Skip to main content

आणखी एक द्राक्ष

मधुराला भेटायचं असलं म्हणजे मला फार म्हणजे फारच टेन्शन येतं ब्वॉ. मला जितक्या मिनिटांचा उशीर होतो तितक्या अंशांनी तिच्या नजरेच्या तिरकसपणाचा कोन वाढत जातो. आणि मग 'अरे वा, नवीन घड्याळ वाट्टं!' वगैरे खवचट बोलणी सुरू होतात. मला वाटतं तिला असलं काहीतरी बोलून दाखवायला आवडतं. मला खात्री आहे की मनातल्या मनात ती 'समीरला उशीर व्हायला हवा' अशी प्रार्थना करते. आणि उशीर झाला की नक्की कुठचे खरमरीत शब्द वापरायचे याची उजळणी करते. जितका जास्त उशीर तितका तिला शब्दांना धार करायला वेळ मिळतो.

त्यामुळे संध्याकाळी नाटकाला जायचं म्हटल्यावर मी ऑफिसमधलं काम भराभर आटपण्याच्या मागे होतो. आज फेसबुकवर बिलकुल टाइमपास करायचा नाही असं ठरवून टाकलेलं होतं. व्हॉट्सअॅपच्या सगळ्या ग्रूप्सना म्यूट करून टाकलं. आणि चॅट विंडोवर बिझी लिहून टाकलं. आणि शक्य तितकी कामं हाताखालच्यांच्या गळ्यात मारली. या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. एरवी सहा तास लागायचे ते काम चार तासांतच झालं. ही बातमी ऑफिसात पसरली तर माझ्यावरचा कामाचा बोजा दीडपट होईल हे माहीत होतं. पण मधुराचे तिरकस शब्द टाळण्यासाठी तेवढा धोका पत्करायची माझी तयारी होती.

त्यामुळे नाटकाच्या मुहूर्ताच्या दोन तास आधीच निघालो; तेव्हा थेटरावर जाऊन वाट बघत बसण्यापेक्षा तिच्या घरीच जावं म्हटलं. तिचा आश्चर्याने चकचकीत झालेला चेहेरा बघायला मिळेल अशीही आशा होती. तिने दार उघडलं तेव्हा मात्र तिचा जळमटलेला अवतार पाहून मलाच आश्चर्य वाटलं.

‘बॉबी’ सिनेमात ऋषि कपूर डिंपलच्या घरी जातो, तेव्हा ती कणीक मळत असते. आणि अभावितपणे केसांत हात फिरवल्यामुळे केसात कणीक भरते. राज कपूरने नर्गिसला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा असंच झालं म्हणतात. तर त्या डिंपल/नर्गिसप्रमाणे हिच्या केसात जळमटं भरलेली होती. मळवट भरावा तशी चेहेराभर धूळ होती, चष्मा वेडावाकडा झाला होता, आणि बाजीप्रभूने हातात तलवार-दांडपट्टा धरल्याप्रमाणे दोन्ही हातांत हीरांच्या काड्या होत्या. मी लवकर आल्याबद्दल तिरकस शब्दांत आनंद व्यक्त करण्याच्या मनस्थितीत ती नाही हे मी ताडलं. मग म्हटलं आपणच चेष्टा करू.

“आजकाल काय ‘हीरं’दाज बनण्याची फॅशन आहे का? की ही नवीन प्रकारची ‘हीर’विणगिरी आहे?” माझ्या शाब्दिक विनोदांकडे ती एरवीसुद्धा दुर्लक्ष करते. आज तिच्यावरच विनोद झाल्यामुळे त्या दुर्लक्षालाही एक विशेष धार प्राप्त झाली होती. मी मात्र माझा हिरमोड होऊ दिला नाही.

तिने तिच्या हरवलेल्या द्राक्षाबद्दलची माहिती आणि त्याच्या शोधासाठी केलेले उपद्व्याप सांगितले. मी तिला सहानुभूती देण्याच्या फंदात पडलो नाही; ही बया अशा वेळेस कशावरून भडकेल याचा भरवसा नाही. म्हणून खोडीच काढली. “दोन महिन्यांनी तुझी बुगडी सांडल्यावर बेदाणा सापडेल की मनुका?” असं विचारल्यामुळे ती मनातनं भडकलीच. उगाच वरून काहीच झालं नाही असं दाखवलं. आज कधी नव्हे ते मला तिच्यासमोर घड्याळ नाचवायची संधीसुद्धा मिळाली. ती 'थांब जरा मी पाचच मिनिटांत तयार होते' असं म्हणून जी आत गेली ती बावीस मिनिटं झाल्याशिवाय आली नाही. पण अर्थातच मी त्याविषयी एक चकार शब्दही काढला नाही. आपण इतर नट्टापट्टा करणाऱ्या बायकांपेक्षा फार पटकन तयार होतो अशी याबद्दल तिला प्रौढी मिरवायला आवडते. आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. खरंतर तिची आत्मप्रतिमा बदलण्याच्या भानगडीत एरवी मी पडत नाही. पण आज राहावलं नाही.

"काय गं, साबण खाली पडला म्हणून हीराच्या काड्यांनी शोधत होतीस का?"
"गब्बस. तू माजलाहेस फार. "
"नाही, त्याचं काय आहे, की एक द्राक्ष हरवलं म्हणून पुढची खायचीच नाहीत असं नाही. द्राक्षांना काही नंबर दिलेले नाहीत. उरलेली द्राक्षं तुझी वाट बघत होती. त्यांना वाईट वाटू नये म्हणून मीच त्यांना खाल्लं."
"मुकाट्याने येतोयेस की नाही तू?" ती वैतागलेली पाहून मला खूपच गंमत वाटली. अशी वेळ फार वेळा येत नाही. शेवटची दोन द्राक्षं तोंडात टाकताना बावीस, तेवीस असं मला मोजायचं होतं. पण सोडून दिलं.

'चालतच जाऊया' असं ती म्हणाली म्हणून मी नाईलाजाने निघालो. खरं तर शांतपणे रिक्षात बसून जाता येतं तिथे दोन दोन किलोमीटर चालत जायचं हे तिचं खूळच आहे. व्यायामाच्या नावाखाली पैसे वाचवायचे असतात तिला, बाकी काही नाही. पण चालत गेल्याचा फायदा झाला खरा. मला 'ती' दिसली. रस्त्याच्या पलिकडच्या फूटपाथवरून आमच्या उलट्या बाजूने जाताना. मी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष न देता जिवावर उदार होऊन धावत रस्ता क्रॉस करून गेलो. मधुरा अवाक् होऊन 'याच्या अंगात कसलं वारं संचारलं आहे?' असे भाव घेऊन बघत होती. (अर्थात हे मला त्यावेळी दिसलं नाही, तिने मला ते नंतर अनेक वेळा वेगवेगळ्या शब्दांत सांगितलं.) तर रस्त्यापलिकडे पोचल्यावर मात्र ती गर्दीत अचानक दिसेनाशी झाली. मी घुटमळलो हे पाहून मधुरा सावकाश रस्ता क्रॉस करून आली.

"काय रे असा काय धावत सुटलास भूत बघितल्यासारखा?"
"भूत नाही, ती दिसली. आपली ती ही..." मधुराला नक्की कसं समजावून सांगावं याचा विचार करण्याची मला फुरसत नव्हती. माझे डोळे फूटपाथावर दिसणाऱ्या माणसांच्या गर्दीचे खडे निवडत होते.
"बंर.." तिची बंर म्हणण्याची एक खास पद्धत आहे. "पण तिला काही नाव गाव आहे की नाही?"
"तेच तर माहीत नाही ना. परवा कॉन्फरन्सला दिसली होती." मी घाईघाईने ती हरवली त्या दिशेने चालत चालत जात होतो. वाटेत लागणारी दुकानंही क्षणभर स्कॅन करत होतो. गर्दीत मूल हरवलेल्या आईबापांची कशी अवस्था होते हे मला त्या क्षणी जाणवलं. आणि निरुपा रॉय आठवली. तिची बिचारीची तर किती मुलं हरवली...
"मग तिथेच का नाही बोललास तिच्याशी?"
"तेव्हा खूप गर्दी होती."
"गर्दी! आणि आत्ता काय कर्फ्यू लावलाय का?" तिला एकंदरीत माझ्या परिस्थितीत विनोद दिसत होता.
"अगं राहिलं त्यावेळी. धीर झाला नाही... थांब. थांब. ती बघ आता रस्ता क्रॉस करतेय. थांब थांब, बघू नकोस. ती आपल्याच दिशेला बघते आहे."
"मग हात हलवून हाय का म्हणत नाहीस? सांग कॉन्फरन्सची ओळख." मधुराचा नेहेमी एक घाव दोन तुकडे असा कारभार असतो.
"तुला यातली सटल्टी कळत नाही. मी तुझ्याबरोबर असताना तिने बघितलं तर ती काय म्हणेल? आपण मागे जाऊया, मी रस्ता क्रॉस करतो आणि अचानक एकटा समोरून भेटलो असं दाखवतो"
"...." ती काही बोलली नाही, पण ज्या पद्धतीने तिने माझ्याकडे एक क्षुद्र, मूर्ख कीटक असल्याप्रमाणे बघितलं ते पाहून मला तिच्या अज्ञानाचीच दया आली.

द्राक्ष

सशाच्या चपळाईने मी प्लॅनची अंमलबजावणी केली. माझं नशीबच फुटकं. ती गायब झाली होती. आसपासच्या सर्व दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांना 'लाल पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी आली होती का?' असं विचारण्याचा मनसुबा मी मनातल्या मनात, आवंढ्याबरोबर गिळला. मधुराने ते आमच्या मित्रांना किती तिखटमीठ लावून सांगितलं असतं याची कल्पना मला होती. आम्ही शांतपणे थेटरकडे निघालो.

अपेक्षेपेक्षा जरा जास्तच वेळ गेल्यावर ती मला म्हणाली. "मग काय, हरवलं ना तुझं पण द्राक्ष?" मी असा दुःखात बुडलेलो असताना माझ्या जखमेवर मीठ चोळलं नाही तर ती मधुरा कसली? आणि थेंबाने तिचं समाधान होत नाही, हौदभर लागतं तिला. "पुढच्या वेळी मुलगी आवडली तर गर्दीतच जाऊन बोलावं. नाहीतर मनुका होईपर्यंत पाहा वाट."

“पहले आप” असं म्हणत थेटरचं दार मी तिला उघडून दिलं.

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

पिवळा डांबिस Wed, 26/08/2015 - 10:39

पण हे 'त्याने' नाही, मधुरानेच लिहिल्यासारखं वाटतंय!
'हाय कंबख्त, तू ने तो पी ही नही!!!'

पिवळा डांबिस Thu, 27/08/2015 - 09:58

In reply to by राजेश घासकडवी

खाली शुचिने थोडंसं सांगितलंच आहे पण तरीही मी ही अजून स्पष्टपणे सांगेन्.
पण आधी हे सांगा, मला असं का वाटलं हे तुम्हाला जाणून घ्यावंसं का बरं वाटलं?
:)