काय होता तो गूढ आवाज? भाग १.

एक मनुष्य आपल्या गाडीने जात असता रस्त्यात त्याची गाडी बंद पडली. रात्रहि होऊ लागली होती. आसपास कोठे मदत मिळेल काय म्हणून पाहतो तो त्याला बुद्ध भिक्षूंचा एक मठ दिसला. तेथे जाऊन त्याने दार ठोठावले. एका भिक्षूने दार उघडले. गाडीवाल्याने त्याला आपली अडचण सांगितली आणि काही मदत मिळेल का असे विचारले. भिक्षु म्हणला, "आता फार रात्र होऊ लागली आहे पण काही अडचण नाही. आपण आनंदाने जेवणखाण करून रात्र आमच्या मठात काढा. उद्या सकाळपर्यंत तुमची गाडी दुरुस्त होऊन तुम्हाला मिळेल." ह्या अनपेक्षित मदतीने खूष होऊन गाडीवाला मठातील त्याला दाखवलेल्या खोलीकडे गेला आणि जेवण करून लवकरच घोरू लागला. अर्ध्या रात्रीत त्याला जाग आली कारण मठातून खोलवरून एक वेगळाच आवाज ऐकू येऊ लागला. तसा आवाज त्याने पूर्वी कधीच ऐकला नव्ह्ता. हा काय आवाज आहे अशा विचारात त्याने उरली रात्र तळमळतच काढली.

सकाळीच कालचा भिक्षु गाडी दुरुस्त झाल्याची सुवार्ता घेऊन आला. एव्हांना गाडीवाल्याची उत्सुकता फारच ताणली गेली होती. "तो रात्रीचा आवाज काय होता?" त्याने भिक्षूला विचारले. "आवाज होता पण तो काय होता हे मी तुम्हाला सांगू शकत नाही." भिक्षु म्हणाला. "का बरे?" असा प्रश्न गाडीवाल्याने केल्यावर भिक्षूने उत्तर दिले, "तुम्ही भिक्षू नाही, त्यामुळे हे उत्तर मी तुम्हाला सांगू शकत नाही." निराश होऊन गाडीवाला दुरुस्तीबद्दल भिक्षूला धन्यवाद देऊन आपल्या मार्गाला लागला.

१० वर्षे लोटली. कर्मधर्मसंयोगाने गाडीवाला त्याच मठावरून गाडीने जात असता पूर्वीच्याच प्रमाणे आणि त्याच ठिकाणी त्याची गाडी बंद पडली. पण आता त्याला ठाऊक होते की मठात आपल्याला निश्चित मदत मिळणार. गेल्या वेळेप्रमाणे त्याने पुनः मठाचे दार ठोठावले. पूर्वीच्याच भिक्षूने पुनः दार उघडले आणि गेल्या वेळेप्रमाणेच पुनः रात्रीचा मुक्काम आणि गाडीची दुरुस्ती अशी मदत त्याने गाडीवाल्याला देऊ केली. त्याला खोलीहि पूर्वीचीच दिली. गेल्या वेळेप्रमाणेच जेवणखाण उरकून गाडीवाला पलंगावर पडला पण ह्यावेळेस त्याला झोप येईना. गेल्या वेळेप्रमाणेच आवाज पुनः ऐकू येईल काय अशा चिन्तेने त्याने अर्धी रात्र तळमळत काढली आणि sure enough पुनः तोच पूर्वी कधी न ऐकलेला आवाज त्याच्या कानावर पडू लागला. आपली उत्सुकता दाबून उतावळेपणात त्याने उरलेली रात्र कशीबशी काढली आणि सकाळी गाडीची किल्ली घेऊन आलेल्या भिक्षूला त्याने तोच प्रश्न केला - "तो आवाज काय होता?" "आवाज होता पण तो काय होता हे मी तुम्हाला सांगू शकत नाही." भिक्षु म्हणाला. "का बरे?" असा प्रश्न गाडीवाल्याने केल्यावर भिक्षूने उत्तर दिले, "तुम्ही भिक्षू नाही, त्यामुळे हे उत्तर मी तुम्हाला सांगू शकत नाही."

ह्यावेळेस प्रश्नाचा चिकाटीने पाठपुरावा करायचा असे ठरवून गाडीवाल्याने विचारले, "मी भिक्षु झालो तर मला उत्तर मिळेल का?" "अर्थात्! का नाही? तुम्ही भिक्षु व्हा. आम्ही तुम्हाला उत्तर सांगू." " कसे होता येईल मला भिक्षु ? तुम्हीच द्याल का मला दीक्षा?" गाडीवाल्याने मोठया काकुळतीने विचारले. "आम्ही तुम्हाला दीक्षा अवश्य देऊ पण त्यासाठी तुम्हाला आमच्या दोन प्रश्नांच्या कसोटीला १०० टक्के बरोबर उत्तर देता आले पाहिजे." "मी तयार आहे. सांगा मला प्रश्न." गाडीवाला आशेने म्हणाला.

"जगात एकूण गवताची पाती किती आहेत आणि वाळूचे कण किती आहेत अशी मोजदाद करून आम्हाला सांगा. तुमचे उत्तर बिनचूक असले तर आम्ही तुम्हाला भिक्षु करून घेऊ." भिक्षु म्हणाला.

प्रश्न ऐकून दुसरा एखादा आवाजाचा नाद सोडून चालायला लागला असता पण गूढ आवाज काय होता हे जाणून घ्यायचे भूत मानेवर स्वार झाल्यामुळे गाडीवाल्याने हे आह्वान स्वीकारले. आपले बाकीचे आयुष्य सोडून देऊन गवताच्या पात्यांची आणि वाळूच्या कणांची मोजदाद करण्याच्या कामावर तो जगाच्या प्रवासाला निघाला.

पुढची चारपाच दशके हे काम करत तो जगभर वणवण फिरला पण त्याने जिद्दीने मोजदाद पूर्ण केली. एव्हांना तो जख्ख म्हातारा झाला होता पण आता आपल्याला गूढाचे उत्तर मिळणार ह्या आशेने तो पुनः मठाकडे आला.

त्याने दार ठोठावले आणि पुनः त्याच भिक्षूने - तोहि तितकाच म्हातारा झालेला होता - दार उघडले.

"तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी आणली आहेत. सांगू?" तो अधीरपणाने म्हणाला. "सांगा" असा प्रतिसाद आल्यावर त्याने आपले उत्तर दिले. "उत्तर अगदी बरोबर आहे." "मग देता मला दीक्षा?" गाडीवाल्याने अजीजीने विचारले. "तुम्ही उत्तर बिनचूक दिल्यामुळे आता भिक्षु झालेलेच आहात." भिक्षु उत्तरला. "तर मग आता सांगा मला. काय होता तो आवाज?" आपल्या कित्येक दशकांच्या तपाचे फळ आता मिळणार अशा खात्रीने तो अगदी प्रफुल्लित झाला होता.

"आमच्या मठाची अशी पद्धत आहे की हे उत्तर आम्ही स्वतः कोणासच देत नाही. ते ज्याचे त्याने शोधायचे असते." भिक्षु म्हणाला आणि असे म्हणून त्याने एक किल्ल्यांचा जुडगा गाडीवाल्याला दिला. "ह्या किल्ल्या घ्या आणि ही समोर दिसणारी एकामागची एक दारे उघडत जा. शेवटचे दार उघडले की तुमच्या प्रश्नाचे उत्तर समोरच तुम्हाला दिसेल." असे म्हणून आणि किल्ल्यांचा जुडगा गाडीवाल्याला देऊन भिक्षु आपल्या कामाला निघून गेला.

गाडीवाला अधीरपणाने दारे उघडण्याच्या कामाला लागला. पहिले दार मजबूत सागवानी लाकडाचे होते. ते उघडून जातो तो पुढे लोखंडाचे दार आले. ते उघडून जातो तो पुढे तांब्याचे दार आले. ते उघडून जातो तो पुढे चांदीचे दार आले. ते उघडून जातो तो पुढे सोन्याचे दार आले. ते उघडून जातो तो पुढे हिर्‍यामाणकांनी मढविलेले हस्तिदंती दार आले. त्यावर आश्वासक असे शब्द लिहिले होते- ’शेवटचे दार! तुमच्या रहस्याचे उत्तर ह्याच्यापलीकडे तुम्हाला दिसेल.’

घाईघाईने गाडीवाल्याने दार उघडले आणि पाहतो तो काय - त्याचे उत्तर त्याला मिळाले आणि त्याच्या कित्येक दशकांच्या प्रयत्नांचे फलित त्याच्या पदरात पडले.

गोष्ट संपली.

वाचकहो, सांगा पाहू काय असू शकेल तो आवाज?

विचार करा...

अजून थोडा विचार करा...

अजून थोडा विचार करा...

अजून थोडा विचार करा...

नाही सुचत? ठीक आहे. उत्तरासाठी पुढेच दिलेला भाग २ उघडा.

field_vote: 
0
No votes yet