टेक्सासात एका रविवारी - भाग २

cowboy

प्रोजेक्टसाठी मी टेक्साससारख्या वाळवंटी प्रदेशात भर उन्हाळ्यात येऊन दाखल झालो. येण्याआधी आगाऊ मित्रांनी "सम्या, लेका एक उंट घेऊन टाक" किंवा "कलिंगडं ठेव जवळ" असले चेष्टाकारक सल्ले दिले होते. ते ऐकून अनेक वेळा मी क्लिंट इस्टवूडसारखा टेक्सन काउबॉय हॅट आणि काउबॉय शूज घालून कलिंगडं लादलेल्या उंटावर बसलोय आणि उंटाच्या धक्क्यांमुळे माझा चष्मा सारखा सावरावा लागतोय अशी स्वप्नं पडली होती. ‘उंटावरून गायी हाकणं’ असा नवीन वाक्प्रचारही मनात डोकावून गेला होता. त्यामुळे मी थोड्याशा धाकधुकीनेच राहायला आलो होतो. तर काय आश्चर्य! पुण्यासारखी थंडी आणि मुंबईसारखा पाऊस! महिनाभर असा पाऊस पडल्यावर लेक ट्रॅव्हिसची उंची ३८ फूटाने वाढली म्हणे. जागोजागी मी ते ऐकल्यावाचल्यामुळे ते इंच असण्याची शंका विरली. मधुराला फोन करून "बघ, मी इथे आल्याबरोबर दुष्काळ संपला" असं म्हणून दाखवलं. तिने हसण्यावारी नेल्यावर म्हणालो,
"तुला माहित्येय, त्या लेकमध्ये समटाइम्स आयलंड असतात. ती बुडली आहेत."
"समटाइम्स आयलंड?"
"हो, कारण ती कधी पाणी कमी झालं की डोकं वर काढतात, आणि पाणी वाढलं की बुडतात. आत्ता बुडलेली आहेत."
"बुडलेली आहेत तर ती कशी दिसणार आपल्याला?" सर्व बाबतीत प्रॅक्टिकल खुसपटं काढावी तर मधुरानेच.
"ते खरंच आहे. पण "लेकाचे बेटे बुडले" असं सांगता येईल की आपल्याला"
"शी, कसला टुकार जोक रे. हवा आन् दे जरा." माझ्या मते ती मुद्दामून मला उचकवण्यासाठी हे करते. पण ती यायला तयार झाली.

पुढच्या वीकेंडच्या भगभगीत दुपारी मी तिच्या घरी पोचलो. तिने आपल्या घड्याळात एक तिरकस नजर टाकली आणि नंतर त्या नजरेचा तिरकसपणा अंशानेही कमी न करत ती माझ्याकडे वळवली. मला तिच्याकडे जायला उशीर झाला होता हे उघड होतं. मग अर्थातच माझ्या देशस्थीपणाचा उद्धार झाला. आणि "आता एवढा उशीर झालाय तर जायचंच का?" असा प्रश्नही विचारला. पण छप्पन्न नाही, तरी निदान दहाबारा सशांची व्याकुळता डोळ्यात आणून बाबापुता केल्यावर आम्ही चालते झालो. बाराचं ऊन मी म्हणत होतं. "बाराचा ही शिवी का आहे हे आत्ता कळलं" आणि "हे ऊन इतकं आहे की मी कसलं, आम्ही म्हणत असणार" हे संवाद साधण्यासाठीचे दोन्ही विनोद मधुराने दुर्लक्षाने मारले. विनोदांच्या बाबतीत तिचं स्टॅंडर्ड फारच उच्च आहे. कारण तिने केलेल्या विनोदांशिवाय इतर विनोद तिला सहसा आवडत नाहीत.

काही पावलं चाललो असू नसू, तर आम्हाला समोरून एक पंचकोनी कुटुंब बागडत येताना दिसलं. तिशीचा बाप, त्याला लगडलेली एक गोड पोरगी, आणि त्याच्यामागून दोन बायका, त्यांच्यातल्या एकीच्या हाताचा आधार घेतलेला पोरगा. अतिरेकी व्यवस्थित भांग पाडल्यामुळे तो वयाला शोभणार नाही इतका सज्जन आणि त्यामुळेच केविलवाणा दिसत होता. अंगातले इस्त्रीचे कपडे आणि शर्टाचं लावलेलं वरचं बटण यांनी त्या केविलवाणेपणाला चार चाँद लावले होते. पंचकोनातल्या दोन आकर्षक टोकांविषयी मी संभ्रमात पडलो. एकीच्या उजव्या गालावर आणि दुसरीच्या डाव्या गालावर खळी पडते एवढा फरक सोडला तर त्या हुबेहुब सारख्या दिसत होत्या. तेव्हा त्या जुळ्या बहिणी असाव्यात असा कयास बांधला.

आम्ही चालताना पंचकोनाच्या टोकांनी आपापल्या जागा आणि वेग सफाईने किंचित काही बदलले की काय कोण जाणे, पण दोन बोटी बंदरांच्या दोन धक्क्यांना लागाव्यात त्याप्रमाणे मधुरा त्या पुरुषाच्या देखण्या स्मिताच्या खोबणीत अडकली तर मी त्या दोन गोड जुळ्या आयांच्या उजव्या आणि डाव्या खळ्यांमध्ये सांडलो. मग - गुडाफ्टरनून, कित्ती ऊन आहे नै, होना काल किती छान हवा होती, तर तर आता समर म्हटल्यावर असाच उन्हाळा व्हायचा, हो सवय करायला हवी - असे थोडे प्राथमिक नमस्कार चमत्कार झाले. मग लगेचच मुद्द्याचा विषय निघाला.
"तुम्ही भारतातले का? आमचे बरेच भारतीय मित्र आहेत. गोव्याच्या आणि कोडाइकनालच्या चर्चमधले काही पास्टर आमचे चांगले मित्र आहेत."
अच्छा, या गोडव्याच्या वर्षावामागे हे कारण होतं तर! मला वाटलं होतं की माझ्या चेहेऱ्यावरच्या बुद्धिमत्तेच्या तेजाने त्या आकर्षित झाल्या होत्या. तरी गळ्यात लकाकणारे क्रॉस पाहून मला तो संशय यायला हवा होताच. पण एक सामान्य पुरुष असल्यामुळे माझं लक्ष बहुधा भलतीकडेच असावं. डार्विनचा दोष, दुसरं काय! त्यांना मी शक्य तितक्या स्पष्टपणे हो, मी हिंदू आहे पण नाही, मी कुठचाच धर्म, देव वगैरे मानत नाही. म्हणजे लहानपणी तशा चुका केल्या असतील पण आता मला त्या परत करण्यात रस नाही असं सांगून पाहिलं. पण त्यांनी आपला गोड हट्ट सोडला नाही. निदान काही माहिती तरी मिळावी म्हणून मी त्यांना बाप्टिस्ट आणि कॅथलिक यांच्यातला फरक विचारला. त्यांनी जे काही सांगितलं त्यावरून ही देशस्थ-कोकणस्थ-कऱ्हाडे छापाची भांजगड असून आपल्याला त्यातला फरक शष्प कळणार नाही हे लक्षात आलं. पण त्यांना ज्ञानदानापेक्षा माझ्या आत्म्याच्या उन्नतीची काळजी होती.
"आपण सगळेच जन्मतःच पापी असतो. येशूच्या चरणी गेलं तरच आपल्याला मुक्ती मिळते."
"जन्मतःच पापी? आता तुमची मुलं काय पापी आहेत?"
"पण थोडी हट्टी आणि काहीशी लबाड आहेतच."
"ती असतील, मी काही पापी वगैरे नाही. मी चांगला वागतो, कष्ट करतो, कोणाला फसवत नाही. हवं तर आमच्या पोलिस स्टेशनवर चौकशी करा."
"परमेश्वराच्या दृष्टीने पुण्यवान म्हणण्यासाठी यापेक्षा खूप जास्त करावं लागतं."
"माझा पापी या शब्दालाच आक्षेप आहे. कारण पाप म्हणजे ते कोणाच्यातरी बाबतीत असायला लागतं. जर मी देवच मानत नसेन तर पापपुण्य वगैरेला काही अर्थच राहात नाही."
माझं बोलणं ऐकून मी कळपापासून फारच दुरावलेलं मेंढरू आहे आणि मेंढपाळाने याला मार्गदर्शन करण्याची अतोनात गरज आहे अशी त्यांची खात्रीच पटली होती. त्यामुळे त्यांनी वाद सोडून देऊन मला चर्चमध्ये येण्याची काकुळतीने डाव्या उजव्या खळ्या पाडत विनंती केली. मीही नमतं घेतलं आणि कुठल्या चर्चमध्ये, कधी भेटतात याची माहिती स्वीकारून त्यांना गुडबाय केलं. एव्हाना मधुराही त्या तरुण बापाच्या तावडीतून सुटलेली होती. आम्ही गाडीकडे चालायला लागलो.

"तू बघितलंस का, त्यांनी आपल्याला कसं बरोब्बर पकडलं? म्हणजे तुझ्यासाठी दोन सुंदर स्त्रिया, आणि माझ्यासाठी देखणा पुरुष!" ती म्हणाली.
"एक्झॅक्टली. म्हणजे दागिने विकताना सेल्सगर्लने क्लीव्हेज दाखवावी तसंच."
"हा. हा." मधुरा यावर खळाळून हसली. शाब्दिक विनोदांपेक्षा तिला असला वात्रटपणाच जास्त आवडतो.
"आणि कहर म्हणजे मी त्यांना सांगत होतो, की मी धर्म, देव वगैरे गोष्टी सोडलेल्या आहेत. तरी त्या मागे लागल्या होत्या. आता जर एखाद्या माणसाने सांगितलं की मी दारू प्यायचो, पण आता सोडलेली आहे. तेव्हा कृपा करून मला ड्रिंक ऑफर करू नका. तर सभ्य लोक मुकाट्याने आग्रह थांबवतात. पण हे देवधर्माचं करणारे लोक म्हणजे..."
"मग तू त्या चर्चमध्ये वगैरे जाणार नसशीलच." आम्ही गाडीत शिरताशिरता ती म्हणाली.
"अं... अॅक्च्युअली मी जाणार आहे... ती दुसरी बहीण सिंगलच आहे. तेव्हा म्हटलं देऊ तिला माझ्या आत्मा वाचवण्याची संधी!" मी डोळा मारत म्हटलं. मधुराने डोळे कपाळात घालवले. दीर्घ श्वास घेऊन मान हलवली. आणि मनातल्या मनात कपाळाला हात लावण्याचे भाव चेहेऱ्यावर आणून ती म्हणाली,
"पुरुष!" मान तशीच हळूहळू हलवत किंचित वेडावत म्हणाली "चला! निघूया." आणि तिने गाडी स्टार्ट केली.

(पूर्वप्रकाशन - मीमराठीलाईव्ह)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

झकास !
आवडलं !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0