फाफे आणि सोविएत सद्दी

फाफे आणि सोविएत सद्दी

- देवदत्त

.

भा. रा. भागवतांच्या कथा वाचायला नक्की कधी सुरुवात केली ते आठवत नाही, पण सातवी-आठवीपर्यंत फाफे आणि बिबु बऱ्यापैकी वाचून झाले होते. वर्गातल्या सर्वांचीच थोडीबहुत हीच परिस्थिती होती, आणि त्यामुळे सायकलींना ब्येसे, हडकुळी वगैरे म्हणणे हा प्रघातच होता. मिसरूड आणि शिंगे फुटण्याच्या त्या वयात, चौथी-पाचवीत वाचलेले इसापनीतीसारखे बालवाङ्मय बाळबोध वाटत असे आणि 'गोट्या', 'चिंगी', 'गुणसागर टिळक' इत्यादी पुस्तके फारच प्रचारकी वाटत असत. त्यामुळे भारा हे शाळेतल्या बऱ्याच जणांना जणू साहित्याचे कर्तुमकर्तुम बादशहा, अनभिषिक्त सम्राट इत्यादी वाटत. माझ्या मनात त्यांच्या सद्दीला प्रथम शह दिला तो 'देनीसच्या गोष्टी' नामक अनुवादित रशियन पुस्तकाने.

आता हा देनीस कोण? तर 'डेनीस द मेनीस' या अमेरिकन व्यक्तिमत्त्वाशी याचा बिलकूल संबंध नाही. हा आहे विक्तर द्रागून्स्की या लेखकाचा मानसपुत्र – मॉस्कोमध्ये राहणारा एक खोडकर, निरागस मुलगा.

तर हा देनीस पहिल्यांदा दिसला तो एका पुस्तक प्रदर्शनात. हत्तीवर बसलेल्या, हेल्मेट घातलेल्या मुलाचे चित्र असलेलं ते मुखपृष्ठ चित्तवेधक होतंच, आणि सहज मधलं एक पान उघडलं तर तोच पठ्ठ्या सायकलवर बसून झोकात चालला होता आणि आजूबाजूला कौतुकाने बघत काही जण उभे होते.

हे अख्खं पानभर रंगीत चित्र म्हणजे गोट्या, चिंगी, आणि फाफे, बिबुच्या तीनरंगी मुखपृष्ठांच्या खुराकावर वाढलेल्या मला पर्वणीच होती. ही चित्रं अगदी 'किशोर'च्या दिवाळी अंकातल्यापेक्षाही छान होती. आणि तो कागद, पुस्तकाची बांधणी हेसुद्धा फारच निराळं काहीतरी होतं. आईकडे थोडा हट्ट करून 'देनीसच्या गोष्टी' विकत घेतलं आणि भारांचं सिंहासन कुठेतरी थोडंसं डळमळलं.

हा आमचा देनीस कराब्ल्योव्ह शूर, हुशार किंवा महाचतुर नव्हता. आदर्श मुलगा वगैरे तर बिलकूल नव्हता. तो मस्ती करायचा, कुंपणावर चढायचा, खेळाच्या नादात गृहपाठ विसरायचा, नावडता खाऊ खायला नकार द्यायचा, अनोळखी कुत्र्याला घाबरायचा. देनीस कधी फाफेसारखा सुपरहिरो नाही वाटला, आपल्यातलाच वाटला.

आणखी एक गोष्ट म्हणजे देनीसच्या सगळ्या गोष्टी प्रथमपुरुषात होत्या. त्यातले शब्द आणि भावना मुलाच्या दृष्टिकोनातून होते. रटाळ प्रश्न विचारणाऱ्या पाहुण्यांना सामोरे जाणाऱ्या सात वर्षांच्या देनीसपासून सर्कशीतील चेंडूवर नृत्य करणारी मुलगी आवडायला लागलेल्या टीनएजर देनीसचा हा प्रवास आम्हीसुद्धा अनुभवत होतो.

आणि या देनीसच्या निमित्ताने रादुगा प्रकाशन, झूबोवस्की बुलवार अशा मंडळींची ओळख व्हायला सुरुवात झाली. 'देनीसच्या गोष्टी', 'सूर्यावरचे वारे', 'दोन भाऊ', 'इवान', 'माणूस महाबलाढ्य कसा बनला', इत्यादी पुस्तके वाचता वाचता लवकरच या ओळखीचं ऋणानुबंधात रूपांतर झालं. उत्क्रांतीपासून अंतराळविज्ञानापर्यंत विविध विषयांची तोंडओळख करून देणारी आणि नर्म विनोदापासून युद्धाच्या भीषण वास्तवापर्यंत मानवी भावनांचा पट उलगडून दाखवणारी ही सोविएत पुस्तकं त्या काळात एक अमूल्य ठेवा होती.

त्यानंतर भारांची पुस्तकं आणि रशियन पुस्तकं हे दोन्ही वारू समांतर रस्त्यांवरून चौखूर धावू लागले, ते कॉलेजात जाऊन 'पॅपिलॉन' आणि 'डेझर्टर'ची ओळख होईपर्यंत.

सातवी ते दहावीच्या काळातील वाचनाचे सिंहावलोकन (का स्मरणरंजन?) करताना आता त्या दोन समांतर रस्त्यांतील साम्य आणि फरक जाणवतात. ते मांडण्याचा हा एक प्रयत्न.

नमनाला अजून थोडे तेल ओततो. भा. रा. भागवत यांनी बरेचसे वैश्विक साहित्य अनुवादित केले – उदा. ज्यूल व्हर्न, लॉरा इंगाल्स वाईल्डर, इत्यादी. भारांची खास शैली या पुस्तकांमध्येही दिसून येते, पण कथाबीज त्यांचे नसल्याने ही पुस्तके येथील तुलनेत वगळली आहेत. रशियन कुमारसाहित्यातील काही टक्के भागच अनुवादित झाला आहे. त्यामुळे सुमारे १९३५ ते १९८५ या कालावधीत लिहिलेल्या काही पुस्तकांचा विचार केला आहे.

माझ्या मते या दोन साहित्यप्रकारांत सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे भारांच्या बहुतांशी कथांमध्ये प्रमुख पात्र एखाद्या संकटातून मार्ग काढते. 'स्लाईस ऑफ लाईफ' प्रकारचे लेखन जवळपास नाही. याउलट निकोलाय नोसोव, विक्तर द्रागून्स्की यांच्या साहित्यात 'स्लाईस ऑफ लाईफ' पद्धतीचे किस्से आढळतात. गृहपाठ करताना केलेल्या चुका, आगगाडीचा प्रवास अशा साध्यासोप्या प्रसंगांचे चित्रण, नायक आणि खलनायक अशी सरळसोट विभागणी नसलेल्या किश्श्यांमध्ये केले आहे.

भारांच्या कथांमध्ये चांगले आणि वाईट याची स्पष्ट विभागणी असे – इंद्रू इनामदार नेहमी वाईटच असतो. तो कधी चांगुलपणा दाखवतो असे दिसत नाही. आणि नंदू नवाथेचे पराक्रम वगळले तर, कथानायक बहुधा चुकीचे वागत नाही. रशियन कथांमध्ये मात्र मानवी स्वभावाचे कंगोरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

देनीसचंच उदाहरण घ्यायचं झालं तर, शाळेला उशीर झाल्याबद्दल शिक्षा होऊ नये म्हणून तो आगीतून लहान मुलाला वाचविल्याची थाप मारतो. देनीसची आईसुद्धा, त्याने खूप मस्ती करू नये म्हणून त्याच्यावर नजर ठेवणाऱ्या दुर्बिणीचा शोध लावल्याची बतावणी करते, दुसऱ्या एका गोष्टीत कोंबडी शिजवायची जबाबदारी अंगावर पडलेले देनीसचे बाबा चिकनच्या वेगवेगळ्या डिशेसचं पाल्हाळ लावतात आणि शेवटी कोंबडी साफ न करता अख्खीच शिजत ठेवतात. किंवा मारीया पेत्रोवना नावाची 'लठ्ठ थापाडी' देनीसला तलवार देण्याचे खोटे आश्वासन देते, अशा गोष्टी.

पण दुसरीकडे, नावडती पेज खायला चक्क नकार देणारा देनीस, बाबांनी युद्धकालात एकदाच मुश्किलीने मिळालेल्या कलिंगडाची गोष्ट सांगितल्यावर तीच पेज शहाण्यासारखी संपवतो. मित्रांनी खिजवल्यानंतर खूप उंचीवरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारून आपल्याच भीतीवर मात करतो. आणि आपली तान्ही बहीण तिला आंघोळ घालताना घाबरली असता तिला धीर देण्यासाठी आपले बोट धरायला देतो. कोणीच परिपूर्ण नसतं, पण प्रत्येकात एक अंगभूत चांगुलपणा असतो, ही बाब रशियन पुस्तकांनी कुठेतरी बिंबवली. (अर्थात, दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील अर्कादी गैदार यांची पुस्तके याला अपवाद आहेत.)

आणखी एक म्हणजे, भारांची मुख्य पात्रे शहरी वातावरणातील आहेत. बिपिन बुकलवार आणि नंदू नवाथे मुंबईत राहतात. फास्टर फेणे मूळचा फुरसुंगीचा आहे, परंतु त्याची बहुतेक साहसं पुण्यात घडतात. याउलट रशियन पुस्तकांचे नायक विविध ठिकाणचे असतात - 'देनीसच्या गोष्टी'मधील देनीस कराब्ल्योव मॉस्कोमधील मध्यमवर्गीय कुटुंबात राहतो, व्लादिमिर बोगोमोलोव यांचा 'इवान' युद्ध आघाडीवरील खेड्याचा रहिवासी असतो, आणि इतर काही पात्रे शेतांवर राहतात. पण साहसी वृत्ती निर्माण होण्याला पोषक अशी पार्श्वभूमी दोन्हींत दिसते. साता समुद्रांचा आणि अंतराळाचा वेध लागलेले कथानायक कुमार-बालवाङ्मयाचा महत्त्वाचा भाग आहेत.

युद्धाच्या पार्श्वभूमीवरच्या कथा रशियन कुमारसाहित्यात आढळतात – व्लादिमिर बोगोमोलोवची 'इवान', अर्कादी गैदारची 'दोन भाऊ' या कथांमध्ये प्रत्यक्ष युद्धआघाडीचं किंवा त्या काळातील जीवनाचं वर्णन केलं आहे. भारांच्या काही कथांमध्येही युद्धाची पार्श्वभूमी आहे. पण त्यांतील वर्णन बरंचसं बाळबोध आहे. त्यात युद्धाची भयाणता कुठेही व्यक्त होत नाही. फाफे शौर्य दाखवतो त्या गोष्टींमध्ये एखादा भारतीय किंवा शत्रुपक्षाचा सैनिक मृत्युमुखी पडल्याचा उल्लेख आढळत नाही. 'युद्धस्य कथा रम्या' ची अनुभूती भारांच्या कथांतून येते, पण रशियन कथांमध्ये युद्धाचं जळजळीत वास्तव दिसतं.

भारांच्या कथानकांमध्ये मुलींचा सहभाग बहुधा दुय्यम असतो – माली, मोना, सीमा या कथेतील मुख्य किंवा दुय्यम पात्रांच्या बहिणी आहेत. रशियन कथांमध्ये स्वतंत्र स्त्री पात्रे आहेत, परंतु तेथेही त्यांचा कथेतील सहभाग दुय्यम आहे. 'देनीसच्या गोष्टी'मधील आल्योन्का, अर्कादी गैदारच्या कथांमधील मुली यांचा कथानकावर फारसा परिणाम नसतो. पण आईची व्यक्तिरेखा मात्र 'दोन भाऊ'सारख्या कथांमध्ये फार छान रंगवली आहे. नवरा दूर तैगामध्ये काम करत असताना 'चुक' आणि 'गेक'ची आई मॉस्कोसारख्या शहरात मुलांना एकट्याने वाढवते. त्यांना घेऊन ट्रान्स-सैबेरियन रेल्वेचा आणि त्यानंतर घसरगाडीचा प्रवास एकटी करते, भूगर्भतज्ज्ञांच्या निर्जन तळावर राहते, आणि मुलगा हरवल्यावर बंदूक घेऊन त्याच्या शोधात जाते.

आपले कथानक भावुक होऊ नये म्हणून भारांनी मुद्दामच कुटुंबाच्या सदस्यांचा उल्लेख वगळला का? माहीत नाही. पण त्यांच्या बऱ्याचश्या कथांमध्ये कथानायकाच्या कुटुंबाचा अभाव जाणवतो. फाफेच्या कुटुंबाचा थोडा तरी उल्लेख आढळतो, पण बिबुचे नातेवाईक कोण आहेत याची माहिती वाचकांना मिळत नाही. साहसी कुमारकथांचा मापदंड असलेल्या 'ट्रेझर आयलंड'मधील 'जिम हॉकिन्स'च्या आईवडिलांचे कादंबरीत त्रोटक वर्णन आहे. पण 'अडमिरल बेन्बो' खानावळ चालवणारे जिमचे वडील कादंबरीच्या सुरुवातीलाच मृत्युमुखी पडतात आणि त्यानंतर काही दिवसांतच जिम आईचा निरोप घेऊन जहाजावरून कूच करतो. पुढील प्रवासात आणि साहसांत जिमच्या आईचा उल्लेखही येत नाही. (कदाचित या पुस्तकापासूनच ही परंपरा सुरू झाली का?) याउलट 'बाबा जेव्हा लहान होते' या अलेक्सांद्र रास्किन यांच्या पुस्तकातील सर्वच कथांमध्ये नायकाच्या कुटुंबीयांचा मोठा सहभाग आढळतो. (टीप – ही साहस कथा नाही.)

भारांचे एक वैशिष्टय म्हणजे कथानकाच्या अनुषंगाने दिलेली जागतिक इतिहास व भूगोलाची माहिती. 'जयदीपची जंगलयात्रा'चा नायक दक्षिण अमेरिकेत जातो, तर 'भुताळी जहाज'चा नायक पूर्व आशियात. तसंच काही पुस्तकांमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कथानक घडतं. उदा. भारत-चीन युद्ध, पानशेत धरण फुटणं, इ. त्याउलट, सोविएतकालीन रशियन पुस्तकांमध्ये मात्र हा पैलू रशियातील विविध प्रदेशांपुरता सीमित ठेवल्याचं आढळतं. उदा. आर्क्टिक समुद्रात जाणारे वीर, तैगामध्ये जाणारे 'दोन भाऊ'मधील चुक आणि गेक.

भारांच्या कथांमधील शाब्दिक विनोद व शाब्दिक क्लृप्त्या कथांना अधिक रोचक बनवतात. काष्ठशिल्पाचे शुक्लकाष्ट, फाफेची फेफे, मारजॉरी मावशीच्या इमारतीतील मार्जारी, इत्यादी विनोद वाचनानंदात आणि शब्दसंग्रहात भर घालतात. काही वेळा शाब्दिक क्लृप्त्या जागतिक भूगोलावर अवलंबून असल्याने त्यांचा सहजासहजी बोध होत नाही. उदा. 'भुताळी जहाज'मधील 'निपाण' हा Nippon (जपान) या अर्थी उल्लेख, किंवा 'खजिन्याचा शोध'मध्ये ऑस्ट्रेलियातील 'अराफरा' समुद्राचा 'अराफरासी' असा मराठी भासणारा उल्लेख. अशा शब्दांचा भारांनी कथेत मोठ्या खुबीने वापर केला आहे. अशा भाषिक गमतीजमती असल्याच, तर अनुवादाच्या प्रक्रियेत त्या बहुधा लुप्त होत असाव्यात , त्यामुळे अनुवादित रशियन कुमारसाहित्यात समांतर उदाहरणे आढळत नाहीत.

पण सरतेशेवटी भारांची पुस्तकं आणि सोविएत रशियन पुस्तकं या दोन्हींमध्ये संस्कारक्षम कुमार मन विकसित करण्याचे सामर्थ्य होते आणि आहे. साहस, हुशारी, देशप्रेम, कुतूहल, विनोदबुद्धी हे गुण कथानायकांच्या अंगी दाखवून वाचकांमध्येही ते गुण आत्मसात करण्याची इच्छा या दोन्ही साहित्यप्रकारांनी जागृत केली आणि त्यामुळेच ते साहित्य केवळ 'बालिश' न राहता अभिजात वाङ्मयाचा एक मोठा ठेवा बनले आहे.

इंग्रजीतून हिंदीत व तेथून मराठीत 'किशोर'च्या दिवाळी (१९८५) अंकाद्वारे मुलांपर्यंत पोहोचलेले सोविएत साहित्य

-----

सर्व चित्रे: देवदत्त यांच्याकडून.
शेवटच्या चित्रपट्टीचे संस्करण: अमुक, देवदत्त.

***
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख आवडला. मीर आणि रादुगा प्रकाशनाने एक समयी पूर्ण गारुड केले होते त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लेख! देनिसच्या गोष्टींचं गारूड उतरता उतरत नाही हेच खरं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टिपं न गाळणारं स्मरणरंजन लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख छानच आहे. पण आता नुसती तुलना न करता, एकूणच मराठीत आलेल्या रशियन पुस्तकांवरती एक स्वतंत्र लेख येऊ द्या बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख नि सर्व मुद्दे आवडले. अजून थोडं विस्तार आवडला असता.
मेघनाला दुजोरा - फक्त सोविएत पुस्तकांवरचा विस्तृत लेख वाचायला खरोखरीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0