निया मधल्या लाकडी पाट्या

सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला. हा प्रवास त्याने त्याच्या काळातील एक अत्यंत महत्वाचा मार्ग असलेल्या रेशीम मार्गाने केला होता. त्याचे हे प्रवास वर्णन या कारणांमुळेच, निदान भारतीयांसाठी तरी अमूल्य असाच ठेवा आहे असे म्हणता येते.
चीनच्या पश्चिम भागात असलेल्या शिंजिआंग (Xinjiang) या भागात, ‘टाकला माकन‘ हे एक विशाल वाळवंट आहे. उत्तर रेशीम मार्ग व दक्षिण रेशीम मार्ग हे या वाळवंटाच्या उत्तर व दक्षिण परिमिती वरून जाणारे दोन मार्ग होते. या मार्गांच्यावर अतिशय समृद्ध अशी व्यापारी केन्द्रे होती. ही बहुतेक व्यापारी केंद्रे या वाळवंटाच्या कडेना असणार्‍या मरूस्थलांमधे (Oasis) वसलेली होती. ह्युएन त्सांगने स्वाभाविकपणेच या सर्व मरूस्थलांना भेट दिली होती व या प्रत्येक ठिकाणाचे त्याने बारकाईने केलेले वर्णन आपल्या लिखाणाद्वारे पुढच्या पिढ्यांसाठी मागे ठेवलेले आहे. टाकला माकन वाळवंटाच्या नैऋत्य कोपर्‍यात होतान (Hotan) या नावाचे एक मरूस्थल आहे. हे होतान मरूस्थल, जेड या मौल्यवान पाषाणाच्या व सुवर्णभुकटीच्या खाणींसाठी मोठे प्रसिद्ध होते व दक्षिण रेशीम मार्गावरचे एक महत्वाचे व्यापारी केन्द्र होते. ह्युएन त्सांगने होतानची भौगोलिक व राजकीय परिस्थिती, इतिहास या सर्वांबद्दल लिहून ठेवले आहे. या सर्व वर्णनामधे त्याने एक महत्वाचा दावा पण केलेला आहे. ह्युएन त्सांगच्या या दाव्याप्रमाणे, हे ‘होतान‘ मरूस्थल व त्याच्या आजूबाजूचा भाग हे कोणातरी भारतीय वंशाच्या सम्राटाच्या अंमलाखाली पूर्वी होते. या मरूस्थलाच्या आधिपत्यासाठी, भारतीय वंशाच्या होतानच्या राजाचे सैन्य व वू-ति या पश्चिम चिन राजघराण्यातील सम्राटाच्या सेनापतीचे सैन्य यांच्यामध्ये झालेल्या शेवटच्या युद्धात होतानच्या राजाचा पराभव झाला. या नंतर भारतीय व चिनी वंशाचे लोक होतान मधेच पण निरनिराळ्या वस्त्यांमध्ये राहू लागले. या माहितीसाठी ह्युएन त्सांगने ‘ Annals of Li-yul’ या तिबेटी हस्तलिखित ग्रंथाचा संदर्भ दिला आहे.
ही सगळी माहिती सत्य आहे का? ‘होतान‘ मरूस्थल आपल्या अंमलाखाली आणणारा भारतीय राजा कोण असावा? त्याला ज्याने मोहिमेवर पाठवले तो भारतीय सम्राट कोण असावा? वगैरे प्रश्न पुराव्या अभावी अनुत्तरीतच राहिलेले आहेत. निदान भारतीय अंमल होता ही माहिती तरी सत्य आहे का? हे काही पुराव्यावरून तपासता येईल का? असे प्रश्न इतिहास संशोधकांना नेहमीच पडत आलेले आहेत.

विसाव्या शतकामधील सुप्रसिद्ध पुराण वस्तू संशोधक सर ऑरेल स्टाईन यांनी जेंव्हा ह्युएन त्सांगचा हा दावा वाचला तेंव्हा या भागात मोहिम काढून काही पुरावा मिळतो का? असे तपासण्याचे त्यांनी ठरवले. ऑरेल स्टाईन हे खरे म्हणजे बुडापेस्ट मधे जन्मलेले एक हंगेरीचे रहिवासी होते. परंतु अलेक्झांडरच्या इराण व भारतातल्या मोहिमांच्याबद्दल त्यांना इतकी उत्कंठा होती की जास्त संशोधन करता यावे म्हणून त्यांनी भारतात येऊन ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करली. ब्रिटिश सरकारच्या सेवेत असताना गांधार या प्राचीन देशातील कला व शिल्पकला याबद्दल त्यांचा बराच व्यासंग झाला व बौद्ध धर्म प्रचारामुळे, गांधार शैली मध्य एशिया व चीनचा रेशीम मार्गाजवळचा भाग येथे पोचली असणार असे अनुमान त्यांनी काढले. या अभ्यासात त्यांना चीनमधल्या रेशीम मार्गावद्दल बरीच माहिती मिळाली व या भागात आपण पुराण वस्तू संशोधनाची मोहिम काढावी असे त्यांच्या मनाने घेतले. ह्युएन त्सांगचा वर निर्देश केलेला दावा तपासणे हेही त्यांनी आपल्या मोहिमेचे एक ध्येय ठेवले. ऑरेल स्टाईन आपल्या पुस्तकात या बद्दल म्हणतात की
“A substratum of historical fact is the old local tradition heard by Hsiian-tsang, which asserted a partial occupation of Khotan )by Indian immigrants from the region of ancient Taxila.”
“भारताच्या तक्षशीला भागातील स्थलांतरितांचा होतानवर अंशत: तरी अंमल होता या स्थानिक व पारंपारिक आख्यायिकेचा, ह्युएन त्सांगने ऐतिहासिक सत्याचा एक उपभाग म्हणून निर्देश केला आहे.”
( आपल्या सर्व लिखाणात,ऑरेल स्टाईन यांनी होतानला खोतान या नावाने संबोधलेले आहे. परंतु सध्या प्रचलित असलेले होतान हे नाव प्रस्तुत लेखात मी वापरले आहे. )
1900-1901, 1906–1908, 1913-1916 या वर्षात स्टाईन यांनी चीनमधल्या शिंजियांग भागात, भारत सरकारने पुरस्कृत केलेल्या, तीन दीर्घकालीन मोहिमा काढल्या. या तिन्ही मोहिमांच्यात ऑरेल स्टाईन यांनी ‘होतान‘ भागात जाऊन आपले पुराण वस्तू संशोधन चालू ठेवले. 29 मे 1900 या दिवशी स्टाईन यांनी आपली पहिली मोहीम श्रीनगर पासून सुरू केली व गिलगिट, हुन्झा मार्गाने त्यांनी मिनटाका खिंडीतून काराकोरम पर्वतराजी ओलांडली व भारतीय द्वीपकल्प सोडून ते शिंजियांगच्या दिशेने निघाले. शिंजियांग मधे प्रथम काशगर व तेथून यारकंड या गांवांमधे मुक्काम करत ते वर्षाच्या अखेरीस होतानला पोचले. होतान ओऍसिसच्या जवळपास दुसर्‍या किंवा तिसर्‍या शतकात वापरात असलेल्या भाजलेल्या मातीच्या अनेक वस्तू त्यांना मिळाल्या. होतानच्या पूर्वेला असलेल्या केरिया या नदीच्या काठापाशी उत्खनन करत असताना त्यांना अशी बातमी समजली की की केरिया नदीच्या पूर्वेला असलेल्या निया या ओऍसिस जवळून वाहणार्‍या निया या नदीच्या काठाने उत्तरेला गेले की इमाम जफर सादिक यांची मझर लागते. यावरून या अर्ध मृत नदीच्या काठाने आणखी थोडे पुढे गेले की वाळवंटातल्या वाळूत अर्धवट बुडून गेलेले एक जुने गाव आहे. स्टाईन यांना ज्या प्रकारच्या स्थानांच्यावर जुने अवशेष सापडू शकतील असे वाटत होते त्या वर्णनाचेच हे गाव आहे असे वाटले व त्यांनी तयारी करून 18 जानेवारी 1901 रोजी निया साठी प्रस्थान केले. चार दिवसाच्या वाटचाली नंतर स्टाईन निया ओऍसिसमध्ये पोचले. या प्रवासात दक्षिणेकडे दिसणारी कुन लुन पर्वतराजीची बर्फाच्छादित शिखरे व उत्तरेला निया वाळवंटातील वाळूचे डोंगर याशिवाय दुसरे काहीही दृष्टीस येत नव्हते. निया ओऍसिस बद्दल स्टाईन लिहितात की ” नियाला पोचल्यावर ह्युएन त्सांगच्या ऐतिहासिक मार्गावर पोचल्याचा मला खराखुरा आनंद झाला. त्याने निजांग या गावाचे केलेले वर्णन निया ओऍसिसला हुबेहुब लागू पडते. ह्युएन त्सांगच्या वर्णनाप्रमाणे हे गाव 3 ते 4 लि( 1 मैल) परिघात व दलदलीच्या प्रदेशात वसलेले आहे. ही दलदल वेत आणि गवत यांनी झाकलेली असल्याने त्यावरून चालणे कठिण आहे. गावात जायला एकच रस्ता आहे व तो लवकर ध्यानात येत नाही. हे गाव होतान राज्याच्या पूर्व सीमेवर येत असल्याने येथे होतानच्या राजाचे सैनिक तैनात असतात. ” 23 जानेवारीला स्टाईन यांनी इमाम जफर सादिक यांची मझर असलेल्या ठिकाणाकडे प्रस्थान केले. हा रस्ता 3 दिवसाच्या वाटचालीच होता व निया नदीच्या काठानेच होता. या मार्गावर निया नदी मृत होते त्या स्थानापर्यंत दाट झाडी होती.इमाम जफर सादिक यांची मझर म्हणजे मानवी अस्तित्वाच्या सीमेचे शेवटचे पोस्ट आहे हे स्टाईन यांच्या लक्षात आले कारण यापुढे उत्तरेला असीम व अफाट असलेले केवळ एक वाळवंट स्टाईन यांना दिसत होते. या वाळवंटात सुमारे 2 मैल चालल्यावर स्टाईन यांना वाळूच्या डोंगरात अर्थवट बुडालेली दोन घरे दिसू लागली. जवळ गेल्यावर प्रत्यक्षात तो एक पडीक अवस्थेत असलेला बौद्ध स्तूप आहे हे स्टाईन यांच्या लक्षात आले. संध्याकाळ होत आलेली असल्याने स्टाईन यांनी त्या अवशेषांमधेच आपला कॅम्प ठोकला.

दुसर्‍या दिवशी सकाळी शून्य डिग्री तपमानात स्टाईन यांनी आपल्या कॅम्पच्या परिसरातील अवशेषांची पाहणी करण्यास सुरूवात केली. कॅम्प पासून सुमारे 1 मैल अंतरावर असलेल्या एका भग्न अवशेषापाशी स्टाईन पोचले हा अवशेष दुरून एखाद्या वाळूच्या डोंगरासारखा दिस्त असला तरी जवळ गेल्यावर 10 ते 15 फूट उंच अशा वास्तूचे ते अवशेष आहेत हे लक्षात येत होते. या वाळूच्या डोंगरावर चढून गेल्यावर स्टाईन यांना 3 लाकडी पाट्या पडलेल्या दिसल्या. या पाट्यांच्यावर लेखन केलेले होते. स्टाईन यांचा प्राचीन भारतातील लिप्यांचा उत्तम अभ्यास असल्याने हे लेखन खरोष्टी या उत्तर भारतात प्रचलित असलेल्या प्राचीन लिपीत आहे हे स्टाईन यांच्या लगेच लक्षात आले. स्टाईन यांचे पथक मग जोरात कामास लागले. भग्न वास्तूचे मोडतोड झालेले लाकडी खांब, वासे, तुळया व फळ्या यांचा खच पडलेल्या जागी त्यांना आणखी पाट्या सापडल्या. ही भग्न वास्तू व शेजारची वास्तू येथे उत्खनन व वाळू साफ करणे हे काम सुरू झाले व दोन दिवसांनंतर 110 ते 114 पाट्या सापडल्या.

स्टाईन यांच्या तिन्ही मोहिमांत मिळून त्यांनी अशा 200 ते 300 पाट्या शोधून काढल्या ज्या खरोष्टी लिपीमधे लिहिलेल्या होत्या.
संध्याकाळी कॅम्पवर परत आल्यावर कडाक्याच्या थंडीत स्टाईन यांनी अगदी कमी मजकूर असलेल्या दोन तीन पाट्या वाचण्याचा प्रयत्न केला व आपल्याला एक अमोल ऐतिहासिक खजिना गवसला आहे हे स्टाईन यांच्या ध्यानात आले. या पाट्या विविध आकाराच्या व पद्धतीच्या होत्या. मोठ्या एकेरी पाट्यांबरोबरच दुहेरी पाट्या बर्‍याच संख्येने मिळाल्या होत्या. काही पाट्या एखाद्या सुरीच्या पात्याच्या आकाराच्या होत्या. दुहेरी पाट्यांना खालची पाटी व झाकण पाटी अशा दोन पाट्या एकमेकाला पाटीच्या एका टोकाला असलेल्या भोकामधून दोर ओवून एकमेकाला जोडलेल्या होत्या. मजकूर न लिहिलेल्या बाजूवर खाचे मारून त्यामधून दोरा गुंडाळून त्याला मातीचे सील केलेले काही पाट्यांच्यात आढळले. पाटीवर लिहिलेला मजकूर हा उजवीकडून डावीकडे ( वाचणार्‍याच्या डावीकडून उजवीकडे ) व पाटीच्या मोठ्या बाजूला समांतर असा लिहिलेला होता. बहुतेक सर्व पाट्यांच्यातील मजकूर हा भारताच्या वायव्य भागात प्रचलित असलेल्या खरोष्टी लिपीमध्ये लिहिलेला होता.
एकसारख्या दिसणार्‍या व एवढ्या संख्येने मिळालेल्या पाट्या सापडल्यामुळे स्टाईन यांना अशी भिती वाटली की कदाचित या पाट्यांवरचा मजकूर म्हणजे एकाच मजकूराच्या प्रती असतील. प्रार्थना किंवा बौद्ध धर्म ग्रंथातील उतारा त्यावर उतरवलेला असेल. परंतु पाट्यांवरचा मजकूर स्टाईन यांनी बघितल्यावर प्रत्येक पाटीवरचा मजकूर भिन्न आहे हे त्यांच्या लक्षात आले. पाट्यांवरची खरोष्टी लिपी ही वायव्य भारतात सापडणार्‍या व कुशाण कालातल्या शिलालेखांसारखीच आहे हे स्टाईन यांच्या लक्षात आले व त्यामुळे या पाट्या इ.स. नंतरच्या पहिल्या तीन शतकात लिहिल्या गेलेल्या असाव्यात या अनुमानाला ते आले.
स्टाईन यांना ज्या ठिकाणी या पाट्या सापडल्या होत्या तिथे या पाट्यांवरचा मजकूर सलग (मोडी लिपी प्रमाणे) लिहिलेला असल्याने वाचणे कठिण गेले. मात्र संध्याकाळी कॅम्पवर यातल्या काही पाट्या वाचून त्यातला मजकूर समजावून घेण्यात स्टाईन यशस्वी झाले. या पाट्या त्या काळी भारतात प्रचलित असलेल्या प्राकृत भाषेत लिहिलेल्या होत्या. सुरीसरख्या असलेल्या बर्‍याच पाट्यांच्यावर अगदी वरच्या बाजूस ‘ महानुवा महाराया ‘ (mahanuava maharaya) असे शब्द लिहिलेले होते. त्यामुळे या पाट्या म्हणजे कोणत्या तरी महाराजाच्या दरबाराने पाठवलेले अधिकृत आदेश आहेत या निष्कर्षावर स्टाईन आले. त्या संध्याकाळी स्टाईन अगदी कमी मजकूर असलेल्या 3 पाट्यावरचा मजकूर वाचण्यात यशस्वी झाले. या पाट्या अगदी स्पष्ट रित्या शासकीय कामकाजाचे आदेश होते. यातली एक पाटी सोथारोग लिपेय याला लिहिलेली होती व सुवयलिन फुमसेव या व्यक्तीला त्याच्या निया ते होतान या प्रवासासाठी संरक्षक देण्याचा त्यात आदेश होता. मोठ्या आदेशांना अनादिलेख व दुसर्‍या काही आदेशांना किलमुद्रा हे शब्द आयोजिलेले स्टाईन यांना आढळले. खोतानचा उल्लेख बर्‍याच पाट्यांच्यावर असल्याने खोतानच्या राजाच्या दरबाराकडून हे आदेश दिले गेले असावेत असे दिसत होते.
बहुतेक पाट्यांच्यावर तारीख लिहिलेली असली तरी ज्या राजाच्या कालात या पाट्या लिहिल्या गेल्या होत्या त्या राजाचा अंमल चालू झाल्यापासून कालगणना केलेली असल्याने त्या तारखेवरून फारसा बोध होणे शक्य नव्हते. मात्र राजाच्या नावाचा उल्लेख ‘देवपुत्र‘ या विशेषणासह केलेला बर्‍याच पाट्यांच्यात आढळला. राजाचा नावाचा देवपुत्र या विशेषणासह केलेला उल्लेख हा भारतातील कुशाण राजवटीच्या कालातील व नंतरच्या शिलालेखांच्यात आढळतो.
या पाट्यांमध्ये अनेक भारतीय नावे स्टाईन यांना आढळली. भीम, बंगसेन, नंदसेन, सामसेन, सितक, उपजीव या सारखी भारतीय नावे किंवा भारतीय नावांचा, अंगस, सुवयलीन फुमसेन, पितेय, सामघिल, समजक, सोमजक, सुसम, सुघीय या सारखा अपभ्रंश या पाट्यांच्यात आढळतो. अर्थातच लिपेय, ओपगेय, लिमिर, ममंगय, त्समय या सारखी भारतीय नसलेली नावे आढळतात. कुशाणसेन हे अत्यंत रोचक नाव या पाट्यांच्यात आढळते. दिविर (Clerk) सार किंवा सारक (Secret Agent) रायद्वार पुरस्थित (President of the royal court) किंवा लेखधारक (Letter-carriers) हे हुद्दे या पाट्यांच्यात आढळतात. लेखधारकाला त्याच्या मार्गावर दूतिय (दूत) या नावाने ओळखले जाते. इंग्रजी पद्धतीचे मायने, लांबलचक ख्याली-खुशाली विचारणारी वाक्ये आणि औपचारिक वाक्ये या पाट्यांच्यात अजिबात आढळत नाहीत. संस्कृत मधला स्पष्टवक्तेपणा व वाक्यांचा आटोपशीरपणा हे या पाट्यांचे वैशिष्ट्य आहे.

आपल्या मोहिमेवरून परत आल्यावर स्टाईन यांनी या पाट्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची तज्ञांना विनंती केली त्यांचा अहवाल व स्टाईन यांची स्वत:ची निरीक्षणे यावरून स्टाईन खाली दिलेल्या निष्कर्षापर्यंत आले.
“ Discovery of the Kharosthi documents from Early use at the Niya Site, proves beyond all doubt, that an Indian language closely allied to the old language of Prakrit of North-western India, was in daily use for administrative purposes throughout the Khotan and Khotan region, about the middle of the third century A.D. Considering the character of these hundreds of documents, dealing with all the varied affairs of practical life and social organization, it is impossible to assume that their language should not have been widely, perhaps universally, known within the territory. The conclusion to be drawn from this current use of an Indian language is greatly strengthened by the Kharosthi script of the records ; for we know that within India this script was peculiar to that region of which Taxila and the adjoining Gandhara were the historical and cultural centres for centuries before and after the commencement of our era.”
“ निया जवळ सापडलेल्या व खरोष्टी लिपीत लिहिलेल्या या पाट्यांवरून हे निर्विवाद सिद्ध होते की खोतान व खोतानचा परिसर या भागात, तिसर्‍या शतकाच्या मध्यास, वायव्य भारतात प्रचलित असलेल्या प्राकृत सारखी एखादी प्राचीन भारतीय भाषा, अगदी रोजच्या व्यवहारासाठी, कार्यालयीन व शासकीय कामात वापरली जात होती. या सर्व पाट्या तपासल्यावर हे लक्षात येते की ही भाषा या प्रदेशात अगदी सर्व साधारण वापरात होती. भारतामध्ये ही लिपी गांधार व तक्षशीला या सारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व असलेल्या ठिकाणी इ.स. पूर्व व त्या नंतरच्या कालात वापरात होती. “
या पुढे जाऊन ऑरेल स्टाईन हे स्पष्टपणे सांगतात की
“Neither the language nor the script of these documents can be satisfactorily accounted for by the spread of Buddhism alone, which, so far as our available evidence goes, brought to Central Asia only the use of Sanskrit as its ecclesiastical language, and the writing in Brahmi characters. But the current use in Khotan of both a Prakrit dialect and of the Kharosthi script becomes at once intelligible if we recognize a substratum of historical fact in the old local tradition heard by Hsiian-tsang, which asserted a partial occupation of Khotan by Indian immigrants from the region of ancient Taxila. “
“बौद्ध धर्माच्या मध्य एशियातील प्रसारामुळे या पाट्या खरोष्टी लिपी व प्राकृत भाषा यामधे लिहिल्या गेल्या असतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल कारण बौद्ध धर्माने फक्त धार्मिक कार्यासाठी संस्कृत भाषा व ब्रम्ही लिपी मध्य एशियात नेली होती. खोतान मधील काही भाग तरी भारताच्या तक्षशिला जवळच्या भागातून गेलेले स्थलांतरितांच्या अंमलाखाली होता व हे स्थलांतरित तेथे स्थायिक झाले होते हे यावरून सिद्ध होते व ह्युएन त्सांगने सांगितलेल्या इतिहासाला आपण सत्य मानले पाहिजे.”
होतानच्या परिसरात, भारतातून गेलेले स्थलांतरित स्थायिक झालेले होते हे मान्य करता आले तरी कोणच्या कालखंडात हे स्थलांतरित तेथे गेले व कोणत्या मार्गाने ते तेथे गेले या बद्दल तज्ञांच्यात बारेच मतभेद दिसतात. यापैकी तीन विचार असे आहेत.
स्वत: ह्युएन त्सांगच्या मताने हे स्थलांतर बौद्ध धर्माचा या भागात प्रसार होण्याच्या आधी झाले असावे. यासाठी एक तिबेटी हस्तलिखित ग्रंथ ‘ Annals of Li-yul’ याचा तो आधार घेतो. खोतानचा राजा विजयसंभव याच्या कालात कश्मिर मधून आलेला एक भिख्खू अर्थवीरसेन याने होतानच्या राजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ही दीक्षा होतानचे राज्य स्थापन झाल्यानंतर 170 वर्षांनी दिली गेली. चिनी सम्राट वू-ती याने इ.स. 269 च्या सुमारास होतान भाग जिंकून आपल्या साम्राज्याला जोडला होता. त्यामुळे भारतीय स्थलांतरितांनी होतानवर आपला अंमल बसवण्याचा काल पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात असू शकतो.
ह्युएन त्सांगने तक्षशीला मधे ऐकलेली आख्यायिका आपल्या मताचा संदर्भ म्हणून दिली आहे. सम्राट अशोकाचा मुलगा कुणाल हा तक्षशीला भागाचा राज्यकारभार चालवत असताना, त्याच्या सावत्र आईने कारस्थान करून त्याला आंधळा बनवले. सम्राट अशोकाला जेंव्हा हे समजले तेंव्हा या कारस्थानाच्या मागे असणारे सर्व मंत्री आणि अधिकारी यांना सीमेपलीकडच्या वाळवंटात पिटाळून लावले. हुएन त्सांगच्या मताप्रमाणे हे स्थलांतरित होतानला येऊन स्थायिक झाले असावेत. या आख्यायिकेप्रमाणे हे स्थलांतर सम्राट अशोकाच्या काळात झाले असावे.
स्टाईन आपल्या पुस्तकात दुसर्‍या एका शक्यतेचाही विचार करतात. या विचाराप्रमाणे स्टाईन म्हणतात की होतानचे रहिवासी व कश्मिरी लोक यांच्यात खूपच साम्य दिसून येते. त्यामुळे कश्मिरी स्थलांतरितांनीच होतान राज्याची स्थापना केलेली असावी अशीही शक्यता आहे. ही कश्मिरी मंडळी काराकोरम खिंडीतून होतानमध्ये आली की गांधार कडून आली हे सांगणे कठिणच आहे. परंतु बौद्ध भिख्खू अर्थवीरसेन याने होतानच्या राजा विजयसंभव याच्या कालात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी होतानला दिलेली भेट हे सिद्ध करते की होतान व कश्मिर यांचे निकट संबंध होते.
Central Asiatic Journal या वर्षातून दोन वेळा प्रसिद्ध होणार्‍या नियतकालिकाच्या 1988 साली प्रसिद्ध झालेल्या अंकात Douglas A Hitch या हारवर्ड विद्यापीठात कार्य करणार्‍या एका संशोधकाने अगदी निराळा विचर मांडला आहे. त्याच्या विचाराप्रमाणे संपूर्ण तारिम नदीचे खोरे इ.स.88-90 ते इ.स. 124-127 या कालात कुशाण राजांच्या अंमलाखाली होते. कुशाण सम्राट कनिष्क किंवा त्याचा मुलगा सुविष्क (Huvishka) याच्या कालात कुशाण सेना या भागात होत्या. होतान मरूस्थल याच तारिम खोर्‍यात मोडत असल्याने तेथे तर कुशाण अंमल होताच पण या शिवाय टाकला माकन वाळवंटाच्या उत्तरेला असलेल्या काराशार किंवा तरपान या ठिकाणी सापडलेली खरोष्टी लिपीतील पत्रे, होतान मधील नाण्यांच्यावर प्राकृत भाषेत असलेला मजकूर या सर्व निरिक्षणांनी असे म्हणता येते की संपूर्ण तारिम खोरे( उत्तरेला काराशार व दक्षिणेला लु-लान पर्यंत), कुशाण साम्राज्य जेंव्हा सर्वात शक्तीशाली होते त्या कालात, कुशाण राज्याचा एक भाग होते. सम्राट कनिष्क किंवा त्याचा मुलगा सुविष्क याने पामिर पर्वतावरून आपल्या सेना येथे पाठवल्या असाव्यात व हा भाग ताब्यात घेतला असावा.

हान राजघराण्याने कुशाणांचा पराभव करून हा भाग बहुदा दुसर्‍या शतकाच्या अखेरीस ताब्यात घेतला असावा. परंतु या भागातील राजे कुशाण परंपरांचे पालन पुढे अनेक शतके करत होते. या पैकी काही राज्यांचा राज्यकारभार प्राकृत मधे चालत असे आणि हे राजे आपल्या नावापुढे कुशाण राजांप्रमाणे देवपुत्र ही उपाधी लावत असत असे या संशोधकाचे म्हणणे आहे.
ऐतिहासिक सत्य काय होते हे कदाचित कधीच कळणार नाही. चीनचा पश्चिमेकडील प्रांत शिंजियांग हा सम्राट कनिष्क याच्या ताब्यात होता का होतान मरूस्थल गांधार किंवा कश्मिर राज्यांची एक वसाहत होते? हे सांगणे अवघड आहे. मात्र एक गोष्ट खात्रीने सांगता येते की काराकोरम पर्वतराजी ही भारताची उत्तर-पूर्व सीमा नक्कीच नव्हती. अक्साई-चिन हा लडाखच्या पश्चिमेला असलेला व चिनी सैन्याने बळकवलेला भू प्रदेश भारतीय भू-प्रदेशच आहे यात शंका वाटत नाही.
संदर्भ
1. Ancient Khotan -By Sir, Aurel Stein Chapter XIX
2. Kushan Tarim Domination, An article by Douglas A Hitch, Central Asiatic Journal Volume 32 (3-4) 1988
स्टाइन यांनी काढलेली निया येथील छायाचित्रे व दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेल्या निया च्या पाट्यांची छायाचित्रे या दुव्यावर बघता येतील.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

हा नक्कीच ऐतिहासिक पुरावा आहे.

>>>काराकोरम पर्वतराजी ही भारताची उत्तर-पूर्व सीमा नक्कीच नव्हती. अक्साई-चिन हा लडाखच्या पश्चिमेला असलेला व चिनी सैन्याने बळकवलेला भू प्रदेश भारतीय भू-प्रदेशच आहे यात शंका वाटत नाही.

भारत सरकारच्या परराष्ट्र संबंध मुत्सद्यांचे(?) याबाबत उचललेले पाउल(ले) काय आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

लेख सुंदर आहे. अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक माहिती दिली आहे. त्याबद्दल चंद्रशेखर यांचे अनेक आभार
मात्र लेखाचा शेवट विनाकारण वादग्रस्त विषयाला हात घालून करण्याचे प्रयोजन समजले नाही.

मात्र एक गोष्ट खात्रीने सांगता येते की काराकोरम पर्वतराजी ही भारताची उत्तर-पूर्व सीमा नक्कीच नव्हती. अक्साई-चिन हा लडाखच्या पश्चिमेला असलेला व चिनी सैन्याने बळकवलेला भू प्रदेश भारतीय भू-प्रदेशच आहे यात शंका वाटत नाही.

१. 'भारत' हा देश ब्रिटीशांनंतरचा (किंवा फारतर पासूनचा) आहे. त्या आधी मुळात भारतच नव्हता तर त्याच्या सीमा कुठून आल्या?
२. बळकावलेला की जिंकलेला हे कसे ठरवावे? याच लेखात आधी तुम्ही म्हणता की हान राजघराण्याने कुशाणांचा पराभव करून हा भाग बहुदा दुसर्‍या शतकाच्या अखेरीस ताब्यात घेतला असावा. म्हणजे दुसर्‍या शतकापासून जर हा हान घराण्याच्या ताब्यात असेल तर विसाव्या शतकात स्वतंत्र झालेल्या भारताचा किंवा एकोणीसाव्या शतकात निर्माण झालेल्या ब्रिटीश इंडीयाचा त्यावर हक्क कसा?

असो. इतकी महत्त्वाची माहिती अश्या छान लेखातून दिल्यानंतर शेवटची टिपण्णी अनावश्यक वाटली इतकेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अक्साईचिन बद्दलची माझी टिप्पणी श्री.हृषिकेश यांना रुचलेली नाही. कदाचित ते नवीन पिढीतील असल्याने आमच्या पिढीतील लोकांना १९६२ मधील चिनी युद्धातील पराभवाचे जे शल्य वाटते ते तसे त्यांना वाटत नसावे. बाकी मुद्यांबद्दल स्पष्टीकरण असे आहे.
१. मी येथे भारत हा शब्द भारतीय उपखंड या अर्थाने वापरलेला आहे. १९४७ नंतरचा भारत या अर्थाने नाही.
२. होतान येथे भारतीय वंशाचा राजा होता म्हणून होतान भारतीय उपखंडाचा भाग होते असे मला म्हणायचे नाही. तेथे अनेक राजवटी नंतर आल्या व गेल्या.
३. मी अक्साईचिन या भागाबद्दल लिहितो आहे. हा भाग होतानच्या नैऋत्येला आणि कुन्-लुन् पर्वतराजीच्या दक्षिणेला, लडाखला लागून आहे. हा भाग कश्मिर महाराजांच्या संस्थानाचा भाग असून त्या आधी तो महाराजा रणजितसिंहच्या ताब्यात होता. कश्मिर राज्याच्या ताब्यात हा भाग १९५५-५६ पर्यंत होता. असा एक मुद्दा उपस्थित केला जातो की काराकोरम पर्वतराजीच्या पूर्वेचा भाग हा भारतीय उपखंडाचा भाग नाही व त्याच्याशी भारतीय उपखंडाचे कोणतेच (व्यापारी, वांशिक, राजकीय) तेथे संबंध नाहीत. स्टाइन च्या संशोधनाने हा मुद्दा गैरलागू असल्याचे सिद्ध झाले आहे एवढेच मला म्हणायचे आहे. हा भाग चीनने सध्या बळकावलेला असला तरी भविष्यात काय होईल ते कसे सांगणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याच्याशी भारतीय उपखंडाचे कोणतेच (व्यापारी, वांशिक, राजकीय) तेथे संबंध नाहीत

भारतीय उपखंडातील लोकांचे संबंध असणे आनि सत्ता असणे यात बराच फरक आहे. तुमच्याच लेखात तुम्ही म्हणता की तिसर्‍या शतकात हान वंशियांनी प्रदेश 'जिंकला' मग उपखंडातील लोकांचे संबंध होते म्हणून तो प्रदेश त्यांचा कसा होईल?

अक्साई चीन व स्वतंत्र भारत यांच्याबद्द्ल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न मी मागेच केला होता. मिळालेली माहिती लेखरुपाने इथे ऐसीअक्षरेवर टाकली आहे. त्यावर आपल्याला वेगळी चर्चा त्या धाग्यात करता येईल. इथे थांबतो कारण मुळ लेखाशी हे बरेच अवांतर आहे.

बाकी, नव्या पिढीचा असल्याने शल्य नाहि असा निष्कर्ष काढता येऊ नये मात्र त्या युद्धामुळे चिनविरोधी (किंवा एकुणच राष्ट्रवादी) अभिनिवेश मात्र ज्येष्ठ पिढिपेक्षा नक्कीच कमी आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपन माझी ही लेख मालिका जरूर वाचावी अशी माझी विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मरूस्थल म्हणजेच वाळवंट असेच लहानपणापासून शिकलो आहे.
गूगलून व शब्दकोषांतही मरुस्थल म्हणजे वाळवंटच दिसते. त्या शब्दाचे भाषांतर ओअ‍ॅसिस असे कुठे मिळाले ते समजले तर बरे होईल..
(शोधून शोधून हे सापडले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ओअ‍ॅसिस या शब्दाला मरूस्थल हा मराठी प्रतिशब्द मी खालील दुव्यावरून घेतला आहे.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%...

चू.भू.द्या. घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे मरूस्थलम म्हणजे कोरडी जमीन असा अर्थ सापडला.

माहितीपूर्ण लेख आवडला. या संदर्भात काहीच माहिती नव्हती. मला दोन प्रश्न आहेतः
१. मझर म्हणजे काय?
२. त्या काळात लाकडी पट्ट्यांवरच सर्व लेखनव्यवहार चालायचे का? का या पट्ट्या पत्रव्यवहार म्हणून वापरल्या गेल्या आहेत, प्रवासात टिकाव्यात म्हणून थोडी खबरदारी, कागद, भूर्जपत्राच्या जागी पट्ट्या असं काही? या बाबतीत काही माहिती आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या मताने मझर या शब्दाचा अर्थ कबर किंवा मकबरा या अर्थाचा आहे. अफगाणिस्तान मध्ये असलेले मझर-ई-शरिफ हे शहर सगळ्यांना माहित असेल.
त्या काळी लाकडी पाट्यांचा उपयोग शासकीय कामासाठी होत होता हे नियाच्या पाट्यांवरून दिसते. बाकी ठिकाणी जर अशा पाट्या वापरात असल्या तर त्या एवढ्या काळानंतर टिकणे शक्यच नाही. निया मधील कोरड्या हवेने त्या पाट्या टिकल्या असाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजार - समाधी ( एखाद्या संताच्या ( बुजुर्ग ) कबरीसाठी हा शब्द प्रयुक्त केला जातो

मझर / मजहर - प्रकाश / प्रकट होण्याची जागा ( जाहिर म्हणजे प्रकट , जुहूर म्हणजे सृष्टी )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओअ‍ॅसिसला मरूद्यान असा शब्द वाचल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्द यथार्थ वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाच शोधत होतो.
धन्यवाद मिहीर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हाच शोधत होतो.
धन्यवाद मिहीर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अत्यंत माहितीपूर्ण लेख. आणि ही माहिती देतानाही निया हा काय प्रकार आहे ही उत्कंठा उल्लेख करेपर्यंत राहिली होती.

असंच उत्तम लेखन वारंवार येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< अत्यंत माहितीपूर्ण लेख. आणि ही माहिती देतानाही निया हा काय प्रकार आहे ही उत्कंठा उल्लेख करेपर्यंत राहिली होती.

असंच उत्तम लेखन वारंवार येऊ द्यात.>>

अगदी असेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0