आक्रसत म्हणाला.
"गुप्त होता म्हण! तुझ्या मैत्रिणीने बाकीचे कागद गडप केलेच की."
"कागद सीमेपलिकडे पोचण्याआधी आपण परत मिळवू ते तिच्याकडून!" फास्टर फेणे सायकलीचा स्टँड काढत म्हणाला. "आर यू गेम फॉर इट, ओ वाईज मॅन ऑफ ऑटम?"
शरदने काही न बोलता सायकलीचं तोंड युनिव्हर्सिटीच्या दिशेला फिरवलं. त्याचेही खांदे आता फुरफुरायला लागले होते. त्याच्या चष्म्याच्या काचांत चमकणार्या साहसाच्या तेजाकडे बघून बन्याने त्याला दुखर्या पायांची आठवण करून दिली नाही!
"बन्या, काय प्लॅन आहे आता आपला?"
"ती मुलगी म्हणाली की ती एम ए करते आहे. पुणे विद्यापीठात असणार. आणि ती लुनावाल्या बाबाच्या मागे बसून तिकडेच गेली. म्हणजे ती तिकडेच कुठेतरी रहात असणार, बहुतकरून विद्यापीठाच्या हॉस्टेलवर." फास्टर फेणेने डोकं लढवलं.
"काहीही तर्क आहे हां तुझा." विचारवंताला पटेना. "खोटंच सांगितलं असेल तर?"
"शरद, आठव काय झालं ते. मी अचानक तिच्या समोर आलो, आणि ती ते कागद उचलताना मी पाहिलंय असं तिच्या लक्षात आलं. मग तिने काहीतरी बोलून वेळ मारून नेली. अश्या वेळी खोटं काहीतरी सांगायला सुचणं अवघड आहे. आयाम ड्याम शुअर तिचा काही ना काही संबंध विद्यापीठाशी असणारच."
"मग ती लुना पकडायची म्हणतोस?"
"प्रयत्न करायला काय हरकत आहे? अगदी काही नाही, तर विद्यापीठाच्या दारात, कारंज्यासमोर एक पोलीस चौकी आहे. तिथेच नेऊन देऊ आपला - एक्झिबिट ए!"
सायकलींवर टांगा पडल्या, आणि बन्याची "हडकुळी" आणि शरदची "हिंद" लुनाच्या पाठलागावर निघाल्या!
लुना कधीची दिसेनाशी झाली होती. ती एकप्रकारची सायकलच असली तरी त्याला पन्नास सीसीचं स्वयंचलित एंजिन होतं. नुकतंच पेट्रोल पिऊन तिचं ढेरकंही भरलेलं असावं. त्यातून मध्ये दहाएक मिनिटांचा वेळ गेला होता.
सायकल मारता मारता बन्याला अचानक तडकलं.
"शरद!"
शास्त्रीबुवा किंचित मागे पडले होते. फास्टर फेणेच्या, आणि त्याच्या सुप्रसिद्ध हडकुळीच्या, बरोबरीने वेग राखणं त्या पुस्तकी किड्याला जड जात होतं.
"काय रे?" शरदने धापा टाकत विचारलं.
"ती अँबेसेडर! ती होती नक्कीच लष्करी कोट्यातली, पण लष्कराची नव्हती." बन्या म्हणाला.
"कशावरून?"
"लष्कराच्या गाड्यांच्या नंबरप्लेट वेगळ्या असतात रे. सुरुवातीला एक उभा बाण असतो, पुढचे दोन नंबर गाडी कोणत्या वर्षी घेतली त्याचे असतात, पुढे एक मोठा नंबर असतो, आणि शेवटी एक अक्षर असतं. मी गाडीचा नंबर नीट पाहिला नाही, पण बाण नव्हता एवढं नक्की!" बन्या म्हणाला.
"मी पाहिला ना!" शरद म्हणाला. "साधाच होता - तीन अक्षरं, आणि २२७."
"मला समजलं तुझ्या लक्षात का राहिला ते! बावीस सप्तमांश!" बन्या हसला.
फास्टर फेणेच्या डोक्यात चक्रं फिरत होती. अँबेसेडरचा शोध फारसा अवघड जाणार नव्हता. फरासखान्यातले एसीपी बखले बन्याचे चाहते होते - ते झटक्यात शोधून काढतील त्या अस्तनीतल्या सापाला. ते कागद हस्तगत करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी लुनावाला आणि त्याने लिफ्ट दिलेली तरुणी सापडायला हवे होते.
आणि पंधरा मिनिटं भरवेगाने पायडंलं हापसूनही तेच नेमके मिळत नव्हते!
आपल्या प्लॅनबद्दल आता खुद्द फास्टर फेणेलाच शंका येऊ लागली. कशावरून लुना सरळ विद्यापीठाकडेच गेली असेल? मॉडेल कॉलनीतून सेनापती बापट रस्त्याला लागून पसार झाली असेल तर? किंवा रेंजहिल्सवरून पुणे-मुंबई रस्त्याला लागली असेल तर? वाटेतल्या कुठल्या बारक्या गल्लीबोळात वळली असेल तर? लुनावालाच तिचा साथीदार असेल तर?
पण त्याचं मन त्याला सांगत होतं की असं काही नसावं. लुनावाल्याला त्याने एक क्षणभरच पाहिलं होतं, पण तो काही वाकडा वाटत नव्हता - ‘क्रूक’! तो नेमका त्या वेळी तिथे होता, आणि त्या तरुणीने त्याचा वापर करून घेतला. तिला घेऊन जाण्यासाठी वेगळ्या वाहनाची व्यवस्था केली असेल, पण ते यायच्या आधीच आपण तिथे कडमडलो! तो लुनावरचा राजकुमार आपल्या वाटेला जात होता, तेवढ्यांत ही संकटातली राजकन्या भेटली! छे:! राजकन्या कसली? चेटकीच म्हणायची, राजकन्येचं रूप घेऊन आलेली!
"जस्ट यू वेट, मिस क्रूक, जस्ट यू वेट! यू विल बी सॉरी, अॅण्ड युवर टीयर्स विल बी टू लेट!" बन्या गुणगुणला आणि पायडलवरचा पाय जोरात दाबला.
रिझर्व बँक, गवर्मेंट पॉलिटेक्निक मागे पडलं होतं, भोसलेनगरमधल्या बंगल्यांचे दिवे दिसायला लागले होते. आणि तरीही लुना काही दिसत नव्हती.
आणि दिसली!
म्हणजे फक्त लुनाच दिसली. लुनावरचा राजबिंडा आणि राजबिंडी गायब होते.
नजर उचलून बन्याने झगमगती अक्षरं मोठ्याने वाचली. "हॉटेल अशोका - पुरे व्हेज."
"पुरे पुरे." मागून शरद म्हणाला. "चल आत जाऊ. मी दमलोय आणि भूक लागलीय."
हळूच, दबकत दबकत ही जोडगोळी हॉटेलात शिरली. त्यांना हवी होती ती जोडगोळी पलिकडेच एका टेबलावर बसून कॉफी पीत होती. एवढ्या उशीरा, थंडीचं हॉटेलमध्ये कोणीच नव्हतं. तिची हॉटेलच्या दरवाजाकडे पाठ होती - कदाचित ती आता निश्चिंत झाली असावी. एका चोंबड्या पोराला किती ते घाबरायचं?
तरीही बन्याने शरदला फॅमिली रूममध्ये ओढलं. तिथून कॉफी पिणारे दोघं स्पष्ट दिसत होते, पण फडफडत्या दारामुळे हे दोघं बाहेरून दिसत नव्हते.
दोन टोणग्यांना फॅमिली रूममध्ये बघून काळसर गिड्ड्या वेटरने डोळे तांबारले. "ए रूम काली पॅमिली के लिए है..."
"रेहने दो ना अंकल..." बन्याने गूळ लावला. फुरसुंगीला त्यांच्या घरी गुळाच्या काहिलीच असत म्हणा! "पिताजी को पसंद नहीं हम हॉटेल में जाते है. वह देखेंगे तो बहुत बदडेंगे. इसलिये इधर बैठे."
"और तुम्हारे हॉटेल में और हैहिच कौन?" शरदनेही एक ठेवून दिली. "कालीच क्या... गोरी, पिवली, निल्ली कौनसिच फॅमिली नहीं है..."
या मार्याखाली चेचलेल्या वेटरने काढता पाय घेतला. बन्या शरदकडे पाहून हसला.
"पेपर लिहिण्यापेक्षा खरंखुरं हिंदी बोलणं अवघड असतं रे!" शरदने कबुली दिली.
लुनावाला तरुण कावराबावरा दिसत होता. कागदचोर तरुणी आता शांत वाटत असली, तरी तिची नजर भिरभिरत होती.
"तिची पर्स उचलून पसार होऊ या का रे?" फास्टर फेणे म्हणाला.
"काय वेडा आहेस का?" शरदचा श्वास अडकला. "ती चोर चोर म्हणून ओरडा करेल. बाहेरचा वॉचमन आपल्याला धरेल. प्रकरण पोलिसांपर्यंत जायच्या आधीच ती पर्स हस्तगत करून उडून जाईल. आपल्याला तिची चोरी सिद्ध करायची आहे, स्वतःला चोर म्हणून बळी नाही द्यायचं!"
"ऑर्डर?" वेटरबाबा पुन्हा प्रकटले.
"एक व्हेज सँडविच, एक इडली सांबार, एक दहीवडा, एक फिंगर चिप्स, उसके बाद चाय." शरदने ऐटीत ऑर्डर सोडली. "बन्या, तू काय घेणार?"
फास्टर फेणेचा आ वासला होता.
"भूक लागलीय रे..." शरदने इवलुसं तोंड करून खुलासा केला.
"इतना तो लाओ, बाकी बाद में देखेंगे." बन्या वेटरला म्हणाला.
"शास्त्रीबुवा, पैसे आहेत ना? माझ्याकडे चार-पाच रुपयांपेक्षा जास्त नसावेत."
"आहेत रे. बाबांनी इमर्जन्सीसाठी म्हणून पन्नास रुपये हनुमानचड्डीच्या खिशात ठेवायची सवय लावली आहे. देशाचे गुप्त कागद चोरीला जाणं हे इमर्जन्सीत मोडेल बहुतेक."
"बरं, शरद, मी आता हॉटेलच्या गल्ल्यावरून फोन लावतो एसीपी बखल्यांना. त्यांना..." फास्टर फेणेचं हे वाक्य तोंडातच जिरलं, कारण त्या तरुणीने वेटरला खूण केली होती. वेटरने बिल नेऊन दिलं. तरुणीने बिल दिलं, आणि ते दोघंही उठून निघाले.
त्यांचं पाऊल बाहेर पडताच वेटरने फडके, पोछा आणि बादली घेऊन रिकाम्या झालेल्या टेबलकडे धाव घेतली. फॅमिली रुमच्या दिशेने एक चोरटा कटाक्ष टाकला. ढापण्या पोराचं डोकं दिसत होतं. समोर बसलेल्या चौकड्यांच्या शर्टातल्या किडकिड्या पोराशी बोलत असावा. त्यांचं लक्ष नाहीसं बघून खुर्चीवर पडलेली एक प्लॅस्टिकची पिशवी त्याने चटकन बादलीत टाकली, आणि पार्टिशनआड गेला.
पण चौकड्यांच्या शर्टातला किडकिड्या पोरगा ढापण्याच्या समोर नव्हताच. त्याच्या ढेंगेखालून, रांगत रांगत शेजारच्या रिकाम्या फॅमिली रुममध्ये गेला होता. तिथून त्याला ते प्लॅस्टिकच्या पिशवीतलं पार्सल स्पष्ट दिसलं होतं. त्याचा आकार त्याने ओळखला होता आणि काळ्या गिड्ड्या वेटरची त्याने "क्रूक नंबर टू" अशी ओळख पक्की करुन टाकली होती!
रांगत रांगत फास्टर फेणे परत शरदसमोर आला. पण आता त्याच्या डोक्यात प्लॅन पक्का झाला होता.
"शरद, तो वेटर दिसतोय? ही इज अवर मॅन! ते गुप्त कागदांचं पुडकं त्याच्याकडे आहे. तू इथे थांब, एसीपी बखल्यांना फोन कर - चारशे सव्वीस दोनशे बत्तीस. ते येतील आणि याला चतुर्भुज करतील. मी त्या मुलीच्या मागे जातो."
"बन्या, पण मिळाले ना कागद! झालं तर!"
"मिळाले नाहीत अजून, पण मिळतील. ते ठीक आहे रे. ही सगळी साखळीच पकडायला हवी. आपल्या वायुदलातला कोणता ऑफिसर फितूर आहे तेही कळायला हवं. त्यासाठी या मुलीला मोकळं सोडून चालणार नाही."
बन्या वायुवेगाने निघाला. हडकुळीवर टांग टाकून बाहेर आला तेव्हा लुनाचे दिवे दूर गेले होते, पण नजरेच्या टप्प्यात होते. बन्या मागून सुरक्षित अंतर ठेवून निघाला. लुना वेगात जात होती. फास्टर फेणेही फास्ट जात होता, पण त्याच्या हडकुळ्या पायांतली ताकद संपत होती. डोळ्यांसमोर ध्येय होतं, पण पोटात भूक होती.
बन्याच्या अपेक्षेविरुद्ध लुना विद्यापीठात जाण्यासाठी उजवीकडे न वळता भरधाव औंधच्या दिशेने निघाली.
राजभवनपाशी लुनाचा वेग मंदावला आणि लुना थांबली. फास्टर फेणेही सुरक्षित अंतर ठेवून धापा टाकत थांबला. दोन मिनिटांनी लुना परत भरवेगाने निघाली. एका गल्लीत लुना वळली, आणि एका बंगल्यासमोर थांबली. तरुणी आणि राजकुमार बंगल्याच्या आऊटहाऊसच्या दिशेने गेले.
फास्टर फेणे धापा टाकत थांबला. सायकलला कुलूप घालून तो बंगल्याच्या दिशेने जायला लागला, तोच...
...त्याच्या खांद्यावर एक दणकट हात पडला.

.
"किधर जारा, मुन्ने?"
अर्धवट उजेडात फास्टर फेणेने त्या व्यक्तीकडे निरखून पाहिलं. उभट चिंचोळा चेहेरा, सिगरेटने काळपटलेले ओठ. किरकोळ शरीरयष्टीच्या, बन्याहून थोड्याशाच उंच असलेल्या या माणसाच्या पंज्याची पकड मात्र जबरदस्त होती. अजूनही त्याने बन्याच्या खांद्यावरचा हात काढला नव्हता.
"किधरभी नहीं. पानी... पानी चाहिये था, वोही मांगने जा रहा था. आप कौन हो?"
"अभी समझ में आएगा मैं कौन हूँ..." असं म्हणत त्याने अस्पष्टशी शीळ घातली. अंधारातून आणखी तीन माणसं आली, आणि त्यांनी फास्टर फेणेला धरून गल्लीबाहेर, स्ट्रीटलाईटच्या उजेडात नेलं.
"ट्टॉक्!" त्यातल्या एकाला फास्टर फेणेने ओळखलं होतं. "हवालदारदादा! आपलं ... जमादारदादा! ओळखलं का मला? आपण कँपात भेटलो होतो, सित्तरशेठला आणि त्या पळालेल्या कैद्याला धरलं होतंत..."
काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून पळालेला एक कैदी फास्टर फेणेला अचानक दिसला होता. त्याचा पाठलाग करत फास्टर फेणे कँपातल्या सित्तरशेठच्या दुकानी पोचला होता. तिथे या हवालदारसाहेबांच्या मदतीने त्याने तो कैदी आणि साथीदार सित्तर यांची गजाआड पाठवणी केली होती.
पण हे हवालदारदादा इथे... म्हणजे... हा खांदा पकडणारा बुटक्या माणूस...
इकडे हवालदारदादांचा एक एक डोळा भोकराएवढा झाला होता!
"तू!!" ते कुजबुजले. "सर..." असं म्हणून बुटकुल्याच्या कानाशी लागले.
बुटकुल्या सरांच्या आठ्या जिरल्या. त्यांनी थंड डोळ्यांनी फास्टर फेणेकडे पाहिलं.
"होशियार मालूम पडते हो. ये मोरे क्या बता रहा है..." खांद्यावरचा पंजा खाली आला - हस्तांदोलनासाठी. "खान. ब्यूरो."
"म्हणजे इंटलिजन्स ब्यूरो. आयबी." हवालदार मोरेदादा बन्याच्या कानात कुजबुजले. "मी सध्या इकडे डेप्युटेशनवर आहे."
"फास्टर फेणे. विद्याभवन." बन्याने आपला वाळकुडा पंजा त्यांच्या हातात दिला.
"छोटासा हाथ है, पर पकड अच्छी है. पसंद आया." पसंती खानसाहेबांच्या चेहेर्यावर मात्र दिसत नव्हती. तो तसाच निर्विकार होता. "ये बंगले तक कैसे पहुंचे?"
बन्याने सगळी कहाणी त्यांना आपल्या दिव्य हिंदीत ऐकवली. ती ऐकून खानसाहेबांच्या भुवयाही पाव इंच वर सरकल्या. म्हणजे हिंदी ऐकून नव्हे, कहाणी ऐकून!
"बहादूर."
बन्याला पहिल्यांदा वाटलं की उरलेल्या दोघांपैकी कोणाचंतरी नाव बहादूर आहे. मग त्याच्या लक्षात आलं की खानसाहेब त्याचं कौतुक करत होते!
"सर, आप लोग इधर कैसे?" बन्याने त्याला पडलेला प्रश्न विचारला. "मेरा दोस्त शरद उधर अशोका हॉटेल की आघाडी संभाळ रहा है, उसने तो नहीं भेजा आपको?"
"सरद? नहीं." खानसाहेबांनी मान हलवली. "हम यहाँ उन्नीस दिनों से हैं..."
"एकोणीस दिवस चोवीस तास बंगल्यावर लक्ष ठेवून आहोत." मोरेदादांनी माहिती पुरवली. "आज तू आमचा संशय खरा ठरवलास!"
"बाब्बौ!" बन्याचे डोळे विस्फारले. "कंटाळ नहीं जाते क्या?"
"बेटा, मेरे पिछले असाईन्मेंट की बात है. एक रुम में बिजली जलनेकी राह मैं तीन महीनों से देख रहा था! बाहर फुटपाथ पे मोची का काम करता था." खानसाहेब म्हणाले. "खैर! अभी कुछ करने का वक्त आ गया है…."
लेखकाचं निवेदनः
तर आपल्यासाठी ही कहाणी इथेच संपली.
खानसाहेब, मोरे हवालदार आणि त्यांच्या चमूने फितूर ऑफिसर, काळसर गिड्डा वेटर आणि ती तरुणी यांच्या तिहेरी नाड्या कशा आवळल्या आणि वायुसेनेतली गोपनीय कागदपत्रं शत्रूपर्यंत पोहोचवण्याचं कारस्थान कसं उध्वस्त केलं ही कथा इंटलिजन्स ब्यूरोच्या एका फायलीत बंदिस्त आहे. ती फाईल 'द ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट, १९२३' खाली 'क्लासिफाईड' आहे. भारतातल्या कायद्याप्रमाणे अशा फायली कधीच डी-क्लासिफाय होऊन जनतेला वाचायला मिळत नाहीत. त्यामुळे या साहसकथेचा शेवट हा आपल्यासाठी धूसरच रहाणार आहे. हे साधण्यासाठीच शास्त्रीबोवांनीदेखील आपल्या डायरीत सहा वेगवेगळ्या पानांवर काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्यातलं खरं पान कुठचं हे त्याला आणि फास्टर फेणेलाच ठाऊक आहे.
हे प्रकरण इतकं गोपनीय असल्यामुळे ना या बालवीरांचे फोटो पेपरात छापून आले, ना त्यांचा सत्कार झाला. मात्र, असं म्हणतात, की कधीतरी मोरे हवालदारांनी फास्टर फेणेची भेट घेतली आणि एक चिठ्ठी त्याला दिली. त्यावर पेन्सिलीने एक टेलिफोन नंबर खरडलेला होता.
बावीस वर्षांनंतर
शरद शास्त्रीच्या डायरीतून...
पान १ ...... पान २ ...... पान ३ ...... पान ४ ...... पान ५ ...... पान ६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बावीस वर्षांनंतर
शरद शास्त्रीच्या डायरीतून
सांगितल्याप्रमाणे दहा वाजता मी 'अनिकेत'मध्ये पोचलो. खरं तर रोजच्याप्रमाणेच. मी रोज दहा वाजता 'अनिकेत'मध्ये जातो हे बन्याला कसं कळलं हे त्याला विचारण्यात अर्थ नाही. त्याला लेकाला मी रोज बन-आमलेट खातो हेही माहीत असेल. दूरवरचे तारे काय बोलताहेत ते ऐकणं हा जसा माझा व्यवसाय आहे, तसा लोक कधी कुठे काय करतात हे जाणणं त्याचा व्यवसाय आहे!
बन्या माझ्या रोजच्या टेबलापाशी बसला होता. आम्ही मिठी मारली. त्याच्या फासळ्या माझ्या पोटाला बोचल्या, शाळेत बोचत तशाच! तो सध्या कुठे असतो, काय करतो वगैरे विचारण्यात अर्थ नाही, कारण तो सांगणार नाही. इतर मित्रांची चौकशी करण्यात अर्थ नाही - कारण मी सगळ्यांना वेळोवेळी भेटत असतो, आणि बन्या भेटत नसला, तरी त्याला त्यांची खडान् खडा माहिती असणारच!
टेबलावर दोन बन-आमलेटं आली. तेही काम त्याने करून ठेवलं होतं! मग मी सरळ विषयाला हात घातला, आणि त्या लेखाची प्रिंट बन्यासमोर ठेवली.
"वाचलाय." बन्या आमलेट खाताखाता म्हणाला.
"खरं आहे हे सगळं?" मी विचारलं.
"बास का आता! तू होतासच की तिथे!"
"ते झालं रे, बन्या. पुढचं सगळं. आपल्या अपरोक्ष घडलेलं." मी म्हणालो. "ते चार हजार रुपये. त्या वयस्कर बाई. तुमच्यासारख्या अनेकांना या पोरींनी गंडा घातला आहे वगैरे सांगणार्या? खरं आहे?"
"मला काय माहीत खरं का खोटं ते?"
मला हसू आलं. "नाही तर कोणाला माहीत असणार, बन्या?" मी म्हणालो. "खानसाहेबांची चिठ्ठी मिळाली ... तुला. फोन केलास ... तू. पंधराएक वर्षांची सर्व्हिस झाली ... तुझी!"
बन्या काहीच बोलला नाही. बराच वेळ.
"पंधरा वर्षं सर्व्हिस म्हणतोयस तू, शरद, त्यात एक शिकलो. संपूर्ण सत्य - अॅबसोल्यूट ट्रुथ - असं काही नसतं रे. सगळी सत्यं सापेक्ष असतात - रिलेटिव्ह ट्रुथ. ज्याचं त्याचं सत्य. बघणारा बदलतो तसं सत्यही बदलतं - बदललं पाहिजे." बन्या काटाचमचा हलवत म्हणाला. "तुझ्या 'लुनावरच्या राजबिंड्या'ला दिसलेलं सत्य वेगळं. आमच्या फायलीतलं वेगळं."
"उगाच भेंडोळं सोडू नकोस!" माझा वैताग वाढत चालला होता. "त्या लेखाच्या खालच्या कॉमेंट्स वाच. लोकांनी अॅबसोल्यूटली हसं केलंय बिचार्याचं. आणि तू मला रिलेटिव्हिटी शिकव! माझ्या समाधानासाठी सांग - तुला तरी संपूर्ण सत्य माहीत आहे का?"
"तुझ्या समाधानासाठी - हो, मला माहीत आहे."
"कोण होत्या या वयस्कर बाई?"
"असतील कोणी खानसाहेबांच्या सहकारी."
"आणि चार हजार रुपये? त्यांचं काय झालं? ते कुठे गेले?"
बन्या विमनस्क हसला. उरलेला बन-आम्लेटचा घास त्याने न चावताच गिळंकृत केला, आणि माझ्याकडे सूचक नजरेने बघत म्हणाला, "पैसे कुठे जातात? खिशात!"
मी समजलो.
संपूर्ण सत्यही समजलं आणि बन्याचं बोलणंही. पैसे कोणाच्या खिशात गेले ते बन्याने न बोलता माझ्या ध्यानात आणून दिलं होतं. बाहेर पडतापडता मी विचारलं, "बन्या, तू काय करणार आहेस आता?"
कोवळी उन्हं बन्याच्या सावळ्या, हडकुळ्या चेहेर्यावर पडत होती. पण चेहेरा उजळून निघण्याच्या ऐवजी चाळिशीच्या उंबरठ्यावरच चेहर्यावर पडलेल्या बारीक सुरकुत्या ठळक होत होत्या.
माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी फास्टर फेणे म्हणाला, "शरद, एक करशील माझ्यासाठी? हे सगळं लिहून, नोंदवून ठेव कुठेतरी. उद्या माझं काही झालं, तरी माझं सापेक्ष सत्य तुझ्याकडे राहील."
त्याप्रमाणे मी केलंय. ओझं झालंय ते. बन्याशी काहीच संपर्क नाही नंतर...
.
.
चित्र व शीर्षक-सुलेखन : अमुक
पान १ ...... पान २ ...... पान ३ ...... पान ४ ...... पान ५ ...... पान ६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बावीस वर्षांनंतर
शरद शास्त्रीच्या डायरीतून
सांगितल्याप्रमाणे दहा वाजता मी 'अनिकेत'मध्ये पोचलो. खरं तर रोजच्याप्रमाणेच. मी रोज दहा वाजता 'अनिकेत'मध्ये जातो हे बन्याला कसं कळलं हे त्याला विचारण्यात अर्थ नाही. त्याला लेकाला मी रोज बन-आमलेट खातो हेही माहीत असेल. दूरवरचे तारे काय बोलताहेत ते ऐकणं हा जसा माझा व्यवसाय आहे, तसा लोक कधी कुठे काय करतात हे जाणणं त्याचा व्यवसाय आहे!
बन्या माझ्या रोजच्या टेबलापाशी बसला होता. आम्ही मिठी मारली. त्याच्या फासळ्या माझ्या पोटाला बोचल्या, शाळेत बोचत तशाच! तो सध्या कुठे असतो, काय करतो वगैरे विचारण्यात अर्थ नाही, कारण तो सांगणार नाही. इतर मित्रांची चौकशी करण्यात अर्थ नाही - कारण मी सगळ्यांना वेळोवेळी भेटत असतो, आणि बन्या भेटत नसला, तरी त्याला त्यांची खडान् खडा माहिती असणारच!
टेबलावर दोन बन-आमलेटं आली. तेही काम त्याने करून ठेवलं होतं! मग मी सरळ विषयाला हात घातला, आणि त्या लेखाची प्रिंट बन्यासमोर ठेवली.
"वाचलाय." बन्या आमलेट खाताखाता म्हणाला.
"खरं आहे हे सगळं?" मी विचारलं.
"बास का आता! तू होतासच की तिथे!"
"ते झालं रे, बन्या. पुढचं सगळं. आपल्या अपरोक्ष घडलेलं.” मी म्हणालो. “ते चार हजार रुपये. त्या वयस्कर बाई. तुमच्यासारख्या अनेकांना या पोरींनी गंडा घातला आहे वगैरे सांगणार्या? खरं आहे?"
"मला काय माहीत खरं का खोटं ते?"
मला हसू आलं. "नाही तर कोणाला माहीत असणार, बन्या?" मी म्हणालो. "खानसाहेबांची चिठ्ठी मिळाली ... तुला. फोन केलास ... तू. पंधराएक वर्षांची सर्व्हिस झाली ... तुझी!"
बन्या काहीच बोलला नाही. बराच वेळ.
"पंधरा वर्षं सर्व्हिस म्हणतोयस तू, शरद, त्यात एक शिकलो. संपूर्ण सत्य - अॅबसोल्यूट ट्रुथ - असं काही नसतं रे. सगळी सत्यं सापेक्ष असतात - रिलेटिव्ह ट्रुथ. ज्याचं त्याचं सत्य. बघणारा बदलतो तसं सत्यही बदलतं - बदललं पाहिजे." बन्या काटाचमचा हलवत म्हणाला. "तुझ्या 'लुनावरच्या राजबिंड्या'ला दिसलेलं सत्य वेगळं. आमच्या फायलीतलं वेगळं. "
"आणि खानसाहेबांचं वेगळं." मी सहज म्हणालो, पण फास्टर फेणेचा चेहरा पाहून चरकलो. त्याचा हाडकुळा चेहरा तटतटला होता.
"खानसाहेब!" तो तुच्छतेने म्हणाला. "बट येस, त्याचं सत्य नक्कीच वेगळं होतं."
"म्हणजे?" मला काहीच कळेनासं झालं होतं.
"साधा विचार कर, शरद. डेप्युटी डायरेक्टर लेवलचा माणूस - म्हणजे साध्या पोलिसांतली डीआयजी लेवल - दस्तुरखुद्द एका संशयिताच्या बंगल्याबाहेर एकोणीस दिवस गस्त घालत बसेल? फक्त संशय आला म्हणून? बाकी काही उद्योगधंदे नाहीत का त्याला? सगळे जुनियर्स सुट्टीवर गेले का?"
"म्हणजे तुला म्हणायचंय..."
"खानच मेन कव्वा होता रे! ते कागद त्याच्यासाठीच होते. पलीकडे पोचवणारा खानच होता." फास्टर फेणे म्हणाला.
"कायपण फेकू नकोस बन्या. कागद वेटरकडे होते."
"अरे शरद, प्लॅन ए करताना प्लॅन बी, सी आणि डीसुद्धा तयार ठेवावे लागतात." बन्या म्हणाला. "खान तिथे फक्त प्रोटेक्शनसाठी होता. त्याच्या माणसांच्या आणि मुख्य म्हणजे कागदांच्या."
"त्या वयस्कर बाई कोण होत्या?"
"असतील कोणी खानच्या सहकारी."
माझा अजून विश्वास बसत नव्हता. बाहेर पडतापडता मी विचारलं, "बन्या, तुला हे सगळं कधी समजलं?"
"खूप वर्षांनी. चिठ्ठीवरचा नंबर खानच्या बॉसचा होता. त्यांच्यामुळे मी भरती झालो. पण खानबद्दल कोणीच काही बोलेना. खान कुठे दिसेना, भेटेना. बरं, थेट विचारायची सोय नाही. सगळं गुप्त गुप्त रे."
"मग?"
"खूप वर्षांनी एका केसमध्ये ब्यूरोच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या अटकेचा संदर्भ आला. उकरून पाहिलं तर खान! मग सगळी फाईल वाचली." बन्या सांगू लागला. "आपल्या कारनाम्यानंतर दहा दिवसांनी बिहारमधल्या सागौली रेल्वे स्टेशनावर बीएसएफने एकाला पकडलं. आपला मित्र - काळा गिड्डा वेटर! सागौलीपासून नेपाळची सीमा ३० किलोमीटर अंतरावर आहे. खानचे हात तिथे पोचण्याआधी बीएसएफने गिड्ड्याला सोलवटला असावा. तो खानसकट सगळ्यांची नावं ओकला."
"बाप रे! मोठाच गेम होता की! म्हणजे आपले मोरेदादापण त्यात..."
"त्यांचं नाव आलं नाही कधी या प्रकरणात." बन्याने खुलासा केला.
"आणि..." मला थांबवत बन्या हसला.
"चार हजार रुपये ना? गिड्ड्याला पॉकेटमनी म्हणून मिळाले होते!"
.
.
चित्र व शीर्षक-सुलेखन : अमुक
पान १ ...... पान २ ...... पान ३ ...... पान ४ ...... पान ५ ...... पान ६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पान ३
बावीस वर्षांनंतर
शरद शास्त्रीच्या डायरीतून
सांगितल्याप्रमाणे दहा वाजता मी 'अनिकेत'मध्ये पोचलो. खरं तर रोजच्याप्रमाणेच. मी रोज दहा वाजता 'अनिकेत'मध्ये जातो हे बन्याला कसं कळलं हे त्याला विचारण्यात अर्थ नाही. त्याला लेकाला मी रोज बन-आमलेट खातो हेही माहीत असेल. दूरवरचे तारे काय बोलताहेत ते ऐकणं हा जसा माझा व्यवसाय आहे, तसा लोक कधी कुठे काय करतात हे जाणणं त्याचा व्यवसाय आहे!
बन्या माझ्या रोजच्या टेबलापाशी बसला होता. आम्ही मिठी मारली. त्याच्या फासळ्या माझ्या पोटाला बोचल्या, शाळेत बोचत तशाच! तो सध्या कुठे असतो, काय करतो वगैरे विचारण्यात अर्थ नाही, कारण तो सांगणार नाही. इतर मित्रांची चौकशी करण्यात अर्थ नाही - कारण मी सगळ्यांना वेळोवेळी भेटत असतो, आणि बन्या भेटत नसला, तरी त्याला त्यांची खडान् खडा माहिती असणारच!
टेबलावर दोन बन-आमलेटं आली. तेही काम त्याने करून ठेवलं होतं! मग मी सरळ विषयाला हात घातला, आणि त्या लेखाची प्रिंट बन्यासमोर ठेवली.
"वाचलाय." बन्या आमलेट खाताखाता म्हणाला.
"खरं आहे हे सगळं?" मी विचारलं.
"बास का आता! तू होतासच की तिथे!"
"ते झालं रे, बन्या. पुढचं सगळं. आपल्या अपरोक्ष घडलेलं.” मी म्हणालो. “ते चार हजार रुपये. त्या वयस्कर बाई. तुमच्यासारख्या अनेकांना या पोरींनी गंडा घातला आहे वगैरे सांगणार्या? खरं आहे?"
""खरंच म्हणायचं. त्याच्या दृष्टीने खरं. काय संबोधतोस तू त्याला कथेमध्ये? हां - लुनावरचा राजबिंडा."
"तू उत्तर टाळतोयस बन्या" मी वैतागलो.
"शरद, संपूर्ण सत्य - अॅबसोल्यूट ट्रुथ - असं काही नसतं रे. सगळी सत्यं सापेक्ष असतात - रिलेटिव्ह ट्रुथ. तुझ्यापेक्षा जास्त हे कोणाला कळणार?"
"उगाच भेंडोळं सोडू नकोस!" माझा वैताग वाढत चालला होता. "त्या लेखाच्या खालच्या कॉमेंट्स वाच. लोकांनी अॅबसोल्यूटली हसं केलंय बिचार्याचं. आणि तू मला रिलेटिव्हिटी शिकव! माझ्या समाधानासाठी सांग - तुला तरी संपूर्ण सत्य माहीत आहे का?"
"तुझ्या समाधानासाठी - हो, मला माहीत आहे."
"कोण होत्या या वयस्कर बाई?"
"असतील कोणी खानसाहेबांच्या सहकारी."
"आणि चार हजार रुपये? त्यांचं काय झालं? ते कुठे गेले?"
"रीतसर रेड वगैरे घालायची असेल तर असं सलमान खानसारखं दबंगाईने घुसता येत नाही रे. अंगाशी येतं." बन्या म्हणाला. "खानसाहेब फोर्स जमवून तिथे पोचेपर्यंत त्या पोरी कटल्या होत्या तिथून. पैशांसकट."
"आणि कागद?"
"वेटर सापडला. कागदपण. तितकंच. आख्खी साखळी कधी कवेत आलीच नाही." बन्या मान हलवत म्हणाला.
"हे डेंजरस आहे, बन्या."
"म्हणजे काय, आहेच! ब्युरोच्या नव्वद टक्के केसेस अशाच असतात रे. एवढा मोठा देश आहे, हजारो किलोमीटर्सच्या बॉर्डर्स, दोन बाजूंना दोन भोचक शेजारी... चालायचंच. ब्यूरोचं मुख्य काम आगी विझवायचं रे."
असंच काहीबाही बोलून आम्ही निरोप घेतला. फास्टर फेणेच्या कुमारवयीन कारकिर्दीला चिक्कार प्रसिद्धी मिळाली. पण ऐन उमेदीच्या वयातले त्याचे कारनामे अजूनही मळक्या धुळकट फायलींत बंद आहेत. लुनावरच्या राजबिंड्याचा लेख जिथे छापून आला होता ते सदर मात्र मी नेमाने वाचतो. न जाणो, कधीतरी बन्या तिथून परत दर्शन द्यायचा!
.
.
चित्र व शीर्षक-सुलेखन : अमुक
पान १ ...... पान २ ...... पान ३ ...... पान ४ ...... पान ५ ...... पान ६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बावीस वर्षांनंतर
शरद शास्त्रीच्या डायरीतून
सांगितल्याप्रमाणे दहा वाजता मी 'अनिकेत'मध्ये पोचलो. खरं तर रोजच्याप्रमाणेच. मी रोज दहा वाजता 'अनिकेत'मध्ये जातो हे बन्याला कसं कळलं हे त्याला विचारण्यात अर्थ नाही. त्याला लेकाला मी रोज बन-आमलेट खातो हेही माहीत असेल. दूरवरचे तारे काय बोलताहेत ते ऐकणं हा जसा माझा व्यवसाय आहे, तसा लोक कधी कुठे काय करतात हे जाणणं त्याचा व्यवसाय आहे!
बन्या माझ्या रोजच्या टेबलापाशी बसला होता. आम्ही मिठी मारली. त्याच्या फासळ्या माझ्या पोटाला बोचल्या, शाळेत बोचत तशाच! तो सध्या कुठे असतो, काय करतो वगैरे विचारण्यात अर्थ नाही, कारण तो सांगणार नाही. इतर मित्रांची चौकशी करण्यात अर्थ नाही - कारण मी सगळ्यांना वेळोवेळी भेटत असतो, आणि बन्या भेटत नसला, तरी त्याला त्यांची खडान् खडा माहिती असणारच!
टेबलावर दोन बन-आमलेटं आली. तेही काम त्याने करून ठेवलं होतं! मग मी सरळ विषयाला हात घातला, आणि त्या लेखाची प्रिंट बन्यासमोर ठेवली.
"वाचलाय." बन्या आमलेट खाताखाता म्हणाला.
"खरं आहे हे सगळं?" मी विचारलं.
"बास का आता! तू होतासच की तिथे!"
"ते झालं रे, बन्या. पुढचं सगळं. आपल्या अपरोक्ष घडलेलं.” मी म्हणालो. “ते चार हजार रुपये. त्या वयस्कर बाई. तुमच्यासारख्या अनेकांना या पोरींनी गंडा घातला आहे वगैरे सांगणार्या? खरं आहे?"
"मला काय माहीत खरं का खोटं ते?"
मला हसू आलं. "नाही तर कोणाला माहीत असणार, बन्या?" मी म्हणालो. "खानसाहेबांची चिठ्ठी मिळाली ... तुला. फोन केलास ... तू. पंधराएक वर्षांची सर्व्हिस झाली ... तुझी!"
बन्या काहीच बोलला नाही. बराच वेळ.
"पंधरा वर्षं सर्व्हिस म्हणतोयस तू, शरद, त्यात एक शिकलो. संपूर्ण सत्य - अॅबसोल्यूट ट्रुथ - असं काही नसतं रे. सगळी सत्यं सापेक्ष असतात - रिलेटिव्ह ट्रुथ. ज्याचं त्याचं सत्य. बघणारा बदलतो तसं सत्यही बदलतं - बदललं पाहिजे." बन्या काटाचमचा हलवत म्हणाला. "तुझ्या 'लुनावरच्या राजबिंड्या'ला दिसलेलं सत्य वेगळं. आमच्या फायलीतलं वेगळं. "
"आणि खानसाहेबांचं वेगळं." मी सहज म्हणालो, पण फास्टर फेणेचा चेहरा पाहून चरकलो. त्याचा हाडकुळा चेहरा तटतटला होता.
"खानसाहेब!" तो तुच्छतेने म्हणाला. "बट येस, त्याचं सत्य नक्कीच वेगळं होतं."
"म्हणजे?" मला काहीच कळेनासं झालं होतं.
"ही लेट देम गो!" बन्या विषादाने म्हणाला. "जस्ट लाईक दॅट..."
"पण का म्हणून? कशाच्या बदल्यात?"
"कनक किंवा कांता! तो एक विकाऊ माणूस होता, शरद."
माझा अजून विश्वास बसत नव्हता. बाहेर पडतापडता मी विचारलं, "बन्या, तुला हे सगळं कधी समजलं?"
"खूप वर्षांनी. त्याच्या पापाचे घडे शेवटी भरले, आणि त्याला रंगेहाथ पकडला. मी जुनियर होतो तेव्हा, पण काही कारणाने त्याच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरीला उपस्थित होतो. तेव्हा या प्रकरणाचा उल्लेख झाला होता."
"त्या वयस्कर बाई कोण होत्या?"
"असतील कोणी खानच्या सहकारी. ते महत्त्वाचं नाही. पुढचं ऐक." बन्या म्हणाला. “त्या मुलींचं काय झालं ते मात्र मला त्या इन्क्वायरीत समजलं. खानने त्या पोरींना खडकी स्टेशनवरून मध्यरात्रीच्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये बसवून दिलं."
"पण कोणालाच संशय आला नाही? मोरे हवालदार? इतर सहकारी? का ते पण..."
"नसावेत. पण आपल्या वरिष्ठाच्या कामाबाबत संशय घेणं त्यांना योग्य वाटलं नसेल. विचार कर, शरद. डेप्युटी डायरेक्टर लेवलचा माणूस - म्हणजे साध्या पोलिसांतली डीआयजी लेवल. मोरेदादा हवालदार. त्यातून हे साहेब गुप्त-पोलीस पडले ना. गुप्ततेच्या बुरख्याखाली बरीच पापं दडवता येतात."
"आणि खान?" मी अधीरतेने विचारलं. "इन्क्वायरीनंतर त्याचं काय झालं?"
"लुका ब्रासी स्लीप्स विथ द फिशेस." बन्याने समस्यापूर्ती केली.
.
.
चित्र व शीर्षक-सुलेखन : अमुक
पान १ ...... पान २ ...... पान ३ ...... पान ४ ...... पान ५ ...... पान ६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बावीस वर्षांनंतर
शरद शास्त्रीच्या डायरीतून
सांगितल्याप्रमाणे दहा वाजता मी 'अनिकेत'मध्ये पोचलो. खरं तर रोजच्याप्रमाणेच. मी रोज दहा वाजता 'अनिकेत'मध्ये जातो हे बन्याला कसं कळलं हे त्याला विचारण्यात अर्थ नाही. त्याला लेकाला मी रोज बन-आमलेट खातो हेही माहीत असेल. दूरवरचे तारे काय बोलताहेत ते ऐकणं हा जसा माझा व्यवसाय आहे, तसा लोक कधी कुठे काय करतात हे जाणणं त्याचा व्यवसाय आहे!
सव्वादहा वाजले तरी बन्याचा पत्ता नव्हता. हल्ली फास्टर फेणे मोठा साहेब झाला आहे. या शिळोप्याच्या गप्पा मारण्यापेक्षा महत्त्वाचं काही काम असेल.
साडेदहा वाजले. जरा बाहेर उभं राहावं म्हणून मी दाराकडे निघालो, तर वाटेत काऊंटरपाशी शेट्टीने अडवलं.
"सर, वो मॅडम आप को बुला री..."
दोन टेबलं पलीकडून एक चाळिशीतली मध्यमवयीन बाई मला हात करत होती. आधी कधी पाहिलं नव्हतं तिला इथे. मी तिच्याकडे गेलो.
"प्रोफेसर शरद शास्त्री?" तिने विचारलं.
"मीच. आपण?"
ती किंचित हसली. डोळे बारीक करून माझ्याकडे नीट निरखून पाहायला लागली. मला जरा अस्वस्थपणा आला.
"बनेश फेणेने पाठवलंय."
"ओह् अच्छा. तो नंतर येणार आहे का?"
"तो येणार नाहीये. पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत." ती म्हणाली.
मला काहीच समजेना. कोण आहे ही?
"बाहेर बसू या का आपण?" ती म्हणाली. 'अनिकेत' पहिल्यापासूनच अंधारं आहे."
आम्ही पायर्या उतरून मराठी विभागाच्या दिशेने चालायला लागलो.
"ओळखलं नाहीस ना मला, शरद?" ती अचानक एकेरीवर येऊन म्हणाली. "पुष्कळ वर्षं झाली. मीही ओळखलं नसतं."
मला कळेना. "आपण आधी भेटलोय का कुठे?"
ती हसली. "हो. डिसेंबरातल्या संध्याकाळी. इथून चार किलोमीटरवर."
खाड्कन माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! पण...पण...
अभावितपणे मी अंग चोरून घेतलं. "तुम्ही... तू... तुला फास्टर फेणे कसा काय माहीत? नक्की त्यानेच पाठवलंय ना? की...? पण माझी मेल..." मला काही दगाफटका करायचा तर बेत नव्हता? घाबरून मी आजूबाजूला पाहिलं. आम्ही चालत चालत 'खेर वाङ्मय भवना'जवळ पोचलो होतो. आसपास तरुणाईची वर्दळ फुलली होती.
माझी तारांबळ पाहून ती मनसोक्त हसत होती. चाळिशीतही सौंदर्य ओसरलेलं नव्हतं.
"सगळी कथा ऐकायचीय?" तिने विचारलं. मंत्राने भारल्यासारखी मी मान डोलावली. तिने पुढच्या अर्ध्या तासात सांगितलेली अद्भुतरम्य कथा आठवेल तशी लिहितो आहे. काही तपशील सांडलेही असतील.
"ब्लॅकमेल कसं करतात, माहीताहे तुला, शरद? आपलं एखादं गुपित ब्लॅकमेलरला माहीत होतं. ते गुपित फारसं महत्त्वाचं किंवा बेकायदेशीर वगैरे नसतंच, काहीतरी फालतूच असतं. पण आपल्याला भीती असते - ते गुपित जगाला कळलं तर आपली छीथू होईल, लोक काय म्हणतील? ते जगाला न सांगण्याच्या बदल्यात ब्लॅकमेलर आपल्याकडून दुसरं कृत्य घडवतो. ते जाहीर करण्याची भीती घालून तिसरं. अशी साखळी पुढे चालू राहते. ब्लॅकमेल होणारा त्यात अडकत जातो. ब्लॅकमेलरच्या तालावर माकडासारखा नाचत राहतो. स्वतःला दुर्बळ दोषी ठरवत घुमत राहतो.
"त्या खानच्या जाळ्यात मी अशीच अडकले होते. त्याने माझ्याकडून काय काय करवून घेतलं हे आज आठवायला नको वाटतं. स्वतःची घृणा येते. त्यातून मला कळत होतं, की खानचा बॉस कोण आहे, कुठे बसलाय. उद्या कुठल्या शहरात काही वेडंवाकडं घडलं असतं, तर त्याला एका अर्थाने मी जबाबदार असणार होते.
"संरक्षणखात्याचा तो रिपोर्ट मिळवायचा खानचा कट अनेक दिवस शिजत होता. त्यासाठीच्या देवाण-घेवाणीत खानने माझा अनेक वेळेला चलनासारखा वापर केला. डिसेंबरातल्या त्या संध्याकाळी रिपोर्ट अखेर हस्तगत व्हायचा होता. तो ताब्यात घेऊन दरभंगा एक्सप्रेस पकडायची होती. पुढच्या सूचना तिथे मिळणार होत्या.
"खानचा डाव बघ - रिपोर्ट मिळवला माझा वापर करून. तो योग्य व्यक्तीच्या हातात जाणारही माझ्याच हातून. मध्ये काही गडबड झाली तर बळी माझाच जाणार. मी खानचं भांडं फोडलं तरी माझ्यावर विश्वास कोणावर ठेवणार? पुरावा काय होता माझ्याकडे?
"त्या संध्याकाळी रिपोर्ट तर मिळाला. पण तुम्ही दोघं नेमके तिथे कडमडलात, त्यामुळे घाईघाईने मला त्या लुनावाल्याची मदत घ्यावी लागली. हॉटेलमध्ये त्याच्याशी गप्पा झाल्या. बोलण्याच्या नादात त्या भाबड्याने आपल्याकडे मोठी रक्कम रोख असल्याचं सांगितलं. माझ्या डोक्यात दिवे झगमगले! या सगळ्यातून सुटायचा मार्ग दिसला!
"काहीतरी करून त्याच्याकडून ते पैसे मिळवायचे. पळून जायचं. ओळख पुसायची. देशाच्या कोणत्यातरी कोपर्यात जाऊन नवी ओळख घ्यायची. नवी सुरुवात करायची. खानपासून दूर.
"त्या भाबड्या तरुणाला फसवणं जिवावर आलं होतं. पण अशी संधी परत आली नसती. कधीतरी भविष्यात त्याचे पैसे परत करू अशी मनाची समजूत घातली, आणि मी माझा डाव टाकला. त्याच्याकडून चार हजार रुपये कसे मिळवले हे तर तू वाचलंच आहेस.
"पण खान बाहेर होताच. त्याला चुकवून सूंबाल्या कशा करायच्या याच्या विचारात असतानाच सुदैवाने नेमका बनेश तिथे पोचला. त्या वेळी त्याला नावाने ओळखत नसले, तरी रस्त्यात आपल्याला हटकणारा पोरगा हाच हे लक्षात आलं. खानला संकेत दिला. खान बनेशला कटवण्यात मग्न असल्याचा फायदा घेऊन मी तिथून पळाले. भूतकाळ मागे सोडून, पण चार हजार रुपये पर्समध्ये घेऊन.
खडकी रेल्वे स्टेशनवर पोचले तेव्हा नेत्रावती एक्सप्रेस स्टेशनात येत होती. खडकी स्टेशनात गाड्या तीन मिनिटांपेक्षा जास्त थांबत नाहीत. एका डब्यात चढले, आणि दोनेक मिनिटांत गाडी सुटलीच. खडकी, रिपोर्ट, खान, लुना सगळं मागे पडत गेलं. आता मी स्वतंत्र होते, मुक्त होते. चार हजार रुपयांत मला स्वतःला नव्याने घडवायला सज्ज होते."
सगळं ऐकूनही माझ्या मनात एक प्रश्न राहिलाच होता.
"तू फास्टर फेणेला कशी काय ओळखतेस?"
"शरद, ते मी तुला सांगू शकत नाही." ती म्हणाली. "बनेशनेच सांगितलं आहे तसं. वाटलं तर तू त्यालाच विचार."
मी मान हलवली. हे असलं काहीतरी मला अपेक्षितच होतं.
"आणि खान? त्याचं काय झालं पुढे?"
"सांगितलं ना बनेशला विचार." ती निर्णायकपणे म्हणाली. "सगळं गुंतलेलं आहे एकात एक."
मी बन्याला एकदोनदा मेल केली. काही उत्तर आलं नाही. परत कधी भेटला, तर याही प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा आहे.
.
.
चित्र व शीर्षक-सुलेखन : अमुक
पान १ ...... पान २ ...... पान ३ ...... पान ४ ...... पान ५ ...... पान ६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पान ६
बावीस वर्षांनंतर
शरद शास्त्रीच्या डायरीतून
सांगितल्याप्रमाणे दहा वाजता मी 'अनिकेत'मध्ये पोचलो. खरं तर रोजच्याप्रमाणेच. मी रोज दहा वाजता 'अनिकेत'मध्ये जातो हे बन्याला कसं कळलं हे त्याला विचारण्यात अर्थ नाही. त्याला लेकाला मी रोज बन-आमलेट खातो हेही माहीत असेल. दूरवरचे तारे काय बोलताहेत ते ऐकणं हा जसा माझा व्यवसाय आहे, तसा लोक कधी कुठे काय करतात हे जाणणं त्याचा व्यवसाय आहे!
सव्वादहा वाजले तरी बन्याचा पत्ता नव्हता. हल्ली फास्टर फेणे मोठा साहेब झाला आहे. या शिळोप्याच्या गप्पा मारण्यापेक्षा महत्त्वाचं काही काम असेल.
साडेदहा वाजले. जरा बाहेर उभं रहावं म्हणून मी दाराकडे निघालो, तर वाटेत काऊंटरपाशी शेट्टीने अडवलं.
"सर, वो मॅडम आप को बुला री..."
दोन टेबलं पलिकडून एक चाळिशीतली मध्यमवयीन बाई मला हात करत होती. आधी कधी पाहिलं नव्हतं तिला इथे. मी तिच्याकडे गेलो.
"प्रोफेसर शरद शास्त्री?" तिने विचारलं.
"मीच. आपण?"
ती किंचित हसली. डोळे बारीक करून माझ्याकडे नीट निरखून पाहायला लागली. मला जरा अस्वस्थपणा आला.
"बनेश फेणेने पाठवलंय."
"ओह् अच्छा. तो नंतर येणार आहे का?"
"तो येणार नाहीये. पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत." ती म्हणाली.
मला काहीच समजेना. कोण आहे ही?
"बाहेर बसू या का आपण?" ती म्हणाली. 'अनिकेत' पहिल्यापासूनच अंधारं आहे."
आम्ही पायर्या उतरून मराठी विभागाच्या दिशेने चालायला लागलो.
"ओळखलं नाहीस ना मला, शरद?" ती अचानक एकेरीवर येऊन म्हणाली. "पुष्कळ वर्षं झाली. मीही ओळखलं नसतं."
मला कळेना. "आपण आधी भेटलोय का कुठे?"
ती हसली. "हो. डिसेंबरातल्या संध्याकाळी. इथून चार किलोमीटरवर."
खाड्कन माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! पण...पण...
अभावितपणे मी अंग चोरून घेतलं. "तुम्ही... तू... तुला फास्टर फेणे कसा काय माहीत? नक्की त्यानेच पाठवलंय ना? की...? पण माझी मेल..." मला काही दगाफटका करायचा तर बेत नव्हता? घाबरून मी आजूबाजूला पाहिलं. आम्ही चालत चालत 'खेर वाङ्मय भवना'जवळ पोचलो होतो. आसपास तरुणाईची वर्दळ फुलली होती.
माझी तारांबळ पाहून ती मनसोक्त हसत होती. चाळिशीतही सौंदर्य ओसरलेलं नव्हतं.
"सगळी कथा ऐकायचीय?" तिने विचारलं. मंत्राने भारल्यासारखी मी मान डोलावली. तिने पुढच्या अर्ध्या तासात सांगितलेली अद्भुतरम्य कथा आठवेल तशी लिहितो आहे. काही तपशील सांडलेही असतील.
"ब्लॅकमेल कसं करतात, माहीताहे तुला, शरद? आपलं एखादं गुपित ब्लॅकमेलरला माहीत होतं. ते गुपित फारसं महत्त्वाचं किंवा बेकायदेशीर वगैरे नसतंच, काहीतरी फालतूच असतं. पण आपल्याला भीती असते - ते गुपित जगाला कळलं तर आपली छीथू होईल, लोक काय म्हणतील? ते जगाला न सांगण्याच्या बदल्यात ब्लॅकमेलर आपल्याकडून दुसरं कृत्य घडवतो. ते जाहीर करण्याची भीती घालून तिसरं. अशी साखळी पुढे चालू रहाते. ब्लॅकमेल होणारा त्यात अडकत जातो. ब्लॅकमेलरच्या तालावर माकडासारखा नाचत रहातो. स्वतःला दुर्बळ दोषी ठरवत घुमत रहातो.
"त्या खानच्या जाळ्यात मी अशीच अडकले होते. त्याने माझ्याकडून काय काय करवून घेतलं हे आज आठवायला नको वाटतं. स्वतःची घृणा येते. त्यातून मला कळत होतं, की खानचा बॉस कोण आहे, कुठे बसलाय. उद्या कुठल्या शहरात काही वेडंवाकडं घडलं असतं, तर त्याला एका अर्थाने मी जबाबदार असणार होते.
"संरक्षणखात्याचा तो रिपोर्ट मिळवायचा खानचा कट अनेक दिवस शिजत होता. त्यासाठीच्या देवाण-घेवाणीत खानने माझा अनेक वेळेला चलनासारखा वापर केला. डिसेंबरातल्या त्या संध्याकाळी रिपोर्ट अखेर हस्तगत व्हायचा होता. तो ताब्यात घेऊन दरभंगा एक्सप्रेस पकडायची होती. पुढच्या सूचना तिथे मिळणार होत्या.
"खानचा डाव बघ - रिपोर्ट मिळवला माझा वापर करून. तो योग्य व्यक्तीच्या हातात जाणारही माझ्याच हातून. मध्ये काही गडबड झाली तर बळी माझाच जाणार. मी खानचं भांडं फोडलं तरी माझ्यावर विश्वास कोणावर ठेवणार? पुरावा काय होता माझ्याकडे?
"त्या संध्याकाळी रिपोर्ट तर मिळाला. पण तुम्ही दोघं नेमके तिथे कडमडलात, त्यामुळे घाईघाईने मला त्या लुनावाल्याची मदत घ्यावी लागली. हॉटेलमध्ये त्याच्याशी गप्पा झाल्या. बोलण्याच्या नादात त्या भाबड्याने आपल्याकडे मोठी रक्कम रोख असल्याचं सांगितलं. माझ्या डोक्यात दिवे झगमगले! या सगळ्यातून सुटायचा मार्ग दिसला!
"काहीतरी करून त्याच्याकडून ते पैसे मिळवायचे. पळून जायचं. ओळख पुसायची. देशाच्या कोणत्यातरी कोपर्यात जाऊन नवी ओळख घ्यायची. नवी सुरुवात करायची. खानपासून दूर.
"त्या भाबड्या तरुणाला फसवणं जिवावर आलं होतं. पण अशी संधी परत आली नसती. कधीतरी भविष्यात त्याचे पैसे परत करू अशी मनाची समजूत घातली, आणि माझा डाव टाकला. त्याच्याकडून चार हजार रुपये कसे मिळवले हे तर तू वाचलंच आहेस.
"पण खान बाहेर होताच. त्याला चुकवणं काही जमलं नाही. रिपोर्ट आणि चार हजार रुपये, दोन्ही खान गिळंकृत करून बसला!" /i >
"मग पुढे?" मी विचारलं. "कशी सुटलीस खानच्या कचाट्यातून?"
"ती वेगळी कथा आहे. याच्याशी त्याचा संबंध नाही." ती बोलताना जरा अडखळली. बोलावं की न बोलावं असा क्षणभर विचार करून म्हणाली, "त्या कथेतही फास्टर फेणे आहे."
"तू फास्टर फेणेला कशी काय ओळखतेस?"
"शरद, ते मी तुला सांगू शकत नाही." ती म्हणाली. "बनेशनेच सांगितलं आहे तसं. वाटलं तर तू त्यालाच विचार."
मी मान हलवली. हे असलं काहीतरी मला अपेक्षितच होतं.
"आणि खान? त्याचं काय झालं पुढे?"
"सांगितलं ना बनेशला विचार." ती निर्णायकपणे म्हणाली. "सगळं गुंतलेलं आहे एकात एक."
मी बन्याला एकदोनदा मेल केली. काही उत्तर आलं नाही. परत कधी भेटला, तर याही प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा आहे.
.
.
चित्र व शीर्षक-सुलेखन : अमुक
पान १ ...... पान २ ...... पान ३ ...... पान ४ ...... पान ५ ...... पान ६
रेखाचित्र आणि सुलेखनः अमुक