यशाची गुरुकिल्ली

अशोक शंकर चव्हाण नावाची अनेक माणसं आपल्याला महाराष्ट्राभर सहज सापडतील. परंतु त्यापैकी मुख्यमंत्रीपद भूषविणारे मा. अशोक(राव) शंकर(राव) चव्हाण हे एकमेव असतील. व इतरामध्ये कुणी शेतमजूर, कुणी गवंडी, कुणी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कारकून वा कुणी वरच्या हुद्यावरील अधिकारी..... अशी असू शकतील. एकजण यशाची पायरी चढत चढत वरपर्यंत पोचतो व इतर मात्र जीवनाच्या रहाटगाडग्यात अडकून पडलेले, कसेतरी दिवस ढकलत असलेले सापडतील. हे असे का? या प्रश्नाचे उत्तर तसे सोपे नाही. काहींना यशाची गुरुकिल्ली सापडते व ते पुढे पुढे जात ते आयुष्यात यशस्वी होतात, व इतर त्यापासून वंचित आहेत एवढेच आपण म्हणू शकतो.
यशासंबंधी विचार करताना यश हे विविध प्रकारच्या घटकांवर अवलंबून असून हे सर्व घटक एकमेकाशी निगडित आहेत हे लक्षात येईल. आई-वडील, भाऊ- बहिणी, घरातील इतर वरिष्ठ नातलग, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शाळा-कॉलेजमधील वरच्या वर्गातील मित्र – मैत्रिणी (peers) इत्यादी सर्वजणांचा आपल्या यशापयशात वाटा असतो. जनुकीय जडणघडण, शाळा-कॉलेजचे वातावरण, सरावासाठी देत असलेला वेळ व घेत असलेले कष्ट, स्वत:मधील उर्मी, संस्कृतीचा वारसा, पिढीजात गुणविशेष, यश मिळवण्यासाठी निवडलेले क्षेत्र, त्या क्षेत्राची बलस्थाने व मर्यादा, (व शेवटी योगायोगाचा (नशिबाचा?) भाग...) इत्यादी अनेक घटक आपल्याला घडवत असतात व आपले यश या सर्व घटकांशी जोडलेली असते. यामुळे यशाचे वैज्ञानिक विश्लेषण करणे अत्यंत अडचणीचे ठरते. फार फार तर आपण यशाचे एखादे सांखिकीय (स्टॅटिस्टिकल) प्रारूप शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु यश मिळवण्यासाठी यापैकीच्या प्रत्येक घटकाची टक्केवारी काय असू शकेल याचा अंदाज हा हवामानाच्या अंदाजाइतकाच अत्यंत बेभरवश्याचा ठरेल. कारण यातील प्रत्येक घटक इतर घटकावर काय परिणाम करतात व त्या व्यक्तीवर त्याचे कसे परिणाम होतात हेच कळेनासे होते.
खुल्या बाजारात यशाची गुरुकिल्ली आम्हालाच सापडली आहे असे छातीठोकपणे दावे करणाऱ्या हजारो पुस्तकांची रेलचेल आहे. सकारात्मक दृष्टिकोन, अथक परिश्रम, संधीचा उपयोग, सुसंवाद, वेळेचे व्यवस्थापन, .... इत्यादी शब्दांची आतिषबाजी करून लिहिलेली पुस्तकं वाचून कुणी यशाच्या शिखरावर पोचलेली उदाहरणं क्वचितच सापडतील. फार फार तर या (महागडया व चकचकीत मुखपृष्ठाच्या!) पुस्तकांच्या जोरदार खपामुळे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक व पुस्तकविक्रीचे दुकानदार यांच्या उत्पन्नात मात्र भर पडलेली दिसेल. यश इतकी सहजपणे मिळणारी चीज असल्यास अशा प्रकारची पुस्तकं लिहिणारेच यशाच्या शिखरावर कायमचेच तळ ठोकून राहिले असते. परंतु टिप्पिंग पॉइंट या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक माल्कम ग्लाडवेल यांचे आउटलायर्स: स्टोरी ऑफ सक्सेस हे पुस्तक अशा गल्लाभरू पुस्तकांमध्ये एक अपवाद म्हणूनच उठून दिसेल.
या लेखकाच्या मते यशस्वितेच्या शिखरावरील माणसं सेल्फ मेड नसून काही सुप्त लाभदायी घटक, मिळालेली अपूर्व संधी व सांस्कृतिक वारसा यांच्यामुळे त्यांच्या आकलनात, परिश्रम करण्यात व इतरापेक्षा जगाकडे पाहण्याच्या वेगळया दृष्टिकोनात फरक पडत गेला व यशाची पायरी चढत चढत ते वरपर्यंत पोचले.
मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स हे स्मार्ट आहेत याबद्दल दुमत नसावे. परंतु त्यांच्या चाणाक्षपणाच्या मागे श्रीमंत आई-वडील, शालेय शिक्षणाच्या कालखंडात संगणकांशी त्यांची जडलेली मैत्री, व संगणक हाताळण्यासाठी मिळालेला अवसर ही कारणं नजरे आड करता येत नाहीत. गेट्स शिकत असलेल्या सीऍटलच्या त्या शाळेतील संगणकांना मेन फ्रेम संगणकाशी जोडलेले असल्यामुळे भरपूर नवीन गोष्टी शिकणे त्यांना शक्य झाले. अशा प्रकारचे शालेय वातावरण त्या काळात अमेरिकेतसुध्दा दुर्मिळच होते. शिवाय संगणक क्षेत्र भरारी घेण्याच्या पावित्र्याच्या कालखंडात बिल गेट्सचा जन्म झाल्यामुळे तेही त्याला लाभदायी ठरले. म्हणूनच बिल गेट्सनी मिळालेल्या या अपूर्व संधीचे सोने करून संगणक प्रणालीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवू शकला, यात काही नवल नाही.
मोझार्ट (1756-1791) या नावाची जादू पाश्चात्य संगीत क्षेत्रातून अजूनही ओसरली नाही. वयाच्या सहाव्या वर्षापासून तो संगीताचे धडे गिरवत होता. आपल्या येथील सतारवादक रवीशंकर, सरोदवादक अमजाद अली खान, तबलापटू झाकीर हुसेन इत्यादी दिग्गजांनीसुध्दा आपापल्या बालपणात भरपूर खस्ता खाल्या. स्वत:च्या गुरूंच्या तालमीत 12 ते 18 तास, सतत, न कंटाळता रियाज केले. उमेदवारीच्या काळात घेतलेल्या परिश्रमामुळेच नंतरच्या काळात ते प्रसिध्दीच्या शिखरावर चढू शकले. 1960च्या दशकात पॉप या संगीतप्रकारात अत्यंत लोकप्रिय झालेल्या बीटल्स ग्रुपला प्रसिध्दीच्या झोतात येण्यापूर्वी जर्मनीतील हॅम्बर्ग येथे 1200 प्रयोग व 10000 तासांचा सराव केल्याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणे अशक्य झाले असते. अनेक अत्युत्तम खेळाडूंना सुरुवातीच्या काळात मिळालेली संधी व उत्तेजनामुळेच ते आता दिग्गज म्हणून नावाजलेले आहेत. सुनील गावसकर वा सचिन तेंडुलकर बरोबर गल्लीबोळात क्रिकेट खेळलेले अनेक बालमित्र असतील. परंतु हे दोघेच परिश्रम, उपजत क्रीडाकौशल्य व शिक्षकांकडून मिळालेल्या योग्य प्रशिक्षणामुळे कुठल्या कुठे पोचले. नाव कमावले. करोडोंनी पैसा कमावला. इतर बालमित्र मात्र तसेच राहिले. अमेरिका वा युरोपमधील नावाजलेल्या विद्यापीठामधून वरच्या क्रमांकात उत्तीर्ण होणाऱ्यामध्ये बहुतेक विद्यार्थी एशिया खंडातील भात-शेतीच्या परंपरेतून आलेले असतात. जेव्हा एशियन देशातील विद्यार्थी उन्हाळा व हिवाळयाच्या सुट्टीतसुध्दा दिवसा व रात्री अभ्यास करत असतात तेव्हा त्यांच्याच देशातील विद्यार्थी मॉल्सच्या कट्टयावर बसून चकाटया पिटत असतात.
काल्डवेलच्या मते समाजगटाचा इतिहास, समाजगटाचा वारसा व मिळालेली संधी इत्यादींच्या फलितातूनच चाइल्ड प्रॉडिजी वा विलक्षण बुध्दीमत्ता असलेले जन्मास येतात. नाव कमावतात. यश म्हणजे काही अपवादात्मक प्रक्रिया वा चमत्कृतीपूर्ण कृती असे काही नसून काही विशिष्ट परिस्थिती व इतर अनेक सहायक घटक यांच्या गुणोत्तरातून मिळालेले फलित असते. मुळातच यशस्वी सर्जनशील व्यक्ती कळत न कळत चिकित्सकपणे विचार करत आपले स्थान पक्के करून घेत असते.
परंतु ही तर्क पध्दती योग्य वाटत असली तरी ती तितकीशी सुसंगत नाही. फ्रँक सलोवे या अभ्यासकाच्या मते सर्जनशीलता ही काही आकाशातून पडणारी वस्तू नव्हे. तुम्ही त्याची वाट बघत बसल्यास ती काही मिळणार नाही. संधी अशी कधी चालत चालत तुमच्यापर्यंत येत नसते. सर्जनशील व्यक्ती संधीचीच निर्मिती करत असतात. चार्ल्स डार्विनला बीगल या जहाजावर निसर्गनिरीक्षकाचे काम मिळाले म्हणून तो उत्क्रांतीची कल्पना मांडू शकला, या विधानाला काही अर्थ नाही. बीगलवरील ऑफर जरी त्याला मिळाली नसती तरीसुध्दा तो त्यापूर्वीच कॅनरी बेटावरील प्रवासाच्या तयारीत होता. त्यामुळे उत्क्रांतीवादाचे विचार डार्विनच्या डोक्यात घोळत असावेत व बीगलच्या प्रवासात त्यामध्ये सुसूत्रता आली व संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले, असे म्हणणे योग्य ठरेल. बीटल्स ग्रुपला हॅम्बर्गला जाण्याची संधी मिळाली नसती तर ते आणखी कुठे तरी जाऊन 10000 तास सराव करून प्रसिध्दी मिळवू शकले असते. गेट्सच्या यशाचे गुपित त्याला लहानपणी मिळालेल्या संगणक सुविधेत आहे हे विधान त्याच्यावर अन्याय करणारे ठरेल. संगणक प्रणालीऐवजी आणखी कुठल्याही क्षेत्रासाठी त्याच्यातील सर्जनशीलता वापरली असती तरी त्याला यश प्राप्त झाले असते. मोझार्ट वा रवीशंकर चाइल्ड प्रॉडिजी होते हे नाकारण्यात हशील नाही. केवळ सांस्कृतिक वारश्यामुळे वा अथक परिश्रमामुळेच ते अत्युच्च शिखरापर्यंत पोचले, हे चुकीचे ठरेल.
10000 तास रियाज केल्यानंतरच कौशल्य प्राप्त होते यालाही तसा कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. एका संशोधकाच्या मते डार्विनच्या सिध्दांताप्रमाणे यशस्वितेतही वैविध्य व निवड या प्रक्रियांचा मोठा वाटा असतो. सर्जनशील बुध्दीवंत फार मोठया प्रमाणात विविध कल्पनांना जन्म देतो व त्यातील काही निवडक कल्पनांचा मागोवा घेत असतो. मागोवा घेत असतानाच त्यांच्या सादरीकरणाविषयी विचार करतो. काही आडाखे बांधतो. त्यातील पुनरुक्ती टाळतो व त्यात बंदिस्तपणा आणतो. हे निवडीचे कौशल्यच त्याला यशाच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोचवते. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये शेकडो राग-रागिण्या आहेत व शेकडो गायन-वादन कलाकार आहेत. परंतु काही कलाकारांचे ठराविक रागच आपल्याला वेगळया उंचीवर नेऊन सोडतात. अभिजात कलाकारांची खरी कसोटी रागाची निवड, राग विस्तार व रसिकांची आवड ओळखून रागाचे प्रस्तुतीकरण यावर निर्भर असते. कुमार गंधर्व यानी आपल्या आयुष्यभरात संगीताविषयी अनेक धाडसी प्रयोग केले. परंतु काही निवडक प्रयोगानाच रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लता मंगेशकराच्या हजारो गाण्यामध्ये फार फार तर पन्नासेक गाणी आपल्या लक्षात राहतात. त्यामुळे सर्जनशील कलाकारांनासुध्दा काही कष्ट न करता यश पदरात पाडून घेता येते, हे तितकेसे खरे नाही. वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातील एखादं संशोधन पारितोषकयोग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी उल्लेखांकाचा (सायटेशन इंडेक्स) निकष लावला जातो. इतर संशोधकांनी आपल्या निबंधासाठी या शोधनिबंधाचा संदर्भ म्हणून किती वेळा वापरला यावरून संशोधनाची उपयुक्तता ठरवली जात असते. ज्या संशोधन निबंधाचा उल्लेखांक जास्त ते संशोधन पारितोषक योग्य असे समजले जाते.
जो सर्जनशील बुध्दीवंत समाजोपयोगी कृती देतो त्याचेच समाज जास्त कौतुक करत असते. त्यामुळे विलक्षण बुध्दीचातुर्य असलेल्यांनी समाजाला सादर केलेल्या अभिजात कृतीवरूनच त्यांच्या सर्जनशीलतेचे मापन केले जाते. त्या तुलनेने इतर सर्व घटक गौण ठरतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet