कशासाठी पोटासाठी

तर निमित्त झालं गजराचं. समीर माझी टिंगल करण्यासाठी निमित्ताला टेकलेला असतो; नाही मिळालं तर उकरून काढतो. वर म्हणे, “मी तुझी चेष्टा करण्याची चेष्टा करतो. हिंदी चेष्टा गं.” त्याचे जोक्ससुद्धा सडके असतात पण येताजाता माझं सगळं कसं नीटनेटकं, व्यवस्थित असतं यावर तो काहीतरी भंकस जोक मारायचा प्रयत्न करतो. च्यायला, स्वतः जातीचा बेशिस्त. कधी काही वेळेवर करणार नाही. मला खात्री आहे की त्याने आईच्या पोटातही आळसापोटी नऊ महिने नऊ दिवसांपेक्षा जरा जास्त वेळ काढला असणार. आपला बेशिस्तपणा लपवण्यासाठी माझ्या व्यवस्थितपणावर खार खाऊन असतो. बायकांना पीनस एन्व्ही असते असं पिल्लू फ्रॉइडनी सोडलं होतं; मला वाटतं समीरला नीटनेटकेपणाशूळ आहे.

साहेब आज मात्र ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच येऊन हजर झाले. मी टीपॉयवर सोडलेलं पुस्तक उचलून बघितलं.
"’चक्रम माणसांशी कसे वागावे!’ तुझ्या मित्रांना या पुस्तकची गरज आहे; त्याऐवजी स्वतःच का वाचते आहेस?" हं, म्हणजे प्रकरण लायनीवरच आहे तर. मी मुद्दामच त्याच्याकडे एक्स्ट्रा दुर्लक्ष केलं.
"कॉफी घेणार का?" मी बोलायला आणि गजर वाजायला एकच गाठ पडली.
"हा काय कॉफीसाठी गजर होता का?"
"नाही. कपडे बदलण्यासाठी."
"..." समीर काही बोलला नाही. पण त्याच्या डोळ्यातले अविश्वासाचे भाव, आणि किंचित 'नाही-नाही' म्हणत हलणारी मान मी बघितली.
"का, तू कधी गजर लावत नाहीस का?"
"झोपेतून उठण्यासाठी वगैरे लावतो. पण कपडे बदलण्यासाठी?"
"मी लावते... म्हणजे उशीर होत नाही. आणि तू इतक्या लवकर उगवणार हे मला काय माहीत? मी सुखात कॉफी पीत पुस्तक वाचत पडले होते, तू यायच्या आत तयार नको व्हायला?" त्याला त्यावर आणखीन सडके जोक करण्याची संधी न देता मी सरळ आतल्या खोलीत कपडे बदलायला गेले.

गेला अर्धा-पाऊण तास पाऊस लागलेला होता, म्हणजे रस्त्यावर पाणी असणार. पूर्ण लांबीचे कपडे घालण्यात हशील नाही. टेक्सासच्या वाळवंटातली खरेदी उपयोगाची होती तर. त्यातली शॉर्ट्स काढली. ही काय पावसाच्या थंडीमुळे आकुंचित झाली का काय! टेक्सासी उन्हाळ्यात सहज अंगा‌वर चढणारी ती भारतात आल्यावर का कोण जाणे मध्येच हटून बसली होती. इथलं पाणी मानवलं नाही, की टेक्सासातल्या कोणा टीशर्टाच्या आठवणींनी झुरून बारीक झाली! कमरेपर्यंत येण्यासाठी तिची बरीच मनधरणी केली.

"च्यायला समीर! परत आल्यापासून चार आठवड्यांत माझं वजन फार वाढलंय रे. शॉर्ट्स घेतली तेव्हा थोडी सैल होती. आता बुडाला, पोटाला घट्ट होत्ये. काहीतरी केलं पाहिजे."
"हट् काही दिसत नाहीये अंगावर. दोन ग्रॅम वाढीव वजनाबद्दल बोलायला तू काय सोन्याची बनल्येस का काय."

आरश्यातला आकार आरसा

पुरुष! या जमातीला काहीही समजत नाही. चारुताला हे सांगितलं तर ती लगेच विश्वास ठेवेल वर वजन कमी करण्यासाठी चार टिप्स आणि डाएट रेसिप्यासुद्धा देईल. या माठ्याला शॉर्ट्सचं बटण किती कष्टांनी लावायला लागतं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं तरीही समजणार नाही. मरो.

समीर सवयीने लिफ्टकडे वळला. "मी चालत उतरणारे. तुला हवं तर लिफ्ट वापर. वजन कमी होईस्तोवर मी लिफ्ट नाही वापरणार." त्याने प्रचंड आंबट चेहेरा केला. "सांगितलं ना तुला ..." "तू जा की लिफ्टमधून..." "बरं, ठीक आहे. तू जिंकलीस. मी पण चालतच येतो." हा निर्णय किती चुकला होता याची मला सहाव्या मजल्यावर कल्पना नव्हती.

तिसऱ्या मजल्या‌वरचा प्रसाद त्यांच्या दारातच होता. त्या खालमुंडीने माझ्या पायांचं स्कॅनिंग सुरू केलेलं मला दिसलं. बाहेर गळणाऱ्या पावसाला न्यूनगंड येईल इतपत लाळ गाळणारं त्याचं तोंड माझा चेहेरा बघून अचानक बंद झालं. तो कार्टूनमध्ये असता तर गळलेली लाळ गुडघ्यापर्यंत पोहोचून परत वर तोंडात आली असती. त्या कल्पनेने माझे दात दिसायला लागले आणि प्रसाद आणखी गोरामोरा झाला. "हाय समीर." मला नक्की कसला राग आला हे ठरवायला वेळ नव्हता. 'अच्छा, आता हाय समीर! भिकारड्या मी याच इमारतीत राहते, आत्ता मी आधी दिसले, तुझी चोरी पकडली तरीही माझ्याकडे दुर्लक्ष करणारेस काय! आणि या सम्याला कोणी सांगितलं होतं जिने उतरायला. हा प्रसाद त्याच्याबरोबर गूळ काढत वेळ दवडणार.'

"काय गं, लक्ष कुठे आहे? प्रसादच्या मसल्सकडे पहा. तो तुला व्यायामाचे सल्ले देईल की!" समीर नक्की काय बोलतोय?
“तू खरंतर अजून थोडं वजन वाढवायला पाहिजेस. आपल्या पारंपरिक भारतीय स्त्रिया बघ कशा भरलेल्या अंगाच्या असतात. खजु..." त्यानी वाक्य तोंडातून आवरलं तरी चेहेऱ्यावर सगळं दिसलंच.
"सम्या भिकारड्या, चल आता. उशीर होतोय."
"कंजूषपणा करून पैसे बुडाखाली दाबून ठेवतेस. तुला जाडी व्हायला काय वेळ लागतोय!"
"जास्त आवाज करू नकोस, बाहेर पावसाच्या पाण्यात तुला बुडवीन."
"मधुरा, खीर मी नाही तू खाल्ली असणार. ‘मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’ म्हणालीस तर तूच बुडशील. बुडावरच चढल्ये ना ती खीर, घागरीसारखं झालंय पहा."
"आपल्याकडे पारंपरिक बायका कमरेवरून घागरी भरून पाणी आणायच्या त्या किती मोहक दिसायच्या."
“माझं बूड माझ्या मागे चरायला जातं आणि माझी बदनामी करतं.”
"प्रसाद, आवर. मी इथे समोर आहे आणि घरोघरी नळ आल्येत. सम्या, तू निघणारेस मी एकटी जाऊ?" प्रसादच्या डोळ्यांतून गळणारा चिकटपणा आता मला सहन होण्यापलिकडे गेला होता. तो एरवी 'स्त्री म्हणजे मोहाची खाण' असल्या छापाचा काहीतरी बकवास बरळतो. पण समोर बाई आली की त्याचा गळेपडूपणा डोळ्यांत मावत नाही. 'संघदक्ष मुलीकडे लक्ष' असलं काहीतरी त्यांच्या संघात बोलतात त्याचं मूर्तीमंत दर्शन प्रसादकडून घडतं. पण या समीरचं काय डोकं फिरलंय.

“तू कशाला त्याला चिकटून बसला होतास? त्याला मादी प्रकारातली कोणीही चालेल, मीच कशाला हव्ये. तो घरी आला तर मी कोकिळादिदीलाही लपवून ठेवते."
"नाही, नाही. तो तुझ्याकडे खासम्‌खास नजरेनी बघतो. तुला कसं समजत नाही ते?"
"... आणि हे मला कसं समजणार म्हणतोयस? चल मुकाट. दुकानात जातोच आहोत तर डाएट रेसिप्यांचं एखादं पुस्तकही आणते. परवाच्या पार्टीसाठी काकूंकडून त्यातलेच काहीतरी पदार्थ बनवून घेता येतील."
"तू पार्टीसाठी डाएट रेसिप्या बनवून घेणार?"

या येड्याच्या काहीही शंका असतात. मी दिवसभर खुर्चीत बसून काम करते तसं हा पण करतो. आमचं सगळंच मित्रमंडळ याच प्रकारातलं. आता कोणी टीनेजर राहिलेलं नाही. सगळ्यांनीच वजनाकडे जरा लक्ष दिलं तर बिघडणारे. उपकारच करत्ये मी सगळ्यांवर.

त्या पार्टीनंतर बरेच दिवसांत समीर, चारुता आणि रोहनशी भेट झाली नव्हती. काही दिवस डाएट, व्यायाम, असले व्हॅनिलाच झाले.

परवा अचानक समीरचा फोन आला. "काय गं सिनेमाला जायचं का?"
"नको रे, खूप कंटाळा आलाय. काकू रजेवर गेल्यात म्हणून स्वयंपाक मीच करत्ये. जिममध्ये रोज चाळीस मिनीटं धावून फक्त चाळीस ग्रॅम वजन कमी होतं, ३१४ कॅलऱ्या. म्हणून डाएट स्वयंपाक. वर तिथली ट्रेनर म्हणते म्हणून वजनंपण उचलते थोडी."
तर याचं काहीतरी भलतंच सुरू झालं. "तू संसारी लोकांसारखी स्वयंपाकाचं बोलायला लागलीस की मला राँग नंबर लागलाय अशी भीती वाटते. कंटाळा आलाय तर घराबाहेर पड. तू चक्रात अडकल्येस. घरून जिम, जिममधून ऑफिस, ऑफिसातून घर. डाएटपलिकडे काही वाचलंयस का गेल्या तेवीस दिवसांत? ऑबसेस झाल्येस तू दोन ग्रॅमपोटी!"
"ऑबसेस वगैरे काही नाही. आजच सकाळी मी चमचाभर साय खाल्ली."
"तू चल आज सिनेमाला. बाहेर जेवू, सिनेमा बघू, पॉपकॉर्न वगैरे चर. बरं वाटेल तुला."

मी गेले पंचवीस दिवस मेहेनत करून दोनशे ग्रॅम वजन केलं होतं आणि त्या मेहेनतीवर एकाच दिवसात पाणी ओतायचं? कदापि नाही. समोरच्या उडप्याकडे जेवायचं या अटीवर मी सिनेमाला जायचं कबूल केलं.

पुन्हा बाहेर पाऊस गळायला लागला. घट्ट असली तरी एकुलती एक शॉर्ट्स बरी. तेवढाच अंदाज येईल वजन किती कमी झालंय याचा. मी घाबरतच ती शॉर्ट्स उचलली. सहज अंगावर चढली. ती मोठी झाली का काय!

"सम्या, वजन कमी झालं माझं. ही शॉर्ट्स आता पुन्हा नीट व्हायला लागली."
"सोन्याचा भाव कोसळला म्हणून अंगावरचं सोनं काढलं असशील तू."
"चूप. वजन कमी झालं. व्यायाम जिंदाबाद. या हवेत तळलेली सुरमई किती छान वाटेल."
"मागच्या वेळेस तुझ्या शॉर्ट्सवर भज्याचा तुकडा पडला होता ना. म्हणून शॉर्ट्स वाढली असणार."

डोळ्यासमोर सुरमईची तुकडी तरळत होती; मी समीरला माफ केलं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

सकस....!!
जिथे संस्थळचं लिहीते होते...!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जव्हेरगंज रिलोडेड

की टेक्सासातल्या कोणा टीशर्टाच्या आठवणींनी झुरून बारीक झाली!

हाहाहा हे आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0